राखणदार !

Submitted by कवठीचाफा on 13 September, 2008 - 16:13

गौरव चालता चालता अचानक थबकला. डोक्यातली कलकल पुन्हा चालु झाली होती. या पुढे काय होणार हे त्याला अनुभवाने माहीत झाले होते. फ़रक फ़क्त इतकाच की या पुर्वी त्याला आलेले अनुभव हे असे भर रस्त्यात गर्दीच्या ठिकाणी आले नव्हते. chafya.jpgपुढे काय घडणार याची कल्पना येताच त्याही अवस्थेत तो भांबावला. कारण होणारी ती घुसमटल्याची जाणिव. शरीरातली एखादी महत्वाची शक्ती पिळून काढल्या जाण्याची जाणिव. सहाजीकच त्यानुसार होणार्‍या प्रतिक्रीया चारचौघात सामान्य नक्कीच दिसल्या नसत्या.
गौरवने आजुबाजुला पाहीले, जवळच एक रेस्टॉरंट होते. एकंदरीत त्याच्या रंगरुपावरुन तिथे आत्तातरी फ़ारशी गर्दी नसणार हे स्पष्ट जाणवत होते. कसेबसे आत शिरुन त्याने एका कोपर्‍यातले टेबल गाठले. एक लिम्काची ऑर्डर देउन तो डोकं हातात गच्च दाबुन बसुन राहीला. वेदनेची आवर्तने येत राहीली, तीच शरीरद्रव्य शोषले जाण्याची यातना, तेच कुणीतरी घसा आवळल्यासारखी होणारी जाणिव. एकदाचं ते सारं थांबल मागे घामाने ओथंबुन जाणार्‍या कपाळा खेरीज काहीही दृष्य खुणा न ठेवता. त्याने आत्ता पर्यंत आवळुन धरलेले डोक्यावरचे हात बाजुला केले आणि घामाने डवरंलेला चेहरा वर केला. टेबलावरची लिम्काची बाटली एव्हाना कोमट झाली होती म्हणजे या वेळी कदाचीत फ़ार वेळ हा प्रकार सुरु राहीला होता तर. कोमट झालेल्या लिम्क्याच्या बाटलीला स्पर्शही न करता समोरच्या बशीत त्याने विसाची नोट टाकली आणि बाहेर निघाला.

या प्रकाराची खरी सुरुवात जाणुन घेण्या आधी आपल्याला जरा गौरवच्या भुतकाळाकडे नजर टाकावीच लागेल. शाळा आणि कॉलेजातही गौरव अभ्यासात फ़ारसा पुढे जरी नव्हता तरी पार मागे रहाणार्‍यातलाही नव्हता. मात्र पहील्यापासुन तो खेळात आघाडीवर असे. भिती हा शब्द कदाचीत त्याच्या आयुष्यात लिहायला देव विसरला असावा. `बिनधास्त' असेच त्याचे वर्णन करायला लागेल. कदाचीत याच बिनधास्त स्वभावामुळे तो अंधश्रध्दा निर्मुलन समितीचा सदस्य झाला. भर दिवसाही ज्या जागी जाताना सर्वसामान्य माणसाच्या काळजाचे ठोके गरजेपेक्षा जास्त पडायला लागतील अश्या जागांना तो भर रात्री भेटी द्यायला लागला. तिथे त्याला जे त्या ठिकाणचे वास्तव दर्शन होत असे त्यावरच तो आपली मते ठरवत असे, इतरांना सांगत असे. भोंदु बाबांच्या मठांना भेटी देउन त्यांच्या शिष्यांसमोर त्यांना आव्हान देत असे. इतके सारे करुनही त्याच्या बाबतीत काहीही अघटीत असे घडलेले कुणी पाहीले नव्हते. अल्पावधीतच तो समितीचा मान्यवर कार्यकर्ता झाला नसता तरच नवल. पण या सार्‍याचा कदाचीत त्याला लवकरच कंटाळा आला. त्याचे लक्ष आता `सर्पमित्र' संघटनेने वेधले. सहाजिकच गौरवने तेथे प्रवेश मिळवला. आता त्याच्या फ़ेर्‍या आजुबाजुच्या रानात व्हायला लागल्या. एकंदरीत सापांची माहीती मिळवल्यावर त्यांना पकडण्याचे तंत्र आत्मसात करणे त्याला जड गेले नाहीच. एक उत्तम सर्पमित्र म्हणुन त्याला वेळी अवेळी साप पकडण्यासाठी बोलावले जाउ लागले आणि तो ही आनंदाने जात राहीला.

शिक्षण संपले आणि पदरी आली ती नेहमीचीच नोकरीसाठीची वणवण, फ़ार नसेल पण लक्षणीय नक्कीच होती. अखेर एकदाची त्याला एका प्रायव्हेट फ़र्म मधे नोकरी मिळाली आगदी भरमसाठ नसला तरी चांगला पगारही मिळत होता. एकंदर अशी परीस्थीती जेंव्हा मुलाच्या बाबतीत होते तेंव्हा त्याच्या आई वडीलांना जी स्वप्ने पडु लागतात तीच त्याच्याही आईवडीलांना पडायला लागली. आडुन आडून लग्नाबद्दल विचारणा व्हायला लागताच त्यानेही मुली पहाण्यास होकार दिला. जणु याचीच वाट पहात असल्यासारखा त्याच्या आईवडीलांनी त्याच्यावर सांगुन आलेल्या स्थळांचा वर्षाव सुरु केला. आजकाल बहुतेकवेळा त्याचे शनिवार रविवार कुठल्या ना कुठल्या `स्थळा'कडे कांदेपोहे खाण्यात जायला लागले. या सगळ्या प्रकारात नेहमीच होत असलेली थोडी अतिशयोक्तीची स्तुती ऐकताना त्याला आपल्या छंदांची आठवण झाली नोकरी आणि घर या चक्रात अडकलेल्या गौरवचे आपल्या सर्पमैत्रीकडे थोडे दुर्लक्ष होत होतेच पण आगदी पार दुर्लक्षही झाले नव्हते. चुकुन माकुन घराजवळच्या एखाद्या ठिकाणी अवेळी निघालेल्या सापाला तो आजही पुर्वीच्याच चपळाईने पकडत होता. कदाचीत त्याचे पुर्ण दुर्लक्ष झाले असते तर कदाचीत हा पुढचा यातनामय कालखंडही त्याच्या आयुष्यात आला नसता.

विशाखा, गौरवची नवपरीणीत वधु. अनेक स्थळे पाहील्यावर, अनेक कुंडल्या पालथ्या घातल्यावर त्याचे आणि त्याच्या आईवडीलांचे ज्या मुलीवर एकमत झाले ती ही विशाखा. जरी शहरात रहात असली तरी तिचे मुळ गाव कुठेतरी दुर कोकणातल्या खेड्यात होते. तिचे काका आता तिकडे रहात होते. यथासांग लग्नसोहोळा पार पडला आणि नवदांपत्याचा नव्या नवलाईचा संसार चालु झाला. लग्न हा जरी मोठा सोहोळा असला तरी त्यात लहान सहान अश्या अनेक रुढींची मालीका असते हे जवळपास सर्वांनाच माहीत आहे. माणसे आपापल्या परीने त्या पाळण्याचा प्रयत्न करत असतात. सत्यनारायणाची पुजा घालणे, देवीचा गोंधळ घालणे, हे आणि आणखी इतरही अनेक. त्यानुसार विशाखाच्या घरच्या मंडळींनी देवीचा गोंधळ घालण्याचा कार्यक्रम ठरवला यात गौरव किंवा त्याच्या आईवडीलांना वेगळे असे काही वाटले नाही. आता देवीचा गोंधळ हा त्या गावी जाउन प्रत्यक्ष देवीसमोरच करायचा असतो. त्या प्रमाणे ठरल्या दिवशी गौरव आणि सारे कुटूंबीय विशाखाच्या गावी जाण्यास निघाले.

विशाखाचे गाव खेडे जरी असले तरी कंटाळवाणे नक्कीच नव्हते याची तेथे पोहोचल्या पोहोचल्या गौरवच्या मनाने नोंद घेतली. गोंधळाचा कार्यक्रम उरकल्यावर राहीलेले सुटीचे दोन दिवस त्या निसर्ग सानिध्यात मजेत जाणार होते. नाहीतरी शहरात हे असे निर्भेळ निसर्ग सौंदर्य अनुभवण्याची संधी मिळणे दुरापस्त असते आणि जे मिळते त्याला कृत्रीमतेची झाक असते. सहाजीकच त्याला असे वाटणे स्वाभाविकच होते.

मुहूर्तानुसार ठरल्या दिवशी गोंधळाचा कार्यक्रम पार पडला. दिवसभराच्या दगदगीने थकलेले नवदांपत्य संध्याकाळची जेवणे आटोपल्यावर आपल्या कुटूंबीयांसोबत गप्पा मारत बसले होते. विषयातुन विषय निघता निघता तो कोकणातल्या कुप्रसिध्द भुताखेतांकडे आणि मंत्रतंत्राकडे वळला. त्यासरशी गौरवच्या मनात इतके दिवस कोंडून राहीलेला बिनधास्तपणा उफ़ाळुन आला. विशाखाच्या काकांचे जवळपास सगळेच मुद्दे तो खोडून काढत राहीला. या वादविवादात वेळ भुर्रर्रकन निघुन गेला आणि सारी थकलेली शरीरे विश्रांतीसाठी उठली.
" जावई बापु, पहाटे किंवा तिन्हीसांजा झाल्यावर जर मागे आमराईच्या रानात जायचे असले तर घरातले कुणितरी बरोबर घ्या हो!" विशाखाचे काका उठता उठता म्हणुन गेले.

" का बरं? तिथे असं काय आहे साधं आंब्यांच्या झाडाखाली वाढलेलं गवत तर आहे." गौरवने आश्चर्य व्यक्त केले.
" तुम्हा शहरातल्या माणसांना नाही कळायचे ते पण तरी सांगतो तिथे आपला राखणदार आहे"
" ओहऽऽ, राखणदार, तो काय मला आत सोडणार नाही का? त्याला मी तुमचा जावई असल्याचे माहीत नाही का? नसेल तर मी सांगेन कुठे आहे ती राखणदाराची खोली?"

" तसा आपल्यासारखा माणुस नाही हो तो कसं सांगु जावईबापु तुम्हाला तो पिढ्या न पिढ्या आमच्या आवाराची राखण करणारा भुजंग आहे या घरातल्या माणसांशिवाय तो कुणालाच आवारात पाउल टाकु देत नाही."
" साप आहे म्हणता?" आता गौरवच्या आवाजात गंमत वाटत असल्याचे भाव आले होते. " मग तो माझे काहीच वाईट करु शकणार नाही कारण मी एक नावाजलेला सर्पमित्र आहे" त्याने अभिमानाने स्पष्टीकरण दिले.
"आहो,जावईबापु हा साधासुधा भुजंग नाही गेल्या कित्येक पिढ्या तो आमचे आणि आमच्या आवाराचे रक्षण करत आलेला आहे."

"काका, एक सर्प काय आपले रक्षण करणार ? आपल्यापासुन त्याला स्वतःचे रक्षण करता येत नाही" आता गौरवच्या स्वरात उपहास होता.

" आमच्या गेल्या कित्येक पिढ्या त्यालाच राखणदार म्हणुन पहातायत"

"आणि असे कैक महाविषारी सर्प आमच्या शहरात काचेच्या पेटीत बंदिस्त दिसतात." पुन्हा उपहासपुर्वक गौरव म्हणुन गेला.

" जावईबापु या शहरातल्या गोष्टी झाल्या, इथे खेड्यात काही काही गोष्टी मान्य कराव्याच लागतात" त्याच्या उपहासाकडे दुर्लक्ष करत काका शांत स्वरात म्हणाले आणि पुढचा वाद टाळण्यासाठी त्याला त्याच्या खोलीपर्यंत सोडण्यासाठी चालायला लागले.

इतकी गरमागरम चर्चा झाल्यावर वादावर तात्पुरता पडदा पडला. परंतु ह्या सगळ्या प्रकारामुळे गौरव मधली बेधडक वृत्ती उसळुन आलीच. त्याने या राखणदाराला जेरबंद करुन सगळ्यांसमोर आणण्याचा मनोमन निश्चय केला.

दुसर्‍या दिवशी पहाटेच उठुन गौरव अमराईकडे निघाला. तिथे जाताना त्याच्या मनात विचार होते ते म्हणजे एकतर हा राखणदार नावाचा प्रकार आपल्याला पहायलाच मिळणार नाही कारण भुजंग म्हणजे कदाचीत तो अस्सल नाग असावा असे सर्प सहसा माणसाच्या वावरापासुन दुरच रहातात. पण चुकुन गाठ पडलीच तर असावी म्हणुन त्याने घराबाहेरच्याच तोडुन आणलेल्या लाकडांमधुन एक बेचके असलेली काठी शोधुन काढली. स्नेक कॅचर सारखा तिचा उपयोग होणार होता. आमराईच्या आवारात प्रवेश करताना त्याच्या मनात तोच कॉलेजमधे असतानाचा जोष संचारला. समोर दिसणार्‍या दाट फ़ांद्यांच्या आम्रवृक्षांकडे पहाताना आत्ता त्याचे मन मोहरुन वगैरे जात नव्हते. तर त्याची नजर सारखी भिरभिरत होती. बराच वेळ सारी आमराई पालथी घातल्यावर आता आजची खेप वाया गेली असे समजुन तो परत निघाला. जर घरातल्या कुणाला तो कुठे गेला आहे हे कळले असते तर त्याला पुन्हा असे एकट्याला इकडे येता आले नसते. कंटाळुन तो परतीच्या दिशेला वळला आणि अखेर तो ज्याचा शोध घेत होता तो त्याला दिसला. दहा ते बारा फ़ुटी पिवळा सरसरीत नाग, `नेहमी पेक्षा मोठा नक्कीच आहे पण कदाचीत याचं वयही जास्त असेल, इथे अशी राखणदार म्हणुन पदवी मिळाल्यावर तेही सहाजीक आहे नाहीतर एव्हाना याचे आयुष्य कधीच संपले असते.' गौरव मनाशी विचार करत राहीला. फ़णा उभारलेला नाग जर मनातली भिती बाजुला ठेवता आली तर खरंच खुप सुंदर दिसतो. त्याच्या निरीक्षणातुन भानावर येत गौरवने आपल्या महत्वाच्या कामाकडे लक्ष वेधले. आत्तापर्यंत मिळवलेले सगळे कौशल्य पणाला लावुन त्याने त्या सापाचे लक्ष आपल्या डाव्या बाजुकडे वेधायला सुरुवात केली. त्याचा फ़णा तिकडे वळताच शक्य तितक्या चपळाईने त्याने उजव्या हातातली बेचके असलेली काठी त्या नागाच्या फ़ण्यावर दाबत फ़णा जमिनीवर खिळवला. थोड्या झटापटीनंतर त्याने नागाच्या शेपटावरही पकड जमवली. नऊ दहा किलोचे ते धुड हातावर पेलत गौरव घराकडे आला.
एव्हाना घरातल्या सगळ्यांच्या लक्षात त्याची अनुपस्थीती आली होती. त्याचीच शोधाशोध चालु होती. त्याला असा हातात साप घेउन येताना पाहून सगळेच चमकले. त्याच्या हातातला साप म्हणजे आपला राखणदार असल्याचे पाहुन विशाखाच्या काकांच्या हातात असलेला पाण्याचा गडू हातातुन निसटून ठण्णकन जमिनीवर पडला. काहीतरी अघटीत पहात असल्यासारखे घरातले सगळे त्याच्याकडे पहात राहीले.
" जावईबापु काय अक्रीत केलेत हे" आजुबाजुच्या शांततेला चिरत काकांचा कापरा आवाज आला.
" हो ना ! राखणदाराला दुखावलत तुम्ही " पटकन कुणितरी बोलुन गेले.
या सगळ्यांकडे लक्ष देण्याची गौरवला गरज वाटत नव्हती. त्याने आधीच बाजुला काढून ठेवलेल्या गोणीत त्या सर्पाला कोंबले आणि ताबडतोब मोबाईल वरुन मित्राला फ़ोन केला. हा त्याचा मित्र शहरातल्या एका प्रख्यात वैज्ञानिक संस्थेत काम करत होता. ही संस्था विषप्रतिबंधक लसीही तयार करत होती. तिथे कदाचीत या सापाचा जास्त चांगला उपयोग होवु शकणार होता. इतक्या वाढीच्या नागापासुन मिळणारे विषही बरेच असणार होते. लसी बनवण्यासाठी ते चांगलेच उपयोगी ठरणार होते.
गौरवचा फ़ोन मिळताच त्याच्या मित्राने ताबडतोब आपले सोर्सेस वापरुन लवकरात लवकर तो नाग शहराकडे रवाना करण्याची तजविज केली. त्या प्रमाणे तासाभरातच वनविभागाची जीप गौरवच्या सासरवाडीला येउन थडकली. पण या तासाभरात गौरवने त्या नागाला पुन्हा सोडून द्यावे यासाठी सासरवाडीतल्या सर्वांनीच त्याच्या खुप विनवण्या केल्या. विशाखाने त्याला आपली शपथ देखील घातली पण एकेकाळी अंधश्रध्दा निर्मुलन समितीचा धडाडीचा कार्यकर्ता असलेला गौरव अश्या गोष्टींना आजिबात महत्व देत नव्हता. आणि एकदा वनखात्याने त्या नागाचा ताबा घेतल्यावर त्याला पुन्हा सोडून देण्याची उरलीसुरली शक्यताही नष्ट झाली. वनखात्याची माणसे नागाला घेउन गेल्यावर घरात एक विचीत्र शांतता पसरली. जणु घरातले कुणीतरी गेले असल्यासारखे वातावरण दिवसभर घरात राहीले.
संध्याकाळी करकरीत तिन्हीसांजाच्या वेळी विशाखाचे काका एका कळकट केसांच्या बटा वाढलेल्या माणसाला घेउन आले त्याच्या वाढलेल्या दाढीचे केस अस्ताव्यस्त पसरले होते, डोळे झिंगल्याप्रमाणे गुंजासारखे लालभडक दिसत होते. तो बहुधा त्या गावचा एखादा मांत्रीक असावा. एव्हाना गौरवचा आतातायी स्वभाव माहीत झाल्यामुळे त्यांनी त्या मांत्रीकाला परस्पर मागच्या अंगणात घेउन गेले. तिकडे त्यांची काय खलबतं झाली ते काही गौरवला कळले नाही पण जाता जाता त्या मांत्रिकाने त्याच्या तांबारल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पहात कठोर आवाजात उच्चारले
" तु, तु फ़ार मोठी चुक केली आहेस याचा परीणाम तुला भोगायलाच लागेल, प्रत्यक्ष राखणदाराला दुखावलेस तु, अपमान केलास त्याचा, याचा परीणाम तुला भोगावाच लागेल. राखणदाराला ज्या यातना भोगायला लागतील त्या तुलाही भोगाव्या लागतील लक्षात ठेव, तुला हे भोग भोगावेच लागतील" हे तो अश्या स्वरात म्हणाला की क्षणभर गौरवच्याही काळजाचा ठोका चुकला. पण त्याने तिकडे दुर्लक्ष केले.
इतके सारे घडल्यानंतर तिथे रहाणे गौरवला अशक्य झाले आणि त्याने पुन्हा आपल्या शहराकडे प्रस्थान केले. तिकडे पोहोचताच त्याला त्याच्या संशोधन संस्थेतेतल्या मित्राचा फ़ोन आला गौरवने पाठवलेला नाग त्याच्या संस्थेत सुखरुप पोहोचवल्या गेला होता. दोन-चार दिवसात त्याच्या जरुरी चाचण्या केल्या जाणार होत्या. पण एकंदरीत वॅक्सीन बनवण्यासाठी या नागाचा फ़ारच चांगला उपयोग होणार होता. आणि असा नाग मिळवुन दिल्यामुळे संस्थेतर्फ़े त्याचे खास अभिनंदन करुन प्रशस्तीपत्र देण्याचे ठरले होते. या आनंदात गौरव आधिचे सारे एव्हाना पार विसरुन गेला होता. आणि एक दिवस अचानक ते घडले.
त्या दिवशी संध्याकाळी मस्त थंड हवा पडली होती. आज विशाखाला घेउन कुठेतरी फ़िरायला जायला हवे असा विचार गौरवच्या मनात घोळत होता. नाहीतरी गाववरुन आल्यापसुन ती जरा अपसेटच होती. तिला बाहेर जाण्याबद्दल विचारण्यासाठी त्याने आतल्या रुमकडे मोहरा वळवला आणि अचानक त्याच्या डोक्यात कलकल सुरु झाली. कुणितरी आपला घसा आवळत असल्याची भावना व्हायला लागली. कुणितरी शरीरातले जिवनद्रव्य शोषुन घेत असल्यासारखे वाटायला लागले. शरीरात उठलेल्या या वेदनांच्या वादळाचे पडसाद त्याच्या चेहर्‍यावर दिसायला लागले असावेत, कारण त्याचवेळी आतुन बाहेर येत असलेली विशाखा त्याच्याकडे पाहुन दचकली. घाबरलेल्या आवाजात तीने विचारले
" काही होतय का तुला गौरव? आणि तुझं अंग बघ घामानं कसं डबडबलय."
त्याला समोरच्या सोफ़्यावर आडवे करत ती त्याचा घाम पुसण्याचा प्रयत्न करत होती.
हळुहळू गौरव पुर्वस्थीतीत आला, थकल्या आवाजात त्याने आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल तिला सांगीतले. ज्या सुंदर संध्याकाळी बाहेर एखाद्या बागेत जाण्याचा विचार होता. त्या रम्य संध्याकाळी गौरववर दवाखान्यात जाण्याची वेळ आली.
तपासणीतुन काहीही दोष नजरेत आला नाही मग नेहमीप्रमाणेच डॉक्टरांनी निदान केले 'कदाचीत डीप्रेशनमुळे असे झाले असावे'. दवाखान्यातुन नॉर्मल रिपोर्ट आणि एक अंधुक आशा घेउन दोघे परत आले.
पुन्हा पंधरा दिवसांनी त्याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली फ़क्त या वेळी रात्री नऊ सव्वानऊची वेळ साधल्या गेली होती. यावेळी मात्र विशाखाने मनात टोचत असलेली शंका बोलुन दाखवली
" गौरव, राग येणार नसेल तर एक सांगु का? तुम्ही त्या राखणदार भुजंगाला दुखवायला नको होतं. तो मांत्रीक काय म्हणाला होता ते आठवतय ना?"
" चल गं, या सगळ्या भाकडकथा आहेत असलं काही नसत" जरी तो अस बोलत असला तरी त्याच्या आवाजात पुर्वीचा आत्मविश्वास नव्हता.
या नंतर पुन्हा पुन्हा असे घडत राहीले फ़क्त वेळेचा फ़रक होत. पण दर पंधरा-वीस दिवसांआड हे घडतच राहीलं. गौरवच्या आयुष्यातलं हे दुष्टचक्र कधी संपणार होतं का? कुणालाच याचे उत्तर माहीत नव्हते.

बोलता बोलता डॉ. गाडगीळ पाणि प्यायला थांबले. डॉ. गाडगिळ एक अनुभवी मनोचिकित्सकम्हणुन प्रसिध्द होते आपल्या आगळ्या वेगळ्या विचार सरणीने त्यांनी अनेक गुंतागुंतीच्या केसेस सोडवल्या होत्या. नाव, ठिकाणे आणि इतर महत्वाचा तपशील बदलुन ते अश्या केसेसबद्दल सांगत असत. त्यामुळे त्यांचे एखाद्या केस बद्दलचे अनुभव ऐकण्यास इतरही डॉक्टर उत्सुक असत. आत्ताही त्यांनी पाणि पिण्याकरीता आपल्या कथनात किंचीत खंड पाडला पण इतकाही खंड सहन न होऊन त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार झाला.
" मग? त्याला नक्की काय झालं असावं?"
"डॉ. तुम्हीही त्या मंत्रतंत्राच्या कहाण्यांवर विश्वास ठेवायला लागलात का?"
" ही केस नक्की कोणत्या प्रकारात येते?"
काही क्षण थांबुन डॉ. गाडगीळ पुन्हा बोलायला लागले. संपुर्ण केस ऐकल्यानंतर मलाही जरा विचीत्र वाटायला लागले. कारण मला तरी गौरव संपुर्ण नॉर्मल वाटत होता अर्थात जरुरी चाचण्या केल्यानंतरच मी हे मान्य केले होते. पण जसं तुम्हाला माहीत आहेच मी थोडाफ़ार पॅरा सायकॉलॉजीबद्दल अभ्यास केला आहे. त्यामुळेच मला यात जरा जास्त इंटरेस्ट वाटला. मी गौरवच्या आधिच्या आयुष्याविषयी थोडी माहीती मिळवली. आणि थोडीफ़ार त्याच्या मित्रांची आणि माझ्या ओळखीतल्या मंडळींची मदत घेतली आणि गौरवला या त्रासातुन बाहेर काढले." पुन्हा एकदा डॉ. थांबले
"पण म्हणजे नक्की काय ट्रीटमेंट दिली तुम्ही ?" एक प्रश्न तेवढ्यात विचारल्या गेलाच.
" आपल्याला माहीतच आहे की आपल्या मनाचे दोन कप्पे असतात. अंर्तमन आणि बाह्यमन" डॉ. गाडगिळ पुढे बोलायला लागले." बाह्यमन हे फ़ार ढोबळ आठवणी ठेवत असतं एखादा माणुस भित्रा किंवा धाडसी हे सुध्दा सर्वसाधारणपणे बाह्यमनाच्या नियंत्रणात असतं परंतु अतीमहत्वाच्या नोंदी अंर्तमन ठेवत असतं म्हणजेच एखाद्या आणिबाणिच्या प्रसंगी नेहमी भित्रा वाटणारा माणूस अचानक पराक्रम गाजवतो. तसच नेहमी बेडरपणे वागणारा माणूस एखाद्या लहानश्या घटनेमुळे डरपोक बनतो त्यावेळी त्याच्या अंर्तमनाने त्याला तशी कमांड दिलेली असते. आणि या अंर्तमनाची कमांडींग पॉवर खुप जास्त असते. आपल्या समाजातले बहुतेक शुभ अशुभ शकुन हे त्या अंर्तमनासाठी तयार केले गेले आहेत. गौरवच्या केस मधे बराचसा भाग हा त्याच्या अंर्तमनाच्या प्रभावाने घडत होता. जसे अंगात आलेल्या व्यक्तीचे शाररीक बल वाढते ही एक सिध्द झालेली कसोटी आहे. हे बल त्या व्यक्तीला प्राप्त करुन देणारा हाच तो मेंदुचा भाग ज्याला आपण मनोविज्ञान म्हणतो. गौरवच्या शाररीक प्रतीक्रीयाही याच कारणामुळे होत होत्या. एक म्हणजे त्याने ऐकलेली राखणदार भुजंगाबद्दलची कहाणी, दुसरं त्याच्यावर सतत झालेलं त्याच्या दुष्परीणामाबद्दलच हॅमरींग. याची त्याच्या अंर्तमनाने कुठेतरी नोंद घेतली." पुन्हा एकदा डॉक्टरांनी एक पॉझ घेतला.
" मग त्या त्याच्या घुसमटल्यासारख्या होणार्‍या जाणिवा? शाररीक त्रास? ते कसे काय? "
" ती एक साधी परंतु सिध्द न करता येणारी गोष्ट आहे आपण जेंव्हा एखाद्या व्यक्तीच्या किंवा वस्तुच्या निकट असतो किंवा तिच्याबद्दल जास्त विचार करत असतो तेंव्हा कधी कधी आपण आणि ती वस्तु किंवा व्यक्ती यांच्यात काही भावनीक बंध तयार होतात. जसे आपल्याला एखाद्या व्यक्तीवर येणार्‍या संकटाची सुचना तिच्यापासुन दुर असताना देखिल जाणवते म्हणजे अचानक आठवण येणे, चौकशी करावीशी वाटणे असे काहीसे घडते आपण आपल्या नेहमीच्या व्यवहारात ती गोष्ट सहज विसरतो. तसाच थोडाफ़ार कार्यकारणभाव या केस मधेही होता. आणि त्याशिवाय मोठी गोष्ट म्हणजे गौरवला त्या संस्थेच्या कार्यपध्दतीची अचुक माहीती होती. म्हणजे सापांचे विष काढले जाण्याचा कालावधी, त्यासाठी सापावर घेतली जाणारी पकड.त्यामुळे कदाचीत सापाला श्वास घ्यायला त्रास होत असावा असे त्याला वाटत होते. पुन्हा विष हे सापाच्या पाचकद्रव्यांपैकी एक आहे आणि ते विषग्रंथी दाबुन बाहेर काढणे म्हणजे शोषुन घेण्यासारखेच आहे हे ही त्याला माहीत होतच. केवळ त्याच्या अंर्तमनाने त्याला सुचना दिली की ज्या त्रासातुन सापाला जावे लागत असेल असे गौरवला वाटत होते त्याची लक्षणे त्याच्यावर दिसायला लागत. "
"इथपर्यंत तरी साधारण लक्षात आलेय पण तुम्ही जी ट्रिटमेंट दिलीत त्याबद्दल काय?"
" ओऽऽ, ते तसे सोपे काम होते मी गौरवच्या मित्राला आणि त्या संस्थेच्या कर्मचार्‍र्‍यांना विश्वासात घेतले आणि गौरवची खात्री पटवुन दिली की त्याला आलेल्या ताज्या अनुभवाच्या दुसर्‍याच दिवशी तो नाग काही चुकीमुळे त्यांच्या कस्टडीतुन निसटला. बस्सऽऽ इतके केले आणी गेला दिड महीना तरी गौरवला तसा त्रास पुन्हा झालेला नाही. थोडक्यात तो आता या त्रासातुन कायमचा मुक्त झालेला आहे असे म्हणायला हरकत नाही." डॉ. गाडगिळ आपले कथन संपवित म्हणाले.
त्यांना आणखी काही प्रश्न विचारण्यासाठी बाकी डॉक्टर मंडळी सरसावणार इतक्यात डॉ. गाडगिळांचा मोबाईल वाजला. उपस्थीत मंडळींची माफ़ी मागत ते मोबाईल कानाला लावुन थोडे बाजुला गेले. बर्‍याच वेळाने ते परत आले तेंव्हा त्यांच्या चेहर्‍यावर आश्चर्य आणि गोंधळल्याचे संमिश्र भाव दिसत होते.
" काय डॉक्टर काही खास केस का?" कुणीतरी विचारले.
"केस नाही पण खास नक्की आहे, गौरवचा फ़ोन होता त्याने पकडून आणलेला त्याच्या सासरवाडीचा राखणदार साप पुन्हा त्याच्या सासरवाडीच्या आवारात दिसायला लागला आहे"
यावर उपस्थितांच्या तोंडातुन आश्चोर्याद्गार निघाला. पण गाडगिळांचे बोलणे अजुन पुर्ण झाले नव्हते.
"आणी मी त्या संस्थेत फ़ोन केला तर त्या ठिकाणाहून तो नाग आश्चर्यकारकरीत्या नाहीसा झालेला आहे."

डॉ.गाडगिळांच्या या वाक्यानंतर त्या डॉक्टर्स क्लब मधे बराचवेळ एक सुन्न शांतता दाटपणे पसरली.

(रेखाटन: पल्लवी देशपांडे)

गुलमोहर: 

चाफ्फा,
तुम्हाला अपेक्षित असावा असा 'थ्रिलिंग ईफेक्ट' अगदी परफेक्ट साधला आहे तुमच्या कथेनं...............
त्यामागचा तुमचा अभ्यास आणि मेहनत नक्कीच दिसुन येतेय. मज्जा आली पुन्हा वाचतांना..:)

कथा उत्तम.. ! एकदम हावा तो परीणाम साधते..

Keep it up.. Happy

bo-vish, adm,
प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद आणि चुक लक्षात आणुन दिल्याबद्दलही. आता ती चुक सुधारलेली आहे. भरपुर दिवसां नंतर अर्धवट पडलेली कथा पुर्ण करताना ही चुक झाली बहूतेक Sad
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **

चाफ्फा, झकास कथा, नेहमीसारखीच. माझं आजोळ कोकणातलं आहे त्यामुळे हे सगळं अनुभवलय. पाच फड्यांचो नाग, त्याका हातभर तरी लांब पांढरे धोप केस, आकड्यार मोठ्ठो मणी..... मी ह्या डोळ्यांनी बघलय त्याका..... घाटीवर.
हे आअणी असलं लहानपनापासून एकलय. ते सगळं आठवलं.
कथा मस्तच.

चाफ्फा,मस्त रे... परिणामकारक झालीये कथा.. आवडली..

चाफ्फा, कथा नेहमीसारखीच मस्त !!

चाफ्फा, छान आहे कथा. नाग निसटला म्हटल्यावर गौरवचा शारिरीक त्रास नाहिसा झाला याचे कारण पुर्ण पटले. पण तिकडे निसटलेला नाग परत त्याच्या सासुरवाडीला दिसू लागला म्हणजे आश्चर्यच आहे. खरंच राखणदार वगैरे असं काही असतं का? (एक भाबडा प्रश्न)

सर्वप्रथम सर्वांनाच धन्यवाद !
दाद, मी कोकणातला नसलो तरी तिकडच्या मित्रमंडळींकडुन ही असली माहीती भरपुर मिळते Happy
अश्विनी, या कथेचा केलेला शेवट मला कथा संपल्यावर अचानक सुचला म्हंटल तेवढाच एक भयकथा स्टाईल ट्वीस्ट Wink म्हणून त्या दोन ओळी टाकल्या Happy आणि राखणदार वगैरे असतं का ? या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही कारण मी पाहीलेला नाही पण असं म्हणतात.
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **

चाफा,

नेहमी प्रमाणे छान!

मी मायबोली वरील सगळे नाही तरि तुमच्या कथा नेहमी वाचतो.
तुम्ही एक उत्तम पटकथा लेखक बनु शकता..

ऑल द बेस्ट!

चाफ्फा,
बर्‍याच दिवसांनी तूझी कथा वाचायला मिळाली. आवडली.

चाफ्फा, कथा छनच--detailing मस्तच करतोस.
आता पुढची कथा---- Happy

--------------------------------------------------
If there is a way, I will find one.
If there is none, I will make one.

चाफ्फा, छान कथा.... पण तो गौरव आगाऊच वाटला जरा... सासुरवाडीला गेल्यावर जावयासारखं वागायचं ना.. फुकट शाईन कशाला मारायला जायचं Wink

अगं दरारा वाटला पाहिजे ना जावयाचा?

नाहीतर काय मन्जू! उगिच आपली मर्दुमकी दाखवायला नको तिथ जाव कशाला?
...;
आपला, लिम्बुटिम्बु

चाफ्फ्या.

राखणदार मी पण पाहिलाय. धारवाडमधे आमच्या वाड्यात फिरतो. साप फार मोठा नाही. अगदी बारीक आहे. एखाद्या सोनसाखळीसारखा दिसतो. आणि झर झर जातो. आमच्या वाड्यातल्या देवघरात जाताना किंवा येताना दिसतो. देवघरात मात्र कधीच दिसत नाही. Happy

पुन्हा कधी फोन केलास की आठवण कर तुला भयकथेला अजून एक टिप देइन Happy
--------------
नंदिनी
--------------

चाफ्फा,
अप्रतिम कथा!!!!!
वाचताना छान वाटलं!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हजारों ख्वाइशें ऐसी
के हर ख्वाइश पे दम निकले...............

जबरी! आवडली!
-----------------------------------------------
आली दिवाळी! Happy

मस्तच! शेवट खुप आवडला.

चाफ्फा तुझ्या कथामधुन ही एक उत्कृष्ट कथा आहे..

वाचली बर का आज
मस्तच आहे.. लै भन्नाट..

चाफ्या... कथा मस्त आहे.
तुझ्या सगळ्या कथांना टिप्स नन्दु देते का रे तुला?? Happy

खिळवून ठेवणारी कथा! खूप आवडली!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल , पण लयलूट करायची ती सुगंधाचीच!
Happy

मस्त कथा आहे
तुझ्या सर्व कथा एकत्र वाचता नाहि का येणार?

चाफ्या, मस्तय रे. पुढे?

उत्तम लिखाण...चाफ्फा

कथा फार चान्गली आहे. पण शेवट थोडा घाई-घाईने केल्यासारखा वाटला.

Pages