फेस्टीवल्स ऑफ चायना भाग-१

Submitted by वर्षू. on 1 May, 2010 - 10:22

चीन मधे साजरे केले जाणारे सण,चीनच्या ५००० वर्ष जुन्या असलेल्या संस्कृती चे अविभाज्य अंग आहेत.
सांस्कृतिक महत्त्व असलेल्या या सणांना प्राचीन इतिहास आहे.
येथील मुख्य सण खालीलप्रकारे आहेत.
१) स्प्रिंग फेस्टिवल किंवा चीन चे नववर्ष
२) लॅन्टर्न फेस्टिवल
३)छिंग मिंग फेस्टिवल
४)ड्रॅगन बोट फेस्टिवल
५) डबल सेवन किंवा चीन चा वेलेंटाईन दिवस
६) मिड ऑटम्न किंवा मून फेस्टिवल
७) डबल नाइन्थ फेस्टिवल
८)विन्टर सोल्स्टिस फेस्टिवल
या सणांपैकी 'स्प्रिंग फेस्टिवल' हा सर्वात महत्वाचा सण असून या सणानिमित्त संपूर्ण चायना मधे सात ते १० दिवसांची कंपलसरी सुट्टी असते. इतर सणांकरता अर्धा दिवस सुट्टीची व्यवस्था आहे. विशेष म्हणजे इकडे कोणत्याही नेत्याचे (दिवंगत/वर्तमान) ,वाढदिवस,जयंती किंवा पुण्यतिथी साजरी केली जात नाही.
तर चीन च्या या सणांबद्दल थोडीशी माहिती ,त्या मागची कथा तुमच्यासमोर काही भागांत मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
यासाठी मी 'ड्रॅगन बोट फेस्टिवल' ने सुरुवात करत आहे.
------------------------------------------------------------------------------------ ड्रॅगन बोट फेस्टिवल
या सणाची कथा ' छू युएन' या प्राचीन आणी सर्वश्रेष्ठ कवीशी निगडित आहे.'छू' हा चीन चा प्रथम क्रमांकावरचा कवि होता. तो २७८ ख्रिस्तपूर्व 'छू' राज्याचा एक उच्चाधिकारी म्हणून कार्यरत होता. त्या काळी चीन देश, छोट्या छोट्या राज्यांमधे विभागलेला होता. ही राज्ये सतत आपसात युद्धरत असत. एकमेकांवर आक्रमण करून शेजारच्या राज्यांना बळकावयाला बघत असत.
एकदा 'छू' राज्याला, त्याच्या शेजारच्या 'छिन' या बलाढ्यशाली राज्याच्या सैनिकांनी वेढा घातला.
हुषार 'छू युएन' ने दिलेले विवेकपूर्ण सल्ले , छू राजाने अजिबात मानले नाहीत याउलट इतर कारस्थानी आधिकार्‍यांच्या चिथावणीला भुलून त्याने 'छू युएन' ला राज्यातून हाकलून लावले.
या निर्वासन काळात 'छू युएन' देशभ्रमण करून आपल्या लिखाणाच्या,कवितांच्या माध्यमातून जनतेमधे जागृती निर्माण करण्याचे कार्य करू लागला. लौकरच तो जनसामान्यांचा अत्यंत लाडका कवि बनला.
काही काळाने 'छू' राज्यावर शत्रू राज्याचे वर्चस्व स्थापित झाले. 'छू युएन' चा लाडका देश , गुलाम झाला. ही बातमी देशभक्त 'छू युएन' ला कळताच त्याचे हृदय दु:खाने विदिर्ण झाले आणी त्याने जीव देण्यासाठी 'मिलुओ' नदीत उडी मारली.
लोकांना 'छू' बुडाल्याची बातमी कळताच त्यांनी नदीवर धाव घेतली. आपापल्या बोटी पाण्यात सोडल्या. अति वेगाने नदीतून जात ते त्याचा, पाण्यात सर्वत्र शोध घेऊ लागले. पण 'छू' चा काही पत्ता लागला नाही. तोपर्यन्त 'छू'पाण्यात खोल खोल बुडून गेला होता.
मग जड अंतःकरणानी लोकांनी पाणातल्या माशांना 'छू'चे शरीर न खाण्याची विनंती केली. माशांच लक्ष दुसरीकडे वेधायला त्यांनी नदीच्या पाण्यात भाताचे गोळे टाकले.
या भाताच्या गोळ्यांना 'चुंग च' म्हणतात. चिकट तांदूळाच्या पिठीपासून बनवलेल्या या गोळ्यात पोर्क,राजमा,फळे,अक्रोड,मशरूम,रताळे,अंडी या पदार्थांपासून बनवलेले सारण भरतात. या गोळ्यांना पिरॅमिड्स सारखा आकार देऊन कणसाच्या अगर बांबू च्या कोवळ्या पानांमधे घट्ट गुंडाळतात. मग या 'चुंग च' ना भरपूर पाण्यात शिजेस्तोवर उकळतात.
'छू' पाण्यात बुडाला तो दिवस लूनार कॅलेंडरप्रमाणे पाचव्या महिन्याचा पाचवा दिवस होता.तेंव्हापासून बोटींच्या शर्यतेची प्रथा सुरू झाली. आजही लूनार कॅलेंडरप्रमाणे पाचव्या महिन्याच्या ५ तारखेला या शर्यती चायनाभर होतात.
आमच्या क्वांग चौ च्या मध्य भागातून पर्ल नदी वाहते. दरवर्षी ह्या दिवशी तिच्या किनार्‍यावर शेकडो पर्यटक आणी हजारो लोकल लोकांची एकच झुंबड उडते.
या बोटी लांबुडक्या,चिंचोळ्या असतात. प्रत्येक बोटीत १४ नावाडी असतात्.ते काळ्या,लाल,रंगीबेरंगी ट्रेडिशनल पोशाखात सजून दिसतात. बोटीच्या मुखाशी रंगीत ड्रॅगन ,लांब मान उंचावून दिमाखाने बघत असतो. तर बोटीच्या मागच्या भागात स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी, मोठा नगारा मोठ्ठ्याने वाजवणारा बसलेला असतो. बोटीच्या पुढच्या भागात त्या त्या बोटींचा कॅप्टन हातात झेंडा घेऊन उभा असतो.
पिस्तुलाचा बार उडतो. पाहता पाहता लांबुळक्या बोटी सुसाट बाणासारख्या वेगाने निघतात. प्रत्येक बोटीवरच्या नगार्‍याचा बुलंद आवाज, किनार्‍यावरच्या उत्साही प्रेक्षकांचा जल्लोष स्पर्धकांना भरपूर प्रोत्साहन देतो . क्षणात वातावरणात वेगळीच धुंदी भरून जाते. कोणीच अनोळखी वाटत नाही.
पाहतापाहता शर्यतीच्या बोटी नदीत लांबवर निघून जातात. आणी प्रेक्षक एक अविस्मरणीय अनुभव गाठीशी घेऊन, गरम गरम 'चुंग चं' खात , मागे फिरतात.
यंदा हा सण १६ जून ला साजरा करण्यात येईल.

dragon boat-1.jpg
ड्रॅगन बोटी ,पर्ल नदीत

dragon boat-2.jpg
चुंग च

dragonboat-5.jpg
ड्रॅगन हेड

dragonboat-6.jpg
ड्रॅगन बोटी
फोटोंमधला ड्रॅगनहेड चा फोटो नेट वरून घेतलेला आहे

गुलमोहर: 

मस्त.. Happy
इथे अटलांटात पण ड्रॅगन बोट शर्यती होतात. लेक लिनियर, इथे अटलांटा ऑलिंपीकच्या शर्यती झाल्या होत्या तिथे ह्या शर्यती असतात. लुनार कॅलेंडरचा पाचवा महिना म्हणजे साधारण जूलै मधे वगैरे ना?? इथेही ह्या तेव्हाच असतात.. मी मागच्या वर्षी बघायला गेलो होतो.. छान अनुभव होता..

बाकी सणांबद्दल लिहा नक्की..

झकास

मला ते छिंग मिंग फेस्टिव्हल नाव फार आवडलं.... छिंग.... मिंग....!! Happy बाकी लेख माहितीपूर्ण. आता पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.

वर्षूनील , सुंदर माहीती आहे,मला चिनच्या ड्रॅगन फेस्टीवलबद्दलच माहीत आहे. अन चिन मधे फेस्टीवलस मधे लाल भडक रंगच का वापरला जातो, याबद्दल पण कुतूहल आहे. Happy

चीन मधे लाल रंग सुबत्ता,आनंद,गुड लक चे प्रतिक आहे.लाल इतकाच सोनेरी रंगाला ही इकडे खूप महत्त्व आहे कारण Golden color or sometimes it can resemble a Yellow color, symbolized the Earth element which is the storage money element (wealth).

वर्षा, महाराष्ट्रदिनाच्या दिवशी एक्दम सुरेख संकल्प सोडला आहेस की Happy मस्त वाटला लेख आणि फोटोसुध्दा. शेफ बॉबी चिनने "World Cafe Asia" च्या एका भागात (डिस्कव्हरी ट्रॅली) ह्या भाताच्या गोळ्यांविषयी सांगितलं होतं. तो असंही म्हणाला होता की नदीचं पाणी खराब होतंय त्यामुळे आता ते नदीत टाक्ले जात नाहीत. खरंय का हे? पुढचा लेख टाक लवकर.

वर्षा..
ni hao Happy एव्ह्ढाच चायनीज शब्द माहितीय मला Happy
छान माहिती... नवीन भागाची वाट बघतेय..

thanx for all the encouragement.will try and keep up to your expectations ,my friends Happy

मस्त लेख... मी तुमचा यापुर्वीही लिहीलेला चायनावरचा लेख वाचलाय... तुम्ही अगदी चायनामय झाल्यासारख्या वाटता अन त्यामुळेच खुप छान लिहीताही....खुप माहीतीपुर्ण.. शुभेच्छा !!! Happy

मस्त लेख आणि ती छोटी छोटी नावं(छिंग मिंग!). यिन यँग (की असंच काही) म्हणजे स्त्री पुरूष का? कुठे तरी वाचलंय!