ही घटना माझा मुलगा राजस ६ महिन्यांचा असतानाची आहे. त्या दिवशी मी ऑफिसमधून थोडासा लवकरच (रा. ०८:३०) घरी आलो होतो. घरातला सीन नेहेमीसारखाच होता. म्हणजेच घरात झी मराठीवर डेलि सोप चे दळण चालू होते. माझे बाबा ऑफिसमधून घरी आलेले होते आधीच. माझी आई राजसशी खेळण्यात मग्न होती. तो पण तिच्या मांडीत बसून मस्ती करत होता. त्याचा अनुप काका (माझा धाकटा भाऊ) बेडरुम मध्ये बसून C.A. चा अभ्यास करत होता. आणि आप्पा (माझे आजोबा - वय वर्षे ८७) त्यांच्या खोलीत काहीतरी अध्यात्मिक वाचन करत होते. तो दिवस होता शुक्रवारचा! म्हणजे पुढे वीकएन्ड होता. धम्माल! २ दिवस सुट्टी. पिल्लूशी मस्ती करण्याचे व खेळण्याचे २ हक्काचे दिवस!
त्या पूर्ण आठवड्यात मला सतत काहीतरी चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं. कसलंतरी guilty feeling आलं होतं. कसला अपराधीपणा वाटतोय ते कळतही होतं आणि नव्हतं पण असं काहितरी विचित्रच झालं होतं. पण पुरुष असल्यामुळे चारचौघात नीट व्यक्तही होता येत नाही आणि धड रडताही येत नाही. आठवडाभर तसाच ऑफिसला जात राहिलो. रात्री घरी पोचतो तेव्हा पिल्लू दिवसभर खेळून दमून झोपायला आलेलं असतं. शुभा आणि माझी ऑफिसहून येण्याची वेळ ही कायम अशी. त्यामुळे बर्याचदा माझी आईच राजसला रात्रीचा भात वगैरे भरवून झोपवते.
त्या दिवशी मी थोडा लवकर घरी आलो होतो पण शुभा अजून पोचली नव्हती. माझी आई मग म्हणाली की "मीच राजसला भाताची पेज भरवते आणि झोपवते. मग शुभा आली की आपण सगळे जेवायला बसू." मी आईला बरं म्हटलं. पण मनात वाटत होतं की बिच्चारं पिल्लू. काहीही तक्रार करत नाही. दिवसभर आजीशी खेळत राहतं. रडत नाही अजिबात! दिवसभर मी, शुभा, बाबा, अनुप ऑफिसमध्ये असतो. आम्हा सगळ्यांना घरी येईस्तोवर ८ ते ९ होतातच होतात. म्हणजे सकाळी ८ ते रात्री ८ पिल्लू आणि आजीचीच गट्टी असते. दोघेही बिच्चारे बिनातक्रार एकेमेकांशी खेळत असतात. आता रात्रीचं जेवण तरी त्याला त्याच्या आईने भरवायला हवं की नको! पण आमच्या या असल्या नोकर्यांमुळे बर्याचदा ते शक्य होत नाही.
मी अशा विचारात असतानाच दाराची बेल वाजली. शुभा आली होती. मी एकदम खुश झालो. म्हटलं आज सगळे वेळेत घरी आलेले आहेत (म्हणजे राजसला झोप लागण्यापूर्वी!). राजसच्या चेहर्यावर देखील त्याच्या आईकडे बघून खुशी प्रकट झाली. शुभा फ्रेश होईस्तोवर माझ्या आईने राजसला भरवायला घेतलं. मी बाजुलाच बसून पिल्लूशी गप्पा मारत होतो. तो मजेत जेवत होता. हसत होता. शुभा पण आम्हांला join झाली. राजसला भरवत असताना सभोवताली १-२ जण लागतात. त्याच्याशी सगळ्यांनी गप्पा मारायच्या, मोबाईलवर ससा-कासवाचं गाणं लावायचं. एकाने हातात खुळखुळा किंवा तत्सम काहीतरी वाजणारं खेळणं घेऊन बसायचं असा आमचा जेवणाचा कार्यक्रम चालतो.
त्या दिवशी घरातले सगळे त्याच्या अवतीभवती असल्याने राजसचे जेवण अगदी खुशीत चालले होते. मी त्याला एकेक चित्रविचित्र चेहरे करून दाखवून जबरी हसवत होतो. तो जोरजोरात हसायला लागला की मी अजून अजून हावभाव करून दाखवत होतो. शेवटी माझी आई म्हणाली की "बास आता! राजसला ठसका लागेल! त्याला जेवताना हसवू नकोस. घशात घास अडकेल त्याच्या. जेवण झालं की मग करा हवी तेव्हढी मस्ती." तरी आमचा आपला दंगा चालूच होता. इतक्यात आई म्हणत होती तसेच झाले. राजसला जोरदार ठसका आला. त्याच्या तोंडातून सगळी भाताची पेज उलटून पडली. थोडीशी पेज त्याच्या घशातून नाकात पण गेली आणि नाकपुड्यांमधून बाहेर येऊ लागली. त्यामुळे त्याला श्वास घेता येईना! तो घाबरून हातपाय झाडायला लागला. जाम कावरा-बावरा झाला तो! जवळजवळ ७-८ सेकंदभर त्याने श्वासच रोखून धरला. चेहरा पूर्ण लाल झाला त्याचा बराच वेळ श्वास न घेतल्याने. माझ्या तर तोंडचे पाणीच पळाले. मला अक्षरशः रडू यायला लागलं. माझ्या डोळ्यांतून कधी आसवं वहायला लागली माझं मलाच कळलं नाही. आवाज रडवेला झाला. मी "सोनु, सोनु" असं करून पिल्लूला हाक मारत होतो. त्याला दिलासा द्यायचा प्रयत्न करीत होतो. "घाबरू नकोस, तुझा बाबा आहे इथेच. तुझ्याजवळ! तुझी आई, तुझे आजी-आबा पण सगळे इथेच आहेत. रडू नकोस! माझ्या सोन्या!" असं त्याला सांगण्याचा प्रयत्न करीत होतो.
हे सगळे इतक्या क्षणार्धात घडले की १-२ मिनिटांत सगळे ठिक झाले होते. आईने हळूहळू त्याला शांत करून त्याच्या नाका-तोंडातून पेज पूर्णपणे काढून टाकली. त्याचे रडणेही हळूहळू कमी झाले. शुभा आणि माझी आई या दोघीही त्या क्षणाला खूपच खंबीर होत्या. दोघी माझ्याइतक्या मुळीच घाबरल्या नव्हत्या. दोघींनी मिळून ती situation एकदम नीट handle केली होती. पिल्लू पण नंतर हसायला लागलं होतं. त्याचं ते गोड हसू बघून मला अजूनच भरून आलं. किती निरागस जीव तो! माझ्या वेड्या चाळ्यांमुळे त्याला हसायला आलं आणि हे मोठ्ठं रामायण घडलं. त्यामुळे त्याचं ते निर्व्याज हसणं पाहून मला अजूनच guilty वाटू लागलं. आधीच असलेल्या अपराधीपणाच्या भावनेत अजूनच भर पडली. खूप रडायला यायला लागलं. कंट्रोलच होईना. मनसोक्त रडून घेतलं मग मी. बाबा माझ्या पाठीवरून हात फिरवीत होते. मला शांत करीत होते.
रडणं ओसरल्यानंतर विचार करताना असं वाटलं की इतका हळवा का झालो मी? जिथे शुभा आणि माझी आई यांनी स्त्रिया असूनही स्वतःला control केलं तिथे मला अगदी मुळूमुळू रडायला का यावं? हा सगळा गोंधळ पाहून आप्पा पण त्या खोलीत आले. त्यांनीही माझ्या खांद्यावर हात ठेवून मूकपणेच मलाच दिलासा दिला. मी शांत झाल्यानंतर बाबा आणि आप्पा दोघांनीही मला समजावलं की "पुरुषाने इतकं हळवं होता उपयोगी नाही." मी अंतर्मुख झालो. खरंच मी मनाने इतका कमकुवत आहे का? मला का बरं असं रडायला आलं. मग माझ्यातलंच दुसरं मन मला म्हणालं की "तु चांगला बाबा होण्याचा प्रयत्न करता करता थोडासा गडबडला आहेस. आपल्या काळजाच्या तुकड्याला तुला सगळी सुखं, आराम आणि प्रेम असं सर्व द्यायचं आहे. देतही आहेस तू. पण तुला त्याला वेळ देता येत नाहिये." इथेच खरी मेख आहे.
जेव्हा माझ्या ऑफिसमध्ये मजबूत काम असतं तेव्हा किंवा parttime MBA चे classes असतात तेव्हा मला घरी यायला रात्रीचे ११ वाजतातच! रात्री कितीही लेट झाला तरी सकाळी निघण्याची वेळ ७:३० चीच! म्हणजे पिल्लूला मी सकाळचे ६:३० ते ७:३० या १ तासातच काय ते भेटणार! शुभाचीही तर्हा थोड्याफार फरकाने अशीच. मग पिल्लूला आई-बाबांचे प्रेम मिळणार तरी कसे? दिवसभर माझी आई त्याला सांभाळते म्हणून ठिक आहे. आज त्याला पाळणाघरात ठेवावे लागले असते तर कुठल्या पाळणाघराने त्याला रात्री ९ पर्यंत सांभाळले असते? बरं सांभाळले जरी असते तरी आपल्या स्वतःच्या घरात आजीकडून जी माया आणि प्रेम मिळते तसे मिळाले असते का?
आता आपण खूप पैसा कमावतोय. पण त्यासाठी जीवाची तगमग करावी लागतेय. आयुष्यातलं काहीतरी sacrifice करावं लागतंय. पिल्लूला हवा तसा वेळ न देता येणं ही त्यासाठी किंमत चुकवावी लागतेय. आम्हां दोघांच्या नोकर्या, माझं MBA चं college, अभ्यास अशी सर्व सर्कस असल्याने पिल्लूला सांभाळण्यासाठी माझ्या आईला दिवसभर घरात अडकून पडावं लागतं. ती पण त्याच्या मागे सारखी उठबस करून दमून जाते बिचारी. पण हे सगळं ती हसत हसत करते. मग खरंच आपण जे करतोय ते बरोबर आहे का? मी नोकरी सोडून घरी तर बसू शकत नाही. शुभा पिल्लूसाठी नोकरी सोडायला मागेपुढे पाहणार नाही. शेवटी पैशापेक्षा पिल्लू महत्त्वाचे! पण माझी आई म्हणते की "अरे, मी आहे ना घरी! मी सांभाळते पिल्लूला! तुम्ही अजिबात काळजी करु नका." मग आमच्या मनात असा प्रश्न उभा राहतो की पैसा महत्त्वाचा की घर? आज माझे आई-बाबा आमच्यासोबत राहत आहेत म्हणून आम्हां दोघांच्या नोकर्या शक्य आहेत.
या सगळ्या संमिश्र भावना माझ्या मनात एकाच वेळी निर्माण झाल्या आणि बांध फुटून मला रडायला आले. मला वाटते की आमच्या पिढीतल्या ज्या आई-बाबांच्या घरी अशीच situation असेल त्यांच्याही मनात असाच प्रकारचे द्वंद्व उभे राहत असेल. आजकालचे जीवनच असे बनून गेले आहे. त्याला इलाज काय! आणि मग हा प्रश्न अनुत्तरीत राहिला की असं एका क्षणी मनाचा संयम गळून पडतो आणि डोळे भरुन येतात!
मोदक सुन्दर लेख. पहिले
मोदक सुन्दर लेख. पहिले शीर्षकावरून कविता असेल छोटीशी असे वाट्ले. पण असेच मन मोकळे करत जा. आमचा इथे एक एकटे पालक गट आहे तेथील पोस्टे वाचलीस कि तुला घरी बाळाबरोबर आजी आहे ही गोष्ट प्रुथ्वीमोलाची वाटेल. त्यात तू संवेदन शील पालक आहेस ही अतिशय चांगली गोष्ट आहे रे. त्यासाठी तुला स्टार. ते काम करणार्या बाबांचे गाणे ऐकलेस का? तुला आवडेल. ह्या पिल्लू साठीच पम्पम ना!
काल माझी फ्लाइट डीले झाली अन यायला १२ वाजले तर छोट्या मॅड्म वाट बघत होत्या मग आल्यावर
सिमस मध्ये काय नवे चीट कोड्स सापड्ले, विडीओ कट स्प्लाइस कसे करायचे वगैरे गहन चर्चा झाल्यावर
झोपलो. Parenting is one of life's best gifts.
खर आहे रे मोदक. पटलं. भावना
खर आहे रे मोदक. पटलं.
भावना पोचल्या.
Parenting is one of life's best gifts.>>>
मामी वजन वाढण्याची चिंता न करता घ्या मोदकांच ताट.
डुआया, हा डिलेमा रहाणार
डुआया, हा डिलेमा रहाणार त्यातून मार्ग काढण महत्वाचं आहे.
वेळ की पैसा इतका साधा हिशोब नसतोच बर्याचदा.
माणूस आपल्या आयुष्यावरुन,जसे मोठे झालो त्यावरुन आपण काय कसं करायचं ह्याची गणितं मांडत असतो. त्याच्या त्याच्या परिने बरोबर अशीच पण खरच बरोबर की चूक हे कधीच ठरवता येत नाही ते परिस्थिती ठरवते.
एक पालक घरी हवा, आईच का? बाबा का नाही? पासुनचे वाद ते पैशांची गरज आहे म्हणजे किती? भागण्/भागवणं, खर्चाची गणितं वगैरे पण व्यक्ती सापेक्ष तेव्हा तुर्तास ते बाजूला ठेवू. (कारण कितीही दोन्ही बाजूने वाद घातले तरी "हेच" योग्य उत्तर असं पटकन गणित सुटत नाही.)
आहे त्या परिस्थितीत कोणते सकारात्मक उपाय्/बदल करता येतील हे महत्वाचे ठरते
एक उदा. म्हणुन देते, माझ्या लहानपणीच्या रम्य आठवणी आहेत तशाच तणावाच्या देखील आहेत. त्यावेळी काय किंवा आता काय मला कायम वाटायचं आईला जर support system असती व्यवस्थित तर... नक्कीच आमची परिस्थिती आहे त्या पेक्षा वेगळी असती. लहानपण चांगलं गेल नाही अस अजिबात नाही पण हे नक्की की भावाला अजून १-२ वर्ष स्वप्न पुर्ण करायला देता आली असती. आणि एक व्यवस्थित स्वतःच छप्पर डोक्यावर आलं असतं (अर्थात त्याला फक्त एकट्याचा पगार हे कारणीभूत नसत पण ते ही दुर्लक्ष न करता येण्याइतक कारण आहेच)
जी परिस्थिती "त्या" घरी तशीच काहीशी "ह्या" घरी मग सांग जे बघत वाढलो त्यातूनच तर ठरणार ना आपण कसा संसार पुढे न्यायचा त्याची गणितं? प्रत्येक पिढीची पद्धत चुकतच नसते उत्तर काय निघतात त्यावरुन पुढची पिढी ठरवते त्यांची स्वतःची पद्धत बदलायची की तिच ठेवायची ते
आम्हाला सध्या तरी डबल इन्कम ची गरज आहे, घरात सपोर्ट सिस्टिम चांगली आहे. पण तरिही सानुला आमची पद्धत चूक वाटू शकते पुढे जाऊन
डुआया, तुझी आई नोकरी करत होती अजुनही करते. तुच विचार कर आणि सांग त्यांनी "डबल इन्कम" ही त्यांच्या काळाची गरज समजून त्यांच्या गणिताची पद्धत निवडली. तुला काय वाटत? तुझी पद्धत काय असणारे? अजून वेळ आहे पण विचार करायला काहीच हरकत नाही.
दोघांनी नोकरी करण आणि करिअर करण ह्यात पुन्हा फरक आहे. मला नोकरीची गरज आहे मी नोकरी करते. करिअर नाही. मला घरी बसुन कमवायचे पर्याय मिळाले तर उत्तमच आहे. तोपर्यंत नोकरी मधल्या माझ्या कामाच्या वेळा/दिवस ठरलेल्या असल्याने त्याचा देखील उपयोग होतो मुलांसाठी वेळेचं नियोजन करताना.
१)गरजा - आर्थिक असोत की मानसिक त्या स्वतःपाशी तरी कबूल करणे (उगाच जग काय म्हणेल ह्याचा विचार न करता)
२)त्या गरजा नी घरातली माणसं, बाळ ह्यांच्या गरजा ह्याची लिस्ट करणे
३) हवी तिथे सपोर्ट सिस्टिमची मदत घेणे
४)त्या त्या वेळी त्या त्या प्रायॉरिटिला महत्व देणे
आजच सानुने सिद्धांत मांडला
घरात वरकामाला बाई का ठेवली मला माहितेय "त्यामुळे आई बाबांना मुलांशी खेळायला वेळ मिळतो"
म्हंटल तुला कोणी सांगितल्/कस कळल?
तर म्हणे, "तुम्ही दोघं खेळता ना माझ्याशी पण जर तुम्ही ही कामं करत बसला असतात तर वेळ त्यातच गेला असता ना"
मुलांना गरज असतेच आपली त्यापेक्षा आपल्याला त्यांच्या निर्व्याज प्रेमाची जास्त गरज असते पण काही गोष्टी ह्या परिस्थितीप्रमाणे पुढे मागे कराव्या लागतात.
पाचा उत्तराची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपुर्ण
छान लिहीलं आहे. < ह्म्म्म
छान लिहीलं आहे.
< ह्म्म्म पैसा की वेळ ह्यातलं आपण काय देऊ शकतो ते आपलं आपणच ठरवायच >
इतकं सोपं असतं तर काय हवं होतं डुआय साहेब?
आता आपण खूप पैसा कमावतोय.
आता आपण खूप पैसा कमावतोय. नोकरी सोडून घरी तर बसू शकत नाही. शुभा पिल्लूसाठी नोकरी सोडायला मागेपुढे पाहणार नाही. शेवटी पैशापेक्षा पिल्लू महत्त्वाचे! पण माझी आई म्हणते की "अरे, मी आहे ना घरी! मी सांभाळते पिल्लूला! तुम्ही अजिबात काळजी करु नका." मग आमच्या मनात असा प्रश्न उभा राहतो की पैसा महत्त्वाचा की घर? >>
मला वाटतं डुआयने ह्या प्रश्णाला उत्तर दिलं आहे आणि मी माझं अनुमोदन त्याला दाखवलं आहे म्हणून इथे लिहीत आहे. कविताचा मुद्दा नोकरीची गरज असणं. इथे तो मुद्दा नाहीच आहे. त्यामुळे हे ज्याचे त्याने ठरवणं हा रिस्पॉन्स मला तरी बरोबर वाट्तो. डुआयच्या आणि त्याच्या आईच्या निर्णयाचा ह्याच्याशी काही संबंध नाही. तो त्यांचा निर्णय असेल.
छान लिहिलंय. आवडलं.
छान लिहिलंय. आवडलं.
सर्वांचे मनापासुन आभार !!
सर्वांचे मनापासुन आभार !! प्रतिक्रिया वाचुन मस्त वाटले.....आणि मन थोडे हलकेही झाले....
पण खरंच कधी कधी खुप ऊदसीनता येते.... खुप हतबल झाल्यासारखे वाटते....
मला आणि शुभाला आई बाबांच्या support आणि प्रेमाची जाणीव आहेच...आणि ती सदैव राहो ....
किंवा सर्वानीच ती तशी ठेवावी अशी अपेक्षा....
आज आपण हे जे दिवस बघतोय ते केवळ आई बाबांमुळे... याचे भान ठेवावे कायम !!
आणि निंबुडाचे विशेष आभार.... माझे हे लि़खाण ...तिनेच भराभर टाइपलं....
कविता, थॅन्क्स अ लॉट फॉर सो
कविता, थॅन्क्स अ लॉट फॉर सो मच इनपूट्स
तुला काय वाटत? तुझी पद्धत काय असणारे? अजून वेळ आहे पण विचार करायला काहीच हरकत नाही.
दोघांनी नोकरी करण आणि करिअर करण >>>
It might be very harsh but can't help it.. on this BB I would not want to discuss this because now a days on maayboli the mentality of people is such that you can have a word war on any stuff.
Kavita sorry for not answering this here. I'll surely tell you my views once we meet tomorrow.
मोदक,
लगे रहो.
(पुन्हा एकदा) तू मस्तच लिहिलंस
मोदक छान लिहिले आहे. माझ्याही
मोदक छान लिहिले आहे.
माझ्याही आईने नातवांची पूर्ण जबाबदारी घेतली होती. फक्त आमच्यापेक्षा, नाववडाचे जास्त लाड केले ..
मी जगात कुठेही असलो, तरी रोजची संध्याकाळ, छोट्या मित्रांसाठी राखीव असते.
डुआयच्या आणि त्याच्या आईच्या
डुआयच्या आणि त्याच्या आईच्या निर्णयाचा ह्याच्याशी काही संबंध नाही. तो त्यांचा निर्णय असेल.>> आर्च अगं हे लिहायचा हेतू हा आहे. की माझा काय किंवा माझ्या नवर्याचा काय दोघांची नोकरी सध्यातरी हवेय हा निर्णय घेताना "आमचं बालपण, एकट्याच्या कमाईने आलेल्या अडचणी, आताची आर्थिक परिस्थिती, घरातून असलेला सपोर्ट" ह्या वरुन ठरवला गेलाय.
आई बाबा नोकरी करत असले, घरातून सपोर्ट असला तरी त्या मुलाचा वाढताना त्या गोष्टिकडे बघण्याचा दृष्टीकोन, त्याच्यावर ह्या गोष्टीचा झालेला इंपॅक्ट त्याला पुढच्या आयुष्यातले निर्णय घेताना महत्वाचा ठरतो. सानुचा काय असेल दृष्टिकोन हे काळाबरोबर कळेलच आम्हाला पण अशाच सिमिलर परिस्थितीतून तो वाढलाय म्हणून विचारलं उत्सुकते पोटी की त्याच्याही आई वडीलांनी आमच्या सारखाच परिस्थिती मुळे निर्णय घेतला असणार पण त्याला सानूच्या जागी ठेवून मी त्याच मत विचारलं इतकच. कदाचित मांडलं गेलं नसेल नीट
त्याच्या घराचा मुद्दा नसून "दोघे नोकरी करणार्या घरातल्या पुढच्या पिढीला काय वाटतं, त्यांचे पुढच्या आयुष्यातले निर्णय काय ठरतात" हे जाणून घेण्याकरता तो प्रश्न त्याला विचारला.
डुआया, बाकी भेटू तेव्हा बोलण होईलच म्हणा. इथे फक्त माझ्या वाक्याने वादग्रस्त वळण घेऊ नये म्हणूण माझा हेतू स्पष्ट केला.
छान च लिहिलंय
छान च लिहिलंय
मित्रा, तुला जाणीव आहे हे खुप
मित्रा, तुला जाणीव आहे हे खुप महत्वाचं. नाहीतर आजकालची मुलं गावाकडून आई-वडीलांना बोलावून घेतात आपली मुले सांभाळण्यासाठी.
लेख छानच जमला आहे, हे सांगणे नलगे!
>>"दोघे नोकरी करणार्या
>>"दोघे नोकरी करणार्या घरातल्या पुढच्या पिढीला काय वाटतं, त्यांचे पुढच्या आयुष्यातले निर्णय काय ठरतात"
माझा असा अनुभव आहे कि मुलांना काय वाटते हे त्यांच्या स्वभावावर अवलंबुन असते.
उदा. म्हणुन सांगते. माझ्या सासूबाई नोकरी करत होत्या. माझा नवरा आणि नणंद यांना बाहेर सांभाळायला ठेवत होते. ज्या बाईकडे ठेवायचे त्या अतिशय प्रेमळ, अगदी मुलांसारखे करायच्या या दोघांचे. अगदी सुट्टीत त्यांच्याबरोबर गावालाही जायची ही मुले. त्या बाईला आई म्हणायची (अजुनही म्हणतात), इतकी मुले तिकडे रमलेली होती.
तरी आज माझी नणंद नोकरी करत नाही. ती म्हणते की आईने पैसे कमी पडले तरी चालेल, पण मुलांना सांभाळावे.
आणि माझा नवरा अगदी विरुद्ध. मुले दिवसभर बाहेर राहिली आणि इतर वेळी जर आपण क्वालिटी टाईम देत असू तर आईने नोकरी करावीच. अगदी हाल होत असतिल मुलांचे तरच नोकरी सोडावी.
सांगायचा मुद्दा हा की मुलाला पुढे जाऊन काय वाटेल हे आपल्याला आधी कळणार नाही. ज्यामुळे आपल्याला "जास्त" समाधान मिळणार आहे तोच निर्णय घ्यावा. कुठलाही पर्याय पूर्ण आनंद देणारा नसणारच.
सांगायचा मुद्दा हा की मुलाला
सांगायचा मुद्दा हा की मुलाला पुढे जाऊन काय वाटेल हे आपल्याला आधी कळणार नाही. >> कुठलाही पर्याय पूर्ण आनंद देणारा नसणारच.>>> पटलं
कुठलाही पर्याय पूर्ण आनंद
कुठलाही पर्याय पूर्ण आनंद देणारा नसणारच.
अगदी पटलं.......
इथे मागे "कुणाशीतरी बोलायचंय" या धाग्यात कुणा स्त्रीने ही समस्या मांडली होती की तिच्या लहान मुलाच्या जडणघडणी साठी ती नोकरी सोडून घरी राहिली होती आणि नंतर तिला वाटू लागले की तिने चूक तर नाही ना केली.
प्रत्येक possible पर्यायामध्ये काही गोष्टी पथ्यावर पडणार्या तर काही disadvantageous......
मोदका नशिबवान आहेस रे...आजी
मोदका
नशिबवान आहेस रे...आजी आजोबांच्या छत्राखाली वाढतंय तुझं पिलू! आणि छान लिहिलयंस. अगदी र्हदयाला भिडलं बघ!
लेख अगदी भिडणारा झालाय.
लेख अगदी भिडणारा झालाय. तुमच्या भावना पोहचल्यात.
खरेच नशीबवान आहात तुम्ही, तुमची पत्नी अन पिल्लुसुद्धा!!! आजी आजोबांनी नातवाची जबाबदारी आनंदाने घेऊन सुनेला नोकरीसाठी सपोर्ट करणे यातच त्यांचा ग्रेटनेस आहे. खूप कमी लोक असे blessesd असतात. आजीला आमचा मुजरा पोहचवा.
मोदक, खुप हळवं व्हायला झालं
मोदक, खुप हळवं व्हायला झालं लेख वाचताना. छान भावना पोहचविल्यास
अरुंधती छान पोष्ट!
खुप सुंदर लेख!!!
खुप सुंदर लेख!!!
मोदक,लेख ह्रदयस्पर्शी झाला
मोदक,लेख ह्रदयस्पर्शी झाला आहे. रडून मन मोकळं केलंत हे चांगलं केलंत. तुमच्या आईला नमस्कार.
कविताने सर्व साधकबाधक विचार करून छान लिहिले आहे. प्रत्येकाची आयुष्याचं गणित सोडवण्याची रीत
वेगवेगळी असू शकते. प्रत्येक घरातील परिस्थितीनुसार आणि त्या त्या वेळेप्रमाणे हे बदलत जाते. पण सपोर्ट सिस्टिमची मदत जरूर घ्यावी असे मला वाटते. उदा. वरकामाला बाई ठेवणे.
छान लेख. एकदम खरेपणातून
छान लेख. एकदम खरेपणातून लिहिलाय हे जाणवतं.
नोकरी करणं/घर सांभाळणं/आजीआजोबानी नातवंड सांभाळणं/पाळणाघरत ठेवणं हे सर्व त्या त्या जोडप्याचे स्वतःचे निर्णय असतात. आम्ही अमुक केले म्हणून सर्वानीच तसे करावे अथवा सर्वच तसे करतात म्हणून आम्हीदेखील करू... असे म्हणणे अथवा वागणे निरर्थक ठरते. प्रत्येकाच्या निर्णयाचा आदर राखाय्लाच हवा. त्याबद्दल इतरानी बोलून काय होणार? प्रत्येकाचे आकडे वेगळे, प्रत्येकाची पद्धते वेगळी म्हणून प्रत्येकाची उत्तरे वेगवेगळी.
मोदक, वास्तववादी लेख.
मोदक, वास्तववादी लेख. अभिनंदन, नि:संकोच धाडस करुन लिहिल्याबद्दल. कित्येक बापांना आपल्या मुलाला/मुलीला दररोज बघणेही जमत नाही उदा. सैनिक, घरापासुन दुर नोकरी करणारे कामगार. कुटुंबाच्या भल्यासाठीच ते दूर असतात.
कविता, डुआय, नंदिनी याविषयावर तुमचीही मते बरोबर आहेत. शेवटी अदिती म्हणतेय तेच बरोबर.
<<कुठलाही पर्याय पूर्ण आनंद देणारा नसणारच.>>
मोदक, छान लेख आहे आणि सगळ्या
मोदक,
छान लेख आहे आणि सगळ्या पालकांना "पिडणार्या "प्रश्नाला तुम्ही हात घातलाय हे प्रतिक्रियांवरून पण लक्षात येतय. खर सांगू का, मनापासून नातवंडांच करणारे आजी-आजोबा, डे-केअर च्या खेळकर टीचर्स, पाळ्णाघरातल्या अगदी हसतमुख प्रेमळ काकू हे सर्व पर्याय आई-वडिलांची उणीव नाही हो भरून काढ्त.
नोकरी ही सध्या गरज झाली आहे पण एका जिवाला आपण "जाणीवपूर्वक" या जगात आणल आहे ही जाणीव पाल़कांच्या मनात जागी असण खूप जरुरी आहे अस मला वाट्त. आपल्या पिल्लांना रोटी-कपडा-मकान च्या पल्याड, प्रेम, विचार, संस्कार, मूल्य यांची पण गरज असते. आणी या गोष्टींच "आउट्सोर्सिंग" झाल की पालकत्वाची मज्जाच संपली ना!
मला आठवत माझ्या डे केअर च्या आज्ज्जीचा उत्साहाने फोन आला " Jai took his first step..." खर सांगू, आनंद व्ह्यायच्या ऐवजी मी जाम रडले. माझ्या बाळाने टाकलेल पहिल पाऊल मी बघितल नाही. असो. छान विषय!
मोदक, छानच लिहिलय..
मोदक, छानच लिहिलय.. आवडलं
अगदी ह्यातूनच जातोय त्यामुळे विशेष जाणवलं...
'परि बापाचे हृदय कसे होते, न ये वदता अनुभवी जाणती ते!!" हेच खरं रे 'बाबा'
सपोर्ट सिस्टिमची मदत जरूर
सपोर्ट सिस्टिमची मदत जरूर घ्यावी असे मला वाटते. उदा. वरकामाला बाई ठेवणे.
तेज, अगं आम्ही ठेवली आहे बाई वरकामाला. मी मॅटर्निटी लीव्ह संपवून ऑफिसला रुजू जोण्यापूर्वीच एक बाई दिवसभराच्या कामासाठी ठरवून टाकली. कारण आमच्या घरात माझे नव्वदीतले आजे सासरेही आहेत. मोदकची आई (माझ्या साबा) या २-२ बाळांची देखभाल एकट्या कशा करणार म्हणून !!!
मोदक- छान लिहीलंत. पालकत्वाचा
मोदक- छान लिहीलंत.
पालकत्वाचा अध्याहृत भाग म्हणजे गिल्ट असंच वाटायला लागलय अलिकडे.
कविताला पूर्ण अनुमोदन. अदितीलाही.
जाता जाता-दरवेळेस पेरंटिंगचा प्रश्न मुख्यतः आईने नोकरी करावी की नाही इथवरच का येऊन ठेपतो?
पैसा की वेळ इतकी थेट दोन घटकांची गणितं मांडता येतात? स्वाभिमान, कामातील आनंद, चॅलेंजेस, स्वायत्तता, स्वयंपूर्णतेकडे वाटचाल, समाजातील आपण, आपल्या उर्जेचा/ कामाचा/ कार्यक्षेत्राचा मुलांवर विधायक परिणाम, या गोष्टींनाही मोल असते का? सगळ्या नोकरी करणार्यांची मुलं Vs सगळ्या नोकरी न करणार्या आईबापांची मुलं असे थेट चांगलेवाईट निष्कर्ष निघु शकतात का?
क्वालिटीटाईम जर भ्रामक समजुत असेल तर मुलांच्या सतत मागे असणारी ओवरऑब्सेस्ड आणि ओवरअँबिश्यस आई हेही फारसं हितावह वाटत नाही.
पालकत्व हे आपल्या माणुसपणावर अवलंबुन असतं का? आपल्याला एक व्यक्ति म्हणुन ज्यात आनंद मिळतो ते खरं, त्याचाच पालकत्वावरही परिणाम होतो असं वाटतं. असो.
निंबुडा, तुमच्या घरातील
निंबुडा, तुमच्या घरातील सर्वांचीच 'शाबास' आहे. मी काय बोलू? बोलती बंद.
मोदक, खुप छान लिहीलयसं. आवडलं
मोदक, खुप छान लिहीलयसं. आवडलं
वाचताना वाटत होतं, अरे, हे तर माझ्याच घरातलं चित्र आहे. सगळं शेम टू शेम, एकदम !
आणि मित्रा स्वानुभवावरुन सांगतो, रडत जा कधीतरी. आपल्या माणसापाशी रडण्यानी मनं खूप मोकळं होतं, हलकं वाटतं एकदम, त्याला कशाचीच तोड नाही.
जुन आठवल तुझा लेख वाचुन. माझी
जुन आठवल तुझा लेख वाचुन. माझी मुलगी लहान पणी माझ्या आई वडीलांनी दिवसभर सांभाळली. कारण आम्ही दोघही नोकरी करायचो. प्ले ग्रुप ला पहिल्या दिवशी मुल आई, मम्मी म्हणुन रडतात. माझी मुलगी नाना ( माझ्या वडीलांना आम्ही नाना म्हणायचो ) म्हणुन रडली. आम्हाला पर्यायच नव्हता. दोघांनी नोकरी केली म्हणुन पाच जणांचा संसार सुखाचा झाला.
अहो मोदक शेवटी स्वताहा आई
अहो मोदक
शेवटी स्वताहा आई बाबा झाल्याशिवाय कळत नाही हेच खरय
Pages