गुलकंद (मराठी चित्रपट) परीक्षण

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 May, 2025 - 04:25

आता थांबायचे नाय आणि गुलकंद! एकाच वेळी दोन उत्तम मराठी चित्रपट आले आहेत. मी या आठवड्यात एकापाठोपाठ एक दोन्ही पाहिले. ते बघताना झालेल्या घडामोडी, बघून मनात आलेले विचार, पडलेले प्रश्न, निरीक्षण, परीक्षण, शंका-कुशंका खालीलप्रमाणे,

१) "आता थांबायचं नाय!" चित्रपटाचे परीक्षण मी स्वतंत्रपणे लिहिले आहे. ते माझ्या लिखाणात शोधू शकता. तेच तेच मी पुन्हा ईथे लिहिणार नाही. कारण आपण चित्रपटांकडून नाविण्याची अपेक्षा धरतो तर ते आपण परीक्षणात सुद्धा पाळले पाहिजे.

२) म्हटले तर दोन्ही चित्रपट अगदी वेगळ्या जॉनरचे आहेत पण दोन्ही चित्रपट कमालीचे मनोरंजक, निखळ विनोदाने ओतप्रोत भरलेले आणि अभिनयसमृद्ध आहेत हा त्यातला समान धागा आहे.

३) दोन्ही चित्रपटांचे कौतुक कानावर पडू लागले तेव्हा पहिला विचार मनात हाच आला की अरे काय गरज होती दोन्ही एकाच वेळी प्रदर्शित करायची. हिंदीमध्ये सुद्धा मोठ्या बॅनरचे चित्रपट ईद, दिवाळी, ख्रिसमस आणि सव्वीस जानेवारी आपापसात वाटून घेतात. त्यात हिंदीचा प्रेक्षकवर्ग मोठा आणि भारतभर विखुरलेला आहे. ईथे मराठी मध्यमवर्गीय कुटुंबातील मर्यादीत प्रेक्षक दोन चित्रपटांत विभागला गेला तर कसे चालेल.

४) आमच्या घरात देखील वेगळी परीस्थिती नव्हती. महिन्याचे बजेट गडबडायला नको म्हणून दोघांपैकी कुठला तरी एक चित्रपट सकुसप बघायचा आणि दुसरा ओटीटीसाठी ठेवायचा हे ठरवण्यातच एक आठवडा गेला. चर्चेअंती असे ठरले की एक मी बघायचा तर दुसरा बायकोने. आणि त्यानंतर आपापला अनुभव एकमेकांशी शेअर करायचा. पण दोघांपैकी कोणी कुठल्या चित्रपटाचा अनुभव घ्यायचा आणि कुठला आपल्या पार्टनरशी शेअर करायचा हे ठरवायला अजून एक आठवडा खर्ची पडला. बायको अश्यावेळी तिच्या सख्या मैत्रिणीला जो बघायचा असेल तो बघायला जाते, तर मी माझ्या सख्या मैत्रीणची आवड लक्षात घेतो. ईथे माझी सख्खी मैत्रीण म्हणजे माझी लेक. वेगळा अर्थ नको. आमच्या नशिबी गुलकंद नाही Wink

५) मी या आपल्या ग्रुपवरील रिव्ह्यू वाचायचा सपाटा लावला. कारण इतर ठिकाणचे रिव्ह्यू पेड असण्याची शक्यता लक्षात घेता मी वाचत नाही. म्हटले तर ईथेही जो तो आपल्या आवडीनुसारच लिहितो. एखाद्याने नावडतीचे मीठ अळणी आणि आवडतीचे कारले गोड म्हटले तर समजायला मार्ग नसतो. पण या दोन्ही चित्रपटांबाबत कोणी चकार वाईट शब्द काढायला तयार नव्हते. ईतके रिव्ह्यू वाचले पण कोणी काहीच नकारात्मक लिहिलेले सापडले नाही. ते बघून, आपली मराठी माणसेच मराठी माणसांचे पाय खेचतात अन्यथा आपण जगात भारी असतो - हा माझा अहंकार गळून पडला.

६) दोन्ही चित्रपटांचे सापडतील ते रिव्ह्यू वाचून काढले आणि अजून गोंधळात पडलो. ऊन्नीस-बीस मध्ये कुठला उन्नीस आणि कुठला बीस हे ठरवताच येत नव्हते. (चित्रपट बघून झाल्यावर देखील ठरवता येत नाहीये.)

७) अश्यावेळी दोन्ही चित्रपटांची कथा-पटकथा मदतीला धावून आली. एका चित्रपटात होते विवाहानंतरचे प्रेम प्रकरण. म्हटले हे लेकीच्या वयाला साजेसे नाही. पण तत्क्षणी मनात दुसरा विचार आला. हा चित्रपट बायकोला बघायला देणेही आपल्या हिताचे नाही. उगाच तिच्या डोक्यात काही खूळ शिरले तर उद्यापासून ती सुद्धा आपली व्हाट्सअप चॅट चेक करायला सुरुवात करेन. म्हणून मग म्हटले त्यापेक्षा गुलकंद बघायला आपण एकटे जावे आणि यावेळी लेकीला बायको अन तिच्या मैत्रिणीसोबत आता थांबायचं नायला पाठवून द्यावे.

७) पण नियतीला ते मान्य नव्हते. बायकाना लफड्यातच जास्त इंटरेस्ट. त्यात मैत्रीणी-मैत्रीणी एकत्र आल्या तर विषयच संपला. त्यांचे गुलकंद बघायचे आधीच ठरले होते. त्यामुळे आता थांबायचं नाय माझ्या वाट्याला येत हा विषय थांबला.

८) पण मी सुद्धा हुशार. आता थांबायचं नाय बघितल्यावर मी सुद्धा लगे हात गुलकंद बघून घेतला. कारण बायको त्यात काय बघून आली आहे हे मलाही समजणे गरजेचे Happy

तर आता गुलकंद निरीक्षणातून परीक्षणाकडे वळूया,

९) समीर चौगुले - हास्य जत्रा जे बघतात त्यांच्यासाठी बस नाम ही काफी है.. तरी या चित्रपटाचा ईतर कुठलाही रिव्ह्यू उघडा आणि वाचा, तो समीरदादांच्या तूफान कॉमेडीच्या कौतुकापासूनच सुरू झालेला आढळेल. त्यामुळे आधीच लांबलचक होऊ घातलेला लेख मी त्यांच्या कौतुकात वाढवत नाही. येत्या काळात अश्याच चांगल्या स्क्रिप्ट मिळाल्या तर ते धुमाकूळ घालणार हे नक्की. माझे कौतुकाचे चार शब्द तेव्हासाठी राखून ठेवतो.

१०) कॉमेडीची खरी मजा जोडीने. एकाने पंच द्यावा, दुसऱ्याने रिॲक्शन. अश्यात वेंधळेपणा आणि बावळटपणाची जोडी जमली की हे आलटून पालटून दोन्ही बाजूने बघायला मिळते. समीर चौगुलेंसोबत ईशा डे ची जोडी अशी काही भन्नाट जमली आहे की चित्रपटातील त्यांचा ट्रॅक वेगळा करून प्रदर्शित केला तरी लोकं तिकीट काढून बघायला जातील.

११) सई एवढी सुंदर दिसली आहे की घरी आल्यावर मी पहिले तिचे वय किती आहे हे शोधले. इथे सांगणार नाही, तुमचे तुम्ही शोधा. पण आईचा रोल करताना इतके भारी दिसणे फाऊल पकडावा का असा प्रश्न पडलाय Happy सईचा अभिनय आधीपासूनच फार प्रगल्भ होता. यातही कित्येक दृश्यात तिचा चेहराच बरेच काही बोलतो.

१२) सईची मुलगी झालेली जुई भागवत सुद्धा फार गोड दिसली आहे. लाईक आणि सबस्क्राईब चित्रपटात देखील छान फ्रेश वाटली होती. त्यातही आवडली होती. छान अभिनय करते. भविष्य उज्ज्वल आहे.

१३) प्रसाद ओकचे कॅरेक्टर आणि अभिनय विशेष आवडला. उगाच सद्गुणांचा पुतळा असल्याचा आव आणला नाहीये. सई सोबत त्याचे पुन्हा जुळणारे नाते छान दाखवले आहे. पूर्वाश्रमीची प्रेयसी पुन्हा आयुष्यात येते तेव्हा पुरुषाला तिची आस वाटणे हे स्वाभाविक वाटते. त्याचे आपल्या केमिस्ट्री न जुळलेल्या बडबड्या बायकोवर वैतागणे देखील तितकेच स्वाभाविक वाटते. त्या चिडण्यात विनोद पेरायचा मोह टाळून त्यातले गांभीर्य कायम ठेवले आहे.

१४) एकीकडे समीर आणि ईशा यांची विनोदाच्या मैदानावर तुफान फटकेबाजी चालू असताना दुसरीकडे प्रसाद आणि सई यांचा सिरीअस नोटवर चालणारा ट्रॅक फार लांबड लावणारा किंवा कंटाळवाणा होणार नाही याची काळजी घेतली आहे. त्यांची कॉलेज काळातील फ्लॅशबॅक लव्हस्टोरी डिटेलमध्ये दाखवणे टाळले आहे. चित्रपट बघताना समीर आणि ईशा यांचे सीन जास्तीत जास्त यावेत हा मोह आवरत नाही. पण त्याचवेळी सई आणि प्रसादची लव्हस्टोरी सुद्धा डोक्यात घोळत राहते. एकीकडे मॅड कॉमेडी चालू असताना दुसरीकडे आपले बेअरींग न सोडण्याचे शिवधनुष्य दोघांनी पेलले आहे. म्हणून त्यांचे विशेष कौतुक वाटले. संयत अभिनय म्हणतात तो हाच असावा.

१५) विनोदनिर्मिती आणि शेवटचे नाट्य घडवायला होणारे गैरसमज पटकथेत अगदी चपखल बसले आहेत. चित्रपट शेवटाकडे येताना विनिंग शॉट ईशाला मारायला मिळाला आहे जे ती डिझर्व्ह करत होती. तिच्यामुळे क्लायमॅक्स जमून आला आहे आणि या निमित्ताने जे चित्रपटात सर्वाधिक हसवतात तेच शेवटी सर्वाधिक रडवतात हा वैश्विक नियम पाळला गेला आहे.

बस एवढेच, उगाच मला आवडलेले प्रसंग आणि संवाद फोडून न बघितलेल्यांचा रसभंग करत नाही.

बॅक टू आमची घर घर की कहाणी,

१६) आता माझी बायको हिशोब फिट्टूस करायला लेकीला घेऊन आता थांबायचं नाय बघायला जाणार आहे. आणि मी तिच्या मागे लागलोय की मलाही तुमच्या सोबत न्या.. तुम्ही दोघींनी चार पॉपकॉर्न कमी खाल्ले तर त्या पैश्यात कुठेतरी कोपऱ्यातल्या खुर्चीत मी पडून राहीन मुकाट.
काय करावे, दोन्ही चित्रपट असे झाले आहेत की एकदा बघून मन भरतच नाही. पुन्हा बघताना काही सुटलेले पंचेस नव्याने कानावर आदळतील, काही जागा नव्याने सापडतील, अगदीच काही नाही तर सर्वांचीच इतकी छान अदाकारी पुन्हा अनुभवायला मिळेल आणि आयुष्य नाही तर किमान त्यातले दोन अडीच तास तरी सुंदर होतील Happy

१७) आता मला कोणी फक्त गुलकंद बघितलेला भेटले की त्याला मी सांगतो यापेक्षा आता थांबायचं नाय सुसाट आहे आणि जेव्हा आता थांबायचं नाय बघितलेला भेटतो त्याला मी म्हणतो गुलकंदाची चव चाखली नाही तर जीवन व्यर्थ आहे. विन-विन सिच्युएशन म्हणतात ती हिच असावी.

१८) या आधी हिंदीमध्ये फार फार वर्षांपुर्वी सनी देओलचा गदर आणि आमिरचा लगान एकाच वेळी आले होते. दोन्ही बॉक्स ऑफिसवर तुफान चालले होते. आपले दोन्ही मराठी चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर गदर माजवून पुरेपूर लगान वसूल करतील याची खात्री आहे. कारण नेहा धुपिया फार फार वर्षांपुर्वी म्हणाली होती. बॉलीवूडमध्ये दोनच गोष्टी विकल्या जातात, सेक्स आणि शाहरुख खान! (ईथे सुपर्रस्टार असे वाचा). पण मराठी चित्रपटांना दोन्हींची गरज पडत नाही. कारण त्यानंतर आपली विद्द्या बालन सुद्धा म्हणाली होती, चित्रपट फक्त तीन गोष्टींवर चालतात - एंटरटेनमेंट, एण्टरटेनमेंट आणि एंटरटेनमेण्ट.. आणि हे दोन्ही चित्रपटात ठासून भरले आहे Happy

- ऋन्मेऽऽष

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

) सई एवढी सुंदर दिसली आहे की घरी आल्यावर मी पहिले तिचे वय किती आहे हे शोधले. इथे सांगणार नाही, तुमचे तुम्ही शोधा. >>>>>>>>>> ३८.......25 June 1986

अजनबी,
सई बद्दल स्वतंत्र लेख इथे आहे. तो ११ वर्षे जुना आहे. सई ज्या पदाला पोहोचेल असे भाकीत मी वर्तवले होते ते खरे ठरत आहे Happy

https://www.maayboli.com/node/50822

मला ही दोनही बघावेसे वाटत आहेत. पण इकडे कोणता लागेल त्यावर आहे.
सई...ज्याची त्याची आवड निवड पण मला & माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना ती अजिबात सुंदर नाही वाटत. बारीक डोळे विचित्र वाटतात.
तिच्या अभिनयात बरीच प्रगती आहे. डबबा एक्स्प्रेस मधे मला आवडले तिचे काम & देहबोली.

तिचे सौंदर्य आणि काम दोन्ही हटके आहे. सर्वांनाच आवडेल असे नाही याची कल्पना आता आली आहे. पण ती आपली छाप पाडते हे बहुतेकांना मान्य असेल.
गेल्या वर्षी बॉलीवूड मध्ये देखील मिमी चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर आणि आयफाचे बेस्ट सपोर्टिंग एक्ट्रेस अवॉर्ड मिळाले आहेत.

बाकी चित्रपट दोन्हीपैकी कुठलाही बघा, पैसा वसूल आहेत.