पर्यटन, पर्यावरण आणि आपण

Submitted by जिप्सी on 20 June, 2008 - 03:32

यंदा पावसाने मुंबईत मृग नक्षत्राच्या मुहुर्तावर वेळेवर हजेरी लावली आणि तेही दमदारपणे. पावसाची रिमझिम सुरू होताचे शहरवासियांना वेध लागते ते वर्षा सहलीचे. पावसाचे आणि निसर्गाचे नाते तसे अतुटच. पावसाळ्यात काय करायचे? याची प्रत्येकाची कल्पना वेगवेगळी असते. बाहेर पाऊस पडत असताना कुणाला घरी जुनी गाणी ऐकत मस्त कांदाभजी फक्कड चहाबरोबर खायला आवडतो, तर कुणाला मित्र मैत्रींणीसोबत धबधब्यात, साचलेल्या पाण्यात स्वच्छंदी धमाल करायला आवडते, तर काहींना सह्याद्रिच्या कुशीत फिरायला. अशा ह्या वर्षाऋतुच्या व ५ जून रोजी झालेल्या पर्यावरण दिनानिमित्त हा लेख मनापासून लिहावासा वाटला.
Lohgad_2_1.jpg(ह्या सुंदर निसर्गचित्राला आपण का बरे नजर लावावी?)

निसर्गासारखा नाही रे सोयरा, गुरू, सखा, बंधू, मायबाप।
त्याच्या कुशीत सारे व्यापताप, मिटती क्षणात आपोआप॥

खरे तर संपूर्ण पावसाळाच हा सह्याद्रिच्या ऋतुचक्राचा राजा आहे. पण सध्या काही हौशी पर्यटकांमुळे तो बदनाम होत चालला आहे. काही अति उत्साही पर्यटकांमुळे लोणावळा, खंडाळा, पळसदरी, माळशेज घाट हि निसर्गरम्य ठिकाणे कौटुंबिक सहलीच्या यादितून केव्हाच बाद झाली आहे. असे म्हटले जाते कि, लोणावळा, खंडाळा, पळसदरी, माळशेज घाटात पाऊस आणि दारुडे एकत्रच येतात. गमतीचा भाग सोडला तर आपण सर्वांनी गंभीरपणे याचा विचार केला पाहिजे. अशीच जर एक एक निसर्गसौंदर्याने भरलेली ठिकाणे आपण आपल्या करणीने नष्ट करत राहिलो तर आपल्या भावी पिढीला निसर्ग हा केवळ चित्रांमध्येच पाहावा लागेल. निसर्गाने मानवाला अगदी भरभरून दिले आहे पण बदल्यात आपण त्याला काय दिले? प्रत्येक वेळी त्याच्याकडून ओरबाडुनच घेतले आहे.

पण निसर्गाच्याही सहनशीलतेला अंत आहे आणि त्याने त्याचे प्रत्यंतर वेळोवेळी, पूर, वादळ, त्सुनामी ह्याद्वारे दिलेले आहेच. प्लॅस्टिकच्या वापराबबती कितीही आरड ओरड चालू असली तरी आजही त्याचा वापर सर्रास केला जात आहे. "मी एकट्याने प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरल्या तर काय होणार आहे? " पण हाच विचार सगळ्यांनी केला तर??? ३ वर्षापूर्वी मुंबईत २६ जुलैला झालेल्या महाप्रलयाला ह्या प्लॅस्टिकच्या पिशव्याच जबाबदार आहे हे माहित असुनही आपल्या रोजच्या वापरात त्यांचा उपयोग चालुच ठेवला आहे. आपल्या निष्काळजीपणामुळे टाकलेल्या या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमुळे आज कित्येक प्राणी, जलचर सृष्टी मृत्युमुखी पडत आहे. १९९० साली प्रख्यात जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यानात काही हरणं अचानक मेली. त्यांच्या मृत्युचे कारण कुणाच्या लक्षात येत नव्हते. शवविच्छेदनानंतर असे लक्षात आले कि, बेजबाबदार पर्यटकांनी प्लॅस्टिकच्या पिशव्यातून टाकलेले खाद्यपदार्थ त्या निष्पाप प्राण्यांनी प्लॅस्टिकसहित खाल्ले होते. आपण फक्त हि एक बातमी आहे असे समजून दुर्लक्ष करतो.

आज पर्यटन करताना आपल्या आजुबाजुची नैसर्गिक संपत्ती, प्राणीजीवनाल पोहचणारा धोका, निसर्गाची अनमोल दौलत, वनसंपत्तीचा हव्यास, अभयारण्यात येणाऱ्या वाहनांच्या आवाजाने वन्य प्राणीजीवांना होणारा व्यत्यय, वाहनाखाली सापडून मरणारे वन्यजीव यांची काळजी घेतली पाहिजे. पर्यटन म्हणजे पर्यावरणाची हानी नव्हे हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. माणसाची हाव दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तो राजरोसपणे झाडांची कत्तल करीत सुटला आहे. एक झाड कापण्यासाठी काही वेळ लागतो पण तेच झाड वाढवण्यासाठी मात्र कित्येक वर्षे हेच त्याला मुळी कळत नाही. जंगलातील प्राण्यांच्या वास्तव्याला माणसाच्या ओरबाडण्याने ते अजाणतेपणाने सिमेंटच्या जंगलात येत आहे.

जमिनीची धूप रोखण्यासाठी खारफुटी (मॅंग्रोव्हज) हि तर निसर्गयोजनाच आहे पण स्वतःच्या स्वार्थासाठी माणसाने आज त्याचीही राजरोसपणे कत्तल सुरू केली आहे. आज समुद्राच्या लाटा थोपवण्याचे सामर्थ्य ह्या खारफुटीची झाडात आहे. ह्याचे लाकुड लवचिक असल्याने मासेमारीसाठी होड्या, गळ, फर्निचर, जळण म्हणून ह्याचा सर्रास उपयोग होत आहे. आज सागरावर पाय रोवण्याच्या इर्ष्येने माणुस मुंबईची किनारपट्टी खचवतोय. ह्या खारफुटीच्या झाडांना तोडून आणि समुद्रात भर घालून त्याने वस्त्या वसवल्या आहेत. स्वच्छ फेसाळता समुद्र, त्याचा सुंदर किनारा यांचे नैसर्गिक सौंदर्य आपण बिघडवत चाललो आहोत. ह्या समुद्रानेसुद्धा आपल्याला भरभरून दिले आहे/देत आहे. पण आपण मात्र निर्माल्य, कचरा, प्लॅस्टिक, मद्याच्या रिकाम्या बाटल्या टाकून त्याची परतफेड करतोय. हल्ली समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना त्यांच्या जाळ्यात कित्येक टनाच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या सापडत आहेत. कारखान्याचे रासायनिक सांडपाणी नदी, खाडीमध्ये सोडले जाते. ह्या प्रदुषित पाण्यामुळे सारी नदी किंवा खाडी प्रदुषित होते आणि नदीकाठी मासे मरून पडलेले दिसतात.

Water_pollution.jpg

आज कित्येक पर्यटनस्थळी स्वातंत्राच्या नावाखाली धुडगुस चालला आहे. सहल म्हटले कि मद्यपान आलेच (अपवाद वगळून). आपल्या महाराष्ट्रातच बेहोष करणारे एवढे निसर्गसौंदर्य आहे कि, ह्या कृत्रिम नशेची लोकांना का गरज लागते तेच कळत नाही. मद्यपानाचा आस्वाद घेऊन झाल्यावर टाकलेल्या बाटल्यांचा खच, खाद्यपदार्थ, प्लॅस्टिकचा कचरा हे दृष्य आज सर्वत्र दिसत आहे. काही ठिकाणांना पर्यटनस्थळांचा दर्जा लाभल्याने तेथे मानवनिर्मित उपद्रव या स्थळांची शांतता व सौंदर्य बिघडवत आहे. यातून आपल्या महाराष्ट्राचे वैभव असलेले गड किल्लेही सुटले नाहीत. या ऐतिहासिक वास्तुंवर आपल्या येण्याची नोंद करून ठेवणारे महाभाग पर्यटक काही कमी नाहीत. नवल फक्त एका गोष्टीचे वाटते की, ज्यांनी ह्या वास्तू उभारल्या त्यांना कधी आपले नाव त्यावर कोरावयाचे वाटले नाही पण आपण मात्र सर्वत्र आपल्या नावाची नोंद करत असतो.
Lohgad_1_0.jpg(हल्ली असे फलक गड किल्ल्यांवर लावावे लागतात.)
परदेशातील लोक मात्र ह्या बाबतीत काटेकोर असतात. फिनलंडला असताना आम्ही काहिजण तेथील नुक्सियो ह्या नॅशनल पार्क मध्ये गेलो होतो तेंव्हाच एक अनुभव. आम्ही कॅंप फायर करण्यासाठी २ तासांची पायपीट करून एका सुंदर तळ्याकाठी आलो. कॅंप फायरसाठी ती एक चांगली जागा असल्याने काही लोकांनी तेथे अगोदरच सोय (लाकुड, बसायला जागा, लाकडे कापण्यासाठी हत्यारे इ. ) करून ठेवली आहे. आम्ही तेथे आमच्या काही फिनिश मित्रमैत्रिंसोबत सहलीचा आनंद लुटण्यासाठी गेलो. कॅंप फायर झाल्यानंतर प्रत्येकाने तेथे पडलेला कचरा न सांगता गोळ केला आणि आपआपल्या बॅगेत भरला. एकाने तळ्यावर जाऊन पाणी आणले व त्या आगीवर टाकले. जाण्यासाठी जेंव्हा आम्ही परत निघालो तेंव्हा वाटतच नव्हते कि येथे कोणी सहलीसाठी आले होते इतका तो परिसर स्वच्छ केला होत. परत १ तासाची पायपीट करून जेंव्हा कचऱ्याचा डबा बाहेर दिसला तेंव्हा सगळ्यांनी आप आपल्या बॅगांमधला कचरा त्यात टाकला. मनात लगेच विचार आला आपण हे आणि असे काटेकोरपणे कधी पाळायला शिकणार? आपल्याकडे तर "स्वच्छता राखा" ह्या फलकावरच हल्ली रंगबिरंगी पिचकाऱ्या दिसतात.

प्रत्येकजणांच्या मनात विचार असेल कि, मी काय करू शकतो पर्यावरणाचे रक्षण करण्याकरीता. मागे एका मासिकात वाचलेल्या एका उपक्रमाचा येथे मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. तो उपक्रम असा होता कि, आपण वर्षभर जी फळे खातो उदा. आंबा, संत्री, फणस, जांभुळ इ. (उन्हाळ्यात तर भरपुर फळे उपलब्ध असतात) त्या फळांच्या बिया फेकून न देता त्या साठवून ठेवाव्यात आणि पावसाळा सुरू झाला कि आपल्या वर्षासहलीच्या दरम्यान त्या रुजतील अशा ठिकाणी उधळायच्या. मस्त आहे ना हा उपक्रम! विचार करा त्या बियांपैकी काही जरी रुजल्या आणि हजारो हातांनी हे काम केले तर नक्कीच परिसर सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही. सध्या वर्षासहलीला जाण्याचे फॅड वाढले आहे. काही हौशी पर्यटक अशा निसर्गरम्य स्थानी जाऊन प्लॅस्टिकच्या पिशव्या, दारूच्या बाटल्या इ. कचरा फेकतात. त्याच ऐवजी जर या बिया उधळल्या तर आपल्या हातून पर्यावरणाचे रक्षण करण्यात खारीचा वाटा झाला याचे समाधान मिळेल.
Seeds_1.jpg

याच बरोबर मी अजून एक सुचवू इच्छितो कि, ज्यांना वर्षासहलीस जाणे शक्य नाही त्यांनी या सर्व बिया साठवून ठेवाव्यात. आपल्या महाराष्ट्रात आषाढी-कार्तिकी एकादशीला पंढरपुरास पायी जाणारे वारकरी असतात त्यांच्याकडे त्या द्यावेत. आषाढी एकादशी तर भर पावसात म्हणजेच साधारणतः जुलै महिन्यात असते. त्या बिया जर तुम्ही वारकऱ्यांकडे दिल्या तर ते आपल्या दिंडी परिक्रमेत उधळत जातील. अशा प्रकारे त्यांना ईश्वरसेवेबरोबर निसर्गाचीही सेवा करण्याची संधी मिळेल.

हा लेख वाचून काही लोकांनी जरी ह्या बाबतीत विचार करायला सुरुवात केली तरी ह्या लेखाचे सार्थक होईल. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की पर्यटन करताना निसर्गाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. निसर्गात आपल्या पाऊलखुणांशिवाय काहिही ठेऊ नका आणि त्यांच्या सुखद आठवणींशिवाय काहिही नेऊ नका.

- योगेश जगताप

गुलमोहर: 

योगेश, विचार करायला लावणारा लेख आहे. लेखात नुसती तक्रार न मांडता तू त्याबरोबर सर्वाना सहज शक्य असे उपायही सुचवले आहेस. आपण खरेदीला, सहलीला जाताना बरोबर कापडी पिशव्या नेल्या तर प्लॅस्टिकच्या वापराला काही प्रमाणात आळा नक्कीच बसेल. पावसाळ्यात प्लॅस्टिकच्या पिशव्या नेणे अपरिहार्य असल्यास निदान ते प्लॅस्टिक रेसायकलेबल आहे ह्याची खात्री करून नेऊ शकतो.
फळांच्या बिया वर्षासहलीच्या किंवा वारीच्या दरम्यान रुजत घालण्याची तुझी सूचना आवडली. ती प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न मी नक्की करेन.

लेख फार फार आवडला. अश्या गोष्टी अज्ञानातून आणि बेफिकिरीतून होत असतात. शाळा शाळांमधून अभ्यासक्रमात निसर्गसंरक्षण हा विषय असणं आणि तो राबवायला शिकवणं आवश्यक आहे.
मागे एकदा कर्नाटाकातल्या 'होन्नेमारडु' ला जाण्याचा योग आला. (शरावती नदीचं खोरं). तीथले आदिवासी पर्यटकांना बरीच मदत करतात. त्यांना सुध्दा प्रशिक्षण दिलंय. कँपिंगला जाताना प्लास्टिक्च्या पिशव्या, सिगरेटी असलं काही नेऊ देत नाहीत. दारू तर नाहीच. निघताना आपण सगळा वापरलेला परिसर स्वच्छ केलाय हे कटाक्षानं बघतात. (१०-१२ वर्षांपूर्वी तरी सगळं स्वच्छ आणि सुरेख होतं) आता माहिती नाही.
'बिया प्रकल्प' फारच कल्पक!

योगेश उत्तम कम करताय तुम्ही. मी आणि माझं कुटुंब असं वगतंच आहे अमेरिका, दुबई,आणि हाँग्काँगला जाऊन आल्यापासून्.असं प्रत्येकानं आचरलं की बघणर्‍यालाही आज नाही तर उद्या नक्कीच "याला सुधारणा म्हणतात" हे कळेल. या बबतीत मी नक्कीच आशावादी आहे. बिया उधळण्याची कल्पना मनपासून आवडली. मी या वर्षीही नक्की अमलात आणीन. अभिनंदन.

छान लेख लिहिला आहे. ह्यावरुन आठवण झाली. माझ्या बहिणीची एक मैत्रिण आमच्या घरी आली होती. तिला सोडवायला म्हणुन आम्ही बस स्टँडवर गेलो असताना तिच्या ३-४ वर्षाच्या मुलीने केळे खाउन साल खाली फेकुन दिले. माझ्या मैत्रिणीने आपल्या मुलीला ते उचलुन कचर्‍याच्या पेटीत टाकायला लावले. असे पालक विरळाच. तसेच परदेशात अनेक भारतीय लोकांना सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता पाळताना बघितले आहे. पण हेच लोक भारतात गेले कि "यहा सब चलता है" असे वागताना दिसतात.
.
ज्यांनी ह्या वास्तू उभारल्या त्यांना कधी आपले नाव त्यावर कोरावयाचे वाटले नाही >>> मला पण नेहेमी असेच वाटते.
.
बिया उधळायची कल्पना छान आहे. अजुन एक- कुठल्याही कारणासाठी बाहेर पडणे झाले तर आपल्याजवळ एक छोटीशी पिशवी अथवा कागदाची घडी ठेवावी. काही कचरा जमल्यास इकडे तिकडे टाकण्यापेक्षा ह्यात गोळा करुन जमेल तेव्हा कचरा-पेटीत टाकता येतो.

योगेश, चांगला लेख! बियांची आयडिया मस्त आहे, पण टिकतात का बिया बरेच दिवस? आणि मुख्य म्हणजे नंतर रुजतात का? वारी ची कल्पना तर झकास. असे ८-१० वर्षे जरी सलग झाले तर तो आख्खा रस्ताच अशा झाडांमुळे ओळखू येइल. शास्त्रशुद्ध विचार करून ते फायदेशीर आहे का बघायला पाहिजे. पालखीचा मार्ग पाण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या भागातून जात असावा आणि प्रत्येक ठिकाणी त्याचे फायदे वेगळे आहेत. अर्थात नुकसान तर काहीच नाही.

योगेश, खुपच छान लिहिलं आहेस. एक साधी सरळ गोष्ट आहे, जे आपण निर्माण करू शकत नाही, ते नासवण्याचा आपल्याला अधिकार नाही! पण खेदाची बाब अशी की आपल्या रक्तातच ही वृत्ती नाही. लोकांना सांगायला गेलं तर वाद घालावे लागतात. मी कामशेत तालुक्यातल्या एका शाळेत आठवीच्या तुकडीचे निसर्गमैत्री शिबीर घ्यायला जात असे, दोन वर्षात मुले इतकी समजुतदार आणि जबाबदार झाली की आम्हाला कौतुक वाटायला लागले, पण हे कौतुक फार काळ टिकले नाही कारण पालकांना त्याचा काच व्हायला लागला. प्लास्टिकचा वापर / रा. खतं / सांडपाणी / कचरा याबाबत सुरुवातीला मुलांच्या सुचनांचा आदर करणारे पालक नंतर त्यांच्यावर खेकसून त्यांना 'तुला काय कळतंय, तू गप रे!' असं ओरडायला लागले. मुलं हिरमुसली. आणि दोन वर्षात मुलांना जे खरंच समजलं आणि पटलं होतं ते पालकांनीच त्यांना न करायला भाग पाडलं. मी उदाहरण जरी खेड्यातलं दिलं असलं तरी त्या तुलनेत हे प्रमाण शहरांमध्ये जास्त भयानक स्वरुपाचं आहे.

आणि संस्कारांची भाषा करणारे आजकालचे पालक किंवा अगदी आजी-आजोबाही आपल्या घरांमध्ये आपण काय संस्कार केले ते पाहू शकत नाहीत का? माझ्या लहानपणापासूनच आम्हा कोणाच बहिण भावंडांना रस्त्यावर काही न टाकणे-न थुंकणे-घराबाहेर कुठेही अस्वच्छता न करणे हे सांगावं लागलं नाही कारण घरातल्या मोठ्या कुणालाच असं करताना पाहिलं नाही. माझ्या मित्र-मैत्रिणिंपैकीही कुणीच असे वागत नाहीत. आपण जेवतो, खातो, तशीच ही अगदी सहज गोष्ट आहे, त्यात आपण काही वेगळं करतोय असा कोणाचाच अभिनिवेश नसतो. थोडक्यात आपण जसे असतो, तशाच संगतीत आपण रमतो. पण बाहेर असं पाहिलं की या सगळ्याचंच आश्चर्य वाटत राहतं. बरेचजण परदेशात जाऊन आले की त्यांना साक्षात्कार होतात की अरे आपण असं वागलं पाहिजे! गंमत आहे ना! मी एकदा आमच्या नेहमीच्या भाजीवाल्याकडे २५ घरी शिवलेल्या कापडी पिशव्या नेऊन दिल्या आणि प्ला. पिशवी मागणा-या बायकांना ही एकेक पैसे न घेता द्या असं सांगितलं. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे दुस-या दिवशी त्यातल्या फक्त तिघीचजणी पिशव्या घेऊन आल्या आणि त्यानंतर पुढे त्यांनीही नाही आणल्या! आता बोला! एकतर फुकट म्हणुन किंमत नाही शिवाय का दिल्या ते जाणून घेऊन त्यावर विचार आणि अंमलबजावणीची तसदी कोण आणि का घेणार? एकदा एका पंचतारांकित हॉटेलमध्ये माझ्याबरोबर घडलेली घटना. मी स्वच्छतागृहात गेले, माझ्या आधी आत गेलेल्या झकपक बाईंनी फ्लशच केलं नव्हतं म्हणुन मी लागलीच त्यांना विचारलं, त्या तिथेच बाहेर आरशात मेकप आणि पेहराव ठाकठीक करण्यात गुंतल्या होत्या, त्या म्हणाल्या करतील की या मुली साफ. एवढाले पैसे कशाचे मोजतो??? ही सगळी खुप वेगवेगळी उदाहरणे आहेत पण मथितार्थ एकच, वृत्ती नाही. आणि ती कुणी दुसरा बदलू शकत नाही, ज्याने त्यानेच स्वत:ची बदलायला हवी.

मृण्मयी, येकाखु, अज्ञात, सिंड्रेला, फरेंड, साई आपल्या प्रतिसादबद्दल धन्यवाद!

तुमच्या सारखाच विचार जर सगळ्यांनी केला तर......?

मृण्मयी " शाळा शाळांमधून अभ्यासक्रमात निसर्गसंरक्षण हा विषय असणं आणि तो राबवायला शिकवणं आवश्यक आहे">>>> सध्याची परिस्थीती पाहता हे आवश्यकच केले पाहिजे.

सिंड्रेला तुमचा "कुठल्याही कारणासाठी बाहेर पडणे झाले तर आपल्याजवळ एक छोटीशी पिशवी अथवा कागदाची घडी ठेवावी. काही कचरा जमल्यास इकडे तिकडे टाकण्यापेक्षा ह्यात गोळा करुन जमेल तेव्हा कचरा-पेटीत टाकता येत">>>>> हा विचार आवडला.
....
फरेंड - हो या बिया जर स्वच्छ धुवुन उन्हात वाळवल्या (मुंग्या येऊ नये म्हणुन) तर त्या अवश्य टिकतात हे स्वअनुभवावरुन सांगतो.
..

साई "जे आपण निर्माण करू शकत नाही, ते नासवण्याचा आपल्याला अधिकार नाही">>>>>> फारच छान. तुमचा अनुभव (निसर्गमैत्री शिबीर आणि कापडी पिशव्या) वाचुन खरंच वाईट वाटले. "एकतर फुकट म्हणुन किंमत नाही शिवाय का दिल्या ते जाणून घेऊन त्यावर विचार आणि अंमलबजावणीची तसदी कोण आणि का घेणार">>>>>> हे मात्र अगदी बरोबर.

योगेश, खुपच छान लिहिलं आहेस...

धन्यवाद परेश!
मायबोलीवर आपले स्वागत आहे.

योगेश,

लेख खुप आवडला. स्वछ्छता राखण, निसर्गाचा आदर करण ह्या साध्या गोष्टि आपल्याकडे अशक्यप्राय होतात हि खिन्न करणारि वस्तुस्थिति आहे. कचरा गोळा करण्यासाठि पिशव्या बाळगण्यासारख्या साध्या साध्या कल्पना बरच काहि साध्य करु शकतिल. फक्त बियांचि कल्पना अमलात आणण्यापुर्वि थोडा विचार व्हावा अस मला वाटत. कारण वृक्षारोपणासाठि सहज लागतिल आणि टिकतिल अशि झाडे सरसकट (तेथिल इको सिसटिम चा विचार न करता) लावल्यामुळे त्या भागातल्या (तेथिल मुळ रहिवासि) झाडांच्या वाढिवर परिणाम झाल्याचि काहि उदाहरणे मी ऐकलि आहेत.

योगेश लेख खुप आवडला.
पर्यावरणावर भरभरुन बोलल्याने संवर्धन होणार नाहि, त्यासाठि आपणच काहि केले पाहिजे.तुमचि बियांचि आयडिया आवडलि, जरुर अमलात आणु.
स्वछ्छता राखणे, निर्सगाचा आदर करणे हे आपणच आपल्या पुढच्या पिढिला देणार ना.

मराठमोळी/कांचनसखी आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

नमस्कार योगेश,
तुमचा लेख आवडला. जरा उशिरातच वाचनात आला. तुमची बियांची कल्पना चांगली आहे.

योगेश, विषय, लिखाण व छायाचित्रे सर्वच चांगले जुळून आले आहे. तुम्ही सुचविलेले उपाय खरोखरीच सर्वांनी अंमलात आणण्यासारखे सोपे आहेत. ह्याशिवाय अजून काही उपाय मी व माझे मिशन ग्रीन अर्थ चे मित्र मैत्रिणी आचरणात आणतो ते असे:
१] रेल्वे, बसप्रवासात स्वतःचा व आपल्या सहप्रवाशांचा कचरा एकत्र गोळा करणे ( प्लास्टिक किंवा कागदी पिशवीत) व नंतर ती पिशवी कचराकुंडीत टाकणे. लोकांना डब्यात कचरा करण्यापासून वा खिडकीतून बाहेर कचरा फेकण्यासाठी विनम्रपणे विरोध करणे.

२] आपल्यासोबत बाहेर जाताना जर प्लास्टिकची रि-सायकलेबल पिशवी ठेवली तर वेगळी पिशवी मागायची गरज भासत नाही. कापडी/ कागदी पिशवी असेल तर अजूनच उत्तम!

३} निसर्गरम्य ठिकाणी गेल्यास आवर्जून तिथे सापडणारे गुटखा, तंबाखू, सिगरेट्स इत्यादीचे प्लास्टिक/ तत्सम पाऊचेस गोळा करणे ( हातात प्लास्टिकची पिशवी घालूनपण आपण हे काम करू शकतो) आणि त्यांची योग्य विल्हेवाट लावणे. आपल्या अशा वागण्याने आजूबाजूची तरुण मंडळीही प्रेरित होतात, मदत करतात असा अनुभव आहे.

४] लहान मुलांना ह्याविषयी, बी संकलनाविषयी सांगितले की आपल्यापेक्षा सवाई काम करतात! एक तर त्यांना 'संकोच' किंवा 'कसे सांगू?' वगैरे प्रश्न पडत नाहीत. ती थेट जाऊन त्या कचरा करणार्‍या व्यक्तीला प्रश्न विचारून निरुत्तर करतात. त्यांची दोस्त कंपनी भरपूर असल्याने एखादे चांगले काम करायचे म्हटल्यावर उत्साहाने करतात. शिवाय आई-वडील, इतर नातेवाईक ह्यांच्यामागे भुणभुण करून त्यांनाही अशा बाबतीत प्रवृत्त करतात.

चांगल्या कामांमध्ये अडचणी येतच असतात. त्या गृहित धरायच्या व त्यांच्यामुळे नाऊमेद न होता पुढील मार्गक्रमणा करायची!!

अजून काही माहिती हवी असल्यास ह्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या :
www.missiongreenearthpune.org/

धन्यवाद!!!
अरुंधतीजी छान उपाय सुचवले आहेत तुम्ही.
नक्किच अमलात आणण्याचा प्रयत्न करू आणि याचा जमेल तसा प्रसारहि करू.

योगेश !
तु हा धागा लिहिला आणि मला आवर्जून त्याची नाळ (लिन्क) पाठवलिस त्याबद्दल फार आभारी आहे.
धाग्यातील मतितार्थ जेवढा दिलासा देणारा आहे तेवढाच किंबहूना त्यापेक्षा जास्त त्यावरच्या प्रतिक्रिया वाचून ह्या विषयावर स्वतःला जमेल तसा हातभार लावणार्‍यां निसर्ग प्रेमी ही कमी नाहीत हे जाणून मनस्वी आनंद झाला..... त्यांचेही अभिनंदन ....
ह्या धाग्यात अजून काही नविन गोष्टि कळल्या ..... त्यांचाही आम्हाला उपयोग होईल..........

योगेश.. लेख आवडला.

सगळ्या मुद्यांशी सहमत. फक्त फारेंड म्हणतो त्याप्रमाणे नुसत्या बिया टाकायच्या ऐवजी त्या टाकल्यावर रुजु कश्या शकतील हाही नीट विचार करायला हवा.