One Flew Over the Cuckoo's Nest - समाजशास्त्रीय दृष्टीकोणातून

Submitted by अतुल ठाकुर on 19 June, 2020 - 11:26

cuckoos_nest.jpg

चित्रपट आणि समाजाचा घनिष्ठ संबंध असतो. समाजात घडलेल्या अनेक गोष्टींचे प्रतिबिंब चित्रपटात पडत असते. पण काही चित्रपट हे अगदी एखाद्या शास्त्राच्या कसोटीवर घासून पुसून पाहता येतात. त्या चित्रपटात ओळखीच्या अनेक खुणा सापडतात. जॅक निकलसनचा One Flew Over the Cuckoo's Nest पाहताना हे वारंवार जाणवत होते. चित्रपट म्हणून त्यात एक झपाटून टाकणारी कथा आहेच. पण त्याही पलिकडे या कथेत आणखी एक कथा आहे ज्यात अनेकानेक समाजशास्त्रीय सिद्धान्त दडलेले आहेत. विशिष्ट तर्‍हेचे वर्तन आणि केलेले काही गुन्हे यावर मानसोपचार घेण्यासाठी दाखल केलेल्या जॅक निकलसनला मनोरुग्णालयात फार काळ राहावे लागेल असे वाटत नाही. त्याचा सुरुवातीचा काळ बरा जातो. उत्साहाने रसरसलेला जॅक तेथे अनेकांशी मैत्री देखिल करतो. पण स्वातंत्र्याची ओढ असलेल्या त्याला तेथिल वातावरण हळुहळु जाचक वाटू लागते. तेथून तो पळून जाण्याचा प्लान करतो. जवळपास यशस्वीदेखिल होतो. पण एका रुग्णामुळे हा बेत फसतो. शेवटी जॅकचे काय होते हे चित्रपटातच पाहणे योग्य. या कथेत छोट्या छोट्या अनेक जागा अशा आहेत ज्यावर बोलता येईल. पण त्याही गोष्टींचा आनंद चित्रपट पाहतानाच घ्यावा असे मी सुचवेन.

सामाजिक नीति नियमांच्या आधारे जोपर्यंत आपण चालतो तोपर्यंत सारे काही आलबेल सुरु असते. त्याविरुद्ध जाणारी व्यक्ती सापडली तर समाज त्याला शिक्षा करतो. आपल्याकडे जातीबाहेर लग्न केलेल्यांना वाळीत टाकलं जातं. याला कायद्याचा आधार नाही. पण समाजातील काही व्यक्ती एकत्र येऊन दुसर्‍याला ही शिक्षा देत असतात. त्याचप्रमाणे काही संस्थामंध्ये विशिष्ट प्रकारची वर्तणूक अपेक्षित असते. त्यात मुरलेल्या व्यक्तींकडे सर्वजण नियम पाळून वागतील हे पाहण्याची जबाबदारी असते. हे नियम तोडले की शिक्षा ठरलेली. या शिक्षेला मर्यादा अशी नाही. कारण समाजच अशी शिक्षा देतो. किंवा काही संस्था अशी शिक्षा देतात. जॅक ज्या मनोरुग्णालयात दाखल आला आहे तेथेही असेच काही कडक नियम आहेत. ज्याला "नॉर्मल" म्हणता येईल असे वागण्याच्या पद्धती ठरलेल्या आहेत. त्याहून तुम्ही वेगळे वागलात तर तुम्ही "नॉर्मल" नाही. "नॉर्मल" काय आणि अ‍ॅबनॉर्मल" काय हे कुणी ठरवायचं? तर ज्यांच्या हातात सत्ता आहे आणि अर्थातच त्यामुळे पॉवर आहे त्यांनी.

यामुळेच सर्वांहून वेगळे वागणार्‍या आणि स्वातंत्र्याची ओढ असलेल्या, गतानुगतिकांप्रमाणे मेंढरांमधील कळपाचा एक भाग नसलेल्या जॅकला एक दिवस या मनोरुग्णालयात उपचार म्हणून इलेक्ट्रीक शॉकला सामोरे जावे लागते. आम्ही ज्याला 'नॉर्मल" म्हणतो तसे तुम्ही नाही आहत. जोपर्यंत तुम्ही "नॉर्मल" होत नाही तुम्हाला अशा तर्‍हेच्या भीषण उपचारांना सामोरे जावे लागणारच अशी येथील परिस्थिती असते. आपल्याकडे क्वचित जेव्हा जातीबाहेर लग्न केलेल्या जोडप्याला ठार मारले जाते तेव्हा याहून वेगळे काही घडत नसतेच. काही रुढी, काही रिती या जर कुणी मोडायला निघाला तर त्याचे वागणे हे "अ‍ॅबनॉर्मल" समजले जाते आणि त्यावर सर्वजण "उपचार" सुरु करतात. मनोरुग्णालयात दाखल झालेल्या जॅकची वर्तणूक अशा जगावेगळ्या तथाकथित "अ‍ॅबनॉर्मल" लोकांसारखी असते. त्याला सुरुवातीला असे वाटते की सर्वांनाच येथे त्याच्याचसारखे डांबून ठेवले आहे. पण जेव्हा त्याला कळते की काहीजणांनी स्वखुशीने हा तुरुंगावास पत्करला आहे, त्यांना येथे राहण्याचे कसलेही बंधन नाही, त्याला चांगलाच धक्का बसतो. स्वातंत्र्याची ओढ सर्वांनाच असते असे नाही. मेंढराप्रमाणे कळपामागून धावण्यात सुरक्षितता मानणारे, मोठ्यांनी सांगितले ते कसलिही शंका न घेता आचरणारे असंख्य लोक असतात. जॅकला मात्र हे जमणारे नाही. त्याचा येथून जाण्याचा निश्चय पक्का आहे. समाजशास्त्राचा विद्यार्थी म्हणून जेव्हा मी या चित्रपटाकडे पाहतो तेव्हा अनेक सोशल थियरीजमध्ये आणि या चित्रपटाची घडण आहे त्यात मला साम्य आढळते.

समाजशास्त्रात मार्क्स आणि विशेषतः फूको यांनी काही सिद्धान्त मांडले आहेत त्याला थेयरीज ऑफ डेव्हियंस म्हणतात. फूकोच्या म्हणण्यानूसार (Discipline and Punishment) शिस्त आणि शिक्षेचा वापर अशा तर्‍हेचे तथाकथित चुकीच्या वर्तन सुधरवण्यासाठी केला जातो. त्यासाठी भीतीचाही सर्रास वापर होतो. पॉवरचा वापर करून माणसावर निरनिराळ्या तर्‍हेचे दडपण आणले जाते. हे सारे अनेकदा कायद्याच्या चौकटीत राहून केले जाते. One Flew Over the Cuckoo's Nest मध्येही शिक्षेचे प्रमाण वाढत गेलेले दिसते. ज्यांच्या हाती सामर्थ्य आहे त्यांनी जे नीति नियम ठरवले आहेत तेच "नैसर्गिक" आणि "नॉर्मल" आहेत. त्याप्रमाणे जे वागतील त्याच माणसांना समाजात राहता येईल. त्याहून वेगळे वर्तन करणार्‍यांवर या सामर्थ्यवानांनी ठरवलेले "उपचार" केले जातात. जॅकला दाखल झाल्यावर ठरलेल्या चाकोरीतून जायला शिकवले जाते. पण तो बधत नाही. मग शिक्षेचे प्रमाण वाढू लागते. अशावेळी समाजातील अन्यायकारक नियमांबद्दल जे आवाज उठवायला पाहतात त्यांचे काय होते हेच One Flew Over the Cuckoo's Nest हा चित्रपट दाखवतो.

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान ओळख. एकदा मॅ ट्रिक्स सिनेमा डोक्यात उतरला की प्रत्येक सामाजिक संर चना हे एक कन्स्ट्रक्ट आहे व ते नाकारायचा हक्क आपल्याकडे असतो हे फार डोक्यात फिट आहे.

ज्यांच्या हाती सामर्थ्य आहे त्यांनी जे नीति नियम ठरवले आहेत तेच "नैसर्गिक" आणि "नॉर्मल" आहेत. त्याप्रमाणे जे वागतील त्याच माणसांना समाजात राहता येईल. त्याहून वेगळे वर्तन करणार्‍यांवर या सामर्थ्यवानांनी ठरवलेले "उपचार" केले जातात. >>> हे थोडेसे ओळखीचे नाही का वाटत? सध्याच्या परिस्थितीत.

"हे थोडेसे ओळखीचे नाही का वाटत? सध्याच्या परिस्थितीत."
अगदी अगदी. आणि हे सार्वकालिक आहे. आतापर्यंत अनेकांनी आपल्या मन:पूत, काळाच्या पुढे, प्रवाहाविरुद्ध वागण्याची शिक्षा भोगली आहे. टिंगल टवाळी, निंदानालस्ती, सामाजिक बहिष्कार, शारीरिक इजा आणि मृत्युसुद्धा शेकडोंच्या वाट्याला आले आहेत. जे लोक मेंढयांच्या कळपातील एक होण्याचे नाकारतात, त्या सगळ्यांचे भवितव्य प्रत्येक दिवशी, वर्षी, दशकी, शतकी, आणि सहस्रकी हेच ठरत आले आहे.

मन्या ऽ, जरूर पाहा तुम्हाला नक्की आवडेल आणि पाहिलात की त्यावर येथे लिहा देखिल.
अमा, हे सार्वकालिक सत्य आहे. जसे हीरा म्हणालेत.
टवणेसर, साधना, हीरा, प्रतिसादाबद्दल आभार Happy

गूगल सर्च आणि बिंग( माइक्रोसॉफ्ट) सर्च यांचे रिझल्ट्स वेगळे असतात.
पुस्तके free epub / pdf downloads च्या चांगल्या साईटस बिंगमध्ये येतात.
( EDGE Browser >> Bing search )
__________________________________

पुस्तक फ्री डाउनलोड इथे

https://b-ok.asia/s/?q=one+flew+over+the+cuckoo%27s+nest

प्रगल्भ कथानक असलेला दिसतोय चित्रपट, तुम्ही लिहिले पण छान आहे. जॅक निकलसनचे बरेच चित्रपट पाहिले आहेत आणि त्याचे काम सुद्धा आवडले आहे.
धन्यवाद.

या सिनेमाबद्दल खूप ऐकून आहे. फार डिप्रेसिंग सिनेमा आहे असे ऐकले आहे. व कथानक ऐकून, तो सिनेमा पहाण्याचा, पूर्वीही धीर झाला नाही.

फार डिप्रेसिंग सिनेमा आहे असे ऐकले आहे. व कथानक ऐकून, तो सिनेमा पहाण्याचा, पूर्वीही धीर झाला नाही.
हे खरं आहे. हा सिनेमापाहणे ही म्हटलं तर रिस्कच आहे. पण त्यातून समाजावर जे भाष्य केलेलं दिसतं त्याला मात्र तोड नाही.

साधारण पंचवीस एक वषांपूर्वी बेळगाव मध्ये कॅन्टोन्मेंट थेटरात पाहिला होता. २ दिवस मतिमुग्ध झालो होतो. अफाट कथानक अन जॅक निकल्सन्चा तो धिप्पाड रुबाब अन् नंतर त्याचा पळून जाण्याचा प्रयत्न सगळ काही सर्र कन डोळ्यासमोर आल> आता पुन्हा पाहतो !!!

दर तीन चार वर्षांनी पहायच्या चित्रपटांच्या यादीतील हा एक आहे. मूळ पुस्तक चांगले, विस्तृत असले तरी चित्रपट फार उजवा वाटतो.

@ SRD

त्या लिंक मधे डायलॉग नाहीयेत

फक्त

म्युझिक आहे

अरर. मी स्ट्रीम करून पाहिला नाही.
पण माझा अनुभव असा की कोणीतरी सिनेमा युट्युबवर अपलोड करतो पण सिनेमावाले तो काढायला लावतात किंवा बदल करतात.
बाहुबली (दुसरा भाग) जेव्हा रिलीस झाला तेव्हा रोज सकाळी युट्युबवर शोधायचो. तिसऱ्या दिवशी मिळाला तो फाइल डाउनलोडही केला. पण दुपारी तो काढला होता.

________________________

https://youtu.be/Rf5E8sEwFNg

यात संवाद आहेत पण हा सिनेमा नाही, नाटक आहे!