काल्-निर्णय

Submitted by सारंग भणगे on 22 October, 2009 - 14:54

पुष्पावतीचा पश्चिमघाट पूर्वेकडून उजळायला लागला होता. अरुणदेवान्चे स्तुतीभाट पूर्वेला अरुणोदयाच्या सवाया गाऊ लागले होते. पुष्पावतीचा प्राचीन स्नेहाळ प्रवाह त्या तांबड्या रंगांमध्ये न्हाऊ लागला होता, आणि पश्चिमघाटावर रांगेने उभ्या असलेल्या वृक्षराजी अरुणोदयाच्या स्वागतासाठी हर्षभरीत होऊन चव-या ढाळू लागल्या होत्या. त्यांची हर्शोत्फुल्लित पान रक्तवर्णाकडून सुवर्णमय होण्यासाठी उत्कंठित झाली होती. फुलांचे उत्सुक ताटवे आपल्या परिमळान संपूर्ण परिसर उत्तेजित करत होते. पश्चिमघाटही रवी उद्याच्या चाहूलीन सावध होऊन भास्करागमनाची प्रतिक्षाच जणू करीत होता.

मंदिरामध्ये आरतीची आर्त घंटा निनादू लागली. नित्यानेमाप्रमाणेच अरुण देवांच्या आगमनापूर्वीच देवारती होणार होती; म्हणून मंदिराचा कळसही अभिमानाने मान उंचावून सस्मित सुहास्यवदन झळकत होता. मंदिराताल्या मंद स्निग्ध ज्योतीतून अलवारपणे स्त्रवणा-या किरणशलाकेच्या आभेमध्ये विश्वनाथशास्त्रींची, एरव्ही प्रसन्न आणी संतुष्ट असणारी चर्या, आज गंभीर आणी खंतीत भासत होती.

सा-या षोडशोपचार यथार्थ पूजा-आरतीनंतर मंदिरातून निर्गमन करण्यापूर्वी शास्त्रीजींनी महाकालेश्वराला विनम्र साष्टांग दंडवत घातला. रोजच्यापेक्षा काही अधिक काळच विश्वनाथशास्त्री साष्टांग दंडवत घालून महाकालेश्वराला न जाणे काय गूज सांगत होते.

पूर्वा हिरण्मयी झाली; अन् ढूपाच्या परिमळान गंधाद्ति झालेल्या गाभा-यातून पुष्पावतीच्या या पश्चिमघाटाच्या या विमल परिसरात विश्वनाथशास्त्री अवतीर्ण झाले. घाटावरच्या विनयी वृक्षांनीदेखिल सलागीने शास्त्रीजीन्कडे माना वळवून पाहिले. नित्याच्या सुपरिचित सुप्रसन्न स्मितचर्येच्या जागी गांभीर्यान खंतावलेली त्यांची मुद्रा पाहून त्या वृक्षांच्या काळजात देखिल चर्र झाल. स्तिमित पानांनी देखिल आपसात सळसळसणारी कुजबुज केली.

नित्याप्रमाणेच धीमी पावले टाकत शास्त्रीजी गावाच्या दिशेन चालू लागले. घाटाच्या नीटस बांधीव पाय-यांना शास्त्रीजींच्या पावलातील आगतिकता आज जाणवली. घाट चढून आल्यानंतर शास्त्रीजींनी किंचित साश्रु नयनांनी घाटाकडे वळून पाहिल. घाटाच्या काही पाय-या नदीत बुडालेल्या होत्या. सततच्या ओलसरपणान त्यांच्या कडेला शेवाळ दाटल होत. ग्रिष्मापर्यंत त्या पाय-या तशाच राहणार होत्या. त्या विशिष्ट जागेकडे पाहून आकाशात हळूहळू दाटणा-या मेघांबरोबरच शास्त्रीजींच्या नेत्रकडा पाणावल्या. कंठ सद्गदित झाला. हाताला सुटलेल्या कंपनान ताम्हणातल पळी-फुलपात्र किणकिणू लागल. साचलेल्या पर्णराशीतून अचानक हवेत उठणा-या एखाद्या कृमीप्रमाणे; त्यांच्या मनात विचार आला, 'केवढ्या निसरड्या झाल्या आहेत या पाय-या'.

इतक्यात चपापून त्यांनी खाली पाहिल; तर कुणी एक गावकरी स्त्री तीच्या एका तरुण लेकीबरोबर त्यांना पदस्पर्श करीत त्यांची विचारपूस करीत होती. घाटावर लोकांची वर्दळ जाणवण्याइतपत वाढलेली होती. म्हणजे आज नक्कीच परतायला उशीर झाला होता. विचारात खंड पडल्यान दचकून त्यांनी त्या दोन स्त्रीयांकडे पाहिल. क्षणभर त्यांची नजर दोघींवर खिळली. त्या तरूण लेकीच्या शरीरावरून ओझरणार इतक्यात ते सावरले. वरमल्या मनाने वर पहातच आशीर्वादाचे दोन शब्द पुटपुटून ते घराच्या दिशेन चालते झाले.

उपरण्याच्या शेवान डोळ्यांच्या तळ्याबाहेर ओसन्डू वहात असलेल पाणी त्यांनी अलगदपणे टिपल; आणी घराची कडी काढून ते घरात शिरले. पडवी सोडून ओसरीच्या अलीकडच्या चौकात क्षणभर ते थबकले. सूर्यदेवांच्या सोनेरी प्रकाश किरणांनी संपूर्ण चौक उजळून निघाला होता. प्रकाशाचे ते किरण चौकातल्या दगडी फरशीवर पडून उधळलेल्या मोत्यांच्या शुभ्र दाण्यान्प्रमाणे नाचत नाचत संपूर्ण घरभर पसरू लागले होते. चौकातल्या तुळशी वृन्दावनाच्या मंजी-या त्यांचे 'मित्र' किरण भेटल्यामुळे सानंदित डोलत होत्या. जणू त्या किरणान्शी त्या मंजी-या काही गूजगोष्टीच करीत होत्या. किंचित कौतुकान शास्त्रीजी हां खेळ हरखून बघत होते. एवढ्यात, बहुदा घाटावरून त्यांचा पाठलाग करत आलेल्या एका क्रूर मेघाच्या सावलीन तो दीप्तीमान सूर्यही झाकोळून गेला; अन् संपूर्ण चौक त्या सावलीच्या सावटान अंधारून गेला. कौतुकाचा झोका अचानकच निखळला; आणि भानावर आलेल्या शास्त्रीजींची नजर प्रसन्नत्वातून खिन्नत्वात परीवर्तीत झालेल्या ओसरीकडे गेली. प्रगाढ़ निश्वास टाकीत ते ओसरीकडे चालते झाले.

हळूहळू चालत ते देव्हा-याकडे गेले. घरचे देव अजूनही पारोसेच होते. कधी नव्हे ते आज सा-याच आन्हिकाला उशीर झाला होता. पूजेची इतर सर्व सिद्धता तर होतीच. उश्णोदकानच देवांना स्नान घालायच या त्यांच्या पूर्वापार आग्रही नियमानुसार त्यांनी शुद्धोदाकान भरलेल पातेल चूल पेटवून चुलीवर ठेवल. अंधारल्या पाकघरात चुलीच्या ज्वाळान्नी तप्त लालसर प्रकाश पसरला. का कुणास ठाऊक, आज चुलीला शास्त्रिजींची नितप्रसन्न मुद्रा विशण्ण वाटली. चूलही थोड़ी निवल्यासारखीच झाली. पाणी लवकर तापेना म्हणून विचारांच्या तंद्रीत शास्त्रीजींची नजर अकारण निवत असलेल्या चुलीताल्या लाकडान्कडे गेली. त्या आगीत पेटलेल्या निखा-यांकडे पाहून आकस्मिकपणे शास्त्रीजींना हुंदका फुटला आणी परसात श्रावणाच्या सरी बरसू लागल्या….

कसेबसे सावरत शास्त्रीजींनी अर्धवट तापलेल पाणी उचलल आणी चुलीवर पाणी शिंपल. थरथरतच; जड़ अंत:करणान आणी खिन्न मनान त्या निमोश्णोदकान देवांना स्नान घालत पूजेचे इतर उपचार त्यांनी उरकले. रोज सजीव समूर्त जाणवणारे देव आज त्याना पाषाण-धातूचे केवळ पुतळेच वाटले. रोज चंदन-अष्टगंध उगाळताना जणू अम्रुताकुंभात बुचकळण्यास अधीर असणा-या अन्गठ्याला आज तोच स्पर्श चिकट आणि लिबलिबीत वाटत होता. विपुल फुलांनी रोज सुशोभित होणारी पूजा आज त्यांना विजोड श्रुंगारासाराखी वाटत होती.

मनातील असे दुर्विचारी काढ बाजूला सारीत; केवळ उपचार म्हणून नित्यसवयीचे स्तोत्र-मंत्रोच्चार करीत त्यांनी पूजा उरकली; अक्षरश: उरकलीच.

पूजेनंतर अन्गवळणी पडल्याप्रमाणेच ते काशीनाथशास्त्री आणी सरस्वतीबाईन्च्या तसवीरीपुढे उभे राहीले. देवघरात मागल्या परसातून येणा-या चुकार प्रकाश किरणान्मुळे तसवीरीवरल्या काचेत शास्त्रीजींच्या प्रौढ़ व्यक्तीमत्वाच प्रतिबिंब पडल. चाळीशी उलटून गेलेल; पण शास्त्राभ्यासाला ब्रम्हचर्येची जोड़ मिळालेल ओज:पूर्ण व्यक्तीमत्व, त्या प्रतीबिंबात आज त्यांना स्वत:लाच ओन्गळ्वाण वाटल. मातापित्यांच्या चित्रात स्वत:च पडलेल ते तसल प्रतिबिंब पाहून, भावनावेगान जोरात कापू लागलेल्या हातातून अष्टगंधाची वाटी आणी फुलं जमिनीवर पडली. धरणीकंप वाटावा जणू इतपत थरथरु लागलेल्या त्यांच्या पायातल बळच हरवल, आणी सोवळ्या-ओवळ्याच भान विसरून ते मटकन खाली बसताना शास्त्रीजींच्या तोंडातून, "बाबा" अशा उद्गारांपाठोपाठ एक अस्फुट हुंदका फुटला.
=================================================

भाग - २

संपूर्ण जील्ह्यातल काशीनाथशास्त्री हे एक सर्वार्थान प्रतिष्ठीत नाव. जीवनाच्या सर्वांगांना आपल्या विद्वत्ता आणि कर्तृत्व यांचा परीसस्पर्श करणार सर्वांगीण अद्भूत व्यक्तिमत्व; अभिनव युगातील जील्ह्यातील एकनाथ महाराज असा लौकिक पावलेल व्यक्तिमत्व, वेद-शास्त्र विद्याभ्यास, वैद्यक शास्त्राचा गाढा आभ्यास आणि वैभवशाली लक्ष्मीवंत असा संसार, थोडक्यात परमार्थ आणि संसार-व्यवहार या दोंहींचा समन्वय साधणार एक अजोड व्यक्तिमत्व म्हणून काशीनाथशास्त्री मान्यताप्राप्त होते. वैचारीक-आत्मिक सघनता आणि आर्थिक सधनता असा अजोड केशर-कस्तुरी योग साधणा-या काशीनाथशास्त्रींना तीन मुले. विश्वनाथशास्त्री हे त्यातील थोरले; तर त्या पाठोपाठ सदानंद आणि मुक्तेश्वरी.

मुक्तेश्वरी आपल्या संसारात सुखाने नांदत असे; तर सदानंद आधुनिक वैदक शास्त्राचा आभ्यास करून शहराच्या ठिकाणी नामांकित वैद्य म्हणून प्रस्थापित झाले.

वंश परंपरेने आलेला महकलेश्वरादी देव देवतांचे पूजा अर्चन आणि व्यवस्था, शास्त्राभ्यास आणि प्रवचन-किर्तानादी उत्सवोपचार या काशीनाथशास्त्रींच्या पारमार्थिक अंगांचा वारसा वडिलबंधू म्हणून विश्वनाथशास्त्रींकडे आला.

विश्वनाथशास्त्री कुमार वयापासूनाच या पारमार्थिक अंगाकडे आकृष्ट झालेले होते. सुकुमार वयात प्रत्यक्ष पीत्याचीच दीक्षा घेऊन त्यांनी विद्याध्ययानास प्रारंभ केला होता. विद्येच्या प्रान्गणातील विविध शास्त्र, पुराण, स्तोत्र, मंत्र आणि औपचारिक तंत्र या बरोबरच परंपरागत वैद्यकशास्त्रही विश्वनाथशास्त्रींनी समाधानकारकरित्या अवगत केले. यथावकाश काशीनाथशास्त्रींच्या महाप्रयाणानंतर हां पारमार्थिक वारसा विश्वनाथशास्त्रीन्कडेच आला; आणि त्यांनीही तो आनंदाने स्वीकारला; पुढे चालवला. जरी काशीनाथशास्त्रींची योग्यता विश्वनाथशास्त्रीन्च्या अंगी नव्हती; आणि याची प्रामाणिक जाणही त्यांना स्वत:ला होती, तरी वंशपरंपरेचे वहन होण्यासाठी आणि स्वानंदासाठीही त्यांनी जीवनाचा हां पारमार्थिक मार्ग स्वीकारला. परमार्थ आणि विद्याभ्यास याच्या आड़ सांसारिक अडचणी येऊ नयेत व आपल्या पारमार्थिक शक्तींचा स्वसंसारार्थ अपव्यय होऊ नये, अशा प्रामाणिक धारणेन शास्त्रीजींनी हेतुपुरस्सर ब्रम्हचर्य व्रत स्वीकारल. अविवाहीत राहून का होईना, कदाचित आपण परमार्थमार्गात काशीनाथशास्त्रींची योग्यता प्राप्त करू शकू अशी सुप्त महत्वाकांक्षा; किंवा मनोकामना मनात बाळगूनही कदाचित त्यांनी ब्रम्हचर्यव्रत धारणा केली होती. प्रत्यक्ष पीता आणि गुरुशीच सुप्त स्पर्धा; आणि ती ही परमार्थासाराख्या निष्काम-निरहंकारी जीवनमार्गात अनाहूतपणे का होईना करावी, याच वैषम्य युक्त शल्य त्यांच्या अंतर्मनास कायमच बोचत असे. वडिलांपेक्षा पारमार्थिक कनिष्ठतेची सल आणि ज्येष्ठताप्राप्तीची सुप्त कामना यांच सूक्ष्म द्वंद्व त्यांच्या मनाला अनेकदा अशांत आणि अस्वस्थ करीत असे. परंतु शास्त्रीजींनी यथाचित परमार्थ आचरण करून काशीनाथशास्त्रींच्या उज्वल परंपरेचा निर्वाह केला होता, याच समाधान त्यांना स्वत:ला आणि ग्रामस्थांना देखिल होते. शक्य तेव्हढी निस्पृहता बाळगून शास्त्रीजींनी ही परंपरा सुमारे पंधरा वर्षे चालू ठेवली होती.

पण तो परमार्थ; ती निष्काम-निस्पृहता; ते ब्रम्हचर्य, मोहाच्या एकाच मायाजाली क्षणात काळवन्डून गेल; व्यर्थ झाल होत. प्राक्तनात साठलेल आजवरच पुण्य एका क्षणात पूर्ण व्यय झाल. त्या एका क्षणान आजवरच्या धवल चारित्र्याला पूर्ण काळिमा फासली. चारित्र्याच शुभ्र श्वेत तलम वस्त्र नुसतच डागाळल नाही; तर ते त्या प्रसंगाच्या कुटील काट्यान टरटरा फाडल. जे वस्त्र घराण्याच्या उज्वल किर्तीच प्रतीक होऊन आकाशामध्ये अभिमानाने फडकत होत, ते मलिन अवस्थेत परिस्थितीच्या धुळीत मिसळून गेल. आत्मवंचानेन शास्त्रीजी पुरते कोलमडून गेले. परमार्थाचा सारा उन्मेष त्या उछ्रुन्खल क्षणाच्या आधीन होऊन दीन दुबळा झाला. घोर पातकाची हिंस्त्र श्वापद शास्त्रीजींच्या मनाला सावज करून त्यावर चाल करून आली होती. आजवरच्या पुण्यपावन जीवनक्रमाला फार फार मोठ छिद्र पडल होत. मातापित्यांच्या तसविरीसमोर बसून स्फ़ुन्दून स्फ़ुन्दून रडताना काल पहाटेचा तो क्रूर प्रसंग शास्त्रीजींच्या डोळ्यासमोर वारंवार उभा राहत होता; आणि अश्रुंवाटे कितीही वाट मोकळी करून दिली तरी तो डोळ्यासमोरून किंचितमात्रही हटत नव्हता.

=================================================

भाग - ३

नित्यनेमाप्रमाणेच पहाटेच्या खोल अंधारात शास्त्रीजी घाटाकडे निघाले. आधीच पहाटे चारचा समय; अन् त्यात गडद ढगांनी आकाशात गर्दी केलेली, त्यामुळे अंधार अधिकच गर्द झाला होता. सरावानं ते घाटाच्या जवळ पोचलेही. पाऊस नुकताच सुरु झाला होता. त्यामुळे घाईनं ते मंदिराकडे जाऊ लागले. मंदिरात प्रवेश करणार एवढ्यात नदीच्या पात्रातुन अस्फ़ुट किंकाळ्या त्यांना ऐकू येऊ लागल्या. क्षणार्धात त्यांनी कयास बांधला की कुणीतरी नदीप्रवाहात गटांगळ्या खात आहे.... त्यांचं प्राक्तनच तर नव्हत ते! क्षणाचाही विचार न करता फ़क्त कटिवस्त्रानिशी शास्त्रीजींनी नदीच्या पात्रात सूर मारला. त्या तसल्या गदळ अंधारात आवाजाच्या दिशेनं अंदाज बांधत ते पोहू लागले. कुठली अनामिक शक्ती त्यांना स्फ़ूर्ती देत होती? नियती कि त्यांच्यातल्या 'सर्वेSपि सुखिनः सन्तु' या प्रामाणिक पारमार्थिक प्रेरणा!!

नदीचा प्रवाह तसा शांत अन् स्थिर होता. पोहत पोहत अखेरीस ते त्या आवाजाच्या अनामिक स्त्रोतापाशी पोचले. आभाळ बहुदा काळ्याकबिन्न दैत्यमेघांनी व्यापुन गेलेलं होतं; आणि पावसाच्या वीषधारा धरेला झोडपु लागल्या होत्या. त्या वातावरणात शास्त्रीजींनी त्या नादोड्गामी देहाला पकडलं; आवळलं आणि घाटाच्या दोशेनं ते आवेशात पाणी कापू लागले.

स्त्री देह! आजन्म ब्रम्हचर्यव्रत पालन केलेल्या विश्वनाथशास्त्रींच्या कवेत अजाणतेपणी एक स्त्रीदेह आला होता. पण याचं भान त्यांना अजून आलेलं नव्हतं. त्यांच्यासारख्या पारमार्थिक आचरण करणा-या ब्रम्हचारी पुरुषासाठी तो एक प्राण जाणारा एक प्राणी किंवा देह होता. त्या देहाला नदीकाठी नेऊन प्राणरक्षणाच अद्वितीय; अजोड पुण्य ते कमावणार होते. खचित त्यांच्या सुप्त मनाने याची दखल घेतली होती. पुण्यप्रद पारमार्थिक जीवनात आणखि पुण्याचं मोरपीस खोवलं जाईल; आणि काशीनाथशास्त्रींपेक्षा अधिक परमार्थप्रवण कार्य केल्याचं समाधान मनाला लाभेल अन् ती सुप्त महत्वाकांक्षा, कामना परिपूर्त होईल, असा विचार त्यांच्या अंतर्मनास कदाचित स्पर्शून गेला असेल. अन् त्याच अंतःप्रेरणेनं शास्त्रीजी त्या स्त्रीला ओढत नदीच्या काठाजवळ पोचले. आणि अचानक शरीराला तो मोरपिसासारखा स्पर्श झाला. सा-या संवेदना अचानक सुषुप्तीमधून जाग्या झाल्या. नदीच्या त्या पात्रावर रोमांच उठले. भाववेगाच्या अजस्त्र लहरी उठल्या.सुमनातून प्रणयगंध घेऊन रोमांचित वारा वाहू लागला. पुष्पांच्या मधाळ कोषातून प्रणयपरागबीज विश्वनाथशास्त्रींच्या को-या मनोभूमीवर पडले. आणि क्षाणात त्या बीजातून महावृक्ष फ़ोफ़ावला. त्याला लालसेची अनेक वीषफ़ळे लगडली. त्याच्या अनेक पारंब्या भूईमध्ये खोलवर घुसून त्यातून पुन्हा अनेक महावीषवृक्ष निर्माण झाली. खदखदा हासत त्या वासनावृक्षांनी फ़ांद्यांच्या माना अशा काही सळसळवल्या कि विवेकाचे मऊ मुलायम धुलीकण त्या वा-यात उडून गेले; आणि खालच्या कोरड्या तप्त भूमीतून वासनेचे विद्रुप कीटक रांगू लागले.

गात्रोत्फ़ुल्लीत शास्त्रीजी त्या स्त्रीला घेऊन घाटावर आले. पाय-यांवर तो देह ठेऊन ते विस्मयानं त्या कडे पाहू लागले. ती स्त्री त्या प्रसंगवशात मुर्छित झाली होती. अर्धानावृत्त ती सुरुप तरुणी निश्चलपणे त्या पायरीवर पडली होती.

पहिला स्त्रीस्पर्श शास्त्रीजींची देहलालसा अनावर करीत होता. वासनेच्या हिंस्त्र लाटा शास्त्रीजींच्या मनाचे बांध ओलांडून ओसंडून वहात होत्या. संयमाने सारे बंध झुगारले आणि त्या प्रपातात विवेकाला वाहून नेऊन त्याम्चे मन वासनापूर्तीची कामना करु लागले.

अशीच एक उन्मत्त लाट शास्त्रीजींच्या मनावर थडथडा आदळली; अनासक्तीचा बुरखा पांघरुन झाकलेल्या आसक्तीच्या शृंखला खळखळा तुटल्या. देहातला-मनातला पुरुष राक्षसी हास्य करीत बाहेर पडला आणि त्यानं अजस्त्र रुप धारण केलं. वासनेचा अजगर भक्ष्याला करकचून कवटाळू लागला. षड्रिपुंच्या असुरांनी भयंकर नंगानाच सुरु केला/ मर्यादा वरमली; शास्त्रीजींनी वासनेच्या खोल डोहात बुडी मारली.

त्या अंधारगूढ निर्मनुष्य घाटावर शास्त्रीजींचं असिधारा ब्रह्मचर्यव्रत गतःप्राण झालं......

अंधार; गडद अंधार; निव्वळ अनाकलनीय अंधःकार. घाटाच्या त्या परिसरात अंधारानं प्रकाशाची सारी कवाडं थोपवून धरली होती. नदी, घाट, मंदिर, देव, वृक्ष, पाने, फ़ुले, प्राणी, पक्षी, कृमी, किटक, मनुष्य आणि शास्त्रीजींमधील ईश्वरत्वाचा; मानव्याचा अंश सारं सारं काही निद्रिस्त होतं. त्या अनाचारी समागमाचे साक्षिदार होते फ़क्त आवेग ओसरून भानावर आलेले पुण्यभूषण विश्वनाथशास्त्री!

इतका वेळ कोसळणारा पाऊस एव्हाना थांबला होता. गाव जागा व्हायला काहीच अवधि होता. विषण्ण शास्त्रीजी केलेल्या कृत्याच्या पापवणव्यात होरपळू लागले होते, आणि इतक्यात त्या स्त्रीची शुद्ध परतू लागली.

विषण्णता आणि विषादाची जागा भयानं घेतली. आता ही जागी झाली, तीनं त्या नाचारी समागमाच्या खुणा पाहिल्या, आपल्याला ओळखलं, गावक-यांना सांगितलं...परमेश्वरा!! काय करु? उत्तुंग डोंगराचे हजार कडे कडकडा आवाज करीत कोसळावेत, कि खवळलेल्या सागराच्या उन्मत्त अजस्त्र महालाटेनं गिळण्यासाठी आ वासावा, अशी गर्भगळित अवस्था शास्त्रीजींची झाली. काही क्षणांपूर्वी गात्रोत्तेजीत झालेले शास्त्रीजी आता गलितगात्र झाले. मनातलं देवत्व तर केव्हाच लोप पावलं, मानव्य लोपलं होतं आणि आता दानव हळुहळु जागा होऊ लागला.

विनाशाच्या आरंभा आधीच त्याचा अंत करण भाग आहे. नाशाची कोवळी पिल्लं ज्या गर्भात अंकुरत आहेत, तो गर्भच फ़ोडणं भाग आहे. कायमची समाजवंचना टाळायची असेल तर ही विवंचना तुटलीच पाहिजे.

मनात तो क्रूर निर्धार केला, आणि पारमार्थिक प्रेरणेनं वाचवलेला; मानवी वासनेनं भोगलेला तो देह त्यांनी उपेक्षेच्या; अधिक्षेपाच्या दानवी भयानं नदीच्या पात्रात लोटला. संयमित जीवनाचा मनोरा कलंडला; पारमार्थिक जीवनाचं मंदिर कोसळलं; त्यातील ब्रह्मचर्याची पवित्र मूर्ती चिरकालासाठी भंग पावली. एका क्षणाच्या क्षुद्र मोहात शास्त्रीजी पतित झाले, आणि एका पतनातून सावरण्यासाठी दुस-या महाभयंकर महापातकाचे धनि झाले. वैराग्याच्या थडग्याखाली दडलेल्या क्रूर श्वापदानं हिंस्त्र नख्या बाहेर काढल्या; अन् पुण्याच्या, नितीमत्तेच्या, चारित्र्याच्या अस्थि घेऊन त्या पुष्पावतीमध्ये कायमच्या विसर्जन केल्या.
=================================================
भाग - 4
रीक्त मनानं शून्यात पहात शास्त्रीजी खांबाला टेकून बसले होते. पश्चात्तापाच्या विषमज्वरानं मन तळमळत होतं. दुःखाचा पहिला आवेग ओसरुन निश्चल शरीरानं शास्त्रीजी देव्हा-याच्या बाहेर ओसरीवर बसले होते. पापण्यांवर अश्रूंचे पाणी अजूनही गोठलेलं होतं. विव्हल अवस्थेत ते निश्चेष्ट बसून होते.

काही वेळानं चेतना आली ती अक्कामावशीच्या आवाजानं. जणू मणाच्या ओझ्यानं जड झालेले पाय घेऊन कसेबसे सावरत ते दाराकडे गेले आणि कोयंडा बाजूला सारला. दार उघडण्याचे कष्टही त्यांना घेववेनात; अन् अक्कमावशीला तोंड दाखवायचं नीतीधैर्यही त्यांच्यात नव्हतं.

अक्कामवशी दार लोटून घरात आली. पाठमो-या शास्त्रीजींकडे पाहून म्हणाली, " अरे नाथा, किती वेळची दरवाजा वाजवतेय, आणि तू कोयंडा खोलून दरवाजा न उघडताच चालूही लागलास."

विमनस्क अवस्थेत चालत काहीच न बोलता शास्त्रीजी ओसरीवरल्या पलंगावर जाऊन बसले. रोजच्या सवयीनं अक्कामावशी स्वयंपाकाला लागली. सरस्वतीबाईंच्या पश्चात अक्कामावशीनंच शास्त्रीजीच्या उदरनिर्वाहाची सोय पाहिली होती. एकभुक्त राहण्याचा शास्त्रीजींचा नेम असल्यानं, फ़क्त सकाळीच अक्कामावशी शास्त्रीजींच्या घरी येऊन स्वयंपाकपाणी, धुणीभांडी, केरकचरा आणि इतर कामे करीत असे. कधीही कशाची अपेक्षा न करता केवळ काशिनाथशास्त्रींच्या पुण्यपावन वास्तव्यानं पुनित झालेल्या या वास्तूची आणि व्रतस्थ विश्वनाथशास्त्रींची सेवा करायला मिळते आहे, या सद्हेतुने ती हे सारं वर्षानुवर्षे करीत होती. एरव्ही अलिप्त असलेल्या शास्त्रीजींना अकामावशीबद्दल नितांत प्रेमादर होता.

पुन्हा शून्य विमनस्क मनःस्थितीत पलंगावर शास्त्रीजी बसून राहिले. अक्कामावशी काम करीत करीत ओसरीवर आली आणि शास्त्रीजी तसे बसलेले पाहून आश्चर्ययुक्त स्वरात म्हणाली "हे काय! आज जपजाप्य काही करायचं नाही कै काय?". शास्त्रीजी जरा चपापले; आणि तिथेच बसून जपमाळ शोधू लागले. अक्कामावशी विस्मयानं पुन्हा म्हणाली, "नाथा, ज्वर आहे का काय तुला? असा काय बावचळल्यासारखा करतो आहेस? अरे जप का पलंगावर बसून करणार आहेस, या खांबाकडे बघत?", आणि कपाळाला हात लावत हासत ती आपल्या पुढल्या कामाला निघून गेली.

आता पुन्हा ती एकांताची भयाण शांतता. वीराट वीराण वाळवंटाच्या मध्यभागी एखाद्या भग्न मंदिरात असावी तशी; किंवा वेशीबाहेरील एखाद्या पछाडलेल्या पडक्या वाड्यात असावी तशी. ती सामसूम; ते रीक्त एकाकिपण शास्त्रीजींकडे बघून विकट हसू लागलं. केलेल्या पापाची माकडं वेडावल्यासारखि वाकुल्या दाखवुन डिवचत होती. ह्र्दयाचं पडकं खिंडार केलेल्या पापकृत्याची घूस पोखरीत होती. आत्मवंचनेचे विखारी नाग मनाला डसत होते. ते पातक पिशाच्च मनाला डाचत होतं. विचारांच्या महागर्तेत शास्त्रीजी गरगरा फ़िरत होते.

वाडवडिलांनी उभा केलेला इमला स्वतःच्या हातांनी खाली खेचावा, त्याचे एकसंध उभे खांब धारदार करवतींनी कापून काढावे; आणि पुर्वजांची अपरंपार कष्टाने उभी केलेली किर्ती धुळीस मिळवावी, उंचापुरा भरभक्कम देवदार वृक्ष आपल्या हातांनी कु-हाडीचे निर्दय घाव घालुन कुलंथून टाकावा, असे घोर पातक माझ्याकडून घडले. आजन्म पाळलेले, जोपासलेले व्रतस्थ जीवन अखेर मोहाचेच दास होते. जर या मोहावर अन् भयावर मात करता येत नसेल तर जीवन व्यर्थ आहे.

वीज चमकावी तसा डोक्यात विचार चमकून गेला, आणि एखाद्या वीषवृक्षाने आपली पाळेमुळे खोलवर पसरावीत, किंवा एखाद्या सर्पमंथराचं वीष हळुहळू अंगभर भिनत जावं, तसा तो विचार शास्त्रीजींच्या मनात खोलवर रुजू लागला.

होय, जीवन आता व्यर्थच आहे. ज्या धारणेने हे पारमार्थिक व्रतबद्ध पवित्र जीवन आजवर जगलो, त्या जीवनात अशा भयंकर पातकाचा भार घेऊन जगण केवळ अशक्यच नव्हे; तर निरर्थक आहे. जीथे पायालाच खिंडार पडले आहे; तीथे हा ईमारतीचा कुजलेला डोलारा तोलून धरण्यात काय हशील! मृत्यु तर अटळ आहेच. मग त्याला या पातकाचं प्रायश्चित्त म्हणून स्वखुशीनं कवटाळलं तर खचित त्या अक्षम्य अपराधाचं क्षालन होईल.

होय, प्रायश्चित्त! नियतीनं किंवा दैवानं दिलेल्या दंडापेक्षा स्वप्रेरणेनं घेतलेलं प्रायश्चित्त हे केवळ अधिक श्रेयस्कर आणि योग्यच नव्हे; तर ते न्याय्यही आहे. अन्यथा चित्रगुप्ताच्या दरबारात या पतकी जीवनाची अवहेलना आणि निर्भर्त्सनाच होईल. पश्चात्तापातून प्रायश्चित्त हाच एकमेव या पापाचा भार हलका करणारा; आणि तो काळिमा धुवून काढणारा उपाय आहे. निदान पुर्वजांना तोंड दाखवण्यासाठी तरी हे प्रायश्चित्त अप्रिहार्य आहे; अनिवार्य आहे. या अशा पापी देहाचा भार आत्म्यावर लादून जीवन जगण्यापेक्षा, त्या अनिरुद्ध आत्म्यालाच या देहाच्या बंधनातून मुक्त करणे योग्य आहे.

कांदा चिरल्यानंतर त्याची एकेक पाकळी जशी विलग होते, तसे एकेक विचार मनात विलग होत गेले. शिजायला घातलेल्या भाताप्रमाणे रटरटणारं मन आता हळूहळू स्थिर व्हायला लागलं. मनात प्रायश्चित्ताचा विचार पूर्ण स्थिर झाला, आणि देहत्याग करायचा निश्चय शास्त्रीजींनी केला.

=================================================
भाग - ५

विचारांच्या अतिश्रमानं काही काळ त्यांचा डोळा लागला. जागे झाले तेव्हा माध्यान्ह झाली होती. विचारांचे मुंगळे पुन्हा पुंजक्यापुंजक्यांनी रांगू लागले. पोटात काही न खाल्यानं खड्डा पडला होता. पण तसेही आता या देहाचे पोषण करण्यात काहीच अर्थ नाही, म्हणून शास्त्रीजींनी आज अन्न वर्ज्य केलं. पण कंठ शुष्क झाला होता. काही काळानं सहन होईना म्हणून शास्त्रीजींनी विचार केला, 'या देहाला हा शेवटचा अर्घ्य देऊ. नाहीतर पिशाच्च बनून ते कुणालातरी पिडेल.' म्हणून त्यांनी पाकगृहात जाऊन पेलाभर पाणी प्यायले. अन्नावरची वासना उडाली होती, परंतु पदार्थांच्या सुगंधाचा एक संकेत घर्णरंध्रातुन मस्तिष्काकडे, आणि तीथून जीव्हेकडे, आणि मग उदराकडे गेलाच. निश्चयानं शास्त्रीजी बाहेर पडले. देव्हा-याकडे लक्ष जाताच त्यांनी असे ठरविले की आज हा देह पुष्पावतीच्या पवित्र प्रवाहात लोटण्यापुर्वी, जो काही काळ शिल्लक आहे तो भगवद्स्मरणात व्यतीत करणे योग्य होईल. त्यांनी जपमाळ घेतली. देव्हा-यासमोर पद्मासन घालून शास्त्रीजी बसले. एकदा डोळे भरून त्यांनी देवांकडे पाहिले, आणि मग डोळे मिटून ध्यान लावण्याचा प्रयत्न केला. मनात श्री महाकालेश्वराचे स्मरण करीत सदाशीवाची पिंड डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न सुरु केला. काही क्षण असे ध्यानमग्नावस्थेत गेले.

महाकालेश्वराची प्राचीन पिंड मनाच्या नेत्रांसमोर उभी राहिली. मंदिर, मंदिराचा गाभारा, आणि तो सुशांत परिसर मनात चित्रीत झाला. मन शांत होऊ लागलं.

आणि अचानक घाटाच्या पाय-यांवर चांदण्या रात्री एक लावण्यमय स्त्रीदेह संपूर्ण विवस्त्रावस्थेत पहुडला आहे. चंद्रज्योत्सनेत तो उजळला आहे, आणि पुष्पावतीच्या जललहिरीतून परावर्तीत होणारे चंद्रकिरण त्या देहावर मोहक छाया-प्रतिछाया निर्माण करीत आहेत, असे रोमांचक दृश्य शास्त्रीजींच्या डोळ्यासमोर तरळले.

आसूडाच फ़टका बसताच बसलेलं जनावर ताडकन् जागेवरून उठावं, तसे शास्त्रीजीं डोळे खाड्कन् उघडले. महापाप! काय हे!! कसली विचित्र दृश्य या पापी मनात निर्माण होताहेत. देवांसमोर बसून असा मनोव्यापार! हाय रे मन!

विव्हळ झालेले शास्त्रीजी देवघरातून ओसरीवर आले आणि येरझा-या घालू लागले. शेकडो वेळा स्वतःला कोसून कोसून त्यांनी देवतांची क्षमा मागितली. जे कधीच घडले नाहीत असे मनोव्यापार कसे सुरु झाले याचे त्यांना राहून राहून दुःखयुक्त आश्चर्य वाटत राहिले. बराच काळ येरझा-या घातल्यानंतर थकून शास्त्रीजी ओसरीवर खांबाला टेकून बसले. विचारांचे आवर्तच्या आवर्त मनावर आदळत होते. डोळे मिटायचे तर आता त्यांना भयच वाटते होते, आणि डोळे उघडे ठेवले तर या जगाकडे त्यांना बघवत नव्हते.

अतिशय विचित्र, खिन्न आणि उद्विग्न मनस्थितीत संपूर्ण दिवस गेला. अन्न पाणी नसल्याने आलेली अशक्तता, विचारांच्या संततधारेमुळे आलेली श्रांतता, यांनी शास्त्रीजी थकून गेले होते. थोडीशी ग्लानी वाटत होती. मनात जो प्रायश्चित्ताचा निर्णय घेतला होता त्याची अंमलबजावणी आज रात्री करायची असा निग्रह त्यांनी केला. जीवनाचं ओझं त्यांना बोजड वाटू लागलं. असं लक्तरं झालेलं जीवन जगण्यापेक्षा जीवनत्याग करून प्रायश्चित्त घ्यावं या निर्णयावर ते ठाम होत गेले. मनात निर्माण झालेल्या शंका-कुशंकांचे तण त्यांनी दूर केले.

आता या जीवनाचा अंत करायला अधिक काळ राहिलेला नव्हता. तसं निर्लिप्त जीवन जगल्यानं कुणाशी काही देणं-घेणं नव्हतं कि कुणाचं ऋण फ़ेडायचं नव्हतं. फ़क्त फ़ेडायचे होते पूर्वजांचे पांग, वडिलांनी दिलेल्या संस्कारप्रसादाचं ऋण.

शास्त्रीजी उठले. देव्हा-यात देवासमोर दिवा लावला. त्यात आज भरपूर तेल ओतले. त्यांच्य जीवनाचा दिवा मालवेल तेव्हा या वडिलोपार्जित वाड्यामध्ये तरी दिवा तेवत रहावा, अशा मनोकामनेनं कदाचित. काशीनाथशास्त्रींनी लिहीलेल्या ओवीबद्ध पोथीचं हस्तलिखित चंदनाच्या पेटीतून काढून त्यांनी मस्तकी लावलं. घराण्यातला हा पुण्यपावन ग्रंथ अतिशय भावपूर्ण आणि सश्रद्ध अंतःकरणानं शास्त्रीजींनी ती पोथी रेशमी वस्त्रातून काढून ताम्हणात ठेवली. ही घराण्याची अजोड संपदा होती. परसातून शास्त्रीजींनी दोन फ़ुले आणि काही तुळसमंजि-या आणल्या, आणि पोथीवर थरथरत्या हातंनी वाहिल्या. डोळे भरून आले. कंठ सद्घदित झाला. हातांना कंप सुटला. अशा पवित्र ग्रंथाला माझ्या अपवित्र हातांनी स्पर्श करणे योग्य नाही. परंतु एकदाच तो पावन परिसस्पर्श माझं जीवन सार्थक करेल, या भावनेनं त्यांनी ती पोथी उघडली, आणि त्यातील प्रथम अध्यायाचं पठण केल. देवांना सादर वंदन करून शास्त्रीजी मातापित्यांच्या तसवीरीपुढे येऊन उभे राहिले. काशीनातशास्त्रींच्या तसवीरीकडे पहात असताना त्यांना पुन्हा एक जोराचा उमाळा फ़ुटला. लहान मुलासारखं ते स्फ़ुंदु लागले. 'बाबाSS बाबाSS' असा टाहोच त्यांनी फ़ोडला. पश्चात्तापाचे अश्रू गालांवरून वाहू लागले. पण आता पश्चात्तापाचा उपयोग नव्हता; प्रायश्चित्त हाच एक जीवनोपाय होता. या जन्माचं संचित पुढल्या जन्मी येणार आहेच, पण आयुष्यात घडलेल्या एकमेव महापातकाचं प्रायश्चित्त घेतलं तर संचितात असलेलं पापचं पारडं थोडं तरी हलकं होईल असा त्यांना विश्वास वाटतं होता.

कसेबसे स्वतःला सावरुन ते घरातील निरवानिरव करायला लागले. सर्व वस्तू जागच्या जागी ठेवल्या. तसा निष्कांचन पिंड असल्यामुळे फ़ार वस्तूसंचय त्यांनी कधीच केला नाही. पण पूर्वापार असलेल्या त्या वाड्यातील प्रत्येक वस्तूवर पूर्वजांची पुण्यपावन सावली होती. त्यांनी सा-या मौल्यवान वस्तू एका संदूकात भरल्या. तो संदूक देव्हा-यात नेऊन ठेवला. आणि साश्रु नयनांनी त्यांनी एक पत्र लिहीलं.
"ईश्वराच्या या अनंत सृष्टीत विलीन होण्याचा मोह मला अनावर झाला आहे. पापपुण्याच्या मायावी मोहजालातून परमेश्वराच्या अड़्कावर विराजमान होण्यासाठी ई हा मलिनदेह पुष्पावतीच्या प्रवाहात अर्पण करीत आहे. पूर्वजांचा हा अमोल ठेवा श्री महाकालेश्वराच्या व्यवस्थेसाठी उपयोगात आणला जावा, अशी मनोमन ईच्छा आहे, ती पूर्ण करावी."

आता जीवनाची कुठलीच क्षिती उरली नाही. सर्व व्यवस्था लाऊन ते ओसरीवर आले. गळा दाटलेल्या अवस्थेत त्यांची नजर त्या वास्तूच्या अंगोपांगावर फ़िरत होती. संपूर्ण जीवन ज्या वास्तूत व्यतित केले ती ही वास्तू एकप्रकारे जननीच होती. पुन्हा एक दुःखावेगाचा कढ आला. मनामध्ये द्वंद्व उभे राहिले. खरेच असे देहान्त प्रायःश्चित्त करणे योग्य आहे काय्? देहत्याग करून प्रायश्चित्त घ्यायचे कि जीवन जगून हे पातक धुवून काढायचा यत्न करायचा; कि सरळ आपल्या घोर पातकाची कबूली देऊन समाज जो दंड देईल तो स्वीकारायचा. खरा पुरूषार्थ कशात आहे, खरा परमार्थ कशात आहे?

नाही, नाही! आपल्या पातकामुळे आपल्या पूर्वजांच्या थोर पुण्याईला विटाळ आणणे योग्य होणार नाही. या गावाला भूषण असणारं घराणं आपल्या पातकाच्या कबूलीनं कायमचं दूषित करुन चालणार नाही. काही सत्य काळाच्या पोटात दडवूनच ठेवणं क्रमप्राप्त आहे. त्या सत्याचं विष पचवायची शक्ती या समाजात नाही.

मग जर आपण आहे असंच जगलो; श्री महाकाळेश्वराची मनोभावे सेवा केली; समाजहितार्थ देह झिजवला; धर्मार्थ कामासाठी आपलं आत्मबल खर्चि घातलं; सर्वसंगपरित्याग करुन तप नि साधनेत व्यग्र झालो; तर खचित हे पापक्षालन होईल. ईश्वरसेवेचा खरा आनंद मिळेल आणि उर्वरीत जीवन सार्थकी लागेल. कदाचित अधिक पुण्यसंचय होईल; कदाचित साधना, तपस्या, आणि वैराग्य यातून ईश्वरप्राप्ती होईल; आत्मोद्धार होईल.

या विचारानं शास्त्रीजींच्या शरीरातून एक दिव्य शिरशिरी ऊठली. विषण्ण मन प्रसन्न झालं; व्यथित काया पुलकित झाली. एका दिव्य अनुभवाचा सुखद स्वप्नरंजनानं एक नवा मार्ग मिळाला.

अहाहा! झालेल्या पातकाच्या प्रायश्चित्तासाठी देहदंड घेऊन भ्याडपणा, पळपुटेपणा दाखवण्यापेक्षा, जीवन अधिक विधायक पद्धतीने व्यतीत करावे, आणि अधिकाधिक पुण्यप्रद कार्ये करुन हा विटाळ धुवून काढावा. वाल्याने नाही काय दुष्कृत्याचा वाममार्ग त्यागून सत्कृत्याच्या दिव्य मार्गावर क्रमण केले; आणि श्रीरामायणासारख्या दिव्य ग्रंथाचे निर्माण करणारा वाल्मिकी ॠषी निर्माण झाला. मग माझ्या हातून तर केवळ एकच पातक नकळतपणे, अनाहूतपणे घडले.

होय, हा विश्वनाथशात्री वाल्मिकी होणार. नकळत घडलेल्या पातकाचा कलंक पुण्याच्या पर्वतराशी रचून हा धुवून काढणार. अशा दिव्य आत्मरंजनात असतानाच त्यांनी देहत्याग करायचा निर्णय रद्द केला; आणि पुण्यकार्याचा पारमार्थिक मार्ग स्वीकारायचा निश्चय केला.
=================================================
भाग - ६

तेव्हढ्यात दरवाज्याची कडी वाजली, आणि श्रीराम उपाध्यायांचा आवाज आला, 'शास्त्रीजी, अहो शास्त्रीजी. जागे आहात काय?'

श्रीराम उपाध्याय गावामध्ये भटकी करुन् पोट भरणारा. दक्षिणेसाठी वटसावित्रीपासून श्राद्धापर्यंत सारं काही करायचं हा त्यांचा शिरस्ता. श्रीरामचे वडिल आणि काशिनाथशास्त्री यांचा जिव्हाळा. दोघेही सत्शिल आणि समविचारी. श्रीरामच्या वडिलांना काशीनाथशास्त्रींची योग्यता ठाऊक. त्यामुळे त्यांना काशिनाथशास्त्रींविषयी प्रचंड प्रेमादर होता. श्रीरामही शास्त्रीजींचा आदर करीत असे. पण आधिच्या पिढीमधिल लागाबांधा त्यांच्यामध्ये नव्हता.

शास्त्रीजींनी दरवाजा उघडला, आणि श्रीराम आगंतुकासारखे घरात शिरले. ओसरीवर खांबाला टेकून बैठक ठोकीत, जानव्याशी चाळा करीत आणि तोंडातल्या विड्यातून जीभेला मोकळी करीत, श्रीराम बोलते झाले, "काय तब्येत बरी नाही कि काय? आज गावात कुठे दिसला नाहीत. हवा खायला कट्यावरही आला नाहीत, म्हटले काय तब्येत बरी नाही काय म्हणून विचारायला आलो."

श्रीराम उपाध्याय बोलू लागले कि महाकाळेश्वरही पळून जाईल असे लोक थट्टेत म्हणत. गेंगणा बसकट आवाज, आणि पूजेत घडाघडा म्हणायच्या मंत्राप्रमाणेच अथक बडबड करायची सवय, यामुळे, तसेच थोड्याशा चहाटळ स्वभावामुळे श्रीराम उपाध्याय तसे शास्त्रीजींना अप्रियच. पण जुना घरोबा आणि शेजार यामुळे टाळावे म्हटले तरी अटळ आअ अवघड जागीचा संबंध शास्त्रीजी आणि श्रीराम यांच्यात होता. श्रीरामना त्याची कल्पना होती, पण स्वार्थरत बुद्धीपुढे अशा क्षुल्लक द्वेष-मत्सरादिअ वंचना त्यांच्या आड येत नसत.

शास्त्रीजींनी पुढील प्रश्न टाळण्यासाठी त्रोटक उत्त दिले, "हो, थोडी कणकणी होती. पण काढा घेतला आहे. थोडी विश्रांती घ्यावी म्हणत होतो."

"हो विश्राम करा. मी आपला आलो चौकशी करायला. म्हटलं काही हवं नको असेल तर विचारावे. तेव्हढच थोडं सेवेचं पुण्य." असं म्हणत श्रीरामांनी देव्हा-याकडे बघून नमस्कार केला.

"आणि हे काय शास्त्रीबुवा, सगळी आवरा आवर करुन ठेवल्यासारखी दिसते. सदानंदशास्त्रींकडे जाण्याचा मानस दिसतोय. तसे ते म्हणा कुठे येतात या गावाच्या कचराकुंडित."

शास्त्रीजींना हा भोचकपणा आजिबात रुचला नाही. पण काही ऊत्तर देण्याचं प्रयोजन नव्हतं. त्यातून पुन्हा एक प्रश्नवादळ श्रीरामनी निर्माण केलं असतं.

श्रीराम बोलतच होते. "बाकि सदानंदशास्त्री खरे भाग्यवंत. जिल्ह्याला गेलो असताना, मी जाऊन आलो त्यांच्या दर्शनाला. काय तो थाट. वाSS वहिंनींनी सुग्रास भोजन केले होते, आणि सदानंदशास्त्रींनी चंदेरी काठाचं तलम उपरणं दिलं. तुम्हाला सांगतो, फ़क्त महाकाळेश्वराच्या महाअभिषेकालाच घेऊन जातो मी."

महाकाळेश्वराचं नाव घेताच श्रीरामनी उगाच काही पुटपुटत बसल्या जागेवरुन घाटाच्य दिशेनं नमस्कार केला. शास्त्रीजी त्या सगळ्या आगाऊ बोलण्याकडे कानाडोळा करीत होते. विचारांचे आवर्त अजूनही शमले नव्हते. द्वंद्व अजूनही अस्वस्थता वाढवीत होते, आणि श्रीरामांचे वाक्-ताडन चालुच होते.

"बरं तुम्हाला कळला काय आजचा प्रकार. अर्थात तुम्हाला कसा कळणार. तुम्ही तर आज घराबाहेरही पडला नाहीत, आणि बाकी तुमच्याकडे येतो तरी कोण बातमी देणारा माझ्याशिवाय." लुबरे हासत श्रीराम पुन्हा म्हणाले, "अहो, आज गाव पावन झाला. त्या जोश्याच्या चारित्र्यहीन कार्टीने पुष्पावतीमध्ये उडी मारुन काल रात्री जीव दिला. आज तीचं प्रेत भोकरवाडीच्या काठावर सापडले."

ईतका वेळ दुर्लक्ष करणारे शास्त्रीजी अचानक चमकले. अंगावर वीज कोसळावी की फ़णा उगारुन भुजंगाने थेट ह्रदयालाच दंश करावा असं काळजात चर्र झालं. भोवळच यायला लागली. ब्रम्हांड कोसळलं, तारांगण अवकाशात गरगरा घुमू लागलं, धरतीला कंप सुटला, गिरीशंकराचा कळस थरथरला, मेरूपर्वताचा उंच कडा ढासळला. महापतकाचे वारूळात दडलेले नाग फ़ुसफ़ुसत बाहेर आले. अंगभर मुंग्यांनी चावे घ्यायला सुरुवात केली. आतड्यातून एक अनामिक कळ थेट काळजापर्यंत सरसरत गेली. शास्त्रीजी अस्फ़ुट किंचाळले - "आई गSSS महाकाळेश्वराSSS".

अजूनही झाल्या दुःखद प्रसंगाचे रसभरीत वर्णन करण्यात दंग असलेले श्रीराम चमकले. शास्त्रीजींचे विव्हळणे ऐकून ते तडक उठले आणि त्यांना आधार देऊ लागले. त्यांनी शास्त्रीजींना उठवून पलंगावर निजवले आणि काही विचारपूस करु लागले.

शास्त्रीजींनी विश्रांतीचा बहाणा करून श्रीरामना जाण्याची विनंती केली. श्रीरामांनी तरिही काही काळ बोलाचाल करून मगच तिथून काढता पाय घेतला. आणि पुन्हा तीच एकाकी भयाण शांतता पसरली.

आता तर शास्त्रीजींच्या पुढे दत्तात्रय जोशींच्या मुलीचं, कालिंदीचं भूत नाचू लागलं. तीच्या अनेक प्रतिमा निर्माण झाल्या. प्रत्येक प्रतिमेतील चेह-याला अनेक लसलसत्या जिव्हा होत्या. त्या जिव्हातून रक्त ठिबकत होते, आणि शब्दही. ते शब्द शास्त्रीजींना डागण्या देऊ लागले.

'तूच तूच तो अधर्मी. जीच्या माऊलीनं तुला आपल्या हातांनी वाढवलं; तुला ममतेचा घास अनेकवार भरवला; तुझ्या मस्तकावर प्रेमाचा ओथंबलेला हात कितीदा ठेवला; त्या माऊलीची मी कन्या आहे. तू माझा भोग घेतलास? मला मृत्युच्या काळडोहात सोडून दिलंस, अरे नराधमा, कुठे फ़ेडशील हे पाप? कुठे फ़ेडशील त्या माऊलीच्या उपकाराचे पांग? तुझ्या अधर्मी नीच पापकृत्याचा काळिमा घेऊन पांडित्याचं सोंग आणणा-या ढोंगी पाप्या, तुला त्या प्रेमळ मातपित्यांचे शाप लागतील. तुझी वासना शमवण्यासाठी तू ज्या स्त्रीचा भोग घेऊन तृप्त झालास, ती अतृप्त पिशाच्च होऊन तुझ्या डोक्यावर आजन्म भ्रमण करीत राहील."

नभोमंडलातून ता-यांचे पुंजके निखळून शास्त्रीजींच्या मस्तिष्कावर कोसळत होते. वीजांचे लोळ शास्त्रीजींचे काळीज भाजून काढू लागले. त्रिखंड शास्त्रीजींच्या भोवती भ्रमण करू लागले. असंख्य वज्राघातांनी शास्त्रीजी भ्रमित झाले. तसेच ताडकन् उठून त्यांनी चौकातून काळ्Oखात बुडालेल्या आकाशाकडे पाहिले, आणि एखाद्या बैलगाडीच्या चाकाखाली ढेकळानं फ़ुटावं असं आतल्याअत फ़ुटल्यासारखे ते गुरगुरु लागले. त्यांच्या यातनांना क्षितीज उरलं नव्हतं. स्वप्नातदेखिल जे मनाला स्पर्श करू शकलं नाही, ते पापकृत्य हातून घडल्याचा महाविषाद आता त्यांना असह्य झाला. मन-मस्तिष्कावरचा तोल सुटला, आणि शास्त्रीजी भ्रमितावस्थेत उधळलेल्या वारुसारखे घराबाहेरच्या खोल अंधाराचं पोट फ़ाडित पुष्पावतीच्या दिशेनं सुसाट निघाले.
=================================================
भाग - ७

दत्तोबांच्या घरात कित्येक वर्षांनंतर कणकीच्या मिणमिणत्या दिव्यानं पेट घेतला होता. पोटचं लेकरू काळाच्या कराल दूतांनी मृत्युच्या अथांग गर्तेत ओढून नेल्यानं वादळात एखादं राहतं झोपडं कोसळाव, तसं दत्तोबा जोशींचं कुटुंब कोसळलं. शोकातिरकानं श्रांत झालेले त्यांचे डोळे त्या मिट्ट काळोखातही टक्क जागे होते. दुर्दैवाच्या दुष्टचक्राने त्यांचे विचारचक्र गतिमान केले होते. सांत्वना करणा-यांनी काढता पाय घेतला होता, आणी आता एकाकीपणाच्या भोव-यात दत्तोवा अनिवार्यपणे ओढले जात होते.

अचानक त्यांच्या लक्षात आले, सारा गाव सांत्वनेसाठी लोटला, पण शास्त्रीजी नाही आले. हे अत्र्क्य, अशक्य आहे. कि दुःखावेगात आपल्या शास्त्रीजी आल्याचे लक्षातच आले नाही. पण असे होणार नाही. शास्त्रीजी आले आणि आपल्या लक्षात आले नाही हे केवळ अशक्य आहे. का बरे आले नसावेत? दत्तोबा व्याकुळले.

कदाचित त्यांना बातमीच मिलाली नसेल. पण हे शक्यच नाही. कुणीतरी त्यांना बोलणारच. मग काय झाले असावे?

अरे देवा! कालिंदिच्या चारित्र्यपतित आचरणाने तर शास्त्रीजींनी धिक्कार म्हणून ईथे यण्याचे टाळले नसेल ना? नक्कीच अस्सच असलं पाहिजे. अखेर काशिनाथशास्त्रींच्या उज्वल घराण्याचे शास्त्रीजी वारस आहेत. आजन्म ब्रह्मचर्याचं कठिण व्रत स्वीकारणा-या, अंगिकारणा-या अन् काटेकोरपणे पाळणा-या त्या विद्यावंत माहात्म्याने या पतित वास्तूत का यावे! पोरीनं मरणानंतरही या कशा नरकयातना या अभागी भाळी मारल्या! एव्हढ्या पुण्यवान् माणसानं वाळित टाकावं, हे केव्हढं महादुर्भाग्य!

नाही, हे मी कदापि सहन करु शकत नाही. ईतर कोणताही आघात सहन करेन, पण हा जीवनभोग मी नाही सहन करु शकत. श्री महाकाळेश्वराचे चरण आणि शास्त्रीजींच्या घराण्याची सोबत यावाचून जर जीवन जगायचे असेल, तर त्यापेक्षा मी मृत्युच अधिक श्रेयस्कर.

असाच तडक शास्त्रीजींच्या घरी जातो, आणि वयाने वडिल असूनही त्यांचे पाय धरुन पोरीच्या पातकाची; चारित्र्यहीनतेची क्षमा मागतो. ऊदार अंतःकरणाने शास्त्रीजी नक्की जवळ घेतील, आणि नाहीच घेतले तर पुष्पावतीच्या विशाल पात्रात या देहाचा त्याग करेन.

एका निश्चयानं दत्तोबा ऊठले, आणि तसक शास्त्रीजींच्या घराच्या दिशेनं अंधारात झपाझप पावले टाकू लागले........रात्रीच्या अंगावर सरसरुन काटा आला.
***************************
मोकाट कुत्री भुंकत होती. रातकिड्यांची चुकार किरकिर चालली होती. वटवाघळं बेभान घुमत होती. घुबडाचे घुत्कार रात्र भयाण करीत होते. पाली जरा अधिकच चुकचुकत होत्या. झोप न येणा-या पाखरांच्या पिलांना त्यांच्या आया खोप्यात चुचकारत होत्या. पुष्पावतीच्या किना-यावर एक टिटवी दूर कुठेतरी कर्कश ओरडत होती.

वारा श्वास रोखून होता, हवा स्तब्ध होती. निरव रात्रीवर कसल्यातरी अक्रिताचं सावट होतं. कालिंदिच्या कलेवराला तरंगत ठेवणारी, आणि तीच्या अस्थिंना वाहून नेणारी पुष्पावती आणखि कसल्यातरी अक्रिताच्या चाहूलीनं भयशंकित झाली होती. गावाच्या काळजात भितीचं काहूर माजलं होतं. मृत्युदेवतेचे काही निर्दय दूत जडं अंतःकरणानं आणि बोजड पावलांनी पुष्पावतीच्या किना-याच्या दिशेनं चालू लागले होते.
*****************************
आपल्या जघन्य अपराधाच्या प्रायश्चित्तासाठी शास्त्रीजी अतीव दुःखावेगानं झालेल्या भ्रमित अवस्थेत पुष्पावतीच्या त्या चिरपरिचित घाटावर येऊन पोचले. रवीआगमनापूर्वी शुचिर्भूतपणे येणा-या पुण्याचरणी शास्त्रीजींना मढ्यरात्रीच्या अंधारडोहात पुष्पावतीच्या किना-यावर आलेलं पाहून प्रत्यक्ष महाकाळेश्वराचं काळिज चरकलं. घाटाच्या पाय-या शास्त्रीजींच्या पावलांच्या भ्रमित अस्थिर स्पर्शानं थरारल्या. पुष्पावतीनं टाहो फ़ोडलाच; आणि शास्त्रीजीनी पुष्पावतीच्या प्रवाहाचा धडधडणारा ऊर फ़ोडत "महाकाळेश्वराSSS" अशी आर्त हाक मारीत आपला देह पुष्पावतीच्या उचंबळलेल्या ह्रदयात लोटला.

त्या प्रवाहात धपकन् पडलेल्या शास्त्रीजींच्या देहानं पुष्पावतीच्या काळजाचं अबोल पाणी उचंबळून घाटाच्या पाय-यांवर पडलं. ती पुष्पावती धाय मोकलून रडत होती; कि घाटाच्या दगडी पाय-या आसवांची टीपं गाळत होत्या! सा-या सृष्टीनं डोळे गच्च मिटले.
=================================================
भाग - ८

दत्तोबा झपाझप पावलं टाकित शास्त्रीजींच्या घराकडे निघाले होते. वारूळातून पिसाटलेल्या मुंग्या बाहेर पडाव्यात तशा विचारांच्या मुंग्या दत्तोबांच्या मेंदूतून बाहेर पडत होत्या. परित्यक्ततेची जाणीव घूशीप्रमाणे काळिज पोखरीत होती. पाय पिसाटल्या वा-यासारखे शास्त्रीजींच्या घराकडे धावत होते.

दत्तोबा शास्त्रीजींच्या घरापाशी येऊन पोचले. एवढ्या गडद रात्री घराचे दार सताड उघडे पाहून त्यांना विस्मय वाटला. ते दारातून त्या चौसोपी वाड्याच्या पोटात शिरले. संपूर्ण वाडा अंधारात बुडाला होता; कि घटनांच्या अभावित धक्क्यांनी काळवंडला होता!

दत्तोबा चाचपडत ओसरीपर्यंत पोचले आणि काप-या आवाजात त्यांनी शास्त्रीजींना हाक मारली. दत्तोबांचे शब्द अंधारात विरुन गेले; पण कुठलाच प्रतिसाद आला नाही. डोळ्यातून वाहणा-या अश्रूंना बंधमुक्त करीत दत्तोबांनी शस्त्रीजींना उच्चरवात पुन्हा एक साद घातली. त्यांच्या आवजाच्या स्पंदनाव्यतिरीक्त त्या अंधा-या घरातून कुठलाच प्रतिसाद आला नाही.

जणू आपल्या भवितव्यालाच आपल्या बोटांनी चाचपडत दत्तोबा त्या अंधारविश्वात पुढे सरकले. एव्हाना, शास्त्रीजी घरात नसावेत अशी धुसर, अस्पष्ट जाणीव त्यांना झाली. पण मन ते स्वीकारेना. चाचपडत चाचपडत दत्तोबा देवघरापाशी पोचले. देवघरात अजून तेल संपलेली समईची मंद ज्योत जणू दत्तोबांची वाट बघत जीव धरुन होती. दत्तोबांनी त्या समईच्या वातीनंच जवळची दिवटी पेटवली; आणि समईची ती ज्योत काळोखाच्या विश्वाशी सलगी करीत अंतर्धान पावली.

दिवटी घेऊन दत्तोबा घरभर फ़िरले. शास्त्रीजींना आर्त हाका घालत त्यांनी घराचा सांदीकोपरा धुंडाळला. अनिच्छेनेच त्या दिवटीच्या खिन्न प्रकाशाने ते सारं घर जणू एका युगानंतर काही क्षणांसाठी उजळून निघत होतं, नी पुन्हा उजेडाचा स्पष्टपणा सहन न होऊन स्वतःच तोंड अंधारात लपवत होतं.

शास्त्रीजी कुठे गेले या संभ्रमानं आणि अतीव दुःखानं व्यथित हतबद्ध अवस्थेत दत्तोबा पुन्हा देव्हा-यापाशी परतले, अन् हमसून हमसून रडू लागले. देव्हा-यातल्या निर्जीव देवांना जाब पुसू लागले. दुःखावेग अनावर झाला आणि दत्तोबांना जवळपास मुर्च्छाच आली. देव्हा-यातील संदूकावर डोके ठेऊन तो वृद्ध देवाच्या दारात अनाकलनीय दैवदुर्विलासाची दाद मागत अचेतन होऊन पडला.
************************************

आगतिक पुष्पावतीने शास्त्रीजींच्या देहाचा अर्घ्य परम अनिच्छेने स्वीकारला. शास्त्रीजींनी पात्राच्या मध्यावर आल्यानंतर आपला देह शिथिल केला, हातपाय मारणे थांबविल, आणि मनाच्या भग्न गाभा-यात मृत्युदेवतेला प्राणहरणाचे अतीव आर्त आवाहन करु लागले. पाण्याच्या लोटाबरोबर वहात शास्त्रीजी घाटापासून दूर जाऊ लागले. पुष्पावतीचे निरीच्छ उदक आपले काम निर्लेपपणे करीत होते. दगडाची बाहुली गिळावी तद्वत नदीचे पाणी शास्त्रीजींच्या देहाला तळाकडे ओढू लागले. मृत्युचे दूत आपल्या ओंजळीच्या शिंपल्यात शास्त्रीजींच्या देहाचे मौक्तीक झेलण्याकरता आतुरपणे पुष्पावतीच्या तळाशी सविनय बसले होते. आज प्राण हरण करण्यापुर्वीच ते हरले होते. कलियुगातील पुण्य मावळण्यासाठीच जणू क्रूर नियतीनं शास्त्रीजींशी भयंकर डाव रचला होता.

शास्त्रीजी बुडू लागले. नाकातोंडात पाणी जाऊ लागले. श्वास घेणे कठिण वाटू लागले. डोळ्यात पाणी जाऊन डोळे लाल झाले. पाय बधिर होऊ लागले. संवेदना नष्ट होताहेत असे स्पष्ट जाणवू लागले. जाणीवा धूसर होऊ लागल्या. पुष्पावतीचे पाणी उदरात पोचले. जडं देह जडशीळ झाला. श्वास थांबू लागला.

यातना असह्य झाल्या. जणू कर्दनकाळानं गळ्याभोवती काळमिठी आवळली. घर्णरंध्र पाण्यानं भरली. श्वासांच्या अथक अश्वांना मृत्युने लगाम घातला. ऊर मृत्युच्या अजगरानं गट्ट आवळला. ह्रदयाची स्पंदन थांबू लागली. आतड्यानं आचके तोडले, आणि....आणि शास्त्रीजींमधली जीजीविषा त्या नदीच्या बुडापासून एखाद्या सुसाट तीराप्रमाणे ऊसळून आकाशात उडाली.

शास्त्रीजी जीव वाचवण्यासाठी धडपडू लागले. जीवनाचा उन्माद प्रायश्चित्ताच्या आकर्षक अभिलाषेपेक्षा अधिक आश्वासक ठरला. पापक्षालनाची आवश्यकता जीवितेच्छेपुढे हरली. पोहत पोहत शास्त्रीजी गावापासून थोडे दूर किना-याला लागले.

काही क्षणांच्या विश्रांतीनंतर शास्त्रीजींमध्ये हुशारी आली. प्रायश्चित्ताच्या अपयशाने निर्माण झालेली अतिसामान्यत्वाची जाणीव आता त्यांना बोचू लागली. टाहो फ़ोडून दुःखाचा पहिला कढ वाहून गेला. एक मन पुन्हा पुष्पावतीमध्ये देहार्पण करण्यासाठी साद घालीत होते. पण जीवितेच्छेनं त्यावर केव्हाच मात केली होती. ते मन आता केवळ शल्य बनून आयुष्यभर शास्त्रीजींच्या मनात सलत राहणार होतं.

शास्त्रीजींनी मनाची स्वाभाविक समजूत घातली. हा सारा दैवाचा खेळ. ईश्वराच्या मनात आपल्या हातून जीवंतपणी पुण्यकर्म घडवून पापक्षालन करून घ्यावयाचे असेल, तर भगवंताच्या त्या ईच्छाज्ञेपुढे मानवानं शरण जाणं भाग आहे. एका पातकाला धुण्यासाठी आत्महत्येचं आणखि एक महापातक करणं हा ईश्वराच्या सृष्टीनिर्माणाच्या मूळ सद्हेतूचा अवमान आहे. नियतीच्या अनाकलनीय खेळापुढे मनुष्य हतबल आहे. मनुष्य ही तर केवळ कळसूत्री बाहुली. जर नियतीच्या मनात असते, तर पुष्पावतीने या देहाची आहुती स्वीकारलीच असती. मनुष्याने नियतीवर आरूढ होण्याचा यत्न करणे हे गैरच आहे. पराधीन मनुष्य हा केवळ दैवाच्या हातचा बाहुला आहे. प्रत्यक्ष देवेन्द्राला सुद्धा जो मोह आवरला नाही, उग्र तपस्वी विश्वामित्र जीथे मेनकेच्या सौंदर्याला शरण गेले, तीथे मी कलियुगातील एक यःकश्चित मानव मात्र! मी जर नियतीच्या खेळाचा भाग म्हणून कालिंदिच्या त्या मृतवत पातकी मलिन देहाला अखेरचे शासन करण्याकरता वापरलो गेलो असेन, तर त्यात माझा काय दोष? किंबहुना, दैवानं त्या पापी चरित्रहीन कालिंदिला दंडित करण्यासाठीच माझ्यासारख्या आजन्म वैरागी ब्रम्हचार्याची निवड केली असेल. किंबहुना माझ्यासारख्या पुण्यपावन देहात्म्याशी संलग्न पावून कालिंदिचे पातक धुतले गेले, तीचा उद्धारच झाला. होय, नक्कीच! या सर्व घटनाक्रमामागे परमेश्वरानं, दैवानं निश्चितच एक उदात्त हेतू नेमला असणार. अन् त्यातूनच माझ्याशी संयोगानं कालिंदिला मुक्ती प्रदान केली असणार.

अखेर जीवन हेच अंतिम सत्य आहे, आणि मृत्यु स्वीकारून त्या अंतिम सत्यालाच मी तिलांजली द्यायला चाललो होतो. आता या जीवनप्रवाहानेच मी असे कित्येक मलिन किनारे धुवून काढेन. अशा विचारप्रवाहात शास्त्रीजी उभे राहिले, आणि पहाटेच्या अंधारात घराकडे चालू लागले......धरा सर्द झाली.
**********************************************

श्रांत दत्तोबा जागे झाले. साश्रु नयनांनी देवाकडे बघत त्यांनी क्षमाप्रार्थनेसाठी हात जोडले, आणि त्यांच्या हाती कसलातरी कागद लागला. किंचित विस्मयानं त्यांनी तो उलगडला; आणि दिवटीच्या अंधुक प्रकाशात ते शास्त्रीजीचे हस्ताक्षरीत पत्र वाचू लागले. शब्द अंगाला निखा-यासारखे पोळू लागले. पत्राचे वाक्य दत्तोबांनी वाचले - 'पापपुण्याच्या मायावी मोहजालातून परमेश्वराच्या अड़्कावर विराजमान होण्यासाठी मी हा मलिनदेह पुष्पावतीच्या प्रवाहात अर्पण करीत आहे', आणि दत्तोबा अक्षरशः कोसळले. त्या वाक्याचा भयार्थ दत्तोबांना कळला. भूमी चक्राकार फ़िरु लागली. हा निश्चितच माझ्या कालिंदिच्या पापाचा परिणाम.

आमच्या पापाचे परिक्षालन करण्यासाठी या महात्म्यानं प्रायश्चित्त स्वीकारायचं ठरवलं. गावावरती आणि धर्माचरणावरती निस्सिम प्रेम करणारा हा महाभाग गावातील कुठल्यातरी चारित्र्यहीन स्त्रीच्या पापाचा भार कसा सहन करणार? गावाची आणि धर्माची ही मानहानी हा मानभावी महर्षी कशी पचवणार. नक्कीच माझ्या घराण्याच्या पापाच्या परिमार्जनासाठी शास्त्रीजींनी हे देहान्त प्रायश्चित्त स्वीकारले आहे. हे विधात्या, हा क्षण पाहण्यासाठी का मला जीवंत ठेवलेस?

दत्तोबा या आघातानं बेभान झाले, आणि "शास्त्रीजीSSS" असे ओरडत पहाटेच्या निळ्य़ा अंधाराला चिरत त्यांनी पुष्पावतीच्या दिशेनं धाव घेतली.

पुष्पावतीचं सर्द काळिज पुन्हा चित्कारलं. निर्जीव होत असलेल्या घाटाच्या पाय-यांनी आकांत मांडला. नुकत्याच जाग्या होत असलेल्या वृक्षवेलींनी टाहो फ़ोडला. पाखरं आक्रंदू लागली. फ़ुलं स्फ़ुंदू लागली. दंव आसवांत बुडालं. पानांची काळजं धडधडू लागली. तांबडं फ़ुटत असलेले क्षितीज रक्ताश्रूत न्हाऊन गेलं. निळ्या निश्चळ आभाळाचं आत्डं तुटतुटलं. श्री महाकाळेश्वरानं आपले त्रिनेत्र योगसमाधिच्या बहाण्यानं बंद केले........

अन् पुष्पावतीच्या गोठलेल्या पात्रात दत्तोबांनी आपल्या नश्वर देहाला लोटलं; निजधामाच्या चिरविश्रांतीसाठीच.......

सृष्टीचा शाश्वत श्वास एकाएकीचं थांबला...

*************************समाप्त *************************

गुलमोहर: 

निसर्ग वर्णन करण्याची कला तर अप्रतिम
पण नेमके काय स्पष्ट करायचे आहे
त्या तरूण लेकीच्या शरीरावरून ओझरणार इतक्यात ते सावरले.>>>>>>>>>>> या ओळीत काही तरी गुढ लपल्या सारखे वाटते आहे

.

.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. प्रतिसादाने उत्साह वाढतो.

पुढे लिहीत राहीनच, पण बेताबेताने वाचले तर अधिक रूचकर होईल असे वाटते आहे. त्यामुळे, एक भाग एका दिवशी, असे टाकत राहीन.

आ.
सारंग_काव्यसाधक

.

नमस्कार sgbhanage
तुम्हाला कथा प्रतिसादात टाकायची गरज नाही, तशी टाकल्याने कथा आणि वाचकांचे प्रतिसाद यांची सरमिसळ होईल. त्या ऐवजी वर जी मुख्य कथा टाकली आहेत तिचे संपादन करा आणि जुन्या मजकुराखालीच हा नवीन मजकुर कॉपी पेस्ट करा.

बापरे! काय वर्णनशैली आहे!! प्रसंग डोळ्यासमोर उभी करायची ताकद आहे लिखाणात...

काही ठिकाणी थोडी शब्दबंबाळ होतेय जड शब्दांमुळे.. पण उत्तम!

अभिनंदन! काही शब्द सोडले तर एवढ्या शब्दबंबाळ कथेतील शुद्धलेखन प्रशंसनीय!

लिहीत राहा...
आणि रूणिने सांगितल्याप्रमाणे कथा वेगळीच पोस्टा... प्रतिसादात नको... गोंधळ वाढेल.

Happy

Searching for guaranteed search engine optimization services at affordable rates? Your search ends here!!! Find your website on the top of popular search engines with our seo services...

कथेबद्द्ल नव्हे- कथानायकाबद्दल थोडंसं - दुसर्‍या माणसाच्या संमतीशिवाय असं काही करणं हे पाप. आणि असल्या कारणाकरता दुसर्‍याला मारणं हे महापाप.. पण ह्या सगळ्याच्या मुळाशी आहे स्वतःच्या नैसर्गिक उर्मी नाकारण्याचं basic पाप.. असो! ही फक्त कथा आहे.. (आणि अशी लोकंही असतातच की खर्‍या आयुष्यात! )असो.. जोपर्यंत दुसर्‍याला त्रास होत नाही, तोपर्यंत कोणी काहीही करू शकत!

पुढचा भाग कधी येणार? लवकर टाका!

पहिला भाग वाचुन पुढे वाचायची उत्सुकता होती. शास्त्रीजींकडून काय घडल असेल याची थोडी कल्पना पण आली. पण कथेच्या मांडणीबद्दल लिहीलेल्या सगळ्यांनाच अनुमोदन.
लिखाणात विलक्श्ण ताकद आहे.
पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत आहे. Happy

शब्द जड जातायत पण हे मराठीतले सुंदर शब्द आहे ह्याची जाण आणि अभिमान बाळगुन कथा वाचत गेले आणि काही ताकदवान वाचतोय असं वाटलं. पु.ले.शु.

कथेला संथपणा आलाय... मला वाटतं कथेपेक्षा तुम्ही वातावरण निर्मितीच्या जास्त प्रेमात आहात.

प्रतिसादाबद्दल सर्वांचेच धन्यवाद.

कथा शब्दबंबाळ असल्याचे कौतुकमिश्रित आरोप अपेक्षित आहे. पण ते शब्द हे माझे व्यसन तर आहेच, पण तेच माझे सामर्थ्य आहे. कदाचित काहींना साध्या शब्दात जादु साधते, मला जड शब्दात आनंद मिळतो.

कथा ब-याच अंशी संथ वाटते. कारण या कथेत कथानक फार मोठे नाही. जर वातावरण निर्मिती न करता ती कथा लिहीली तर ती उगाचच संक्षिप्त वाटेल असे मला वाटते. तसेच त्या वातावरण निर्मितीच्या योगेच मी माझ्या शब्दधनुष्याला प्रत्यंचा चढवु शकतो.

माझ्या मते या कथेत ३ च गुण आहेतः
१. शब्दाविष्कार
२. उत्सुकता
३. शेवट

मला खात्री आहे कि कथेचा शेवट तुम्हाला थोडा का होईना धक्का देऊन जाईल.

सारंग_काव्यसाधक

मित्रहो,

कथा संपविली आहे. आपल्या प्रतिसादांची अपेक्षा करतो.

आजवरच्या सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद!

सारंग_काव्यसाधक