... फक्त निर्व्याज हसू...

Submitted by नानबा on 21 June, 2010 - 23:55

मी एका लहानशा गावात वाढले. तिथे लोकांचं वागणं अघळपघळ. पहाटे फिरायला जाताना कुणी अनोळखी माणूस दोन दिवस सलग भेटला तर तिसर्‍या दिवशी तो अनोळखी राहिलेला नसणार. अशा वातावरणात वाढल्यानं की काय, पण मला समोर आलेल्या माणसाकडे बघून निर्हेतूक हसायची सवय लागलीये.
बारावीनंतर गाव सोडून मुंबईत शिकायला राहिले. पण तिथं राहूनही 'शहरात राहिल्याची' भावना काही फारशी कधी आली नाही. ट्रेन मधली समोरची बाई थोडा जरी निवांतपणा सापडला तर गप्पा मारायला लागणारच! मुंबईहून बँगलोर, पण 'नम्मा बेंगलूरू' मधल्या लोकांचा अनुभवही एकदम छान! एकदम प्रेमळ माणसं!
हे सगळं बदलल्याचं जाणवलं ते पुण्यात आल्यावर. (थांबा पूर्ण लेख वाचल्याशिवाय कसलीही मतं करून घेऊ नका!)
पुण्यात जाणवलं, समोरच्याचं आपल्याकडे खालपासून वरपर्यंत बघणं - आपली सांपत्तिक स्थिती काय आहे हे judge करत असल्यासारखं! अनोळखी माणसाकडे बघून आपण हसलो तर त्यानं भूत बघितल्यासारखा चेहरा करणं.
एकदा कंपनीच्या बस मधे शेजारी एक मुलगा बसायला आला - मी त्याच्याकडे बघून हसले, त्याला वाटलं त्याच्या मागे कुणीतरी आहे, ज्याच्याकडे बघून मी हसतेय. मागे कुणीही नाही हे कळल्यावर हसणं तर लांबच वरती 'मी?????????' असा चेहरा. मी हसून म्हणाले, 'हो, तुमच्याचकडे पाहून हसले'. ह्यावर तो अत्यंत केवीलवाणा चेहरा करून हसला.
अशा एकेक अनुभवांनंतर हळूहळू मीही असं हसणं सोडूनच दिलं - समोरचा हसत तर नाहीच, वर 'Do I know you' किंवा आणखीन वाईट म्हणजे 'काय वेडबीड लागलय का' असा चेहरा! आणि बहुतेकदा - समोरच्याकडे चुकून जरी लक्ष गेलं तरी नजर चुकवायची प्रवृत्ती (त्यामुळे हसायचा चानस बी नाय घावत!)
मात्र कंपनीच्या आवारातली हीच नजर चुकवणारी माणसं - अमेरिकेत गेल्यावर मात्र 'हॅल्लो, गुड मॉर्निंग, कसा/शी आहेस' विचारताना, हसताना दिसतात. मग आपल्याच देशात असं हसण्यात काय प्रॉब्लेम आहे बा! गप्पा मारत बसायला वेळ आहे कुणाला - पण समोरच्याकडे बघून प्रसन्न हसायला काय हरकत असावी?
(रच्याकने, मला अमेरिकेतली, समोर आलेल्या माणसाला 'काय कसं काय बरं ना' विचारायची पद्धत जाम आवडली - कदाचित मी लहानपणी ज्यात वाढले, त्या संस्कृतीला रिलेट करू शकते म्हणून असेल!)
असो, तर ह्या सगळ्या पुराणाला कारण म्हणजे कालचा कंपनीच्या बस मधला किस्सा. खूप दमलेले, कशामुळे तरी चिडचिडलेले. शेजारी एक मुलगी बसायला आली, तिच्याकडे बघून हसले तर तिनं 'राष्ट्रीय कर्तव्य' केल्याच्या आविर्भावात अर्धा इंच (का पाव?) ओठ फाकवले.
माझी स्वतःवरच चिडचिड झाली - "मी का अशा लोकांकडे बघून हसते. नाही हसले तर काही बिघडणार आहे का! हे 'युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका' नाहिये किंवा माझं गावही नाहिये जिथे लोकांनी एकमेकांकडे बघून विनाकारणच हसावं! हे पुणं आहे. कदाचित असं दुसर्‍याकडे बघून हसण्यामधेही त्यांना कसलीतरी असुरक्षितता जाणवत असावी किंवा ह्या रोजच्या धकाधकीमधे हसण्याइतके त्राणच रहात नसावेत! काहीही असो, मला नसते उद्योग कशाला पाहिजेत!"
डोक्यात हे असलं सगळं चालू असतानाच मी बसच्या खिडकीतून बाहेर बघत होते. एक दुसरी तिसरीतली पोरगी (बहुदा वडिलांच्या मागे) बाईक वर बसून आमच्या बसचं आणि आतल्या लोकांचं निरिक्षण करत होती. आमची नजरानजर झाल्यावर, लहानमुलांकडे बघून मी मजेनं जशा भुवया उंचावते, तशा उंचावल्या. ती खुदकन हसली - अर्थातच त्याचं प्रतिबिंब माझ्याही डोळ्यात उमटलं - मी तिला हातानं 'टाटा' केलं - तशी ती आणखीन गोडुलं हसली आणि मला टाटा करायला लागली - अगदी तिची गाडी पार माझ्या नजरेआड होईपर्यंत हे 'टाटा' प्रकरण चाललेलं.. गाडी पुढं गेल्यावरही तिनं मागं वळून खात्री करून घेतली की मी टाटा करतेय ना. हे सगळं घडलं एका क्षणात - पण मी दिवसभराची दगदग, थकवा, न हसणार्‍या लोकांवरचा राग सगळं विसरले.
त्या चिमुरडीच्या हसण्यानं, सकाळी गाडी काढताना आयसीआयसीआय मधल्या प्यूनचं तसलंच निर्व्याज हसू आठवलं. एकदा पाऊस असल्यानं झाडाखाली उभी असताना, एका पुण्यातल्या रिक्षावाल्या काकांनी स्वतःहून शाळेतल्या मुलांबरोबर मलाही दिलेली लिफ्ट आणि ती लिफ्ट देतानाचं त्यांचं समाधानाचं हसू आठवलं.

इतका वेळ पुण्यातले फक्त वाईट अनुभवच आठवून त्रागा करताना विसरलेले असले सगळे सगळे छान क्षण त्या एका प्रसन्न गोडुल्या हसण्यानं आठवले! जॅम झालेलं ट्रॅफिक सुटेपर्यंत घडलेल्या ह्या छोट्याशा घटनेनं माझं जॅम झालेलं डोकही नीट झालं. मला काय करायचय हे अगदी नीटच कळलं. ती चिमुरडी, तो रिक्षावाला, प्यून आणि भेटलेली अशी अनेक अनोळखी माणसं - त्यांनी दिलेला हा आनंद ठेवा मला इतरांनाही वाटायलाच हवा!
कुणाला माहिती, जसं त्या चिमणीच्या हसण्यानं माझा दिवस सार्थकी लागला तसाच कदाचित आणखी कुणाचा माझ्याही हसण्यानं लागेलं - आणि मग तीही अशीच आपल्या मैत्रिणींना सांगेल 'काय माहिती कोण होती, पण इतकी छान हसली ना.. मस्त वाटलं'.. आणि हे होईल न होईल, पण तोवर माझ्या हसण्यानं मलाच छान वाटेल हे जास्त महत्त्वाचं, नाही का! Happy

गुलमोहर: 

नानबा, सुंदर लेख.. खरचं नितांत गरज असते असल्या एकाद्या हास्याची... रखरखीत उन्हात हळूवार गारवा दाटून येतो अन भुरभुर सुरू झाल्यावर जो सुखद अनुभव वाटतो ना त्यात अन अश्या हास्यात काहीही फरत नाही. Happy

नानबा.... छान गं! आपण मस्त बिनधास्त हसायचं.... टॅक्स फ्री आहे Wink आणि त्यावर कोण काय बंदी नाही आणू शकत! समोरचा हसला - न हसला.... त्याचा प्रश्न! शेवटी ती व्यक्ती कश्या मनस्थितीत आहे, विचारात आहे, तिला हसण्यात कमीपणा वाटतो का या गोष्टी आपल्यालाही माहीत नसतात. नम्मा बंगळुरु, मुंबईमधे मलाही लोकांच्या अश्याच हास्यप्रतिसादाचे छान अनुभव आलेले आहेत. पुण्यात देखील तू उल्लेख केल्याप्रमाणे एखादे छोटुले, रस्ता झाडणारी झाडूवाली, रस्त्यावरचे एखादे वृध्द जोडपे, ओळख-पाळख नसलेल्या अनोळखी व्यक्ती, भाजीवाला वगैरे लोक आपल्याकडे बघून प्रसन्न हसतात तेव्हा किंवा आपल्या स्मितहास्याला प्रतिसाद देतात तेव्हा खरेच मस्त वाटते!

smile is the only curve which makes everything straight Happy

कळलं???? त्यामुळे हसायचं. आपलं हसू दुसर्‍याच्या चेहर्‍यावर आनंद घेऊन येणार असेल तर काय हरकत आहे हसायला?

मला पण रोजच्या प्रवासात कितीतरी असे दिसतात की चेहर्‍यावर हसू तर सोडाच पण सदैव सर्व जगाची चिंता आपणच वाहत असल्याचा आविर्भाव असतो. अशा लोकांना माफ करून टाकायचं. आपण आपला हसरा बाणा का सोडा अशा लोकांसाठी ???

smile is the only curve which makes everything straight >> एकदम सही ..निंबूडा Happy

नानबा, खूप छान लिहिलं आहेस. जनरली अशा स्वतःहून उगाचच हसणार्‍या लोकांचंच हसं होतं त्यांच्यामागे. पण त्या हसण्यातून एक निर्मळ साखळी तयार होते शीण घालवणारी, सकारात्मक दृष्टीकोनाची. तू हासलीस, की दुसरा एखादा प्रसन्न होईल, तो अजून कुणाकडे तरी बघून हसेल आणि तो अजून तिसरा आपला दिवसभराचा ताण विसरून जाईल.

Happy हे एक निर्मळ हास्य तुझ्यासाठी Happy

नानबा. मस्त. Happy
पुण्याबद्दल निरीक्षण पटलं. पुण्यात एकंदरीतच फटकुन वागायची तर्‍हेवाईक वृत्ती फार आहे, आणि मुंबईत कमालीचा कोरडेपणा, पुण्याच्या दसपट. स्नेह सुद्धा स्वीकारायची माणसाची एक मानसिक तयारी व्हावी लागते खरंच, भावनांच्या कोंडलेपणाला शिष्टाचार हे गोंडस नाव कसं पडलं असावं ?

इरा (माझी मुलगी) हसते इतकी खळखळुन, इतकी खळखळुन की तिचं हसणं टेप केलय. तिच्या हसण्याला मला मराठी भाषेत एक नवीन शब्द शोधायला हवा. Happy

नानु, मस्तच हं! मी पण हसते गं लोकांकडे बघुन असच! ईथे काही प्रश्ण नाही पण देशात आल्यावर बर्याचदा तुला आलेले अनुभव येतात.

नानबा, बरेच दिवसांनी तुझ छान लेखन वाचल. म्हणजे तु खुप दिवसांनी लिहीलस की मी वाचल हे सांगता येणार नाही. बहुदा मीच बरेच दिवसांनी वाचल असाव.

मस्त Happy

भावनांच्या कोंडलेपणाला शिष्टाचार हे गोंडस नाव कसं पडलं असावं ?>>>> आपण कुणाकडे पाहुन हसावं तर त्याने नजर चुकवुन जावे! असे बरेचदा होत.. विषेश्तः इथल्या भारतीय लोकांबाबत.

पण आज सकाळी, गाडी पार्क करुन छत्री बाहेर काढली, तो शेजारील गाडी पर्क करणारी एक ऑस्ट्रेलियन बाई तिची छत्री उंचावत छान हसली. अन म्हणाली. हो इट विल रेन टुडे! Happy मग पार्कींग ते बिल्डींग पर्यंत पोचेस्तोवर बराच वेळ गप्पा मारल्या...! ऑस्ट्रेलियातील पाउस, दुष्काळ, तिच्या घरची लॉन्..इ इ !

गुड ऑब्जरवेशन. पुणेकर लोक स्वताला खुप शाणे समजतात दुसर्‍याला तुच्छ,बामनांचे प्रमान जास्त त्यातुन! विचारायलाच नको. हसत ह्रावा.

नानबा मस्त लेख, मला खास करुन लहान मुलांकडे बघून त्यांना टाटा करायला, वगैरे खुपच आवडते.
पुढच्या किंवा बाजूच्या सीटवर, गाडीत छोटे बाळ असले, कि ते नजर चोरुच शकत नाही, परत परत ते बाळ आपल्याकडे बघणारच.

नानबा !
छान लिहिलय !
आज काल बरयाच लोकांना इतरांच्या बरोबर बोलायला,हसायला वेळ तरी कुठे असतो,असलाच तर तो मोबाईल चालु असतो ,अशात कुणीतरी आपल्या गावाकडचा,भागातला म्हणुन बोलल तर शंका,भीती चा महापुर !!

छान Happy ... मला नाहीये पण असं हसायची सवय. आणि मला राग येतो सवय नसल्याचा. पण ही सवय नाही, का स्वभाव? पण हां, एकदा ओळख झाली की मी आणि मित्र्मैत्रीणी भेटल्यावर येवढे हस्तो कि काय... फोन्॑वरही बोल्णं कमी हसणं जास्ती.. Uhoh बाकी गावावर काही नसतं.. माणुस हो. माणुस. आतल्यासहित माणुस. ;). (चोरलं टायटल!)

मस्त हं नानबा Happy
इथे ऑफिसमध्ये कुणालाही हाय हॅलो केलं (विशेषतः ज्युनिअर्स ना) तर माझा बॉस म्हणायचा --"if u treat them like friends, they won't take u seriously"!! :confused:
आणि हो, ऋयामच्या पुण्याला नाही हं काही म्हणायचं Proud

माझं गाव कोल्हापूर आहे, एक फुल;) गावात काय आहे!? आणि ज्युनिअर्सबद्दल माझंही सेम मत. तुझ्यासारखंच गं:)

एकदम छान. हलकं फुलकं लिखाण. ''हसायला पैसे पडतात का??'' हा माझा लाडका विचार.:स्मित: त्यामुळे आपण हसलो आणि समोरचा हसला नाही तर नुकसान नाही होत असं मला वाटतं! अमेरिकेतला अनुभव म्हणजे बरेच गोरे ओळख नसतानाही हसून हाय म्हणतात. छान वाटतं.

खुप सही लिहिलयस नानबा.. आवड्लं
मी पण अशीच कोणाकडे बघुनही हसते आजकाल. (हो मीच ती Happy )
समोरचा नाही हसला तर नाही, आपण हसायचं . कधी कधी त्या व्यक्तिचा गोंधळलेला चेहरा पाहुन अजुन मजा येते..
रच्याकने .. लिहित रहा.. छान लिहितेस...

नानबा..मलाही अगदी अशीच्या अशी सवय आहे Happy तू सांगितल्याप्रमाणे मुंबईत ह्या सवयीमुळे वाईट असे अनुभव नाही. शेवटी काय एवढं मोठं लागतं हसायला..दोन सेकंदाची नजरानजर आणि थोडीशी ओठांची हालचाल...मनातुन खुप खुप छान वाटायला ही किम्मत म्हणजे काहीच नाही Happy

मस्त लेख!!

Pages