वादळ - भाग २

Submitted by चिमण on 29 August, 2008 - 09:38

वादळ - भाग १ इथे वाचा: http://www.maayboli.com/node/3079

जितक्या सहजतेने गुंड्या आमच्या कळपात आला तितक्याच सहजपणे त्यानं इतर कळपातही प्रवेश मिळवला. डिपार्टमेंट तसं छोटं असलं तरी टोळकी बरीच होती... सीनिअर मुल/मुली, रीसर्च करणारे, इतर डिपार्टमेंटचे ग्रुप शिवाय हॉस्टेलमधल्या पोरां/पोरींचा ग्रुप... ईथर सारखा तो सर्वदूर असायचा. त्याचा अस्थिर आत्मा हे कारण असेल कदाचित पण तो बारा पिंपळावरचा मुंजा होता हे खरं! एक रीसर्च करणारा ग्रुप फारच वैशिष्ट्यपूर्ण होता..त्यात दोघेच जण होते... पण चांगलेच दर्दी होते... न्युक्लीअर फिजिक्समधे रीसर्च करायचे. त्यांच्या लॅबमधे रसायनं ठेवण्यासाठी एक फ्रीज होता..फक्त त्यांच्यासाठी. रोज दुपारी कलिंगडाला रमची इंजेक्शनं मारून ते फ्रीजमधे ठेवायचे आणि रात्री सामसुम झाली की कापून खायचे. गुंड्यानं त्यांचा रीसर्च पेपर एकदा टाईप करून दिल्यामुळे त्याला या कलिंगड पार्टीचं अधुनमधुन आमंत्रण मिळायचं आणि आमची जळजळ व्हायची. गुंड्याला टाईपिंग पण येतं हे तेंव्हा कळलं. पुढं त्यानं आमचे प्रोजेक्ट रिपोर्ट सुध्दा टाईप केले.

परीक्षा जवळ आल्यामुळे पास होण्यासाठी काहीतरी करणं भाग होतं. सर्वानुमते माझ्या घरी रोज रात्री बसायचं ठरलं. अभ्यासाचं फक्त निमित्त होतं, टाईमपासच जास्त चालायचा. सारखी कुणाला तरी सिगरेट नाहीतर चहाची तल्लफ यायची की त्याच्याबरोबर सगळे बाहेर! सिगरेटी परवडेनाशा झाल्या की खाकी विड्या... सिगरेटी/बिड्या घ्यायला, जवळच्या थेटरमधल्या पानवाल्याकडं जायचो. एकदा बिड्या घेता घेता कुणीतरी म्हंटल "ये नया पिक्चर लगता है ना?" झालं.. भानावर आलो तेंव्हा १२ वाजून गेले होते... त्या रात्रीचा बिडी ब्रेक ३ तास चालला. असं नंतर २-३ वेळा झाल्यावर सगळ्यांना आपण पिक्चर बघायला जमतो का अभ्यासाला असा संभ्रम निर्माण झाला. मग ज्याच्या घराशेजारी थेटर नाही त्याच्या घरी जमायचं ठरलं. पण असं कुणाचच घर नाही हे कळल्यावर सगळे हताश झाले.
"अब हमे बचनेका कोSSई चान्स नही!" माझ्या तोंडून अजित गरजला.
"आपुन हॉस्टेलमे पढ सकते है!" गुंड्याने खडा टाकला.
"नको. तिथून जवळ राहुल थेटर आहे." बन्याला खात्री नव्हती.
"अरे भुईनळ्या! मग काय सिंहगडावर जायचं का?" मी थयथयाट केला.
"अरे तिथं फक्त इंग्रजी पिक्चर लागतात. तुला एकतरी डायलॉग कळतो का? मला तर सगळं डोक्यावरनं जातं." माने सगळ्यांच्या मनातलं बोलला.
"पण हॉस्टेलवरनं रात्री घरी कसं जायचं? बस कुठं असते रात्री?" बन्या एक वातुळ प्राणी आहे... सारख्या शंका काढून वात आणतो.
"बस रात्री डेपोत असते" मानेची बॅटींग सुरू झाली.
"घर कायको जानेका? उधरीच सोनेका". फिजिक्समधली Principle of least action, Principle of least time अशी तत्वं ऐकून गुंड्यानं स्वतःच Principle of least trouble असं एक खास तत्व बनवलं होतं... म्हणजे कुठल्याही समस्येचं निराकरण आपल्याला कमितकमी त्रास करून कसं करता येईल ते बघायचं.
"हॉस्टेलवर आपण कसं झोपायचं?" बन्याला हॉस्टेलवर झोपणं स्मशानात झोपण्याएवढं भीषण वाटत होतं बहुतेक.
"अरे! घरी झोपतो तसच झोपायचं" मानेला फुलटॉस मिळाला.
"बाहेरची खूप लोकं हॉस्टेलवर राहतात. त्यांना पॅरासाईट म्हणतात. रेक्टर चुकून चक्कर मारायला आलाच तर ते गॅलरीत लपून बसतात." गुंड्याला हॉस्टेलवर राहण्याचा थोडा अनुभव होता.
"बन्या, तू काळजी कशाला करतो? अगर हम हैं तो क्या कम हैं?" मानेन एका फडतुस डायलॉगच्या आधारे फुशारकी मारली.
"तू है वोही गम है" बन्याची मानसिक तयारी अजूनही झाली नव्हती पण एकट्यानं अभ्यास करणं त्याला जमणार नव्हतं म्हणून नाईलाजाने तो तयार झाला.

हॉस्टेलच्या पोरांनाही आमच्याबरोबर अभ्यास करण्यात रस होताच... नाही म्हंटल तरी आमच्यातल्या काहीजणांना थोडफार फिजिक्स यायचं. हॉस्टेलवर बसण्याचा एक फायदा होता... बिड्या प्यायला बाहेर जायला लागायचं नाही... चहाला मात्र जावं लागे... फार रात्र झाली तर चालत शिवाजीनगर बस स्टँडपर्यंत!! गुंड्या स्वतः फारसा खादाड नसला तरी इतरांसाठी नेहमीच काहीना काही तरी चरायला आणायचा... मेसच्या खाण्याला वैतागलेले बुभुक्षित त्यावर वखवखल्यासारखे तुटून पडायचे. एकदा गुंड्यानं डबाभर इडल्या आणल्या. सगळ्यात वरती त्याच्या आईने मोठ्या प्रेमाने तिखट चटणीचा गोळा ठेवला होता. आधीच गच्च भरलेल्या एका रूममधे गुंड्या घुसला आणि लाईट गेले. अंधारात करायचं काय म्हणून कुणीतरी खाण्याची आयडिया टाकली.
"अरे हाँ! मैं इडली लेके आया है!" गुंड्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच त्याच्या जवळ बसलेल्या मानेनं चाचपडत डबा हिसकावून घेउन तो उघडला आणि अंधारात पहिलं जे हाताला लागलं त्याचा बकाणा भरला.. नेमका तो चटणीचा गोळा होता.. एवढी तिखटजाळ चटणी तोंडात गेल्यावर माने ४४० व्होल्टचा धक्का बसल्यासारखा हवेत तीनताड उडाला. अंधारामुळे त्याला बाहेर बेसीनकडेही जाता येईना आणि तोंडातलं थुंकूनही टाकता येईना. त्याला जागच्याजागी उड्या मारण्यापलीकडे काही पर्याय राहीला नाही. कुणालाच काय झालंय हे कळलं नव्हतं.. ते आरामात इडल्या खात होते आणि मधेमधे मानेला कसला झटका बसला यावर उद्बोधक चर्चा करत होते.
"मानेला शॉक बसला!" एकानं परीस्थितीवर प्रकाशझोत टाकला.
"कुणाच्या?" खोटंखोटं वेड पांघरून पेडगावला जाण्याची काहींना सवयच असते.
"लाईट गेल्यावरसुध्दा कुणाला शॉक बसू शकतो हे मला माहीत नव्हतं." एकानं टाकला.
"उड्या मारून पोटात जागा करतोयस काय? गव्हाचं पोतं हलवून हलवून करतात तशी?".. दुसरा.
तेवढ्यात लाईट आले. उजेडात तोबरा भरल्यामुळे मारुतीसारखं दिसणारं तोंड, डोळ्यात पाणी आणि अंगाला सुटलेला घाम पाहून सगळे खिंकाळायला लागले.
"अगदी, उठला तर मारुती बसला तर गणपती, दिसतोय" अजुन एक जण. माने तसा शरीरानं आडदांडच होता. त्या वयातही त्याचं पोट सुटलेलं होतं.
"डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी".. याला कुठल्या प्रसंगी कुठलं गाणं म्हणाव याचा काही पाचपोचच नाही.
"अरे! मारुतीला घाम आला! मारुतीला घाम आला!" मी अफवा उठवली.
माने ते काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता, धावतपळत बाहेर जाउन तो तोंड धुऊन आला आणि मग आम्हाला खरा प्रकार कळला.
"या पै. मारुती माने" बन्यानं स्वागत केलं.
"पै म्हणजे काय रे?" गुंड्याला मराठी येतं असलं तरी बारीकसारीक गोष्टी त्याला माहीत नव्हत्या.
"पैगंबरवासी" बन्यानं मानेला होत्याचा नव्हता करून टाकला.
"आता तू हवा सोडलीस तर जाळ येईल कारे?" कुणाच्या तरी अंगातला निद्रीत संशोधक जागा झाला.
"तू गरम पाणी पी म्हणजे बरं वाटेल. लोहा लोहेको काटता है!" गुंड्याही डायलॉगबाजीत मागे नव्हता.. बरं झालं, याला मेडीकलला प्रवेश नाही मिळाला ते... आगीनं होरपळलेल्या लोकांनासुध्दा यानं गरम पाण्यानं आंघोळ करायचा सल्ला दिला असता.
"च्यायला! मला पोचवता काय भ..*$@&. थांबा. एकेकाच्या कानाखाली जाळ काढतो चांगला" मानेनं खोट्या खोट्या रागानं बन्याचं मानगुट धरलं.
"सरदार! सरदार! मैने आपका नमक खाया है! सरदार!" बन्यानं शोलेच्या डायलॉगनं करुणा भाकली.
"अब गोली खा!" मानेनं खिशातून लिमलेटची गोळी काढून दिली. गोळ्यांनी बिड्यांचा वास मारला जातो असा एक (गैर)समज आहे म्हणून प्रत्येक फुकणार्‍याकडे गोळ्यांचा स्टॉक हा असतोच.

एवढा जालीम अभ्यास केल्यावर पास व्हायची काय बिशाद होती.. प्रत्येक जण कमितकमी एका विषयात नापास झालाच. पुढच्या सेमिस्टरला सॉलीड अभ्यास करून सर्व विषय सोडवायचे असा निर्धार करून सगळे जोमाने कॅरमवर बसले. अभ्यासात मार खात असले तरी खेळ आणि संगीत या क्षेत्रात सगळेच पुढे होते. प्रत्येकजण कमितकमी दोन खेळात तरबेज होता. गुंड्या कॅरम व क्रिकेट चांगला खेळायचा. तो आमचा विकेटकीपर कम् बॅट्समन होता म्हणजे विकेटकीपर कम, बॅट्समन जादा. त्याच्या बॅटींगमुळे आम्ही बरेच सामने जिंकले होते. बरीचशी खेळातली पदकं आमच्या टोळक्यातच असायची. शास्त्रीय संगीत जरी फारसं कुणी शिकलं नव्हतं तरी तालासुराचे प्राथमिक ज्ञान सगळ्यांना होते... बाथरूम घराण्याच्या गायकीत तरबेज असले तरी सुरात गाणी म्हणायचे... गुंड्या "एक हसीन शामको दिल मेरा खो गया" हे गाणं उत्तम म्हणायचा... ज्यांचा आवाज चांगला नव्हता ते काहीना काहीतरी वाजवायचे. गॅदरींगच्या काळात आमच्या ग्रुपला बराच भाव असायचा... अर्थात आमच्याकडे त्या काळात आदराने बघणार्‍या नजरा नंतर सहानुभूतिनं ओथंबायच्या... 'बरी मुलं आहेत पण वाईट संगत लागली' अशा अर्थाच्या!!

दरम्यान बन्याची विकेट पडली. फिजिक्स आपल्याला अजिबात झेपणार नाही असा साक्षात्कार झाल्यानं त्यानं गुपचुप एका बँकेची परीक्षा देउन ऑफीसरची जागा मिळवली... पण पार्टीशिवाय असल्या बातम्या लोकांच्या मनात ठसत नाहीत. मग संध्याकाळी सगळे त्याच्या पार्टीला जमले. बोलता बोलता, एका मिनटात जास्तीतजास्त बिअरच्या बाटल्या पिण्याची पैज लागली. अतिरेकी गुंड्यानं ती एका मिनटात पावणे दोन बाटल्या पिऊन जिंकली. पण पुढचा सबंध वेळ त्याला काहीही सुधरत नव्हतं... नुसता सुम्म्म्म बसला होता... त्याला चालता पण येत नव्हतं. अशास्थितीत त्याला घरी कसा पाठवायचा म्हणून मग हॉस्टेलवर पोचवला.

दुसरं सेमिस्टर आलं आणि गेलं.. आमच्या स्थितीत षस्पसुध्दा फरक पडला नाही. तिसरं सेमिस्टर सुरू झालं. नवीन बॅचमधे एक आशा नावाची मुलगी होती. ती मला गुंड्यानं कारण नसताना चिकटवली. निमित्त तिच्याशी फक्त एक-दोन वेळा बोलण्याचं झालं. तिला आशू म्हणतात हे कळल्यावर मला आशुतोष नाव पाडण्यात आलं. आमच्या गँगच्या पोरीही अशा डांबरट.. तिला मुद्दाम कँटीनमधे आमच्या टेबलवर गप्पा मारायला घेऊन यायच्या.. आणि कँटीनच्या मॅनेजरला सांगून "आजकल तेरे मेरे प्यारके चर्चे हर जबानपर" हे गाणं लावायच्या. पुढचे ७-८ महीने रोज मला --

आशा अगं आशा
कधी समजेल तुला
माझ्या डोळ्यांची भाषा

किंवा

इकडे आशा तिकडे निराशा
मधे चिमण्याचा तमाशा

असल्या टुकार कविता व मधे मधे "चिमण्या नुसत्या आशेवर जगू नकोस! काहीतरी कर!" असले डायलॉग ऐकवून जीव नकोसा केला. शेवटी माझं आणि गुंड्याचं जोरदार भांडण झालं.. "मी M.Sc. सोडलं, परत येणार नाही" असं ठणकावून मी घरी गेलो ते दोन दिवस आलोच नाही. गुंड्या मानेबरोबर हारतुरे घेऊन समेटासाठी घरी आला.
"क्या यार चिमण्या, तुम तो आजकल कहीं दिखताहीच नहीं!" अमिताभच्या अमर अकबर अँथनी मधल्या डायलॉगनं गुंड्याचं ओपनिंग.. जसं काही त्या टोणग्याला माहीतच नव्हतं.
"अरे चिमण्या, तुझ्याशिवाय आमची करमणूक कशी होणार?" माने जरुरी पेक्षा जास्त स्पष्ट बोलतो.
"अरे पण काही लिमीट आहे का नाही" मी अजून धुमसतच होतो.
"तुला मित्र हवेत का कुत्री?" मानेच्या रोखठोक सवालाला माझ्याकडं काही जवाब नव्हता. मी परत जायला लागलो. अधुनमधुन आशा प्रकरण डोकं वर काढायचं पण खूपच कमी झालं होतं.

आशा प्रकरण चालू असताना गुंड्याला दोन नवीन नाद लागले - एक भविष्य बघण्याचा आणि दुसरा ट्रेकिंगचा. काय त्याला एवढा स्वतःच्या भविष्यात रस होता देव जाणे. पण लकडी पुलावरचा पोपटवाला, हात बघणारे आणि पत्रिका बघणारे यांच्याकडे त्याच्या चकरा चालायच्या. त्याला पोपट पिंजर्‍यातून येऊन चोचीनं पान उचलून देतो ते बघायला फार आवडायचं. जाताना पोपटवाल्याला हमखास थोडे जास्त पैसे देऊन पोपटाला नीट खाउ-पिउ घाल असं बजावायचा. आम्ही "आपलं भविष्य आपल्या तळहातात नसून ते त्या मागच्या मनगटात असतं" असं काहीबाही सांगायचो, पण तो बधला नाही.

दर रवीवारी गुंड्या कुठल्याना कुठल्या ट्रेकवर जायचा. उन्हातान्हाचं, नाही ते डोंगर कारण नसताना चढणं आमच्यासारख्या आळशी व निवांत लोकांना जमणं शक्यच नव्हतं म्हणून आमच्यापैकी कोणी जायचं नाही. उलटं आम्ही त्याला "अरे अण्ण्या! ये ट्रेकिंगकरके कायको जवानी बरबाद करता है?" म्हणून परावृत्त करायचा प्रयत्न करायचो, पण त्याचा उपयोग नाही झाला. आजुबाजुचे गड पालथे घातल्यावर एका सुट्टीत मनालीला दोराच्या सहाय्यानं अवघड डोंगर चढायचं शिक्षण घेऊन आला... येताना माझ्यासाठी एक बाजा (माउथऑर्गन) घेऊन... पुण्याच्या दुकानात मला मनासारखा बाजा मिळाला नव्हता ते त्यानं लक्षात ठेवलं होतं. मी फारच खूष झालो... लगेच २-३ गाणी बसवून टाकली.

एका ट्रेकला जायच्या आदल्या शनीवारी रात्री नेहमीप्रमाणे आम्हाला 'अच्छा' करून तो गेला तो कायमचाच.. एका मित्राच्या घरी गाड्या लावून ते पुढे बसने जाणार होते. रमोनावरून पहाटे पहाटे जाताना एका ट्रकनं निर्दयपणे त्याला आयुष्यातून उठवलं... नेहमी आईच्या 'दही खाऊन जा' या सांगण्याला नकार देणारा माणूस आज नेमका दही खाऊन निघाला होता... आजही नसता थांबला तर... कदाचित...!!!

हवासे बाते करणारा एक स्वच्छंदी तितक्याच सहजपणे खुदासे बाते करायला निघून गेला. आयुष्याची दोरी बळकट नसेल तर तरबेज गिर्यारोहकालासुध्दा जीवनाचा डोंगर चढता येत नाही.

रवीवारी बातमी कळल्यावर मी पायातलं त्राण जाऊन मटकन खाली बसलो. कसंबसं सावरून धावत पळत नंतर ससून मधे गेलो. गेलेला माणूस दुसराच कोणीतरी असेल ही वेडी आशा खोटी ठरली... तो तोच होता... चेहर्‍यावरचं नेहमीचं स्मितं विधात्यानं कायमचं पुसलं होतं... सगळेच सुन्न झाले होते... अश्रू आवरत नव्हते... एवढी टिंगलटवाळी करूनसुध्दा माणसं एकमेकांच्या इतकी जवळ जातात?

त्याच्या अवेळी जाण्यानं एक वादळ आलं आणि माझ्या आयुष्याला कलाटणी देऊन गेलं... मी जास्त हळवा झालो... दुसर्‍यांच्या भावना मनाला भिडायला लागल्या... सिनेमातले हळवे प्रसंग हसू आणायच्या ऐवजी डोळ्यांच्या कडा ओलावू लागले.

अजूनही मी तो बाजा जपून ठेवला आहे... पण आता तोही त्याच्यासारखा अबोल झाला आहे.

-- समाप्त --

गुलमोहर: 

अप्रतिम....
लेखनशैली खुपच छान आहे. पुणेरी slangs चा वापरही मस्तच झाला आहे.

सुन्न करून गेलं झंझावाती वादळ.
छान लिहिलसं. लिहित रहा चिन्मय.

डोळ्यासमोर उभे केलेस सगळ्याना!
केवळ अप्रतीम! सुन्न करुन टाकलेस!

शेवट चटका लावून गेला चिन्मय!

खरच शेवट चटका लावुन गेला. शिक्षण पुर्ण होइपर्यंत हि धमाल अशिच सुरु रहावि अशि मनापासुन इछ्छा होति. Sad

हसवुन हसवुन शेवटी रडवलंस की रे.. खुप छान flow आहे तुझ्या लिखाणाला.. लिहित रहा..

छान फ्लो आहे रे पूर्ण कथेला.. फक्त भाग १ आणि २ थोडे तुटक वाटले.. पण छानच..

छान आहे कथा....सर्व पात्र मस्त रेखाटली आहेत...उत्तम!!!

चिन्मय, तुम्ही कोणत्या साली विद्यापिठात होता? यातिल अण्णा ओळखीचा वाटतोय. मी ८० साली होतो. बाकी लिखाण सुंदरच आहे. बर्‍याच जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

अरे पहिला भाग आणि दुसर्‍या भागातील शेवटच्या काही ओळी सोडल्या तर उरलेला भाग ह्यानी गदगदा हसवल यार!
शेवट मात्र चटका लावणारा.... Sad

लेखनशैली छान आहे.

.............................................................
Marriage is a relationship in which one person is always right and the other is husband! Sad Proud

सर्वांचे परत एकदा आभार.

उचापती माणसा,
मी ७६ साली विद्यापिठात आलो. तू म्हणतोस ते बरोबर आहे. ही कथा काही घडलेल्या घटनांवर आधारीत आहे. तू ८० साली विद्यापिठात आलास की विद्यापिठातून गेलास? फिजिक्सला होतास काय?

चिन्मय, खास शैली आहे तुमची. शेवट असा असेल असं वाटलं नाही... त्यामुळे जास्तं चटका बसला.
सुरेख लिहिताय. आता पुढल्या लेखाची अजूनच वाट बघतो.

चिन्मय, मी ७९-८१ च्या बॅचचा. ७९ जुनच्या सुमारास विद्द्यापीठात फिजिक्सला प्रवेश घेतला. सुरुवातिचे २-३ महिने स्थिरस्थावर होण्यात गेले. कॅन्टीन मधिल कॅरम व टेटे ग्रुपशी ओळख व्हायला सुरुवात झाली होती. अण्णाची ओळख त्या ग्रुप मुळेच झाली. नंतर १-२ महिन्यातच तो दुर्दैवी अपघात झाला. ग्रुपमधे मिसळुन गेल्यावर त्याचे बरेच किस्से ऐकायला मिळाले. वर लिहील्याप्रमाणे बर्‍याच जुन्या आठवणी जाग्या झाल्या त्या बद्द्ल तुला धन्यवाद. जर खरच टाइम मशिन निघाले तर मला पुन्हा त्या काळात जायला व ते दिवस पुन्हा एकदा जगायला मनापासुन आवडेल.

आताच तुमचे दोन्ही भाग वाचून पुर्ण केले.
अक्षी कॉलेजात हिंडत असल्यागत आठवलं. मस्त शैली, प्रासंगिक विनोद-चुटके यामुळे जिवंत लेखन झालंय. टण्या म्हणतो तसं काही ठिकाणी तुटकपणा, आवरतं घेतल्यासारखं वाटलं. सर्व डिटेल्स वापरले तर ही छान दीर्घकथा किंवा छोटी कादंबरी होईल, असे वाटते..
पुढील लिखाणास शुभेच्छा.

हलकी फुलकी सुरुवात केलीस, मध्ये मध्ये हसवलस्-- कॉलेज च्या दिवसात घेऊन गेलास्.---पण शेवटी हळवं करुन सोडलंस.--पण आवडलं ते.

मित्रा! जिंकलस!!!!!!!
खुपच छान लिखाण आणि शैलीहि. असेच लिहित रहा.
शेवट सुन्न करणारा होता.
पुढील लिखाणाकरीता शुभेच्छा.

वाचून पाणी आले डोळ्यात, ते हसून हसून का कलाटणी दिलेल्या शेवटामुळे, कळलेच नाही.
लिहित रहा.
-अनिता

सगळ्या जुनाट स्मॄती चाळ्वल्या. पाणावलो.

kautukshirodkar, D_ani, yogesh24, Anaghavn, SAJIRA आणि दाद तुम्हा सर्वांचे आभार! मी आजच तुमच्या प्रतिक्रिया वाचल्या. वाचून अंगावर मूठभर मांस चढलं हे खर!

>> काही ठिकाणी तुटकपणा, आवरतं घेतल्यासारखं वाटलं.
साजिरा, तुटकपणाच जरा ससंदर्भ स्पष्टीकरण दिलस तर बरं पडेल मला. 'आवरतं घेतल्यासारखं वाटलं' हे मात्र खर आहे. मी काही प्रसंग घालायचे टाळले.. एकतर लिहायचा कंटाळा आला आणि शिवाय रटाळ होण्याची भीति! आणि 'छोटी कादंबरी' कसली लिहायला सांगतोस बाबा? एवढं लिहीतांनासुध्दा घाम फुटला मला!!

खुप छान लिहिलि आहे कथा.

अगदी डोळ्यासमोर ग्रुप उभा केलात तुम्ही..हसता हसता रडवलंत.. पण शेवटी अचानक संपवून टाकल्या सारखं वाटलं.. साजिरा म्हणतो तसे. गुंड्याचा शेवट अजून थोडा लिहायला हवा होता असं आपलं माझं मत. बाकी दोन्ही भाग मस्त!
---------------------------------------------------------------------------
The only thing you take with you when you're gone is what you leave behind.

चिमण्या, हे मी वाचलंच नव्हतं.
हसवता हसवता धक्का दिलास रे..

>>>आयुष्याची दोरी बळकट नसेल तर तरबेज गिर्यारोहकालासुध्दा जीवनाचा डोंगर चढता येत नाहै!!!अगदी अगदी..

आजच वाचले दोन्ही भाग. वादळ भन्नाट वेगाने आलं आणि हादरवून गेलं आता सुन्न व्हायला झालय.

कस्स्स्स्स्स्स्स्स्स्ली सौलीड आहे!

Pages