वानू - पीनल कोड - भाग ४

Submitted by bedekarm on 7 April, 2008 - 08:49

वानू वकीलाच्या घरच्या अन्नावर मोठा झालाय. आता त्या अन्नाचा गुण वान्यालाही लागणारच. वकीलांच्या संगतीत राहून त्यांच्या दिवाणखान्यातल्या गप्पा ऐकून वान्याला चांगल्यापैकी कायद्याचे ज्ञान झाले आहे. वानूने स्वतःचे असे स्वतंत्र पीनल कोड तयार केलेले आहे. या मधे प्रत्येक गुन्ह्याची व्याख्या, त्या साठी शिक्षेची तरतूद आहे. पण माफीचीही सोय नाही. या कायद्याला बारीकशीही पळवाट नाही. कायद्याचे अज्ञान हा डिफेन्स तुम्ही घेऊ शकत नाही. वानूची कायदा फार कडक आहे. भले भले येउन वान्याच्या परवानगीसाठी दाराशी तिष्ठत उभे असतात.

वानूला लहान मुल खूप आवडतात. वानू खूप प्रेमाने त्यांच्याशी वागतो. अगदी त्यांनी शेपूट धरली, कान ओढले, नाकाला हात लावून बघितला, तरीही वानू गरीबपणे उभा राहून मुलांना प्रेमाने वागवतो. पण याला वयाची अट आहे. ० ते ६ या वयोगटासाठी ही सूट आहे. ६ ते१६ वयोगटातील मुलांनी मात्र शाळेतून जाता येताना आमच्या कंपाउंड किंवा गेटपासून किमान तीन ते चार फूट अंतर सोडून जायला पाहिजे. नाहीतर भुंकून गुरगुरून त्यांना त्यांची जागा दाखवतो. कारण ही मुल झाडाची फुल तोडतात, गाडीला हात लावतात, बदामाखालचे बदाम गोळा करतात.

घरामधे कुणाही अनोळखी इसमाला प्रवेश नाही. मग आम्ही त्या माणसाला आत घेतले, त्याच्याशी बोललो, आणि एकूण सगळा सुरळीत व्यवहार आहे ही खात्री पटली तर मग पुढच्या वेळेस त्या माणसाला सहजपणाने गेटपास मिळतो. काही माणस मात्र एकदम सज्जन असतात अशी खूप शांत व गरीब स्वभावाची माणस याला अपवाद आहेत. अशी माणस आम्हाला अनोळखी असली तरीही वानू त्यांना ओळखतो आणि आत सोडतो. पण काही माणस लबाड, धोकेबाज असतात. ही माणस कितीही वेळा आली तरीही वानू त्यांना गुरकावतो. वानूला मनुष्यस्वभावाची चांगली पारख आहे. कित्येक अनोळखी माणस लबाड आहेत का सज्जन आहेत हे आम्हाला वान्याच्या रिऍक्श्न्सवरुन, ती दारात बघूनच समजते.

घरातल्या प्रत्येकाने आपापल्या कामाच्या जागेवरुन थेट घरी आले पाहिजे. जर कुणीही आपल्या नेहमीच्या कामाच्या ठिकाणांवरुन, कॉलेजमधून किंवा नेहमीचे मित्रमैत्रिणी सोडून इकडे तिकडे गेल तर घरी आल्या आल्या वानू चेक करत असे. अगदी घरी आल्यावर बदलून, काढून टांगलेल्या कपड्यांचीही तपासणी होत असे. गम्मत म्हणजे मुलांना वानूची ही सवय माहीत नव्हती. मी अगदी सहजपणाने मुलांना आज उशीर का झाला, कुठे गेला होता का असे विचारी. आपण इकडे तिकडे कुठे गेलो किंवा नवीन मित्रमैत्रिणींना भेटलो तर आइला कसे कळते अस मुलांना वाटायच. मुल आणि नवरा यांच्यावर वानूच्या मदतीने मी खूप दिवस स्पाइंग केलेले आहे. मी वानूची ही मजा डॉक्टर परिचारकांना सांगत होते. मी सांगत होते की, समजा आपण ऑफिसमधून घरी येताना हळ्दीकुंकवाला गेलो, तर बायकांच्यात मधे बसतो की नाही, तर घरी आल्यावर लगेच वानू आपली तपासणी करतो. मी बायकांच्या मधे आपण बसतो की नाही, असे म्हटल्याबरोबर डॉक्टरांनी मला मधेच अडवत म्हटले, अस नका हो म्हणू, मला अगदी बायकांमधे बसल्यासारख वाटतय.

आमच्या घरात ग्रीनहाउस होत. शाळेतली मुल हे ते डे साजरे करायला आमच्याकडून फुल विकत नेत असत. एरवी शाळेतल्या मुलांवर भुंकणारा वानू त्यांच्याकडे पैसे आहेत व ती फुल विकत घेणार आहेत हे समजून गप्प उभा राही. वान्याची समज खरच अजब आहे.

ग्रीनहाउसमधे कामाला येणारा बसू दिवसभर वान्याची देखभाल करतो. वान्याला हिंडवून आणतो. जेवायला बसला की त्याच्या डब्यातले दोन घासही वानू खातो. घराच्या बाहेर कंपाउंडमधे, ग्रीनहाउसमधे कुठेही बसू फिरु शकतो. पण चुकून जरी बसू व्हरांड्याची पायरी चढला तर वानूला खपत नाही. वानू लगेच अंगावर धावून जातो. बसूने गाडी बाहेरून धुण्याला वानूची हरकत नाही पण गाडीचे दार मात्र उघडायला बसूला परवानगी नाही. कामाच्या नादात कधी कधी बसू हे कायदे विसरुन जाइ पण वानू जागरुक असे. शेवटी कायदा म्हणजे कायदा. त्यापुढे शहाणपण नाही.

पोळ्यांना येणारी जयाबाइ सकाळी आली की वानू तिच्यामागोमाग आत येऊन बसतो, मला वाढा म्हणून. तिची मर्यादा किचनपर्यंत. ती जर काही कामासाठी मागच्या रुम्समधे जाउ लागली तर वानू तडक उठून तिच्या मागेमागे हिंडतो. ती जोवर तिथून बाहेर पडत नाही तोवर हा तिची पाठ सोडत नाही. तिचा व्हीसा हॉलकिचनपुरताच मर्यादीत आहे. बाकी ठिकाणी तिला सिक्युरिटी खाली जावे लागते.

घरात पाहुणे आलेले वानूला जाम आवडतात. लाडाने त्यांच्याजवळ जायला बघतो. सगळे गप्पा मारताना त्याला मधोमध बसायला फार आवडते. वान्याला पाहुणे आवडतात पण त्यांना वानू आवडेलच अस काही नाही. मग मात्र फार पंचइत होते. बाहेर बांधून ठेवावे लागते. हा अपमान वानूला सहन होत नाही. भुंकून घर डोक्यावर घेतो. पण बहुतेकांना वानू आवडतो, नसला आवडत तर आम्ही त्याच्याकडे पद्धतशीर दुर्लक्ष करतो आणि वानूला आमच्यात घेतो. शिवाय वर त्यांनाच तो तुमचा फक्त वास घेइल, का---ही करणार नाही वगैरे मखलाशी करतो. सगळे गप्पा मारत असताना वानू मधोमध बसून राहतो. अधूनमधून जर कुणी वान्याचा विषय बोलल तर भॉक करून प्रतिसाद देतो. एक्दोनदा तर मुद्दाम वानूचे नाव न घेता आम्ही वानूविषयी बोललो. तरीही वानूला बरोबर समजले. लगेच प्रतिसाद दिला.

पाहुणे घरात आहेत तो पर्यंत वानू त्यांच्याशी फार प्रेमाने वागतो. ते परत जाण्यासाठी बॅगा भरु लागले की त्यांना कळणारही नाही अशा पद्धतीने त्यांच्या बॅगा तपासतो. माझ्या श्वानप्रेमी वहिनीने मला वानूची ही खुबी दाखविली. पाहुण्यांचे सामान वान्याच्या स्कॅनमधूनच बाहेर पडणार. एकदा माझा माहेरचा गोतावळा, जवळ जवळ पंधरा जणी आमच ग्रीनहाउस बघायला आल्या होत्या. यातील एक बहीण व भाची वान्या लहान असताना आमच्याकडे आल्या होत्या. वानूने एवढ्या सगळ्याजणीत लगेच त्या दोघींजवळ जाऊन शेपूट हलवून ओळख असल्याचे सांगितले. दोन दिवस त्या सर्वांमधे वानू अगदी लगीनघाइ असल्यासारखा वावरत होता. नंतर त्या परत जायला बॅगा भरायला लागल्यावर सगळ्यांच्या बॅगेतील प्रत्येक वस्तू तपासत होता. मी त्याची मजा काकूला दाखवली. तोपर्यंत कुणाच्याही लक्षात आले नव्हते. काकू मला म्हणाली, मी तुझे कपाट उघडून एखादी वस्तू माझ्या बॅगेत भरु का? बघू वान्या काय करतो ते. मी म्हटल हाय रिस्क कन्सेन्ट खाली तू काहीही करु शकतेस.

घराची साफसफाइ करायला येणार्‍या भाभीने बाजूला सरक म्हटलेले वानूला आवडत नाही. तिच्यावर गुरकावून हा हक्क तिला नसल्याची समज वानू तिला देतो. मग आम्ही कुणीतरी उठ म्हटले तर नाइलाजाने उठतो. घरात, वावरात कामाला येणार्‍या कुणीही डोक्यावर काही घेतलेले वानूला संशयास्पद वाटते, आणि वानू अशा माणसाचा पाय हळूच मागे जाउन पकडतो. घरी कामाला येणार्‍या प्रत्येकाला हे सगळे कायदे लक्षात घेउनच काम करावे लागते.

घरामधे निवांतवेळी बासरी वाजवत तो(माझा नवरा) बसतो. वानू पायाशी मुटकुळ करुन भक्तीभावाने बसलेला असतो. याच बघून शंतनूलाही बासरी वाजवण्याची प्रेरणा मिळाली. दोन चार दिवस क्लासही झाला. पुढे जमेना. पण तेवढ्यात शंतनू पधसाधप अस भूप रागात वाजवायला शिकला. हा बासरी वाजवताना शांत बसणारा वानू शंतनूने पधसाधप वाजवायचा अवकाश, वानू सात्विक संतापाने भुंकू लागतो. मग आम्ही शंतनूची चेष्टा करतो. घरात बासरी वाजवण्याचा हक्क शंतनूचा नाही हा वानूचा नियम आहे.

वानूला बजाज स्कूटरचा आवाज अजिबात आवडत नाही. बजाज स्कूटर दारावरुन गेली की वानू चिडतो. कॉलनीतल्या नणदीकरांकडे बजाज होती. ते दारावरुन जायला लागले की त्यांच्यावर वानू जाम ओरडतो. एक दिवस नणदीकर म्हणाले, वकीलसाहेब कुत्रा बदला, तर वकीलसाहेब म्हणाले, नणदीकरसाहेब तुम्हीच स्कूटर बदला. पुढे नणदीकरांनी गाडी बदलली आणि वानू त्यांच्यावर भुंकेनासा झाला. वानू कदाचित मागच्या जन्मी बजाजचा बिझनेस रायव्हल असावा.

आमच्या हातून चुकुनही कुठल दार उघड राहिल, किंवा कंपाउंडमधे फट राहिली तर वानूने आम्हाला कधीही माफ केले नाही. वानू क्षणात पसार होतो आणि त्या क्षणापर्यंत आमच्याशी एकनिष्ठ असलेला वानू एकदम स्वतंत्र होतो. आमचे काहीही ऐकत नाही. वानू स्वातंत्र्यप्रिय आहे. आणि पारतंत्र्यातल्या जनतेला स्वातंत्र्य न देण्यासाठी जी जी कारणे जेते सांगतात, त्या सगळ्या कारणांमुळे आम्ही वानूला हे स्वातंत्र्य देउ शकत नाही.

गुलमोहर: 

खूपच मस्त लिहीताय तुम्ही .. छान वाटतंय वाचायला .. Happy

फिदा!

तुमच्या वान्यावर आणि तुमच्या लेखनशैलीवर बेफाम फिदा आपण! कसमसे! झक्कासच लिहिताय. हे जतन करून ठेवा... एक जबरदस्त 'व्यक्ति'चित्रण आहे Happy

मस्त! रोज उठल्यावर वान्याचा पुढचा भाग पोस्टलाय का हे बघत असते मी हल्ली....

सुरक्षारक्षक वानू. बर्‍याचश्या ठिकाणी असे वानू आढळतात. परंतू तरीही तुमचा हा वानू एकमेव. तुमच्या लेखनशैलीला तोड नाही. खुपच बारकाईने लिहीले आहे. परत परत वाचावे असे लेखन.

छानच आहे तुमची लेखनशैली. मजा येतेय वाचायला.

खूप छान लिहिलय. आमच्याकडे लुई आहे त्याचा हा चुलत भाऊ वाटतो . कारण खूपश्या गोष्टी दोघान्च्या सारख्या आहेत.

मस्त लिहीताय मीनाताई. मी खरंतर pets-person नाहीये, पण तुमच्या वान्याशी दोस्ती होत चालली आहे. Happy

खरतर, मला कुत्र्न्याची खुप भिति वाट्ते....... पण तुमचा वान्या मला खुप आवडला........इतका की त्याच्याशी मैत्री करावीशी वाट्ते.
खुप छान लिहीत तुम्हि...........

वानु आजच पाहिला. आवडतोय वाचायला.
मला आमच्या चिनुची आठवाण झाली. तीचे पण अगदी असेच सगळे कायदे होते.
गम्मत म्हणजे ती मामा, मावशी, मावसबहिण ह्या आईच्या माहेरच्यांवर कध्धी म्हणजे कध्धीच ओरडली नाहि. ते आले कि अगदी लाडाने शेपुट हलवित त्यांना भेटायची. बाबा नेहेमी आईला म्हणायचे 'हि नक्की तुझ्या माहेरची आहे' Happy

घराची साफसफाइ करायला येणार्‍या भाभीने बाजूला सरक म्हटलेले वानूला आवडत नाही. तिच्यावर गुरकावून हा हक्क तिला नसल्याची समज वानू तिला देतो.>>>>

आमच्याकडे सुरवातीला हा प्रकार झाला पण शेवटी मावशींनी त्यांच्या पद्धतीने प्रश्न हँडल केला
ओडीन जवळ येताच त्यांनी झाडू उलटा केला आणि छानपैकी पाठीत हाणला
तेंव्हापासन या भयंकर बाईपासून आपल्याला जपून राहील पाहिजे हे त्याने नोटीस केलं
आता त्या आल्या की आदर देत उभा राहतो, आपली झोपायची जागा झाडून पुसून झाली की परत येऊन बसतो
आणि मग पार शेपटी हाताने वर करून खालून झाडू मारला तरी अजिबात हरकत घेत नाही Happy