ही घटना माझा मुलगा राजस ६ महिन्यांचा असतानाची आहे. त्या दिवशी मी ऑफिसमधून थोडासा लवकरच (रा. ०८:३०) घरी आलो होतो. घरातला सीन नेहेमीसारखाच होता. म्हणजेच घरात झी मराठीवर डेलि सोप चे दळण चालू होते. माझे बाबा ऑफिसमधून घरी आलेले होते आधीच. माझी आई राजसशी खेळण्यात मग्न होती. तो पण तिच्या मांडीत बसून मस्ती करत होता. त्याचा अनुप काका (माझा धाकटा भाऊ) बेडरुम मध्ये बसून C.A. चा अभ्यास करत होता. आणि आप्पा (माझे आजोबा - वय वर्षे ८७) त्यांच्या खोलीत काहीतरी अध्यात्मिक वाचन करत होते. तो दिवस होता शुक्रवारचा! म्हणजे पुढे वीकएन्ड होता. धम्माल! २ दिवस सुट्टी. पिल्लूशी मस्ती करण्याचे व खेळण्याचे २ हक्काचे दिवस!
त्या पूर्ण आठवड्यात मला सतत काहीतरी चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं. कसलंतरी guilty feeling आलं होतं. कसला अपराधीपणा वाटतोय ते कळतही होतं आणि नव्हतं पण असं काहितरी विचित्रच झालं होतं. पण पुरुष असल्यामुळे चारचौघात नीट व्यक्तही होता येत नाही आणि धड रडताही येत नाही. आठवडाभर तसाच ऑफिसला जात राहिलो. रात्री घरी पोचतो तेव्हा पिल्लू दिवसभर खेळून दमून झोपायला आलेलं असतं. शुभा आणि माझी ऑफिसहून येण्याची वेळ ही कायम अशी. त्यामुळे बर्याचदा माझी आईच राजसला रात्रीचा भात वगैरे भरवून झोपवते.
त्या दिवशी मी थोडा लवकर घरी आलो होतो पण शुभा अजून पोचली नव्हती. माझी आई मग म्हणाली की "मीच राजसला भाताची पेज भरवते आणि झोपवते. मग शुभा आली की आपण सगळे जेवायला बसू." मी आईला बरं म्हटलं. पण मनात वाटत होतं की बिच्चारं पिल्लू. काहीही तक्रार करत नाही. दिवसभर आजीशी खेळत राहतं. रडत नाही अजिबात! दिवसभर मी, शुभा, बाबा, अनुप ऑफिसमध्ये असतो. आम्हा सगळ्यांना घरी येईस्तोवर ८ ते ९ होतातच होतात. म्हणजे सकाळी ८ ते रात्री ८ पिल्लू आणि आजीचीच गट्टी असते. दोघेही बिच्चारे बिनातक्रार एकेमेकांशी खेळत असतात. आता रात्रीचं जेवण तरी त्याला त्याच्या आईने भरवायला हवं की नको! पण आमच्या या असल्या नोकर्यांमुळे बर्याचदा ते शक्य होत नाही.
मी अशा विचारात असतानाच दाराची बेल वाजली. शुभा आली होती. मी एकदम खुश झालो. म्हटलं आज सगळे वेळेत घरी आलेले आहेत (म्हणजे राजसला झोप लागण्यापूर्वी!). राजसच्या चेहर्यावर देखील त्याच्या आईकडे बघून खुशी प्रकट झाली. शुभा फ्रेश होईस्तोवर माझ्या आईने राजसला भरवायला घेतलं. मी बाजुलाच बसून पिल्लूशी गप्पा मारत होतो. तो मजेत जेवत होता. हसत होता. शुभा पण आम्हांला join झाली. राजसला भरवत असताना सभोवताली १-२ जण लागतात. त्याच्याशी सगळ्यांनी गप्पा मारायच्या, मोबाईलवर ससा-कासवाचं गाणं लावायचं. एकाने हातात खुळखुळा किंवा तत्सम काहीतरी वाजणारं खेळणं घेऊन बसायचं असा आमचा जेवणाचा कार्यक्रम चालतो.
त्या दिवशी घरातले सगळे त्याच्या अवतीभवती असल्याने राजसचे जेवण अगदी खुशीत चालले होते. मी त्याला एकेक चित्रविचित्र चेहरे करून दाखवून जबरी हसवत होतो. तो जोरजोरात हसायला लागला की मी अजून अजून हावभाव करून दाखवत होतो. शेवटी माझी आई म्हणाली की "बास आता! राजसला ठसका लागेल! त्याला जेवताना हसवू नकोस. घशात घास अडकेल त्याच्या. जेवण झालं की मग करा हवी तेव्हढी मस्ती." तरी आमचा आपला दंगा चालूच होता. इतक्यात आई म्हणत होती तसेच झाले. राजसला जोरदार ठसका आला. त्याच्या तोंडातून सगळी भाताची पेज उलटून पडली. थोडीशी पेज त्याच्या घशातून नाकात पण गेली आणि नाकपुड्यांमधून बाहेर येऊ लागली. त्यामुळे त्याला श्वास घेता येईना! तो घाबरून हातपाय झाडायला लागला. जाम कावरा-बावरा झाला तो! जवळजवळ ७-८ सेकंदभर त्याने श्वासच रोखून धरला. चेहरा पूर्ण लाल झाला त्याचा बराच वेळ श्वास न घेतल्याने. माझ्या तर तोंडचे पाणीच पळाले. मला अक्षरशः रडू यायला लागलं. माझ्या डोळ्यांतून कधी आसवं वहायला लागली माझं मलाच कळलं नाही. आवाज रडवेला झाला. मी "सोनु, सोनु" असं करून पिल्लूला हाक मारत होतो. त्याला दिलासा द्यायचा प्रयत्न करीत होतो. "घाबरू नकोस, तुझा बाबा आहे इथेच. तुझ्याजवळ! तुझी आई, तुझे आजी-आबा पण सगळे इथेच आहेत. रडू नकोस! माझ्या सोन्या!" असं त्याला सांगण्याचा प्रयत्न करीत होतो.
हे सगळे इतक्या क्षणार्धात घडले की १-२ मिनिटांत सगळे ठिक झाले होते. आईने हळूहळू त्याला शांत करून त्याच्या नाका-तोंडातून पेज पूर्णपणे काढून टाकली. त्याचे रडणेही हळूहळू कमी झाले. शुभा आणि माझी आई या दोघीही त्या क्षणाला खूपच खंबीर होत्या. दोघी माझ्याइतक्या मुळीच घाबरल्या नव्हत्या. दोघींनी मिळून ती situation एकदम नीट handle केली होती. पिल्लू पण नंतर हसायला लागलं होतं. त्याचं ते गोड हसू बघून मला अजूनच भरून आलं. किती निरागस जीव तो! माझ्या वेड्या चाळ्यांमुळे त्याला हसायला आलं आणि हे मोठ्ठं रामायण घडलं. त्यामुळे त्याचं ते निर्व्याज हसणं पाहून मला अजूनच guilty वाटू लागलं. आधीच असलेल्या अपराधीपणाच्या भावनेत अजूनच भर पडली. खूप रडायला यायला लागलं. कंट्रोलच होईना. मनसोक्त रडून घेतलं मग मी. बाबा माझ्या पाठीवरून हात फिरवीत होते. मला शांत करीत होते.
रडणं ओसरल्यानंतर विचार करताना असं वाटलं की इतका हळवा का झालो मी? जिथे शुभा आणि माझी आई यांनी स्त्रिया असूनही स्वतःला control केलं तिथे मला अगदी मुळूमुळू रडायला का यावं? हा सगळा गोंधळ पाहून आप्पा पण त्या खोलीत आले. त्यांनीही माझ्या खांद्यावर हात ठेवून मूकपणेच मलाच दिलासा दिला. मी शांत झाल्यानंतर बाबा आणि आप्पा दोघांनीही मला समजावलं की "पुरुषाने इतकं हळवं होता उपयोगी नाही." मी अंतर्मुख झालो. खरंच मी मनाने इतका कमकुवत आहे का? मला का बरं असं रडायला आलं. मग माझ्यातलंच दुसरं मन मला म्हणालं की "तु चांगला बाबा होण्याचा प्रयत्न करता करता थोडासा गडबडला आहेस. आपल्या काळजाच्या तुकड्याला तुला सगळी सुखं, आराम आणि प्रेम असं सर्व द्यायचं आहे. देतही आहेस तू. पण तुला त्याला वेळ देता येत नाहिये." इथेच खरी मेख आहे.
जेव्हा माझ्या ऑफिसमध्ये मजबूत काम असतं तेव्हा किंवा parttime MBA चे classes असतात तेव्हा मला घरी यायला रात्रीचे ११ वाजतातच! रात्री कितीही लेट झाला तरी सकाळी निघण्याची वेळ ७:३० चीच! म्हणजे पिल्लूला मी सकाळचे ६:३० ते ७:३० या १ तासातच काय ते भेटणार! शुभाचीही तर्हा थोड्याफार फरकाने अशीच. मग पिल्लूला आई-बाबांचे प्रेम मिळणार तरी कसे? दिवसभर माझी आई त्याला सांभाळते म्हणून ठिक आहे. आज त्याला पाळणाघरात ठेवावे लागले असते तर कुठल्या पाळणाघराने त्याला रात्री ९ पर्यंत सांभाळले असते? बरं सांभाळले जरी असते तरी आपल्या स्वतःच्या घरात आजीकडून जी माया आणि प्रेम मिळते तसे मिळाले असते का?
आता आपण खूप पैसा कमावतोय. पण त्यासाठी जीवाची तगमग करावी लागतेय. आयुष्यातलं काहीतरी sacrifice करावं लागतंय. पिल्लूला हवा तसा वेळ न देता येणं ही त्यासाठी किंमत चुकवावी लागतेय. आम्हां दोघांच्या नोकर्या, माझं MBA चं college, अभ्यास अशी सर्व सर्कस असल्याने पिल्लूला सांभाळण्यासाठी माझ्या आईला दिवसभर घरात अडकून पडावं लागतं. ती पण त्याच्या मागे सारखी उठबस करून दमून जाते बिचारी. पण हे सगळं ती हसत हसत करते. मग खरंच आपण जे करतोय ते बरोबर आहे का? मी नोकरी सोडून घरी तर बसू शकत नाही. शुभा पिल्लूसाठी नोकरी सोडायला मागेपुढे पाहणार नाही. शेवटी पैशापेक्षा पिल्लू महत्त्वाचे! पण माझी आई म्हणते की "अरे, मी आहे ना घरी! मी सांभाळते पिल्लूला! तुम्ही अजिबात काळजी करु नका." मग आमच्या मनात असा प्रश्न उभा राहतो की पैसा महत्त्वाचा की घर? आज माझे आई-बाबा आमच्यासोबत राहत आहेत म्हणून आम्हां दोघांच्या नोकर्या शक्य आहेत.
या सगळ्या संमिश्र भावना माझ्या मनात एकाच वेळी निर्माण झाल्या आणि बांध फुटून मला रडायला आले. मला वाटते की आमच्या पिढीतल्या ज्या आई-बाबांच्या घरी अशीच situation असेल त्यांच्याही मनात असाच प्रकारचे द्वंद्व उभे राहत असेल. आजकालचे जीवनच असे बनून गेले आहे. त्याला इलाज काय! आणि मग हा प्रश्न अनुत्तरीत राहिला की असं एका क्षणी मनाचा संयम गळून पडतो आणि डोळे भरुन येतात!
चांगलं लिहिलस रे. पण आई करते
चांगलं लिहिलस रे.
पण आई करते आहे म्हणून तिच्यावरही जास्त ताण येउ न देण्याची खबरदारी घ्या तुम्ही लोकं. अन हो, ती करते आहे त्याची जाणिवही तुम्हाला आहे ती तशीच ठेवा.
मोदक लेख छान झाला आहे. ही
मोदक लेख छान झाला आहे. ही अपराधी भावना आजच्या पिढीचीच आहे, कुणी ती मान्य करतं, कुणी असुरक्षिततेने अमान्य करतं. चालायचचं.
आपल्याकडे रडण्याला कमीपणाचे का समजतात तेच कळत नाही. त्यातही पुरुषाने रडणे तर विचारुच नये. मुळात ती एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे.
खुप छान लिहिलय मोदक! डोळे
खुप छान लिहिलय मोदक! डोळे भरुन आले
खूप छान लिहिलयं.. पण आई करते
खूप छान लिहिलयं..
पण आई करते आहे म्हणून तिच्यावरही जास्त ताण येउ न देण्याची खबरदारी घ्या तुम्ही लोकं. अन हो, ती करते आहे त्याची जाणिवही तुम्हाला आहे ती तशीच ठेवा.>>> अनुमोदन
मोदक, मी रिलायन्स मध्ये
मोदक,
मी रिलायन्स मध्ये मुंबईत कामाला असताना असे अनुभव बरेच घेतले. अनेक सहकारी हेच अनुभव सांगत. पण तुमच्या घरी किमान घरातले लोक आहेत पिलु सांभाळायला. ज्यांच्याकडे ते ही नाहीत, त्यांचा विचार करुन सुख मानायचे!
एम्बीए पुर्ण झाले कि मोकळा वेळ मिळेलच! तेंव्हा हवी तेवढी मजा करा!
शुभेच्छा!
दीपुर्झा च्या म्हणण्याप्रमाणे, मागे वळुन बघायला विसरु नका...
सही लिहीलं आहेस रे
सही लिहीलं आहेस रे मोदका.
नशीब चांगलं आहे तुमचं की पिल्लूला आजी आजोबांचा आधार आहे.
मी पण शक्यतो कधीच रडत नाही. पण पिल्लूला तीच्या जन्मानंतर तीसर्याच दीवशी NICU मध्ये ठेवायचा प्रसंग ओढवला होता, तेंव्हा अशक्य रडलो होतो. अजूनही तीला जरा काही झाले की, भयंकर कासावीशी होते.
खूप छान लिहिलंय मुख्य
खूप छान लिहिलंय
मुख्य म्हणजे तुम्ही तुमच्या आईच्या कष्टांची जाणिव ठेवून आहात.
छान लिहलयं...
छान लिहलयं...
चान्गल लिहीलय
चान्गल लिहीलय
चांगल लिहिलय.. दिप्याला
चांगल लिहिलय..
दिप्याला अनुमोदन..
हम्म, मोठा कठीण तिढा आहे
हम्म, मोठा कठीण तिढा आहे हा.
एक मात्र कायम लक्षात ठेवला तर बरेच प्रश्न सुटतील -' इव्हन इफ यू कॅन नॉट गीव्ह युअर चिल्ड्रन द बेस्ट ऑफ द वर्ल्ड, यू कॅन डेफिनेटली गीव्ह देम द बेस्ट ऑफ युअरसेल्फ'
चांगलं लिहीलयं..
चांगलं लिहीलयं..
अगाऊ शी सहमत.. मोदक लेख उत्तम
अगाऊ शी सहमत..
मोदक लेख उत्तम आहे. खूप आईवडिल यातून जात असतील.
अगदी हृदयाला भिडणारं,
अगदी हृदयाला भिडणारं, सध्याच्या पिढीच्या नव्या आईबापांच्या मनातलं लिखाण!
परवाच माझा एक मावसभाऊ सांगत होता त्याच्या तीन वर्षाच्या चिमुरडीची कथा. मावसभावालाही ऑफिसमधून तुमच्यासारखाच यायला खूप उशीर होतो. कधी कधी तर रात्रीचे दहा - साडेदहा - अकरा. शक्यतो आल्यावर तो आपल्या ह्या कन्येशी थोडा वेळ तरी खेळतो. मधे तो अचानक एक दिवस लवकर घरी आला. लेकीशी मनसोक्त खेळू म्हणाला. पंधरा-वीस मिनिटांनी लेक म्हणाली (खूप इब्लिस आहे रत्न!), ''बाबा, मी कन्फ्यूज झाले रे! (हो, कन्फ्यूज हा शब्द वापरता येतो मॅडमना) तू माझ्याशी रोज किती थोडा वेळ खेळतोस! मला सवय नाहीए तुझ्याशी जास्त वेळ खेळायची.... आता तुझ्याशी काय खेळायचं, काय बोलायचं ते तूच सांग ना!'' माझा भाऊ एकदम गपगार झाला. त्याच्याच पुढच्या आठवड्यात मुकाट्यानं ऑफिसमधून चार दिवसांची सुट्टी काढून बायकोपोरांना घेऊन गावाला जाऊन आला!
मोदक.. तुला १००० मोदक..इतकं
मोदक.. तुला १००० मोदक..इतकं हृदयस्पर्शी लिहिलसं म्हणून
बरं वाटतं ना...असे अश्रू मोकळे वाहिले कि मन ही खूप मोकळं होतं.. हलकं वाटतं
मोदक.. खरचं खुप सुंदर लेख...
मोदक.. खरचं खुप सुंदर लेख...
"Its just like art from heart, all colours are pefectly painted within outlines of proper emotions "
मोदक, खुप छान लिहीलयस. अगदी
मोदक, खुप छान लिहीलयस. अगदी बर्याच जणांना ह्या सगळ्याला सामोरं जावं लागतं. आम्हीही अपवाद नाही त्याला.
तरिही आपल्या गिल्ट मधुन पॉझिटिव्हली आपणच मार्ग काढायचा. राजस अजून लहान आहे पण कधी कधी ह्या गिल्ट मुळे आपण विकत घेऊन देऊ शकतो अशा बर्याच गोष्टी मुलांच्या तोंडातून बाहेर आल्या आल्या हजर करतो. तसं दरवेळी करणं म्हणजे गिल्ट मधुन बाहेर पडण्याचा निगेटिव्ह मार्ग अवलंबणं, त्यातून मुलांचं बर्याचदा नुकसान होतं. अजून बरच काही आहे लिहायचं. सध्या माझा निबंध इथेच पुरा करते
आणि हो अजून एक, कोण म्हणतं
आणि हो अजून एक, कोण म्हणतं खंबीर माणसं डोळ्यात पाणी आणत नाहीत म्हणून? आणी आई हळवीच असते नी बाबा हळवे नसतात हे पण खर नाही रे. तेव्हा डोंट वरी.
मोदक... छान लेख...
मोदक... छान लेख...
कर्तव्यदक्ष पालक आणि कर्तव्यदक्ष कारकून म्हणजे तारेवरची कसरत... पैसा नंतरही मिळवू हो... सध्या गरज आहे ती मातीला योग्य आकार देण्याची... त्यासाठी एकाने काहीकाळ तरी पुर्णवेळ कुंभारची भूमिका पार पाडवी...
खूपच सुंदर लेख.
खूपच सुंदर लेख.
मोदक . खुप समजुतदार आई लाभली
मोदक
. खुप समजुतदार आई लाभली आहे तुला. खुप छान लिहीलयस ,मनाला भिडणारं. तुझ्यातला हळवा बाबा असाच जपुन ठेव.
हृदयस्पर्शी
हृदयस्पर्शी
मोदका, छान लिहीलयस.
मोदका, छान लिहीलयस. हृदयस्पर्शी....
नशीबवान आहात अशी समजून घेणारी
नशीबवान आहात अशी समजून घेणारी आई मिळाली आहे.आज माझ्यासारखे अनेक पालक असे आहेत ज्याना आपल्या पिल्लाला पाळणाघरात ठेवावे लागते.अगदी आमच्या मनातली खंत शब्दात मांडलीत.
़खुपच ह्रुदयस्पर्शी!
़खुपच ह्रुदयस्पर्शी!
your kid definitely needs
your kid definitely needs your time and I don't mean "Quality Time" (Is there any more of such BS word when it comes to child nurturing and raising............?) Your mom's is the best.
I second agau and dhanudi.
<<शेवटी माझी आई म्हणाली की
<<शेवटी माझी आई म्हणाली की "बास आता! राजसला ठसका लागेल! त्याला जेवताना हसवू नकोस. घशात घास अडकेल त्याच्या. जेवण झालं की मग करा हवी तेव्हढी मस्ती." तरी आमचा आपला दंगा चालूच होता. इतक्यात आई म्हणत होती तसेच झाले. राजसला जोरदार ठसका आला>>
बापरे.श्वासच रोखून धरला मी. .
उत्तम रीतीने व्यक्त झाला आहेस.
छान लिहिलं आहे मोदक !!
छान लिहिलं आहे मोदक !!
इथलं आधीच वाक्य मी
इथलं आधीच वाक्य मी एडीटतोय.
छान लिहिलस आवडलं
तुमच्या आईला सलाम. दिवसाचे १५
तुमच्या आईला सलाम. दिवसाचे १५ तास नातवंड सांभाळायच ही खरं तर शारिरीक आणि मानसीकही जबाबदारी आहे. आणि ह्याने दोन्हीला थाकावट येते. तुम्ही त्या बाबतीत नशीबवान आहात.
आणि डुआय म्हणतो त्याला अनुमोदन. वेळ का पैसा हा तुमचाच निर्णय आहे.
Pages