अन्नं वै प्राणा: (२)

Submitted by चिनूक्स on 14 August, 2008 - 14:44

अथान्नस्यै द्रष्टाभवति, श्रोता भवति, मन्ता भवति, बोध्दाभवति, कर्ताभवति, विज्ञाता भवति, अन्नमुपास्वेति | - यजुर्वेद.
---------------------------------------------------------------

वेद हे भारतीय संस्कृतीचे व धर्माचे मूलाधार ग्रंथ. अनेकांच्या मते जगातील पहिले वाङ्मय. वेद हे मानवसृष्टीच्या आधी परमेश्वराने मानवाच्या कल्याणासाठी निर्माण केले आणि म्हणूनच ते अनादी आहेत अशी वैदिकांची धारणा होती.
वेद हा शब्द विद् या धातूपासून भाव, कर्म व करण या अर्थी धञ् प्रत्यय लागून तयार झालेला आहे. असणे, मिळवणे, ज्ञान करून घेणे किंवा पाहणे असे विद् धातूचे अनेक अर्थ आहेत. यावरून वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान, ज्ञानाचा विषय किंवा ज्ञानाचे साधन असा होतो. संस्कृतमधल्या विद् धातूला जवळचा vidio असा एक लॅटिन भाषेतही धातू आहे. त्यापासूनच video, vision हे शब्द तयार झाले. प्राचीन काळी ऋषींनाही वेद 'दिसले' म्हणून त्यांना वेद हे नाव मिळालं.

वेद हे आर्यधर्माच्या मूलस्थानी आहेत. हे वाङ्मय ऐहिक आणि पारलौकिक ज्ञानावर आधारित आहे. दैविक आणि आध्यात्मिक विचार मांडणारे, काव्यमय भाषेत लिहिलेले, कायदा, ज्योतिष, व्याकरण इत्यादींचे हे संग्रहग्रंथ आहेत. 'वेद हे भारतीय वाङ्मयात प्राचीनतम असल्याने भारतीयांचा आध्यात्मिक जीवनक्रम व संस्कृती या संबंधी यथार्थज्ञान वैदिक वाङ्मयात गती करून घेतल्याशिवाय मिळणार नाही', असं ज्ञानकोशकार केतकर यांनी लिहून ठेवलं आहे.

वेद कधी निर्माण झाले, यासंबंधी प्राचीन टीकाकारांनी अजिबात चर्चा केलेली नाही. वेद हे कोणत्याही पुरुषाने लिहिलेले नसल्याने ते अपौरुषेय आहेत, असं एकदा मानल्यावर याची चर्चा करण्याचे त्यांना कारणच नव्हते. म्हणून वेदांचा अर्थ लावून त्याप्रमाणे आचारधर्म पाळण्याकडेच लक्ष दिले गेले. संपूर्ण वेद हे केवळ कर्मासाठी आहेत, असं मीमांसासूत्रात जैमिनीने म्हटलं आहे, ते यासाठीच.
वेद कसे निर्माण झाले? प्राचीन काळी ऋषी तपश्चर्येत मग्न असताना परमेश्वराचे संगीत त्यांना 'दिसले', त्याचेच त्यांनी उच्चारण केले, आणि याच वाङ्मयाला वेद असे नाव मिळाले. मात्र या वेदांची रचना कुठे झाली, याबाबत काही अंदाज बांधता येतो.

अतिप्राचीन काळी, म्हणजे सुमारे १०,००० वर्षांपूर्वी उत्तर ध्रुवापाशी लोक राहत होते. पुढे तिथलं हवामान अनुकूल न वाटल्याने त्यांनी तो प्रदेश सोडून दिला आणि मध्य आशियामध्ये असलेल्या उरल पर्वताच्या परिसरात ते स्थायिक झाले. या ठिकाणी या लोकांनी अनेक 'चमत्कार' पाहिले आणि विश्वात नियमांनी चालणार्‍या अनेक गोष्टींचे त्यांनी निरीक्षण केले. सूर्य नियमितपणे उगवतो व अस्तास जातो, पाऊस वेळेवर पडतो, नद्या ठराविक दिशेनेच वाहतात, ठराविक दिवशी आकाश सारखे दिसते इ. अनेक गोष्टी ज्या अर्थी नियमाने चालतात, त्या अर्थी विश्वात चाललेल्या या सर्व घटनांमागे या नियमांचे काटेकोर पालन करणारी एखादी शक्ती असली पाहिजे, असा विचार कदाचित प्राचीन विद्वानांच्या मनात आला असेल.
या शक्तीला संतुष्ट करून घेतले असता आपलं जीवनही सुखी होऊ शकेल, या कल्पनेने त्या शक्तीला उद्देशून त्यांनी मंत्र रचले. वेदमंत्रांचा हा पहिला आविष्कार.

मात्र सर्व वैदिक वाङ्मयाची रचना एकाच ठिकाणी झाली, असंही म्हणता येणार नाही. उत्तर ध्रुवीय प्रदेशात त्यांनी जे 'चमत्कार' पाहिले, त्यांचे वर्णन करणार्‍या ऋचाही मध्य आशियातच त्यांनी रचल्या असाव्यात. 'ध्रुवतारा आम्हाला आकाशात डोक्यावर दिसत आहे', 'येथे लांबच लांब रात्र आहे', 'सप्तर्षिमंडल आकाशात फिरत आहे' इ. वर्णनं ज्या ऋचांतून आढळतात, त्या ऋचा सर्वांत प्राचीन असल्या पाहिजेत. कालांतराने उरल प्रदेशातूनही आर्य बाहेर पडले. काही इराणला गेले, तर काही लोक पूर्वेकडे भारतात आले. हिंदुकुश पर्वत ओलांडून जे आर्य पूर्वेकडे जात होते, त्यांना अनेक युद्धे करावी लागली आणि त्यांत विजय मिळविण्यासाठी त्यांनी निरनिराळ्या देवतांच्या स्तुतीपर असे नवे मंत्र रचले. युद्धात मदत करणारी व त्यात विजय मिळवून देणारी देवता म्हणजे इंद्र. या देवतेची अनेक प्रकारे स्तुती करून तिला प्रसन्न करून घेण्यासाठी जे नवे मंत्र आणि सूक्ते गायिली गेली, ती आर्य भारतात येऊन पोहोचण्यापूर्वीची होती. सप्तसिंधूच्या प्रदेशात आल्यानंतर आर्य तिथे स्थायिक झाले आणि त्यांच्या जीवनाला एक प्रकारचे स्थैर्य आले. तिथल्या नद्या, ऋतुमान इ. सर्व गोष्टी त्यांना अनुकूल अशाच ठरल्या. त्यानंतर मग सूर्य, उषस्, पर्जन्य, पृथ्वी या नव्या देवतांसाठी नव्या ऋचा रचल्या गेल्या. या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची गोष्ट झाली, आणि ती म्हणजे निरनिराळ्या मंत्रांचे संहितीकरण झाले. देवतांना उद्देशून जी सूक्ते गायिली गेली होती, त्यांची एक संहिता तयार झाली. एकाच ऋषिकुलातील लोकांनी रचलेली सूक्ते एकत्र करण्यात आली आणि त्यातूनच दहा मंडलं असलेली ऋग्वेदसंहिता तयार झाली. याच वेळी निरनिराळ्या अदृश्य शक्तींना संतुष्ट करण्यासाठी जे मंत्र वापरले जात होते, त्यांचा संग्रह अथर्ववेदात केला गेला.

आर्यांच्या जीवनाला स्थैर्य आल्यावर त्यांच्या धर्मकल्पनेत अनेक बदल झाले. यज्ञाला प्राधान्य मिळालं. म्हणून यज्ञासाठी नवीन वाङ्मयही निर्माण होऊ लागलं. यजुर्वेदातील गद्य मंत्र आणि गायनाला उपयोगी पडतील असे सामवेदातील मंत्र याच हेतूने रचले गेले. या वेळी आर्यजनांत ब्राह्मण, क्षत्रिय इ. वर्ण निश्चित झाले होते. नवा प्रदेश जिंकण्याच्या इच्छेने क्षत्रिय राजांनी गंगा-यमुनेचा प्रदेश आणि मध्यभारतावर आक्रमणे केली. या क्षत्रियांना ब्राह्मणांचे सर्व प्रकारचे साहाय्य होते. अश्वमेध, राजसूय अशा मोठ्या यज्ञांच्या निमित्ताने त्यांनी यज्ञधर्माचा प्रचार केला. या वेळी यज्ञविषयक माहिती देणारे वाङ्मय तयार झाले. यालाच ब्राह्मणग्रंथ असे म्हणतात. ब्राह्मणग्रंथांच्या शेवटच्या भागात आरण्यके आणि उपनिषदांचा समावेश केला आहे.

हे आर्य कसे दिसत याचं फारसं वर्णन ऋग्वेदात नाही. पण निरनिराळ्या सूक्तांतून त्यांच्या देवतांचं जे वर्णन वाचायला मिळतं तेच त्यांचंही असावं असं समजायला हरकत नाही. त्यांचा वर्ण गोरा, केस पिंगट, डोळे निळे, नाक धारदार, छाती विशाल होती. स्त्रिया व पुरुष आपले केस लांब राखत. गायी, घोडे, मेंढ्या, बकर्‍या हे त्यांचे मुख्य धन होते. ते मुख्यतः मांसाहारी होते. 'पुरुषार्थाला', 'पराक्रमाला' त्यांच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचं स्थान होतं. मोकळ्या मैदानात वसाहत करून राहणं त्यांना अधिक आवडे. ते लोकरीची वस्त्रं विणत व वापरत असत. त्यांची सामाजिक व्यवस्था कुलबद्ध होती. कुलांच्या समुदायाला ग्राम म्हणत. ग्रामाच्या मुख्याला ग्रामणी म्हणत.

ऋग्वेदकाळात पुरू, यदु, अनु, द्रुह्युतुर्वश असे आर्यांचे पाच समुदाय भारतात राहत होते. ही सारी आर्यप्रजा पंचजन या नावाने ओळखली जात असे. ज्याच्या नावावरून आपल्या देशाला भारत हे नाव पडले, ते भरतकुलही पुरूंची एक शाखा होते. भरतांतून पुढे तृत्सु निघाले. यदु-तुर्वश व अनु-द्रुह्यु हे वेदांत जोडीने आढळतात. पंचजन आर्य हे इंद्र व अग्नी चे उपासक होते. ब्राह्मण व राजन्य असे दोन भेद सुरुवातीलाच त्यांच्यात निर्माण झाले. बाकीचे सारे आर्य, विश् म्हणजे प्रजा, या वर्गात मोडत असे. त्यांच्या राजाला विश्पति किंवा विशांपति असं म्हणत.

पण असं असलं तरी आर्य हा शब्द विशिष्ट मानववंशासाठी वापरला जात नाही. युरोपात जेव्हा संस्कृत भाषेचा आणि तुलनात्मक भाषाशास्त्राचा अभ्यास सुरू झाला आणि प्राचीन भारतीय आणि प्राचीन युरोपीय यांचं घट्ट नातं पाश्चात्यांना दिसू लागलं, तेव्हा या मोठ्या मानववंशाला लागू पडेल, अशा एका शब्दाची गरज भासू लागली. त्यासाठी वैदिक संस्कृतात वारंवार येणारा आर्य हा शब्द निवडला गेला आणि त्याचं आर्यन् असं रुपांतर करून तो शब्द विशिष्ट मानववंशवाचक किंवा भाषावंशवाचक म्हणून स्वीकारला गेला. पुढे विशिष्ट मानववंश स्वतःला आर्य म्हणवीत असे, ही कल्पना सिद्ध करण्यास अडचणी आल्या, तरी तो शब्द मात्र टिकून राहिला.

अनेक भाषाशास्त्रज्ञांनी आर्यन् हा शब्द अनेक अर्थांनी वापरला आहे. मॅक्स म्युलर तो इंडो-जर्मन याचा समानार्थक म्हणून वापरतो व त्या भाषा बोलणार्‍यांना आर्यन् म्हणतो. इरा म्हणजे पृथ्वी, या शब्दावरून आर्य हा शब्द आला, असं त्याचं मत आहे. मात्र ज्ञानकोशकार केतकरांच्या मते ario पासून आर्य आला. Ireland, aristocrat हे त्यापासून तयार झालेले इतर शब्द. पण असं असलं तरी हा शब्द कोणत्या तरी उच्च अर्थाने इंडो-जर्मन लोकांचे पूर्वज स्वत:साठी वापरत असत हे नक्की. हल्ली हा शब्द वरील दोन्ही शाखांसाठी वापरला जातो आणि इराणी आर्यांपासून वेगळेपण दाखविण्यासाठी भारतीय आर्यांना इंडो-आर्यन् म्हणतात.

वेद, उपनिषदे, ब्राह्मणे, संहिता यांबरोबरच रामायण आणि महाभारत यांतून आपल्याला तत्कालीन समाजजीवनाची माहिती मिळते. वेद हे प्राचीन आर्यभाषेत आहेत. त्यांतला बहुतेक भाग देवतांच्या स्तुतीने आणि यज्ञयागांच्या वर्णनांनी भरलेला आहे. त्यामुळे वैदिक वाङ्मयातून निघणारी ऐतिहासिक अनुमाने जरा अस्पष्ट असतात, पण रामायण व महाभारत हे ग्रंथ प्रचलित संस्कृत भाषेत रचले असल्याने लवकर कळतात. प्राचीन काळी अश्वमेध वगैरे जे बरेच दिवस चालणारे यज्ञ होत असत, त्यात फुरसतीच्या वेळी ऐतिहासिक गाथा व आख्याने गायिली जात. या सर्व गाथा, गोष्टी, रामायण व महाभारतात एकत्र आल्या आहेत. त्यामुळे आर्यांच्या अन्नसंस्कृतीच्या अभ्यासात वेद वाङ्मयाबरोबरच या धर्मग्रंथांचंही खूप महत्त्व आहे.

'अन्न हेच जीवन' असं आर्यांचं मत होतं. आपली सर्वं दु:खं नष्ट करण्याचं सामर्थ्य अन्नात आहे, असं चांडग्योपनिषदात सांगितलं आहे [१]. मनुष्याचा जन्मच मुळी अन्नातून होतो, असं तैत्तिरीय उपनिषदात लिहिलं आहे [२]. विविध झाडं, फळं, फुलं यांचा त्यादृष्टीने म्हणूनच त्यांनी सखोल अभ्यास केला होता. सुखधान्य (कडधान्ये), समिधान्य (डाळी), शाक्न (भाज्या), फल (फळे), सूप्यम् (मसाले), मांसवर्ग (मांसाहारी पदार्थ), पायोवर्ग (दुग्धजन्य पदार्थ) आणि मद्यवर्ग (मादक पेये) अशी विभागणी त्यांनी केली होती. मात्र धार्मिक बाबतीत थोडंसं वेगळं वर्गीकरण होतं. गहू, तांदूळ, जवस आणि डाळी हे 'नांगरामुळे जमिनीच्या बाहेर येत', म्हणून त्यांना अन्न किंवा कृष्टपच्य म्हणत. नांगराचा उपयोग न कराव्या लागणार्‍या पदार्थांना अकृष्टपच्य असं नाव होतं. उदाहरणार्थ, भाज्या आणि फळं. विशिष्ट धार्मिक प्रसंगी किंवा संन्यास घेतलेल्या व्यक्तींना केवळ अकृष्टपच्य खाण्यास परवानगी होती. कृष्टपच्य उपवासास चालत नसे. तसंच धार्मिक प्रसंगी तेलाचा वापर निषिद्ध होता. रामायण व महाभारतात अन्नपदार्थांचे कठीण, मऊ, चोखण्यायोग्य आणि चाटण्यायोग्य असं विभाजन केलं आहे [३].

आर्यांच्या रोजच्या जेवणात जवसाला मुख्य स्थान होतं. या जवसाच्या पीठाचा वाफवलेला इडलीसारखा एक पदार्थ करीत. याला पुरोडाश असं नाव होतं. जवसाच्या पीठाचे अपूपसुद्धा आर्यांचे आवडते होते. भाजलेले जवसाच्या पीठाला सक्तु (आताचे सातू) असं म्हणत. या सक्तुत दही, तूप, पाणी घालून करम्भ नावाचा पदार्थ तयार होई. बरेचदा जवसाचे धान्य पाण्यात किंवा दुधात शिजवून खाल्ले जाई.

द्रविडी संस्कृतीशी संबंध आल्यावार आर्यांनी गहू वापरायला सुरुवात केली. त्यामुळे साहजिकच ऋग्वेदात गव्हाचा उल्लेख अजिबात नाही. तसंच तांदुळाचाही उल्लेख ऋग्वेदात कुठेच नाही. पण यजुर्वेदात कृष्णवृहि, शुक्लवृहि, अशुधान्य, हायन आणि महावृहि या तांदुळाच्या पाच जातींचा उल्लेख आहे. यांपैकी महावृहि जातीचा तांदूळ सर्वोत्कृष्ट असल्याचं म्हटलंय. पाण्यात शिजवलेल्या भाताला ओदन तर दुधात शिजवलेल्या भाताला क्षीरौदन म्हणत. तीळ (तिलौदन), मूग (मुद्गौदन), मांस (मांसौदन) घालूनही भात करत असत. साळीच्या लाह्या पाण्यात किंवा दुधात घालून खात. या लाह्यांचा पृथक नावाचा चिवडाही आर्यांचा आवडता होता. याशिवाय माष (उडीद), राजमाष (राजमा),मुद्ग (मूग), मसूर ही धान्यंही रोजच्या वापरात होती. उडीद शिजवून त्यात गूळ घालून खात. आपल्या घुगर्‍यांसारखा हा पदार्थ होता. गरिबांचे हे मुख्य अन्न होते.

अयोध्येत आणि हस्तिनापुरात भात हेच प्रमुख अन्न होते. त्याचबरोबर यवागू (जवसाची लापशी), यावक (जवसाची दूध व साखर घालून केलेली लापशी), वात्य (दलिया) आणि अपूप हे पदार्थही रोज केले जात. कोद्रव (वरई) हे गरिबांचं धान्य होतं. राजमा, मूग, कुळीथ, चणे ही धान्येसुद्धा वापरात होती.

आर्यांच्या रोजच्या आहारात दुधालाही महत्त्वाचं स्थान होतं. गायीच्या दुधाला आर्य पवित्र मानत असत. यजुर्वेदात गायीला वर असं म्हटलं आहे. प्रतिधुक (निरसं दूध), शृत (उकळलेलं दूध), शर (साय) रोजच्या जेवणात असे. बकरी व म्हशीचं दूध श्रीमंत आर्य सहसा वापरत नसत. केवळ गायीचं दूध सेवन करणारीही बरीच मंडळी होती. या व्रताला पयोव्रत असं नाव होतं. दुधाला विरजण लावण्यासाठी पळसाची साल किंवा कुवल (बोराचं फळ) वापरत असत. मात्र हे बोराचं दही नैवेद्यासाठी चालत नसे. दही घुसळताना वर आलेल्या लोण्याच्या गोळ्यासहीत ताक पीत असत. याला पृषदाज्य असं नाव होतं. दधन्वत म्हणजे cheeseसुद्धा आर्यांच्या रोजच्या आहारात असे.
रामायणात ब्राह्मणांनी शेळी, गाढवी, सांडणी, हरीण व स्त्रीचे दूध पिऊ नये असं सांगितलं आहे. गायीच्या दुधात मध घालण्याची पद्धत होती. महाभारतात दह्यापासून केलेल्या शिखरिणी आणि रसाल (दोन्ही पदार्थ एकच - श्रीखंड) यांचा उल्लेख सापडतो.

मध हा बहुधा आपण वापरलेला पहिला गोड पदार्थ. ऋग्वेदात अर्थातच मधाबद्दल लिहिलं गेलं आहे [४]. हा मध दोन प्रकारच्या मधमाशांपासून गोळा केला जाई. आरंगर या मोठ्या मधमाशीपेक्षा सारघ या छोट्या मधमाशीपासून गोळा केलेला मध अधिक चांगला [५]. अपूप बनवताना मधाचा वापर व्हायचा. मात्र स्त्रिया व विद्यार्थ्यांनी मध खाऊ नये, असे उल्लेखही काही ठिकाणी सापडतात.
ऋग्वेदात ऊसाचा उल्लेख नसला तरी अथर्ववेदात मात्र ऊस चावून खाण्याबद्दल सांगितलं आहे [६].

रामायणकाळात दूधपोह्यात मध घालून खात असत. याला मधुलाजा असं म्हणत. पायस (तांदळाची खीर), वेलदोडा घालून सम्याव (चूर्मा), मोदक (तांदळाच्या पिठीचे लाडू), शस्तिक (जवसाच्या पिठाचे लाडू), अभ्यूस (कणकेचे गूळ घातलेले लाडू) हे गोड पदार्थही बरेच लोकप्रिय होते. याशिवाय खाण्डव (साखरेची कडक गोळी) ही मुलांची आवडती मिठाई होती. म्हणूनच हलवायासाठी, खाण्डविक हा संस्कृत शब्द आहे. Candy हा इंग्रजी शब्ददेखील यावरूनच आला.

या गोड पदार्थांबरोबरच आर्य मसालेदेखील वापरत. मीठ, हळद, मिरी इ. मसाल्यांचा उल्लेख वेदांत सापडतो.
रामायणाकालात साध्या मीठाबरोबरच सौवरकल म्हणजे सैंधव मीठही वापरत. ब्राह्मणांना मीठाचा व्यापार करण्यास मनाई होती, आणि रात्री हातात मीठ घेणं अशुभ समजत असत. याचबरोबर जायफळ, जीरे, हिंग, मिरी, धणे, जटामांसी या मसाल्यांचाही रामायण व महाभारतात उल्लेख वारंवार येतो. फळाच्या रसांमध्ये हे मसाले घालायची पद्धतही त्याकाळी अयोध्येत रूढ होती. डाळींब, मनुका यांच्या पातळ रसाला राग तर दाटसर रसाला शाडक असं नाव होतं.

ऋग्वेदात अनेक फळांबद्दल विस्ताराने लिहिलं गेलं आहे. अनेक संहिता आणि ब्राह्मणांतही अशी वर्णनं आहेत. बोरं (बदर म्हणजे मोठे बोर, कुवल म्हणजे मध्यम आकाराचे बोर, करकन्धु म्हणजे अगदी लहान बोर), बिल्व (बेलफळ), खर्जुर (खजूर) या फळांचा उल्लेख यजुर्वेदात केला आहे. आंब्याचा प्रथम उल्लेख सत्पथ ब्राह्मणात येतो, तर जैमिनीय ब्राह्मणात आमलक म्हणजे आवळ्याचा उल्लेख सापडतो. उर्वारुक (काकडी), बिस (कमळाचे देठ), कारवेल (कारले), अश्वबाल (मेथीचा एक प्रकार), अळाबु (दुधी भोपळा) या भाज्या वैदिक काळात खाल्ल्या जात.

रामायण व महाभारतकालात बोर, कास्मर्य (शिवन), भल्लातक (marking nut, काजूसारखे एक फळ), प्लाक्ष (white fig) ही रानफळं खाल्ली जात. याशिवाय बेलफळ, कवठ, पपनस, जांभूळ, डाळींब, आंबे ही फळंही बाजारात विकली जात.
प्रतिष्ठीत वर्गात कांदा, लसूण आणि मश्रुम खाल्ले जात नसे. तसंच अंजीरही खाऊ नये, असा समज होता. श्राद्धप्रसंगी दुधी भोपळा, कालशक (आंबटचुका) यांचा वापर करू नये, असं महाभारतात सांगितलं आहे.

भारतात सुरुवातीला आलेले आर्य हे मांसाहारी होते. घोडा, मेंढी, शेळी, म्हैस यांचं मांस खाल्लं जाई [७]. वेदांत सुमारे २५० प्राण्यांची वर्णनं आली आहेत. त्यांपैकी ५० प्राणी 'खाण्यायोग्य' असल्याचं वैदिकांचं मत होतं. ऋग्वेदात शसन म्हणजे खाटीकखान्याचा उल्लेख आहे [८]. बाजारात वेगवेगळ्या प्राण्यांचं मांस विकायला दुकानं असत : गोगतक (गोमांस), अरबिक (शेळीचं मांस), शुखरिक (डुकराचं मांस), नगरिक (हरणाचं मांस), शकुन्तिक (कोंबडी), गिधबुद्दक (मगर आणि कासव) इ.

ऋग्वेदात बोकडाचा बळी कसा द्यायचा, याचं सविस्तर वर्णन केलं आहे. ऋग्वेदाच्या १६२व्या ऋचेत घोड्याच्या बलिविधीबाबत विस्ताराने माहिती दिली आहे. त्यावरून आर्यांचे शरीरशास्त्राचे ज्ञान किती जबरदस्त होतं, हे कळतं. या घोड्याचं मांस निखार्‍यांवर भाजलं जाई. घोड्याच्या समोरच्या, उजव्या मांडीच्या मांसावर प्रमुख ब्राह्मणाचा हक्क असे. जबडा, व जीभ त्याच्या मदतनीसाच्या वाट्याला येई. ऋग्वेदात अग्नीला गाय व बैलांचा नैवेद्य दाखवला जायचा. विष्णुसाठी बुटका घोडा, इंद्रासाठी मोठ्या शिंगांचा बैल, रुद्रासाठी तांबुस गाय, आणि वरुणासाठी काळी गाय असे. लग्नात वांझ गायीचा बळी देत. त्याचप्रमाणे नंतरच्या काळात पाहुण्यासाठी बैल, गाय किंवा बकर्‍याचा बळी देत. पाहुण्यासाठी राखून ठेवलेल्या गायीला अतिथीग्व असं म्हणत.
सत्पथ ब्राह्मणात आणि याज्ञवल्क्य संहितेत महोक्ष (मोठा बैल) आणि महाज (मोठा बकरा) यांचा पाहुण्यांसाठी बळी द्यावा, असं सांगितलं आहे [९]. तैत्तिरीय संहितेत अगस्त्य ऋषींनी १०० बैलांचा बळी दिल्याचा उल्लेख आहे.

बृहदोपनिषदात गर्भवती स्त्रियांसाठी जो आहार सुचवला आहे तो मुख्यतः मांसाहार आहे. गृह्य सूत्रांमध्ये अन्नप्रसन्न विधीचं वर्णन केलं आहे. या विधीत बाळाला अन्नाचा पहिला घास भरवला जाई. वैदिकांच्या मते, ते बाळ भविष्यात कसे निपजेल हे त्याच्या पहिल्या घासावर अवलंबून असे. मेंढीच्या मांसाने सामर्थ्य, तितराच्या मांसाने दैवत्व, माशाच्या घासाने सात्त्विक वृत्ती आणि दुधभातामुळे मानसन्मान मिळतात अशी धारणा असल्याने, बाळाचा पहिला घास त्याप्रमाणे ठरविला जाई.
सुश्रुत संहितेतही या विधीचा उल्लेख सापडतो. खरं म्हणजे सुश्रुत संहिता हे एक प्रकारचं cook book आहे. आरोग्य आणि अन्न यांचा परस्परसंबंध अधोरेखीत करताना त्यात असंख्य पदार्थ योग्य प्रकारे कसे करावेत, याची अतिशय शास्त्रशुद्ध माहिती दिली आहे. या संहितेत सात प्रकारच्या मांसाहारी पदार्थांची कृती दिली आहे. तूप, तांदळाचे मद्य, आलं आणि आंबट फळं घालून मांस शिजवत असत. दुसर्‍या एका प्रकारात मांस सावलीत वाळवल्यावर निखार्‍यांवर भाजत. या पदार्थाला परिसुकमांसम् असं नाव होतं. तळलेल्या मांसाला भर्जित , तर खिम्याला उल्लुप्लमांसम् असं म्हणत. आणखी एका प्रकारात खिम्याचे गोळे करत. याला पिष्ठ असं नाव होतं. निखार्‍यांवर तूप घालून भाजलेल्या मांसखंडांना प्रतप्त म्हणत. वेसवार या प्रकारात मांस पाण्यात शिजवून, त्याचा खिमा करून त्यात काकवी, तूप, काळी मिरी आणि आलं घालत. याचा सारणासारखा उपयोग होई. इसवी सनाच्या दुसर्‍या शतकात लिहिल्या गेलेल्या याज्ञवल्क्य स्मृतीत मांस घालून शिजवलेल्या भाताला पल्लाओ असं म्हटलं आहे.

रामायण आणि महाभारतात अनेक मांसाहारी पदार्थांचा उल्लेख आला आहे. वनवासात असताना राम आणि लक्ष्मण दंडकारण्यात शिकार करीत असत [१०]. मांसभूतोदन हा हरणाचे मांस, भाज्या घालून शिजवलेला भात सीतेचा आवडता होता. दशरथाच्या राजवाड्यात कोंबडी, मेंढी, मोर यांचे मांस आंबट फळं, लवंग, ओवा, डाळी घालून शिजवत. भरद्वाज ऋषीच्या सन्मानार्थ दिलेल्या मेजवानीत डुक्कर आणि तितराचे मांस शिजवल्याचे उल्लेख आहेत. डाळी व मांस घालून शिजवलेला निष्ठक नावाचा पदार्थही आवडीने खाल्ला जायचा. रामायणात इतरत्र ससा, कासव, hedgehog, porcupine, iguana या प्राण्यांच्या मांसाच्या पदार्थांची वर्णनं येतात.

महाभारतात पिष्ठौदन म्हणजे खिमा घालून केलेल्या भाताचा उल्लेख खूपदा येतो. दुर्योधनाचा हा आवडता पदार्थ होता [११]. कम्यकारण्यात असताना पांडवांनी हरणांची शिकार करून उदरनिर्वाह केला होता. युधिष्ठीराने राज्याभिषेकानंतर दहा हजार ब्राह्मणांना जेवू घातलं होतं. त्यावेळी केलेल्या पदार्थांत हरिणाचं मांस घातलेला भात आणि डुकराच्या भाजलेल्या मांसाचा समावेश होता [१२]. रन्तिदेवाच्या राजवाड्यात रोज दोन हजार प्राण्यांचा बळी दिला जाई आणि मांस ब्राह्मणांमध्ये वाटले जाई [१३]. श्राद्धप्रसंगीही ब्राह्मणांना मांसाहारी भोजन दिले जाई [१४]. दमयंतीने आपल्या दासीला नल राजाने शिजवलेले मांसाहारी पदार्थ आणण्याची आज्ञा केली होती [१५]. दही व मीठ घालून केलेलं मांसाचं सूपही अनेकजण करीत [१६].
मांस विकणारी दुकानं गर्दीने गजबजलेली असत [१७]. रानडुक्कर, वांझ गाय, उंट, बकरी यांचंही मांस महाभारतकाळी आवडीने खाल्लं जाई. महाभारतातील एका मेजवानीचं वर्णन तर निव्वळ भन्नाट आहे :
'स्वच्छ कपडे घातलेले सेवक, उत्तम आचार्‍यांनी निखार्‍यावर भाजलेले मांसखंड पाहुण्यांना देत होते. चिंच व डाळींब घालून शिजवलेली कोंबडी, तूप घालून भाजलेले म्हशीचे कोवळे पिल्लू, कैरी घालून शिजवलेले आणि मग वेलदोड्यात घोळलेले हरणाचे मांस, काळी मिरी घालून तळलेले बकरीचे मांस, आणि मुळा, डाळींब, लिंबू, लवंग, हिंग आणि आलं घालून शिजवलेले बैलाचे मांस , सर्व पाहुण्यांना तृप्त करत होते.'

ही सर्व वर्णने वाचल्यावर एक लक्षात येतं की मांस शिजवताना आंबट फळ घालण्याची पद्धत होती. यामुळे मांस लवकर शिजतं व मऊ राहतं, हे वैदिकांना ठाऊक होतं.

मद्यनिर्मितीची कला भारतीयांना प्राचीन काळापासून अवगत होती आणि समाजाच्या सर्व थरांत मद्यपानाची प्रथा होती, याचे असंख्य दाखले मिळतात.
वैदिक संस्कृतीत सोमरसाला प्रचंड महत्त्व होतं [१८]. सोमवल्ली या नावाने ओळखल्या जाणार्‍या एका विशिष्ट वेलीपासून सोमरस तयार करत. या सोमरसाचा यज्ञात उपयोग होई. अशा सोमयागाला ऋग्वेदात मध्यवर्ती स्थान असल्याने सोमरसाला देवतेचे स्थानही मिळाले. ऋग्वेदाचे संपूर्ण नववे मंडल सोमदेवतेसाठी असून त्यात सोमरसाची प्रशंसा केली आहे. त्यांपैकी या काही ऋचा-

स्वादिष्ठया मदिष्ठया पचस्व सोम धारया |
इन्द्राय पातवे सुतः ||
रक्षोहा विष्वचर्षणिरभि योनिमयोहतम् |
द्रुणा स्धस्थमासदत् ||
वरिवोधातमो भव मंहिष्ठो वृत्रहन्तमः |
पर्षि राधो मधोनाम् ||
अभ्यर्ष महानां देवानां वीतिमन्धसा |
अभि वाजमुतश्रवः ||
त्वामच्छा चरामसि तदिदर्थं दिवेदिवे |
इन्दो त्वे न आशसः || (ऋग्वेद ९.१.१-५)

याचा अर्थ : अत्यंत रुचकर आणि मद उत्पन्न करणार्‍या हे सोमरसा, तू स्वच्छ प्रवाहाने वाहत राहा. इंद्राने तुला प्राशन करावे म्हणून तुझा रस पिळला आहे. राक्षसांचा नाश करणारा सर्वदर्शी सोम, लोखंडाच्या बत्त्याने किंवा लाकडाने जिथे कुटतात, अशा आपल्या ग्रहात तू अधिष्ठीत झाला आहेस. तू हमखास इच्छिताची प्राप्ती करून देतोस. तू अत्यंत दानशूर आहेस. तू अज्ञानाचा समूळ नाश करणारा आहेस. दानशूर यजमानाच्या रूपात तू आमच्याकडे मोठी देणगी आणतोस. हे सोमा, श्रेष्ठ असे जे दिव्य विबुध, त्यांच्या यज्ञाकडे आपल्या पेयाच्या योगाने वाहत रहा आणि सत्य, बल, सत्किर्ती यांना आमच्याकडे वाहत आण. आम्ही तुझ्या सेवेत स्वतःला समर्पित केले आहे. हे आल्हाददायक रसा, आमच्या आकांक्षा तुझ्या ठायी एकवटल्या आहेत.

सोमरसाच्या स्वादाची व सुगंधाची वैदिक ऋषींनी स्तुती केली असून सोमरस अत्यंत स्वास्थ्यवर्धक आहे, असंही म्हटलं आहे. अंगात तरतरी व मद येण्यासाठी, युद्धात वीरश्री अंगात संचारण्यासाठी, प्रतिभेच्या विकासासाठी व वक्तृत्वाला धार येण्यासाठी सोमरसाचा उपयोग होतो, असं ऋग्वेदात सांगितलं आहे [१९].

ऋग्वेदाप्रमाणेच पर्शियनांच्या अवेस्ता ग्रंथातही सोमाचे महात्म्य सांगितले आहे. तिथे त्याला हओम म्हटलं आहे. श्येनपक्ष्याने, म्हणजे ससाण्याने, स्वर्गातून सोमवल्ली आणली, ही ऋग्वेदातली कल्पना; तर पवित्र पक्ष्यांनी सोमवल्लीच्या दूरवर प्रसार केला ही अवेस्तातली कल्पना. विवस्वान व त्रितआप्त्य हे सोम तयार करतात, असं ऋग्वेदात म्हटलं आहे; तर विवन्हवंत, आथव्य व थ्रित हे सोम तयार करतात, असं अवेस्तात म्हटलं आहे.

ही सोमवल्ली म्हणजे नेमकी कुठली वनस्पती याबाबत काही प्रवाद आहेत. काही संशोधकांच्या मते सोमवल्ली म्हणजे Ephedra नावाची पर्णहीन वनस्पती. यात ephedrin हे alkaloid असतं. Adrenalin सारखंच ते कार्य करतं. डॉ. राहुल सांकृत्यायन यांच्या मते सोमवल्ली म्हणजे भांग. काहींच्या मते Amanita Muscarita हे मश्रुम म्हणजेच सोमवल्ली. मात्र Sarcostemma acidum ही वनस्पती ऋग्वेदातील सोमवल्ली असावी, असं बहुमत सांगतं. भारतातल्या असंख्य भागात या वनस्पतीला आजही सोमलता असं म्हणतात.

sarcostemma.gif

सोमरस हा गोड, मादक, तीव्र आणि रसवान असल्याचं ऋग्वेदात वारंवार म्हटलं आहे [२०]. सोमवल्ली लाकडाच्या फळीवर ठेऊन व दगडाने ठेचून तिचा रस काढीत. क्वचित खलबत्ताही वापरत. रस अधिक निघावा म्हणून सोमवल्ली थोडावेळ पाण्यात भिजत ठेवत. हा रस निघत असताना स्त्रिया गाणी म्हणत. सोमरस गाळण्यासाठी पवित्र म्हणजे चाळणी वापरली जाई. जमिनीवर बैलाचे कातडे पांघरून त्यात हा रस गोळा केला जाई. या रसाचा रंग तांबूस असे. लाकडी पिंपांत तो साठवून ठेवत.

सोमरसात मध, पाणी, दही, तूप इ. चवीसाठी घालत. करम्भ (सातूचे पीठ आणि दही), अपूप, पक्ती (इडलीसारखा तांदळाच्या पिठीचा पदार्थ), सक्तु (सातूचे पीठ, तूप, गूळ) या पदार्थांतही सोमरस वापरत असत.

सोमवल्लीच्या अंकुरांना किंवा देठांना अंशू म्हणत. हे अंशू ठेचले की त्यातून दुधासारखा पांढरा रस निघत असे. या क्रियेला सोमदोहन किंवा सोमसवन म्हणत. सोम ठेचण्याच्या दगडांना अग्री असं म्हणत असत. ऋग्वेदकाळी ठेचून रस काढणे ही पद्धत रूढ होती. पुढे मग उखळ व मुसळ वापरले जाऊ लागले.

दिवसातून तीन वेळा सोमसवन करीत. प्रातःसवन, माध्यंदिन सवन आणि सायंसवन अशी त्यांना नावं होती. पहिल्या दोन सवनांतील सोमरस वायू व इंद्र यांना समर्पित करत असत.
वेदकाळात सोमपान करणे हे आर्थिक सुबत्ता व आध्यात्मिक योग्यता यांवर अवलंबून असे. ज्याच्या कुलात पूर्वीच्या दहा पिढ्यांत सदाचार पाळला आहे आणि कोणताही अनाचार झालेला नाही, असा पुरुषच सोमपानाला योग्य ठरतो, असं पातंजलि सूत्रात म्हटलं आहे. मनूच्या सांगण्याप्रमाणे ज्याच्या घरात तीन वर्षं पुरेल एवढे अन्न नोकरचाकरांच्या उदरनिर्वाहासाठी आहे, त्यालाच सोमपानाची योग्यता प्राप्त होते.

सोमरसाची विक्री करणारे लोकच सुरेचीही विक्री करत असत. सुरा धान्यांपासून आणि विशेषतः जवस व तांदूळ यांपासून तयार करीत. यजुर्वेदात सोम-सुरा असा जोड उल्लेख येतो. यज्ञप्रसंगी सोम व सुरा यांचे मिश्रण करीत, असे शुक्ल यजुर्वेदात सांगितले आहे. सोम हे सुरांचे व सुरा हे मानवांचे पेय आहे आणि सोम हा पती असून, सुरा त्याची पत्नी आहे, अशी वचने तैत्तिरीय ब्राह्मणात आढळतात. सोमाचा उपयोग मुख्यत्वे यज्ञप्रसंगी, निमंत्रित व वरिष्ठ समाजात होत असे आणि सुरा सामान्य जनतेत प्रिय होती. म्हणूनच ऋग्वेदात सोमपानाला उत्तेजन दिले असून सुरापानाचा निषेध केला आहे. अथर्ववेदात मात्र सुरापानाचे फायदे सांगितले आहेत. पुजेत बळी दिल्यानंतर सुरा प्यायची, असा दंडक होता.

सत्पथ ब्राह्मणात व अथर्ववेदात परिसृत नावाच्या एका पेयाचा उल्लेख येतो. फुलांपासून केलेले हे मद्य होते. किलाल हे मद्य विविध धान्ये एकत्र करून तयार करत असत. यजुर्वेदात मासर नावाच्या एका पेयाची कृती दिली आहे. मसाले घातलेल्या पाण्यात तांदूळ तीन दिवस आंबवून मग ते मद्य गाळत असत.

रामायणकाळात आर्य व अनार्य असे सर्व लोक सुरा पीत असत. सुरेला त्याकाळी चांगलीच प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. सुरेचे अनेक प्रकार लोकांना माहीत होते. सुरा गाळण्याची कलाही त्यांना ज्ञात होती. गाळलेल्या सुरेला ते कृतसुरा म्हणत. सुगंधी किंवा मसालेदार दारुला मैरेय असे नाव होते. हे सीतेचे आवडते मद्य होते. सीधू नावाचे मद्य गुळापासून तयार करत. सीवीरक हे एक साधारण प्रतीचे मद्य होते. ते बोरांपासून बनवत. वारुणी मात्र एकदम कडक. खजुराच्या रसात काही विशेष वनस्पतींचा रस मिसळून वारुणी तयार करत. कपिथ्थ (कवठ) आणि काकवीपासून आसव हे मद्य तयार करत. रामायणात चार प्रकारच्या आसवांचा उल्लेख आहे. पुष्पासवात मधूक म्हणजे मोहाची फुलं वापरत. यालाच माधवी असंही नाव होतं. फलासवात खजूर असे, मध्वासवात मध आणि शर्करासवात साखर. या आसवात पाण्याऐवजी सुरा वापरली की त्याला सुरासव म्हणत. प्रसन्ना नावाच्या मद्यात तांदुळाचं पीठ, वेलदोडा आणि औदुंबराची फळं असत. कदम्ब वृक्षाच्या सालीपासून दिव्या हे मद्य तयार होई. याशिवाय फळं, फुलं, साखर यांपासूनही मद्य तयार करीत.

उत्तम प्रतीच्या मद्याला सुराग्र्य म्हणत. भरद्वाजाच्या आश्रमात भरताच्या सैनिकांना असे श्रेष्ठ मद्य दिले गेले होते, असा उल्लेख रामायणात आहे. स्त्रियांनी मद्यपान करणंही प्रचलित होतं. वनवासाला जाताना गंगा व यमुना या नद्या सीतेला ओलांडून जाव्या लागल्या. त्या वेळी सीतेने या नदीदेवतांची प्रार्थना करून त्यांना सांगितलं होतं की, 'चौदा वर्षांचा वनवास संपवून परत आल्यावर मी तुम्हाला सुरेचे सहस्र घट आणि मांसमिश्रित भात अर्पण करीन [२१].' राम वनवासाला गेल्यानंतर वाल्मीकींनी अयोध्येची तुलना 'मद्यपी निघून गेलेल्या मद्यपानगृहाशी' केली आहे [२२]. तसंच रामाने सीतेला आपल्या हाताने मधु-मैरेय सुरा पाजली होती, असं रामायणात सांगितलं आहे [२३]. 'मदिरापानाने धुंद झालेल्या नृत्यगीतकुशल अप्सरा, नागकन्या व किन्नरी त्या दोघांचे मनोरंजन करीत होत्या', असंही पुढे म्हटलं आहे. रावणाच्या अंतःपुरातील बायकाही अतिशय मद्यासक्त होत्या.
त्या काळात अनेक सार्वजनिक मदिरागृहे असत. त्यांना पानभूमी म्हणत. तिथे सामान्यपणे खालच्या वर्गातील लोक जमत व त्यांना मातीच्या परळातून मद्य देण्यात येई. मद्यप्यांसाठी तिथे मनोरंजनाची विविध साधनेही ठेवलेली असत. लंकेतील अशाच एका पानभूमीचे वाल्मीकीने वर्णन केलं आहे: 'या पानभूमीत काही खोल्या होत्या. त्यांत सामिष व निरामिष असे दोन्ही प्रकारचे पदार्थ ठेवलेले होते. तिथे निरनिराळ्या प्रकारची स्वच्छ मद्ये सजवून ठेवली होती. मद्यप्यांसाठी सोन्याचे कलश व स्फटिक व रत्ने यांची पात्रे ठेवली होती. यांपैकी काही पात्रे पूर्ण भरलेली तर काही रिकामी होती. जमिनीवर पात्रे, हार, पैंजणं, फळं, फुलं अस्ताव्यस्त पडली होती. सोनं व रत्ने यांनी अलंकृत असे पलंग आणि बसण्यासाठी अनेक आसनं जिकडेतिकडे ठेवली होती.'

रामायणातच अनेक ठिकाणी मद्यपानाची निंदा आणि सुरात्यागाची प्रशंसा केली असून सुरा न पिणे हे सात्त्विक जीवनाचे लक्षण मानले आहे . धर्म आणि अर्थ यांच्या सिद्धीसाठी सुरापान आवश्यक नाही. उलट सुरापानामुळे धर्म, अर्थ व काम भ्रष्ट होतात, असं वाल्मीकीने म्हटलं आहे. दशरथ कैकेयीला सांगतो की त्याने जर रामाला वनवासात पाठवले तर सुरापान करणार्‍या ब्राह्मणाच्या वाटेला येणारे निंदेचे बोल त्याला ऐकावे लागतील [२४]. भरतानेही मद्यपानाची निंदा केली आहे. ब्राह्मणांनी मद्यविक्रीशी संबंध ठेवू नये, असा नियम होता.

महाभारतकाळीही लोक मद्यपान करत असत. या कामी यादव लोक फारच पुढारलेले होते. द्वारकेत मद्यपानाचा बराच प्रसार होता. वृष्णी आणि यादव हे अतिरिक्त मद्यपान करून आपसांत भांडले आणि त्यांचा वंशसंहार झाला. बलराम व श्रीकृष्णाच्या मद्यपानाचे अनेक उल्लेख महाभारतात येतात. कृष्ण आणि अर्जुन एकत्र मद्यपान करीत [२५]. युधिष्ठीराच्या अश्वमेधप्रसंगी सुरामैरेय यांचे 'जणू सागरच उसळले होते [२६].' त्या काळी लढाईला जाण्यापूर्वी योद्धे मद्यपान करत असत. स्त्रियाही मद्यपान करीत. एकदा द्रौपदी व सुभद्रा वनभोजनाला गेल्या असता मद्यपान करून बेहोष झाल्याचं वर्णन महाभारतात आहे [२७]. पण महाभारताच्या काळात ब्राह्मणांना मात्र सुरा वर्ज्य ठरली होती. ब्राह्मणांचे ब्राह्मण्यच सुरापानाने नष्ट होते, अशी त्या काळची धारणा होती. मद्य, मांस, सुरा व आसव हे पिशाचान्न असून ब्राह्मणांनी ते वर्ज्य करावे, असं महाभारतात म्हटलं आहे [२८].

आर्यांच्या वसाहतीचे क्षेत्र वाढले तसतसे आर्येतरांशी त्यांचे संबंध वाढले आणि त्याचबरोबर मद्याचाही प्रसार झाला. परदेशातून जल व भूमार्गांनी व्यापारी, योद्धे भारतात येऊन स्थायिक झाले आणि त्यांच्यामार्फत कडक, चविष्ट व सुगंधी मद्ये तयार करण्याच्या पद्धती इकडे प्रचारात आल्या. रोमनांशी संपर्क वाढल्यावर तिकडून भारतात मद्यकुंभही येऊ लागले. अंफोरा नावाचा, चार फुट उंच व अतिशय जड असा मद्यकुंभ लोखंडी तिवईवर ठेवून जहाजातून भारतात आणत. असे अनेक मद्यकुंभ महाराष्ट्रातील उत्खननात मिळाले आहेत.

मद्यार्क गाळण्याची प्रक्रिया वाजसनेयी संहितेतही उल्लेखलेली आहे. ही पद्धत परशुरामाच्या काळात हैहय राजांच्या कारकीर्दीत सुरू झाली असावी. या प्रक्रियेमुळे मद्यनिर्मितीत क्रांती झाली आणि तिचा सामाजिक व आर्थिक परिणाम म्हणून सोम व सुरा यांचे निर्माते व विक्रेते विभक्त झाले. या विभक्तीकरणाचा पहिला उल्लेख याज्ञवल्क्य स्मृतीत आढळतो. मद्याची ने-आण करण्यासाठी कातडी पखाली व बुधले वापरण्याची प्रथा होती. पखालीच्या सोंडेसारख्या तोंडातून मद्य सुरईत ओतत असत. सोंड म्हणजे शुंडा. मद्यविक्री करणार्‍यांना म्हणून शौंडिक म्हणत असत. दारूच्या दुकानदाराने आपल्या दुकानावर विशिष्ट ध्वज लावला पाहिजे, असा कायदा होता. या ध्वजांवरील चिन्हे ही सुरापात्रांची असत.

असं असलं तरी वैदिक कालापासूनच सुरापानाचा निषेध केलेला आढळतो. अश्वपती राजाने आपल्या राज्यात एकही मद्यपी नाही, हे अभिमानाने जाहीर केले होते [२९]. धर्मसूत्रांत तर सुरापान हे पाच महापातकांपैकी एक मानले आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांपैकी कोणीही मद्यपान करू नये, असे मनुने सांगितले आहे. पण कोणत्याच राजसत्तेने या कायद्यांचा कधीच पुरस्कार केला नाही, आणि सामान्य जनतेनेही त्याकडे लक्ष दिले नाही.

असाच कहीसा प्रकार मांसाहाराच्या बाबतीतही झाला. अथर्ववेदात गोमांसभक्षणाविरुद्ध रचलेल्या बर्‍याच ऋचा आहेत [३०]. यज्ञात घोड्याचा बळी देऊ नये, असंही सांगितलं गेलं. 'शुद्ध' व 'अशुद्ध' मांस ही कल्पना रामायणकाळात प्रचारात आली [३१]. ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांनी केवळ 'शुद्ध' मांस खाणे अपेक्षित असे. Porcupine, ससा, कासव यांचे मांस 'शुद्ध' समजले जाई [३२]. गोमांस व कुत्र्याचे मांस खाणे निषिद्ध होते [३३]. बरेचसे ब्राह्मण केवळ नैवेद्यासाठी तयार केलेले मांसाहारी पदार्थ खात. नंतरच्या काळात प्राण्यांचा बळी न देता देवाला अन्नधान्याचा नैवेद्य दाखवावा, असाही विचार पुढे आला [३४].

वैदिक वाङ्मय व रामायण, महाभारतात याचप्रमाणे अन्नसेवनाबद्दलही काही नियम घालून दिले आहेत. तसेच असंख्य नियम सूत्र वाङ्मय व मनुस्मृतीतही आहेत. त्याबद्दल पुढच्या भागात...

क्रमशः

अन्नं वै प्राणा: (१) - http://www.maayboli.com/node/2802

अन्नं वै प्राणा: (३) - http://www.maayboli.com/node/7685

अन्नं वै प्राणा: (४) - http://www.maayboli.com/node/13569

-----------------------------------------------------------------------------------

संदर्भ :

[१]. आहारशुद्धौ सत्वशुद्धि: सत्वशुद्धौ ध्रुवास्मृति: |
स्मृति लम्भे सर्वग्रंथीनां विप्रमोक्षः | -चांडग्योपनिषद

[२]. अन्नाद्वै प्रजा: प्रजायन्ते या: काश्च पृथिवी श्रिता: ॐ अथोन्नेनैव जीवन्ति अथैनदपि यन्त्यन्ततः अन्न ॐ हि भूतानां ज्येष्ठम् तस्मात्सर्वौषध मुच्यते | - तैत्तिरीय उपनिषद

[३]. भक्ष्यं भोज्यं च चोष्यं च लेह्यं च विविधं बहु | - रामायण (अयोध्याकांड)
लेह्यं चोष्यं च पेयं च हृद्यं स्वादु मनोहरम् | - महाभारत

[४]. मध्वः पिबतं मधुपेभिरासभिरूत प्रियं मधुने युञ्जाथां रथं |
आवर्त्तनि मधुना जिन्वथस्पथो दृति वहेथे मधुमन्तमश्विना | - ऋग्वेद

[५]. आरङ्गरेव मध्वेरयेथे सारघेव गवि नीचीनवार |
कीनारेव स्वेदमसिष्विदाना क्षामे वोर्जा सूयवसात सचेथे | -ऋग्वेद

[६]. परित्वा परित्नुने क्षुणागाम विद्विषे |
यथा मां कामिन्यसो यथा मन्नापगा असः | - अथर्ववेद

[७]. यस्मिन्नश्वास ऋषभास उक्षणो वशा मेषा अवसृष्टास आहुता: | - ऋग्वेद
पचच्छतं महिषां इन्द्र तुभ्यम् | - ऋग्वेद

[८]. कर्हि स्वित्स त इन्द्र चेत्यासदघस्य यद्भि नदोरक्ष एषत् |
मित्रक्रुवो यच्छसने न गावः पृथिव्या आपृगमुया शयन्ते | -ऋग्वेद

[९]. महोक्षं वा महाजं वा पचेत् | -सत्पथ ब्राह्मण

[१०]. तौ तत्र हत्वा चतुरो महामृगान् वराहमृष्यं पृषतं महारुरुम्
आदाय मेध्यं त्वरितं बुभुक्षितौ वासाय काले ययतुर्वनस्पतिम् | -रामायण (अयोध्याकांड)

[११]. आच्छादयसि प्रावरानश्नासि पिशितौदनम् |
अजाने यावहन्त्यश्वा: केनासि हरिणः कृशः | -महाभारत

[१२]. तं तं देवं समुद्दिश्य पक्षिणः परावश्च ये |
ऋषभा: शास्त्रपठितास्तथा जलचराश्च ये |
सर्वांस्तानभ्ययुंजस्ते तत्राग्निचयकर्मणि | -महाभारत

[१३]. अगन्यहनिवध्येते द्वे सहस्रे गवां तथा |
स मांसं ददतोह्यन्नं रन्तिदेवस्य नित्यशः | -महाभारत

[१४]. द्वौमासौ तु भवेत् तृप्तिर्मत्स्यै पितृगणस्य ह |
त्रीन्मासानाविकेनाहुश्च्तुर्मासं शशेन ह |५|
आजेन मासान् प्रीयन्ते पञ्चैव पितरो नृपः |
वाराहेण तु षण्मासान् सप्त वै शकुलेन तु |६|
मासानष्टौ पार्षतेन रौरवेण नव प्रभो |
गवयस्य तु मांसेन तृप्ति: स्याद्दशमासिकी |७|
............................................
आनन्त्याय भवेद्दत्तं खड्गमासं पितृक्षये |१०| - महाभारत

[१५]. पुनर्गच्छ प्रमत्तस्य बाहुकस्योपसंस्कृतम् |
महानसाछ्रितं मांसमानस्वेह भाविनि | - महाभारत

[१६]. प्रतप्तपिठरैश्चापि मार्गमायूरकौक्कुटै: | - रामायण (अयोध्याकांड)
महिषानेकशल्यांश्च छागांश्च कृअतनिष्ठितान् | - रामायण (सुंदरकांड)

[१७]. आढ्यानां मांसं परमं मध्यानां गोरसोत्तरम् |
तैलोत्तरं दरिद्राणां भोजनं भरतर्षभ | - महाभारत

अपश्यत् तत्र गत्वा तं सूनामध्ये व्यवस्थितम् |
मार्गमाहिषमांसानि विक्रीणन्तं तपस्विनम् |
आकुलत्वाच्च क्रेतृणामेकान्ते संस्थितो द्विजः | - महाभारत

[१८]. नित्यस्तोत्रो वनस्पतिर्धीनामन्तः सबर्दुघः |
हिन्वानो मानुषा युगा | - ऋग्वेद

[१९]. सोमः पवते जनिता मतीनां जनिता दिवो जनिता पृठिव्या: |
जनिताग्नेर्जनिता सूर्यस्य जनितेन्द्रस्य जनितोत विष्णो: | - ऋग्वेद

[२०]. स्वादुष्किलायं मधुमां उतायं तीव्रः किलायं रसवां उतायम् | - ऋग्वेद

[२१]. सुराघटसहस्रेण मांसभूतौदनेन च
यक्ष्ये त्वां प्रीयतां देवि पुरीं पुनरुपागता | - रामायण (अयोध्याकांड)

[२२]. क्षीण पानोत्तमैर्भिन्नै: शरावैरभिसंवृताम् |
हतशौण्डमिवाकाशे पानभूमिमसंस्कृताम् | - रामायण (अयोध्याकांड)

[२३]. सीतामादाय हस्तेन मधुमैरेयकंशुचि | - रामायण (उत्तरकांड)

[२४]. विकरिष्यति रथ्यासु सुरापं ब्राह्मणं यथा | - रामायण (अयोध्याकांड)

[२५]. उभौ मध्वासवक्षीनावभौ चन्दनरुषितौ | - महाभारत

[२६]. एवं बभुव यज्ञः स धर्मराजस्य धीमतः |
बह्नन्नन्धनरत्नौघः सुरामैरेयसागरः | - महाभारत

[२७]. स्त्रियश्च विपुणश्रोण्यश्चारुपीनपयोधरा: |
मदस्खलितगामिन्यस्चिक्रीडु र्वामलोचना: | - महाभारत

[२८]. सुरा वैमलमन्नानां पाप्मा च मलमुच्यते |
तस्माद् ब्राह्मण राजन्यौ वैश्यश्च न सुरां पिबेत् |
गौडी पैष्टी च माध्वी च विद्नेया त्रिविधा सुरा |
यथैवैका तथा सर्वा न पातव्या द्विजोत्तमै: | - महाभारत

[२९]. उवाच न मे स्तेनो जनपदे न कदर्यो न मद्यपो ...... भगवन्त इति | - चांडग्योपनिषद

[३०]. क्रूरमस्या आशसनं तृष्टं पिशितमस्यते |
क्षीरं यदस्या: पीयते तद् वै पितृषु किल्विषम् | - अथर्ववेद

[३१]. बहून् मेध्यान् मृगान् हत्वा चेरतुर्यमुनावने | - रामायण (अयोध्याकांड)
इदं मेध्यमिदं स्वादु निष्टप्तमिदमग्निना | - रामायण ( अयोध्याकांड)

[३२]. पञ्च पञ्चनखा भक्ष्या ब्रह्मक्षत्रेण राघव |
शल्यकः श्वाविधो गोधा शशः कूर्मश्च पञ्चमः | - रामायण (अयोध्याकांड)

[३३]. श्वमांस नियता हारा: मुष्टिका नाम निर्घृणा: | - रामायण (बालकांड)

[३४]. बीजैर्यज्ञेषु यष्टव्यमिति वैदिकी श्रुति: |
अज संज्ञानि बीजानि छागानि नो अर्हथ | - महाभारत

------------------------------------------------------------------------------------

प्रमुख संदर्भग्रंथ :

1. आर्यांचे सण व इतिहास- पं. महादेवशास्त्री जोशी
2. India in the Vedic age - P. L. Bhargawa (Lucknow, 1956)
3. Rigvedic India - A. C. Das ( Calcutta, 1927)
4. Religion in the Vedic Literature - P. S. Deshmukh (Oxford, 1933)
5. Rugveda - R. T. H. Griffith (Benares, 1920)
6. Rugveda Samhita - Vaidika Samshodhana Mandala (Poona, 1946)
7. Epic India - C. V. Vaidya (Bombay, 1907)
8. The Great Epics of India - Hopkins (New York, 1901)
9. Mahabharata - Poona Edition, 1929-1936
10.Nirukta - Ed. V. K. Rajwade (Poona, 1940)
11. Atharvaveda Samhita - Roth & Whitney (Berlin, 1856)
12. Atharvaveda - S. B. E. 42, with the commentory of Saayana (Oxford, 1897)

-----------------------------------------------------------------------------------

स्रोत :

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाला, पुणे, यांचे ग्रंथालय, पुणे विद्यापीठाचे जयकर ग्रंथालय व भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, पुणे, यांचे ग्रंथालय

-----------------------------------------------------------------------------------

Protected by Copyscape Online Plagiarism Detector
गुलमोहर: 

chyayala,
1. <<मोहेन जोंदारो व जवळपासच्या उत्खननात जे काही सापडले त्यात कुठेही शस्त्र सापडले नाहीत भले नागरी रचना जी त्या काळात ईतरांपेक्षा सरस मानण्यात येते पण युद्दातील शस्त्रे आढळली नाहीत. तसेच सापडलेल्या मृतदेहांवर कुठेही शस्त्रामुळे मृत्यु झाला नसल्याचे लक्षात आले. जे मृत्यु झालेत ते उपासमारीने, भुकेने, तहानेने तडफडुन झाल्याचे लक्षात आले. याचा अर्थ त्यांचे एखाद्या आक्रमणामुळे मृत्यु व स्थलांतर झाले नाही तर वातावरणातील बदलामुळे वा भौगोलिक कारणामुळे पडलेल्या भीषण दुष्काळामुळे झाले व ते स्थलांतर पुढे दक्षिणेकडे झाले. सरस्वती नदीही त्याच काळात भुमिगत होउन अदृष्य होण्याची शक्यता आहे<<>>

या दोन्ही संस्कृतींचा कालखंड पूर्णतः वेगळा होता. आर्यांनी मोहेंजोदडो संस्कृतीचा विनाश केला, असं मी तरी अजून कुठे वाचलं नाही. तसंच या दोन्हीत अनेक बाबतीत असंख्य फरक होते, उदा. इथल्या विषयाला धरून, खाद्यसंस्कृतीत. जर या दोहोंचा संपर्क आला असता, तर आर्यांना खूप अगोदर गहू, तांदूळ ठाऊक झाले असते.

तुझ्या इतर मुद्द्यांबाबत सविस्तर लिहिन.
पण ही माहिती तू stephen-happ च्या वेबसाईटवर वाचली आहेस का?

चिन्मय, आणि माझाही मुद्दा हा नाही की आर्यान्नी मोहेन जोंदारो सन्स्कृती नष्ट केली, कारण कुठल्याच प्रकारचे आक्रमण तिथे दिसत नाही. असेही असु शकते की ती आर्य संस्कृतीचा भाग असेल. असो हा केवळ तर्क आहे माझा त्यावर विश्वास ठेवावा हा आग्रह नाही, अधिक माहिती मिळाल्यास मीही उत्सुक आहे.

हो मी ही माहिती stephen-happ वर वाचली आहे, त्यात सविस्तर आर्यांच्या आक्रमणाचे खंडन केले आहे. पण माझी माहीती याव्यतिरिक्त ईतर वर्तमानपत्रातील लेखांवरही आधारित आहे. आर्यांचे आक्रमण याच्या समर्थनार्थ तसेही ठोस पुरावे नाहीत, उलट ही थियरी कशी चुक आहे याचेच भरपुर पुरावे सापडतात.

आर्यांचे आक्रमण ह्या कल्पनेमुळे भारतात आजही बरेच ईतर थेयरीज निर्माण केल्या त्यामुळे भरपुर वाद आहेत व त्याचा उपयोग समाजात वैमनस्य उत्पन्न करण्यासाठी होतो जसे मुलनिवासी, आदिवासी, दलित, द्रविड यांच्याविरुद्ध ईतर समाज यासाठी या थेयरीचा भरपुर उपयोग करुन बुद्धिभेद केल्या जातो.
मुस्लिम, ब्रिटिश हे जसे आक्रमक आहेत तसेच आर्य म्हणजे पर्यायाने आपण भारतिय ही अक्रमकच आहोत यावरुन त्यांच्या आक्रमणालाही समर्थनीय ठरवण्याचे तत्वज्ञान दिसुन येते.
त्यामुळे ही कल्पना न वापरता संशोधन झाले तर न्याय मिळेल असे वाटते. कारण पायाच चुकीचा, वादग्रस्त असेल तर कितीही सुंदर ईमारत बांधली तर ती कमकुवतच राहणार ना.

आर्य बाहेरून आले याचा सर्वांत मोठा पुरावा म्हणजे IBM आणि National Geographic चा genome project..
याची सविस्तर माहिती त्यांच्या लघुपटात आहे..
इतर माहिती मी २-३ दिवसात लिहीन.

चिनूक्स केवळ अफाट! व्यासंग, चि़काटीला मनापासून सलाम!!
दोन-तीन उल्लेखात मला थोडी गफलत वाटते.
१) व्रीही म्हणजे तांदूळ नव्हे तर यव,सक्तु ज्याला आपण सातू म्हणतो ते.
२)सौवरकल म्हणजे सैंधव नव्हे तर सौवर्चल अर्थात ज्याला आपण पादेलोण म्हणतो ते होय.
३) भल्लातक म्हणजे आजचा बिब्बा. त्याच्या टोकाला काजूसारखा गोडसर अग्रभाग असतो ज्याला गोडंबी म्हणतात ती गोडंबी खाण्यासाठी वापरतात. नुसता बिब्बा खूप उष्ण असतो तो औषधासाठी वापरला जातो.

राहुल,
धन्यवाद. Happy
वृहि म्हणजे तांदूळच. पाणिनीच्या 'अष्टाध्यायी'पासून ते असंख्य ग्रंथांत हाच अर्थ सापडेल.
सैंधव मिठाबाबत आपटे-देवस्थळी शब्दकोशात मी या अर्थाची खात्री केली आहे. तरी परत एकदा बघून सांगतो.

माफ कर चिनूक्स तुझे म्हणणे बरोबर आहे. व्रीही म्हण़जे तांदूळच.
मात्र सैंधवाबाबत सौवरकल शब्द आयुर्वेदीय ग्रंथात आढळत नाही तत्सदृश सौवर्चल हा शब्द आहे जो पादेलोण मिठासंबंधी आहे. रामायणातील मूळ संदर्भ मला ठाऊक नाही. म्हणून नामसाधर्म्यांमुळे मला पादेलोण हा अर्थ योग्य वाटला.

एक अनावश्यक माहिती. खनिज मिठापैकी गडद तपकिरी अस्ते ते सिदेलोण आणि पांढरे खनिज मीठ असते ते पादेलोण.

बाकी तुमचे चालू द्या तो आप्ला प्रान्त नाही Proud

मला वाटते टोणगा तुम्ही उलट सांगताय..

पादेलोन तपकिरी असते . ब्लॅक सॉल्ट...

सेन्देलोन पांढरे असते...

( खाल्ल्या मिठाला जागणारा
पादोमोहनप्यारे)

अहो हे लिखाण नाही. हा डॉक्टरेट चा प्रबंध आहे. तुम्हाला आमच्यातर्फे डॉ.दिली.धन्यवाद!

"आणखी एका प्रकारात खिम्याचे गोळे करत. याला पिष्ठ असं नाव होतं"
महाभारतात पिष्ठौदन म्हणजे खिमा घालून केलेल्या भाताचा उल्लेख खूपदा येतो.

..... हा खिमा राइस का मीट्बॉल राइस?
लेख खुपच छान आहे आज वाचायला घेतले.

भल्लातक (marking nut, काजूसारखे एक फळ),<<
यालाच भिलावा किंवा बिब्बा असे म्हणतात.

सहीच...

विषयाची आवड आणि त्याचा व्यासंग लक्ष्यात येतो लगेच.. तू खूप मेहनत घेतली आहेस हे सर्व एकत्र करताना ते ही लक्ष्यात येतंय.. Happy प्रसंगांची वर्णने भारी आहेत.. Happy पदार्थांची नावे देखील भन्नाट... Happy

मृदुलाने आज सांगितले म्हणून इथे येउन हा लेख वाचला -- माहिती आणि लेखनशैली उत्तमच .

थोडी भौगोलिक गल्लत दिसते लोकांच्या प्रतिसादात -- वेद , उपनिषदे, रुचा या वेगवेगळ्या वेळी रचल्या गेल्या. ज्या समाजात त्या रचल्या गेल्या ते समाज स्थलांतरित होताना, इतर समाज व संस्कृतींशी मिसळताना दिसतात. बर्याच वेळेस आजच्या भारताच्या भौगोलिक सीमाप्रदेशाचाच विश्लेषण करताना विचार होतो -- चिनुक्स तुम्ही करत आहात असे नाही पण बऱ्याच लिखाणात हे दिसून येते. नक्की कोणता आणि किती मोठा भूभाग आपण पाहत आहोत ? बौद्ध धर्माचा प्रसार नंतर पूर्व आशियात आणि चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर झाला. यज्ञामध्ये होणारी पशु हत्या रोखण्यासाठी शाकाहाराचा प्रसार झाला पण याला धर्ममान्यता नक्की केव्हा मिळाली?

लेख छान माहितीपूर्ण आहेत.
परंतु यातील जवसाचा उल्लेख चुकीचा आहे माझ्या माहितीप्रमाणे.
आर्यांचे मुख्य अन्न यव किवा बार्ली हे होतं, जवस नाही. पुरोडाश आणि सातू देखील यव/बार्ली यापासून बनवले जात होते.

आर्य बाहेरून आले याचा सर्वांत मोठा पुरावा म्हणजे IBM आणि National Geographic चा genome project..
याची सविस्तर माहिती त्यांच्या लघुपटात आहे>>>

वरील वाक्य 2008 मध्ये लिहिले होते. त्यानंतर गेल्या 11 वर्षांत झालेल्या शोधांमुळे आर्य बाहेरून आले किंवा इथलेच यावर कितपत प्रकाश पडलेला आहे?

Pages