पाण्याखालचे जग... (स्कुबा डायविंग)

Submitted by सॅम on 25 April, 2010 - 17:36

आपण राहातो या जगात आजूबाजूला हवा असते. हवा नसलेलं जगही आहे... अंतराळ! तिथे जाणं अजूनतरी तितकं सोप्प नाही. तिसरं जग पाण्याखालचं! त्या जगातल्या सफरीचा हा माझा अनुभव...

फ्रान्समध्ये येऊन एक वर्ष झालं. बऱ्याच ठिकाणी फिरणं झालं पण फिरुन फिरुन त्याच त्या गोष्टी बघितल्यावर आता काहीतरी वेगळं करायचं होतं. आल्प्समध्ये स्की शिकायचापण प्रयत्न केला आणि या गोष्टी दिसतात तितक्या सोप्प्या नाहीत हे कळलं!! त्यामुळे आता काय करायचा हा प्रश्ण होता. इथे दर शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला (म्हणजे इथली उन्हाळ्याची सुट्टी संपल्यावर, सप्टेंबरमध्ये) प्रत्येक नगरपालिका एक प्रदर्शन आयोजित करते, ज्यात त्या भागातल्या सगळ्या संस्था आपापली माहिती देतात. यात सगळे खेळ, विविध कला, संगीत, छंद, सामाजिक कार्य या सर्व प्रांतातील संस्था भाग घेतात. या संस्थांना नगरपालिकेकडून आर्थिक मदत मिळते. त्यामुळे स्वतःच्या नगरपालिकेतील संस्थांमध्ये लोकांना फी देखील कमी असते. (हो.. मी 'परका' असलो तरी मलापण हा लाभ मिळतो.) तर... प्रस्तरारोहण, जंगलातून भटकंती, सायकलिंग वै ची माहितीपत्रके गोळा करतानाच स्कुबा दिसलं आणि ठरवलं, हेच करायचं! माझं कामचलाऊ फ्रेंच आणि तिथल्या बाईचं मोडकं तोडकं इंग्लिश वापरून मी शंकानिरसन केलं आणि समाधानाने घरी परतलो. स्कुबामध्ये निदान पाण्याखालीतरी भाषेचा अडसर येणार नव्हता हा अजून एक फायदा! पोहायला तर मला आवडतंच! (पोहताना घाम येत नाही म्हणून जास्त आवडतं.) पाण्यावर मी एकदम मजेत असतो पण पाण्याखाली तितका नाही. पण स्कुबामध्ये तर हवेची टाकी बरोबर असते त्यामुळे काही चिंता नव्हती. पण उत्सुकता भलतीच होती. आठवडातून एका संध्याकाळी पालिकेच्या तरणतलावात सराव आणि शेवटी मे महिन्यात समुद्रात डुबकी असा कोर्स होता.

बातेमः
पहिल्या दिवशी गेलो तर बरीच गर्दी होती. सगळे फ्रेंचच होते. परवा प्रदर्शनात जिच्याबरोबर बोललो होतो तिनी अजून एक दोघांची ओळख करून दिली. इथे स्कुबा शिकायला आलेला सेमी-फ्रेंच बहुधा मी पहिलाच होतो. मी त्यांना माझ्या फ्रेंच (अ)ज्ञानाची कल्पना दिली पण स्कुबानिमित्त जगभर फिरल्यामुळे बहुतेक सगळ्या प्रशिक्षकांना कामापुरतं इंग्रजी येत होतं. पहिलाच दिवस असल्याने मला वाटलं फोर्म भरणे, विषयाची ओळख, लोकांची ओळख, थोडंफार पोहणं करून सोडून देतील. पण सगळं घालून पाण्याखाली जायचय हे ऐकून मला धक्काच बसला!!... याला इथे 'बतेम' म्हणतात. ज्याला स्कुबा शिकायचंय अशा प्रत्येकाबरोबर एक प्रशिक्षक होता. माझ्या प्रशिक्षकांनी मला स्कुबा उपकरणाची थोडक्यात माहिती दिली.

स्कुबा (SCUBA) हा शब्द म्हणजे Self Contained Underwater Breathing Apparatus याचे संक्षिप्त रूप आहे. सध्या प्रचलित असलेल्या उपकरणाचे तीन भाग असतात.

  • पहिला भाग म्हणजे बिन बाह्यचं जाकीट (Buoyancy compensator, stab jacket), ज्यात हवा भरता येते, त्यासाठी डावीकडे एक नळी आणि हवा भरायची/काढायची बटणं असतात.
  • दुसरा भाग म्हणजे या जाकीटला मागे बांधायची हवेची टाकी (Diving cylinder). या टाकीत २०० बार दाबाची हवा असते. (१ बार म्हणजे समुद्रसपाटीवरील हवेचा दाब).
  • तिसरा भाग म्हणजे या टाकीला लागणाऱ्या नळ्या. टाकीवर एक व्हाल्व्ह बसवला जातो, जो २०० बार दाब कमी करून १० बार करतो. इथून चार नळ्या निघतात, एकावर अजून एक व्हाल्व्ह (Regulator) असतो जो तोंडात पकडायचा. यातून हवा ओढल्यावरच येते. ती हवा बाह्य दाबाएवढी असते. (बाह्य दाब तुम्ही पाण्यात किती खाली आहात यावर ठरतो.) दुसरी नळी जाकीटाला लावायची. तिसऱ्या नळीवर हवेचा दाब दाखवणारी तबकडी (Pressure gauge) असते. चौथी नळी (असली तर) तिला अजून एक व्हाल्व्ह असतो जो संकट समयी दुसऱ्याच्या मदतीसाठी असतो. याचं जमिनीवर वजन बरंच होतं पण पाण्याखाली ते वजन जाणवत नाही (आठवतंय का? ... पाण्यातल्या वस्तूंना वर ढकलणारे Buoyancy बळ ).
  • या शिवाय पायात पाल्म (Fin) आणि डोळ्यांवर मुखवटा (गॉगल) असतो जो डोळ्यांबरोबर नाक देखील झाकतो.




[सर्व प्रकाशचित्रे विकीवरुन साभार]

एवढी तपशीलवार माहिती मलाही नव्हती. मला वाटायचं कि पाण्याखालीही नाकानीच श्‍वास घेतात. इथे पाण्याखाली जायच्या पाच मिनिटं आधी कळलं की डोळ्यांवरच्या गॉगलमध्ये नाकही आत येतं आणि रेग्युलेटर तोंडात ठेऊन हवा शोषावी लागते!! जाउदे आता काय करणार... मी पाण्यात उतरून जाकीट चढवलं आणि खाली जाण्याआधी श्‍वास घ्यायचा सराव केला. पाण्याखाली एकमेकांशी खुणेनेच बोलावं लागतं. माझ्या प्रशिक्षकाने सगळं ठीक आहे, ठीक नाही, खाली जायचं, हवा संपत आलीये, डुबकी संपली अशा महत्वाच्या खुणा सांगितल्या. यानंतर मी जाकीटमधली हवा कमी करून खाली गेली. डोकं पहिल्यांदाच पाण्याखाली घातलं आणि मला श्‍वासाच घेता येईना! तोंडात रेग्युलेटर होता पण आजूबाजूला पाणी असल्याने बहुतेक माझा मेंदू तोंडानी हवा खेचायची परवानगी देत नव्हता! (त्याला वाटत असेल पाणीच तोंडात येईल... येडाच्चे!!) जाकिटात हवा भरून मी पटकन वरती आलो... सोबत प्रशिक्षकही वरती आला. त्याच्या मते हे स्वाभाविक होतं. मग अजून थोडा सराव करून परत खाली गेलो. यावेळी कसाबसा श्‍वासोच्छ्वास करता आला! मग प्रशिक्षकानी माझ्या जाकिटातली हवा कमी करून मला अजून खाली नेलं. मी थोडा घाबरलो होतो. जमिनीवर श्‍वासोच्छ्वास सहज होतं असतो. विचार करावा लागत नाही. शिवाय आजूबाजूला मुबलक हवा असल्याने ती पण चिंता नसते. पाण्याखाली माझ्याबरोबर मी हवा घेऊन गेलो होतो पण तरीही आजूबाजूला पाणी असल्याने थोडं घाबरायला होतं. त्यामुळे प्रशिक्षकांना सांगून मी परत वरती आलो. मग पुन्हा थोडा आत्मविश्‍वास गोळा करून खाली गेलो. या वेळी अगदी तळ गाठला! (३ मीटर खोली Happy ) आता जाकिटमधली सगळी हवा काढली होती. माझा प्रशिक्षक तळावर बसला होता पण मला काही केल्या खालपर्यंत जाता येईना. या वेळी मी नं सांगता प्रशिक्षकानेच वर जायची खूण केली. आम्ही वर आल्यावर त्याने सांगितलं की मी श्‍वास दाबून ठेवतोय त्यामुळे खाली जाऊ शकत नाही. मी हे मुद्दाम करत नव्हतो पण नकळत होत होतं.

मग यावेळी पुन्हा खाली गेल्यावर श्‍वास सोडताना छाती पूर्ण मोकळी केली तेंव्हा कुठे मी देखील तळावर बसु शकलो. मग आम्ही दोघं तळाला समांतर आडवे होऊन तलावाच्या खोल बाजूला जाऊ लागलो. आता मी पूर्णपणे सावरलो होतो त्यामुळे भरपूर मज्जा येत होती. आडवं जाताना आपली खोली बदलायला छातीतली हवेची मात्रा बदलावी लागते. छातीत हवा भरल्यावर शरीर लगेच वर जात नाही... जरा वेळ लागतो. वर (किंवा खाली) जाण्याच्या थोडा आधीच श्‍वास घ्यावा (किंवा सोडवा) लागतो याचा अंदाज आता आला होता. तलावाच्या दोन-तीन चकरा मारून झाल्या. शेवटी वेळ झाल्यामुळे आम्हाला वर यावे लागले. या 'बातेम' चा उद्देश गोताखोरीची तोंडओळख करून द्यायची आणि तुम्हाला 'खरच' ही गोष्ट शिकायची आहे की नाही याचा निर्णय घ्यायला मदत करायची हा आहे. थोडक्यात 'कौन कितने पानीमे है' हे दाखवण्यासाठी! सुरुवातीचा मानसिक अडथळा पार केल्यावर मलातरी गोताखोरी सोप्पी वाटली होती. आता शंका ही होती की उरलेल्या वर्षभर काय करायचं?!! (त्याचं उत्तर अर्थातच पुढे मिळालं!!)

अजुन एक माहिती कळली की, गोताखोरी शिकायला पोहायला यायलाच हवं अशी अट नाही... थोडा विचार केल्यावर पटतं, इथे पोहायचं नसुन बुडायचंच आहे!!

Disassociation bouche-et-nezal:
पुढच्या आठवड्यात पुन्हा पाण्याखाली जायला मी उत्सुक होतो. पण यावेळी जाकिट आणि हवेची टाकी न घेता नुसतंच मास्क आणि ट्यूब (ज्याचे एक टोक त्या व्होल्व्ह सारखं तोंडात पकडायचं असतं आणि दुसरं डोक्याच्या वरती येतं) घेऊन माझ्या प्रशिक्षकांनी आम्हाला बोलावलं. आता प्रत्येक प्रशिक्षकाबरोबर दोन किंवा तीन नवशिके होते. हा दिवस disassociation bouche-et-nezal चा होता. (मी फ्रांसमध्ये असल्याने गोताखोरीची परिभाषा देखील फ्रेंचच आहे! फ्रेंचमध्ये bouche म्हणजे तोंड आणि nez म्हणजे नाक) Disassociation bouche-et-nazal म्हणजे थोडक्यात नाक आणि तोंड यांनी स्वतंत्रपणे श्‍वास घेणे. फक्त नाकानी श्‍वास घेणं सोप्पय, तोंड बंद करता येतं.... पण फक्त तोंडानी आपण जेंव्हा श्‍वास घेतो तेंव्हा नकळत नाकानी थोडी हवा ओढून घेतली जाते. पण पाण्याखाली असताना असं करून चालणार नाही. एरवी नाक मास्कमध्ये असलं तरी काही कारणांनी मास्क निघाला/काढला तर नाकातून पाणी जाऊ नये यासाठी disassociation bouche-et-nazal येणं महत्वाचं आहे. अगदी विचारपूर्वक श्‍वास घेत फक्त तोंदातूनच हवा जाईल याची काळजी घ्यावी लागते. एकदोनदा नाकात पाणी गेल्यावर हे जमतं!!


[सर्व प्रकाशचित्रे विकीवरुन साभार]

जलक्रिडा:
पुढच्या आठवड्यात वाटलं पुन्हा मास्क-ट्यूब लाऊन काहीतरी करायला लावणार... पण नाही... यावेळी जाकिट-हवेची टाकी लाऊन पाण्याखाली नेलं. यावेळी आम्हाला पाण्याखाली गेल्यावर बरंच काय काय करायचं होतं. जसं, तोंडातली नळी काढायची फुफ्फुसातली हवा बाहेर सोडायची आणि परत तोंडात नळी घालून श्‍वास घ्यायचा. तसंच तरण तलावाच्या तळाला पाठीवर आडवे झोपून वरती बुडबुड्यांची वर्तुळं सोडायची. (सिगारेटच्या धुराची वर्तुळं असतात तशी!) यात दोन अडचणी आहेत. एक म्हणजे बुडबुड्यांची वर्तुळं होणं अवघड आणि दुसरं म्हणजे आडवं झोपल्यावर गॉगलमधल्या हवेमुळे गॉगल थोडा वर उठतो आणि थोडे पाणी आत येते. इथे disassociation bouch-et-nazal उपयोगाला येते. नाक पाण्यात असूनही तोंडाने श्‍वास घेता आला पाहिजे! अजून एक कसरत म्हणजे पाण्यात एका पातळीत राहणं. छातीतील हवेची मात्रा बदलून ही पातळी सांभाळवी लागते. तसंच गॉगल काढून परत लावायचा आणि नाकानी गॉगलमध्ये हवा भरून आतले पाणी काढून टाकायचे हे देखिल शिकवलं.

पुढच्या बऱ्याच आठवड्यात अशाच प्रकारच्या अजून बऱ्याच कसरती करून घेतल्या...जसं,

  • गॉगल काढायचा, तोंडातली नळी काढायची, श्‍वास पूर्ण सोडून द्यायचा, तोंडात नळी घालून पुन्हा श्‍वास घ्यायचा, गॉगल घालायचा, गॉगलच्या आतलं पाणी काढून टाकायचं... आणि हे सगळं पाण्यात एका पातळीत राहुन करायचं.
  • पाण्यात शीर्षासन करणं
  • पाण्याखाली जाकिट काढणं आणि पुन्हा चढवणं आणि हे करताना तोंडात नळी तशीच ठेवणं.
  • त्याहून भारी म्हणजे एक खेळ आहे ज्यात तीन/चार गोताखोरांनी तळाला गोल जमायचं, जाकिट काढून तळावर ठेवायचं, एकाच वेळी सगळ्यांनी तोंडातली नळी काढून आपलं जाकिट सोडून आपल्या उजवीकडील गोताखोराच्या जाकिटपर्यंत पोहून त्याच्या जाकिटची नळी तोंडात घेऊन श्‍वास घ्यायचा. असंच आपलं जाकिट येईपर्यंत करायचं. हे करताना पहिल्यांदाच पाण्याखाली हवेशिवाय पोहायचं होतं. तरी अंतर थोडंच असल्याने घाबरत घाबरत का होइना... केलं!
  • पायातल्या फिन्स काढून तरण तलावाच्या तळावर चालायचं! हे वाटतं तेवढ सोप्प नाही कारण, आधी लिहिल्याप्रमाणे पाण्यात खाली जायचं असेल तर छातीत जास्त हवा ठेऊन चालत नाही आणि पूर्णपणे खाली गेल्याशिवाय चालायला जोर येत नाही!!

एकंदर ह्या सगळ्याचा उद्देश आम्हाला पाण्याखाली कुठल्याही दडपणाशिवाय सहज वावरता यावं हा होता.

हे पाण्याखालचे धडे चालू असतानाच warm up च्या नावाखाली पाण्यावरतीपण आम्हाला पोहायला लावायचे. फिन्स न लावता १०० मीटर आणि फिन्स लाऊन २०० (नंतर वाढवत ६००) मीटर पोहायचो. कधी कधी दोघा दोघांच्या जोड्या करून मागच्याने पुढच्याचे पाय धरून ढकलायचं तर कधी कधी पुढच्यानी मागच्याला ओढायचं असंपण करून झालं. यात तर बरीच दमछाक व्हायची!

थोडा आभ्यासः
हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर मी स्तर-१ चा गोताखोर होईन. म्हणजे मला समुद्रात डुबकी मारायची असेल तर स्तर-२ किंवा अधिक वाला गोताखोर बरोबर असणं आवश्यक आहे. तरी माझी जबाबदारी त्याच्यावर नसते. माझी हवा किती उरलीये वै गोष्टींवर माझे मलाच लक्ष ठेवावं लागतं. तसं गोताखोरी हे स्वअनुशासित क्षेत्र आहे. त्यामुळे फाजील आगाऊपणा न करणं हिताचं आहे. (स्वतःच्या आणि दुसर्‍यांच्याही)

स्तर-१ च्या गोताखोराला तांत्रिक गोष्टींची फक्त तोंडओळख असली तरी चालते. पुढच्या स्तरांसाठी भौतिक शास्त्र, सागरी विज्ञान, पाण्यातले जीवजंतू याचाही थोडा अभ्यास असतो. थोडक्यात आम्हाला दिलेली माहिती अशी, हवेच्या टाकीत २०० बार दाबाने २० लिटर हवा भरलेली असते. (म्हणजे १ बार दाबाची ४,००० लिटर हवा) वयस्क माणसाचे फुफ्फुस ४ ते ६ लिटर क्षमतेचे असते. श्‍वास पूर्ण सोडल्यावर देखील २ लिटर हवा आत राहात असते. समजा १ मिनिटात १२ वेळा श्‍वासोच्छवास केला तर साधारण १०० मिनिटं ही टाकी पुरते. पण यात एक मेख आहे. आपल्या सभोवताली जितका दाब असतो त्याच दाबाची हवा आपण घेतो. त्यामुळे जमिनीवर १ बार दाबाची साधारण ४ लिटर हवा एका श्‍वासात घेतली जाते. पण पाण्याखाली दर १० मीटरला सभोवतालचा दाब १ बारने वाढतो. त्यामुळे १० मीटर खाली २ बार (हवेचा १ बार दाब + १० मिटर पाण्याचा १ बार दाब) दाबाची ४ लिटर हवा घेतली जाते त्यामुळे जमिनीवर १०० मिनिटं चालणारी टाकी १० मीटर पाण्याखाली ५० मिनिटंच चालते!! त्यामुळे टाकीच्या दाबावर नजर ठेऊन असावं लागतं. दाब १०० बार झाला की बोटीकडे परतायचं आणि ५० बार झाला की जिथे असेल तिथेच डुबकी संपवून सरळ वरती यायला सुरुवात करायची असा संकेत आहे.

!! खतरा !!
हे वरती येणं देखील साधं सरळ नाही. एकतर श्‍वास घेत-सोडत वरती यावं लागतं. कारण १० मीटर खाली २ बार दाबाने फुफ्फुसात असलेली ५ लिटर हवा वरती येईपर्यंत सभोवतालचा दाब १ बार झाल्याने प्रसरण पाऊन १० लिटर होते. या वाढत्या हवेला बाहेर सोडत राहणं महात्वाचं आहे. तसंच पाण्याखाली जास्त दाबाने घेतलेल्या हवेतले वेगवेगळे वायु रक्तात सहजपणे विरघळतात. पण तो दाब अचानक कमी झाल्याने रक्तात त्याचे बुडबुडे निर्माण होऊ शकतात. हे बुडबुडे कुठे तयार झाले यावर त्याचा परिणाम ठरतो. (भोवळ येणे, स्नायू आखडणे, लकवा वै.). याला
decompression sickness म्हणतात. हे टाळण्यासाठी तुम्ही किती खोलीवर किती वेळ आहात यावर, वरती किती टप्प्यांमध्ये किती वेळ थांबत यायचं हे ठरतं. सध्यातरी याची काळजी मला नाही. मी ज्या प्रशिक्षकासोबत जाईन तो हे बघेल. त्यांच्याकडे यासाठी गोताखोरीचे तक्ते असतात.

हे वाचुन घाबरुन जायची काहीच गरज नाही. अशी जोखिम प्रत्येक खेळात असतेच... साधं पळायला गेलं तर पाय मुरगाळुन लिगामेंट टेअर होउ शकतोच की! त्यामुळे या परिणामांची जाणीव असणं आणि त्याची काळजी घेणं महत्वाचं आहे.

पहिल्यांदाच २० मीटर खोलः
आमचा तरण तलावा जास्तीत जास्त ५ मीटर खोल आहे. त्यामुळे त्याहून खोल जायचं असेल तर La Fosse (मराठी अर्थ: गर्ता) या ठिकाणी जावं लागतं. इथे ५ मीटर व्यासाच्या तीन विहिरी आहेत प्रत्येकी ५, १० आणि २० मीटर खोल. मी पहिल्यांदाच २० मीटर खोल जाणार होतो. बाकी खोलीप्रमाणे वाढता दाब कानांवरही जाणवतो. याला ear barotrauma म्हणतात. दर तीन-चार मीटरला घसा आणि कान यांच्यातला दाब सारखा करावा लागतो. तसं केलं नाही तर कान प्रचंड ठणकतो. पण ते इतके काही अवघड नाही. बाकी तुम्ही किती खोल आहात याचा तसा काही फरक पडत नाही. असलाच तर मानसिक दबाव असतो कारण २० मीटरवर काही झाले तर मदत बरीच दूर असते. वीस मीटर खोलीवर तुम्हाला वाटलं म्हणून लगेच वरती जाता येत नाही. त्यामुळे आपल्या उपकरणांवर, प्रशिक्षकांवर आणि मुख्य म्हणजे स्वतःवर विश्‍वास असावा लागतो. (याची तुलना मी पोहण्याशी करीन, पोहायला वरचे तीन फुट पाणीच लागते. खाली तळ किती खोल आहे याचा तसा काही संबंध नसतो. तुमच्या पोहोण्यावर तुमचा भरवसा असेल तर खोली कितिही असली तरी काही फरक पडत नाही.) २० मीटर खोल गेल्यावर वर बघायला मजा वाटते. वरून अंधुक प्रकाश येतोय, खालून आम्ही सोडलेल्या हवेचे बुडबुडे वर चाललेत आणि त्यातच एखाद दुसरा गोताखोर! आपण वीस मीटर पाण्याखाली आहोत ही भावना रोमांचक (काहींना भीतीदायक) असते!! इथून वर येताना देखील अतिशय सावकाश यावं लागतं. माझ्या प्रशिक्षकाच्या शब्दात सांगायचं तर हवेचा अगदी छोटा बुडबुडा जीतक्या वेगात वर येईल त्याहीपेक्षा सावकाश!

पाण्याखाली हवेशिवाय!
गोताखोरीचा स्तर-१ पार करायला पाण्याखाली हवेशिवाय जाणं देखील यावं लागतं. असे गोते मारायच्या दोन पद्धती आहेत. एक canard (म्हणजे बदका) प्रमाणे डोके आधी खाली घालून तर दुसरी phoque (म्हणजे सील) प्रमाणे पायाच्या दिशेने खाली जाणे. यात सीलची पद्धत मला अवघड जाते कारण श्‍वास सोडून आत जावं लागतं. आधी म्हणाल्याप्रमाणे पाण्याखाली हवेशिवाय जायला मी घाबरायचो. बदकाप्रमाणे जाताना श्‍वास घेऊन गेलो तरी खाली (३ मीटर खोल) गेल्यावर लगेचच मला पुन्हा श्‍वास घ्यायची इच्छा व्हायची. मग लगेच वर यावं लागायचं. माझ्या प्रशिक्षकांनी समजून सांगितले की, श्‍वास सोडल्यावर लगेच पुढचा श्‍वास घेणे ही शरीराची गरज नसून जन्मल्यापासून आपल्याला लागलेली एक सवय आहे. नेटवर अजून वाचन केल्यावर याबद्दल बरीच नवीन माहिती मिळाली. जसं कुठलेही प्रशिक्षण नसलेली व्यक्ती देखिल १ ते २ मिनिटे श्‍वास रोखुन ठेउ शकते. त्याचा त्या व्यक्तिच्या शरिरावर कुठलाही वाईट परिणाम होत नाही. जी गुदमरल्याची भावना असते ती मानसिक असते!! ३ ते ५ मिनिटांनंतर मेंदुला इजा होउ शकते. जे काही परिणाम होतात तेही प्राणवायूच्या कमतरतेमुळे न होता रक्तातल्या कार्बन डॉयऑक्साइडच्या वाढीमुळे (आणि रक्ताच्या कमी झालेल्या pH मुळे) होतात. तसंच कोणालाही स्वेच्छेने श्‍वासोच्छवास थांबवता येत नाही, कारण कार्बन डॉयऑक्साइडची मात्रा एका पातळीवर गेली की आपली शुद्ध हरपते आणि श्‍वासोच्छवास पूर्ववत होतो! पाण्याखाली mammalian diving reflex मुळे अजुन थोडी मदत मिळते. सध्या free-diving मध्ये विश्व-विक्रम १९ मिनीटांचा आहे!!! त्यामुळे शारिरीक पातळीवर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याखाली पोहताना शरीराची कमीत कमी हालचाल करणं, जेणेकरून कमीत कमी कार्बन डॉयऑक्साइड तयार होईल. तसेच मानसिक पातळीवर मन शांत ठेवणं, त्यासाठी पाण्याखाली डुबकी मारल्यावर 'किती दूर जायचंय?', 'किती वेळ झाला?', 'बस करूदे का?' असे विचार न करता आपलं मन दुसरीकडे वळवता आलं पाहिजे. जसं, तरण तलावाच्या तळाला लावलेल्या फरशा मोजणं किंवा आजूबाजूला कुणी असेल तर त्याच्याशी खाणाखुणा करणं इ. माझा प्रशिक्षक एका डुबकीत १०० मीटर जाऊ शकतो!! मी तर हे ऐकून उडालोच. या सगळ्याचा परिणाम माझ्यावर झाला नसता तरच नवल. सुरुवातीला ५ मीटरही न जाऊ शकणारा मी आता २० मीटर जाऊ लागलो!!

पाण्याखालची भाषा:
पाण्याखाली फक्त खुणांचीच भाषा असते. या खुणा आणि त्यानंतर करायची कार्यवाही यांची उजळणी दर आठवड्याला होत असे. यात 'वर', 'खाली', 'ठीक आहे', 'ठीक नाही', 'दाब किती?', 'दाब=१०० बार', 'दाब=५० बार', 'डुबकी संपली' अशा दर डुबकीला लागणाऱ्या खुणा आहेत. तसेच काही विशेष खुणा म्हणजे 'थंडी वाजतीये', 'नळीतून हवा येत नाहीये', 'श्‍वास घेता येत नाहीये' इ.

संकटसमयी
पाण्याखाली असताना काही कारणाने समजा तुमच्या नळीतून हवा येईनाशी झाली तर काय करायचं? याचा विचार मी कधी केला नव्हता Happy पण याचेही प्रशिक्षण आम्हाला देण्यात आले. जर तुम्हाला हवा मिळत नसेल तर जवळच्या गोताखोराला एक विशिष्ट खुण करायची आणि मग तो गोताखोर तुमच्या मदतीला येतो (म्हणजे काय यावंच लागतं... आणि तुम्हालाही कोणी खुण केली तर जावंच लागतं). आता तो जवळचा गोताखोर तुमच्यासारखाच स्तर-१ चा (म्हणजे नवशिका) देखील असू शकेल. त्यामुळे संकट समयी स्वतः कसं वागायचं आणि दुसर्‍याला कशी मदत करायची हे पण आम्हाला शिकवलं. तुमच्या टाकीला संकटसमयी वापरायची जादा नळी असेत तर हे सोप्पं जातं पण जर का एकच नळी असेल (जी तुम्ही सध्या वापरत असता) तर तीच नळी संकटग्रस्त गोताखोराला श्‍वासोच्छवासासाठी द्यावी लागते. यावेळी अनेक छोट्या छोट्या गोष्टींचं भान ठेवावं लागतं, जसं,

  • लगेच त्या गोताखोराजवळ पोचणं
  • संकटग्रस्त गोताखोराच्या जाकिटला डाव्या हातानी पकडून ठेवणं (याचा त्यालाही मानसिक आधारही मिळतो)
  • आपल्या तोंडातली नळी काढून त्याच्या तोंडात देणं आणि ती नळी सदैव आपल्या हातात पकडुन ठेवणं (कारण तो गोताखोर आधीच घाबरलेला असतो, तुम्ही तुमची नळी सोडली आणि त्यांनी ती पकडून धरली तर तुम्हाला हवा कुठून मिळणार!)
  • त्याला दोनदा श्‍वास घ्यायला देऊन ती नळी परत आपल्या तोंडात घेणं, आपण दोनदा श्‍वास घेऊन पुन्हा त्याले देणं.
  • मॉनीटरला शोधून त्या गोताखोराला मॉनीटरच्या स्वाधीन करणं. (नशिब!)

ह्या सगळ्याचा सराव आमच्याकडून कधी अगाउ सुचना देउन तर कधी अचानक करवून घेतला गेला. प्रत्येक छोटी गोष्ट (जसं आपली नळी न सोडणे) ही प्रत्यक्ष अनुभव देऊन लक्षात राहील याची खबरदारी आमच्या प्रशिक्षकांनी घेतली. त्यामुळे आता फक्त एका टाकीवर देखिल आम्ही दोघं नवशिके व्यवस्थित श्‍वासोच्छवास करु शकतो.

एवढा सराव केल्यावर आता भीती कसलीच नाही, फक्त उत्सुकता आहे प्रत्यक्ष समुद्रात माशांबरोबर डुबकी मारण्याची! त्याचीही तयारी झालीये... मे महिन्यात मार्सेलला भूमध्य समुद्रात... आता फक्त वाट बघतोय त्या दिवसाची!!!

-------------------------------------------------

काय योगायोग!
पहा, डिस्कव्हर महाराष्ट्रमध्ये तारकर्ली स्कुबा डायव्हिंग बद्दल मिलिंद गुणाजी बरोबर, (८ व्या मिनीटानंतर)

गुलमोहर: 

जबरी रे सॅम !!!
एकदम व्यवस्थित माहिती लिहिलयस.

तुझा समुद्र डुबकीसाठी शुभेच्छा.. !!! Happy तिथला पण वृत्तांत लिही.

खरंच खूप सविस्तर आणि माहितीपूर्ण लिहिलं आहे. भूमध्य समुद्रातील अनुभव वाचायला आवडेल Happy

मस्तच रे सॅम. अतिशय सविस्तर माहिती.
आता समुद्रातला वृत्तांतही येऊदेत नक्की..>>>>अगदी अगदी
बादवे snorkeling आणि स्कुबा डायविंग यात फरक काय आहे?

महाराष्ट्रात मालवण तारकर्ली येथे snorkeling आणि स्कुबा डायविंग सुरु केले आहे. Happy

मस्त तपशीलवार लिहिलंय.

अंडरवॉटर सी वॉक केलाय मी. ते फारच फालतू आहे ह्याच्यापुढे, पण रिलेट करू शकले बर्‍याच गोष्टींशी- जसं की खुणेची भाषा, कान दुखणे, पाण्यात सहज हालचाल न करता येणे वगैरे. पण जमलं, की धमाल येते Happy

तुम्हाला शुभेच्छा, पुढल्या वेळी फोटोही टाका.

सॅम उत्तम माहिती... अगदी डिटेलवार... तुला १०० बार बक्षिस :p
पाण्याखालील गेल्यावर फोटो काढायला विसरू नको... Wink

बादवे snorkeling आणि स्कुबा डायविंग यात फरक काय आहे? >>> योगेश स्नोर्केलिंग म्हणजे फक्त पाण्याच्या पातळीवर राहून आतील साधारण ५ फुटांपर्यंतचे पहाणे... यात फक्त मास्क आणि एक नळी असते जिचे एक टोक (व्हाल्व्ह) तोंडात आणि दुसरे पाण्या बाहेर असते.

अंदमानच्या जॉली बॉय बिचवर केलेला स्नोर्केलिंगचा अनुभव एकदम अफलातून आहे... Happy

पराग, नानबा, मृण्मयी, निवांत, पन्ना, योगेश२४, अगो, हिम्सकूल, पूनम, ललिता-प्रीति सर्वांना धन्यवाद... बरेच दिवसांपासुन लिहायचं राहिलं होतं, आता पुढच्या महिन्यात समुद्रातला वृत्तांत जरुन देइन... शक्य झालं तर पाण्याखालच्या फोटोंसकट!!

योगेश२४,
>> snorkeling आणि स्कुबा डायविंग यात फरक काय आहे?
स्नॉर्कलिंग मधे मास्क, ट्युब आणि फिन्स घालुन पाण्यावर पालथे (खाली बघत) पोहतात आणि अधुन मधुन बदकासारखं पाण्यात डुबकी मारतात. अर्थातच जास्त खोल जाता येत नाही. पण स्कुबा डायविंग मधे हवेची टाकी बरोबर असल्याने खोल जाउ शकतो (recreational diving मध्ये ६० मीटर पर्यंत जाता येतं). एक डुबकी साधारण अर्ध्या तासाची तरी असते.
अधिक माहिती:
http://en.wikipedia.org/wiki/Scuba_diving
http://en.wikipedia.org/wiki/Snorkelling

>> महाराष्ट्रात मालवण तारकर्ली येथे snorkeling आणि स्कुबा डायविंग सुरु केले आहे.
मी ही हे ऐकुन आहे, कोणी प्रत्यक्ष अनुभवलय का? MTDC च्या संकेतस्थळावर जास्त नाहिती नाहीये Sad
http://www.maharashtratourism.gov.in/mtdc/HTML/MaharashtraTourism/Defaul...

आपल्याकडे लक्क्षद्विप, मालदिव आणि अंदमानला पण चालतं. पण पुण्या/मुंबईत तरी याचे कोर्सेक होतात का याची काही कल्पना नाही. लक्क्षद्विप/मालदिव ला जाउन कोर्स करण्यात अर्थ नाही, किती दिवस राहणार, किती सराव करणार, किती खर्च करणार आणि किती खोल जाणार... त्यापेक्शा तरण तलावात पूर्वतयारी करुन तिकडे गेलो तर फायद्याचं आहे.
आपल्याकडाची एक साईट सापडली,
http://www.barracudadiving.com/divedestinations.php

इंद्रा/सॅम अधिक माहितीबद्दल धन्यवाद Happy
@ सॅम
मी ही हे ऐकुन आहे, कोणी प्रत्यक्ष अनुभवलय का?>>>> माझे काही मित्र गेल्या महिन्यात तारकर्लीला जाऊन स्नोर्केलिंग करून आलेत. मी विचारतो त्यांना डिटेल्स Happy

सॉलिड्ड वर्णन. मे मधल्या मोठ्या डुबकीकरता शुभेच्छा.
बर्‍याच ठिकाणी ( ग्रेट बॅरियर रिफला वगैरे) स्कुबा डायव्हिंगच्या आधी थोडा वेळ ट्रेनिंग देतात त्यात एवढं डिटेल शिकवत नसावेत ना?

काय योगायोग!
पहा, डिस्कव्हर महाराष्ट्रमध्ये तारकर्ली स्कुबा डायव्हिंग बद्दल मिलिंद गुणाजी बरोबर, (८ व्या मिनीटानंतर)
योगेश२४, ह्याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!

ब्ल्यूsssssssssssssss Proud

सॅम.. काय मस्तच माहिती दिलीस ! मांडणीदेखील छानच ! बरेच ज्ञान वाढवलेस.. त्याबद्दल धन्यवाद Happy

बाकी तुला ब्ल्यूमध्ये डुबकी मारण्यासाठी खुप सार्‍या शुभेच्छा ! Happy नि ह्या डुबकीचा अनुभव घेतल्यावर तू लिहिशलच !

सूक्ष्म बारकाव्यान्सहीत रन्जकपणे ही सर्व महत्वपूर्ण माहिती मराठीतून इथे लिहील्याबद्दल स्यामचे आभार Happy
पुन्हा एकदा बारकाईने वाचून पाठ करुन ठेवले पाहिजे!

मस्त माहिती. आवडले सगळेच. या सगळ्यातून गेल्याने बऱ्याच ठिकाणी अगदी अगदी झालं. पुढचा भागही वाचला.
अजूनही करता डायविंग की नाही?

छान रे! आतमधे गेल्यानंतर तिथल्या प्राण्यांची भिती वाटतं नाही का?
पहिल्यांदा वाट्ते ना!
स्नॉर्केलिन्ग करताना एक खुप मोठा मासा सरळ माझ्याच रोखाने आल्यावर माझी तारांबळ उडाली होती!
मासा खुप मोठा होता माझ्या दुप्पट आकाराचा. अगदी जवळ येऊन तो निघून गेला.
नंतर आलेले मोठे कासव मात्र मी शांतपणे जवळून न्याहाळले होते.

पोहताना तळ दिसत नाही पण स्नॉर्केलिंग करताना समुद्राचा तळ दिसतो. तेव्हा 'बापरे आपण इतक्या उंचीवर आहोत' असा विचार येऊन जरा घाबरायला झाले होते पहिल्यांना. नंतर मात्र खुप मजा आली.