‘कॅलस इन कन्सर्ट’ - मी पाहिलेला एक अप्रतिम ‘ऑपेरा’

Submitted by दीपा जोशी on 2 October, 2018 - 17:15

callas-in-concert 2_1.jpg

‘ऑपेरा’ ही एक इटालियन रंगमंचाची संगीतमय कलाकृती.

ह्या कलाकृतीचा संगीत हाच आत्मा असतो, आणि प्रत्यक्ष गायकाचा रंगमंचावर प्रमुख सहभाग असतो. थोडक्यात ऑपेरा म्हणजे संगीत नाटकाचाच इटालियन अवतार. तसा ‘ऑपेरा’ हा शब्द, पूर्वी कानावरून गेलेला होता. पु.ल देशपांडे यांनी ब्रेश्ट च्या ‘थ्री पेनी ऑपेरा’ चे केलेले मराठी रूपांतर ‘तीन पैशाचा तमाशा’ मुळे- ऑपेरा हा काही पाश्चिमात्य नाट्य-प्रकार असावा एवढे माहित होते. म्हणून, सध्याच्या अमेरिकेतील मुक्कामात कॅलिफोर्निया राज्यातल्या ‘डेव्हिस’ नावाच्या गावात एका जगप्रसिद्ध ऑपेरा गायिकेचा आगळा-वेगळा प्रयोग पाहायची आलेली संधी मी सोडली नाही.

मारिया कॅलस हे त्या गायिकेचं नाव. संगीत आणि नाट्य यांचा अंतर्भाव असणाऱ्या ऑपेरा प्रकारातली ती अनभिषिक्त राणी मानली जाते. तिची नाट्य गायन कला अद्वितीय अशा प्रकारची होती.
ह्या ऑपेराचे वेगळेपण म्हणजे, त्यातली गायिका सध्या हयात नाही. पण आधुनिक ‘होलोग्राम’ तंत्राचा वापर करून प्रत्यक्ष तिला रंगमंचावर गाणे सादर करताना दाखवले गेले. ‘होलोग्राम’ मध्ये लेसर किरणे आणि डिजिटल टेकनॉलॉजी वापरून त्रिमिती आकृती निर्माण केली जाते. भूतकाळातल्या संगीत -नाटक कलाकृती अशा रीतीने पुनः सादर करता येतात.

आधी, मारिया कॅलस बद्दल थोडं सांगितलं पाहिजे.

मारिया कॅलस ही विसाव्या शतकातली एक प्रसिद्ध आणि प्रतिभावंत ग्रीक ऑपेरा गायिका. १९२३ साली अमेरिकेत जन्मलेली, एका ग्रीक दाम्पत्याची तिसरी मुलगी. तिच्या आईला ती जन्मली तेव्हा मुलगा हवा होता. पण पहिल्या एका मुलीनंतर परत मुलगीच झाल्याने ती इतकी निराश झाली की, चार दिवस तिने तान्ह्या मारियाचे तोंड पाहिले देखील नाही.

वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून मारियाची गायन कला आकार घेऊ लागल. तिच्या आईच्या हे लक्षात आल्यावर आईने लहानपणापासूनच तिला व्यवसाय म्हणून रंगमंचावर सादरीकरण करायला लावलं . पुढे कौटुंबिक वादविवादांमुळे आई अमेरिका सोडून दोन्ही मुलींना घेऊन ग्रीस मध्ये अथेन्स ला परत गेली. अथेन्स मध्ये ग्रीक शास्त्रोक्त संगीत शिकवणाऱ्या, ‘ट्रेव्हेला’ नावाच्या शिक्षिकेच्या हवाली मारियाला केलं. त्यामुळे ग्रीक मध्येच मारियाची शास्त्रोक्त संगीत आणि नाटकाची कला विकसित झाली. ती ‘सोपेरानो’ गायिका होती. ‘सोपेरानो’ म्हणजे अतिशय उच्चं पट्टीच्या आवाजात गाणाऱ्या गायिका. विसाव्या वर्षी तिने पेललेल्या अनेक वजनदार भूमिका तिच्या गायन आणि नाट्य कलेचा मोठा आवाका विस्मयीत करणारा होता.

ग्रीस मध्ये अनेक कार्यक्रमांमधून आपली कला सादर केल्यावर आणि बऱ्यापैकी नाव कमावल्यावर, करिअर घडवायला १९४५ मध्ये बाविसाव्या वर्षी मारिया अमेरिकेला परत आली. अमेरिकेत तिला निकोल रोस्सी लेमेनी नावाचा एक इटालियन गायक-नट भेटला. तिच्या आवाजाची प्रत, त्यामधला भाव-अविष्कार, उबदार पण धारदार आणि वेगवेगळ्या लयीत येणारा आवाज पाहिल्यावर त्याच्या इटलिमध्ये होणाऱ्या ऑपेरासाठी त्याने ‘सेराफिन’ नावाच्या दिग्गज संगीत दिग्दर्शकाकडे तिला काम मिळवून दिले. इटलीमधील ओपेरांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या ‘व्हेरोना’ मध्ये तिची गायन कला पाहिल्यावर सेराफिन ला तिच्या आवाजाची ताकद, त्यातला वेगळेपणा लक्षात आला . पुढे त्यानेच तत्कालीन ऑपेरा नाट्य संगीतातले अनेक बारकावे शिकवून तिचे संगीत शिल्प अधिक घोटीव आणि देखणे बनण्यास मदत केली. त्यामुळेच इटलीमध्ये तिची नाट्य - गायन कला बहरली.

१९५० हे वर्ष म्हणजे मारियाच्या कारकिर्दीचा कळस. युरोप, अमेरिका, फ्रान्स मध्ये तिचे अनेक कलाविष्कार संस्मरणीय ठरले. ऑपेराचा इतिहास बदलावणारी गायिका अशी तिची ख्याती झाली . मारिया म्हणजे ऑपेराचं बायबल असं समजलं जाऊ लागली!

तर अश्या या जगप्रसिद्ध गायिकेच्या १९७७ मध्ये पॅरिस येथे झालेल्या मृत्यूनंतरही तिची अमर्त्य कला जशीच्या तशी, ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्याची संधी ‘कॅलस इन कॉन्सर्ट’ या ऑपेरा कार्यक्रमात मिळाली.

पूर्णतः भरलेल्या अवाढव्य थिएटर मध्ये प्रवेश करतानाच अनेक जणांकडे दुर्बीणी दिसून आल्या. आम्ही आमचे मोबाईल्स बंद केले. अंधारलेल्या भव्य रंगमंचावरचा पडदा हळूहळू उघडत असतानाच तिथे आधीच उपस्थित असलेल्या वाद्यवृन्दावर गडद निळा प्रकाश पसरत गेला.एवढ्या लांबून त्यांचे चेहरे दिसत नसले तरी हातातली वाद्ये दिसत होती. व्हायोलिन, सेलो, व्हायोला, बास, फ्ल्यूट, ओबो, क्लॅरिनेट, बासून, हॉर्न, ट्रम्पेट, ट्रॉम्बोन, ट्युबा, तिंपनी, हार्प, इत्यादी वाद्यांची नावे त्यांनी दिलेल्या माहितीपत्रकात होती.

संपूर्ण काळ्या रंगाचा पेहराव घातलेली ‘कंडक्टर’ म्हणजे संगीत दिग्दर्शिका टाळ्यांच्या कडकडाटात प्रवेश करती झाली. प्रेक्षकांना अभिवादन करून ती वाद्यवृन्दाकडे वळली . तिच्या इशाऱ्यानुसार संगीताचे स्वर निर्माण होऊ लागले. नाजूक, तालबद्ध रचना सादर करताना वाद्यवृन्द अतिशय शिस्तबद्ध दिसत होता. तिच्यावर पडलेल्या पिवळसर प्रकाशामुळे एवढ्या लांबूनही तिचे हातवारे दिसत होते. एक सुंदर सुरावट सादर झाली.

प्रकाश हळूहळू मंद झाला.

आणि प्रकाशाच्या झोतात रंगमंचावर पांढरे शुभ्र रेशमी वस्त्र ल्यायलेली एक गोरीपान, उंच, सुंदर केशभूषा केलेली ललना प्रवेश करती झाली. पुनः टाळ्यांचा कडकडाट. तिचे चालणे आणि रंगमंचावर वाद्यवृन्दासमोर येऊन उभे राहणे अतिशय मार्दवपूर्ण होते. मान खाली झुकवून तिने सगळ्यांना दोनदा अभिवादन केले. तिचा पेहराव, उभे राहण्यातली नजाकत, एवढ्या लांबून तिचा चेहरा दिसत नसला तरी एकूण तिचं सौन्दर्य, मागच्या बाजूच्या मंद जांभळ्या प्रकाशातील वाद्यवृन्द ,आणि काळ्या पेहरावातील संगीत दिग्दर्शिका यांचे मिळुन एक मोहक दृश्य रंगमंचावर उभे राहिले. मंचावरची ललना प्रत्यक्षात नसून होलोग्राम द्वारा निर्माण झालेली मारिया कॅलस होती हे अक्षरशः खरं वाटत नव्हतं!

संगीताचे स्वर निर्माण होऊ लागले. मारिया डोळे मिटून, मान मागे झुकवून जणू स्वरांच्या विश्वात गेली होती. तिचे गाणे सुरु झाले, तसे मंचाच्या वरच्या बाजूला बोर्डावर ती गात असलेल्या गाण्याचे शब्द उमटू लागले. मारियाच्या उच्चं पट्टीच्या स्वरातले मनाला भिडणारे गाणे आणि त्याचा अर्थ समजावणारे शब्द यांच्या दुहेरी मिलाफाने अंगावर रोमांच उभे राहिले!!

एव्हाना ज्यांच्याकडे दुर्बिणी होत्या, ते त्या डोळ्यांना लावून समोरचे दृश्य जवळून पाहायचा आनंद घेत होते. आम्हाला सुद्धा शेजारच्या अमेरिकन बाईने तिचा आनंद अनावर होऊन समोरच दृश्यं पाहायला दुर्बीण दिली. त्यामधून रंगमंचावरचे दृश्य काही फुटांवर पाहताना हावभावांसहित तल्लीनतेने गाणे म्हणणारी मारिया कॅलस ही होलोग्राफी द्वारा निर्माण झालेली प्रतिमा आहे यावर विश्वास बसत नव्हता. गाताना मध्ये मध्ये डोळे मिटत होती, जणू दुसऱ्या विश्वात जात होती. तिच्या आवाजातली आर्तता तिच्या चेहऱ्यावर प्रकट होत होती.
पहिले गाणे संपले आणि टाळ्यांच्या कडकडाटात पुनः पुनः अभिवादन करून मारिया विंगेत गेली .

मारियाने पुन्हा प्रवेश केला तेव्हा खांद्यावर लाल ओढणीसारखे वस्त्र घेतले होते. त्यामुळे तिचे हावभाव अधिकच उठून दिसत होते. आणखी काही गाणी सादर केल्यावर तिचे शेवटचे गाणे संपले. वाद्यवृन्द स्तब्ध झाला. चार पाच क्षण सगळीकडे एकदम निःशब्द शांतता पसरली. आणि टाळ्यांच्या कडकडाटात संपूर्ण थिएटर दणदणून गेले. बरेच जण नकळत तिला मानवंदना देण्यासाठी उभे राहिले.

होलोग्राम द्वारा निर्माण झालेल्या मारियाचा रेशमी पेहेराव, तिची भूमिकेशी तल्लीनता, आवाज, हावभाव, यांचे उत्कृष्ट सादरीकरण आणि याबरोबर असणारा सुसंगत वाद्यवृन्द यामुळे हा ऑपेरा खरोखर अतिशय निखळ आनंद देऊन गेला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव!!! खूप छान अनुभव आणि तुम्ही लिहिलेलं वाचून आयुष्यात एकदा तरी पाहता यावा अशी इच्छा झाली Happy

वॉव!!! खूप छान अनुभव आणि तुम्ही लिहिलेलं वाचून आयुष्यात एकदा तरी पाहता यावा अशी इच्छा झाली >>>

+१

ब्राव्हो, सुंदर अनुभव !

तुमच्या ह्या सुंदर अनुभव लेखनामुळे आठवले - काही वर्षांपूर्वी वेरोना भेटीत प्रथमच मारिया कॅलस हे नाव ऐकले. शहरापासून थोडे दूर झेव्हिओ भागात तिचे घर आहे, तिथे एक प्रदर्शन बघितले होते. आता तिथे एक म्युझिअम आकाराला आले आहे असे ऐकतो.

काहीतरी वेगळे वाचायला मिळाले. होलोग्रामने व्यक्ती उभी करणे, तिची रेकॉरडेड गाणी लावणे व त्या व्यक्तीच्या हालचाली व स्टेजवर असलेल्या वाद्यवृंदाने त्या समवेत वाजवणे सिंक्रोनाईज केलेले प्रत्यक्षात पाहणे खूप भारी वाटत असेल.

इथले वाचून यु ट्यूबवर शोधले. कॅलस चे एक दोन व्हिडीओ पाहिले, डोळ्यांना दिसतेय ती व्यक्ती प्रत्यक्षात तिथे नाही यावर विश्वास ठेवणे खूप जड जात होते. पण दोन तीनदा ती व्यक्ती पारदर्शक होऊन मागचा वाद्यवृंद दिसला त्यामुळे विश्वास ठेवावा लागला.

पण तिच्या चाहत्यांनी ह्यावर खूप टीका केलीय.

खूप छान वर्णन.

असंच एकदा 'द फँटम ऑफ ऑपेरा' बघितलं होतं (ब्लु रे डिस्कवर) त्याची आठवण आली.