आमच्या सोन्याची प्रेमकथा!!

Submitted by नंदिनी on 7 November, 2009 - 00:42

"तुला बातमी समजली का?"

सकाळी सकाळी कम्प्युटरवर लॉगिन झाल्या झाल्या जीटॉकवर श्रीयाचा मेसेज.

"कसली बातमी?" मी विचारलं.

"सोन्या लग्न करतोय" क्काय्य??? मी टाईप करायचे सोडून जोरात किंचाळले.

सोन्या.. आमचा सोन्या.. अरे आमचा सोन्या..... लग्न???? करतोय?????

ही बातमी नव्हे!! ब्रेकिंग न्युज आहे. अरे कुणीतरी न्युज चॅनल लावा रे!!!

कॅलेंडरवर तारीख पाहिली. एक एप्रिल नक्कीच नव्हता!

श्रीयानंतर जास्मिन, अर्नब आणि अजून कुणीतरी हीच बातमी दिली. तितक्यात सोन्या ऑनलाईन दिसला.

स्टेटस मेसेज होता: कर चले हम फिदा जानोतन साथियो..
"सोन्या, तू लग्न करतोयस??"
"का?? मी नाही करू शकत?? माझ्या ऑर्कुटवर फोटो बघ."

बॉस यायला अजून दहा मिनिटे होती. पटकन ऑर्कूट काढून पाहिले. बहुतेक सोन्याच्या एंगेजमेंटचे फोटो असावेत. सोन्या इतका वेगळा दिसत होता त्यामधे. अंजिरी रंगाचा शालू. हेअर स्टाईल. आणि हातभर बांगडया, नाकात नथ कपाळावर टिकली आणि मेकप.

आणि खाली लिहिलेले भलेमोठ्ठे नाव "सोनालिका आणि दीपक" पण सोन्याच्या मानाने फारच लहान वाटत होता.

कोण दीपक?? मी फोटो निरखून पाहिला. चेहरा ओळखीचा होता .

परत जीटॉकवर सोन्याला पिंग केले.

कोण दीपक???
तिचा रीप्लाय आला "गधडे, स्मृतिभ्रंश झालाय का? दीपक, माझा लहान मामेभाऊ... त्याचा आणि माझा फोटो आहे"

"अगं, मग तुझ्या मिस्टराचा फोटो का नाही लावलास?"

"तो स्वत:च फोटो काढत होता, त्यामुळे एकाही फोटोत तो नाही.."

सोन्या ऑफलाईन.

छ्या!! फारच वादळी सकाळ होती. सोन्या आमची बाल मैत्रिण. ती लग्न करत होती. कुणाशी हा प्रश्न नंतर आधी मुळात सोन्या लग्न करतेय... अंहं.. लहानपणची सवय.. करतोय हेच पचनी पडत नव्हतं.

सोन्या आईवडिलाचे एकुलते एक अपत्य. तिचे बाबा मर्चंट नेव्हीमधे कायम जहाजावर. ती आणि तिची आई अशा दोघीच घरात. आईला मुलगा हवा होता म्हणून तिने बाबानी ठेवलेले छानशा सोनालिकाचे सोन्या केले.

आम्ही लहानपणी रहायला एकाच कॉलनीमधे. एकाच शाळेमधे. मी सोन्या, जास्मिन, श्रीया, अर्नब, पूर्वा असा आमचा भला मोठा ग्रूप. साधारण एकाच वयाचे होतो आम्ही. आता मोठे झाल्यावर पण आमचा ग्रूप अजून कायम होता!!!

सोन्या कधी शाळेत धड गेला नाही की आला नाही. रोज कुणाची ना कुणाची तरी मारामारी. वर्गात कुणालातरी मारल्याशिवाय त्याचा दिवस परिपूर्ण व्हायचाच नाही. आम्ही सर्व मुली भरतनाट्यम शिकायला जायचो आणि सोन्या तायक्वान्दो शिकून त्याचे प्रात्यक्षिक गल्लीत इतर मुलांवर करायचा. पुढे कॉलेजात गेल्यावर तर सोन्याच्या वाटेला कुणी जायचे नाही. पहिल्याच दिवशी रॅगिंग करणार्‍या एका सीनीयरला त्याने प्रिन्सिपलच्या ऑफिससमोर नेऊन तुडवला होता.

मुलीसारखे राहणे सोन्याला जमायचेच नाही. कधी पंजाबी सूट नाही, कधी फॅशन नाही, चेहर्‍यावर दोन आण्याची पावडर काधी लावली नसेल. लहानपणी मोठ्या कौतुकाने काकू तिला मुलासारखे ड्रेस घालायला लावायच्या. आणि आता तिने जरा तरी मुलीसारखे वागावे म्हणून सोन्याला विनवायच्या.

सोन्या अभ्यासात नको तितका हुशार होता. कॅम्पसमधे बसून टवाळक्या करण्यात पण एक नंबर एक होता. अर्थात, आता मारामारी थोडी कमी आली होती, कारण सोन्याची दादागिरी भरपूर फेमस झाली होती. त्यामुळे फारसे कुणी आमच्या अख्ख्या ग्रूपच्या वाटेला जायचेच नाही. सोन्या आमचा जणू बॉडीगार्ड होता.

सेकंड इयरला असताना एका मुलाने तुला माझी मिसेस बनायला आवडेल का? असा प्रश्न सर्वादेखत सोन्याला विचारला होता. आम्हाला वाटले की गेला बिचारा इस्पितळात. पण सोन्या इब्लिस!

त्याने उलट प्रश्न केला "का रे??"

त्यावर तो मुलगा काय बोलला ते आठवत नव्हतं. जास्मिनला विचारायला पाहिजे.. पण तो मुलगा मार खाण्यापासून वाचला होता हे मात्र नक्की!!

इतक्यात बॉस आला. मी रोजच्या कामामधे गुंतून गेले. लंचच्या वेळेला सोन्याचा मेसेज आला.

"आजचा लंच माझ्यातर्फे. भेटूया सत्कारमधे दीड वाजता."

मी सत्कारमधे वेळेवर पोचले. सोन्या लग्न करतोय इतके समजले होते. पण पुढची स्टोरी अजून समजली नव्हती. कोण कुठला मुलगा सोन्याबरोबर आयुष्य घालवायला तयार होता कुणास ठाऊक? सोन्याला प्रेम प्रकरण वगैरे बिल्कुल मान्य नव्हते. काकू तिच्यासाठी स्थळे शोधतायत हे समजलं होतं. पण आयुष्यात कधी किचनामधे पाय न ठेवणार्‍या मुलीच अरेंज मॅरेज होणं पण तितकंच कठिण होते.

सोन्या आमच्या सर्वाच्या आधी येऊन बसला होता. जीन्स, टीशर्ट आणि शूज, सोन्याचा जागतिक युनिफॉर्म. मीटिंगला पण सोन्या असाच जात असेल बहुतेक. शाळेत असताना कृष्ण झालेला तेव्हा हेडबाईची जरीची हळदी साडी त्याला पितांबर म्हणून नेसवली होती. त्यानंतर त्याने डायरेक्ट तो अंजिरी शालू नेसला असावा.

"श्रीया थोडी लेट येइल. तिच्या बॉसला अ‍ॅटेक आलाय."

जास्मिनचे ऑफिस अंधेरीला म्हणजे तीपण नाहीच येणार. मुंबईत आमच्या ग्रूपच्या आम्ही तिघीच. बाकी सर्व असेच दूर गेलेले.

"बोल धिका. तू काय घेणार?" माझं नाव राधिका. लहानपणीच कधीतरी सोन्याने त्याचं "धिका" करून ठेवलेले.

मी ऑर्डर दिली. तितक्यात श्रीया आली. आमच्या ग्रूपमधली ही तुलसी. सात्विक, सोज्वळ, गृहकृत्यदक्ष इत्यादि इत्यादि. मागच्याच वर्षी तिचं लग्न झालं.

"काय गं? आधी नाही का सांगायचं,, मी मग डबा नसता ना आणला." श्रीयाने आल्या आल्या तक्रार केली.

"सॉरी" सोन्याचे उत्तर. हल्ली हल्ली सोन्याला ही सवय लगली होती. पूर्ण वाक्ये बोलायचाच नाही. एक किंवा दोन शब्द!! हाच सोन्या दिवसच्या दिवस बडबड करून सर्वाचे कान किटवायचा लहानपणी.

श्रीयाची ऑर्डर झाल्यावर मी शेवटी विचरलं. "सोन्या, तुझी काल एंगेजमेंट झाली आणि तू बोलावले पण नाहीस आम्हाला!"

"सॉरी" परत तेच!

"सोन्या, कोण आहे तो??" श्रीयाने विचारले. मला आश्चर्य वाटलं. श्रीयाला पण माहित नव्हते?? आणि सोन्याची एंगेजमेंट काल झाली? मागच्याच आठवड्यात तर आम्ही भेटलो होतो .. तेव्हा सोन्या काहीच बोलला नव्हता!

"कोण तो?"

"तुझा नवरा गं बायो" मी आता वैतागले होते. सोन्या मोबाईलवर बहुतेक गेम खेळत असावा.

सोन्याने माझ्याकडे बघितले आणि म्हणाला, "तुम्हाला मी लग्न करतेय की ही माहिती कुणी दिली??? त्यालाच का नाही विचारत??""

मी श्रीयाकडे पाहिले. श्रीयानेच मला बातमी दिली होती. श्रीयाला कुणी दिली होती??

"इम्पॉसिबल!!" श्रीया अगदीच फिल्मी स्टाईलने म्हणाली. सोन्याने मान वर करून पाहिलं. आणि मग तो हलकेच हसला.

"मयुर???? " श्रीया परत एकदा म्हणाली आणि मला ४४० व्होल्टचा धक्का बसला.

मयुर शाह. आमच्या शहरातल्या शाह ज्वेलर्सचा मुलगा. म्हणजे हे अरेंज मॅरेज नव्हते हे नक्की!!

पण मयुर आणि सोन्या??? जोडी काही जमत नव्हती. मयुर अत्यंत हुशार, सिन्सीअर आणि पहिल्या बेंचवरचा पुस्तकी किडा. सोन्याने कॉलेजची तीन वर्षे कँटीनमधे आणि कट्ट्यावर काढलेली. रहायला आमच्याच गल्लीत होता. शिवाय मयुर आमच्या कॉलेअमधे पण नव्हता. कधीच इंजीनीअरिंग करून पुढे शिकायला यु एस ला गेलेला. नंतर तिथेच नोकरी करत होता. सोन्याने बी एससी करून नंतर कसलातरी कोर्स केला होता.

'पण सोन्या हे झालं कसं काय??' श्रीयाने विचारलं.

"काय मर्तिकाला आलाय? काय हो, कसं काय झालं? काल रात्रीपर्यंत बरे होते ना?" सोन्या उचकला.
"सोन्या, हे बघ. तू लग्न करतोयस हे समजलं, मयुरशी करतोस हेही समजलं, पण तुझी प्रेमकथा आम्हाला सांगितलीस तर जास्त बरे होइल ना?? " मी विचारलं.

आणि यानंतर जगातलं सातवं, आठवं कितवं असेल तितकंव्वं आश्चर्य घडलं.

सोन्या लाजला... सवय मोडायला हवी. सोनुली चक्क लाजली. जगातल्या कुठल्याही मेकपने आला नसता असा गुलाबी रंग तिच्या गालावर आला!! आम्हीच लहानपणापासून पाहिलेली सोनालिका इतकी सुंदर दिसू शकते हेच मला खरं वाटेना!

"मयुरने मला आठवीत असताना प्रपोज केले होंतं. मी त्याला परवा हो सांगितलं." ती हळूच कुजबुजल्यासारखं बोलली.

"हे जरा जास्तच संक्षिप्त स्वरूपात होतय," श्रीया.

सोन्याने केसातून हात फिरवला. खुर्चीवर मागे डोके टेकलं आणि दीर्घ उसासा सोडला. सोन्यासर तासभर बोलायचे असले की अशी तयारी करतात. म्हणजे आता एक दोन वाक्यात उत्तरे द्या हा प्रश्न संपून थोडक्यात उत्तरे द्या चालू झालं होत..

श्रीयाने तिच्या मोबाईलचा रेकॉर्डर ऑन केला. मी का म्हणून विचारले तर तिने मला गप्प रहायला सांगितलं. बहुतेक ही क्लिप ती ग्रूपमधे सर्वाना मेल करणार असेल. श्रीयाच्या डोक्यात असल्या भन्नाट आयडिया कायम असायच्या.

"दिवाळीची सुट्टी चालू होती. आपण त्या दिवशी कॉलनीत लपंडाव खेळत होतो. मयुर आपल्यात कधीच खेळायला यायचा नाही. गच्चीवर बसून बघायचा फक्त. सर्वात मोठा बंगलेवाला होता ना तो!! तो दहावीत होता तेव्हा. आणि आपण सर्वजण आठवीत. जास्मिन सहावीत आणि अर्नब नववीत. मयुर कसल्याशा क्लासवरून परत येत होता. बघावं तेव्हा क्लासेसलाच जायचा तो!! तिन्हीसांज झालेली होती. सर्वाच्या आया अभ्यासासाठी हाक मारत होत्या. मी जास्मिनच्या घराच्या गेटच्या मागे लपले होते. मयुरने मला रस्त्यावरून पाहिलं. आणि तो उगाचच ओरडला. "सोन्या इथे लपलाय" त्याची आणि माझी तशीपण खुन्नस होतीच. त्याच्या सायकलमधली हवा काढताना त्याच्या गड्याने एकदा बघितलं होतं मला..

मी गेटमधूनच गप्प रहा अशी खूण केला. पण मयुर एक नंबरचा नालायक. तो गेटमधे उभं राहून हसत होता. "गप्प रहा, नाहीतर याद राख" मी त्याला ह़ळूच आवाजात धमकी दिली. "नाहीतर काय करशील?" तो मुद्दाम जोरात ओरडला. पण बिच्चारा, तवर बावळाटासारखा अर्नब आऊट झाला होता. कायम पितळेकाकाच्या आंब्याच्या झाडावरच लपायचा. मी हसत हसत गेटमधून बाहेर आले. "मयुर, तुझी आयडिया फेल गेली. मी आऊट नाही झाले."

यावर त्याने अचानक माझा हात पकडला. आणि माझ्या डोळ्यात डोळेघालून वगैरे म्हणाला, "मी तर कधीच हिट विकेट झालोय. पण तुला अजून नाही समजलं." आयुष्यात पहिल्यादा मला अंगावर काटा येतो म्हणजे काय ते समजलं. इतर वेळी असते तर मयुरला सरळ मारून ठोकून काढला असता. पण तेव्हा ते का कुणास ठाऊक जमलंच नाही!! मी तिथून सरळ घरी पळून निघून गेले. कुणालाच याबद्दल काही बोलले नाही. एकटी दिसले की मला मयुरने एक दोनदा वाटेत अडवून परत असेच काहीतरी विचारलं. मी काहीच उत्तर दिलं नाही. मयुर चांगला मुलगा होता पण मला तेव्हा हे असे प्रेम वगैरे काही करायचं असतं. वगैरे समजतच नव्हतं. धिका त्या मानाने चाप्टर होती. फर्स्ट इयरच्याही आधीच तिने "मी अर्नबशी लग्न करणार" हे सांगून टाकलं "

"हो, ग्रूपमधे काय गहजब उडाला होता ना?? अर्नब तर काहीच बोलत नव्हता"

अर्नब त्या दिवशी बोलत नव्हता कारण त्याची दाढ दुखत होती. पण मला माझीच लव्ह स्टोरी ऐकण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता.

"मग मयुरचं काय झालं??"

"ह्म्म... काहीच नाही. मी एकदा त्याला स्पष्टपणे मला यातले काहीही जमणार नाही हे सांगितलं. तो म्हणाला की ठिक आहे, मी वाट बघेन."

वेटर आमची ऑर्डर घेऊन आला. सत्कारच्या मानाने ऑर्डर बरीच लवकर आली होती.

"पुढे काय झालं?"

"मग काय होणार? मयुर इंजीनीअरिंगला निघून गेला. तिथून यु एसला गेला. श्रीया त्याच्या टचमधे होती. म्हणजे जीटॉक, फेसबूक वगैरे. मी कधीच त्याला अ‍ॅड केलं नाही. करावंसं कधी वाटलं पण नाही. पण तो गेल्या वर्षी परत आला. इथे मुंबईमधेच काम करायचा. श्रीयाकडून त्याने सहज आपल्या सर्वाचे नंबर घेतले.तुम्हाला कुणालाच फोन नाही केला पण मला मात्र केला."

जवळ जवळ बारातेरा वर्षानी??? मानलं पाहिजे या मयुरला!!

"पण तवर त्याची एक गर्लफ्रेंड होती. त्यामुळे त्याला आता फक्त अ‍ॅज अ फ्रेंड रहायचं होतं" सोन्या इथ हसला. नक्की कशाला ते समजले नाही.

"पण मग हळू हळू आमच्या गप्पा वाढत गेल्या. आम्ही एक दोनदा भेटलो सुद्धा! मयुर आता खूपच बदललाय. लहानपणी कसा बावळ्ट्ट आणि शामळू वाटायचा ना?? आता एकदम शांत आणि विचारी वाटतो. पण चेहर्‍यावरचे भाव तेच!!! मागच्या आठवड्यात इंडिया ऑस्ट्रेलिया मॅच होती ना तिची माझ्याकडे पाच तिकिटे होती. पण तुम्ही सर्व मूर्ख आणि घोंचू लोक ऑफिस चुकवून मॅच बघणं हे पाप मानता त्यामुळे तुम्ही कुणीच आला नाहीत. मयुरला सहज जीटॉकवर म्हटलं तर तो म्हणे चल मी पण येतो. त्यामुळे उरलेली तीन तिकिटे विकली. काय मस्त होती मॅच. सचिनची सेंचुरी झाली. पाँटिंग १५ वर बोल्ड आणि भज्जीने चार विकेट्स घेतल्या. तुम्ही तर टीव्हीवर पाहिली नसणार मॅच! अरे लाईव्ह मॅच बघणं काय आहे हे तुम्हाला असं सांगून नाय समजणार.."

सोन्या रूळ बदलत होता पण आता त्याला थांबवला असता तर सोन्या भडकलाच असता. क्रिकेटबद्दल काहीही उलट सुलट बोलायचे ते पण सोन्यासमोर???????

"आपली इनिंग संपली होती. ऑस्ट्रेलियाच्या पाच ओव्हर झाल्या असतील. तितक्यात मयुर मला म्हणाला की आज ५ नोव्हेंबर २००९ आहे. म्हटलं मग? तेव्हा तो मला म्हणतो काय? तर आजपासून बरोबर बारा वर्षापूर्वी मी तुला प्रपोज केलं होतं याच दिवशी याच वेळेला. आज परत करतोय. आज नाही म्हणालीस तर अजून बारा वर्षानी करेन." त्याच्या हातात एक हिर्‍याची अंगठी. आजूबाजूला नुसता आरडाओरडा आणि जल्लोष! यामधे तो काय बोलतोय हे धड ऐकू पण येत नव्हतं. आमच्या आजूबाजूचे सर्व जण नुसते ओरडत होते आणि मयुर मला लग्नासाठी विचारत होता. सर्वात जास्त मला भावलं त्याचं हे रूप. मयुरने अख्ख्या आयुष्यात क्रिकेटची मॅच पाहिली नाहिये. पण मला क्रिकेट आवडतं म्हणून त्याचा हा प्लान. आईच्यान!!! काय सही वाटलं होतं त्या वेळेला. ते सोनेरी क्षण बिण वगैरे काय म्हणतात ना तसं अगदी! ऑस्ट्रेलियाची एक विकेट गेली होती. आणि मयुर मी माझ्या डोळ्यात डोळे घालून बघत होता. त्याने प्रपोज केल्या केल्या ऑसीजची एक विकेट गेली. मग मी त्याला नाही कसं म्हणणार?? मला हो म्हणावंच लागलं. आणि आता नकार देण्यालायक काही कारण पण नव्हतं ना!!!"

सोन्याचे लॉजिक सही होतं, पण इंडिया मॅच हरली, हे सोन्या बहुतेक प्रेमकथेमधे विसरला असावा. आणि आता सांगून उपयोग नव्ह्ता. मयुरने तिला क्लीन बोल्ड केलेलेच होतं.

"मला अजूनही समजलं नाही, की मयुरने माझ्यात काय पाह्यलं? मी काय फार सुंदर नाही, फार श्रीमंत बापाची आहे असंही नाही पण तरीही मयुरला मी १२ वर्षानंतर आवडते हे ऐकूनच मला कसंतरी झालं! श्री, धिका,.... मी योग्य निर्णय घेतलाय ना??"

"सोन्या, मयुर तुझ्यासाठी एकदम लायक आहे. काळजी करू नकोस." श्रीयाने तिच्या हातावर हात ठेवला.

मला मयुरची जास्त काळजी होती!!

"हो. पण मला खूप भिती वाटतेय. की मला हे सर्व निभावेल का? घर संसार नोकरी आणि इतर सर्व.." सोन्या खरंच घाबरला होता. लहानपणी मारुतीच्या देवळात राहणार्‍या पुजारीणीला बघून घाबरायचा तस्साच.

यानंतर श्रीयाने तिला भलंमोठं लेक्चर दिलं. रिलेशन्शिप, संसार, वर्किंग वूमेन.. तिच्या पी एच डीचे विषय असल्यागत ती तासभर बोलली. सोन्या शांतपणे ऐकत होता. आणि मी पण. मी अर्नबबरोबर्लग्न करायच्या आधी श्रीयाने हेच लेक्चर मला दिलं होतं. आणि स्वतःच्या लग्नाच्या आदल्या दिवशी तर अख्ख्या ग्रूपला बसवून हे सर्व ऐकवलं होतं.

"ते सर्व खरय पण तरीपण भिती वाटते." सोन्या म्हणाला.

"सोन्या, तुला माहितीये का की मला पण अशीच भिती वाटत होती. मी अर्नबला ओळखत असल्यापासून.. त्यामुळे घाबरू नकोस, तुझ्यावर आणि मयुरवर विश्वास ठेव. बाकी सर्व काही ठिक होइल. आणि बेस्ट ऑफ लक" सोन्या हसला. "थँक्स!"

वेटर येऊन बिल देऊन गेला. सोन्याची प्रेमकथा ऐकता ऐकता तास होऊन गेला होता. आता ऑफिसमधे गेले नाही तर बॉसने मला एक भयकथा ऐकवली असती.

आम्ही सत्कारच्या बाहेर येऊन टॅक्सी शोधत होतो. तित्तक्यात मला काहीतरी आठवलं.

"सोन्या, तू तुझं नाव सार्थ केलेस."

"म्हणजे?"

"अरे सोन्या, तू ज्वेलर्सच्या घरात चालली.,..."

आमची सोनुली परत एकदा लाजली. आणि मला अर्नबच एक वाक्य आठवलं..

तो एकदा म्हणाला होता... "जगातली सगळ्यात सुंदर स्त्री कुठली? कुणाच्या तरी प्रेमात पडलेली आणि त्याच्या आठवणीनेसुद्धा लाजणारी!!!"

समाप्त!

गुलमोहर: 

सोन्याला पुढील वैवाहीक आयुष्याच्या वाटचालीसाठी मना पासुन शुभेच्छा......
कथा भारी आवड्ली

किती गोड! Happy
साधीसुधी प्रेमकथा Wink वाचायला छान वाटलं

(अगं, कालच ही कथा पोस्ट केली होतीस ना? आणि त्यावर बरेच प्रतिसादही होते ना? ती उडवलीस का? :अओ:)

मस्त. डायलॉग्ज क्यूट. सोन्या आणि धीकाची कॅरेक्टर्स पण झकास जमलीयत. अगदी थोडक्या शब्दांत करता आलय तुला ते. फक्त सोन्याची अ‍ॅक्चुअल लव्हस्टोरी -त्याचं प्रपोज करणं, तिचं हो म्हणणं तो भाग गंडला. इतर स्टोरीच्या मानाने.
सोन्या आणि तिला टेन्शन असलेला तिचा संसार मस्त खुलवता येईल तुला अजून. तेव्हा पार्ट २ येणे मस्ट. तसंही आहे तो शेवट वाटत नाहीये शेवट आहे असं. ओपन एन्ड टाईप वाटतोय.

धन्यवाद..

ट्युलिप. ते लिहत असताना कथमधे एक कथा इतका मोठं होत होतं. पण सोन्याचा लग्नसमारंभ यावर मात्र विचार चालू आहे. टिप्पिकल मारवाड्याच्या लग्नात सोन्याची काय अवस्था होईल हाच विचार चालू आहे!!!!

शाळेत असताना कृष्ण झालेला तेव्हा हेडबाईची जरीची हळदी साडी त्याला पितांबर म्हणून नेसवली होती. त्यानंतर त्याने डायरेक्ट तो अंजिरी शालू नेसला असावा.
हे भारीच!!!!!!!!!
मस्त जमलीय कथा. आता टिप्पिकल मारवाड्याच्या लग्नात सोन्याची काय अवस्था होईल त्यावर लवकर लिही.
वाट पहाते.

तो एकदा म्हणाला होता... "जगातली सगळ्यात सुंदर स्त्री कुठली? कुणाच्या तरी प्रेमात पडलेली आणि त्याच्या आठवणीनेसुद्धा लाजणारी!!!">> हे फारच आवडलं.

शेवटचं वाक्य लै भारी बर्का !!!
सोन्याची प्रेमकथा थोडक्यात आटोपल्यासारखी वाटली. फक्त दोन प्रसंगात. पर जो है वो मस्त धमाल है.... भाग दोनची नक्कीच वाट पहातोय.

छानच आहे पण जरा छोटी वाटली. थोडी अजून खुअलवली असतीस तर खूपच आवडली असती. पण जाउदे ! मग ते क्रमशः आले असते आणि मगे ते तारीख पे तारीख ! त्यापेक्षा हे बरे Happy

रच्याकने रेहान नसलेल्या कथा बहुतेक पूर्ण होतात. आता तू रेहान हे नाव बादच करून टाक.

मस्त झालीय कथा. संवाद एकदम झक्कास.
कथेची पार्श्वभूमी मस्त तयार केलीस. मजा आली वाचायला. Happy

>>>>>"जगातली सगळ्यात सुंदर स्त्री कुठली? कुणाच्या तरी प्रेमात पडलेली आणि त्याच्या आठवणीनेसुद्धा लाजणारी!!!"
क्या बात है!!

Pages