शाही आजोळपण.....

Submitted by कृष्णा on 3 November, 2009 - 01:02

शाही आजोळपण.....

आज किती वर्षांनी त्या वाटेवरून जात होतो.. वीस एक वर्ष तर नक्कीच झाली असतील.. ह्याच ठिकाणी गेले ते बालपणीचे सुट्टीचे रम्य दिवस... कधी वाड्याच्या रस्त्याला गाडी वळवली कळलेही नाही.. पण अगदी परिचित वाडा कुठेच दिसेना.. एक मोठी इमारत त्याच्या नामशेषाची साक्ष देत होती......... त्या इमारतीकडे बघता बघता तो माझा आजोळचा प्रशस्त वाडा उभा राहिला.. आमचे दर सुटीचे हक्काचे ठिकाण.. त्या सुट्टीच्या बळावर काढलेले शाळेचे खडतर बालपण... लहानपणीचा त्या शाळा या छळवादातून आमचा एकमेव सुटकेचा मार्ग म्हणजे सुट्टी आणि ती ही अशी सुट्टी

आम्ही सात भावंड.. तात्यांची जिथे बदली असेल त्या गावी आमचा मुक्काम. शाळा संपत आल्या की आम्हाला वेध लागायचे सुट्टीचे. कारण सुट्टी म्हणजे आजोळी जायचे. आजोळ म्हणजे अक्षरश: नंदनवन... आईचे वडील म्हणजे आमचे आजोबा पीआर.काका हे एक बडं प्रस्थं. वतनदार.. आमची आई त्यांची ज्येष्ठ कन्या. खरंतर मोठा अण्णा मामा म्हणजे अनंत मामा.. मग आमची आई म्हणजे अक्का.. माहेरची गोदू... आणि सगळ्यांची अक्का.. मी आणि पुपडी वगळता आमची मोठी भावंडंही तिला अक्काच म्हणायचे. मग कंठू मामा म्हणजे नीळकंठ नंतरची कुसुम मावशी.. मग राममामा.. हा आमचा अत्यंत लाडका मामा, मग मंदा मावशी, विजू मावशी, सुंदा मावशी.. त्या तिघी नंतर अरू मामा म्हणजे अरविंद, शशी मामा म्हणजे भरत आणि छोटी मावशी हेमा मावशी. असा मोठा परिवार.

आजोबांना सगळ्या पंचक्रोशीत पीआर काका म्हणून संबोधायचे. ते एके बडं प्रस्थं.. कुठे काही तंटा झाला सगळे पीआर काकांकडे धाव घ्यायचे.. काही सल्ला हवाय जा पीआर काकांकडे. अन काकांच्या शब्दा बाहेर जायचा कोणी प्रयत्नही करायचे नाही.. संपूर्ण गावात पीआर काका म्हणून प्रसिद्ध असलेल्या काकांना आम्ही घरातही सगळी काकाच म्हणायचो आणि आजीला मामी.. आमची आजी म्हणजे साक्षात देवी भासायची. सदैव प्रसन्न हसतमुख मुद्रा, लख्ख गोरा रंग, कपाळावर मोठं कुंकू.. खूप प्रसन्न वाटायचं तिच्याकडे बघूनही,.. मला तर लहानपणी गोष्टी ऐकताना देवीची गोष्ट आली की आजीचाच चेहरा यायचा डोळ्यापुढे देवी म्हणून.. काका त्या मनाने सावळे पण मोठे करारी आणि कणखर वाटायचे.

तर सुट्ट्यांची चाहूल लागली की आमची नजर दारावर येणार्‍या पोस्टमनकडे असायची.. त्याने चला "जी ए जोशी" म्हणून पत्र टाकलं आणि ते पोस्ट कार्ड असलं की एखादा देवदूत आल्याचा आनंद व्ह्यायचा आम्हाला.. ते हमखास काकांचे पत्र असायचे तात्यांना.. मुलांना घेऊन सगळ्यांनी सुट्टीस येणे असा काहीसा मजकूर आणि खाली लपेटेदार "दत्ता" अशी सही.. मग काय विचारता आमची लगबग... जायचं म्हणून नुसती घाई.. आम्हीही सात भावंड आमचं सगळ्यांचं आवरून जायचं म्हणजे मग आईचीही धावपळ व्हायची पण तेव्हापासूनच आम्ही मात्र मनाने कधीच पोचलेलो असायचे.

प्रवासाला निघायचे म्हणजेही एक सोहळाच असायचा .आम्हा सगळ्यांचे सामान म्हणजे एक मोठा पेटाराच व्हायचा. तात्या आम्हांस बसवून द्यायला यायचे. त्यात मोटारी कमी, एस्टी ने जायचे.. मग किती तरी वेळ वाट बघणे मग तो प्रवास.. मला तर असे व्हायचे कधी एकदाचे गाव येते. त्यात मी शेंडेंफळ त्यामुळे लाडोबा.. दर दहा मिनिटाला आईला विचारायचो कधी गं येणार?.. सारखी हिच भुणभुण.. मग आई करवादे.. ताई ,माई, दादा आळीपाळीने मला समजावून सांगे येईल हं आता... मग असा तो एकदाचा प्रवास संपला गाडी स्टॅण्ड वर थांबली की हमाल हजरच असे त्याला सांगावेही लागत नसे कुठे जायचे ते.. एवढा मोठा गोतावळा म्हणजे पीआर काकांकडेच.. मग वाडा दृष्टिपथास आला की माझी पावलं झटाझट पडायला लागत... वाड्याचे ते भव्य दर्शन सुखावून जाई.. आत जायला मोठेच्या मोठे दार.. चौदा पंधरा खोल्या तर नक्कीच असतील वाड्यात. आत प्रथमदर्शनी मोठा दिवाणखाना.. त्याच्या भिंतींना पोपटी रंग दिलेला..... तिथे एक लोखंडी पलंग.. त्यावर जाजम आणि समोर मोठी सतरंजी अंथरलेली.. त्यावर लोड, तक्के, पानदान. काका काहीतरी वाचीत बसलेले, डोळ्यावर चष्मा, एका हातात विडी, डोके पुस्तकात... मग आमची चाहूल लागली की वर बघून आत बघत आजीला सांगायचे
"अहो कोण आलंय बघा गोदी आणि मुलं आली.. जरा तुकडा आणा "
मग आजी हसत लगबगीने तुकडा पाणी घेऊन यायची पण आम्हाला तोवर धीर नसायचा. कधी एकदा आत जातो असे व्हायचे.. तो तुकडा उतरवण्याचा कार्यक्रम पार पडला की धूम आत.. आधी सगळ्या खोल्या पालथ्या घालायच्या कोण कोण आलंय ते बघायचं, मामा सगळे आले असायचे मावश्या एक दोघी येणार असायच्या.

मग काय विचारता घर नुसते भरून जायचे चिवचिवाटाने.. मग सगळ्यांच्या पाया पडायचा कार्यक्रम व्हायचा.. काकांच्या पाया पडताना "आलास कृष्णा?" म्हणून जवळ घ्यायचे. आम्ही सात भावंडं पण माझा जन्मानुक्रम आठवा आणि शेंडेफळ त्या मुळे आजोबा नेहमी ’कॄष्णा’ म्हणूनच हाक मारत. राममामाच्या पाया पडताना तो हमखास माझ्या पाठीत धपाटा घालायचा की मी कोलमडायचो ,एक तर सुदाम प्रकृती.. मग मोठ्याने हसून म्हणायचा
"काय जोशीबुवा अक्का खायला घालत नाही का तुम्हाला? "
पण तरीही आमची स्वारी हसत असायची. रामा मामा होताच तसा सगळ्यांचा लाडका.. आम्हा मुलांना तर जबरदस्त कारण आमची प्रत्येक हौस पुरवणारा म्हणजे राममामा.. तितक्यात आजीचा आवाज यायचा
"हातपाय धुतले ना.. या आत"
आजीचा कटाक्ष असायचा हातपाय धुण्यावरत्याशिवाय ती आम्हाला स्वैयपाकघरात येऊच द्यायची नाही..
सगळे मामा आलेले असायचे मावश्या बहुतेक असायच्या.. मग आम्ही सगळीमावस, आते, मामे भावंड, मावसं भावंड जवळपास ३०-३५ मुलं हुंदडायला मोकळे.. काय काय बोलू अन काय करू असे व्ह्यायचे.. सगळा वाडा अगदी गजबजून गेलेला असायचा मुलांच्या दंग्याने.. चिवचिवाटाने.. अजून कानात गुंजतोय तो भरल्या वाड्यातला आवाज... अजून असे वाटते की मामाची हाक येईल.. काका दिसतील.

एकदा आलो की मग वाड्यातला दिवस पहाटेच सुरू होई. आमचा हा वाडा म्हणजे खूप मोठा. तिथे दोन जुन्या वाड्याच्या बखळी. एक मोठा आड, आणि देवीचे मंदिर. या मंदिराचा सगळा कारभार आजी कडे. त्यांमुळेच मला देवी म्हटली की आजीच आठवते.. एक तर तिचे दिसणे, प्रसन्न स्वभाव आणि कायम हे मंदिर. वाड्यासमोर मोठे चिंचेचे झाड. त्याखाली यथेच्छ खेळ, काळ वेळ तहान भूक विसरून खेळणे .बरं आम्ही घरातलेच इतके भावंड जमायचो की बाहेरून कोणी खेळायला यायची गरजच नसायची. घरभर मुले अन माणसे.. पन्नास साठ होत असतील एकंदर आणि त्या चिंचेच्या झाडामागे बारव.. तिथे दुपारी कपडे धुण्याचा कार्यक्रम चाले बायकांचा... ही कामे पण विभागलेली असत.. आजी, आई, कुसुममावशी आणि माम्यांकडे स्वयंपाकघर.. त्या सदोदित स्वयंपाकात गुंतलेल्या बाकी लहान मावश्या व मोठ्या बहिणीकडे मग पाणी, मुलांचे आवरणे, कपडे धुणे वैगरे कार्यक्रम.

भल्या पहाटे काका उठत. मोठा तांब्याचा बंब होता तो स्वत: पेटवत.. अजून एक चूलही पेटलेली असे त्यावर मोठी डॆग तांब्याची तिला खालून जाळ घालावा लागे. मग अंघोळींचा मोठा कार्यक्रम चालू होई. आधी मोठ्यांच्या अंघोळी मग लहानांचा नंबर.. असा जवळपास साडेआठ नऊ पर्यंत तो कार्यक्रम चाले आम्ही मुलं मोठ्या बहिणींनी मावश्यांनी बारवेवर शेंदून दिलेले पाणी आणत असू जमेल तसे. मग दोघी तिघींकडे अंघोळीची व्यवस्था. म्हणजे एका बादलीत चार मुले.. असे गणित.. मग चार मुलांना रांगेत बसवून त्यांना अंघोळ एकजण घालत असे.. लगेच दुसरी अंग पुसून त्यांना कपडे चढवणे तोवर तिसरीने नाश्त्याची तयारी करणे. अंघोळ झाल्य़ा खेरीज नाश्त्याच्या खोलीत प्रवेश नसायचा. मग सगळ्यांना एका रांगेत बसवून नाश्ता, दूध चहा जे असेल ते.
बर्‍याच जणांना दूध नको असायचे.. चहा हवा असायचा.. मुख्य म्हणजे मला.. मग चहा मागितला की आजी म्हणायची
"अरे चहा पिऊ नये.. काळ होत माणुस चहा पिऊन"
"आजी तू पितेस चहा मग तरी तू इतकी गोरी गोरी कशी? "
त्यावर मग मोठ्याने राममामाचा आवाज आलाच म्हणून समजायचे
"अहो मास्तर गप्प बसा.. " मला म्हणायचा
"जोशीबुवा अजून व्हाल खोकड चहा पिऊन.. दूध प्या मुकाट्याने"

आम्ही येणार म्हणून काकांनी तीनचार दुभत्या गाई घेतलेल्या असायच्या. परसातल्या गोठ्यात त्या बांधलेल्या असत. एकजण यायचा पहाटे धार काढायला.. मग ते ताजे दूध सगळ्यांना पिण्यासाठी मस्त खरपूस तापवून चुलीवर.. अवर्णनीय चव.. अजून रेंगाळतेय त्या दुधाची चव..
नाश्ता झाला की मग आमची खेळण्याची घाई.. मुलांचे वेगळे खेळ, मुलींचे वेगळे.. जोरदार भांडणे पण व्हायची लहान मुलांमधील भांडणे मोठी भावंड सोडवायची पण ती ही क्षणिक.. परत हसत खेळायला सुरवात.. चिंचे खाली गाभुळलेल्या या चिंचा शोधणे आणि खाणे हा जवळपास रोजचाच कार्यक्रम असायचा. कधी जेवणाची वेळ व्हायची पत्ता लागायचा नाही... मोठ्या बहिणींचे आणि मावश्यांचे हाका मारणे सुरू होई चला जेवायला.. हात पाय धुवा.. कारण पहिली पंगत लहान मुलांची, मग पुरुषांची आणि शेवटची बायकांची ,मोठ्या बहिणींची.... हसत खेळत गप्पा टप्पा होत जेवणं व्हायची.

एकदा जेवणं आटोपली की परत स्वयंपाक खोलीत मुलांना प्रवेश नाही.. अगदी पाणी पिण्यासातःइही. आजीला आवडायचे नाही स्वयंपाक घरातल्या माठात मुलांनी चबढब केलेली. मग आमच्या खेळायच्या खोलीत वेगळा रांजण भरलेला असायचा. परसदारी एक.. आम्ही पाणी प्यायला जरी डोकावलॊ स्वयंपाक खोलीत की आजी ओरडायची आले चोची बुचकळायला.... अजून ऐकू येतो तिचा आवाज......

खेळताना मात्र आमचा यथेच्छ संचार असायचा. काकांकडे दिवाणखान्यात कोणीतरी सतत आलेले असायचेच. त्या सतरंजीवर बसलेले असायचे काहीतरी चर्चा गप्पा यांची आवाज येत असायचे. समोरच्या पानदानात दोन तीन मोठ्या सुपार्‍या , मोठा अडकित्ता, पान, चुना, कात ठेवलेला असायचाच. काकांकडॆ संपतराव देशमुख आणि पांडू सातपुते हे नक्कीच असायचे. ह्या पांडू सातपुत्यांवरून आठवले हा इसम कायम लोडावर टेकून अघळपघळ लवंडलेलाच असायचा. मी जेव्हा जेव्हा बघितलय त्यांना तेव्हा तेव्हा ते असेच असायचे.. त्यावरून आमच्या घरात एक म्हणच तयार झाली होती. आजीही कोणी अवेळी लोळताना दिसले की म्हणायची काय रे तुझा पांडू सातपुते का झालाय?
घरी अभ्यास करताना झोपून लोळून वाचायला लागलो की आमचे तात्या देखील ओरडायचे
"अहो पांडू सातपुते नीट बसा" असे ही जितीजागती म्हण.. पांडू सातपुते होणे..
तर अश्या बेदम खेळण्यात मध्ये एक अडथळा असायचा.. दुपारचा.. दुपारी उन्हातखेळायचे नाही.. मग खोली मध्ये आमचे पत्ते खेळणे, गाण्याच्या भेंअड्या चंपल पाणी असे खेळ सुरू असायचे. त्या नंतरचा मोठा फतवा म्हणजे सगळ्यांनी झॊपायचे.. ती झोप म्हणजे मोठी शि़क्षा असायची पण आमची काही मात्रा चालायची नाही.. मग आम्ही त्या झोपण्याच्या खोलीतही हळूहळू आवाजात खेळायचो.. लपायचो अंथरुणात खुसखुस चालूच असायची. मग राममामा फार हुशार त्याला आमच्या ह्या प्रकारांची अगदी बित्तंबातमी असल्यासारखा त्याचा आवाज यायचाय
’काय चालय? झोपा गप्प"
एकतर राममामा एकदम भारदस्त शरीरयष्टीचा त्याचा आवाज ही पल्लेदार. आम्ही सगळी मग चडिचुप गडी गुप व्हायचो. तो गेला अशी चाहूल लागली की परत आमची खसखस सुरू.. हसणे, हळूच बोलणे. हळूच खेळणे.. मजा एकदम.

मोठी मुले पुस्तके वाचत. काकांना वाचनाचा खूप नाद ते सतत वाचत बसलेले असत एकतर कोणाबरोबर चर्चा किंवा वाचन. सिन्नरच्या नगरपालिका वाचनालयतल्या यच्चयावत पुस्तकांची अनेक पारायणं काकांनी केलेली. तिथला ग्रंथपाल सुद्धा म्हणायचा ’काका आता तुम्हाला कोणते पुस्तक देऊ? तुम्ही न वाचलेले एकही पुस्तक नाही!’ राम मा पुण्याला राहायचा तो मग काकांसाठी शेकड्याने पुस्तके घेऊन याययचा त्यात मग बाबुराव अर्नाळकर पण असायचे. दादा येताना त्यांतली वीस पंचवीस पुस्तके घेऊन यायचा. काळा पहाड, झुंजारकथा, धनंजय, छोटू असे कितीतरी.. आमचे बालपण समृद्ध करण्यात ह्या पुस्तकांचाही मोलाचा वाटा होता. ही वाचनाची आवड अशी काकांकडून आमच्यात आली......

तर कधी एकदाचे ऊन उतरते अन चार वाजतात असे व्हायचे आम्हाला कारण पाच नंतर कुठेतरी भटकायला जायचा, म्हणजेच सहलीचा कार्यक्रम. गोंदेश्वराचे मंदिर हे आमच्या सहलीचे हमखास ठिकाण. आमच्या वाड्या पासून जवळपास मैलभर तरी लांब असे हे मंदिर पण.. तरीही तो जाण्याचा उत्साह. मग सहल म्हटलं की त्याची तयारी.. आजी मग आम्हाला बरोबर लाडू, गूळ शेंगदाणे, चिवडा, चकल्या, शेव, मुरमुरे असा खाऊ आम्हाला बरोबर देई. मग तिथे गप्पा टपा करत जायचे, यथेच्छ खेळायचे अन खाऊ खाऊन परत सातच्या आत घरात. कधी सहली ऐवजी आजी बरोबर देवळातपण जायचे. भैरोबाच्या देवळात आजी प्रवचन द्यायला जायची, आम्ही मुलं पण जायचो तिच्या बरोबर. मग काय तिथेही धमाल खेळायची. समोर वीस एक फुटी गणपतीची मूर्ती होती आम्ही त्या मूर्तीच्या मांडीवर खेळायचो. खूप मजा यायची आपण गणपती बाप्पाच्या मांडीवर बसलोय ही भावनाच किती सुखद केवळ शब्दात नाही वर्णन करता यायची.

या गणपतीचा आई एक किस्सा सांगायची नेहमी अण्णा मामाचा. हा अण्णा मामा साप वैगरे पकडायचा अन खेळायचा असा याचा लौकिक तर तेही असेच खेळायचे आमच्या सारखे, तर त्याने ह्या मोठ्या गणपतीच्या बेंबीत बोट घातले अन् त्याला विंचू चावला. याला कळले विंचू चावतोय पण याने हूं की चू केले नाही याला चढतंही नसे विंचू. तर या पठ्ठ्याने काय केले चुलतं भावला सांगितले इथे गणपतीच्या बेंबीत हात घाल खूप गार वाटते.. त्याने घातला हात तर विंचू चावला त्याला तो ठो ठो बोंबलला.. मग काय काकाम्च्या कानावर हा प्रताप गेल्यावर त्याम्नी चांगले झोडपून काढले अण्णा मामाला.. असे आमचे मामा.. महावल्ली
मग असे सहलीवरुन किंवा भैरोबाच्या मंदिरातून आल्यावर वाड्यात भराभर शिरलो की आवाज यायचाच किंबहुना नाही आवाज आला तरी हातपाय धुवायचेच हा दंडक होताच. मग आम्ही सगळी वानरसेना हातपाय धुऊन एकत्रित पणे शुभंकरोती म्हणणार. मग जेवायच्या वेळेपर्यंत परत कोणी काही किस्से सांगणार, गाणी म्हणणार. मग परत तसेच आधी मुलांची पंगत मग पुरुषांची आणि मग बायकांची. आमची जेवणे आटोपली की आम्ही आमच्या झोपण्याच्या खोलीत पळायचो. परत थोडी दंगा मस्ती, गाण्याच्या भेंड्या, गोष्टी.. मोठी भावंडे गोष्टी सांगणार.. मग त्या गोष्टीतल्या राज्यात गुंग होऊन कधी सगळे स्वप्नांच्या अधीन होत.... कळतही नसे.. पहाटे प़क्षांच्या किलबिलाटाने अन काकांच्या आवाजाने परत जाग येई. मग दिवस सुरू......

एक महत्त्वाचा कार्यक्रम तर राहिलाच आंब्याचा. आमबे म्हणजे एक मोठा एक कलमी कार्यक्रम. तिसर्‍या मजल्यावर मोठ्या खोलीत आंब्याची अढी असायची. या खोलीत आंबे पिकण्यासाठी ठेवलेले असायचे खोलीला मोठे कुलूप आणि चावी राममामा कडे. रोज पाटी पाटी आंबे खायचो तरीही त्या अढीतील आंबे पळवण्याचा बेत आम्ही मुलम करत असू. एक वेगळीच क्रेझ वाटायची त्या गोष्टीत आम्हाला.. मग मॊठी मुले आंबे पळवायचे असा बेत करायची. गायीच्या चार्‍यासाठी एक गवताची माडी असे, त्या माडीतून या आंब्याच्या खोलीच्या खिडकीत जाता यायचे. या छॊट्याश्य़ा खिडकीतून लहान भावाला उतरवायचे आत खोलीत आणि मग त्याने आंबे द्यायचे खिडकीतून असा प्लॅन असायचा. एकदा काय झाले राममामाच्या धाकट्या जयुला आत उतरवले. जयू असेल त्यावेळेस दोन तीन वर्षांचा, त्याला आत सोडले अन राम मामाचा आवाज आला तो घाबरला. त्याने मोठ्याने भोकांड पसरले.. त्याचे रडणे बघून खालून राममामाचा वर आला. मग काय सगळ्यांनी धूम ठोकली. मामा आला त्याने अढीच्या खोलीचे कुलूप काढून जयुला शांत केले अन मग जयुने धडाधड सगळ्यांची नावे सांगितली.. मग काय विचारत आंब्या ऐवजी सगळ्यांना राममामाच्या दणकट हातचा धम्मकलाडू मिळाला....

आंबे खाणे म्हणजे एक मोठा कार्यक्रम असायचा तीन चार पाट्या आंबे मध्ये असायचे भोवती सगळ्यांनी गोल करून बसायचे खायला. खायचे आंबे वेगळे आणि रसाचे आंबे वेगळे. आंब्याचा रस करणे हा एक अजून स्वतंत्रच प्रकार असे. काकांकडे सगळे जावई आले की मग आंबेरसाच्या जेवणाचा बेत. ते मोठे मोठे रसाचे आंबे घेऊन काकांचे सगळे जावई रस करायला बसायचे... मध्ये मोठे रसाचे पातेले , भोवती त्या रसाच्या आंब्याच्या मोठ्या पाट्या. आणि सगळे काका रस करतायेत. काकांकडे जावईपण वैगरे करणारे जावई मी कधी बघितलेच नाही सगळे जणू एक कुटुंब..

या सगळ्या गमती जमतीत आणि मजेत कसे दिवस भरभर सरायचे समजायचे देखील नाही. मग चाहूल लागायची सुट्टी संपत आल्याची. तो इशारा समाजायचा जेव्हा सगळ्यांसाठी तागे अन साड्यांच्या गाठी घरी यायच्या. त्यात बरेच तागे असायाचे.. आपापल्या आवडीचे कापड निवडायचे. एका ताग्यात साधारण चार ते पाच मुलं बसायचे वयानुसार असे साधारण आठ दहा तरी तागे लागत असतील.. मुलींना परकर पोलक्याचे फ्रॊकचे डिझाइनचे तागे वेगळे, मोठ्या मुलींना आणि सगळ्या लेकी सुनांना साड्या. जणू बस्ताच असायचा आमची कापड खरेदी म्हणजे!

सगळ्या लेकी सुनांना मग एक दिवस बांगड्या भरण्याचा जंगी कार्यक्रम असे. कासार वाड्यावर येई. मग सगळ्या लहान मुली मोठ्या मुली आई, मावश्या, मामी अशा सगळ्या जणींना त्यांच्या त्यांच्या आवडीच्या बांगड्या भरल्या जात. आज आठवले की वाटते खरंच एखादे लग्नघर वाटावे असा तो भरलेला आमचा आजोळाचा वाडा असे. माझ्या स्मृतीपटलावर तो कायम एक गजबजलेली आनंदवास्तू असाच कोरला गेलाय.....

मग एक एक करून प्रत्येकाच्या निघण्याचा दिवस उजाडे. निघण्याचा वेळी आई आजी मावशी यांच्या डोळ्यांतून गंगा यमुना सरस्वती चालू होत. आम्ही मुलं पण अगदी चिमुकली तोंड घेऊन कावरी बावरी होत असू. आता दिवाळीच्या सुट्टीत परत या असे भरघोस आमंत्रण घेऊन आम्ही परत यायला निघत असू. पाऊल निघता निघत नसे.. वारंवार पाठीमागे वळून वाड्याकडे नजर जात असे. त्या अनमोल आनंदक्षणांची शिदोरी बरोबर घेऊन आमचा प्रवास सुरू होई.

आम्ही मोठे झालो. आमचे जाणे हळुहळु कमी कमी होत गेले. शिक्षणानिमित्त , नोकरी व्यवसायानिमित्त आम्ही बरेच लांब लांब आलो. कालांतराने काका कालवश झाले. आजी गेली. मोठे मामा पण गेले. आमचे जाणे येणे खूप कमी कमी होत गेले. मी दादाच्या लग्नाची पत्रिका घेऊन आलॊ होतो त्याआधी काका गेले तेव्हाच... आणि आज कशी पावले आपसूक ओढली गेली माझी इकडे. पण आता इथे कोणी नाही काकांनंतर मामांनी हा वाडा नंतर पाडून टाकला.. तिथे मोठं मोठ्या इमारती उभ्या राहिल्या..
आज ती जागा न्याहाळताना आत्ताही माझ्य़ा नजरे समोर त्या सगळ्या खोल्या, जेवायच्या मोठ्या घरातला रंगवलेला मोठा गणपती, त्याच्या बाजूला असलेले जाते. चुलीच्या घरातली मोठी चूल, त्यावर असलेली तांब्याची मोठी देग, आंब्याच्या पाटीतले आंबे खाणे, गवताच्या खोलीतल्या उड्या, गोठ्यातले हुंदडणे, गाभुळलेल्या चिंचा गोळा करणे, गोंदेश्वराची सहल, गणपतीच्या मांडीवरचे खेळणे, आजीबरोबरची देवीची पुजा, तिने हातावर ठवलेली खडीसाखर.... असे दरवर्षी उपभोगलेले शाही आजोळपण उभे राहिले.

ज्यांच्या मांडीवर खेळलो लहानपणी ते गणपती बाप्पा!

आता वर छत आलंय त्यांच्या!

IMG-20160906-WA0007.jpg

गुलमोहर: 

मस्तच लिहीले आहेस रे कृ. Happy एकदम आमच्या गावातल्या जुन्या वाड्याची, मामाची व आजोळची आठवण झाली.

सुरेख. सुट्टीला २५-३० पोरे जमायची म्हणजे फार उद्योग केले असणार सगळ्यांनी मिळून. एकदम धमाल येत असणार Happy

किशोर मस्त सिन्नरची सफर घडवून आणलीत. खुप सुंदर लिहिलत. भैरवनाथाच्या जुन्या मंदिरात किती छान वाटायचं नं, गावा बाहेरची देवी, गोंदेश्वर. माझी हि प्रत्येक सुट्टिची आठवण इथलीचं. आता दिवसभर त्याचं आठवणी.....

धमाल !!! आजोळपण कधीच अनुभवायला मिळाले नाही ह्याची फार खंत वाटते असे काही वाचले की Sad

कृ, अप्रतीम.. अप्रतीम..
सगळं डोळ्यासमोर उभ केलस.. खूप आठवण आली आजी, आजोबा, मामाची.. आणि आजोळची.
शेवट डोळे ओलावून गेला.
परमेश्वराने खूप उपकार केलेत आपल्यावर, भूतकाळाचा read only का होईना पण access देवून...
आठवणींच्या रूपात.

शाही आजोळ... शाही लिखाण!
वाटल... परत एकदा लहान होऊन गावी जावं... आंब्यांपासून मोठ्यांच्या ओरड्यापर्यंत सगळं सगळं खावं!
कृष्णाजी, शाही सफर घडवलीत की...

मस्तच

tula sangu? majhe ajol pan Sinner che ch, aaj kharach pani ale bhag he sagale wachtana, he sagale agdi aplya barobar ghadlay asech watatay, janu kahi aplich gost/katha aahe he.

simply great, awsome,

Gondeshwar, motha ganpati, bhaइroba che mandie, pan ajun hi kahi thikane asayache amchya khela chi jase Gava bhaer chi Devi, talyat la bhairoba, gavabhaer che tale(lake) ani pratek galli bol.

khup khup chan hote te diwas te balpan,

Pages