दे कॉल मी इ. झेड - भाग २

Submitted by कौतुक शिरोडकर on 1 February, 2010 - 13:45

पहिला भाग - http://www.maayboli.com/node/13598

१८ मार्च २०१५
राजीव गांधी मेमोरियल हॉस्पिटल, अंधेरी, मुंबई, भारत
दुपारी १२ वाजून २७ मिनिटांनी
व्हिडियो कॉन्फरेंस रुम

अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे संसदेत व विधानसभेत चाललेला सावळा गोंधळ 'लाईव्ह' पहात, डॉ. जोशींची टिम व्हिडियो कॉन्फरेंस रुममध्ये शांत बसलेली होती. राजकारण्यांचा खेळ तिथल्या कोणाला नवीन नव्हताच. परिस्थितीच गांभिर्य कळेल ते राजकारणी कसले ? असे मनाशी घोळवत जोशींनी टिव्ही बंद केला. नंतर ते सगळे समोरच्या स्क्रीनकडे वळले. आता स्क्रीनवर usamriid च्या डोरोथी स्कॉट होत्या. त्यांच्या मागच्या स्क्रीनवर अनेक स्लाईडस ये-जा करत होत्या.

"शत्रुशी लढण्यापुर्वी त्याला जाणून घेणे महत्त्वाचे. तरच त्याच्याशी सर्वशक्तीनिशी लढता येते, मी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या थोडक्यात शत्रुची कल्पना देते. आफ्रीकेच्या विषुववृत्तीय वर्षारण्यातून बाहेर पडलेल्या विषाणूंची ही यादी - लासा, रिफ्टवॅली, ओरपुके, रोकिओ, क्यू फिव्हर, ग्वानरिटो, व्हीइइ, मंकीपॉक्स, डेंग्यु, चिकनगुन्या, माकुपो, जुनिन, हान्ता, रेबिजसारखे मोकोला व दुवेनहेग, लेझन्टेक, कॅसनूर फॉरेस्ट ब्रेन व्हायरस, एच. आय. व्ही., सेमिलिकी फॉरेस्ट एजंट, क्रिमियन काँगो, सिंदवीस, ओनोंग लोंग, नाव नसलेला साओ पावलो, मारबर्ग आणि एबोला." थोडं थांबून त्यां समोरच्या ग्लासातील घोटभर पाणी प्यायल्या.
"'फिलोव्हायरस' हा शब्द लॅटीन भाषेतून आलाय. याचा अर्थ 'धाग्यासारखा विषाणू'. इतर विषाणू प्रामुख्याने गोलाकार चेंडूसारखे असतात मात्र फिलोव्हायरस पिळदार दोरीप्रमाणे भासतात. एबोला याच कुळातला. झायरे इथे २६ ऑगस्ट १९७६ला एबोला नदीच्या काठावर यांबुकु येथे ह्या रोगाने पहिला हल्ला केला होता. तो वर्षारण्यातून कसा बाहेर पडला त्याची कल्पना नाही. कदाचित जनावरांच्या विष्ठेतून वा मांसातून किंवा वनस्पतीतून. झायरेतील एबोला नदीच्या काठाला सापडल्याने त्याचे नाव 'एबोला झायरे' ठेवण्यात आलं. १९८० ला पुन्हा उद्रेक झाला तो सुदान येथे हा किंचित वेगळा म्हणून 'एबोला सुदान' आणि त्यानंतर मग १९८९ ला रेस्टन येथे. हा दोघांपेक्षा वेगळा. याने माणसांवर हल्ला केला नव्हता. प्रयोगासाठी आणलेल्या माकडांवर त्याने हल्ला केला. १९९४ ला आयव्हरी कोस्ट येथे चिंपांझीमध्ये सापडला. नोव्हेंबर २००७ ला युगांडातील बुंडीबुगयो येथे. एबोला आफ्रिकेतल्या किटूम गुफेतून बाहेर आल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. कारण तेथून बाहेर पडलेले दोन पर्यटक एबोलाग्रस्त होऊन मेले. पण किटूम गुफेच्या महिनाभराच्या अभ्यासात तो काही तिथे सापडला नाही." क्षणभर थांबून त्यांनी समोर नजर फिरवली. समोर कमालीची शांतता होती.
"एबोला झायरे विषाणू शरीरातल्या प्रत्येक भागावर, पेशींवर आणि अवयवांवर हल्ला करतो. रक्तातल्या सरंक्षक पेशींना याचं अस्तित्व जाणवत नाही. त्यामुळे त्या त्याच्याविरोधात कार्य करू शकत नाहीत. फक्त हाडे आणि हाडांवरचे स्नायु तेवढे ह्या तडाख्यातून सुटतात. हा विषाणू परोपजीवाची परिसीमाच आहे. ज्या सात प्रथिनांचा मिळून तो विषाणू बनतो, ती गुढ प्रथिने न थकता अहोरात्र काम करीत असतात. रक्तामध्ये लहान लहान गुठळ्या होऊ लागतात. रक्त घट्ट होऊ लागल्याने रक्तप्रवाह मंदावतो. त्या गुठळ्या रक्तवाहीन्याच्या भिंतीना चिकटू लागतात. मग गुठळ्यांचे थर बसू लागतात. छोट्या गुठळ्या केशवाहीन्यांमध्ये वाहात जाऊन अडकतात. त्यामुळे अवयवांना होणारा रक्तपुरवठा बंद पडतो. त्याचा परिणाम म्हणून मेंदू, किडनी, फुफ्फुसे, अंडाशय, स्तन, आतडी, त्वचा अशा सर्व ठिकाणी अनेक लहान भाग मृत होतात. त्वचेखाली अनेक ठिकाणी रक्तस्त्रावाच्या खुणा निर्माण होतात. हा विषाणू संयोजी उतींवर विलक्षण कडवेपणाने हल्ला चढवतो. शरीरात त्वचा आणि अनेक भाग एकमेकांशी जोडून ठेवणारे कोलाजेन हे एक महत्त्वाचे प्रथिन आहे. हा विषाणू त्या कोलाजेनमध्ये वाढू लागतो. शरीरातील कोलाजेनचे लिबलिबित पदार्थात रुपांतर होते. त्वचेखालचे थर मरण पावतात. त्वचेवर पांढर्‍या रंगाचे लाखो लहान लहान बुडबुडे निर्माण होतात. त्वचेवर आपोआप भेगा पडतात. त्यातून रक्तस्त्राव होऊ लागतो. त्वचेवरचे लहान लाल ठिपके मोठे होऊन लांबलचक चिरा तयार होतात. त्वचा मऊ आणि लिबलिबित होते. एखाद्या लहानश्या धक्क्याने फुगा फुटावा तशी त्वचा फुटते. प्रत्येक रंध्रामधून रक्त बाहेर पडायला सुरुवात होते. जिभेची सगळी त्वचा सोलून बाहेर पडते. उलटी होताना घशातले आतले आवरण सोलून निघते. श्वासनलिकेतील आवरण सोलपटून फुफ्फुसात जमा होते. ह्रदयाचे स्नायु आतल्या आत रक्तस्त्राव घडवितात. ह्रदयातून रक्त बाहेर येऊन छातीच्या पोकळीत साठू लागते. मेंदूमध्येही ठिकठिकाणी रक्त साठू लागते. डोळ्यांमधील कडांवर परिणाम होतो. सगळा डोळा रक्ताने भरून माणूस आंधळा होतो. डोळ्यातून अश्रूंऐवजी रक्त वाहू लागते. न गोठणार्‍या रक्ताच्या धारा वाहू लागतात. कधी कधी पक्षाघाताचा झटका येतो व एक बाजू संपुर्णपणे लुळी पडते. रक्तात गुठळ्या होतात पण बाहेर पडणारे रक्त गोठत नाही. अखेरच्या अवस्थेत एबोलाचे रोगी झटके देऊ लागतात. अपस्मारासारखे. हातपाय वेडेवाकडे फेकले जातात. रक्ताळलेले डोळे फिरून वर जातात. हादर्‍यांमुळे आणि झटक्यांमुळे रोग्याच्या अवतीभवती रक्त उडते. या रक्ताच्या शिंपणातच एबोलाला एखादा नवीन बळी मिळतो." डोरोथी स्कॉट त्या प्रदिर्घ भाषणानंतर थांबल्या. चारही हॉस्पिटलमध्ये जे कोणी त्या रोग्यांच्या संपर्कात आलेत ते सगळे आता पुर्णपणे हादरले असतील याची त्यांना कल्पना होती. त्या समोरून येणार्‍या प्रतिक्रियांसाठी थांबल्या. पण समोर शहारलेल्या देहांशिवाय काहीच नव्हतं.
"एबोलाचा कांजिण्या, गालगुंड व रॅबिज विषाणूंशी लांबचा संबंध आहे. पॅराइन्फूएंझा त्याचा दुरचा नातेवाईक आहे. एडस झालेल्या माणसात प्राणघातक न्युमोनियाने बळी घेणार्‍या सिनिक्टीकल विषाणूशी एबोलाचा थोडाफार संबंध आहे. एबोला कांजिण्याप्रमाणे अंगावर पुरळ आणतो. त्याचे काही परिणाम रॅबिजसारखे दिसतात - बेभानपणा आणि डोके फिरणे. त्याची इतर काही लक्षणे तर जोरदार सर्दीसारखी वाटतात. एबोला विषाणूच्या कणामध्ये फक्त सात प्रथिन रेणू असतात. त्यापैकी तीन रेणूंच्या रचनेची फारच त्रोटक माहीती आहे तर उरलेली चार प्रथिने सर्वस्वी अज्ञात आहेत. ह्या प्रथिनांची रचना आणि कार्य पुर्णत: कोडे स्वरुपात आहे. एबोलाची प्रथिने शरीरातील प्रतिरक्षण यंत्रणेवरच विशेष हल्ला चढवतात. एड्सच्या विषाणूला जे करायला दहा वर्षे लागतात, तेच काम एबोला फक्त दहा दिवसात उरकतो. एका व्यक्तीकडून दुसर्‍याकडे एबोला कसा जातो, हे मात्र नीटसे समजलेले नाही. माणूस आणि माकडे दोन्ही प्रायमेट वर्गात मोडतात. एबोला विषाणू प्रायमेटच्या पेशीवर जगतो. रोगी मेल्यावर शरीर अचानक सडू लागते. आतले अवयव जे पुर्वीच मेलेले असतात किंवा मरण्याच्या वाटेवर असतात, ते विरघळू लागतात. विरघळणारा हा शरीराचा भाग द्रवरुपात मृताच्या शरीराभोवती वाहत राहतो." **
त्या आता थांबल्या. त्याच्या प्रश्नार्थक मुद्रेकडे पाहून डॉक्टर्स भानावर आले.
"फॅटालिटी रेट ? " प्रश्न डॉ. जोशींनी विचारला होता.
"गेल्या चाळीस वर्षांची सरासरी बघता ८३ % म्हटता येईल."
"लढाईचा प्लान काय आहे ? " हा प्रश्न इंद्रप्रस्थच्या डॉ. अवस्थींचा होता.
"सिंपल. हॉस्पिटलस संपुर्णपणे आयसोलेट करून प्रत्येकाची तपासणी केली जाईल. बाहेर एबोलाचा एकही कॅरियर फिरता कामा नये. सीडीसीने एबोला वॅक्सीन डेव्हलप केला आहे. यासाठी रक्ताशी कोणताच संसर्ग येऊ नये म्हणून खास अंतराळ पोषाखासारखे पोषाख बनवण्यात आले असून त्यांच्या निर्जंतुकीकरणासाठी विशिष्ट खोली उभारावी लागेल. यासाठी लागणार्‍या सामग्रीची यादी तयार आहे. आपल्याला त्याचा फैलाव रोखायचा आहे. ते झालं की अर्धी लढाई जिंकलीच म्हणून समजा." स्कॉट यांनी थोडक्यात कल्पना दिली.
"निसर्गात उत्क्रांती सतत होत असते. मग एबोलाच्या बाबतीतही ते शक्य आहे ना ? " डॉ. बॅनर्जीनी शंका विचारली
"हो. शक्य आहे. झायरे रक्तसंपर्कातून पसरतो तर रेस्टन हवेतून पसरल्याचे दाखले आहेत. स्वतःच्या अस्तित्वासाठी विषाणू नेहमीच परिस्थितीशी लढा देतात. जसे इतर सजीव. एबोलाच्या प्रत्येक रचनेत नवा बदल आढळल्याने नेहमी त्याचे नवे नामकरण झाले आहे. तो स्वतःला बदलत आहे हे त्यामुळे सिद्ध होतेच. हा विषाणू किती प्रगत झाला आहे ते कळेलच. तो हवेतून पसरण्याइतपत हुशार झाला असेल तर मग या पृथ्वीला जलप्रलयापर्यंत थांबण्याची गरज नाही." बोलता-बोलता स्कॉट थांबल्या. आपली विनोदाची वेळ चुकलीय हे त्यांच्या उशीरा लक्षात आलं.
"याचा वेग किती आहे ? " डॉ. अन्सारीनी विचारले.
"३-२१ दिवस हा त्याच्या संसर्गाचा वेळ आहे. रक्ताच्या प्रत्यक्ष संबधात हाच कालावधी ५-६ दिवस असतो. इथे आलेले हे ह्युमन बाँब तसेच आहेत ."
"ओ.के. यु लुक आफ्टर द वायरस एन्ड आय विल फाइंड दोज हॅकर्स." मल्होत्रांनी चार्ज डॉ. अवस्थींकडे दिला आणि ते बाहेर पडले.

१८ मार्च २०१५
व्ही. एन. देसाई शासकीय रुग्णालय, सांताक्रुझ, मुंबई, भारत
दुपारी २ वाजून १३ मिनिटांनी
मेन गेट

टॅक्सी गेटजवळ थांबली आणि दोघेजण खाली उतरले. त्यांनी आतून एका बाईला बाहेर काढलं. ती संपुर्ण रक्ताने माखलेली होती. त्यांचेही हात रक्ताने लडबडले होते. ते तिला घेऊन गेटच्या आत शिरले. एकजण स्ट्रेचरसाठी ओरडला आणि दुसरा फॉर्म भरायला धावला. तिसरा तोवर टॅक्सीवाल्याचे पैसे चुकते करून आत शिरला. ती बाई आता हातपाय झाडायला लागली होती. बाहेर उभ्या टॅक्सीवाल्याने पैसे देऊन आत पळालेल्या माणसाच्या आईबहिणीचा उद्धार केला. नोट खिशात टाकताना त्याला नोटेवरचे रक्त दिसले. त्याने ते बोटाने पुसून टाकले आणि मागच्या रक्ताळलेल्या सीटकडे पाहीलं. पुन्हा जबरदस्तीने त्याच्या टॅक्सीत बसलेल्यांच्या पिढ्यांचा उद्धार करत त्याने डॅशबोर्डवरचा फडका उचलला आणि तो पाठच्या सीटकडे वळला. आतल्या माणसाने दुसर्‍याकडून फॉर्म भरायला पेन मागितले. त्या रक्ताळलेल्या हातात पेन देताना दुसरा माणसाने चेहरा कसानुसा केला. कदाचित तो शाकाहारी असावा. फॉर्म भरण्यापुर्वी त्याने रक्ताळलेले हात शर्टाला पुसले. तरी फॉर्मला रक्त लागलच. तो आता घाईघाईने फॉर्म भरत होता. तेव्हा दुसरा स्ट्रेचरसाठी धावत होता. गर्दीत तो किती जणांवर आदळतोय हे त्यालाही कळत नव्हत. बघ्यांची गर्दी वाढत होती. गोंधळ वाढायला लागला तसा एक हवालदार पुढे सरकला. त्या बाईशेजारी असलेल्या माणसाजवळ बसला. मागून धक्क बसताच एकाचा तोल गेला आणि तो तिच्या अंगावर पडणार तोच हवालदाराने त्याला सावरलं. मग हातातला दांडा फिरवायला सुरुवात केली तशी थोडी पांगापांग झाली पण ती तात्पुरतीच. त्या बाईचं हातपाय झाडणं वाढायला लागलं. रक्ताचं थारोळं जमा होऊ लागलं आणि गर्दीचे डोळे विस्फरायला लागले.

१८ मार्च २०१५
रॉ, लोधी रोड, नवी दिल्ली, भारत
दुपारी चार वाजून ५७ मिनिटांनी
मल्होत्रांची कॅबिन

"नो आदर वे सर. मानता हूँ के लोग डर जायेंगे... भगदड मचेगी. लेकीन बात दबायेंगे तो खतरा बढ जायेगा. फॉर पब्लिक एन गवर्मेंट अल्सो. दे प्लान्ट इट इन मेट्रो स्लम एरियाज. सांताक्रुझ, मुंबई की वो औरत दो दिन पहले समझोता एक्सप्रेससे आई थी | वो शायद उनमेसे एक नही है| पर उसे इस्तेमाल किया गया है और ऐसे 'इंजेक्टेड' कितने होंगे... पता नही. एक्सप्रेस बंद करनी होगी. वायरस जितना फैलेगा खतरा उतना ज्यादा है | मै पीएमओसे बात करता हूँ |"
"मिडिया जान ले लेगी." आरोग्यमंत्र्यांना कळत होत पण वळत नव्हतं.
"बट वी हॅव टू डू इट. पुरा एडमिनिस्ट्रेशन, टिव्ही, रेडीओ, मोबाईल्स, इंटरनेट.... सब युज करेंगे | फैलाव रोकना जरुरी है | सीडीसीने डेव्हलप किया हुवा वॅक्सिन ज्यादा मात्रामे नही है | इनफेक्टेड बंदेको शुरुमे देंगे तो फर्क पडेगा. सो प्लीज डिक्लेर. डॉ. रॉय विल अ‍ॅन्सर रिपोर्टर्स ऑन युवर बिहाल्फ." मल्होत्रा कळकळीने सांगत होते.
"ठिक है |" आरोग्यमंत्र्यांनी शेवटी होकार दिला व मल्होत्राने फोन ठेवताच पुन्हा रिंग वाजली.
"यस ? "
"सर, कॉल फ्रॉम पी.एम.ओ."

१८ मार्च २०१५
न्युयॉर्क, अमेरिका
सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांनी
गोल्डफार्मा ऑफिस

"डेरिक, आपलं वॅक्सीन बाजारात दाखल व्हायला तयार आहे. तू सगळं नीट सेट केल आहेस ना ? "
"हो. माझं सीडीसीमध्ये बोलणं झालय आणि usamriid मध्ये देखील. एफडीएने खात्री पटवली आहेच. बाकी तू नीट सांभाळशील याची मला खात्री आहेच."
"ते आहेच म्हणा. गोल्डफार्मा एबोलावर काम करत आहे हे मी सायन्स मॅगझिन्समध्ये अधूनमधून देत होतोच. फक्त आम्ही आजपर्यंत केलेली प्रगती जाहीर केली नव्हती. "
"तेवढं गुपित तर बाळगायलाच हवं. ऐक. परिषद ठिक साडे दहा वाजता चालू होईल. "
" मी तयार आहे."
"गुड एडी. रॉक द वर्ल्ड."

१८ मार्च २०१५
गोळीबार झोपडपट्टी, सांताक्रुझ-खारच्या दरम्यान, मुंबई, भारत
संध्याकाळी ६ वाजून ३३ मिनिटांनी
मोहम्मद करीम अब्दुल खान याच्या घरी

"कुछ पता चला ? " नफीसाने किचनमधूनच विचारलं.
"नै अभी. फोनीच नै लगा. अन्वरको बोला था. उसका का भी फोन नै आया." समोरचा रिमोट उचलून त्याने टिव्ही लावला. "चाय है के नै ? "
"बचा है थोडा. आधा कप. लाती हूँ |" तिने पॅन खाली उतरवून चहाचं भांड गॅसवर ठेवलं. अब्दुल खानने जमिनीवर बसकण मारली आणि तो मागच्या गोदरेजच्या कपाटाला रेलला. दोनचार चॅनल सर्फ केले आणि न्युजचॅनलवर आला. प्रत्येक चॅनवलवर गदारोळ दिसत होता. खान किंचित गोंधळला. त्याने आवाज वाढवला.
"ये अलग किस्म का हमला है | ये हमलावर अपने शरीरमे इस भयानक रोग को लेकर हमारे बीच घुम रहे है | अबतक दस लोगोंका पता लग चुका है | ये ज्यादा भी हो सकते है | यह रोग खूनसे फैलता है | अगर कोई खूनकी उलटी करता हो या किसीके शरीरके अंगोसे खून निकलता हो, तो उनसे दूर रहे और नजदिकी अस्पताल या पुलिसस्टेशनमे इतल्ला करे | "
"या अल्ला...अनवर... " खान थरारला आणि तेव्हाच नफिसा बाहेर आली.
"क्या हुवा ? "
"मै अस्पताल जाता हुँ |" खानने तातडीने कपाटाच्या हॅडलला अडकवलेला शर्ट काढला आणि शर्ट घालत तो बाहेरच्या दिशेने गेला.
"क्या हुवा... बताओ तो सही... सुनो... " खान मात्र वळला नाही पण तिच्या अशा दारातून हाका देण्याने समोरचा नईम तिच्या दिशेने आला.
"क्या हुवा आपा ? "
"पता नै | दोपरको फातिमाबी को अन्वर और उसके दोस्त अस्पाताल ले गए, तबसे उसका फोन नै आया. ये अब टिव्ही देखने बैठे थे, अचानक अस्पताल निकल पडे |"
"टिव्हीपे कुछ दिखा रहे है क्या ? " नईमसोबत आता आणखीन चार जण आत वाकले.
"ये रोग जानलेवा है | इससे दुर रहनेमे ही भलाई है | ....." रॉय त्यांच्या बंगाली उच्चारातील हिंदीत एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देत होते. पत्रकार परिषदेतला गोंधळ वाढत चालला होता. त्या सगळ्यांना आता आकडे हवे होते. मेलेल्यांचे, सावजांचे आणि मरणपंथाला लागलेल्यांचे.... बातमीत आकडेवारीला फार महत्त्व असते.

१८ मार्च २०१५
न्युयॉर्क, अमेरिका
सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी
गोल्डफार्मा पत्रकार परिषदेत

"गोल्डफार्माने या प्राणघातक रोगाची निवड केली ती मानवजातीच्या कल्याणासाठीच. सीडीसी आणि usamriid त्यांच्यापरिने यावर काम करताहेत याची आम्हाला कल्पना होतीच. आम्ही त्यांच्यापेक्षा वेगळी वाट निवडून आमच्या ध्येयापर्यंत पोहोचलो. यासाठी मी डॉ. मॉरिस इवू आणि Iowa स्टेट युनिवर्सिटीचे प्रोफेसर गया अमरसिंधे यांचे जाहीर आभार मानतो. त्यांच्या संशोधनामुळे आम्हाला एक नवी दिशा सापडली. एबोला आमच्या संशोधनाचा विषय आहेत हे आम्ही वेळोवेळी सांगितलं आहेच. आमचं हे वॅक्सीन एबोलावर प्रचंड परिणामकारक आहे हे लवकरच तुम्ही पहाल. उंदराशिवाय आम्ही माकडांवर पण याचा प्रयोग केला आहे. प्राणीमित्र संघटना यामुळे नाराज होतील याची कल्पना आहे. पण मानवजातीच्या कल्याणासाठीच हे पाऊल उचलण्यात आले आहे हे तुम्हाला पटेल याची आम्हाला खात्री आहे. एबोलाची लागण झालेल्या व्यक्तीला तीन दिवसाच्या आत हे वॅक्सीन देण्यात आलं तर तो संपुर्ण बरा होऊ शकतो याची मी हमी देतो." एडवर्डने श्वास घेतला. सारख्या चमकणार्‍या फ्लॅशचा त्याला त्रास होत होता.

"तुमच्या मनातल्या अनेक शंकाना उत्तर द्यायला डॉ. लुंगा मापुकाटा इथे हजर आहेत. सो प्लीज गो अहेड." एडवर्डने चार्ज डॉ. लुंगांकडे दिला. ते उठून उभे राहीले.

१८ मार्च २०१५
मंत्रालय, मुंबई, भारत
संध्याकाळी ७ वाजून २३ मिनिटांनी
आरोग्यमंत्र्याची कॅबिन

"शक्यता आहे. पण कधीपर्यंत ? " पीएने घाईत विचारलं.
"उद्याच. शक्य तेवढ्या लवकर."
"ठिक आहे. मी साहेबांना सांगतो."

१८ मार्च २०१५
स्पेशल वॉर्ड, राजीव गांधी मेमोरियल हॉस्पिटल, अंधरी, मुंबई, भारत
संध्याकाळी ७ वाजुन २४ मिनिटांनी
डिनच्या ऑफिसबाहेर

"२४ तास उलटलेत. या अंगावरच्या कपड्यांना वास येऊ लागलाय आता." अजय राऊत आता प्रचंड वैतागला होता. त्याच्या मोबईलची बॅटरी संपत आली होती. त्याचा घरच्यांशी असलेला संपर्क संपुष्टात येत होता. हॉस्पिटलमध्ये असलेल्या चार्जर फॅसिलिटी त्याच्या मोबाईलचा चार्जर उपलब्ध नव्हता. शक्यताही नव्हती. ते मॉडल त्याने दोन दिवसापुर्वीच सिंगापूरहून आणलेलं.
"हे बघा राऊत, ही नॅशनल इमर्जन्सी आहे. इथे तुम्हाला हौस म्हणून अडवण्यात आलेलं नाही. तुमच्या रक्ताची तपासणी होताच तुम्हाला बाहेर पाठवलं जाईल. तुमच्या जीवाची तुम्हाला नसली तरी आम्हाला काळजी आहे." डॉ. जोशींच्या आवाजाचा स्तर वाढला.
"कधी होणार ते ? किती ताटकळायचं ?" राऊतचा वैताग वरचढ होता.
"राऊत, त्रागा केल्याने प्रश्न सुटणार नाहीत. सहकार्य करा. हा रोग आमच्यासाठी सर्वस्वी नवीन आहे. तुमच्यासारख्या जबाबदार पत्रकाराने यावेळेस बाईटच्या भानगडीत न पडता आमच्यासोबत खांदा भिडवून काम करायला हवय." जोशींनी जवळजवळ खडसावलच. राऊत गप्प झाला. जोशी नाडकर्णीकडे वळले.
"नाडकर्णी तुम्ही स्वतःपासून सुरुवात करा. अहमदला तुमच्या सोबत घ्या. मला त्याची जास्त काळजी वाटतेय. ज्यांना लागण झाल्याची शक्यता आहे, त्यांना रेस्टरुममध्ये जमा करा. " नाडकर्णी मान हलवून रेस्टरुमकडे वळले. जोशी इतर स्टाफला भराभर सुचना देत होते. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर भयाची रेषा होती. ज्यांनी पाहीलं होत त्यांच्याही आणि ज्यांनी फक्त ऐकलं होतं त्यांच्याही.
"मी काय केलं तर मदत होईल ? "त्या प्रश्नावर जोशी वळले. समोर राऊत होता. तो मनापासून बोलतोय हे जाणवताच त्यांना बर वाटलं.

१८ मार्च २०१५
रॉ, लोधी रोड, नवी दिल्ली, भारत
संध्याकाळी सात वाजून २५ मिनिटांनी
मल्होत्रांची कॅबिन

"सर, चारो दुबईसे थे | इंटरपोल लोकेटींग देअर दुबई कॉन्टॅक्टस. वी हॅव टू सेंड अ टिम टू दुबई फर्स्ट. सिक्स केम वाय समझोता एक्सप्रेस. अ‍ॅज युज्वल पाकीस्तान रेज देअर हँडस. समझोता विल बी ऑफ द ट्रॅक सुन." अवतारने रिपोर्ट दिला.
"अवतार, इंटरपोलको लगता है के यह २०१० के जोहानेसबर्गकी चोरीसे रिलेटेड है | मैने रिपोर्ट मंगाई है, शायद उससे कुछ मिल जाए |"
"उनका कोई बंदा होगा शहरमे ? "
"शायद नही. फिरभी लोकल सोर्सेस काम पर लग जाने दो | शायद कोई सुराग मिल जाए|"

१८ मार्चे २०१५
महाराष्ट्र, भारत
संध्याकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी
मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान

"आणिबाणीची परिस्थिती आहे. हाताबाहेर गेली अस म्हणता येणार नाही. पण ही वेळ आता एकत्रित येऊन लढण्याची आहे. इथे उपस्थित प्रत्येकाकडून मी या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मदतीचे अपेक्षा बाळगतो." मुख्यमंत्र्यांनी प्रास्ताविक करून मुद्द्याला हात घातला.
"जनता टिकली तरच नेता टिकेल एवढं कळत आम्हाला. काय निर्देश आहेत तेवढं कळलं तर पुढचं पाऊल उचलता येईल." विरोधी पक्षाने सहकार्याचा हात पुढे केला.
"एक महत्त्वाची घोषणा. 'गोल्डफार्मा' या अमेरिकन कंपनीकडे यावर उपाय आहे. त्यांच्याकडून वॅक्सीनचा पुरेसा साठा मिळू शकतो. आपण तातडीने केंद्राकडे संपर्क साधायला हवा. कोटेशन दोन मिनिटात आपल्यापर्यंत पोहोचेल."आरोग्यमंत्यांनी त्यांच्या संभाषणात व्यत्यय आणला.
"दुसरा एखादा पर्याय ?" विरोधी पक्ष नेत्यांनी सवयीने विचारलं.
"सध्यातरी नाही. जगभरातल्या संस्थांकडे निरोप पाठवलेत. BDCP (Bioresources Development and Conservation Programm) च्या डॉ. मॉरिस इवू यांनी त्यांच्याकडच्या वॅक्सीनचा साठा पाठवण्याचे कबूल केलय. ते थोड्याफार प्रमाणात रोगाला अटकाव करते. बाकी कुणाकडे प्रभावी औषध नाही."
"मला वाटते जे आहे तेच स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही." इति मुख्यमंत्री.
"मला २००९ स्वाईन फ्लुच्या हल्ल्याची आठवण होतेय."
"तो हल्ला नव्हता."
"अस कसं म्हणू शकता ? ब़ळींची संख्या आठवतेय का तुम्हाला ? ती सुरुवात होती व त्याच्याकडे आपण लक्ष दिलं नाही."
"तो वाद आता काढायलाच हवा का ? "

संध्याकाळी ८ वाजून १३ मिनिटांनी
निवासस्थानाबाहेर

"अचूक वेळ आहे. ही संधी हातून जाता कामा नये. सगळ्या कार्यकर्त्यांना कामाला लावा. ठिकठिकाणी पक्षाचे बॅनर आणि निशाणी दिसली पाहीजे. आपण खुप काही करतोय हे ठसवणं गरजेचे आहे. मुदतपुर्व निवडणूकांची आता शक्यता आहे. त्याचा विचार करायलाच हवा. पुन्हा हा मुख्यमंत्री होणे नाही."
"पण साहेब, रोग धोकादायक आहे. यात कार्यकर्त्यांचा जीव जाऊ शकतो."
"तुम्ही ते ऐकलत नाही काय ? लाख मेले तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नये. राजकारणात बळी द्यायचे असतात त्याशिवाय सत्तेची देवी प्रसन्न होत नाही. आणखी एक, ज्या ठिकाणी रोगी नाहीत अशा हॉस्पिटल्सची नावे शोधा. आपल्याला काही भेटी द्याव्या लागतील. प्रेसवाले भेटतील का कुणी आता ? "

१८ मार्च २०१५
हॉस्पिटल्स, भारत
रात्री १० वाजून ११ मिनिटांनी
हॉस्पिटल्सच्या आत आणि बाहेर

पोलिसांनी संपुर्ण वेढा घातला होता. कोणी बाहेर जाऊ नये याची पुर्ण खबरदारी घेतली जात होती. बाहेर जमाव वाढत होता. ते आत जाऊ पहात होते. नातेवाईक, पत्रकार, चॅनेलवाले, राजकीय नेते, समर्थक, सामाजिक कार्यकर्ते,बघे आणि जमलेल्या गर्दीला खानपानाची सेवा सुविधा पुरवणारे स्वयंसेवक.... भर वाढत होती. गर्दीची सायकोलॉजी अजब असते. त्यांचा शासकीय यंत्रणेवर विश्वास नसतोच. धोका आहे सांगितलं तरी धोका कसला आहे ते पहायला थांबतात. खुट्ट झालं की पळतात आणि पुन्हा मग मधमाश्यांच्या थव्यासारख्या तिथेच परततात.
आत परिस्थिती ठिक म्हणावी अशी नव्हतीच. प्रत्येकजण बाहेर जाण्यासाठी धडपडत होता. सुरक्षारक्षकांशी बाचाबाची, हाणामारी चालू होतीच.
"मरणारच असेन तर मला माझ्या माणसांसोबत राहून मरू दे."
"पण तेही तुमच्यासोबत मरतील त्याच काय ? "
"मी मेल्यावर त्यांना पोसणार तरी कोण ? माझ्यासोबत गेलेलेच बरे."
असले युक्तीवाद कुठे ना कुठे चालू होतेच. परिस्थिती आटोक्यात येत नव्हती. शेवटी लष्काराला पाचारण करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं हे प्रशासनाला कळून चुकलं.
रोग्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना आवाहन करून हॉस्पिटल्समध्ये बोलावले जात होते. तेवढ्यापुरताच दरवाजा उघडत असे. त्यातही कोणी बाहेर तर कोणी आत जाण्याचा प्रयास करत होता. सुरक्षारक्षकाची धावपळ होत होती. लाठीमाराचा नाईलाज होता. मोबाईलवरून संवादांची देवाणघेवाण चालू असूनही डोळ्याने आपल्या माणसाला पाहण्याची ओढ होती. हॉस्पिटल प्रशासन स्पीकरवरून आत-बाहेरच्या लोकांची नावे जाहीर करत होते.
वैद्यकिय यंत्रणेने सर्वात आधी 'स्लॅमर' उभारून रोग्यांशी संबंध आलेल्या प्रत्येकाला वेगवेगळ्या 'स्लॅमर'मध्ये हलवले. त्यांच्या रक्ताची आधी तपासणी करण्यात येत होती. संपुर्ण हॉस्पिटलमधील लोकांची तपासणी करता येईल एवढी यंत्रणा हाताशी नव्हतीच. रक्त बाहेरच्या लॅबमध्ये पाठवणेही धोक्याचे होते. त्यातल्या त्यात ज्यांचा दुरान्वये संबंध आला नव्हता अशा लोकांना वेगळ्या मजल्यांवर हलवण्यात आलं होतं. इतर कारणांमुळे ज्यांची परिस्थिती जास्त वाईट होती त्यांना दुसर्‍या हॉस्पिटल्समध्ये हलवण्यात येत होतं. हॉस्पिटल्समध्ये अंतराळ पोषाख घातलेले डॉक्टर्स फिरत होते. ते दिसायला विचित्र दिसलं तरी सगळ्यांच्या ओठावरचं हसू केव्हाच पळालं होतं. प्रशासनाच्या कामात कधी नव्हे तो वेग होता. नेहमीसारखा ढिसाळपणा नव्हताच. तेवढा वेळ हाताशी नव्हताच म्हणा. आता आपल्याकडे फक्त पाच-सहा दिवसच आहेत असा हॉस्पिटलमधल्या प्रत्येकाला संशय होता.

१८ मार्चे २०१५
होडेडाह, येमेन
संध्याकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी
एका आडबाजूच्या खोलीत

त्याचे सुरमा घातलेले डोळे काहीतरी वेगळच सांगत होते आणि तो काहीतरी वेगळच बोलत होता. नझीरला ते बिलकुल पटत नव्हतं.
"प्रिन्सला पटणार नाही." नझीरच्या बोलण्यात येमेनी अरॅबिक झाक होतीच.
"त्याने मला फरक पडत नाही. ठरल्याप्रमाणे काम झालं आहे ना ? "
"हो. मी स्वतः तिथे होतो. सगळं काही प्लानप्रमाणे झालं आहे. आता प्रिन्सच्या म्हणण्याप्रमाणे वागायला हरकत नाही."
"नझीर, माझी ६ माणसं मी यात गमावली आहेत. आधीच मला मोबदला हवा तसा मिळालेला नाही."
"तो मिळेल. मी बशीरशी बोललोय. तू पैशाच्या गोष्टी करतोयस याचं मला आश्चर्य वाटते."
"मला तुझ्या या वाक्याच आश्चर्य वाटतेय. मी तुम्ही दिलेलं कॉन्ट्रेक्ट ठरल्याप्रमाणे पार पाडलय."
"हा जिहाद आहे."
"तुमच्यासाठी असेल. माझ्यासाठी नाही. जेहादींकडून ठरलेलं काम करून घेणं हा माझा व्यवसाय आहे आणि व्यवसायात मी धर्माला स्थान देत नाही."
"मला वाटल तू सर्वशक्तीमान अल्लाच्या शिकवणीप्रमाणे चालला आहेस. माझाच गैरसमज झाला असेल. बशीरला सांगून मी व्यवस्था करतो." नझीरने फोन लावला. त्या दोघांच बोलणं चालू असताना सुरमेवाला त्या जुनाट खोलीतलं जुजबी फर्निचर न्याहाळत बसला. अधुनमधुन तो नझीरवर नजर टाकत होता. फोन खिशात टाकून नझीर त्याच्याकडे वळला.
"बशीर तुझा मोबदला उद्यापर्यंत पोहचवेल."
"निघतो." सुरमेवाला त्याच्या होकाराची वाट न पहाता दाराकडे वळला. जिन्यात तसा अंधारच होता. पण त्याला उतरताना त्रास झाला नाही. थोड्याच वेळात तो मुक्कालाच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यावर होता.

१८ मार्च २०१५
सॅनड्रिंगहॅम, जोहानेसबर्ग, दक्षिण आफ्रिका
संध्याकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी
जेकब बार

हातातला भरलेला ग्लास टेबलावर ठेवून पॅट्रिकने नजर स्क्रीनवर टाकली. चॅनलवर ब्रेकींग न्युज होती. 'एबोला' ऐकताच तो सावरून बसला. क्षणार्धात पाच वर्षापुर्वी घडलेल्या घटना त्याच्या डोळ्यासमोर तरळून गेल्या. एन्.एच.एल.एस. मध्ये झालेली चोरी, घाबरलेला बॅरी, भ्रमिष्टावस्थेतला सॅगी, एस.ए.एस.एस. मधून झालेलं निलंबन, ते मानहानीचे दिवस, पुन्हा मिळालेला चार्ज, मकाबा आणि रॅम्पोटाची प्रेते, सॅगीचा अपघात आणि त्याचं तो अर्धवट जळालेला देह, त्यानंतर घर सोडून निघून गेलेली सॅगीची पत्नी नेली आणि मुलगी सिल्विया.... या सगळ्याचा त्याच्याशी संबंध असावा हे त्याच्या मनात आलं. ती चोरी आपण टाळू शकलो नाही हे त्याला प्रकर्षाने जाणवलं. पुन्हा जुनं शल्य वर उसळून आलं. त्याने समोरचा ग्लास उचलून एका दमात रिकामा केला.

१८ मार्च २०१५
कर्नल अमानुल्ला रोड, इस्लामाबाद, पाकीस्तान
रात्री ९ वाजून ५५ मिनिटांनी
आर्मी क्लब

"फक्त चारजण पाठवायचं ठरलं होतं ना ? "
"मला वाटतं जे काही झालय ते तुमच्या पत्थ्यावरच पडणारं आहे."
"तरीसुद्धा जे ठरलं त्यात माझ्या परवानगीशिवाय बदल झालेच कसे ?"
"परवानगी ? त्याचा प्रश्न येत नाही. तुमचं काम फक्त फायनान्स करायचं होतं हे विसरलात का ?"
"मला वाटतं आता ती अपेक्षा तुम्ही न बाळगलेलीच बरी. या नाट्याचा सुत्रधार मी होतो आणि ते माझ्या सुचनेप्रमाणेच व्हायला हवं होत." पलिकडून फोन ठेवण्यात आला. दोन क्षण त्याने कट झालेल्या फोनकडे पाहीलं. मग खांदे उचकावून त्याने फोन ठेवला आणि.तो समोरच्या माणसाकडे वळला.

"काय झाल ? "
"विशेष नाही, मेजर. जमालचं काय बिनसलय ?"
"त्याचा तो सुरमेवाला पैशासाठी रडतोय. बशीर त्याची काळजी घेईल."
"आणि जमालचं काय ?"
"त्याची सध्यातरी गरज आहे."
"ठिक आहे. अजून किती जण तयार आहेत म्हणालाय तो ?"
"९ जण."
"पुरेसे आहेत. आता काही दिवस तू सुट्टीवर जायला हरकत नाही. "
"थँक्स. " अभिवादन करून मेजर बाहेर पडला. तोच त्याचा फोन वाजला. फोनवर जमाल होता. मेजरने फोन घेतला.
" हं बोल. प्रिंस बोलतोय."

१९ मार्च २०१५
मुक्काला समुद्रकिनारा, येमेन
रात्री १२ वाजून १० मिनिटांनी
कॉटेज

"तिघेही आत आहेत ?" बशीरने पुन्हा विचारलं. सुरमेवाल्याच्या बाबतीत त्याला कोणताही धोका पत्करायचा नव्हता.
"हो."
"ठिक आहे. दाब तो स्विच." दुसर्‍याने हातातला रिमोट दाबला. त्याबरोबर पाचशे मीटर अंतरावरच्या त्या कॉटेजच्या चिरफळ्या उडाल्या. वातावरणात चोहीकडे फक्त धुर, धुरळा आणि आगीचे लोळ होते.

१९ मार्च २०१५
हेसारक मेडीकल हेल्प, अफगाणिस्तान
पहाटे १ वाजून ४० मिनिटांनी
तळघर

"सॅगी, तुझ्यामुळे हे शक्य झालं. याबद्दल तुझे खरेच आभार मानायला हवेत. डॉ. गाझीच्या अकस्मात मृत्युनंतर मला वाटल होतं की ह्या प्रोजेक्टची वाताहात होणार. अल्ला गाझीच्या आत्म्याला सदगती देवो. पण तुझ्या सहकार्यामुळे सगळं नीट जुळून आलं. हे काम संपल की तुझी गरज लागणार नाही असं वाटलं होतं खर, पण तुझ्या दुर्दैवाने तसं झाल नाही. नव्या कामाचं कॉन्ट्रेक्ट मिळण्याची शक्यता आहे." जमालने समोरचा टिव्ही बंद करत म्हटलं.
"माझी बायको व मुलगी कसे आहेत ? मला त्यांना भेटायचं आहे." सॅगीने पडलेल्या चेहर्‍याने विचारलं.
"ते व्यवस्थित आहेत. तू नेहमी आमच्यावर अविश्वास का दाखवतोस ? त्यांना काय झाल तर तू आमचं काम करणार नाहीस याची खात्री आहे आम्हाला. हे बघ, नवीन काम सुरु करण्यापुर्वी तू काही दिवस तुझ्या कुटुंबाबरोबर घालवशील याची मी हमी देतो. खर सांगतोय मी. कधी तरी चेहरा हसरा ठेवत जा." जमालने त्याच्या गालावर टिचकी मारली आणि तो बाहेरच्या दिशेने निघून गेला. सॅगी रॉडिटीने त्या बंद झालेल्या दाराकडे पाहीलं आणि गुडघ्यात मान खुपसून रडू लागला.

********************साडे पाच वर्षापुर्वी ***********************

९ ऑक्टोबर २००९
न्युयॉर्क, अमेरिका
सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी
मि. ब्राऊन यांची स्टडी रुम

२००८ च्या मंदीत 'कॉमटेक' हादरली होती. ब्राऊनना हा पहिलाच धक्का होता. ' गोल्डनेट ' ने जेव्हा मिडिया आणि कम्युनिकेशनच्या क्षेत्रात झेंडा गाडला तेव्हाच ते बिल गेटसची बरोबरी करतील अशी 'फॉर्ब्स' ने शक्यता दर्शवली होती. 'बिल गेटस सारख्या हॅकरशी माझी तुलना नको' हे त्यांनी तेव्हा ढासून सांगितलं होतं. 'कॉमटेक' हा मायक्रसोफ्टसाठी धोका ठरेल असा विश्वास मायक्रोसॉफ्टचे अधिकारीही खाजगीत व्यक्त करत. पण आर्थिक मंदीने अमेरिकेची कंबर मोडली आणि सगळच चित्र पालटलं. खरतरं ब्राऊन यांच्या इतर उद्योगाच्या मानाने कॉमटेक एक छोटी बाब होती. पण प्रश्न व्यवसायातल्या नफानुकसानीचा नव्हता. तर हारजीतचा होता. पहिल्या दहाच्या यादीत हे अपयश बिब्बा घालत होते.

कॉफीचा मग घेऊन ब्राऊन खिडकीकडे वळले. मागे चाहूल जाणवताच ते वळले. एडवर्ड तिथे आला होता. एडवर्ड म्हणजे त्यांचे नाक, कान आणि डोळे.' नफ्यातला व्यापार कसा करावा' या विषयात मुरलेला मुरब्बी. पण मंदीने त्यालाही स्वतःवरचा विश्वास डळमळीत करायला भाग पाडलं होतं.

"मला वाटतं कॉमटेक चालू ठेवण्यात काही अर्थ नाही."
"ठिक आहे. पण कामगारांचा प्रश्न उपस्थित होणार नाही ना ?"
"नाही. मी ते पहातो काय करायचय ते ? तुम्ही राजकारणात जाणार नाही ना ?" मि. ब्राऊनने नकारार्थी मान डोलावली.
"मग हरकत नाही. नाहीतर जनमानसात तुमची प्रतिमा उगाच कामगारांचा कर्दनकाळ अशी व्हायची." मि. ब्राऊनने त्याच्याकडे पाहीलं. एडवर्डच्या हसण्यातून त्यांना जाणवलं की तो नुकताच सेनेटर डेरिकला भेटून आलाय.
"काय म्हणतोय डेरिक ?"
"बरच काही. त्याला अपेक्षा होत्या पार्टीकडून. पण ओबामा मधे आले. शांततेचं नोबल जाहीर होणार आहे ओबामांना."
"डेरिकला काय हवय ? "
"त्याची नजर प्रेसिडंटच्या खुर्चीवर आहे. त्याला आर्थिक मदत हवीय. त्याबदल्यात फार्मा बिझनेससाठी सवलती मिळवू़न देईन म्हणतोय. कल्पना चांगली आहे. ह्या धंद्याला मरण नाही कारण जगण्याची धडपड प्रत्येकजण शेवटच्या श्वासापर्यंत करतोच." एडवर्डने ब्राऊनकडे पाहीलं. ते किंचीत विचारात पडलेले वाटले.
"आयटीपेक्षा हे चांगलच. डन. " ब्राऊनने होकार दिला. "तू ते सगळं पाहशीलच." एडवर्डने मान डोलावली. "मग कशावर काम करणार आहात ? एडस ? "
"नाही. त्यात दम नाही. त्याची बरीच जनजागृती झाली आहे. "
"मग ? "
"एबोला"
"हा काय प्रकार आहे ? "
"आफ्रिकेच्या जंगलातला डेडली वायरस. दोन दिवसापुर्वीच सुदान आर्मीमध्ये २३ जण शिकार झालेत. २० पुरुष व ३ बायका. बरेच इन्फेक्टेड आहेत. महत्त्वाचं म्हणजे याच्यावर अजून इलाज उपलब्ध नाही."
"आफ्रिका कंगाल आहे एडी."
"खरय. पण जग झपाट्याने जवळ येतय. २४ तासाच्या विमानप्रवासातदेखील जगतो हा वायरस. कुठेही पसरू शकतो. भविष्यात तो काय करेल याचा नेम नाही."
"तुला खात्री आहे ? "
"हो."
"ठिक आहे. मला माझ्या गुंतवणुकीला लवकर फळं आलेली आवडतात. तुला तर माहीत आहेच ते."
"मलाही. आपली आवड सारखी आहे."

क्रमशः

शेवट - http://www.maayboli.com/node/13826

संदर्भ :-
** - हा भाग एबोलावर आधारित रिचर्ड प्रेस्टन लिखित व डॉ. प्रमोद जोगळेकर अनुवादीत 'द हॉट झोन' या कादंबरीतून नेटवर मिळालेल्या माहीतीसह सरमिसळ करून लिहिण्यात आला असला तरी संपुर्ण श्रेय कादंबरीलाच आहे.
पीएमओ - प्राईम मिनिस्टर ऑफिस
डॉ. मॉरिस इवू - BDCP चे हेड ज्यांच्या रिसर्च टिमने गार्सिनिया कोला या आफ्रिकेत खाल्ल्या जाणार्‍या वनस्पतीवर संशोधन करून त्यातले घटक एबोलावर परिणामकारक असल्याचे सिद्ध केले.
Iowa स्टेट युनिवर्सिटीचे प्रोफेसर गया अमरसिंधे - बायोकेमिस्ट्री, बायोफिजिक्स आणि मोलेक्युलर बायोलॉजीचे युनिवर्सिटीतील सहप्राध्यापक. VP35 नामक एबोलाच्या प्रथिनांच्या रचनेचा शोध लावल्यानंतर ती प्रथिने रक्तातल्या पेशीवर हल्ला करून त्यांचा नाश कसा करतात याचा शोधही त्यांच्याच रिसर्च टिमने लावला.
स्लॅमर - USAMRIID's Medical Containment Suite, informally known as "the slammer", was originally created to isolate and care for personnel who had a potential exposure in a maximum containment, or Biosafety Level 4, laboratory (एबोला हा जैविक सुरक्षा प्रणाली ४ च्या वर्गवारीत मोडतो. ही सुरक्षेची शेवटची कडेकोट पायरी. याचा संपुर्ण तपशील ' द हॉट झोन' मध्ये आहे.)

मागील भागातील संदर्भ पुन्हा दिले नाहीत. पुन्हा क्रमश: केल्याबद्दल माबोकरांकडे दिलगिरी व्यक्त करण्याखेरीज पर्याय नाही. क्षमा असावी. चुका नक्की सांगाव्या. शेवटचा भाग लवकरच पोस्टण्याचा प्रयत्न करेन.

गुलमोहर: 

अरे बाबा सम्पव ना लवकर.
आता वाट नाहि बघायला होत आहे.
प्लिझ प्लिझ लवकर पुर्ण करा कथा.
बाकि कथा एक दम झक्कास आहे. आणी फ्लोव पण सुन्दर आहे.

बाप रे...एकदम.हादरवुन टाकणारी कथा झालीये ही....एक क्षण ही हलले नाही मॉनीटर पासुन....लवकर टाका पुढचा भाग प्लीज...

छान लिहिलं आहे. दुर्दैवाने असं घडण्याची शक्यता दिवसेदिवस वाढत चाललीय त्यामुळे ही गोष्ट वाचताना एक भीतीही आहे मनात. Sad