बाबासाहेब,प्रणाम...

Submitted by लसावि on 8 December, 2008 - 05:41

बाबासाहेब, प्रणाम...
तुमचा महापरिनिर्वाण दिन नुकताच झाला, चैत्यभुमीवर दर्शनासाठी लोकांची रीघ लागली, पण त्यात आम्ही नव्हतो.कारण आम्ही तुमच्यापैकी नाही. दर्शन तर दुरची गोष्ट, तुमच्याबद्दल मत मांडण्याचा इतकेच काय पण विचार करण्याचाही आम्हाला हक्क नाही,
कारण आम्ही ब्राह्मण आहोत.
तुमचं कर्तुत्व काय हे आम्हाला कधी नीट कळूच दिलं गेलेलं नाही. तुमचं नाव घेताच, पहिल्यांदा आठवणार्‍या गोष्टी कोणत्या; तर घटनेचे शिल्पकार, महाडचा सत्याग्रह आणि फारफार तर पुणे करार; संपलं, शाळेतला इतिहास यापेक्षा जास्त बोलत नाही. आणि आम्ही ज्या काळात वाढत आहोत त्यात ह्या प्रत्येकाबद्दल आमच्या मनात तिरस्काराचीच भावना कशी येईल याची नीट काळजी घेतली जात आहे; थोडी तुमच्या लोकांकडून आणि थोडी आमच्या.
भारताची घटना निर्माण करणे हे मुळातच केवढ्या जिकीरीचे, जबाबदारीचे आणि अभिमानास्पद कार्य आहे. आणि असे कार्य एका मराठी माणसाने केले याचा आम्हाला खरोखरीचा सार्थ अभिमान आहे का? आम्हाला तरी आज घटना म्हटले की केवळ एकच गोष्ट आठवते ती म्हणजे आरक्षण. आणि तुम्ही आपोआप आरोपीच्या पिंजर्‍यात जाता. आरक्षणामागे असलेला सामाजिक समतेचा व्यापक विचार मागे पडतो आणि राहतो केवळ राग आणि हताशा. अशी भावना होण्यात तुमच्या लोकांचे योगदानही कमी नाही. जरा कुठे घटनादु्रुस्तीचा मुद्दा निघाला की घाऊकरित्या भावना दुखावल्याच. जणु घटना म्हणजे तुम्ही निर्मीलेली एक अस्पर्श्य रचना आहे, जसा एखादा धर्मग्रंथच.
जीवनभर प्रस्थापीत धर्माविरुद्ध लढल्यानंतर तुमच्या या महान कार्याला तशाच झापडबंद चौकटीत आपण कोंबतो आहोत याचे भान सुटले आहे.
तुमची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते, त्याला आम्ही नाके मुरडतो. तुमच्या लोकांचे हे शक्तीप्रदर्शन आम्हाला कुठेतरी दचकवते, अस्वस्थ करते. तुमच्या लोकांनाही आमची प्रतिक्रिया माहित आहे त्यामुळे वर्गणी देण्यावाचुन आमचा सहभाग अपेक्षीतही नसतो. तुम्ही फक्त त्यांचे आहात हा त्यांचा दावाच आहे. असे कार्यक्रम थोड्याफार समाजप्रबोधनासाठी वापरावेत असेही त्यांना वाटत नाही.
सरकारी कार्यालये, शाळा इ.ठिकाणी तु्मच्यापैकी आडनाव ऐकले की नकळत आमच्या कपाळावर आठी पडते, जणू ते अकार्यक्षमतेचा सबळ पुरावाच आहे. आमच्यातली किती माणसे कामचुकार आणि भ्रष्ट आहेत याचा आम्हाला विसर पडतो.याही बाबतीत तुमच्यापैकी काहींचे वागणे या समजाला खतपाणी घालणारेच असते.

एक व्यक्ती, अशक्यप्राय अडचणींवर मात करुन, अवहेलना, उपेक्षा पचवुन केवळ काही वर्षात कोट्यावधी जनतेला हजारो पिढ्यांच्या गुलामगिरीतुन सोडवते, एवढेच नव्हे तर भारतासारख्या अजस्त्र देशाचा समाजप्रवाहच बदलून टाकते, हा केवळ चमत्कार आहे. पण प्रत्येक चमत्कारानंतर ज्या नेटाने त्या चमत्कारामागचे तत्वज्ञान पुढे जायला पाहिजे ते गेलेच नाही. तुम्ही मंत्र दिला 'शिका, संघटीत व्हा आणी संघर्ष करा'. आम्ही आणी तुमचे लोकही केवळ शिकले, संघटीत होणे आणि संघर्ष करणे राहुन गेले...
शिकल्यानंतरही ब्राह्मणनिरपेक्ष विचार किंवा संस्कृती आणणे दलितांना जमले नाही, नवशिक्षीत दलितांना बरोबरीच्या नजरेने पाहणे आम्हाला जमले नाही.

अशी दरी पडायला आणी पाडायला मतांचे राजकारणही जबाबदार आहे. मराठा नेतॄत्वाने दलितांना केवळ वोट बँक याच नजरेने पाहिले, आणी आम्ही वरचढ होण्याचा बागुलबुवा दाखवुन हे सामाजिक धृवीकरण कायम कसे राहील याची काळजी घेतली.

तुम्ही सुरु केलेली क्रांती अजुनही अपुर्ण आहे,बाबासाहेब.
आणि जोपर्यंत दोन्ही समाज एकमेकाकडे पुर्वग्रह सोडून, बिगर-राजकारणी नजरेने पहाणार नाहीत तोपर्यंत ती अशीच राहील.

गुलमोहर: 

खरंच रे ! एक मित्र आहे माझा, मनोज गायकवाड म्हणुन. खुप मोठ्या हुद्द्यावर आहे पी. डब्ल्यु. डी. मध्ये.
जुळे सोलापुरात १० खोल्यांचा बंगला बांधलाय, सुबत्ता आहे घरी. पण आजही घराबद्दल सांगताना म्हणतो, " बामणासारखं घर आहे आपलं !"
ज्या उद्देशाने बाबासाहेबांनी एवढे प्रयत्न केले, आपलं सर्वस्व पणाला लावलं त्या उद्देशाचा पराभवच नाही का हा?

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

औचित्यपूर्ण लेख लिहिलास रे भो! आणि त्यात आपल्या समाजातल्या विविध घटकांत उमटणार्‍या (ढोबळ स्वरूपातील) प्रतिक्रियाही प्रामाणिकपणे नोंदवल्यास हे चांगलं केलंस. मतभेद असू शकतात, पण किमान स्वमताबद्दल प्रामाणिकपणा आणि परमताबद्दल समजूतदारपणा दाखवला तर परिस्थिती सुधारायच्या दिशेने पहिले पाऊल पडेल.

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

छान लिहिला आहेस रे लेख.. खूप लिहिण्यासारखे आहे ह्या विषयावर. तुझी मते संयत आहेत हे वाचून बरे वाटले (ह्या विषयावर बहुसंख्य जनतेची मते इकडचे नाहीतर तिकडचे अशीच असतात)

छान लिहीलेस.

खरे तर बोध्द धर्माचा उदया-अस्त अश्या टाईपचा एक लेख मी सध्या ६ डिसेंबरला धरुनच लिहीत आहे. त्यातला थोडा विचार इथे मांडतो. तूला हरकत असल्यास कळव मी डिलीट करेन. (होप, की मी तूझा लेख भरकटवनार नाही. कारण विचार थोडे वेगळे आहेत पण परिस्तिथीला सुसंगत आहेत म्हणून..)

अशी स्तिथी का आली ह्यासाठी त्या काळाचा विचार करने फार आवश्यक आहे असेही वाटते. बाबसाहेब ग्रेट आहेतच ह्यात वाद नाही. पण त्यांनी तत्कालिन हिंदू जनतेला खोटा इतिहास लिहून दूखावले हे देखील तितक्याच मोठेपने मान्य करता यावे. ती दरी तेव्हां जी निर्मान झाली ती अजुनही आहेच. भरुन काढन्याचा प्रयत्न बाबासाहेबांनाच करता आला असता पण त्यांनी तो मुद्दमहून केला नाही ह्याचाही खेद वाटतो.

उदा द्यायचे झाले तर हे वाक्य बघा, 'The Hindus’ has been a life of a continuous defeat. It is a mode of survival of which every Hindu will feel ashame';. - बाबासाहेब आंबडेकर. नुस्ते हेच नाही तर अशी अनेक वाक्ये.

हे धांदात खोटे, अभ्यासावर न आधारलेले मत आहे. पुढे ह्या मताचे खंडन सावरकर व इतर इतिहासकारांनी तर केलेच पण त्याही आधी इंग्लीश इतिहासकार स्मिथ ने केले.

ज्या धर्माचा त्यांनी पुरस्कार केला त्याला भारतातच खूप मोठा काळा इतिहास आहे. ज्यात जून्याकाळी राष्ट्रद्रोहच भरलेला आहे त्यामूळे परिस्तिथी हाताबाहेर गेली व दरी वाढतच गेली. पण त्यांचाच बुध्दीझमच्या पुस्तकात हे येत नाही. थोडे एकांगी लिहील्यासारखे वाटते. इतर समकालीन समाज सुधारकांनी त्यांना हे पटवून देन्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ऐकले नाही. ह्यातून हिंदू सुधारकांत दोन प्रवाह निर्मान झाले, गांधी-आंबेडकर भेटीने काही होईल असेही वाटत होते पण त्यात काहीच निष्पन्न झाले नाही.
त्यामूळे ही दरी निर्मान व्हावी हे आंबेडकरांचीच इच्छा होती की काय असे वाटायल लागते. त्यांना वेगळा समाजच स्थापण करायचा होता पण द्रुदैवाने ते झाले नाही.
आणी आजचे नेते म्हणजे रामदास आठवले व प्रकाश आंबेडकर निव्वळ जोक आहेत. कणा नसलेले.
आजकाल तर शिवाजी देखील ब्राम्हणांचे व इतर जातीयांचे राहीले नाहीत. फक्त मराठा.
कोण जाणे कूठे जाणार आपणं?
त. टी. इतरांसाठी
(हे त्यांचाविषयीचे अभ्यास केल्या नंतरचे मत आहे, उगाच जातीय आणि धर्मीय चश्म्यातून ते पाहू नये. )

़केदारभाऊ,तुम्ही जरुर लेख लिहा.मी वाट पाहतोय! (बौद्ध धर्माचा उदयास्त यावर डॉ.डी.डी.़कोसंबी यांचे लिखाण जरुर वाचा,कोसंबी कट्टर मार्क्स्वादी बुद्धीस्ट होते,त्यांनी या सर्व इतिहासाचा अर्थकारणाच्या दृष्टीने मागोवा घेतला आहे.)
बाबासाहेबांपेक्षाही कितीतरी जास्त प्रमाणात फुल्यांनी हिंदू देवता,चालीरिती इ. ची अत्यंत जहरी टिंगल केली आहे. एक विशिष्ट तत्वञान पुढे रेटण्यासाठी त्याच्या विरोधातील सर्व गोष्टींवर हल्ले चढवणे ही राजकीय अपरिहार्य्ता असते.त्यावेळी आपले मत कितीही असत्य अस्ले तरी ते ठासुन सांगणे हे तंत्र सगळ्याच काळात वापरले गेले आहे.फुले किंवा आंबेडकर हे शेवटी जननेते होते इतिहासतञ नव्हे.
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

मला ही वाटत त्या महाम्याच्या दर्शनासाठी जाव आणी त्यांच्या पुढे नत मस्तक व्हाव. सवर्ण असल्याने मागे थांबतो. मी लिडरशीप चे ट्रेनींग ट्रेनर या भुमीकेतुन घेतो तेव्हा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे नाव आदराने घेतो ते युगप्रवर्तक नेता म्हणुन. पण एक गोष्ट नक्की की ही व्यथा भारतातच नाही जिथे जिथे म्हणुन मानव आहे तिथे तिथे अस्प्रृश्यता हा शाप आहे. आता शारिरीक नाही पण मानसिक रित्या अस्पृश्यता आहे.

आगाऊ,
अगदी बरोबर लिहलात हो!
--------------------------------------

बामणासारखं घर आहे आपलं >> अशी मुर्ख लोकं माझ्या परिचयात सुद्धा आहेत. काय करणार, उपाय नाही.
----------------

ती दरी तेव्हां जी निर्मान झाली ती अजुनही आहेच. भरुन काढन्याचा प्रयत्न बाबासाहेबांनाच करता आला असता पण त्यांनी तो मुद्दमहून केला नाही ह्याचाही खेद वाटतो.>> १९३१ मधे हिंदु धर्म सोडण्याचा संकल्प सोडला व ५६ मधे धर्मांतर केले. या कालावधीत हिंदु नेत्यानी पुढाकार घेऊन दलिताना मानवतेची वागणुक देण्याची हमी दिली का ? नाही! म्हणजे हिंदुना द्लीताला माणुस म्हणुन वागवायचेच नव्हते. यात बाबासाहेबांचा काय दोष. २६ वर्षे वाट बघितली, पुढून काहीच प्रतीसाद मिळालेला नव्हता. उपायच नव्हता.

त्यामूळे ही दरी निर्मान व्हावी हे आंबेडकरांचीच इच्छा होती की काय असे वाटायल लागते.>> तशी ईच्छा असती तर त्यानी इस्लाम धर्माचा पर्याय निवडला असता. त्यानी तसे केले नाही त्या बद्दल हिंदुनी त्यांचे आभार मानावे.

आणि भारताच्या झेंड्यांचा रंग भगवा असावा अशी मागणी करणारे बाबासाहेबच होते. हे हि तेवढच सत्य आहे.

आगाऊ हे लिहायला, स्वतःशीच कबूल करायलाही धाडस लागते. अभिनंदन .
आज कायद्याने अस्पृश्यता गेली असली तरी आपल्या मनातून गेलेली नाही.
साधना दिवाळी अंकात महाराष्ट्राची शोधयात्रा वाचली...कोकणातल्या आमच्या गावाशेजारच्या थोड्या मोठ्या गावाचा उल्लेख आहे त्यात्..दलित आमदार झाला तरी त्याला देवळात सन्मानाने प्रवेश नाही. दलित प्राध्यापकांना भाड्याने जागा मिळत नाही. आमच्या गावात दलितांना देवळात वर्षात एकच दिवस देवळात प्रवेश असे, त्यानंत देऊळ शुद्ध केले जाई....आता काय स्थिती आहे माहीत नाही....
आमच्या कार्यालयात संक्रातीचा तिळगूळ कचर्‍याच्या डब्यात टाकला गेला...
आमच्या कॉलेज मध्ये आरक्षणावर वाद विवाद स्पर्धा होती..त्यातला हा एक मुद्दा....
आरक्षण घेऊन डॉक्टरकी पास झालेल्यांच्या ज्ञानाची खात्री नाही.(पास होण्यासाठी पण 'त्यांना' जादा गुण देतात?). पण कॅपिटेशन फी देऊन आणि परीक्षकांना पैसे चारून पास झालेल्या धनदांडग्याच्या पुत्राच्या कुवतीबद्दल आणि प्रवृतीबद्दल शंका नाही (त्याच दिवशी निलंगेकरांनी आपल्या मुलीला मेडिकलच्या परीक्षेत पास होण्यासाठी काय उपद्व्याप केले त्याची बातमी आली होती).

आणखी एक वेगळे निरीक्षण - शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अनुसूचित जातीच्या कर्मचार्‍यांना संघटित करण्याचा प्रयत्न अगदी जोरात चालतो (अगदी त्याला कंपूशाहीचा रंग येईतो), पण पुढे त्यांचे कार्य बाबासाहेंबाच्या नावाने चांगभले करणे..त्यांचे उत्सव करणे यापलीकडे जात नाही....आपल्याला मिळालल्या संधीचा फायदा आपल्याच तृषार्त बांधवांना देण्यासाठी किती जण प्रयत्न करतात्..अगदी संघटना असूनही. आम्ही कार्यालयात गणेशोत्सव साजरा करायचो...त्यात प्रसादाला मिठाई म्हणण्याचा प्रकार पाहिला, प्रत्यक वेळी असे फटकून वागण्याची गरज काय ....एकमेकांच्या घरी जाणे...एकत्र लंच करणे हे सगळे झाल्यावर?

.आपल्याला मिळालल्या संधीचा फायदा आपल्याच तृषार्त बांधवांना देण्यासाठी किती जण प्रयत्न करतात्..>>> माझ्या काकांच्या भाषेत सांगायचे तर उच्चशिक्षित दलित लोक त्यांच्यातले ब्राह्मण होतात.ते स्वतःला मागास दलितांपासुन तोडुन टाकतात.

अगदी छान लिहीलयस नेमक्या शब्दात
१४ अप्रिल च्या निमित्ताने आंबेडकर कार्य समितीच्या एका कार्यत्याची मुलाखत ऐकायला मिळाली,
खरच बाबासाहेबांच्या दुरदृष्टीला सलाम करावासा वाटतो, १९३६ साली कुट्म्बनियोजनाविषयी त्यांनी लोकांना जागृत केल होत. र.धो.कर्व्यांना पण ह्या गोष्टीचा प्रसार केल्यामुळे अटक झाली होती Uhoh
तेव्हा त्यांच्या बाजुने बाबासाहेबांनी खटला चालवला होता

हा लेख मिसला होता. अतिशय संयतपणे लिहिलंस.
आंबेडकरांना अभ्यासण्यापासून आम्हाला तोडतो तो अनेकदा समोर आलेला द्वेष आणि रागच एवढं नक्की.

आमचे काय कमी नाहीत हे तर आहेच.... त्यांच्या तर मुळातल्या कंम्फर्ट झोनवर घाव घातला गेलाय. तेव्हा विरोधी प्रतिक्रिया येणारच पण तो विरोध किती काळ आणि का करायचा याचं तारतम्य संपलंच आहे.
हेच बर्‍याच अंशी समोरून..
तात्पर्य काय अजूनही आपण सगळे समोरासमोर उभे ठाकलेलोच आहोत.. एकत्र नाहीच झालेलो...

१९३६ साली कुट्म्बनियोजनाविषयी त्यांनी लोकांना जागृत केल होत. धोंडो केशव कर्व्यांना पण ह्या गोष्टीचा प्रसार केल्यामुळे अटक झाली होती
>> हो ध्यासपर्वमधे ह्याच उल्लेख येतो, किंबहुना संजय मोनेने केलेली आहे ही भुमिका,बाबासाहेब आंबेडकरांचा हा द्र्ष्टा पैलु खुप आवडला होता आणि त्यांच्याविषयी आदरही वाढला.
मी गांधी -नेहरु द्वेष्टी नाही, पण र धो कर्व्यांच्या कुंटुंबनियोजन/संतती नियमन कार्याला त्यांनी मदत तर केलीच नाही पण विरोध केला ह्याचा खुप राग आला होता सिनेमा पाहिल्यावर.
विषयांतराबद्दल क्षमस्व पण दलित बायकांना खुप बांळंतपणाच्या चक्रातुन सोडवल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही, हे त्यांना जितके कळले होते तितके त्यांच्यानंतरच्या कुठल्याच दलित नेत्याला कळलेले नसावे, कारण मला तरी ह्या क्षेत्रात कुठलाच दलित नेता काम करताना दिसला नाही.

बरं झालं लेख पुन्हा वर आला.
खुप छान.

स्मिता- धोंडो केशव कर्व्यांना की रधोकर्व्यांना अटक झाली होती गं?

नितिनचिंचवड, हा लेख वर आणल्याबद्दल आभार!
आगाऊ, तुमचे आधीचे काही विशेषतः WTC च्या जागी मशीद ह्या बीबी वरील विचार वाचले की माझ्या वडिलांची आठवण येते. त्यांना हे वाचायला द्यायला हवं... ditto त्यांचे विचार... तेच "आगाऊ" असा आयडी बनवून लिहितायत का असं वाटतं... पण त्यांचं computer exposure इतकं नाही, त्यामुळे ही शक्यता मोडीत निघते...
ह्या लेखाच्या निमित्ताने आवर्जून सांगावंसं वाटतं, मी ब्राह्मण आणि दलित ह्या दोन्ही समाजांचं प्रतिनिधित्व करतेय. कोणत्यातरी एका समाजाचा भाग असंण, मग तो 'वर'चा असो, नाही तर 'खाल'चा... त्यात जी belongingness ची सुखावह भावना असते, ती मला कधीच अनुभवायला मिळाली नाही... आमची अवस्था 'ना घरका ना घाटका' अशीच. सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने आईवडीलांनी उचललेले पाऊल आम्हाला बर्‍यापैकी मानसिक अस्वस्थता आणि अस्थिरता देते आहे आजही... बाबासाहेबांविषयी प्रेम आणि ब्राह्मणी समाजाविषयी आपलेपणा हे एकाचवेळी जमणे जिथे 'आमच्यासारख्यां'ना टोकाचे अशक्य वाटते, तिथे 'तुमच्यासारख्यां'ची काय कथा...

अरे, या लेखाचा अचानक पुर्नजन्म कसा झाला? Happy
माझं सर्व शालेय जीवन घरात शहरी-ब्राह्मणी वातावरण आणि बाहेर ग्रामीण;दलित-मराठा-मुस्लिम मित्र असं गेलं त्यामुळे दोन्ही परस्पेक्टीव्ह्ज अनुभवायला मिळाले हे माझं नशिब.
@ सानी, तुमच्या वडिलांना भेटायला नक्कीच आवडेल मला

>>>> १९३१ मधे हिंदु धर्म सोडण्याचा संकल्प सोडला व ५६ मधे धर्मांतर केले. या कालावधीत हिंदु नेत्यानी पुढाकार घेऊन दलिताना मानवतेची वागणुक देण्याची हमी दिली का ? नाही! <<<< Lol
बाळा, याच दरम्यान १९४८ येऊन गेल रे भो! याच दरम्यात पत्री सरकारच्या व अन्य नावाखाली कम्युनिस्टान्चा चन्चूप्रवेश सुरू झाला होता ज्याचे फलितस्वरुप १९४८ झाले, नथुराम केवळ निमित्त!
आता येवढे मोठ्ठे कार्य चालू अस्ताना, यान्च्या धर्मान्तराच्या सन्कल्पचा कोण विचार करतो??? Wink
त्यातुनही मी तर उलटे विचारेन की १९३१ ते १९५६ इतका वेळ का लागला सन्कल्प पूर्ण करायला? की सत्तेचाळीसची निर्वासितान्ची अन अठ्ठेचाळीसची ब्राह्मणान्ची गत बघितल्यावरच या सन्कल्पाला जोर आला? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही! Happy

माझं सर्व शालेय जीवन घरात शहरी-ब्राह्मणी वातावरण आणि बाहेर ग्रामीण;दलित-मराठा-मुस्लिम मित्र असं गेलं त्यामुळे दोन्ही परस्पेक्टीव्ह्ज अनुभवायला मिळाले हे माझं नशिब.
>> अगदी असच नाही, पण सुरवातीला लहानपणी ते (ह्यात अनेक धर्म जाती ,दुसर्‍या प्रातांतले,देशातले सगळेच आले)वाईटच आणि आपणच चांगले अशी black & white शिकवणुक अप्रत्यक्षपणे मिळाली, सुदैवाने late teenage मधे कधी जिवंत माणसे तर कधी पुस्तकांच्या माध्यमातुन अनुभवविश्व सम्रुध्द होत गेले आणि स्वतःच्या स्वतःलाच जाणवले छ्या काहीतरी चुकतय , पुढे नोकरीच्या निमित्ताने तर अठरापगड जातीची /धर्माची/प्रांतातली इतकी माणस भेटली तेव्हा खाडकन डोळे उघडले आणि जाणवले किती पुर्वग्रहदुषित होती सगळी विचार करायची पध्दत .किंबहुना आप्ले म्हणुन एखाद्याच्या जवळ जावे तर त्याचा वाईट अनुभव आणि ही व्यक्ती आपल्यातली नाही म्हणुन एखाद्याशी तुटक वागायला जावे तर नेमकी तीच व्यक्ती चांगली निघावी असे तर फार व्हायचे सुरवातीला.

छान लिहिलं आहेस आगाऊ,

पात्रता असूनही बाबासाहेब समस्त समाजाचे वा देशाचे नेते होऊ शकले नाहीत ही एक शोकांतिकाच आहे.
दलितेतर तर बाबासाहेबांकडे दलितांचे नेते म्हणून बघतात, पण दलितांमध्ये मात्र प्रामुख्याने फक्त महारांचे नेते म्हणून बाबासाहेबांकडे पाहिले जाते, मातंगांचे वगैरे नाही. महारांमध्येही भीमरावांची लेकरे वेगळी आणि येशूबाप्पाची लेकरे वेगळी...

छान लिहिलं आहेस आगाऊ,

सर्वच युगप्रवर्तक नेत्यांच्या नशीबी हे दुर्दैव आले! त्यांच्या अनुयायी म्हणवल्या जाणार्‍यानीच त्यांना एका चौकटीत बंदिस्त केले. त्याहीपेक्षा त्यांना देवाचाच दर्जा देऊन त्यांचे अनुकरण करण्यापासुन पळवाट शोधली. आता केवळ उत्सव साजरे होतात अन विचार विसरले जातात, त्यामुळे विचारांचे आचरण करण्यापासुन सुटका झालीय.

नितीन, निधप, एआरसी, भरत, जीएस... यांनी दिलेले अनुभव पुरेसे बोलके आहेत.

लेख अतिशय आवडला, वेगळा विषय... आपल्याकडे दोनच गट आहेत एक बाबासाहेब अनुयायी आणि दुसरा बाबासाहेब विरोधि

नथुराम केवळ निमित्त!>>>>
अरेरे, गरज संपली की फेकून देण्याचे एवढे भयानक उदाहरण फार कमी वेळा वाचायला मिळते Sad
४८चे ब्राह्मणविरोधी दंगे कम्युनिस्टांमुळे झाले हा विनोदी शोध तर पहिल्यांदाच वाचला,आणि त्याचा व धर्मांतराचा लावलेला पाट तर एकदम बादरायण.

प्रतिसाद आगाऊ | 8 June, 2010 - 04:57
अरे, या लेखाचा अचानक पुर्नजन्म कसा झाला?
आगाऊ, तुमची मेल वाचली आणि तुम्ही केलेल लिखाण वाचायचा मोह झाला. मी २०१० पासुन मायबोलीवर आहे त्यामुळे लिखाण वाचनात नव्हत. प्रतिसाद लिहीताना मुळ लेख कधी लिहीला हे बघायच विसरलो आणि हा लेख वर आला. अर्थात तुमचा लेख कालबाह्य नाही त्यामुळे पुन्हा प्रतिसाद दिसु लागले.

लिंबुटींबुंच्या मते हिंदुंनी बाबासाहेबांच्या इशार्‍याला सकारात्मक प्रतिसाद देत अस्पृश्यता नष्ट करण्याचे का नाही ठरवले ? बाबासाहेबांनाही हेच अपेक्षीत असावे. पण आजही हिंदुधर्म हा एका धर्मग्रंथाने वा फतव्याने नियंत्रीत होणारा नाही. अर्थात शंकराचार्यांनी हा प्रयत्न करायला हवा होता जो झाला नाही. कसा होणार चारही प्रमुख पिठाचे शंकराचार्य प्रथम १९६० साली एका व्यासपिठावर आले ते प.पु गुरुजींच्या प्रयत्नातुन. १००० वर्षांच्या चुकीच्या पायंड्यांना विरोध करणार्‍यांना समाज वाळीत टाकत असे.

जे झाल त्याची जाण फक्त सावरकरांनी ठेवली व पतीतपावन मंदीरात सहभोजनाचे कार्येक्रम केले. हा प्रयत्न अगदिच तोकडा होता. कुणी धर्म मार्तंड सावरकरांच्या बाजुने बोलले नाहीत. अन्यथा ही दरी गेल्या काही वर्षात कमी होताना दिसली असती.

पण वेळ गेलेली नाही. ज्यांना ही दरी संपावी असे वाटते त्या सर्वांनी असे प्रयत्न केले तर नक्की हा शाप पुसला जाईल.

संपुर्ण लेख आवडला. मी पुन्हा शांतपणे वाचणार आहे... अगावांच्या लेखाला वर आणल्यबद्दल नितीनला धन्यवाद.

तुम्ही सुरु केलेली क्रांती अजुनही अपुर्ण आहे,बाबासाहेब.

लिम्ब्याने नेहमीप्रमाणे आपले निरर्थक आणि असंबद्ध पोस्टिंग केले आहे. १९४८ ला घडले ते स्वाभाविक प्रतिक्रिया होती. कितीही वाईट असली तरी. या प्रतिक्रियेचा विचार नथुराम आणि कम्पनीने करणे आवश्यक होते.पत्री सरकारचा आणि त्याचा काय संबंध ? आणि कम्युनिस्टांचा ही? अजूनही चुकले कोठे याचे आत्मपरिक्षण करण्याची इच्छा नाही.

Pages