सैनिकाच्या गोष्टी - भाग २ [माझा सैन्यात प्रवेश]

Submitted by शरद on 24 April, 2010 - 08:00

वरचा मथळा वाचून बर्‍याच वाचकांची अशी नक्कीच समजूत होईल की आता हा माणूस स्वतःविषयी आत्मप्रौढीचे काहीतरी वर्णन करत बसणार. मी प्रांजळपणाने जे जसे घडले किंवा मला जसे आठवते तेच सांगणार आहे; काही गोष्टी माझा मूर्खपणासुद्धा दाखवून देतील. पण नक्कीच मी कशाचा विपर्यास करणार नाहीय.

तर त्या काळात म्हणजे १९६५-७५ च्या दशकात माझे जे मित्रमंडळी होते त्यांना आणि मला आपले कार्यक्षेत्र निवडण्याचे फक्त दोनच पर्याय असतात असे वाटत होते: डॉक्टरी किंवा इंजिनिअरिंग. मॅट्रिक नंतर सायन्स साईड पकडून प्री डिग्री करायचे. (आर्ट्स आणि कॉमर्स या साईड म्हणजे 'तुच्छ' असा एक समज होता.) आणि प्री डिग्रीनंतर बी साईड किंवा ए साईड निवडायची. बी साईड म्हणजे डॉक्टर व्हायचे आणि ए साईड म्हणजे इंजिनीअर व्हायचे. अगदी साधा सरळ सोपा मार्ग होता. आजच्यासारखे शंभर पर्यायांपैकी एक निवडायचा अशी भानगडच नव्हती. मी तसा बर्‍यापैकी हुशार विद्यार्थी होतो; त्यामुळे अर्थातच सायन्स साईड ला गेलो. त्यामध्येसुद्धा इंजिनिअरिंग घ्यायचे असे माझे ठरले होते. म्हणजे आजच्यासारखी अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट वगैरे भानगड नव्हती. माझे मीच ठरवले होते. सुदैवाने काही मित्रसुद्धा चांगले लाभले; त्यामुळे अभ्यास योग्य दिशेने चालला होता. आमचे एक स्टडी सर्कल होते. सारे मिळून अभ्यास करायचो; लायब्ररीतील पुस्तके एकमेकांसाठी ब्लॉक करायचो; नोटसची अदलाबदली करायचो वगैरे.

एकदा आमच्या काकांनी (मावशीचे मिस्टर) प्रस्ताव मांडला की मी एन्.डी.ए. ची परीक्षा द्यायची. मी 'बरं' म्हणालो. वडिलधार्‍यांची आज्ञा मोडायची नाही म्हणून अभ्यास करायला लागलो. आमच्या घरचे - दूर-दूरचे कुणीही नातलग आर्मीत नव्हते. आई-वडिल दोघेही शिक्षक. आईचे वडिल शिक्षक. वडिलांच्या घरचे सारे शेतकरी. माझा मोठा भाऊ महाकष्टाने शेवटच्या चान्समध्ये सिलेक्ट होऊन एयर फोर्स मध्ये गेला होता; पण त्याची मला काहीच मदत मिळणार नव्हती. त्यामुळे मार्गदर्शन करायला कुणी नव्हते. मग जुन्या बाजारातून एक-दोन गाईड विकत आणली. लक्षात आले की एन.डी.ए. आणि आय.आय.टी. च्या प्रवेशपरीक्षांचा अभ्यासक्रम जवळ जवळ सारखाच आहे. फक्त आय.आय.टी. चं गणित वेगळं होतं. बाकी सामान्यज्ञान, इंग्रजी सारखेच. त्यामुळे जरा अभ्यासाला हुरूप आला - म्हणजे अगदीच काही वेगळे करतोय असे वाटले नाही.

वैद्य सरांचा क्लास लावला. वैद्य सर म्हणजे त्यावेळी (म्हणजे १९७६ साली) कोल्हापुरात यु.पी.एस.सी. स्पर्धा परिक्षांची तयारी करून घेणारे एकच सर असावेत. त्यांचं क्वालिफिकेशन वगैरे मी बघत बसलो नाही; कुणी तरी सांगितले की चांगले आहेत.. तेच क्वालिफिकेशन. त्यांचे क्लासेस म्हणजे वांगी बोळातून बाहेर पडल्यावर भाऊसिंगजी रस्त्यावर येताना कॉर्नरवरची दोन मजली बिल्डिंग. फाटक यांचा वाडा. अजूनही ती इमारत तशीच आहे आणि माझ्या पत्नीची भाची त्या घरात सध्या सूनबाई म्हणून वावरते आहे. असो. वैद्य सरांच्या शिकवणीचा कितपत उपयोग झाला ते आता आठवत नाही. कारण ते आठवड्यातून दोनच वेळा म्हणजे चार तास माझी शिकवणी घेत. मी एकटाच विद्यार्थी. त्यामुळे काही दिवसांनंतर ती शिकवणी आपोआप बंद पडली.

आमचे घर राजारामपुरीत एका चाळीत होते. घरमालक भयानक खडूस होता. तीन खोल्यांचे घर. त्यात प्रत्येक खोलीत एक या हिशोबाने तीनच बल्ब वापरायचे. त्यांचा मेन स्विच त्याच्याचकडे होता. वीज संध्याकाळी सात ते अकरा आणि सकाळी पाच ते साडे सहा या काळातच तो उपलब्ध करून द्यायचा. त्यामुळे आमच्या अभ्यासात खूप वांधे यायचे.

मी माझी अभ्यासाची पद्धत थोडी बदलली. मी मराठी मेडियमचा मुलगा. त्यामुळे इंग्रजी अगदीच सुमार. मे महिन्यात परीक्षा. कॉलेजच्या अभ्यासातून वेळ काढून एन्.डी.ए. चा अभ्यास करणे शक्य नव्हते. म्हणजे गणित आणि सायन्स या विषयांचा अभ्यास कॉलेजच्या अभ्यासाबरोबर शक्य होता; पण सामान्यज्ञान आणि इंग्रजी या दोन विषयांचे काय? आमच्या घराजवळ आठव्या गल्लीत कामगार कल्याण केंद्र होते. रोज संध्याकाळी कॉलेज नंतर तिथे जायचो. अगोदर महाराष्ट्र टाईम्स मधील राष्ट्रीय आणि आंतर-राष्ट्रीय बातम्या वाचायचो. मग त्याच बातम्या टाईम्स ऑफ इंडिया मध्ये वाचायचो. मग परत म.टा! म.टा. मधील बातम्या म्हणजे टा.ऑ.इं. मधील बातम्यांचे शब्दश: भाषांतर असते. (म्हणजे त्या काळात तरी असायचे. आता ठाऊक नाही कारण दोन्ही वर्तमानपत्रे मी वाचत नाही.) त्यामुळे माझा इंग्रजी आणि सामान्यज्ञान या दोन्ही विषयांचा अभ्यास व्हायचा. आणि त्या अभ्यासानेच मला तारून नेले.

मी जरी काकांनी सांगितले म्हणून परीक्षा दिली असली तरी त्यात माझा स्वार्थ होताच. तो म्हणजे मुंबई पाहणे. त्यापूर्वी कोल्हापूर शहर आणि पन्हाळा तालुका यापलिकडचे जग मी पाहिलेच नव्हते. आणि सुदैवाने माझा नंबर माझगाव डॉकयार्ड मधील एका उत्तुंग इमारतीत शेवटच्या मजल्यावर आला होता. पास झालेच पाहिजे असे बंधन माझ्यावर नव्हते; कारण माझे धेय्य मिलिट्रीत जाणे हे नव्हतेच. त्यामुळे कुठलाही तणाव नव्हता. आठ दिवस मुंबईत मावस-मावशीकडे राहिलो. जिवाची मुंबई केली.

रिझल्ट लागला. पास झालो होतो. म्हणजे इंग्रजीत जेमतेम पास मार्क होते पण इतर विषयांमुळे प्रथम फेरीच्या निवडपात्र यादीत नाव लागले. आता खरी कसोटी होती. सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड चा इंटरव्ह्यू देणे. त्याची तयारी करणे. कोल्हापूरमध्ये १०९ इंन्फंट्री बटालियन (टेरिटोरियल आर्मी) आहे. त्या बटालियनच्या कमांडिंग ऑफिसरचा मुलगा माझ्याबरोबर कॉलेजमध्ये माझ्याच वर्गात होता. तो सुद्धा एन्.डी.ए. ची परिक्षा देऊन आला होता. मग आम्ही दोघांनी एकत्र ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी कर्नलने माझा इंटरव्ह्यू घेतला. मी पायात स्लिपर घालून गेलो होतो. (इयत्ता चौथीपर्यंत आम्ही पायात चप्पल घालतच नव्हतो. नंतर आमची स्लिपरवर बढती झाली, ती तोपर्यंत कायम होती). त्यांनी एका विशिष्ट नजरेने पाहिले - कसे कसे लोक येतात ऑफिसर बनायला!!- या अर्थाची नजर! टाय घालता येतो का ते विचारले. मी टाय ही वस्तू चित्रपटातच पाहिली होती; घालायचा सवालच नव्हता. परत 'ती विशिष्ट नजर'. पण मी त्या नजरेने हैराण झालो नाही, कारण बाहेरील वस्त्रांमुळे माणूस मोठा होत नाही ही शिकवण माझ्या मनावर बिंबली गेली होती. मी फारसा विचलित न होता माझे ट्रेनिंग घेऊ लागलो. ट्रेनिंग कसले, तिथले जवान आमच्याकडून सॉलिड शारीरिक व्यायाम - पळणे, रोप क्लायंबिंग, टायरमधून लटकणे वगैरे गोष्टी करून घेत होते. मी शरिराने ताकदवान होतो. व्यायामाची मला आवड होती, त्यामुळे मला गंमतच वाटायची. असे सात आठ दिवस 'ट्रेनिंग' घेतले. तोपर्यंत माझे इंटरव्ह्यूचे पत्र आले होते. भोपाळला इंटरव्ह्यू होता. मागे लिहिल्याप्रमाणे मी कोल्हापूर सोडून बाहेर गेलो नव्हतो; त्यामुळे ही एक पर्वणीच होती. यू.पी.एस्.सी.च्या पत्रात लिहिल्याप्रमाणे दोन पांढर्‍या हाफ-चड्ड्या, पांढरे कॅनव्हास शूज, कपड्यांचे पुरेसे जोड वगैरे घेऊन गेलो. त्या यादीत टायचा कुठेही उल्लेख नव्हता, हे महत्वाचे. काळ्या कातड्याच्या बुटांचासुद्धा कुठे उल्लेख नव्हता.

आता पहिली गोष्ट म्हणजे भोपाळला जाणे. त्यासाठी रेल्वेचे रिझर्वेशन करणे. कधी बाहेर गेलो नव्हतो; तरी कुणी (म्हणजे वडील, काका वगैरे) रिझर्व्हेशनसाठी मदत केली नाही आणि मी मागितलीसुद्धा नाही. सायकल घेऊन स्टेशनवर गेलो, चौकशी केली, परत आलो, लागतील तेवढे पैसे घेतले आणि जाऊन रिझर्व्हेशन करून आलो. महाराष्ट्र एक्स्प्रेस ने कोल्हापूर ते भुसावळ, तिथे महाराष्ट्र एक्स्प्रेस चा एक डबा तुटणार आणि तो दादर- वाराणसी एक्स्प्रेस (जी सहा तासानंतर तिथे येते) तिला जोडला जाणार, त्या ट्रेनने इटारसी पर्यंत जाणे, आणि मग इटारसी ते भोपाळ मिळेल त्या गाडीने जाणे; (मी लेडिज डब्यातून जायचा प्लॅन केला, कारण टी.टी. ने पकडले तरी तो पुढच्या स्टेशनवर उतरवणार व पुढचे स्टेशन भोपाळ हेच होते.) भुसावळला जे सहा तास मिळणार होते त्या वेळात अजंठा लेणी पाहून यायचे ठरवले आणि ठरवल्याप्रमाणे पाहिली. हे सगळं सविस्तर सांगण्याचा उद्देश म्हणजे हे सर्व मला पुढे मुलाखतीत सांगावे लागले आणि त्याचा अत्यंत प्रभावशाली उपयोग झाला. कसा ते पुढे सांगतो.

मी एक दिवस आधीच गेलो होतो. सकाळी दिवस उजाडता उजाडता भोपाळ आले. स्टेशनवर रिसेप्शन वगैरे प्रकार नव्हता. असेल असे मला वाटलेसुद्धा नव्हते. इंटरव्ह्यूच्या पत्रात लिहिले होते - 'स्टेशनवर उतरल्यानंतर आर.टी.ओ. ला रिपोर्ट करणे'. मी आर.टी.ओ. शोधू लागलो. कुणीतरी आर.टी.ओ. च्या ऑफिसचा पत्ता सांगितला. रिक्षा केली आणि तडक आर.टी.ओ.मध्ये गेलो. तिथे मिलिट्रीचा इंटरव्ह्यू असावा असे वातावरण दिसत नव्हते. मनात शंकेची पाल चुकचुकली. परत चौकशी केली तेव्हा समजले की आर.टी.ओ. नावाचा प्राणी हा रेल्वे स्टेशनवरच असतो. (म्हणजे रेल्वे ट्रान्स्पोर्ट ऑफिसर - हा मिलिट्रीचा एक अधिकारी असतो, सर्व मुख्य रेल्वे स्थानकांवर असतो, आणि त्याचे काम मिलिट्रीच्या जवानांना मदत करणे, मिलिट्रीच्या ट्रेन सोडणे वगैरे असते. त्याला आजकाल एम्.सी.ओ. - मूव्हमेन्ट कंट्रोल ऑफिसर - म्हणतात.) परत मागे फिरलो. पहिला धडा शिकलो - 'अनोळख्या जागी पत्ता शोधताना सर्व माहिती घेणे'. आर.टी.ओ. ला भेटलो. पत्र दाखवले. त्याने सांगितले की दुपारी ३ च्या सुमारास मिलिट्रीचा ट्रक येईल आणि इंटरव्ह्यूच्या ठिकाणी घेऊन जाईल.

बारा वाजले होते. पोटात कावळे कोकलत होते. बाहेर जाऊन जेवून यावे म्हटले. सामानाला कडी-कुलूप लावले आणि स्टेशनबाहेर आलो. चालात चालत एका हॉटेलसमोर आलो. शांतता होती. आत गेलो. मी एकटाच ग्राहक दिसत होतो. पोर्‍या आला. काय पाहिजे विचारले. मी राईस प्लेट मागवली. मला राईस प्लेट म्हणजे चार चपात्या, दोन भाज्या, लोणचे, पापड, दोन मूद भात वगैरे अपेक्षित होते.
तो एक प्लेट राईस घेऊन आला. तो सुद्धा थंड. मग आमटी मागवली आणि तसाच खाल्ला. बिल मात्र कोल्हापुरातल्या राईस प्लेटपेक्षा जास्त. दुसरा धडा शिकलो - 'कधीही मोकळ्या हॉटेलात जायचे नाही. बाकी लोक काय खातात ते पाहून मागणी करायची.'

तीन वाजता मिलिट्रीचा ट्रक आला. तोपर्यंत आणखी दोन-तीन मुले आली होती. सगळे मिळून एस.एस.बी. ला गेलो. रहायची चांगली व्यवस्था होती. विशेष म्हणजे फुकट. आमचा जाण्यायेण्याचा खर्च सुद्धा सरकार देणार होते. मला या गोष्टीचे अप्रूप वाटत होते. दुसर्‍या दिवशी इंटरव्ह्यूचा पहिला दिवस. त्यामुळे संध्याकाळ मोकळी होती. तिथल्या एका मुलाने एक आकड्यांचा डाव शिकवला - 'काऊ आणि बुल'. एकाने चार अंकी संख्या मनात धरायची, मात्र चारही अंक वेगवेगवेगळे असले पाहिजेत. दुसर्‍याने ती संख्या ओळखायचा प्रयत्न करायचा. कागदावर एक चार अंकी संख्या लिहायची. एखादा अंक तुम्ही निवडलेल्या संख्येत असेल आणि योग्य त्या ठिकाणी असेल तर बुल, नसेल तर काऊ आणि तो अंकच नसेल तर काही नाही असे सांगायचे. उदा. मी १४६७ अशी संख्या मनात धरली आणि दुसर्‍याने १६८४ अशी संख्या सांगितली तर १ बुल (१ या अंकाकरिता) आणि २ काऊ (६ आणि ४ या अंकांकरिता). असे अंक लिहीत व सांगत जायचे; फोर बुल आले की गेम संपला. मग दुसर्‍यावर पाळी. जो कमीत कमी चान्समध्ये संख्या ओळखेल तो जिंकला. खूप छान गेम आहे. मजा आली. तुम्हीसुद्धा खेळून पहा आणि मुलांना शिकवा. या गेममुळे विचार करण्याची शक्ती वाढते. हा गेम सुद्धा सविस्तर सांगण्याचे कारण वर दिले तेच आहे - पुढे मला मुलाखतीत ते सांगावे लागले आणि त्याचाही अत्यंत प्रभावशाली उपयोग झाला.

आता एस.एस.बी. इंटरव्ह्यूविषयी थोडेसे सांगतो. हे ज्ञान इंटरव्ह्यू दिला त्यावेळचे नसून नंतर सर्व्हिसमध्ये मिळवलेले आहे. एका वेळी साधारणत: ४० उमेदवारांना बोलवण्यात येतं. त्यांना १०-१० च्या चार ग्रूपमध्ये वाटले जाते. एका ग्रूपमध्ये कमीत कमी सहा आणि जास्तीत जास्त दहा उमेदवार असावेत असा संकेत आहे. अगदीच तज्ज्ञ ग्रूप टास्क ऑफिसर असेल तर तो क्वचित बारा उमेदवारांचा ग्रूपसुद्धा घेऊ शकतो. याचं कारण म्हणजे ग्रूप डायनॅमिक्स आणि मनुष्याची (ग्रूप टास्क ऑफिसरची) ग्रूप हाताळण्याचे क्षमता. कुठलाही माणसांचा घोळका काहीही कारणास्तव एकत्र आला तर त्याचे सामान्यतः तीन भाग बनतात. एक म्हणजे ते लोक जे लगेच ग्रूपचा ताबा घेतात, दुसरे असे लोक जे पहिल्या लोकांचं ऐकून काम करतात आणि तिसरे म्हणजे फक्त शरीराने घोळक्यात सामिल असलेले पण काहीच काम न करणारे लोक. जरी उमेदवारांचा ग्रूप एका विशिष्ट उद्देशाने (इंटरव्ह्यू पास होणे) एकत्र आला असेल तरी त्यात हे तीन प्रकारचे लोक आढळतातच. मात्र जर ग्रूप चार-पाचच माणसांचा असेल तर असे तीन सब-ग्रूप होणे शक्य नसते आणि जर दहापेक्षा मोठा असेल तर ते सब ग्रूप न्याहाळणे शक्य होत नाही.

एस.एस.बी. इंटरव्ह्यूचे तंत्र म्हणजे ३६० डिग्री अवलोकन म्हणावे लागेल. कारण तीन वेगळे अधिकारी तीन वेगळ्या पद्धतीने निवडक १५ गुणांची (जे सैन्याधिकारी बनण्यासाठी आवश्यक आहेत अणि ज्यांचे मोजमाप केले जाऊ शकते) पडताळणी करतात. ते पंधरा गुण मला आता पूर्ण आठवत नाहीत पण त्यात - Intelligence, Resourcefulness, Organising Ability, Responsibility, Courage, Co-operation, Stamina, Social Behaviour वगैरे सामील असावे असे वाटते. सायकॉलॉजिस्ट मनाचे भाव जाणून घेतो; ग्रूप टास्क ऑफिसर नियंत्रित ग्रूपमध्ये व्यक्तीचे प्रत्यक्ष वर्तन पाहतो आणि तोंडी मुलाखत घेणारा अधिकारी त्या व्यक्तीचे विचार ऐकतो. त्यामुळे एखादा अवगुण लपवणे अशक्यप्राय होते. तसेच कितीही ट्रेनिंग घेतले असले तरी बोर्डला फसवता येणे शक्य नसते. उमेदवार निवडीचे हे एक अत्यंत चांगले तंत्र आहे; आणि म्हणूनच बर्‍याच इंडस्ट्री एस्.एस्.बी. इंटरव्ह्यू पास झालेल्या उमेदवारांना डोळे झाकून सिलेक्ट करतात.

पहिल्या दिवशी मानसशास्त्रज्ञांकरवी लेखी परीक्षा होते. त्यात 'Thematic Appreciation Test', 'Word Association Test' आणखी एक कुठलीतरी अशा तीन टेस्ट होतात. या टेस्टची खूबी म्हणजे वेळेचं बंधन असते आणि प्रश्नांची संख्या अफाट असते; म्हणजे वेळ खूपच कमी असतो त्यामुळे मनात येणारा पहिलाच विचार मांडण्याशिवाय गत्यंतर नसते. शिवाय एखादा प्रश्न सोडला तर नेमका तोच प्रश्न का सोडला याचेसुद्धा विश्लेषन होते. त्यामुळे जर कुणाला वाटत असेल की आपण टेस्ट घेणार्‍याला फसवू शकू तर टेस्ट देणाराच त्यात फसला जाण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे तसा प्रयत्न न करणेच जास्त चांगले. मी वर लिहिल्याप्रमाणे फक्त सरकारच्या पैशांवर फिरायला मिळते म्हणून मी इंटरव्ह्यूला गेलो होतो त्यामुळे मी असा कुठलाच प्रयत्न केला नाही. कदाचित तशी माझी मानसिकताच नाही.

दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशी ग्रूप टास्क ऑफिसरची (जी.टी.ओ.ची) 'बॅटरी ऑफ टेस्टस' होते. याला 'बॅटरी ऑफ टेस्टस' म्हणतात कारण एका विशिष्ट क्रमानेच त्या टेस्ट घ्याव्या लागतात. सर्वसाधारणपणे क्रम बदलता येत नाही. त्यात Lecturrete, Group Discussion (जी.डी.), Group Planning Exercise (जी.पी.ई.), Progressive Group Tasks (पी.जी.टी.) , Command Task (सी.टी.), Half Group Task (एच्.जी.टी.), Obstacle Course (अडथळ्यांची शर्यत), Final Group Task (एफ्.जी.टी.) आणि Snake Race या टेस्ट असतात. यातल्या Lecturrete, सी.टी. आणि अड्थळ्यांची शर्यत या वैयक्तिक टेस्ट असून इतर सर्व ग्रूपने (किंवा अर्ध्या ग्रूपने) एकत्र करायच्या असतात. Lecturrete, जी.डी., जी.पी.ई., आणि पी.जी.टी. यांचा सिक्वेन्स मोडता येत नाही. नंतरच्या टास्कमध्ये सी.टी. आणि अडथळ्यांची शर्यत कधीही घेता येते पण बाकीच्या टास्कचा क्रम मोडता येत नाही. त्याचे कारणसुद्धा शास्त्रीय आहे. एखाद्या खोलीत किंवा हॉलमध्ये तुम्ही गेला आणि तिथल्या गोष्टी न्याहाळून तुम्हाला रिपोर्ट बनवायचा आहे तर काय कराल? प्रथम त्या हॉलमध्ये जाल. गेल्या गेल्या चौफेर नजर फिरवाल. त्यानंतर मग एक एक गोष्ट मनात साठवून ठेवाल. निघण्यापूर्वी परत एकदा चौफेर नजर फिरवून काही विसरले तर नाही हे पहाल आणि मग खात्री पटल्यावर आपला रिपोर्ट बनवाल. अगदी हेच तंत्र या बॅटरीमध्ये वापरले जाते. लेक्चरेट सुरू असताना उमेदवारांची भीड चेपते. ग्रूप डिस्कशन, ग्रूप प्लॅनिंग एक्सरसाईज आणि प्रोग्रेसिव्ह ग्रूप टास्क सर्व ग्रूप ने एकत्र करायच असतात. नंतर कमांड टास्क, हाफ ग्रूप टास्क आणि ऑब्स्टॅकल कोर्समध्ये ग्रूप मोडला जातो आणि ग्रूप टास्क ऑफिसरला वैयक्तिक उमेदवारांवर लक्ष ठेवता येतं. त्यानंतर फायनल ग्रूप टास्कमध्ये परत सगळा ग्रूप एकत्र येतो. शेवटी स्नेक रेस मध्ये तर सर्व चार ग्रूपची एकत्र रेस होते. त्यातही उमेदवारांच्या बर्‍याच गुणावगुणांचे दर्शन होते.

लेक्चरेट मध्ये तीन मिनिटांचा वेळ लेक्चरेट तयार करण्यासाठी दिला जातो. तीन विषय दिले जातात आणि त्यातला एक विषय निवडून तीन मिनिटे भाषण द्यायचे असते. दिलेल्या विषयांमध्ये एक अगदी सामान्य (माय कॉलेज, द फिल्म आइ लाईक्ड मोस्ट वगैरे) एक सामान्यज्ञान असलेला त्या काळचा प्रचलित विषय (आता द्यायचा झाला तर 'मनी अ‍ॅण्ड आय्.पी.एल., ५० ईयर्स ऑफ महाराष्ट्र वगैरे) आणि एक कठिण (फॉरेन पॉलिसी ऑफ इंडीया अगेन्स्ट अफगानिस्तान, वॉटर ऑन मून वगैरे) असे विषय असतात. तीन मिनिटांत विषयाची सुरवात, मध्य आणि समारोप तसेच सर्व मुद्दे सांगणे यात उमेदवाराची खरी कसोटी लागते. लेक्चरेटमध्येच जी.टी.ओ.ला अंदाज येतो की तो उमेदवार पुढे कसे करणार आहे.

ग्रूप डिस्कशनबद्दल बोलायलाच नको, कारण आज-काल प्रत्येक ठिकाणी उमेदवाराला आजमावण्याचे हे तंत्र वापरले जाते. फक्त इतकेच की यात सुद्धा तीन वादात असलेले विषय दिले जातात. वाद झालाच पाहिजे याकडे जी.टी.ओ.चे लक्ष असते. जर सर्वांचे एकमत झाले तर गुणावगुणांचे परीक्षण काय करणार?

तिसरी टेस्ट म्हणजे ग्रूप प्लॅनिंग एक्सरसाईज. यात ग्रूपशी संबंधित एक काल्पनिक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम दिला जातो त्यात वेळेचे सुद्धा बंधन असते. नकाशावर तो सर्व ग्रूपला समजावून सांगितला जातो. जे निवेदन दिलेले असते त्यात जे रिसोर्सेस उपलब्ध आहेत (प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष) ते सुद्धा सांगितले जातात. एखादे चुकीचे उत्तर किंवा कमी महत्वाचा प्रश्नसुद्धा दिला जातो आणि तो प्रॉब्लेम सोडविण्यासाठी तुम्हाला प्लॅन करावा लागतो. प्रथम वैयक्तिक प्लॅन बनवून जी.टी.ओ. ला लिहून द्यावा लागतो नंतर ग्रूप ने एकत्र येऊन ग्रूपचा प्लॅन ठरवावा लागतो. जी.पी.इ. चं खूप महत्व आहे, कदाचित जी.टी.ओ. टेस्ट मधील ही सर्वात महत्वाची टेस्ट म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण तुम्हाला सगळे resources वापरून प्रत्यक्ष प्लॅन बनवावा लागतो, त्यातून तुमची बुद्धीमत्ता, आपली आणि शत्रुची कुवत ओळखण्याची कला, वेळ वापरण्याचे तंत्र सारे काही स्पष्ट होते. शिवाय हे एकच लेखी डॉक्युमेन्ट जी.टी.ओ. कडे असते, त्यावरून तुमच्या लेखी प्रेझेंटेशनची कल्पना येते. शिवाय ग्रूप डिस्कशनमधून कळून येणारे सारे गुणावगुण या टास्कमधून सुद्धा कळून येतात.

बाकीच्या टास्क (अडथळयांची शर्यत आणि स्नेक रेस सोडून) सारख्या पद्धतीच्या असतात. दहा-बारा फूट अंतरावर दोन समांतर रेषा (विटांची लाईन आखून किंवा चॉकपीठ ने) आखलेल्या असतात. एक स्टार्ट लाईन आणि एक फिनिश लाईन. त्यामधील अंतर आउट ऑफ बाऊंड असते. आत काही ठोकळे, काही बुंधे, वगैरे इन बाऊंड असतात. जवळ काही दोर, फळ्या आणि बांबू दिलेले असतात. त्यांचा आणि आत ज्या वस्तू असतील त्यांचा उपयोग करून संपूर्ण ग्रूपला घेऊन पलिकडे जायचे. वेगवेगळ्या उमेदवारांकडून वेगवेगळ्या कल्पना येतात, भांडणे होतात, काहीजण काम करतात, काही काम टाळतात, काही चांगल्या आयडिया देतात त्या सर्वांचे निरीक्षण करून जी.टी.ओ. आपले निष्कर्ष काढतो. खूप मजा असते. अशा कल्पना ज्यामुळे कमीत कमी शारीरिक कष्ट करून लवकरात लवकर पलिकडे जाता येईल त्या उत्कृष्ट, अशा कल्पना ज्यामुळे बरेच शारीरिक कष्ट करून पलिकडे जाता येईल त्या मध्यम आणि अशा कल्पना ज्यामुळे वेळ वाया जाऊनही पलिकडे जाता येत नाही त्या निकृष्ट मानल्या जातात. जी.टी.ओ. ग्राऊंड खूप मोठे असते. आठ दहा फूट्बॉल फिल्ड मावतील इतके मोठे. त्यात शेकडो टास्क असतात. त्यात दरवर्षी बदल केला जातो.

पी.जी.टी.मध्ये तीन टास्क असतात; पहिली अतिशय सोपी, दुसरी थोडी अवघड आणि तिसरी कठिण असते. हाफ ग्रूप टास्क मध्ये अर्ध्या ग्रूप साठी एक मध्यम कठिण टास्क असते. कमांड टास्कमध्ये प्रत्येकाला आयडिया सांगता येत नाही. फक्त कमांडर सांगेल त्याप्रमाणे त्याने निवडलेल्या उमेदवारांनी वागायचे. अर्थातच प्रत्येकाला कमांडर होण्याची संधी मिळते, आणि प्रत्येकासाठी जी.टी.ओ.ने वेगळी टास्क निवडलेली असते. त्या उमेदवाराने पाच मिनिटे आपल्या टास्कचा अभ्यास करायचा, ग्रूपमधून तीन साथीदार निवडायचे आणि ती टास्क पूर्ण करायची. अर्थात साथीदार म्हणून निवडले जाणे हासुद्धा एक सन्मान असतो आणि जो उमेदवार जास्त्त वेळा साथीदार म्हणून निवडला जातो त्याची इंटरव्ह्यू पास होण्याची शक्यता खूप वाढते.

उमेदवारांच्या मनात एक गैरसमज असा असतो की कमांड टास्क सुटली म्हणजे आपण पास झालो. तसे काही नसते. उलट जे उमेदवार नक्कीच फेल होणार किंवा नक्कीच पास होणार याची जी.टी.ओ.ला जाणीव असते त्यांना तो अत्यंत सोप्या टास्क देतो म्हणजे वेळ वाचतो. ज्यांना अजून पडताळून पहायचे असते त्यांना मात्र त्यांचा कुठला गुण पहायचा आहे त्याप्रमाणे वेगळ्या टास्क देतो. उदा. जो उमेदवार भांडखोर असावा अशी शंका असते त्याला अशक्य अशी टास्क दिली तर त्याचा तोल सुटतो का ते पाहता येते.

अडथळ्यांच्या शर्यतीबद्दल सांगायचे झाले तर फक्त ते सर्व अडथळे पार करणे महत्वाचे नसते तर कुठल्या क्रमाने ते पार करता याला महत्व असते त्यातूनच त्या उमेदवाराची 'Resourcefulness' आणि 'Organising Ability' लक्षात येते.

दोन किंवा तीन दिवस सकाळ-संध्याकाळ जी.टी.ओ.च्या टेस्ट होतात आणि दुपारी इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूच्या वेळेस ते पंधरा गुण पडताळण्याच्या दृष्टिकोनातूनच प्रश्न विचारले जातात. आता माझ्या बाबतीत सांगायचे झाले तर मुलाखत घेणार्‍या अधिकार्‍याने विचारले, "तू पहिल्यांदाच घरातून बाहेर पडतोयस काय?". मी "होय" म्हटले. मग त्यांनी विचारले, "प्रवासाचे नियोजन कसे केलेस". मी अजंठा ट्रिपसह संपूर्ण वर्णन केले. त्यातून resoursefulnee, organising ability, confidence सर्व काही दिसून येते. तीच गोष्ट त्या गेमबद्दल. त्यांनी विचारले, "इथे मोकळा वेळ कसा घालवतोस?" मी तो गेम कसा शिकलो ते सांगितले. त्यातून effective intelligence, co-operation, social behaviour या सर्व गोष्टी दिसून येतात. आणि मी हे मुद्दाम केले नव्हते. ते आपोआप झाले होते. असो.

शेवटच्या दिवशी फेल झालेल्या उमेदवारांनी दंगा करू नये म्हणून वेगळाच प्रयोग केला जातो. सर्वच उमेदवारांना सांगण्यात येते की तुम्ही फेल झाला आहात. सर्वांना ट्रकमध्ये बसवण्यात येते ट्रक चे इंजिन सुरू करण्यात येते आणि मग पास झालेल्या उमेदवारांना खाली उतरवण्यात येते. त्यांना मेडिकल टेस्ट साठी ठेवून घेण्यात येते. मेडिकल टेस्ट पुढचे दोन तीन दिवस चालते.

मी अर्थातच मेडिकल वगैरे सर्व पास झालो. मग माझ्या सर्वात जवळच्या मित्राला मी चौसष्ट पानी पत्र लिहिल्याचे आठवते. तो पुढच्या वर्षी एन्.डी.ए.च्या परीक्षेला बसणार होता. घरी परतलो. परत जाताना अगदी सातव्या स्वर्गात होतो. एन.डी.ए.ला सिलेक्ट होणे म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती. त्या धुंदीत ट्रेनमध्येच एका मुलीच्या प्रेमात पडल्याचेसुद्धा आठवते. म्हणजे आता तिचे नाव, पत्ता, चेहरा वगैरे आठवत नाही; पण प्रेमात पडलो होतो एवढे मात्र नक्की! Wink

एका आठवड्याने परत बेंगलोरला इंटरव्ह्यूसाठी पत्र आले. हा इंटरव्ह्यू नसून पायलट अ‍ॅप्टिट्यूड बॅटरी ऑफ टेस्ट (पी.ए.बी.टी.) असते. पी.ए.बी.टी. आयुष्यात एकदाच देता येते असे म्हणतात. मी एयर फोर्स हा तिसरा चॉईस दिला होता तरी पत्र आले. मला काय! अगोदर मुंबईची ट्रिप, नंतर भोपाळची आणि आता बेंगलोरची. मज्जाच मज्जा!

बेंगलोरला रेल्वेतून जात असताना डब्यात एक माणूस आला. तो तीन पत्ते अगोदर दाखवायचा. नंतर पिसून उलटे लावायचा. त्यातला एक पत्ता अचूक ओळखायचा म्हणजे आपण लावलेल्याच्या दुप्पट पैसे तो देणार. नाहीतर आपण लावलेले पैसे वाया जाणार. त्याच्याकडे दोघा-तिघांनी आठ आणे चार आणे वगैरे लावले होते. आणि ते सतत हरत होते. त्या माणसाकडे जे तीन पत्ते होते त्यातील एकाची कड अगदी थोडी दुमडलेली होती. त्या पैसे लावणार्‍या लोकांच्या लक्षात ही गोष्ट आली नाही: पण माझ्या चाणाक्ष नजरेने लगेच ही गोष्ट पकडली आणि मी तिचा फायदा घेण्याचे ठरवले. माझ्याजवळ पन्नास रुपये होते. ते सगळेच्या सगळे मी त्या कड दुमडलेल्या पत्त्यावर लावले. त्याने पत्ते उघडले आणि मी उडालोच. कड दुमडलेला पत्ता मला वाटला तो नव्हताच. दुसराच होता. मी शपथेवर सांगतो की त्या अगोदर मला माहीत होते की एकच पत्ता कड दुमडलेला होता. बाकी दोन्ही चांगले होते. मी त्या माणसाशी खूप वाद घातला, पण उपयोग नव्हता. माझे पैसे पाण्यात गेले होते. धडा नंबर तीन - "आयुष्यात कधीही जुगार खेळायचा नाही". पश्चाताप म्हणून त्यादिवशी रेल्वेत काही जेवलो नाही. खिशात थोडी चिल्लर होती बाकीचे पैसे बॅगेत होते, ते काढलेच नाहीत.

बेंगलोरला पोचलो. आता मला आर.टी.ओ. म्हणजे कोण ते चांगले ठाऊक होते. त्यामुळे मी रिक्षा वगैरे करून स्टेशनच्या बाहेर वगैरे गेलो नाही. थेट आर. टी. ओ. कडे गेलो. तिथे दोन उमेदवार अगोदरच आले होते. ते पण माझ्यासारखे एक दिवस अगोदरच आले होते. त्यांच्याशी गप्पा मारत बसलो. नंतर कंटाळा आला म्हणून बाहेर फिरायला गेलो. समोरच महात्मा गांधी रोड आहे. त्यावर खूप थिएटर आहेत. चालत चालत बरेच दूर आलो. नंतर परत फिरलो. परत येऊन बघतो तर काय, ते दोन्ही उमेदवार गायब. माझे सामानसुद्धा कुठे दिसत नव्हते. मी घाबरलो. अगोदर वाटले की सामानाची चोरी झाली. मग आर.टी.ओ. ऑफिसमध्ये चौकशी करताना समजले की मी फिरायला गेलेल्या मुदतीत एस्.एस्.बी.चा ट्रक येऊन गेला होता. आता परत दुसर्‍या दिवशी सकाळीच येणार होता. चौथा धडा घेतला, "आपले सामान आपल्यजवळच ठेवावे."

सकाळचे ११ वाजले होते. "पश्चातापामुळे" ट्रेनमध्ये काही खाल्ले नव्हते. खिशात फक्त आठ आणे होते. त्यातले चार आण्याची इडली प्लेट घेतली. चार आणे दुसर्‍या दिवसासाठी 'रिझर्व' ठेवले. कसाबसा दिवस काढला. रात्री तिथेच एका बाकड्यावर झोपलो. सकाळी यथावकाश ट्रक आला आणि मग एस. एस. बी. ला गेलो. तिथे सामान मिळाले, 'दोस्त' भेटले आणि जिवात जीव आला. पुढे पी.ए.बी.टी. पास झालो. एयर फोर्सची मेडिकलसुद्धा पास झालो; पण माझा चॉईस आर्मी असल्यामे एयर फोर्सला गेलो नाही.

पुढे आता निर्णयाची वेळ आली होती. एन.डी.ए. ला जायचे की नाही? मी जेव्हा म्हटले की मला आय.आय.टी. ला जायचे आहे; तेव्हा सगळ्यांनी मला अक्षरश: खुळ्यात काढले. अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही कल्पना करू शकता ते सगळ्या प्रकारचे संवाद झाले आणि पुढे यथावकाश मी एन.डी.ए.मध्ये प्रवेश घेतला.

गुलमोहर: 

सर्व मा.बो.करांना नमस्कार. नवीन कथा / लेखमाला सुरू करतोय. कशी वाटते ते जरूर कळवा. सर्व बर्‍या-वाईट सूचना स्वागतार्ह आहेत.

आपला विनम्र,

शरद

शरद, फारच छान लिहिले आहे तुम्ही... आजसुद्धा मिरज-सांगलीतल्या मुलांना फारशी माहिती नसते.. तुम्ही ७०च्या दशकात फारशी माहिती नसताना तुम्ही एसएसबी पास झालात हे जबरदस्तच.. हॅट्स ऑफ..

खुपच छान लिहलय.. विषय, मांडणी सगळं अगदी जमून आलय...
>>>
तुम्ही ७०च्या दशकात फारशी माहिती नसताना तुम्ही एसएसबी पास झालात हे जबरदस्तच.. हॅट्स ऑफ..>> अनुमोदन.

तशि आर्मिच्या लोकांशि किंवा तिथल्या गोष्टिंचि सामान्य माणसांना कल्पना नसते .त्यामुळे हे सर्व वाचताना अलिबाबाच्या गुहेत गेल्यासारखेच वाटत आहे. मजा येत आहे. मध्ये जास्त गॅप घेऊ नका हि विनंति.

मला ही सर्व माहिती/लेख अतिशय उपयुक्त वाटला आहे!
भले या वयात मी आता कुठ्ही मिलिटरी वगैरेत जाऊ शकणार नसलो तरीही
तसेच हा लेख छापुन माझ्या पोरान्ना वाचायला द्यायला पाहिजे Happy

शरद, असेच अनुभव असन्ख्य असतील, इथे जरुर वाचायला आवडेल! एका वेगळ्याच, कधिच न अनुभवलेल्या विश्वाची सैर, दुसरे काय?

फक्त एक गफलत वाटते आहे या वाक्यात
>>>> आणि सुदैवाने माझा नंबर माझगाव डॉकयार्ड मधील ३५ मजली इमारतीत पस्तीसाव्या मजल्यावर आला होता.<<<<
ती मजल्यान्ची सन्ख्या पुन्हा तपासता का?

<<ती मजल्यान्ची सन्ख्या पुन्हा तपासता का?>> मला आठवतेय, ती कुठली तरी सरकारी इमारत होती आणि माझ्या आठवणीनुसार ३५ मजली होती. १९७६ साली. 'माझगाव डॉकयार्ड' विषयी थोडी साशंकता मनात आहे.

शरद

शरद आपले अनुभअव खुप छान आहेत. असेच आर्मीतील अनुभव लिहा म्हणजे आम्हा सिविलीयन लोकांना आर्मीतील जीवनाची माहिती होईल. आत्ता सध्या आपण कोठे व कोणत्या पदावर आहात.

शरद,
मस्तच झालाय हा भाग! तुमचे अनुभव इतके आगळे आहेत की वाचताना मी एका वेगळ्याच जगात जाते. काउ अँड बुल झकास. आता पोरांबरोबर खेळणार. गाडीतल्या पत्यांची गोष्ट पण जबरी आहे. आम्ही सगळेच पुढल्या भागाची वाट पहातोय.

वा वा शरद हे फार मोलाचे आहे. तुमच्याकडून फार फार अपेक्षा आहेत. पोरांना वाचायला दिले. आर्मीत जावे म्हणून नाही. अ‍ॅटीटुड शिकण्यासाठी. फारच वन्डरफुल.....

आता तुम्ही लिहिले नाही तर आम्ही रागावू हं !

अत्यंत सुंदर,जबरदस्त....
पुढच्या भागाची वाट पाहतोय.

सुरेख लिहिलंय एकदम. इतक्या वर्षांनी इतकं सगळं तपशीलवार आठवून लिहायचं म्हणजे सोपं नाही.

बारावीच्या सुटीत वडलांनी उपनगरातून फोर्टातल्या कुठल्याशा सरकारी ऑफिसात जाउन डॉमिसाइल सर्टीफिकेट आणायला लावले होते मला एकटीला तर मला त्याचा कोण अभिमान! बरोबरच्या बर्‍याच जणांसाठी हे काम बाबा/ आजोबा / काका अशांपैकी कोणीतरी केलं होतं.
पण हे असं एकट्याने इतक्या दूर, अनोळखी ठिकाणी जाऊन यशस्वी रीत्या इन्टर्व्ह्यू देणं म्हणजे खरोखर कौतुकास्पद.
अजून येऊ द्या माहिती .

छान लिहिलय अगदी.
१९९१ मधे भारतीय वायुदलात मुलींच्या पहिल्या बॅच साठी देहरादुन मधे मुलाखतीला मी गेले होते.
बर्याच आठवणी जाग्या झाल्या. ३ दिवस तुम्ही सांगितल्यासारखीच निवड प्रक्रिया होती.
निवडही झाली होती, पण अपरिहार्य कारणांमुळे नाकारावी लागली.

खरंच खूप मस्त माहिती मिळत आहे.... फार छान लेखमाला आहे! माझ्या परिचयातील आर्मी करीयर करण्यास उत्सुक असलेल्या काही मुला-मुलींना मी आपले लेख फॉरवर्ड करत आहे. त्यांना नक्कीच फायदा होईल. शिवाय इतकी वेगळी माहिती मुद्देसूदपणे तुम्ही लिहित आहात.... तुमचे कौतुक! Happy

Pages