जळतो आजही तुझ्याशिवाय!

Submitted by नंदिनी on 27 May, 2010 - 01:58

सकाळचे सात साडेसात वाजले असतील. पहाटे पहाटे धुक्याच्या मिठीत असलेलं हे शहर नुकतंच कुठे जागं होतय. सुटीचे दिवस असल्याने शाळकरी मुलं, कॉलजकट्टे पण अजून जागे झालेले नसतील. डिसेंबरमधली थंडी माझ्या अंगाला मात्र जाणवतेय.

उन्हाचा एखादा चुकार किरण जमिनीवर येतोय. हळदी रंगाचे रस्त्यावर पडलेले कवडसे. रस्त्याच्या आजूबाजूला घनदाट झाडं. आणि त्यातून येणारे ते निरनिराळे पक्ष्यांचे आवाज. एखाद्या स्वर्गासारख्या शांत ठिकाणी आल्यासारखं मला वाटतय. चार पावलावर पुढे माझा नुकताच झालेला नवरा चालतोय.

अंगाभोवतीची शाल मी अजूनच गुरफटवून घेतली. मला थंडीची अजिबात सवय नाही. नवरा माझ्याकडे बघून हसेल. हसू देत... त्याला या थंडीची लहानपणापासून सवय. त्याचं बालपण या शहरात गेलं. पुढे मुंबईत शिक्षण आणि नोकरी करताना सुद्धा या शहराशी त्याने नाते जोडून ठेवलंय. लग्नानंतर अवघ्या तीन दिवसानी तो मला इथे घेऊन आला. सुरूवातीला मी थोडी नाराज होते. "असल्या शहरात काय हनिमूनला यायचं म्हणून.." पण इथे आल्यावर मात्र खरंच खूप छान वाटलं. चार दिवस कसे गेले कळलंच नाही.

रोज नवर्‍याचा एखादा मित्र भेटतो. रोज कुठेतरी फिरायला जायचं. नवरा लहानपणी जिथे जिथे भटकायचा खेळायचा हुंदडायचा अशी ठिकाणं बघायची. त्याच्या विविध खोड्या ऐकायच्या. नवर्‍याच्या लहान्पणीच्या नात्याशी माझं नातं जुळत होतं. गेले तीन वर्षे आपण ज्याला आपला "माणूस" म्हणून ओळखतो त्याची अजून पण दुसरी एक बाजू असू शकते, त्याचं दुसरं आपल्याला माहित नसणारं एखादं रूप असू शकतं हे समजूनच फार मजा वाटतेय.

आत्ता एवढ्या सकाळी सकाळी तो मला एका टपरीवर घेऊन चाललाय. त्या टपरीवाल्याकडे म्हणे "जगातली सर्वात सुंदर कॉफी" मिळते. खरंतर मी चहाबाज. पण इतक्या सकाळी या शहरातून फेरफटका मारणं हे देखील एक अद्भुत गोष्ट आहे. म्हणूनच मी इतक्या लवकर बाहेर पडायला तयार झाले, एखाद्या घरट्यासारखं छोटंसं शहर. सकाळची बोचरी थंडी हळू हळू ऊबदार बनत जाते आणि संध्याकाळी परत गारव्याची शाल पांघरून झोपी जाणारं.

अजून पंधरा मिनिटे चालल्यावर ती टपरी आली. खरंतर एक छोटंसं हॉटेल. समोर चार टेबलं आणि खुर्च्या. गरमागरम कॉफी आणि इडलीचा वास. हॉटेलमालकाची लगबग चालू आहे. नवर्‍याला त्याने बरोबर ओळखलं आणि सर्वात आधी दोन कॉफीचे भलेमोठे मग समोर आणून ठेवले.

"एवढी?" माझ्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला.
"ह्म्म.." नवरा आजूबाजूला बघण्यात मग्न..

एवढ्यात बाजूच्या टेबलवर एक माणूस येऊन बसला. असेल पस्तिशीचा. भकास डोळ्याचा. विस्कटलेल्या केसाचा आणि गबाळ्या वेषाचा. नवर्‍याने त्याला हाक मारली. त्याचं लक्ष नव्हतं. परत नवर्‍याने हाक मारली.

"डॅनी,,,"

त्याने आमच्या टेबलकडे वळून पाह्यलं. आधी नवर्‍याकडे मग माझ्याकडे. तो हसला. ओळख असून नसल्यासारखा.

"मी तिला मारली नसती.. माझ्यासोबत कशीपण राहिली असती... " आणि तो उठून निघून गेला.

मला काही समजलं नाही. नवर्‍याला विचारलं.. तर त्याने त्याची अख्खी कथाच सांगितली.

=================================================

त्या शहरामधे वातावरण तसं कर्मठच.त्यातून काळ दहा बारा वर्षापूर्वीचा. बाजूच्याच्या घरात आमटीला फोडणी कधी पडली इथपासून ते गावाच्या दुसर्‍या टोकाला असणार्‍या सुमीला गणितात किती मार्क पडले याची इत्यंभूत माहिती ठेवणारं शहर. गावामधे एकच चित्रपटगृह. तीन चार शाळा आणी एकच कॉलेज. त्यामुळे कोण कुठे काय कसे हे सर्वाना समजणारं.

अशा शहरात जातीपातीमधले वातावरण अजूनच कडक. त्यात परत ब्राह्मण गल्ली, सोनार गल्ली, सुतार गल्ली अशा गल्ल्याच त्या त्या जातीला वाहिलेल्या. अर्थात वाढत्या गर्दीमुळे काही लोकाचे टुमदार बंगले पण होतेच गावामधे. नविन उठलेल्या या हाऊसिंग सोसायटीमधे ही छान छान घरे बांधली होती. अशाच घरामधे बाजूबाजूला रहायचे देशमुख आणि सिक्वेरा कुटुंबं.

देशमुख मूळचे विदर्भाकडले, आणि सेक्वेरा उडुपीचे. इकडे नोकरीला म्हणून आले आणि इथेच स्थायिक झाले. त्याची मुलं इथेच शिकली आणि वाढली. त्याची लग्नं पण इथेच झाली. आणि इथेच त्याचे संसार वाढले. सेक्वेराचा डॅनियल आणि देशमुखाची पूजा मधे फार फार तर तीन चार महिन्याचा फरक असेल. दोघं एकत्र खेळायची, शाळेत एकत्र जायची.... अगदी दृष्ट लागावी अशी मैत्री होती दोघाची.

अठरा वीस वर्षं तरी त्या मैत्रीमधे काही वावगं आहे असं कुणाला वाटलं नाही. पहिलं वादळ आलं ते देशमुखाच्या घरात. पूजाने जेव्हा स्पष्टपणे सांगितलं की तिला डॅनीबरोबरच लग्न करायचं आहे.

डॅनीच्या घरात वादळाचा दुसरा तडाखा बसलाच तोपर्यंत. एकच जमेची बाजू होती. दोन्ही मुलानी आपापाल्या घरी सर्व प्रकरणाची कबूली दिली होती. "पळून जाणे" वगैरे प्रकार दोघानाही पसंद नव्हते. शिक्षण संपून नोकरी लागताच दोघं लग्न करणार होते. घरातल्याची संमती असो वा नसो.

देशमुखाच्या घर हे "मुलीचे घर" असल्याने तिथे मारहाण, मुलीला कोंडून ठेवणे वगैरे सर्व प्रकार झाले. हळू हळू गावामधे या प्रकाराची वाच्यता होऊ लागली. प्रकरण जास्त शेकायच्या आधी यातून काहीतरी राजरोस मार्ग काढणे उत्तम असे घरातल्या सर्वाचे मत झाले. प्रश्न फक्त धर्माचाच नव्हता, सांपत्तिक स्थितीचा पण होता. पूजा एकुलती एक मुलगी होती. तिच्या काकाला तर मूलबाळ नव्हतंच. काही नाही तरी वीस पंचवीस लाखाच्या इस्टेटची ती वारस होती.

सीक्वेराच्या घरातलं वातावरण थोडं वेगळं होतं. त्याना पूजा पसंत होती. नापसंद करण्यासारखं काही नव्हतंच तिच्यामधे. प्रश्न फक्त धर्माचा होता, आणि तेवढी तडजोड त्याना मान्य होती.

देशमुखाच्या घरात रोज पूजाच्या गैरहजेरीत चर्चा व्हायला लागल्या. शेजार्‍याना काही समजू न देता कुणाच्या कुणाच्या गाठीभेटी, फोनाफोनी चालू झाली. आणि एक दिवस पूजाच्या बाबानी पूजाला जवळ बसवून घेतलं आणि प्रेमाने समजावलं.

ते पूजाच्या आणि डॅनीच्या लग्नाला तयार होते!!! अट फक्त एकच होती. त्याना लग्न हिंदू पद्धतीने करून द्यायचं होतं.

पूजा खुश झाली. धावत डॅनीला जाऊन तिने सांगितलं. डॅनी खुश झाला, त्याच्या घरचे खुश झाले, त्याना अट मान्य होती.

मुहूर्त काढण्यासाठी डॅनीची जन्मपत्रिका बनवून घेतली. ती पत्रिका पूजाच्या पत्रिकेसोबत जुळवून घेतली.

आणि पुन्हा एक वादळ घरात आलं. पूजाला कडक मंगळ होता. तिचं लग्न जर डॅनीबरोबर झालं असतं तर वर्षभरात डॅनी मेला असता!!!

आता निर्णय पूजाच्या हातात होता. डॅनीला हे सर्व अर्थातच मान्य नव्हतं.. पण पूजा भोळी बिचारी... तिने स्वतःच्या आनंदापेक्षा डॅनीचे आयुष्य आस्त महत्वाचं मानलं आणि लग्नाला नकार दिला.

अवघ्या दोन आठवड्यात देशमुखानी पूजाचे लग्न पुण्यामधे एका इंजीनीअरबरोबर लावून दिलं.. गुपचुप. डॅनीला आणि त्याच्या घरच्याना समजू न देता. लग्नामधे काही गोंधळ होऊ नये म्हणून.

पूजा, पूजाचा नवरा आणि तिची सासू असा तिघाचा संसार चालू झाला. पूजाच्या पूर्वायुष्याबद्दल थोडीफार कल्पना त्याना पण होती. म्हणूनच भरपूर हुंडा घेऊन मगच ते लग्नाला तयार झाले होते. पूजाच्या खुशीसाठी घराण्याच्या इभ्रतीसाठी देशमुखानी त्याना हवं ते दिलं होतं. अजून द्यायची तयारी होती.

लग्नानंतर पूजा कधीच माहेरी आली नाही. तिचे आईवडिल तिला भेटायला जायचे. पूजा त्याच्याशी कधीच बोलायची नाही, कधीही गेले तरी झोपलेलीच असायची. जागी असली तरी तारवटलेली असायची. पूजाच्या आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. पण नवर्‍यासमोर काय बोलणार? पूजाचे वडिल आपला प्लॅन किती कामयाब झाला हे बघून खुश होते. मुलगी काय आज ना उद्या बोलेल आपल्याशी. करेल हळू हळू संसार...

तिला भेटायला गेले की काहीतरी महागडी गिफ्ट आणि सोन्याचा दागिना घेऊन जायचे. तिच्या नवर्‍याला आणि सासूला खुश ठेवण्यासाठी!!!

गावामधला बंगला पूजाच्या नवर्‍याने तिच्या नावावर हट्टाने करून घेतला. पूजाच्या नावावर असलेला सर्व पैसा, इस्टेट हळू हळू तिच्या नवर्‍याच्या नावावर झाली. आणि एक दिवस पूजाच्या गावी फोन आला.

"तुमच्या मुलीने आत्महत्या केली.." संपलं!!! सगळंच संपलं!!!

देशमुख पुण्याला जाईपर्यंत सर्वच संपलं होतं. पूजाची राख मिळाली त्याना. तेवढे घेऊन परत आले. काय झालं. कसं झालं. प्रत्येक प्रश्नाची उत्तरं पूजाच्या नवर्‍याकडे होती. पोलिस पण आत्महत्या म्हणून मोकळे झाले. मानलं नाही ते फक्त पूजाच्या आईचं मन..

आणि मानलं नाही ते डॅनीचं मन. पूजाचं लग्न झाल्यापासून पूजाला विसरण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले. पण पूजाच त्याला सोडत नव्हती. सारखी स्वप्नात यायची. घरामधे, अंगणामधे फिरताना दिसायची. कुठे का असेना ती खुश आहे ना.. हाच विचार त्याच्या मनात कायम असायचा.

आता पूजा नाही, या जगातच नाही, कुठेतरी लांब गेली.. त्याला सोडून, त्याला एकटं एकटं सोडून. आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाची आठवण जिच्या नावासोबत होती तीच आता त्याच्या आठवणीत राहिली.

त्याने तिचं ऐकायला नको हवं होतं.. तिला पळवून न्यायला, जबरदस्तीने कसं पण घेऊन यायला हवं होतं. त्याने तिला खूप खुश ठेवलं असतं. किमान तिला जिवंत ठेवलं असतं... तिला मारलं तरी नसतं. त्याचं प्रेम होतं तिच्यावर. पूजाचे भलं हवं असणारे लोक नेमकी हीच गोष्ट विसरले होते... दहा बारा वर्षं झाली तरी तो अजून असाच फिरतो. शहरामधे काही लोक त्याला वेडा म्हणतात. मानसिक रूग्ण म्हणतात. तरी तो तसाच भकास डोळ्यानी फिरतो... पूजासाठी.

=================================================

समाप्त.

गुलमोहर: 

सत्य घटना म्हणून चर्चा करायला ठीक, पण माफ करा , कथा , साहित्य म्हणून यात काही मूल्य दिसत नाही. शुभेच्छा पुढील लिखाणाला!

छानच लिहीलं आहे नंदिनी......... वाचुन खुप वाईट वाटले.

प्रभात रोड वर आलिशान घर असलेले आणि मुलीने आणि जावयाने सगळे आपल्या नावावर करून घेतल्यावर हाकलून लावले आहे , एक आजोबा कमला नेहरू पार्क च्या आस पास दिसतात . लोक त्यांना वेडा म्हातारा म्हणतात , त्यांची गोष्ट त्यांच्याच मुलीच्या मैत्रिणीने मला सांगितली. असे वेडे नेहमी दिसतात ,कथेतल्या पत्राबद्दल वाचून आठवले. त्यांच्या अशा अवस्थेचे कारण आपल्याला माहिती नसते आणि आपण उगाच हसे करून टाकतो न त्यांचे?

फार छान लिहिले आहेस नंदिनी . कथेला न्याय मिळाला आहे.

छान लिहीलं आहे नंदिनी ! सीक्वेरा , सिक्वेरा आणि सेक्वेरा तीन वेगळी आडनावे आहेत कथेत. ती ठिक करशील.

मारणारा मारतो, चारचौघात उजळ माथ्याने - कोरड्या काळजाने हिंडतो, ज्याचं कुणी आपलं माणूस गेलं तो मात्र आयुष्यभर ती जखम उरी बाळगून घायाळ मनाने वणवण भटकत राहातो.....

सकाळमध्ये ''स्टोव्हच्या स्फोटांमध्ये भाजून मृत्युमुखी पडणार्‍या विवाहिता स्त्रियांचे प्रमाण'' लक्षणीय रीत्या जास्त आहे, ते का व कसे ह्याची मीमांसा आली होती.... त्याची पुन्हा एकवार आठवण झाली!

मन अस्वस्थ झालय..........
मनाला चूट्पूट लागली आहे........

हम्म.... Sad

पालक आप्ल्या पोटच्या पोरीचे असे कसे हाल करु शकतात?? आपल्याच मुलीची फसवणुक केवळ समाजात नाक कापल जाऊ नये म्हणुन??? आणि शिकलेल्या मुलीही अश्या परिस्थितीत गप्प का बसतात आणि अन्याय का सहन करुन घेतात? हा मला नेहमीच पडलेला प्रश्न.

दोन आयुष्य बरबाद Sad

मला त्या पालकांचा भयाण राग आलाय. आपल्या इभ्रतीसाठी (तीही खोटी) त्यांनी मुलीचा बळी दिला. त्यांना पालकही कसले म्हणायचे?? ज्यांना मुलगी कशी आहे हेही कधी तिला विचारावेसे वाटले नाही. तिच्या सासरच्यांना वेळोवेळी पैसे देऊन खुष केले की ते आपल्या मुलीला सुखात ठेवणार हा विचार करुन त्यांनी तिच्याकडे पाठ फिरवली???

आता ह्या उद्ध्वस्त होऊन फिरणा-या डॅनीकडे पाहुन त्यांना चुटपुट वाटत नसेल की आपली मुलगी याच्याबरोबर सुखात राहिली असती म्हणुन?? की मुलीच्या सुखाचा विचार करायची पद्धतच नाहीये समाजात???? Sad

आणि शिकलेल्या मुलीही अश्या परिस्थितीत गप्प का बसतात आणि अन्याय का सहन करुन घेतात? हा मला नेहमीच पडलेला प्रश्न.

ती मुलगीही बेअक्कल निघाली. आपल्या बाबाला ओळखु शकली नाही Sad

सत्य ! Sad

''स्टोव्हच्या स्फोटांमध्ये भाजून मृत्युमुखी पडणार्‍या विवाहिता स्त्रियांचे प्रमाण'' लक्षणीय रीत्या जास्त आहे, ते का व कसे ह्याची मीमांसा आली होती>>>>. कानोकानी मध्ये लिंक दिली आहे

पहिल्या भागातील, नवर्‍याने बायकोला आपल्या मुळ गावी फिरायला नेणे ही कल्पना आवडली. नवर्‍याचा स्वभाव/मानसिकता समजायला बायकोला अन बायकोचा स्वभाव/मानसिकता समजायला नवर्‍याला अश्या एकमेकांच्या गावी दिलेल्या भेटी नक्कीच भन्नाट आयडिया ठरेल. ज्यांची बालपणे बदलीच्या गावी झालीत त्यांना अनायसे महाराष्ट्र/भारत दर्शन-कम-हनीमुन असा योग येईल.

Pages