दे कॉल मी इ. झेड

Submitted by कौतुक शिरोडकर on 24 January, 2010 - 23:42

२६ डिसेंबर २००९
लंडन, यु.के.
रात्री ८ वाजुन ३२ मिनिटांनी
अँ. एल्डरसन यांनी संपादीत केलेली बातमी, चीफ रिपोर्टर, डेली टेलिग्राफ (संक्षिप्त स्वरुपात)

रात्री साडेआठ वाजता डेल्टा एअरबस ए ३३० एम्स्टरडॅमवरून डेट्रोइटच्या प्रवासाला निघाली. एखादा फुगा फुटावा वा फटाका फुटावा तसा जोरदार आवाज कॅबिनमधून घोंगावला. काहीनी प्रकाशझोत पाहीला तर काहीना वास आला. काहींनी तर उमर फारुक अब्दुल मुतल्लब या एका बसलेल्या तरुण पुरुष प्रवाश्यातून ज्वाला निघताना पाहील्या. ते काही ठराविक प्रवासी सोडले तर आपलं आयुष्य धोक्यात आहे याची त्या अकरा 'क्रु'ना व बर्‍याचशा प्रवाशांना माहीतीही नव्हती.
एम्स्टरडॅम येथील एक व्हिडियो डायरेक्टर व प्रोड्युसर, '१९ ए' या सीटवर असलेला एक तरुण डच, जॅस्पर स्कुरिंगा याने त्या अतिरेक्यावर झडप घातली. त्याचक्षणी तो इतर प्रवाशासमोर हिरो ठरला. 'फटाक्यांचा आवाज आणि 'आग...आग' असे कोणाचे तरी ओरडणे त्याने ऐकले' असे त्याने सांगितले. जेव्हा त्याने अब्दुल मुतल्लबच्या मांडीवरील ब्लँकेटखालून धुर येताना पाहीला तेव्हा काहीतरी गडबड आहे हे त्याला जाणवले. त्याने पाहील की त्या प्रवाशाची पँट खुली होती आणि तो प्रवासी छोट्या, पांढर्‍या शॅम्पुसारख्या दिसणार्‍या एका जळत्या वस्तूला त्याच्या पायांच्यामध्ये धरून होता.
"मी ती वस्तू त्याच्याकडून खेचली आणि माझ्या हातांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि वस्तू फेकून दिली." मि. स्कुरिंगा म्हणाले. ते पुढे म्हणाले की ते पाण्यासाठी ओरडले आणि त्यांनी त्या माणसाला त्याच्या सीटमधून खेचले व खेचत विमानाच्या पुढच्या भागात आणले. अब्दुल मुतल्लबकडे आणखी विस्फोटक आहेत का, हे पहाण्यासाठी मि. स्कुरिंगा यांनी त्या हल्लेखोराचे कपडे फाडले. कोणीतरी - कदाचित कॅबिनस्टाफच्या मेंबरपैकी - बेड्या आणल्या आणि त्या डचमाणसाने, क्रु मेंबरच्या मदतीने अब्दुल मुतल्लबला जेरबंद केले.
शमा चोप्रा, एक कॅनेडीयन प्रवाशी, आठवणीने म्हणाली: ‘‘तो माणूस जळत होता आणि ज्वाळा इतक्या उंच होत्या की त्या जवळ-जवळ विमानाच्या छताला भिडत होत्या. मला वाटलं की आम्ही सगळे गेलोच." दुसर्‍या एका प्रवाशाने अब्दुलमुतल्लब याने 'अफगाणीस्तान' हा शब्द उच्चारल्याचे ऐकले, कदाचित पश्चिमी देशांनी तिथे केलेल्या दखलंदाजीच्या विरोधातील ही प्रतिक्रिया आहे असे त्याला सुचित करायचे होते.
नंतर असे कळले की अब्दुल मुतल्लब याने त्याच्या मांडीवरील लपवलेल्या एका विशिष्ट कंटेनरमध्ये असलेला द्रव पदार्थ आणि पावडर, या दोहोंच्या मिश्रणामुळे सदर स्फोट झाला. 'त्याने विमानातील एका शौचालयात सदर स्फोटक सामग्री एकत्र केली आणि स्वतःच्या सीटवर परतल्याबरोबर स्फोट घडवण्याचा प्रयत्न केला' असाही विश्वास व्यक्त करण्यात आला.
प्रवासाच्या शेवटच्या पंधरा मिनिटात अब्दुल मुतल्लबच्या हातात बेड्या घालून त्याला विमानाच्या पुढच्या भागात ठेवण्यात आले. १२ वाजून १ मिनिट या स्थानिक वेळेवर फ्लाईट २५३ सुरक्षित रित्या डेट्रोईट विमानतळावर उतरले. विमान उतरताक्षणी, गणवेशधारी पोलिस आणि विमानतळावरील सुरक्षाविभाग घटनास्थळी अवतरले. मिनिटभराने एफबीआय एजन्टस पोहोचले.
अब्दुल मुतल्लबला बेड्या घातलेल्या अवस्थेतच विमानातून उतरवण्यात आले.
*****************************************************
७ जानेवारी २०१०
वॉशिंग्टन डी.सी., अमेरिका
सकाळी ८ वाजून १९ मिनिटांनी
पॅट्रिशिया लोपेझ यांनी संपादित केलेली बातमी, असिस्टंट चीफ रिपोर्टर, वॉशिंग्टन पोस्ट.

ख्रिसमसच्या दिवशी घडलेल्या विमान अपघाताच्या पार्श्वभुमीवर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी 'दहशतवादी हल्ल्याचा विरोधात राष्ट्रसंरक्षणासाठी अजून काही पावलं उचलली जातील' असे जाहीर केले.
"आज वेगवेगळ्या विभागांकडे मी नवीन योग्य सुधारणांची जंत्रीच सादर करणार आहे." वाईट हाऊस येथे टेलिव्हिजनवरील आपल्या लाईव्ह मुलाखतीत ओबामा म्हणाले. इतर गोष्टींचा आढावा घेत असतानाच नवीन कार्यपद्धती आणि तंत्रज्ञान यातल्या गुंतवणूकीसह जगभरातील विमानतळांवरील सुरक्षाप्रणाली अधिक मजबूत करण्यासाठी अंतर्राष्ट्रीय संबंध वृद्धींगत करणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
"राष्ट्राध्यक्ष या नात्याने आपल्या देशाचे आणि लोकांचे रक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे आणि जर यंत्रणा अपयशी ठरल्यास तीही माझीच जबाबदारी आहे." ते म्हणाले.
मंगळवारी त्यांनी अनेक महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित असल्याचे सांगितले. त्यातील काही निवडक बाबी म्हणजे विमानप्रवासातील सुरक्षाप्रणाली, गुप्तहेर खात्यातील त्रुटी, दहशतवादाची टेहळणी, एंबसी व कॉन्सुलेटतर्फे होणारी 'विजा' हाताळणी वगैरे.
*****************************************************
११ जानेवारी २०१०
मुंबई, भारत
सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी
पीटीआय, महाराष्ट्र टाईम्समधील २ बातम्या

महानगरे, महत्त्वाची ठिकाणे, ऐतिहासिक वास्तू अशा टागेर्ट्सनंतर आता लष्कर ए तोयबाने भारतातलील दहा जिनियसना टागेर्ट केल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. हे दहा जिनियस म्हणजे भारताच्या अणु, संरक्षण आणि अंतराळ विषयक प्रकल्पांमध्ये संशोधन करणारे शास्त्रज्ञ असून सरकारने त्यांच्या भोवतीचे सुरक्षेचे कडे आणखीनच पोलादी केले आहे.
या शास्त्रज्ञांची नावे सर्फराझ नवाज याच्या चौकशीतून समोर आली असून त्याला लष्कर ए तोयबाच्या दक्षिण भारतातील टी. नझीर या दहशतवाद्याच्या चौकशीतून पुष्टी मिळाली आहे.
नवाझ याला मस्कतमधून हद्दपार केले होते. तर नझीर याला भारत आणि बांग्लादेश सीमेवरून पकडण्यात आले होते. बंगळुरू येथे झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये या दोघांचा हात होता.
अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या हेडली आणि राणा या दोघांनी भारतात येऊन मुंबईतील भाभा अ‍ॅटॉमिक रिसर्च सेंटर आणि काही चित्रपट स्टुडियो यांना वारंवार भेट दिली होती. या भेटीत त्यांनी बीएआरसीच्या प्रवेशद्वाराची छायाचित्रे काढल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे सरकारने येथील सुरक्षा व्यवस्था अजूनच कडक केली आहे.
********
भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा पाकिस्तानी दहशतवाद्यांचा प्रयत्न आज सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी उधळून लावला. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत जवानांनी त्यांना मागे पळवून लावलं. गेल्या आठवड्याभरातील घुसखोरीचा हा चौथा प्रयत्न आहे.
दाट धुक्याचा फायदा घेऊन भारतीय हद्दीत घुसण्याचा दहशतवाद्यांचा डाव होता. त्यासाठी त्यांनी जम्मू जिल्ह्यातल्या अखनूर विभागात अल्फा मशेल चौकीजवळ स्फोट घडवून सीमेवरचं कुंपण तोडलं. त्यांच्या हालचालींची चाहूल लागताच, सीमा सुरक्षा दलाचे जवान सावध झाले आणि काही वेळातच जोरदार चकमक सुरू झाली. जवळपास एक तास दोन्हीकडून अंदाधुंद गोळीबार सुरू होता. त्यात कुणी दहशतवादी मारला गेला नाही, परंतु या चोख प्रत्युत्तरामुळे त्यांना मागे पळावं लागलं.
दरम्यान, कुंपण तोडलं गेल्यानं आजूबाजूच्या परिसरात जवानांनी शोधमोहीम हाती घेतली आहे. याआधी ४ जानेवारी, ८ जानेवारी आणि काल वेगवेगळ्या ठिकाणांहून भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केला होता. परंतु, त्यांना भारतीय जवानांनी पळवून लावलं.
*****************************************************
२३ जानेवारी २०१०
अल मलिक अल कमिल मुहम्मद मदरसा, कैरो, इजिप्त
दुपारी १२ वाजून १८ मिनिटांनी
लिवान ( जुन्या पद्धतीने बांधलेला घुमटाकार हॉल)

"या बाजूने सर..." गाईडने त्यांना एका बर्‍याचशा पडझड झालेल्या हॉलसमोर आणले.
"अल मलिक अल अदिल यांच्या मृत्युनंतर अल मलिक अल कमिल मुहम्मद सन १२१८ मध्ये इजिप्तच्या गादीवर विराजमान झाले. त्यांनी बांधलेल्या मदरश्याचा हा हॉल." त्याने समोरच्या भागाकडे बोट दाखवलं.
"प्रिन्सच काय म्हणणं आहे बशीर ? " दोन पावल पुढे टाकून त्या चौघांमधला एक पुढे आला. गाईडने समोरच्या हॉलवरची नजर हलवली नाही.
"वर्तमानपत्र वाचता का तुम्ही ? "
"वाचतो. " मागचा एकजण बोलला. पुढे आलेला आणखी दोन पावलं हॉलच्या दिशेला टाकून बशीर गाईडकडे वळला. बशीरला त्याच्या त्या सुरमा असलेल्या डोळ्यात पहायची इच्छा नव्हती. त्याने नजर मागे वळवली.
"तुमचा घुसखोरीचा प्रयत्न यशस्वी होत नाही. पॅराग्लायडिंगच तुमचं शॉपिंग जगजाहीर झालय. विमान अपहरणाच्या योजना लोक चहाच्या घोटासोबत चघळताहेत. भरीस भर म्हणून स्वतःची कातडी वाचवायला युसुफ गिलानी आधीच तुमच्या नावाने शंख करून मोकळा झालाय." बशीर हॉलकडे सरकला आणि त्याने वळून दुरवर असलेल्या पर्यटकांकडे नजर टाकली.
"मग ?" मघासचा माणूस पुन्हा बोलला.
"गुप्तता नाही बाळगत तुम्ही. सगळा पैसा पाण्यात जातोय. प्रिन्सना परवडणारं नाही." बशीरने प्रिन्सचा निरोप त्यांना दिला.
"मला भेटायचय प्रिन्सला. " सुरमेवाला समोरच्या पर्यटकातील एका गोर्‍या यौवनेकडे टक लावत बोलला.
"का ?"
"शास्त्रज्ञांच्या अपहरणाची बातमी कदाचित तो वाचायला विसरला असेल म्हणून." सुरमेवाला किंचित उपहासाने बोलला.
"विचारावं लागेल." बशीर १२१८ मधील मदरशाच्या उर्वरित अवशेषाच्या दिशेने निघाला. इतर तिघांनी सुरमेवाल्याकडे पाहीलं. त्या नजरेत भविष्यातल्या धोक्यांची चाहुल होती.
*****************************************************
१४ जुन २०१०
नॅशनल हेल्थ लॅबोरेटरी सर्विस - एन एच एल एस, सॅनड्रिंगहॅम, जोहानेसबर्ग, दक्षिण आफ्रिका
संध्याकाळी ५ वाजून २३ मिनिटांनी
चेअरपर्सन श्री. सॅगी रॉडीटी यांची कॅबिन

दारावर टकटक होताच त्याने वर पाहीलं. काचेपलिकडे बॅरी माजामिसा होता. बॅरीचा पडलेला आणि घामेजलेला चेहरा पाहताच त्याच्या कपाळाला आठ्या पडल्या. त्याने त्याला आत बोलावलं.
"सॅगी, एक प्रोब्लेम झालाय." बॅरी चार शब्दांच वाक्य अडखळत बोलला. चार भिंतीच्या आड एकांतात दोघे जिवलग मित्र होते. बाहेर मात्र सॅगी बॅरीचा बॉस होता.
"बोल." सॅगीने समोरच्या लॅपटॉपवरील 'स्विच ऑफ' क्लिक केलं.
"इ. झेड इज मिसिंग."
"व्हॉट ? " सुदैवाने सॅगीचा कानठळ्या बसवणारा आवाज त्या साऊंडप्रुफ कॅबिनच्या बाहेर गेला नाही. बॅरीच्या भेदरलेल्या चेहर्‍यावरील घामाचे ओघळ त्याला आता नीट दिसले.
"तुला खात्री आहे बॅरी ?" सॅगी रॉडीटीच्या आवाजात जीव नव्हता.
"हो. मकांबा होता काल ड्युटीवर. त्याचा आज ऑफ आहे आणि रॅम्पोटा लिव्हवर." बॅरीने खिशातला रुमाल काढून कपाळावरचे ओघळ पुसले. तोच फोन वाजला. सॅगीने इंटरकॉमचं बटण दाबलं.
"बोल."
"सर, तुमची मिसेस आहे लाईनवर."
"कनेक्ट कर." तो क्षणभर थांबला. "हॅलो नेली, मला उशीर..."
"तुझ हे नेहमी..."
"इथे इमर्जन्सी आहे नेली. सो जस्ट शट युअर माऊथ एन्ड हँग दॅट ब्लडी फोन." तिच्या आधी त्याने फोन आपटला. आपण वड्याचं तेल वांग्यावर काढल्याचं जाणवलं त्याला. आजचा त्या दोघांचा कार्यक्रम त्यानेच ठरवला होता. असं करायला नको होतं... त्याला वाटून गेलं. दोन क्षण त्याने आपटलेल्या फोनकडे मग समोर उभ्या आपल्या एक्जेक्युटीव्ह मॅनेजरकडे पाहीलं आणि इंटरकॉम दाबला.
"नो कॉल्स. जग बुडत असलं तरी..." त्याने बटण ऑफ केल. ताबडतोब नंबर फिरवला.
"हॅलो, पॅट्रिक, सॅगी बोलतोय. कुठे आहेस ?"
"जेकब बार."
"पुढच्या दहा मिनिटात इथे ये. होप, तू युनिफॉर्ममध्ये नसशील." त्याने फोन ठेवला. बॅरीला बसण्याची खूण केली.
"तू त्या दोघांना चेक केलस ? "
"दोघे मिसिंग आहेत. इथून ते घरी पोहोचलेच नाहीत. त्यांच्या घरच्यांनी त्यांची मिसिंगची कंप्लेट लॉज केलीय."
"मी का इथला इन्चार्ज झालो ?" सॅगी स्वत:वरच चरफडला. त्याने घड्याळाकडे पाहीलं. सेल उचलून नंबर फिरवला.
"मॉर्निंग नॅन्सी."
*****************************************************
१४ जुन २०१०
सेन्टर फॉर डिसिज कंट्रोल एन्ड प्रिवेन्शन - सीडीसी, एटलांटा, अमेरिका
सकाळी ११ वाजून ३३ मिनिटांनी
स्टेशन इंचार्ज - नॅन्सी इव्हान्सचे ऑफिस

"बोल सॅगी, आज अचानक ? काही विशेष ? " नॅन्सीने त्याला उत्तर दिलं.
"नॅन्सी, इ. झेडची एक ट्युब मिसिंग आहे."
"सॅगी..... " भीतीची एक लहर नकळत तिच्या देहात शहारत गेली.
"मला नाव मिळालीत. पण मला वाटते यात तुझी मदत लागेल.
"आय विल डु द नीडफुल सॅगी. थँक्स फॉर कॉलिंग." नॅन्सीने फोन ठेवला. दुसर्‍याच क्षणी ती फोनवर होती.
"विली, इ. झॅड इज मिसिंग फ्रोम जोहानेसबर्ग."
"ओह जिझस..." विलीचे एवढेच शब्द तिला ऐकू आले.
*****************************************************
१४ जुन २०१०
एन एच एल एस, सॅनड्रिंगहॅम, जोहानेसबर्ग, दक्षिण आफ्रिका
संध्याकाळी ५ वाजून ४४ मिनिटांनी
चेअरपर्सन श्री. सॅगी रॉडीटी यांची कॅबिन

"पॅट्रिक, ह्या त्या दोघांच्या फाईल्स आणि हे आहे इझेड. या दोघांना लवकरात लवकर शोधून काढायला हवं. जर उशीर झाला तर...." पुढे काय होईल याच्या कल्पनेनेच सॅगीचा थरकाप उडाला. त्याच्या चेहर्‍याकडे पहाताच पॅट्रिकला ते प्रकरण साध नसल्याचं लक्षात आलं.
"या दोघांचा संशय येण्याचं कारण ?" पॅट्रिक पोलिस खात्याचा माणूस. पुराव्याशिवाय पुढे सरकणार तरी कसा ?
"मकांबा लॅब असिस्टंट आहे. रुटीन चेक अपची जबाबदारी त्याचीच होती. रॅम्पोटा सेक्युरीटी इन्चार्ज. त्याच्या मदतीशिवाय ट्युब बाहेर काढणं असंभव. आज दोघेही नाहीत. मी त्यांचे सेल चेक केलेत. बंद आहेत. काल संध्याकाळपासून ते घरी पोहोचलेल नाहीत. तसा मी पंधरा दिवसातून एकदा चेक करतो. दोन दिवसापुर्वीच मी चेक केलं होतं. पण आज दुपारी कॅमेरा सेक्शनमध्ये ट्युब युनिटचा क्लोजअप पाहीला. फ्रिझरच्या चिकटपट्टीत मला एक केस आढळून आला. त्यामुळे आज ते युनिट मी पुन्हा चेक करायला गेलो. तेव्हा एक ट्युब मिसिंग असल्याचे दिसले." बॅरीने मघाशी सॅगीसमोर दिलेला रिपोर्ट पुन्हा जसाच्या तसा पॅट्रिकसमोर सादर केला.
"चिकटपट्टी ? "
"सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून तसे करावे लागते. फ्रिझरच्या प्रत्येक बाजूला चिकटपट्टीने सिल केलं जाते. आतल्या द्रावणातील एक थेंबही बाहेर येऊ नये म्हणून प्रत्येक इंट्री-एक्झिट सील केली जाते." बॅरीने माहीती पुरवली.
निघताना पॅट्रिकने एक नजर बॅरीच्या पांढर्‍याफटक चेहर्‍यावर टाकली. तेव्हाच सॅगीचा सेल वाजला. सॅगीने सेलकडे पाहीलं. हा नंबर लिस्टेड नव्हता.
*****************************************************
१४ जुन २०१०
व्हाईट हाऊस, वॉशिंग्टन डी.सी., अमेरिका
दुपारी १२ वाजून १७ मिनिटांनी
डिपार्टमेंट ऑफ हेल्थ एन्ड ह्युमन सर्विसेस - डेप्युटी सेक्रेटरी विली स्मिथ

"मला वाटते एवढ्यात हे राष्ट्राध्यक्षांच्या कानावर घालायला नको. आपल्याला कंप्लिट रिपोर्टस अजून मिळाले नाहीत. इंटरपोलशी मी बोललोय. ते साउथ आफ्रिका सिक्रेट सर्विसशी याबद्दल बोलत असतील आता. थोड्याच वेळात काही ना काही माहीती हाती लागेल." विलीने थोडं थांबून सगळ्यांकडे पाहीलं. चिंता प्रत्येकाच्या चेहर्‍यावर दिसत होतीच.
"एक महत्त्वाचं, ही न्युज चार भिंतीच्या बाहेर जाता कामा नये." usamriidच्या रिप्रेझेंटेटिव्ह डोरोथी स्कॉट बोलल्या. सगळ्या माना होकारार्थी हलल्या. मिडियापर्यंत काही गोष्टी न पोहचलेल्या चांगल्या.
*****************************************************
१४ जुन २०१०
एन एच एल एस, सॅनड्रिंगहॅम, जोहानेसबर्ग, दक्षिण आफ्रिका
संध्याकाळ - ५ वाजून ५५ मिनिटांनी
चेअरपर्सन श्री. सॅगी रॉडीटी यांची कॅबिन

बॅरी माजामिसा सॅगीच्या हलणार्‍या मानेकडेच पहात होता. तो फोन आल्यापासून गेल्या दहा मिनिटात तो फक्त 'होय' ' नाही' या पलिकडे बोलतच नव्हता. या प्रकरणात पॅट्रिकसारख्या लोकल पोलिस स्टेशनच्या इंचार्जला गुंतवण्यात आपली चुक झाली हे सॅगीच्या एव्हाना लक्षात आलं होतं. प्रामाणिकपणे त्यांने आपली चुक कबूल केली. त्याने फोन ठेवला तोच बॅरी पुढे सरकला.
"कोण ? "
"एस.ए.एस.एस." सॅगीने समोरचा पाण्याचा ग्लास उचलला. घशाला पडलेली कोरड त्याला आता जाणवली होती.
पॅट्रिक हा साऊथ आफ्रिका सिक्रेट सर्विसचाच माणूस असून एन्.एच.एल्.एस.च्या घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठीच नेमण्यात आला आहे हे सॅगीला तो जिवंत असेपर्यंत कधी कळालेच नाही. पॅट्रिकचा नेहमी अवतीभवतीच वावर का असतो हे कळायला काही मार्गच नव्हता. तेवढा त्याने विचारही केला नाही. त्याला एवढेच माहीत होते की पॅट्रिक आपला मित्र आहे आणि या प्रकरणात तोच आपली मदत करू शकतो. ते एकाअर्थी खरही होतं. पण ही चोरी पॅट्रिकवरही शेकणार आहे याची त्याला कल्पना नव्हती. वॉशिंग्टनमध्ये काँग्रेसच्या ब्लु रिबन पॅनलच्या मीटमध्ये सेनेटर बॉब ग्रॅहमच्या स्टेटमेंटनंतर एन. एच.एल्.एस.वर लक्ष ठेवायला सुरुवात झाली होती, याचा चेअरपर्सन असून सॅगी रॉडीटीला पत्ता नव्हता.
विकसित आणि विकसनशील देशांच्या गुप्त बैठकीत हा अंतर्राष्ट्रीय करार झाला होता. त्याचे सर्व अधिकार सरसेनापतीला देण्यात आले होते. NTI शी सलंग्न असलेल्या या विभागाचा इतर कोणत्याही बाबींशी काही संबंध नव्हता.
*****************************************************
१५ जुन २०१०
व्हाईट हाऊस, वॉशिंग्टन डी.सी., अमेरिका
सकाळी ८ वाजून १३ मिनिटांनी
डिपार्टमेंट ऑफ हेल्थ एन्ड ह्युमन सर्विसेस

ते सगळे त्या गोलाकार टेबलाभोबती बसले होते. प्रत्येकाचे लक्ष विलीकडे होतं. आज त्यांच्यासोबत The Nuclear Threat Initiative (NTI) चे डेव्हिड कॅम्पबेलही होते.
"त्या दोघांची प्रेते वेगवेगळ्या ठिकाणी सापडलीत. त्यांना १३ तारखेच्या रात्री गोळ्या घालण्यात आल्या असून मारेकर्‍याने त्यांची प्रेते लपवण्याचा त्रासही घेतलेला नाही. याचा अर्थ तो फार घाईत होता. इ. झेडची ट्युब त्यांच्याजवळ सापडली नाही हे सांगायला नकोच. वापरण्यात आलेले रिवॉल्वर जर्मन बनावटीचं असून तेथे तपासाची दिशा खुंटतेय. आफ्रिकेत रिवॉल्वर मिळवणं काही कठीण नाही. शहराबाहेर पडणार्‍या प्रत्येक मार्गाची कसून तपासणी केली जात असून अजून काही माग सापडलेला नाही. त्या दोघांच्या घरातून मोठी रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. त्या रक्कमेचे मूळ शोधण्याचा प्रयत्न चालू आहे. नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी आणि एस. ए. एस. एस. इंटरपोलसह शोध घेत आहे. आपला एक प्रतिनिधी काल रात्रीच रवाना झाला असून लवकरच पुढची माहीती मिळेल." विलीने रिपोर्टची कॉपी पुढे केली. राष्ट्राध्यक्षापर्यंत माहीती गेली होती. आता होणार्‍या प्रत्येक घटनेवर नजर ठेवणं भाग होतं. विलीसाठी येणारे दिवस आता चांगले नव्हते. लवकरच भविष्यात काहीतरी भयाण घडेल असं सांगून डोरोथी स्कॉटने त्याला नखशिखांत हादरवून सोडलं होतं. usamriid मध्ये सगळे संभाव्य परिणामाच्या मुकाबल्यासाठी सिद्ध होण्याची तयारी करत होते.
*****************************************************
१८ जुन २०१०
व्हाईट हाऊस, वॉशिंग्टन डी.सी., अमेरिका
दुपारी १२ वाजून ३९ मिनिटांनी
डिपार्टमेंट ऑफ हेल्थ एन्ड ह्युमन सर्विसेस

" जोहानेसबर्गमध्ये मिळालेल्या पेट्रोलपंप, हॉटेल्स, तुरळक खबरी या सगळ्या माहीतीच्या कड्या जुळवता एक स्केच हाती लागले असून सदर व्यक्ती १४ जुनच्या पहाटेच डर्बन एअरपोर्टवरून कैरोला गेल्याचं कळलं. कैरोमध्ये पुढील तपासाअंती, इब्राहिम ओसमान नामक या व्यक्तीचे प्रेत एका हॉटेलच्या खोलीत सापडले असून त्याचा मृत्यु हार्ट अटॅकने झाल्याचे कळले आहे. ती ट्युब त्याच्याजवळ सापडली असून त्यातील इ. झेड टॉयलेटमध्ये सांडलेले होते. त्या व्यक्तीबद्दल अधिक तपास चालू असून त्याला भेटायला आलेल्या व्यक्तीचे चित्र हाती लागले आहे. आतापर्यंत संशयाचा रोख असलेल्या दोन्ही व्यक्तींची कोणतीही माहीती शासकीय यंत्रणेच्या संगणकात नोंदवलेली नाही. पुढील तपास चालू आहे."
*****************************************************
२१ जुन २०१०
व्हाईट हाऊस, वॉशिंग्टन डी.सी., अमेरिका
संध्याकाळी ६ वाजून ५८ मिनिटांनी
डिपार्टमेंट ऑफ हेल्थ एन्ड ह्युमन सर्विसेस

"शेवटच्या अधिकृत माहीतीनुसार इब्राहिम ओसमान हा एक भुरटा सर्वसाधारण चोर असून दुय्यम दर्जाचा शार्पशुटर म्हणून आपली कारकीर्द करू पहात होता. त्याच्या नावे तिथल्या पोलिसखात्याकडे इतर विशेष अशी माहीती नाही. तो इजिप्तचाच रहीवासी असल्याचे कळले आहे. त्याचे लागेबांधे शोधण्यात येत असून त्याला भेटून गेलेल्या माणसाबद्द्ल नवीन माहीती उपलब्ध झालेली नाही. पुढील तपास चालू आहे."
*****************************************************
१८ जुलै २०११
एन एच एल एस,सॅनड्रिंगहॅम, जोहानेसबर्ग, दक्षिण आफ्रिका
संध्याकाळ - ७ वाजून ३० मिनिटांनी
चेअरपर्सन श्री. सॅगी रॉडीटी यांची कॅबिन

"हे बघ सॅगी, ती फाईल आता बंद करण्यात आली आहे. संबधित व्यक्तीवर इंटरपोलने वर्षभर नजर ठेवली पण अजून काहीच विशेष असं घडलेलं नाही. तो रक्कम पुरवणाराही आता या जगात नाही. मला तरी वाटतं, इ. झेड नक्कीच टॉयलेटमधून वाहून गेलं असावं. तपासात तेच निष्पन्न झालय. तू आता चिंता करणं सोडून दे." नॅन्सीने सॅगीला नेहमीप्रमाणेच समजावलं. पण सॅगीला मात्र अजूनही दु:स्वप्न पडत होतीच आणि कदाचित पडत राहणार होती. १९८० ची ती घटना त्याच्या डोळ्यासमोरच घडलेली. एखाद्या भयावह चित्रपटासारखी. त्यानंतर कित्येक रात्री त्याने घाबरून काढल्या होत्या. सॅगीला नॅन्सीच्या त्या बोलण्यावर विश्वास नव्हता. तो रोज वर्ल्ड न्युज चेक करत होता. शेवटी इ. झेड त्याची जबाबदारी होती. आज ना उद्या इ.झेड उसळी मारून वर येणार याची त्याला खात्री होती. सुईच्या अग्रावर राहु शकणारा इ. झेडचा एक थेंब एका संस्कृतीच्या नाशासाठी पुरेसा होता.
*****************************************************
२६ ऑक्टोबर २०११
हेसारक मेडीकल हेल्प, अफगाणिस्तान
दुपारी १२ वाजून ३ मिनिटांनी
तळघरातील विद्युत दाहिनी

"टाका आत." त्याच्या इशार्‍याबरोबर त्यांनी बटन दाबलं आणि ती बॉडी विद्युत दाहीनीच्या आत गेली. तो त्या खोलीच्या दुसर्‍या टोकाकडे निघाला. तिथला दरवाजा उघडून तो त्या दहा बाय दहाच्या खोलीत शिरताच आत जंतूनाशकांचा वर्षाव सुरु झाला. बाहेर येऊन त्याने त्याच्या निथळणारा पोषाख काढून ठेवला. आतला विशिष्ट सुट काढला. हातातले हातमोज्यांचे थर काढले. सगळं काही तिथेच सोडून तो समोरच्या दरवाज्याने बाहेर पडला. तिथे एकजण खुर्चीत निवांत बसला होता.
"प्रिन्सला म्हणावं सगळं व्यवस्थित आहे. आता फक्त 'कॅरियर' तयार करायचे आहेत. याला वेळ लागेल. पण काम होईल. "
"किती वेळ लागेल ?"
"सांगु शकत नाही. 'कॅरियर' मिळवणं सोप काम नाही.
"तुमच्याकडे आत्मघाती दस्ता आहे ना ? " त्याच्या या वाक्यावर तो हसला.
"तुही एकदा आत्मघाती द्स्त्यात होतास ना ? तुझी तयारी आहे कॅरियर होण्याची ?" त्याच्या या वाक्यावर तो शहारला.
*****************************************************

२० ऑक्टोबर २०१२
सॅनड्रिंगहॅम, जोहानेसबर्ग, दक्षिण आफ्रिका
दुपारी ३ वाजून १७ मिनिटांनी
सॅनड्रिंगहॅम स्मशानभुमी

"त्या भयाण अपघाताने आज आपला परममित्र सॅङी रॉडीटी आपल्यामध्ये राहीलेला नाही. परमेश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो." फादर शेवटच्या प्रार्थनेकडे वळले. कोपर्‍यात उभ्या असलेल्या पॅट्रिकचे डोळे पाणावले. इ. झेडने कोणत्याही स्पर्शाशिवाय त्याच्या मित्राचा बळी घेतला होता. इ.झेडच्या त्या चोरीने, सॅगी, त्याचं मन:स्वास्थ गमावून बसला होता. गेल्या दिड वर्षात त्या चोरीच्या परिणामाच्या कल्पनेनेच त्याला अर्धमेला केलं होतं. पॅट्रिकला जेकब बारमधली त्याची ती शेवटची भेट आठवली.
"मला ते शक्यच होत नाही पॅट्रिक... मी त्याला पाहीलय नरसंहार करताना... तो भयानक आहे..... सैतान आहे.... त्याला कुणीतरी मोकळं केलय आणि तो केव्हाही हल्ला करू शकतो. त्या हल्ल्यासाठी आपण तयार नाही. कुणीही तयार नाही... तो सगळ्यांचा नाश करेल. तो सैतान आहे... सैतान....." भीती फक्त त्याच्या डोळ्यात नव्हती तर त्याच्या नसनसात भरली होती. इ. झेडसारखी.
सॅगी रोडीटीच्या निधनानंतर इतर कोणी त्याच्यासारखं जगभरातल्या बातम्यांवर नजर ठेवून नव्हतं.
*****************************************************
१३ मार्च २०१५
दुबई अंतर्राष्ट्रीय विमानतळ, यु.ए.इ.
सकाळी ११ वाजून १४ मिनिटांनी
गेट १ - स्टारबक्स (कॅफेटेरिया)

ते चौघेही शांतपणे समोर असलेल्या पिझाचे लचके पाडत होते. तो मात्र त्यांना शांतपणे न्याहाळत होता. चौघांच्या पायाजवळ सारख्याच रंगाची व पद्धतीची ट्रॅवेल बॅग होती. त्याने स्वत:च्या बॅगेतील चार वेगवेगळी पाकीटे काढून समोर ठेवली. चौघांनी समोर बसलेल्या माणसाकडे पाहीलं. समोरचा चेहरा अनोळखी होता. पहिल्यांदाच भेटत होते ते. पण त्याच्या आवाजाची लकब त्यांना ओळखीची वाटत होती. कदाचित तो तोच असावा ज्याने त्यांच्या दुबईमधील वास्तव्याची सोय केली होती. पण त्या माहीतीत त्या चौघांना रस नव्हता.
"तुमचे पासपोर्ट, तिकीटस आणि तुमच्या दहा दिवसाच्या वास्तव्यासाठी तुम्हाला लागणारी रक्कम त्यात आहे. उतरल्यावर तुम्ही कुठल्या हॉटेलात जायच त्याची माहीतीही आहे. गरजेच्या वस्तू बॅगेत ठेवा आणि इतर माहीतीपत्रके फाडून विमानाच्या शौचालयात टाका. कुणाला काही विचारायचं आहे का ? " त्याच्या या प्रश्नावर त्या चौघांनी नकारात्मक मान डोलावली आणि ते पुन्हा पिझाकडे वळले. त्याने समोर ठेवलेला ग्लास उचलून काचेबाहेर नजर टाकली. त्यांची दखल घेणारं अवतीभवती कुणी दिसत नव्हतं.
****
विमानतळाबाहेर
सकाळी ११ वाजून ५३ मिनिटांनी
एअरपोर्ट पार्किंग कडून रामी रॉयल हॉटेलकडे
गाडी त्याने अल करामाच्या दिशेने वळवली. ते पाच किमीचे अंतर कापायला त्याला जास्त वेळ लागला नाही. थोड्याच वेळात तो रामी रॉयल हॉटेलच्या पार्किंगमध्ये होता. तो गाडीतून उतरला तेव्हा त्याचा चेहरा पुर्ण बदलला होता. थोड्या वेळापुर्वी ज्या चार माणसांबरोबर तो बसला होता त्यांनी त्याला आता ओळखलही नसतं. तासाभरात तो त्याच्या मोजक्या सामानासह हॉटेलच्या बाहेर चेक आऊट झाला होता. आता त्याने कळवल्याशिवाय कोणाला तो कुठे आहे ते कळणारही नव्हते.
*****************************************************
१३ मार्च २०१५
छत्रपती शिवाजी विमानतळ, मुंबई
संध्याकाळी चार वाजून ५५ मिनिटांनी
जेट एअरवेज, फ्लाईट नंबर ५४१

विमान धावपट्टीवर थांबल आणि आतील प्रवासी आपापल्या सामानासहित उतरण्यास सज्ज झाले. हुसेन कमाल त्यांच्यातला एक होता.
दुबई विमानतळावर १२.३० मिनिटांनी त्याची फ्लाईट होती. इतर तिघांचा निरोप घेऊन तो आपल्या गंतव्य स्थानाकडे निघाला तेव्हा त्याच्या घड्याळात साडे अकरा वाजत होते. त्या तिघांची नावेही त्याला माहीत नव्हती आणि त्याची गरजही नव्हती. ती त्यांची पहिलीच आणि शेवटची भेट होती. हे त्या चौघानाही नीट माहीत होतं. गेल्या तीन तासात त्याने कुराणाच्या पठणाव्यतिरिक्त दुसरं काही केलचं नाही. त्याचा त्याच्या अल्लावर दृढ विश्वास होता.
*****************************************************
१४ मार्च २०१५
हॉटेल ओरिटेल वेस्ट, अंधेरी
सकाळी १० वाजून १६ मिनिटांनी
रिसेप्शन

सॅविओने फॉन उचलला.
"गुड मॉर्निंग, सॅविऑ फ्रॉम रिसेप्शन"
"आपके पास एस्पिरिन मिलेगी ? "
"यस सर. मै अभी आपके पास भिजवाता हूँ |" समोरच्याने फोन डिसकनेक्ट केला आणि सॅविऑ वळला. समोरच रुमसर्विसवाला आनंद त्याला त्याच्या दिशेने येताना दिसला.
"आनंद, सुन... ३०२ मे एक एस्पिरिन का पॅकेट देके आ जल्दी | " सॅविओचा हुकुम ऐकताच आनंद आल्या पावली फिरला. थोड्याच वेळात तो रुम नंब ३०२ मध्ये होता. समोर उभ्या हुसेन कमालच्या चेहर्‍यावरून त्याला जाणवलं की तो डोकेदुखीने प्रचंड त्रस्त आहे. त्याने पॅकेट त्याच्या हातात दिलं आणि तो माघारी फिरला.
***
सकाळी १० वाजून ४७ मिनिटांनी
रुम नंबर ३०२
डोकेदुखी फक्त वाढत होती. वेदना आतून होत्या. खोलवरून. आत कोणीतरी नेटाने दाबत असल्यासारख्या. वेदनेचा बिंदु कानशिलात फिरत होता. एस्पिरिनचा त्याला काहीच उपयोग झाला नाही. तो आता झोपण्याचा प्रयत्न करत होता. पण वेदना त्याला एका मिनिटासाठी अंग टेकण्याची परवानगी देत नव्हत्या. तो कुराणाच्या आयता पुटपुटू लागला.
*****************************************************
१६ मार्च २०१५
हॉटेल ओरिटेल वेस्ट, अंधेरी
सकाळी १० वाजून १६ मिनिटांनी
रिसेप्शन

"सर, वो ३०२वाला बंदा दरवाजा नही खोल रहा |" आनंदने रितसर तक्रार सॅविओच्या कानावर घातली.
"कितनी देर हुई ? "
"सर, सुबहसे कोशिश कर रहा हुँ | कल दोपहरसे खानेका प्लेट उठाया नही है वहाँसे | अंदरसे शायद उसकी आवाज आई थी |" आनंदच्या चेहर्‍यावर टेंशन दिसत होतं. ते साहजिकच होतं. मागच्या वर्षीच त्याला तिथे नोकरी मिळाली होती आणि पंधरा दिवसानंतरच, एका, अशाच न खुलणार्‍या दारामागे एक प्रेत सापडलं होतं. त्यानंतर मग पोलिस चौकशीमध्ये उलटसुलट प्रश्नांच्या सरबत्तीने पोलिसांनी त्याला जवळजवळ वेडाच केले होते. सॅविऑला त्याची ती भीती माहीत होती. त्याने समोर स्क्रीनवर ३०२ चे डिटेल्स चेक केले. सदर व्यक्ती हॉटेलमध्ये राहायला आल्यापासून कुठे बाहेर गेला नव्हता. खरं तर त्याच्या प्रोफाईल मार्केटिंगचा होता. त्याला गेल्या तीन दिवसात कोणी भेटायलाही आलं नव्हतं. शिवाय काल संध्याकाळपासून त्याने काहीच खाण्यासाठी मागवलं नव्हतं.
"चलो |" सॅविऑ आनंदबरोबर निघाला.
रितसर दार ठोकून, हाका मारून त्यांनी पाहील्या. पण काहीच उत्तर न आल्याने शेवटी त्याने डुप्लिकेट चावी वापरली. दोघेही सावधपणे आत शिरले. उलटीसारखा एक विचित्र दर्प त्यांना जाणवला. ते दोघे थबकले. समोर पलंगावर चादरीखाली कोणीतरी होत. पुटपुटण्याचा अस्पष्ट आवाज त्यांना जाणवला. त्याबरोबर सॅविऑने आवाज दिला आणि क्षणभर थांबला. तोच चादर हलली. आनंदच्या जिवात जीव आला. त्याने सोडलेल्या सुस्कार्‍याचा आवाज सॅविओने नीट ऐकला. तो पुढे सरला. तोपर्यंत चादर किंचित बाजुला सरली होती. समोर हुसेन कमाल होता. पण त्या चेहर्‍यावर जिवंतपणाची कळा नव्हती. त्याचे डोळे त्यांच्यावर रोखल्यागत वाटले त्यांना पण ते तसे नव्हते. ते एकाच जागी स्थिर आणि निर्जिव झाले होते. त्याच्या पापण्या अर्धवट झुकलेल्या होत्या. सॅविऑ पुढे सरकला. आपला हा 'कस्टमर' बराच आजारी आहे हे त्याच्या लक्षात आलं. त्याने त्याच्या डोळ्याकडे पाहीलं. ते जणू बाहेर पडण्याच्या तयारीतच होते. डोळ्याच्या बाहुल्या गोठलेल्या होत्या. रंग लालभडक होता. चेहर्‍याची त्वचा पिवळसर झाली होती. त्यावर लालभडक फुल्या उमटल्या होत्या.
"आनंद, कॉल डॉक्टर." सॅविऑने हुसैनची परिस्थिती पहाताच आनंदला हुकुम सोडला. आनंद फोनकडे झेपावला.
"नही |" सर्वशक्ती एकवटून आल्यासारखा आवाज होता तो. दोघेही हुसैन कडे वळले. तेवढं बोलतानाही त्याला प्रचंड वेदना झाल्याचे जाणवलं त्यांना.
"सर, आपकी हालत ठिक नही | डॉक्टरको बुलाना जरूरी है | " सॅविओच्या वक्तव्यावर त्याने पुन्हा नकारार्थी मान हलवली. दोघेही आता कमालीचे गोंधळले होते. त्याची अवस्था पाहवत नव्हती. तरीही तो डॉक्टरला नकार का देतोय ते त्यांना कळेना. पण ते त्याला तशा अवस्थेत सोडू शकत नव्हते. सॅविओ त्याच्या जवळ गेला.
"सर, कुछ चाहिए आपको ? " हुसैनने किंचित हालचाल केली. कदाचित त्याला उठून बसायचं असेल असं सॅविओला वाटले. तो पुढे सरला आणि त्याने त्याला बसण्यासाठी मदत म्हणून हात त्याच्या काखेत घातला. चटका बसावा तसं झालं त्याला. हुसैनच्या अंगात ताप होता.
"नही |" हुसैन चिडला होता. सॅविऑ मागे सरला. "कौन हो तुम लोग ? यहॉ क्या कर रहे हो ? "
त्याच्या या प्रश्नावर मात्र दोघेही गोंधळले. त्याच्या चिडण्यामुळे मागे सरकले. एकमेकांकडे पहात त्यांनी नेत्रपल्लवी केली आणि ते बाहेर सरले.
*********
सकाळी १० वाजून ४१ मिनिटांनी
मॅनेजर विश्वास कामतेकर यांची कॅबिन

पुढच्या दहा मिनिटात ते मॅनेजर विश्वास कामतेकरांसमोर होते.
"................. त्याची परिस्थिती फार वाईट आहे. पण डॉक्टरला बोलवू नका म्हणतोय. " सॅविओने सगळं चित्र कामतेकरांसमोर मांडलं.
" साब, तो आम्हाला पैचानतपण नाही. " आनंदची अजूनही मराठीची बोंब होती.
"सॅविओ तू डॉक्टरांना बोलव. हॉटेलमध्ये असा एखादा पेशंट असणं इतर कस्टमरसाठी चांगल नाही. त्या कस्टमरची इच्छा असो वा नसो. दुसरं म्हणजे गरज वाटलीच तर त्याला हॉस्पिटलला शिफ्ट करू. त्याचे बाकी डिटेल्स घेऊन ये पाहू तोवर." कामतेकर सुचना देऊन वाजणार्‍या इंटरकॉमकडे वळले.
*****************************************************
१६ मार्च २०१५
रॉ, लोधी रोड, नवी दिल्ली
सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी
जॉईंट सेक्रेटरी मल्होत्रांची कॅबिन

गेली पाच मिनिटे मल्होत्रा त्या समोरच्या कागदाकडे पहात होते.
op vivivi
cdmk
set
अफगाणिस्तानच्या वकीलातीमधून मिळालेला डि-कोडेड संदेश. संदेश देणारा त्यानंतर जग पहाण्यासाठी शिल्लक राहीलाच नव्हता. पण मरण्यापुर्वी तो एवढच त्याना सांगू शकला. यात काय रहस्य दडलय ते शोधणं फार गरजेचं होतं. कारण संदेशकर्त्याची हत्या करण्यात आली होती. त्याची जागा घेण्यासाठी नवीन माणूस पाठवेपर्यंत थांबण्यासाठी वेळ नक्कीच नव्हता. भारतीय राजदुताच्या हत्येपेक्षा जास्त चिंतेची बाब होती तो कोड. लवकरात लवकर कोड उलगडायला हवा होता. मल्होत्रांनी एक बटण दाबलं.
"यस सर." पलिकडून अवतार सिंगचा पंजाबी आवाज त्या कॅबिनमध्ये झळकला.
"अवतार, प्लीज कम फॉर अ मोमेंट." मल्होत्रांनी बटण पुन्हा दाबलं.
*****************************************************
१६ मार्च २०१५
हॉटेल ओरिटेल वेस्ट, अंधेरी
सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी
रुम नंबर ३०२

"मलेरिया किंवा टायफॉईड असू शकतो कामतेकर." समोर अर्धग्लानीच्या अवस्थेत पडलेल्या हुसेनकडे पहात डॉ. पटेल बोलले. " पण त्याचे डोळे... ह्या लाल खुणा... हा प्रकार मी यापुर्वी पाहीलेला नाही. विचारलेल्या प्रश्नांचॉ तो उत्तरेही नीट देत नाही. एखाद्या स्मृतीभंश झालेल्या माणसासारखा बोलतोय तो. शिवाय त्याने उलट्याही बर्‍याच केल्यात. "
"काल दुपारपासून त्याने काही खाल्लेलं नाही डॉक्टर. दुपारची प्लेट तशीच पडलीय आणि नंतर त्याने काही मागवल नाही. " कामतेकरांनी हुसेनची 'फुड हिस्टरी' दिली. पटेल पुन्हा हुसेनकडे वळले.
"मि. हुसैन, हम लोग आपको हॉस्पिटलमे शिफ्ट कर रहे है |" डॉ. पटेलांनी त्याच्या चेहर्‍याजवळ वाकून त्याला सांगितले. तो किंचित हलला आणि डॉ. पटेलांना काही कळायच्या आतच त्याने उलटी केली. रक्ताची एक चिळकांडी पटेलांच्या कपड्यावर पडली. हडबडून पटेल मागे सरून उठले. कामतेकरांनी त्यांना सावरलं. त्यानंतर त्याला कोरडे उमासे येऊ लागले. प्रत्येक वेळी त्याचे पोट जबरदस्त पिळवटून निघत आहे हे जाणवत होते. त्याचे दोन्ही हात लुळे पडल्यासारखे पोटावर होते.
डॉ. पटेल स्वतःला स्वच्छ करायला बाथरुमकडे धावले. कामतेकरांनी सॅविऑला फोन करून डॉ. पटेलांसाठी कपडे मागवले आणि हुसेनसाठी एंबुलेन्स.
*******
दुपारी १ वाजून १२ मिनिटांनी
विश्वास कामतेकरांची कॅबिन

कामतेकरांनी फोन ठेवला. बाब चिंतेची होती. त्यांनी ताबडतोब फोन फिरवला.
"बोल विश्वास, आज पार्टी ठेवलीयस का ? " ते काही बोलायच्या आतच समोरून आवाज आला.
"खंड्या, एक प्रोब्लेम झालाय. हुसेन कमाल नावाचा एक कस्टमर आहे इथे. त्याला आताच हॉस्पिटलला शिफ्ट केलाय. दहा दिवसाचं पेमेंट अ‍ॅडवान्समध्ये भरलय त्याने. कर्तव्य म्हणून मी त्याच्या दुबईतील डिटेल्सवरून फोन केला. तर पलिकडची शिपिंग कंपनी त्याला ओळखत नाही म्हणून सांगतेय. मेललाही नकारार्थी उत्तर मिळालय. त्या माणसाकडे त्या शिपिंग कंपनीचं आयकार्ड आहे. त्याच्या घरच्या पत्त्यावरही फोन केला पण तिथे कोणी फोन उचलत नाही. त्याच्या सेलमध्ये तर एकही नंबर लिस्टेड नाही."
"विश्या, मॅटर गडबड आहे. मी आलोच तिथे." इन्स्पे. खंडागळेनी फोन ठेवला आणि हवालदार बारटक्केना घेऊन ते हॉटेल ऑरिटेलच्या दिशेने निघाले.
************************************** ***************
१७ मार्च २०१५
स्पेशल वॉर्ड, राजीव गांधी मेमोरियल हॉस्पिटल, अंधरी (वेस्ट), मुंबई
सकाळी ८ वाजून १३ मिनिटांनी
लॅब

लॅब टेक्निशियन माणकेंनी नळीतील थोडे रक्त काढून घेतले. पुन्हा नळी जागेवर ठेवली. त्यातला रक्तद्रव वेगळा केला. रक्तातील पेशी बाजूला काढल्यावर खाली उरलेला हा रक्तद्रव स्वच्छ सोनेरी रंगाचा होता. त्यांनी तो स्लाईडवर घेतला आणि नेहमीच्या कामाला सुरुवात केली.
************************************** ***************
१७ मार्च २०१५
रॉ, लोधी रोड, नवी दिल्ली
सकाळी १० वाजून २ मिनिटांनी
लिफ्ट

आयबी ऑफिसर विक्रम शेट्ये रिसेप्शनला पोहोचले तेव्हा अवतारसिंग तिथेच होते. हस्तांदोलन झाल्यावर दोघेही मल्होत्रांच्या कॅबिनच्या दिशेने निघाले.
"वॉटस द मॅटर, अवतार ? " विक्रमने मुद्द्याला हात घातला. अवतारसिंगने खिशातला कागद त्याच्यासमोर धरला. लिफ्टमध्ये शिरता शिरता विक्रमने कागदावर नजर टाकली.
"एनीवन ब्रेक द कोड ? "
"नो. vivivi की 464000 और cdmk 64000 साईटस मिली है इंटरनेटपे. वी आर वर्कींग ऑन इट."
"मल्होत्राजी अपसेट है ? "
"काफी. रिमेंबर २६/११... सात साल पहिले का किस्सा. रॉ ने मुंबई अटॅक़के २-६ महिने पहलेसे SIGNIT के थ्रु काफी टेलिफोन कॉलस इंटरसेप्ट किए थे जो क्लियरली अटॅककी तरफ इशारा कर रहे थे, लेकीन उसके बाद ना तो कॉऑर्डीनेशन हुवा और ना ही कोई फॉलो अप अ‍ॅक्शन. रिजल्ट वॉज हेवी लॉस. रॉ वॉज क्रिटीसाइज लॉट. ऑन १५ जॅन २०१०, वी कॉट शेख अब्दुल ख्वाजा, चीफ ऑफ हुजी इंडीया ऑपरेशन्स अ‍ॅन्ड वन ऑफ द मास्टरमाईंड बिहाईंड दोज अटॅक, अ‍ॅट कोलोंबो एन्ड ब्रॉट हिम टू हैदराबाद फॉर फॉर्मल अरेस्ट. बट बुंदसे गई वो हौदसे नही आती. वी हॅव टू लर्न फ्रॉम अवर मिस्टेक्स विक्रम. मल्होत्राजीको यकीन है के इस कोडमे कुछ छिपा हुवा है|"
"लेट्स सी अवतार. वी मे गेट समथिंग फ्रोम दॅट." लिफ्ट थांबली आणि दोघे डाव्या बाजूला वळले.
*****************************************************
१७ मार्च २०१५
स्पेशल वॉर्ड, राजीव गांधी मेमोरियल हॉस्पिटल, अंधरी (वेस्ट), मुंबई
सकाळी १० वाजून ३४ मिनिटांनी
कॉरिडोर

"पेशंट कालच एडमिट झालाय सर. पण नेमकं डायग्नोसिस होत नाही. काल त्याला त्याला अँटीबायोटिक्स दिले पण त्यांचा उपयोग झाला नाही. त्याची परिस्थिती पाहून तो उभा राहीलं असही वाटलं नव्हतं. पण तो चालण्याच्या स्थितीत होता. तो आला तेव्हा त्याच्या ओठांवर लाल चिकट द्रव होता. त्यात काळसर ठिपके होते. त्याने रक्ताची उलटी केली होती. मी आज सकाळी त्याला चेक केलं तेव्हा. त्याचे रक्त तपासणीसाठी पाठवलय मी."
"म्हणजे नाडकर्णी तुम्ही कालपासून इथेच आहात ? " डॉ. जोशींनी मध्येच त्यांचा फ्लो तोडला.
"यस सर. ही केस नवीन होती. म्हणून मी अंडर ऑबजर्वेशन ठेवली. त्याच्या चेहर्‍यावरच्या लाल फुल्या आता वाढल्यात. जांभळ्या रंगाच्या पट्ट्या तयार झाल्यात. चेहर्‍यावरच्या स्नायुंचा ताण नाहीसा झाला. लिबलिबित झालाय चेहरा. चेहर्‍याचे मांस जणू खालच्या हाडापासून सुटल्यासारखे झाले आहे. त्याचे पोट रिकामेच आहे पण त्याला उलट्या होताहेत. लाल काळ्या रंगाच्या. त्यात रक्ताच्या गुठळ्या होत्या. "
"नाडकर्णी, तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा. मला हा प्रकार वेगळाच वाटतोय. तिथे इतर कुणाला प्रवेश देऊ नका. तुमच्या व्यतिरिक्त अजून किती जण आहेत तिथे ? "
"दोन वॉर्डबॉय, दोन सिस्टर आणि डॉ. करमरकर."
"ठिक आहे. यात अजून कोणी वाढता कामा नये."
"ओ. के. सर." डॉ, जोशी पुढे निघाले आणि नाडकर्णी आपल्या नव्या पेशंटच्या दिशेने.
********
सकाळी १० वाजून ४४ मिनिटांनी
कॉरिडोर

"मला त्या माणसाशी बोलणं फार गरजेचं आहे डॉक्टर." खंडागळेंनी नाडकर्णीना किंचित पोलिसी आवाजात दरडावलं.
"हे बघा इन्स्पेक्टर, तो माणूस तुमच्याशी बोलण्याच्या स्थितीत नाही आणि पळून जाण्याच्याही. तुम्ही हवं तर तुमचा माणूस इथे पहार्‍याला ठेवा. तो बोलायला लागला नंतर तुम्ही हवं ते करा." नाडकर्णींनी त्यांच्या दरडावण्याला भीक घातली नाही आणि ते पुढे निघून गेले. ते गेले त्या दिशेला पहातच खंडागळेंनी सेलवरील नंबर रिंग केला.
"सर, खंडागळे बोलतोय. अंधेरी लिंक रोड ठाणे सर... सर... इथे हॉटेल ऑरिटेलमध्ये उतरलेल्या प्रवाशाकडे बनावट पासपोर्ट आणि बनावट आयडी सापडली आहे. सध्या तो राजीव गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आहे. ... नाही सर... विचित्र आजार म्हणताहेत डॉक्टर.... बारटक्केना थांबवतोय मी इथेच. ..... ओके...... ओके... बरं" खंडागळेंनी सेल खिशात सारला.
*****************************************************
१७ मार्च २०१५
रॉ, लोधी रोड, नवी दिल्ली
संध्याकाळी ६ वाजून ३९ मिनिटांनी
कॉन्फरेंस रुम

"विक्रम, शॉर्टलिस्ट किए हुवे मिनिग्स आपके सामने है | आपको क्या लगता है.. क्या है ये vivivi ?"
"VENI VIDI VICI. दिस इज व्हॉट ज्युलियस सीजर सेड. आय केम, आय सॉ. आय कॉन्कर्ड."
" इट अलसो स्टँड्स फॉर 666. मिन्स बीस्ट. मतलब ज्युलियस सीजर वॉज अ बीस्ट."
"देअर इट गोज मल्होत्रा. इट मस्ट बी द सेम. बट वॉट अबाऊट सीडीएमके. सॉलिसिटर फर्म इन युके ऑर ख्रिश्चन डेमोक्रेटीक मुव्हमेंट ऑफ केनिया ऑर समथिंग एल्स.."
"इट इज चेन्नई, देहली, मुंबई एन्ड कोलकाता." अवतारसिंगने त्या रुममध्ये प्रवेश करत विक्रमच्या बोलण्यात व्यत्यय आणला. दोघेही त्याच्याकडे वळले.
"इट इज ऑपरेशन सॅटन अँड सेट इन मेट्रो सिटीज. सीआयए से ये मिला है |" त्याने हातातला कागद पुढे केला. त्यांच्या सुदैवाने कोड ब्रेक अफगाणिस्तानातच झाला होता. मल्होत्राचा कपाळावर आठ्यांच जाळ वाढलं. जे आपल्याला आधी कळायला होतं ते सीआयएकडून कळलं होतं. बाब नाचक्कीची होती.
*****************************************************
१७ मार्च २०१५
मेडीकल कॉलेज अँड हॉस्पिटल, कॉलेज स्ट्रीट रोड, इस्ट कोलकाता
संध्याकाळी ७ वाजून ३ मिनिटांनी
आय सी यु, दुसरा माळा

"दिस इज समथिंग एल्स डॉक्टर दास. रक्त त्याच्या शरीरात साकळतयं. रक्ताच्या गुठळ्या किडनी, यकृत, फुफ्फुसे अशा सर्व अवयवात साचलेल्या आहेत. आतड्यांकडे जाणारा रक्तप्रवाह गुठळ्यामुळे थांबलाय. तेथील स्नायु मरण पावलेत. आतडी शिथिल झालीत. त्याला आता कोणताही पेन होत नाही. मेंदुमध्ये झालेल्या गुठळ्यांमुळे वेदना जाणवणार्‍या केंद्रानाचा धक्का बसलाय. त्याचा मेंदू संपुर्ण कोडमडलाय. तो फक्त नावापुरता जिवंत आहे. आदरवाईज ही इज डेड."
*****************************************************
१७ मार्च २०१५
श्री रामचंद्र मेडीकल सेंटर, पोरुर, चेन्नई
संध्याकाळी ७ वाजून १७ मिनिटांनी
डिलक्स स्पेशल रुम, तिसरा माळा

त्याच्या रक्तवाहीन्याच फुटाव्या तसा त्याच्या नाकातून रक्ताचा प्रवाह सुरु होता. रक्त गोठत नव्हतं. नुसतं वाहत होतं. डॉ. सुब्रमण्यमसारख्या शिकाऊ डॉक्टरसाठी हा प्रकार नवीन होता. त्याने असा पेशंट कधी पाहीलाच नव्हता.
"नर्स, कॉल डॉ. अय्यर इमिजियटली." तो पेशंटकडे वळला. पेशंटच्या अर्धवट उघड्या डोळ्यांवर आता झापड होती. बसल्या जागी तो हिंदकळला. त्याच्या मानेचा तोल गेला आणि मान गुडघ्यामध्ये लोंबकळली. पोटातलं रक्त बाहेर उसळलं आणि तो कोलमडला. त्याच्याभोवती आता रक्ताचं थारोळं वाढत होतं. तो अजूनही कष्टाने श्वास घेत होता. रक्त आता श्वासनलिकेत गेल्याने त्याच्या श्वासमार्ग बंद झाला.
*****************************************************
१७ मार्च २०१५
इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल, मथुरा रोड, दिल्ली
संध्याकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी
आय सी यु, दुसरा माळा

डॉक्टर गर्ग यांनी पेशंटची नाडी तपासली. त्यांनी नर्सला आवाज देऊन लॅरिंगोस्कोप (श्वासमार्ग मोकळा करण्यासाठी वापरण्याची नळी) आणायला सांगितला. डॉक्टरने त्याच्या घशात बोटे घालून जबडा फाकवण्याचा प्रयत्न केला. लॅरिंगोस्कोप श्वासनलिकेच्या आत घालणे गरजेचे होते. नर्स लॅरिंगोस्कोप घेऊन आली. त्यांनी नळी आत खुपसली. थोडीशी हवा फुफ्फुसात गेली. तो श्वसन करू लागला. प्रचंड रक्तस्त्रावाने शरीरातील पाणीच नव्हे तर रक्तही कमी झालेले. ह्रदयाची हालचाल मंदावली. रक्तदाब शुन्यावर आला. बाहेरुन रक्त देण्याशिवाय पर्याय नव्हताच. रक्ताची पर्यायी व्यवस्था करून ठेवलीच होती. नर्सने सगळी तयारी केली आणि डॉक्टरांनी सुई खुपसली. रक्त बाहेर निघू लागलं. ते गोठत नव्हतं. दुसरा प्रयत्नही विफल झाला. नेमकं काय करावं तेच डॉक्टरांना कळेना. रक्तस्त्राव सुरुच होता. द्रावणाच्या एखाद्या भरगच्च थैलीला छोटेसे छिद्र पडल्यावर व्हावा तसा. त्यांच्या डोळ्यादेखत तो पेशंट अल्लाला प्यारा झाला.
*****************************************************
१७ मार्च २०१५
सीआयए हेड॑क्वार्टर, वर्जिनिया, अमेरिका
सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी
कॉन्फरंस रुम

"ऑपरेशन सॅटन भारतातल्या चार महत्त्वाच्या शहरात सुरु झालेलं आहे. एवढीच बातमी आहे. त्याचा नेमका अर्थ आपल्या माणसाला गवसला नाही. तो अर्थ देण्यापुर्वीच भारतीय हेर मारला गेला. सैतान म्हणजे काय आहे ते शोधायला हवय." मिशेल जॅक्सनने मूऴ मुद्द्याला हात घातला.
"मला कल्पना आहे ते काय आहे ते ? " नॅन्सी हळुवारपणे बोलली. "सॅगी त्याला शैतान म्हणायचा."
"तू इ. झेडबद्दल बोलतेयस ?" सॅगीचे नाव घेताच विलीला पाच वर्षापुवीची धावपळ आठवली.
"आर यु सुअर, नॅन्सी ? " डोरोथीने खात्री करून घेण्यासाठी पुन्हा विचारलं. नॅन्सीने होकारार्थी मान हलवली. क्षणभर कोणी काहीच म्हणालं नाही. १९८९ ला रेस्टनला जे झालं ते विसरण्याजोगं नव्हतं.
"ते यासाठी तयार असतील का ?" विलीने ती शांतता भंग केली.
"मला वाटत नाही. डेव्हिड कँपबेलला कळवायला हवं. आणि राष्ट्राध्यक्षांसुद्धा." विलीच्या स्वरातला हतबलपणा लपला नाही.
*****************************************************
१७ मार्च २०१५
रॉ, लोधी रोड, नवी दिल्ली
संध्याकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी
कॉन्फरेंस रुम

मल्होत्राने फोन ठेवला. त्याच्या चेहर्‍यावरील बदललेले हावभाव सगळ्यांनी टिपले.
"इटस इ.झेड. एबोला झायरे. हि इज इन फोर मेट्रो सिटीज. एक्टिव्हेटेड. अवतार कॉल त्रिवेदी एट DRDE (The Defence Research and Development Establishment laboratory at Gwalior, Madhya Pradesh) एन्ड शेणॉय एट NICD (National Institute of communicable diseases, New Delhi). हमे उसे ढुंढना है | जितनी जल्दी हो सके, उतनी जल्दी |"
"वॉट इज एबोला झायरे ?" विक्रमच्या प्रश्नावर मल्होत्राने त्याच्या लॅपटॉपवरील एक फाईल क्लिक करून त्याच्यासमोर ओपन केली.

ebola2_0.jpg

समोरच्या चित्राकडे विक्रमने निरखून पाहीलं. त्याला काहीच अर्थबोध झाला नाही.. त्याने पुन्हा प्रश्नार्थक नजरेने मल्होत्राकडे पाहीलं.
" दे हॅव स्टार्टेड बायोलॉजिकल वॉर अगेन्स अस. "
*****************************************************
१७ मार्च २०१५
NICD, शामनाथ मार्ग, दिल्ली
संध्याकाळी ७ वाजुन ३ मिनिटांनी
रिसेप्शन

"सर...." रिसेप्शनिस्टच्या आवाजावर जॉइंट डायरेक्टर (मायक्रो) डॉ. रॉय वळले. तिच्या हातात फोन होता.
"सर, डॉ. जोशी फ्रोम मुंबई." ते तिच्याकडे वळले. त्यांनी दुसर्‍या एक्टेंशनवर फोन घेतला.
"हॅलो जोशी, आज कैसे याद किया भई ? "
"रॉय, आज एक पेशंट एक्स्पायर हुवा यहाँ एन्ड ही वॉज कॅरींग एबोला."
"इम्पॉसिबल !"
"रॉय आय एम नॉट किडींग. समथिंग इज राँग. ये बंदा दुबईसे आया हुवा है | इसके सारे डॉक्युमेंटस नकली है | कुछ तो गडबड है |"
*****************************************************
१७ मार्च २०१५
स्पेशल वॉर्ड, राजीव गांधी मेमोरियल हॉस्पिटल, अंधरी (वेस्ट), मुंबई
संध्याकाळी ७ वाजुन ३ मिनिटांनी
डॉ. जोशींची कॅबिन

"नाडकर्णी, सगळे डॉक्टर्स आणि डिपार्टमेंट हेड मला कॉन्फरंस रुममध्ये हवेत. ताबडतोब. सेक्युरिटीला म्हणाव सगळे गेट ताबडतोब सील करायला. बाहेरचा कोणीही आत येता कामा नये आणि आतला कोणीही बाहेर जाता कामा नये. नाडकर्णी. तुमच्या शिवाय ज्यांनी ज्यांनी पेशंटला ट्रिट केला ते सगळे मला इमर्जन्सी वॉर्डमध्ये हजर हवेत. प्रत्येक जण. त्या पेशंटला स्ट्रेचरवर आणणार्‍या वॉर्डबॉयपासून सगळेच. बॉडी कुठे आहे ती ?"
"शवागारात."
"तिथल्या कोणी बॉडी हॅन्डल केली असेल तर तेही तुमच्यासोबत हवेत."
"सर कदाचित बॉडी पोस्टमॉर्टॅमसाठी....."
"व्हॉट ? " जोशींच्या आवाजाने खिडक्यांच्या काचा थरारल्या, " शीट..."स्वतःचे वय विसरून जोशी बाहेरच्या बाजूस धावले. मागोमाग नाडकर्णी.
******

संध्याकाळी ७ वाजून ९ मिनिटांनी
शवागार

दरवाजा धाडकन उघडला तसे डॉ. अहमद दचकून वळले. रक्ताने माखलेल्या अहमदकडे पहाताच जोशींच्या काळजात धस्स झालं. नाडकर्णीही जागीच थबकले.
"काय झाल सर ? आज एवढ्या घाईत ?" अहमद पुन्हा बॉडीकडे वळला. " हा पेशंट कुठे मिळाला तुम्हाला ? एवढी वर्षे मुडदे फाडतोय मी. पण असा प्रकार कधी पाहीला नाही. याची किडनी पाहीलीत का ? डेड आहे. कंप्लिटली. लिव्हरची अवस्थाही तीन दिवसाच्या प्रेताच्या अवस्थेसारखी झालीय. छिन्नविछिन्न झालय ते.. काही भाग आधीच द्रवरुप झालाय. आतड्याच्या आतील आवरणांचाही नाश झालाय आणि ते सुटून बाहेर आलय. लेबल म्हण़तय की हा पेशंट आजच खपलाय. पण लक्षणतर तीन दिवसांच्या प्रेतामध्ये आढळून येतात तशी आहेत. याच्या आत सर्वकाही चुकलय. रक्तातल्या गुठळ्या, प्रचंड रक्तस्त्राव, लिव्हरचा स्फोट, आतड्यातला रक्तस्त्राव..... मृत्युचं नेमकं कारण काय लिहावं तेच कळत नाही." बडबडत असलेला अहमद कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने क्षणभर थांबला. मागे वळला. ते दोघेही अजून दाराजवळच होते.
"काय झाल ? कशाने मेला म्हणून लिहू सर ? " अहमदच्या स्वरात मिश्किलपणा होता.
"एबोला." जोशी शांतपणे बोलले. अहमदने त्यांच्याकडे पाहीलं. तेआज नेहमीप्रमाणे विनोदाच्या मुडमध्ये नव्हते. अहमदला आपल्या हातून नेमकं काय झालय. ते लक्षात आलं. तो हताशपणे खुर्चीत कोसळला.
*****************************************************
१७ मार्च २०१५
स्पेशल वॉर्ड, राजीव गांधी मेमोरियल हॉस्पिटल, अंधरी (वेस्ट), मुंबई
संध्याकाळी ७ वाजुन १० मिनिटांनी
गेट नंबर ३ ते ४ च्या दरम्यान

बेसमेंटमधून सुझुकी किझाशी घेऊन अजय राऊत गेट नंबर ३ च्या दिशेने निघाला. पण पुढे त्याला थांबावं लागलं. पुढच्या टाटा प्रायमाला त्याने हॉर्न दिला. पण पुढची गाडी काही जागची हलली नाही. त्याने काच खाली घेऊन नजर बाहेर टाकली. त्या किंचित वक्राकार मार्गात जवळपास दहा गाड्या रांगेत होत्या. गेट बंद होता. गेटजवळ बराच जमाव उभा होता. त्याने शांतपणे गाडी मागे वळवली ती सरळ गेट नंबर चारकडे. पण इथेही तीच परिस्थिती. काहीतरी बिनसलय हे त्याच्या लक्षात आलं. तो गेटच्या दिशेने निघाला. तिथे एक गोरटेला, टक्कल पडलेला जाडा गृहस्थ सेक्युरीटीशी तावातावाने भांडत होता.
"साब, हम लोगोंको ऑर्डर है | कोईभी डीनसाहबके परमिशनके बगैरे बाहर नही जा सकता |" सेक्युरीटी गार्ड पुन्हा पुन्हा तेच सांगत होता. त्याच वेळेस स्पीकरमघ्ये कोणीतरी खाकरलं आणि हॉस्पिटलच्या आवारात आवाज घुमू लागला.
"नमस्कार, मी हॉस्पिटलचा डीन स. गो. जोशी बोलतोय. तुमच्या सर्वांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून हॉस्पिटलमधील कोणालाही बाहेर जाता येणार नाही. कृपया आपण सहकार्य करावं. थोड्याच वेळात डॉक्टर आपल्याला परिस्थितीची पुर्ण कल्पना देतील. हे सगळं आपल्या सुरक्षिततेसाठी आहे हे लक्षात घ्या. सहकार्य करा. धन्यवाद." पुन्हा तीच सुचना इतर भाषांमध्ये प्रसारित होऊ लागली.
अजय राऊतने चटदिशी आपल्या सेलवर सर्च केला.
"हॅलो रॉनी, जय बोलतोय.. एक ब्रेकींग न्युज आहे. राजीव गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना कैद करण्यात आलय. आतला कोणी बाहेर जाऊ शकत नाही आणि बाहेरचा कोणी आत येऊ शकत नाही.......... हो मी पुर्ण शुद्धीवर आहे..... तू फटाफट वॅन पाठव इथे."
*****************************************************
१७ मार्च २०१५
NICD, शामनाथ मार्ग, दिल्ली
संध्याकाळी ९ वाजुन २२ मिनिटांनी
जॉइंट डायरेक्टर (मायक्रो) डॉ. रोय

"यस मल्होत्रा, ऑल साईटस आर लोकेटेड. ऑल आर आयसोलेटेड. वी हॅव टू मुव नाऊ." रॉयची नजर समोरच्या न्युज चॅनेलवर होती. तुर्तास त्यावर मुंबईतील राजीव गांधी मेमोरियल हॉस्पिटलच्या बाहेरचा वैतागलेला, गोंधळलेला जमाव दिसत होता. न्युज वॅन्स आणि पत्रकार बाईटच्या शोधात भटकताना दिसत होते. स्थानिक नेते उपस्थित झाले होते. मते विचारली जात होती. आता नेमकं काय चाललय याचा काहीही अंदाज नसलेले आपापलं मत हिरीरीने व्यक्त करत होते. सरकार मुर्दाबादच्या घोषणासोबत नेत्यांच्या जिंदाबादच्या घोषणा सुरु होत्या. काहींची भाषणे सुरु झाली होती. काहीजण अंगात मंडळाचे टिशर्ट आणि कपाळावर संघटनेच्या पट्टया बांधून हॉस्पिटलमध्ये बंदिस्त झालेल्या आपल्या नातेवाईकांसाठी आलेल्यांना चहा, पाणी, बिस्किटे यांचे वाटप करण्यात दंग होते. गोंधळ क्षणाक्षणाला वाढत होता.
"मल्होत्रा, गेट इन टच विथ हेल्थ मिनिस्टर. हि हॅज टू अड्रेस द कंट्री. मिडिया इज क्रियटिंग द मेस." रॉय फोन ठेवून दाराकडे वळले.
*****************************************************
१८ मार्च २०१५
संपुर्ण भारत
सकाळी ८ वाजता
टिव्हीसमोर

"एका विशिष्ट रोगाचे काही रोगी ठराविक हॉस्पिटल्समध्ये आलेले आहेत. रोगाचे स्वरूप नवीन असून त्याची लागण किती जणांना झालेली आहे याची कल्पना प्रशासनाला नाही. हा स्वाईन फ्लुपेक्षा जास्त भयानक आहे. जनसामान्यात हा पसरलेला नाही. त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही. हॉस्पिटल्समधील प्रत्येकाची तपासणी करून त्यांना बाहेर पाठवण्यात येईल. आजाराची लागण झालेल्यांना उपचार होईपर्यंत आत ठेवण्यात येईल. या आजाराच्या निराकरणासाठी अमेरिकेने मदतीचा हात दिला असून त्यांची मदत आज दुपारपर्यंत येथे पोहोचेल. नागरिकांनी तोवर शांतता पाळावी. कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. कृपया सहकार्य करावे." आरोग्यमंत्र्यांनी त्यांच लिखित भाषण संपवलं.
त्यानंतर बरेचसे चॅनल बदलले गेले. काही पुढील बातमीसाठी तसेच थांबले. ज्यांचे नातेवाईक, मित्र हॉस्पिटल्समध्ये होते ते हॉस्पिटलकडे पळाले.
तो तेव्हा एका हॉटेलच्या लॉबीत बसून वर्तमानपत्र वाचत अधूनमधून समोरच्या एलसीडी स्क्रीनवर नजर ठेवून होता. सगळं काही योजनेनुसार झालेलं. फक्त प्रशासनाचा हस्तक्षेप अपेक्षेपेक्षा लवकर झाला होता. पण अचूक परिणाम साधला गेला होता. आता फक्त हलकल्लोळ.
*****************************************************
क्रमशः

मध्य - http://www.maayboli.com/node/13766
शेवट - http://www.maayboli.com/node/13826

कथा काल्पनिक असली तरी स्थळ, संस्था खर्‍या आहेत. अस्तित्वात असलेल्या. नावे बदललेली आहेत. शक्य तेवढा जीएमटीप्रमाणे वेळेचा काटेकोरपणा लक्षात घेतला आहे. वेगळी पद्धत हाताळण्याचाही प्रयत्न केला आहे. काही शंका असल्यास कृपया विचारावे. कथेचा आवाका मोठा आहे. कादंबरी होऊ न देता बरीच काटछाट करून शक्य तेव्हा लिहीतोय. समजून घ्यावे ही विनंती.
काही संदर्भ -
इ. झेड - एबोला झायरे ( एक विषाणू - याची सविस्तर माहीती पुढच्या भागात मिळेल.)
युसुफ गिलानी - पाक पंतप्रधान... (आम्ही आमच्याच नागरिकांचे सरक्षण करू शकत नाही मग भारतावर हल्ले होणार नाही याची हमी काय देणार ? असे म्हणून संभाव्य हल्ल्यांची सुचना देणारा )
usamriid - The United States Army Medical Research Institute for infectious diseases. - सीडीसीसह एबोलावर १९८९ मध्ये काम केलेली संस्था.
वॉशिंग्टनमध्ये काँग्रेसच्या ब्लु रिबन पॅनलच्या मीटमध्ये सेनेटर बॉब ग्रॅहमच्या स्टेटमेंट - २०१३ मध्ये अमेरिकेवर बायोलॉजिकल हल्ला होऊ शकतो असं सुचित करणारे.
रेस्टन - एबोला रेस्टनचा १९८९मध्ये वॉशिंग्टन डी.सी. जवळील या शहरात उद्भव झाला होता. हा एबोलाच्या जातीतील सौम्य प्रकार ज्याने प्रयोगशाळेसाठी आणलेल्या माकडांवर हल्ला केला होता. लक्षणे वर दिल्याप्रमाणेच. फक्त यामुळे कोणतीही जिवितहानी झाली नाही. त्यामुळे हा सौम्य मानला जातो.
सुझुकी किझाशी व टाटा प्रायमा - या लवकरच भारतीय बाजारपेठेत येणार्‍या गाड्या. भविष्यात दिसतीलच.

गुलमोहर: 

चित्त थरारक,भन्न्न्न्न्न्न्नाट आणि जबर्दस्त ...

मला रॉबिन कूक वाचल्यासारखं वाटलं
कसलं भारी लिहिता हो तुम्ही.. तुम्ही कादंबरी का लिहित नाही????????????????????????

जबरदस्त!!! वाचता वाचता मधे लिंक तुटली..तर पुन्हा पहिल्यापासुन वाचली...पी.सी पासुन आजीबात न हलता.. Happy
आता लिंक एकदम तोडु नका...लवकर येऊदे पुढचा भाग्..प्लीज Happy

धन्स माबोकरांनो !!
अरभाट, रिचर्ड प्रेस्टन यांचे डॉ. प्रमोद जोगळेकर यांनी अनुवादीत केलेल ' हॉट झोन ' वाचले आणि मग नेटवर थोडा सर्च केला. तेव्हाच या विषयावर लिहायचं ठरवलं. शेवटच्या संदर्भसुचीत कथेची पार्श्वभुमी देताना हा उल्लेख करणार होतोच कारण एबोलाची 'हॉट झोन' मधली माहीतीच मी सरळ सरळ उचलली आहे. प्रमोद जोगळेकरांनी सोप्या मराठीत छान लिहीली आहे. आता कोणी कॉपी केली वा ढापली अस म्हटलं तरी हरकत नाही. 'द हॉट झोन' ही रेस्टनच्या लढ्याची सत्यकथा आहे. त्यात संदर्भ देण्यासाठी एबोलाचा १९७६ पासून २००३ पर्यंतचा प्रवास लिहीला आहे. बाकी माहीती नेटवर आहेच. इच्छुकांना तिथे मिळेलच.
कथेचा गाभा सत्यावर आधारित असल्याने बराच रिसर्च करावा लागतोय. मी फार नेटफ्रेंडली नसल्याने कष्ट जास्त होताहेत. त्यामुळे पुढच्या भागाला उशीर होतोय. शिवाय इतर पोटापाण्याचे प्रश्न असतातच. थोडी कळ सोसा. चांगल लिहीण्याचा प्रयत्न करतोय. बाकी शेवटी तुमचे प्रतिसाद माझं मुल्यमापन करतीलच.
पुन्हा एकदा धन्स !!!

Pages