"झाडांना संवेदना असतात का?"

Submitted by जिप्सी on 20 May, 2010 - 07:32

शिर्षक वाचुन विचारात पडला असणार ना! अहो आहेच हा विषय थोडासा तरी विचार करायला लावणारा. आणि हा लिहायला कारणही तसेच घडले. मागे एकदा लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीमध्ये आलेला अभिनेत्री शुभांगी गोखले यांचा "शेवटची इच्छा" हा लेख वाचण्यात आला. त्यात त्यांनी आईच्या अंतिम इच्छेबद्दल लिहिले होते. आईच्या आजारपणात आईने जिवापाड सांभाळलेली त्यांची आवडती झाडे त्यांनी त्यांच्या एका मैत्रिणीकडे ठेवायला दिली होती. काहि दिवसानंतर त्यांच्या आईचे निधन झाले. हि गोष्ट त्यांनी आपल्या मैत्रीणीला कळवली असता त्यांनी सांगितले कि, "अग आईची सगळी झाडे अचानक जळुन गेलीत. काल संध्याकाळपर्यंत ठिक होती!!!! . . . . . . . .

सदर लेख वाचला आणि मागे एकदा एफएम गोल्डवर ऐकलेला एक कार्यक्रम आठवला. विषय होता "झाडांना संवेदना असतात का?" त्यात प्रेक्षक आपले अनुभव/किस्से फोन करून सांगत होते. त्यातील काही अनुभव/किस्से खरंच विचार करायला लावणारे होते. त्यातील काहि निवडक या लेखात मांडतो.

एका बाईने गुलाबाचे झाड विकत आणुन कुंडित लावले होते. ती त्याला रोज पाणी, खत वगैरे घालत असे. पण त्या झाडाची हवी तशी वाढ काहि होत नव्हती. हळुहळु ते झाड सुकु लागले. काही दिवसानंतर तीने ते झाड फेकुन देण्यासाठी काढले असता तिच्या शेजारणीने ते मागितले. त्या म्हणाल्या, "अग हे झाड तर पूर्णपणे वाळले आहे. त्याचा तुला काय उपयोग?". तरीही त्या शेजारणीने तिच्याकडुन हट्टाने ते सुकलेले झाड मागुन घेतले. तिच्याकडुन ते रोपटे घरी आणल्यावर पुन्हा ते कुंडित व्यवस्थित लावले. सकाळ संध्याकाळ त्याला नियमित पाणी घालु लागली. रोज पाणी घालताना ती त्याच्याशी गप्पा मारू लागली. "तुला हे घर नवीन, हि जागा नवीन आहे, पण तु घाबरू नकोस, मी तुझी पूर्ण काळजी घेईन," असे म्हणुन ती हळुवारपणे त्या सुकलेल्या रोपटयावर हात फिरवत असे. आणि काय आश्चर्य काही दिवसातच त्या रोपट्याला नविन पालवे फुटु लागली. काहि दिवसात ते पूर्ण बहरात आले.

दुसर्‍या एका व्यक्तीने सांगितलेला अनुभव असा होता कि त्यांच्या आजीने गावी एक झाड लावले होते. आजी नित्यनियमाने त्या झाडाला पाणी घालत असे आणि रिकाम्या वेळेत त्याच्याशी गप्पाहि मारत असे. कालांतराने त्या रोपट्याचे वृक्षात रूपांतर झाले आणि आजीशी त्याची मैत्री घट्ट होते गेली. ज्या दिवशी आजीचे निधन झाले त्या दिवसापासुन ते झाड उदास दिसु लागले. हळुहळु त्याची पाने गळावयास लागली आणि आजीच्या कार्याच्या दिवशी ते पूर्णपणे सुकुन गेले :(.

तिसरा अनुभव एका कॉलेजकन्येचा होता. कॉलेजमधुन घरी आल्यावर ती घराच्या बाल्कनीत जाऊन तासनतास झाडांशी गप्पा मारत बसायची. तिने सांगितले कि झाडांशी गप्पा मारताना तिला असे जाणवायचे कि तेहि अगदी समरसुन तिच्या गप्पा ऐकत आहेत आणि मध्येच पानांची सळसळ करून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहेत.

माझाहि अनुभव काहीसा असाच आहे. आमच्या इमारतीमध्ये एक जोडपं रहात होते. त्यातल्या काकींना झाड लावण्याची खुप आवड होती आणि तळमजल्यालाच घर असल्याने अनायसे भरपुर जागा मिळाली होती. त्यात त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची भरपुर झाडे लावली होती (जाईजुईचा मांडव घातला होता, त्या मांडवाखाली फुलांचा सुगंध घेत घेत लहानपणी आम्ही तासनतास खेळत बसायचो, गावठी गुलाब तर अगदी हाताच्या पंजाएव्हढे मोठे यायचे, काटेकोरांटी, जास्वंद, गुलाब यांनी त्यांची बाग सतत बहरलेली असायची). त्यांना स्वतःला मुलबाळ नसल्याने झाडांची अगदी स्वतःच्या मुलांसारखी काळजी घेत होत्या. त्यांनी अगदी सुकलेली फांदी जरी लावली तरी तिला पालवी फुटायची असा त्यांचा "हिरवा हात" होता. आज त्या काकी हि नाही आणि त्यांनी लावलेली ती झाडेहि नाहित. Sad

अशाच प्रकारचा एक अनुभव मी सध्या अनुभवत आहे. आमच्या शेजार्‍यांनी गुलाबी जास्वंद लावली होती, सुरुवातीचे काहि दिवस त्याला फुलं आली होती (मोजुन अगदी ५-७) नंतर अचानक त्या झाडाला फुलं येणे बंद झाले आणि झाड वेलीसारखे नुसतेच वाढत राहिले. ७-८ महिन्यापूर्वी त्यांनी ते झाड काढुन टाकले, त्यातलीच एक फांदि घेऊन मी कुंडीत लावली आणि आता ते झाड कळ्या फुलांनी बहरले आहे. रोज ३-४ फुलं मला पुजेसाठी मिळतात. अर्थात त्या रोपट्याची तशी जोपासनासुद्धा करतोय. याच गुलाबी जास्वंदीचे काहि फोटो मागे प्रकाशचित्र विभागात मी प्रवास कळीचा या शिर्षकांतर्गत टाकले होते. शेजार्‍यांनाही या गोष्टीचे आश्चर्य वाटते कि जेंव्हा हे झाड त्यांच्याजवळ होते तेंव्हा फुलं का नाहि फुलत होती (कदाचित याच्यामागे काहि शास्त्रीय कारणही असेल). आता तेच माझ्याकडे येत्या पावसाळ्यात कुंडित लावण्यासाठी झाडाची फांदी मागत आहेत Happy

मागे एकदा वाचनात आले होते कि, पूर्वी गावात हरतालिकेच्या/गौरीच्या पुजेसाठी जी पाने लागत ते तोडण्याआधी बायका, त्या झाडांची परवानगी घेत आणि विचारत, "आम्हाला गौरी/हरतालिकेच्या पुजेसाठी काहि पाने हवी आहेत ती आम्ही घेतो." :-).

"तारे जमींपर" या चित्रपटातसुद्धा अमीरने एका प्रसंगात झाडाच्या उदाहरणाचा उल्लेख केला आहे. कुठल्यातरी आदिवासी जमातीचे लोक झाड तोडण्याआधी त्या झाडाला मनसोक्त शिव्याशाप देतात, ते शिव्याशाप ऐकुन कालांतराने ते झाड आपोआप सुकुन जात असे आणि नंतरच ते त्याला कापत असे.

वरील उदाहरणे, अनुभव वाचुन/ऐकुन, अनुभव घेऊन खरंच मन विचार करायला लागले आहे कि, "झाडांना संवेदना असतात का?"

याहि विषयावर काहि मतमतांतरे किंवा शास्त्रीय कारणे असतील पण तुम्हीसुध्दा एकदातरी हा अनुभव घेऊन बघा. एखादे रोपटे कुंडित्/मोकळ्या जागी लावा. त्याची व्यवस्थित जोपासना करा. त्याच्याशी आपुलकिने वागा. जेंव्हा त्या रोपट्याला पहिल्यांदा फुलं/फळं लागतील तेंव्हा तुम्हाला होणारा आनंद अनुभवा. म्हणजे शिर्षकात असलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपसुकच मिळेल.

गुलमोहर: 

योगेश, काही वर्षांपूर्वी मी 'द सिक्रेट लाईफ ऑफ प्लान्ट्स' हे पुस्तक वाचले होते, ज्यात अनेक शास्त्रीय प्रयोगांच्या आधारे वनस्पती, झाडांमध्ये असलेल्या भावना, संवेदना, परस्परसंपर्कशक्तीवर केलेले संशोधन ग्रथित केले गेले आहे. खरोखरी एक अद्भुत जग आहे ते! झाडांच्या संवेदना, सहवेदनांचा अनुभव मलाही आलेला आहे. ह्यावर खूप लिहिण्यासारखे आहे. इथे अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद!

माहितीसाठी ही लिंक पहा : http://en.wikipedia.org/wiki/The_Secret_Life_of_Plants

ही व्हिडियो लिंक : http://video.google.com/videoplay?docid=4753736638977368381#

http://www.youtube.com/watch?v=wt3smrXkVpE

वरच्या उदाहरणांमध्ये नक्की कशामुळे झाडांच्या वाढीत बदल झाले ते (भावनीक न होता) सांगणे अशक्य आहे.

विकीवरुन मिळालेली माहीती....
झाडांना आपल्यासारखी इंद्रिय नसली तरी त्यांना chemicals, gravity, light, moisture, infections, temperature, oxygen and carbon dioxide concentrations, parasite infestation, physical disruption, and touch याची जाणीव असते व त्याला प्रतिक्रियादेखिल देतात... (जसं लाजाळूचं झाड)
http://en.wikipedia.org/wiki/Plant_perception_%28physiology%29

पण यापुढे जाउन झाडांना संवेदना असते (ती 'विचार' करतात.. advanced affective or cognitive abilities), असंही काही प्रयोगांमधुन सिद्ध झालंय (उदा. जगदीश चंद्र बोस)
http://en.wikipedia.org/wiki/Plant_perception_%28paranormal%29

झाडांना नक्की संवेदना असतात यात दुमत नाही. माझे सख्खे काका कुठुनही काहीही उचलून आणतात आणि कुंडीत लावतात त्याला हमखास पानं फुलं, फळं येतातंच. आम्ही लहान असताना त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन झाडं लावत असू, पण ती कधी वाचलीच नाहीत Sad
काकांनी केलेला अजून एक प्रयोग, गुलाबाच्या दोन वेगवेगळ्या काटक्या (अक्षरश: काटक्या) रोवून, त्याचं कलम केलं होतं. सुदैवाने दोन्ही काटक्या वेगवेगळ्या रंगाच्या असून सुद्धा त्याचं कलम झालं, आणि सुरेख गुलाब आला होता त्याला.
ग्रीन फिंगर्स आपण म्हणतो, पण त्या माणसाच्या संवेदना आपोआप झाडापर्यंत पोचतात. माझे काका ऑफिसातून आले की पहिल्यांदा गॅलरीत लावलेल्या कुंड्यांमधली झाडं तपासायचे मग पुढे सगळं. बोलायचे नाहीत ते कधी, पण झाडाच्या कुंड्यांजवळ तासनतास अबोल उभे असायचे... Sad

मला नक्की आठवत नाही, पण सुनीता देशपांडेंचा एक लेख मी लोकसत्ता मधे वाचला होता...अशाच आशयाचा.
तसेच इंग्रजीच्या पाठयपुस्तकात एक उतारा होता..झाडांवर संगीताचा परिणाम यावर केलेल्या प्रयोगांबद्दल.....
रॉक म्युझिक ऐकवले तर झाडे विरुद्ध दिशेला वाढतात्...तर क्लासिकल म्युझिक ऐकवले तर झाडे संगीतच्या स्त्रोताची दिशेने वाढतात. (जे झाडांना कळते ते माणसांना कळत नाही?)

हो, झाडांना क्लासिकल म्यूझिक आवडतं असं मीही वाचलंय कुठेतरी! Happy
वरच्या यूट्यूब व्हिडियो लिंकमध्ये एक जपानी बाई कॅक्टसना जपानी अल्फाबेट्स बोलायला शिकवते आहे, रशियन वैज्ञानिकांनी केलेल्या प्रयोगांमधून झाडांना त्यांच्या बांधवांना नष्ट करणारे लोक लगेच ओळखू येतात, त्यांच्यासमोर कोबी जरी कापला तरी त्यावर झाडे प्रतिक्रिया देतात, सिगरेटचा धूर त्यांना आवडत नाही, पॉलिग्राफ टेस्टमधून त्यांच्यातील संवेदना व सहवेदना कळून येतात हे दाखवले आहे.

सर जगदीशचंद्र बोस यांनी फार पूर्वीच ते सिद्ध केलंय.>>> अगदी पोटॅशियम साईनाईड चा प्रयोग करुन त्यांनी हे दाखवुन दिले होते. गुगल करा.

पिकांना संगीत ऐकवले कि ते चांगली वाढ करतात हे ही वेळोवेळी सिद्ध झालेले आहे!

डुकरांना रॉक ऐकवले कि ते पिकाकडे परत येत नाहीत, हे ही सिद्ध केले गेले आहे.:)

सर जगदीशचंद्र बोस यांनी फार पूर्वीच ते सिद्ध केलंय.>>> हो अगदी खरंय ते आणि माहितही आहे. एफएम वरच्या त्या कार्यक्रमाचे शिर्षक घेऊन हा लेख लिहिला आहे. Happy

संवेदना आणि नैसर्गीक प्रतिसादाची इथे गल्लत होते आहे. वनस्पती आपल्या आधी आल्या. त्यांची जगण्याची 'इच्छा' त्यामुळे जास्त प्रबळ असते. त्यांना संवेदना असतात हे सिद्ध झालेले नाही. विकिपेडीया वरील ज्या २ लिन्क्स वरती आहेत त्यावरही तेच म्हंटले आहे.

हवाईच्या व्हलकॅनीक रॉक्स मधे उगवलेले एक झाड

ह्या संदर्भात सुनीता बाईंचा ' सोयरे सकळ ' ह्या लेखातला काही भाग---------

आमच्या वाडीतली बहुतेक झाडे ही आईने स्वतः लावली होती , जपली होती. आम्हा मुलांइतकेच तिने त्या झाडांवरही प्रेम केले. कुणी आमच्याकडे कधी जरा अधिकच टक लावून पाहिले तर ती व्यक्ती निघून गेल्या गेल्या आई आमची दृष्ट काढून टाकत असे. तीच गोष्ट तीने वाढवलेल्या झाडांच्या बाबतीतही घडे. केळीचे लोंगर, आंबे, फणस पाहून त्यांच्या रसरशीतपणाचे, किंवा नारळाच्या आकाराचे , बहरलेल्या फुलझाडांचे कुणी असेच खूप कौतुक केले तर त्या त्या झाडाचीही आई दृष्ट काढी. मुलांना काळी तीट लावतात त्या प्रमाणे झाडांना फाटकी चप्पल बांधण्याचीही पद्धत होती. पण त्याहीपेक्षा म्हणजे फुले फळे काढताना, खतपाणी घालताना वगैरे आई त्या झाडांशी बोलतही असे. वर्षानुवर्षाच्या या सवयीमुळेच की काय कोणजाणे, ती झाडेही आईला ओळखू लागली होती असावी. आईची उंची माझ्याइतकीच होती. माझा हात जिथपर्यंत पोहोचे तिथपर्यंतच तिचा पोहोचे. पण त्याहूनही थोड्या अधिक उंचीवर असणार्‍या शेंगाही ती अनेकदा हातानेच काढू शकत असे. तिने शेंगाच्या दिशेने हात वर केला की फांदीही थोडी खाली झुकत असेल का ? त्याच वेळी वार्‍याची झुळूक येत असेल का ? वनस्पतीसृष्टी आणि जीवसृष्टी यांचे काही नाते असेल का ?

shugol तुमचे मनापासुन आभार सुनिताबाईंच्या लेखातला भाग इथे टाकल्याबद्दल. खुप सुंदर.
अकु/सॅम लिंक दिल्याबद्दल धन्यवाद.

खूपचं छान आहे हा विषय.

झाडांना संगीत आवडतं. झाडांना आपल्यासारखी nervous system नसते. त्यामुळे झाड कापले की त्यांना आपल्यासारख्या वेदना होत नाही.

जुन्या काळी एखादी गोष्ट सिद्ध (प्रमाणीत) करण्याच्या पद्धतींपैकी एक होती तज्ञांचा हवाला (म्हणणे, वक्तव्य या अर्थी).
तसे करणे चुकीचे होते, आणि चुकीचे आहे. वर ज्यांचे हवाले दिलेले आहेत ते तर तज्ञही नव्हेत. मुलांची दृष्ट कढणे हे झाडांची दृष्ट काढण्याइतकेच निरर्थक आहे. झाडांशी बोलुन त्यांना काही फायदा होत नाही. झाला तर बोलणार्या माणसांनाच होतो.

झाडांशी बोलुन त्यांची वाढ सुधरवण्याची पुढची पायरी म्हणजे त्यांना मंत्रोच्चार ऐकविणे. वेद ५ हजार वर्षांपेक्षा जुने नाहीत. झाडेझुडपे कोट्यावधी वर्षांपासुन पृथ्वीवर राज्य करताहेत. त्यांना तुमच्या आमच्या मदतीची गरज नाही. कुत्र्या-मांजरांची गोष्ट वेगळी.

योगेश, अरुंधती म्हणतेय ते पुस्तक आणि सिडी उपलब्ध आहे. अवश्य वाच.
अटेनबरो साहेबांच्या बर्‍याच सिडी आहेत. साध्या बाभळिच्या झाडाचा काटे असावेत कि नसावेत, याबद्दलचा "विचार" बघण्यासारखा आहे. (जिथे जिराफाचे तोंड पोचू शकत नाही, त्या मधल्या भागात बाभळीला, अजिबात काटे नसतात. )
मला झाडांचा सहवास मनापासून आवडतो, आणि ती मला प्रतिसाद देतात, असे मी अनुभवले आहे. पण असे अनुभव वैयक्तीक पातळीवर घेणे जास्त चांगले. मला आला म्हणून सगळ्यांनाच येईल असे नाही.
शुभांगी गोखले चा लेख मी पण वाचला होता

आजकाल तर शेतातल्या पिकांना संगीत ऐकवण्याचे प्रयत्न चालू आहेत. झाडांना एक जीव मानून त्याच्याशी संवाद साधण्यात कुणाचे नुकसान आहे असे मला वाटत नाही.

त्यांना संवेदना असतात हे सिद्ध झालेले नाही
>> मी वाचलेलं की बोसांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केलंय
In his research in plant stimuli, he showed with the help of his newly invented crescograph that plants responded to various stimuli as if they had nervous systems like that of animals. He therefore found a parallelism between animal and plant tissues.

आशिष,

उत्त्क्रांतीच्या सायन्स नुसार तुझा प्रतिसाद १००% पटतो परंतु त्यापल्याड मानवाच आपल्या आजुबाजूच्या निसर्गाशी (झाडांशी) सुद्धा नक्कीच कनेक्शन आहे, अस नाही का वाटत? We are all part of the same conciousness. ज्याला काळाच बंधन नसाव. मला तरी ते जाणवत.

झाडांची वाढ सुधरवाण्याकरता मंत्रोच्चार? ऐकाव ते नवलच!

मस्त आहे हा विषय. आवडला.

ग्रीन फिंगर्स आपण म्हणतो, पण त्या माणसाच्या संवेदना आपोआप झाडापर्यंत पोचतात.>>>
दक्षीणा तुला "ग्रीन थंब (किंवा ब्राउन थंब)" अस म्हणायच आहे का?

> We are all part of the same conciousness.

म्हणजे नेमके काय? आपल्या सगळ्यांची मने गुंफलेली आहेत? सगळे आत्मे एक आहेत या धर्तीवर का?

संवेदना म्हणजे काय हे आधी नीट मांडायला हवे. उदा. लाजाळुचा रिस्पॉन्स मेकॅनिकल असतो. चटका बसल्यावर आपला हात जसा मागे होतो तसा. त्या 'संवेदना' हार्ड-वायर्ड असतात आणि संवेदना नसतात. उंदराचा धक्का लागल्यावर सापळा जसा बंद होतो तसा.

बोसांनी पॅरॅललीझम दाखवली, सिद्ध नव्हते केले. सिद्ध अजुनही झालेले नाही. बॉटनी वाले आहेत का इथे कोणी?

लाजाळूच्या झाडाचा स्पर्शाला प्रतिसाद हा Seismonastic movement प्रकारात मोडतो. खूप कुतुहल असल्यास इथे वाचा. ही mechanical movement झाडातल्या physiological बदलांमुळे होते. त्याची तूलना चटका लागून हात मागे घेण्याच्या कृतीशी करता येईल की नाही याबद्दल साशंक आहे.

सविस्तर माहिती नंतर टाकते.

अशीच एक वनस्पती आहे, व्हिनस फ्लायट्रॅप. ती तर चक्क माश्या,कीट़क ई. आपल्या पानांत ट्रॅप करून स्वतः साठी वापरते. तीच्या द्विदल पानांत एखादी माशी शिरली की ते आपोआप मिटतात.
कालच ऑफिसमधे एका कलिग ने हि वनस्पती आणली , मी लगेच प्रयोग पण करुन पाहीला Happy

मला वाटते की वनस्पतींचे अ‍ॅडॉप्टेशन आणि आणि त्यांचा तथाकथित 'विचार' यात गल्लत होते आहे. झाडंचे बरेचसे रिस्पॉन्सेस हे बाह्य बदलांना तोंड देण्यापुरते मर्यादित आहेत,त्यात आपण ज्या पद्धतीने म्हणतो तसा विचार नसतो.त्यांच्या हलचालीही पेशींमधील भौतीक बदलामुळे घडून येतात जसे की पेशीत पाणी शिरणे वा बाहेर येणे.
उदा. कीटकभक्षी वनस्पती जिथे नायट्रेट्सची कमतरता आहे अशा दलदलीच्या जागी वाढतात आणि कीटक पकडणे हा नायट्रेट्सची गरज भागवण्याचा एक उपाय आहे.याचा अर्थ असा होत नाही की झाडे क्रूर वगैरे संवेदना दाखवतात.
वनस्पतींच्या वाढीवर ध्वनीलहरींचा परिणाम अनेकवेळा तपासला गेला आहे.पण यातील बहुतेक प्रयोग स्वतंत्ररित्या केले असता सुसंगत रिझल्ट्स मिळालेले नाहीत. बर्‍याचवेळा अशा प्रयोगातील वनस्पतींच्या रिस्पॉन्सचे कारण प्रकाश,तपमान,अन्न इ असते.हे सर्व घटक समान ठेउन प्रयोग केल्यानंतरच होणारा बदल ध्वनीमुळे होतो हे सिद्ध करता येईल.

खुप सुंदर लेख. पण सध्या कलियुग आहे तेव्हा झाडे हि भावनाप्रधान होत चाललि असावित तर माणुस भावनाहिन.

>मुलांची दृष्ट कढणे हे झाडांची दृष्ट काढण्याइतकेच निरर्थक आहे.
रीक्षा आली बरं का.... Happy

वनस्पती नैसर्गिक प्रतिसाद, मेकॅनिकल/ सेस्मिक मूव्हमेंट इत्यादी देत असतील तर त्या आधारावर मी वर दिलेल्या यूट्यूबच्या व्हिडियो लिंकमध्ये एक जपानी बाई कॅक्टसना जपानी अल्फाबेट्स बोलायला शिकवत आहे, आणि ते कॅक्टस त्याप्रमाणे प्रयत्न करत आहे, ते कसं, हे कोणी समजावून देऊ शकेल का? लिंक इथे पुन्हा देत आहे : http://www.youtube.com/watch?v=wt3smrXkVpE

गमतीदार प्रकार आहे खरा. सगळ्यांनी भाजीपाला खाणे थांबवायला हवे. प्राणी न खाण्यामागचे लॉजीक येथे देखिल लागु करायला हवे.

तो जो क्लिव्ह बॅक्स्टर आहे (व्हिडीओ मधील पॉलिग्राफवाला), त्याने आमच्याच कॅलिफॉर्नीयातील, पण मान्यता नसलेल्या ह्युमन सायन्सच्या ग्रॅजुएट स्कुल मधुन डिग्री मिळवली. त्याचे दावे मिथबस्टर्स नी फोल ठरविले आहेत. त्याचप्रमाणे 'स्केप्टिकल इन्क्वायररच्या १९७८ च्या एका अंकात क्मेट्झ यांनी बॅक्स्टरचा रिसर्च कसा(कसा) अयोग्य होता हे दाखविले आहे. '७५ व '७७ मध्ये २ लेख पण प्रसिद्ध झाले होते.

व्हिडीओ कशाचेही बनवता येतात. कशावर विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. म्हातारी मेल्याने ...

Horowitz, K. A., D.C. Lewis, and E. L. Gasteiger. 1975. Plant primary perception. Science 189: 478-480.

Kmetz, J. M. 1977. A study of primary perception in plants and animal life. Journal of the American Society for Psychical Research 71(2): 157-170.

Kmetz, John M. 1978. Plant perception. The Skeptical Inquirer. Spring/Summer, 57-61.

माझ्या लहानपणी मी कारल्याची एक वेल लावली. वर एक खिडा ठोकला आणि त्याला दोरा बांधूला. वेलीला हे बरोबर कळले की इथे दोरा आहे आणि मग ती त्या दोर्‍याभोवती वेढे घालू लागली. मला गम्मत वाटली की वेलीला डोळे कसे आहेत की इथे दोरा आहे हे कळले. मी मग खिळा आणि दोर्‍याची जागा बदललली. असे करुनही वेल अगदी जिथे दोरा आहे त्या दिशेने वाढू लागली. तितके लांब तिचे तंतू होत गेले. नक्कीच काहीतरी आहे ...

Pages