चित्रपट परिक्षण – tc.gn – टेक केअर गुड नाईट - साइबर गुन्हा आणि वास्तव

Submitted by भागवत on 1 September, 2018 - 09:07

tc-gn-marathi-film-poster.jpg
चित्रपटाची सुरुवात एका व्याखाना पासून सुरू होते. सचिन खेडकर हा व्याखान निमंत्रित म्हणून त्यांच्या एक मित्राची गोष्ट प्रेक्षकांना सांगतो. खरे तर ती कथा त्याची स्वत:चीच असते. हीच चित्रपटाची कथा आहे. या कथेचा नायक अविनाश पाठक (सचिन खेडेकर) आहे. हा एका चांगल्या कंपनीत मोठ्या हुद्यावर असतो. पण नवीन तंत्रज्ञाना सोबत त्याला जुळवून घेता येत नाही म्हणून तो सेवानिवृत्ती घेण्याच्या विचारात असतो. आसावरी(इरावती हर्षे) त्याची पत्नी एक शैक्षणिक सल्लागार आहे. पण तिला नवीन पिढी सोबत जुळवून घ्यायला अवघड जात आहे. त्यांचा मुलगा अमेरिकेत शिक्षणासाठी गेला आहे. त्यांची मुलगी सानिका (पर्ण पेठे) बारावीला कमी गुण मिळाल्यामुळे कॉमर्सला असते. अविनाश घरच्यांचा विरोध पत्करून निवृत्ति घेतो. ऐच्छिक निवृत्तिसाठी त्याला ५० लाख मिळतात.

अविनाशला निरोप देण्यासाठी त्याचा मित्र आणि मित्राचे कुटुंब आले असते. मित्राची मुलगी आणि सानिका या चांगल्या मैत्रिणी असतात. सचिन खेडेकरांनी भूमिकेला न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. नवीन तंत्रज्ञाना शिकण्यासाठी विरोध करणारा बाप. तंत्रज्ञाना साठी सर्वस्वी मुलांवर अवलंबून असलेला बाप छान रंगवलेली आहे. मुलीला मोकळीक आणि मुलाला अति-मोकळीक देणारा बाप अभिनयातून डोकावतो. इरावती यांचा ठीकठाक अभिनय आहे. त्यांच्या अभिनयाचे एक दोन वेळेस सर्व साधारण प्रकटीकरण झाले आहे. त्या काही विशेष काही प्रभाव पाडू शकल्या नाहीत. पण पर्ण पेठेने चांगला अभिनय केला आहे. एकांगी मुलगी जिला प्रियकर नाही. नटण्या-मुरडण्याची सवय नाही. एकच मैत्रिण आहे. एखादी विशेष आवड नाही फक्त दिवसरात्र इंटरनेट वर गप्पा मारणे यात तिचा दिवस जात असतो.

ऐच्छिक निवृत्तिच्या भाषणात अविनाश सांगतो की त्याच्या अपूर्ण इच्छा, आवड पूर्ण करण्यासाठी तो आत्ता निवृत्ति नंतर खास वेळ देणार असतो. त्याची पहिली इच्छा तो युरोप पर्यटन करून करतो. आणि तिथेच त्यांच्या घरावर वाईट घटनाची मालिका सुरू होतो. अविनाश मोबाइल बंद पडतो. त्यात अविनाशने त्यांच्या मित्राला ५ लाखांचा धनादेश बँकेत वटत नाही. बँकेत जाऊन त्यांना माहिती मिळते की अविनाशच्या खात्यातील ४५.५ लाख ऑनलाईन हस्तांतरीत झाले आहेत. हे ऐकून त्यांना जबरदस्त धक्का बसतो. त्या धक्यातून सावरत असताना सानिका सांगते खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. त्यात प्रत्येक जण एकमेकाला दोष देत असतो. पालकांना आपल्या पाल्यांना आपण काय संस्कार देले यांची जाणीव होते. सानिकाचा एक व्हिडिओ इंटरनेट वर व्हायरल होतो. सानिकाच्या मैत्रिणीचा गर्भपाताचा निर्णय अंगलट येतो आणि मैत्रिणीचा प्रियकर पळून जातो. तिला शेवटी दवाखान्यात अॅडमिट व्हावे लागते. त्यामुळे अविनाशचा मित्र खचतो कारण त्यांनी मुलीला बरेच निर्बंध घालून सुद्धा असे हाल सोसावे लागत असतात. निर्बंध हे नात्यात मिठा सारखे असतात. जास्त झाले तर नात कडू होत आणि कमी झाले तर नात अळणी होत. आपलं माणूस जर आपल्या पासून दूर झालं असेल तर तो कधी दूर गेला हे त्यांच्या डोळ्यातून दिसणार्‍या भावातून जुन्या फोटो मधून हुडकून काढता येते. पालकत्व ही एक तारेवरची कसरत आहे.

पहिला भागात कथेचा वेग खूप चांगला आहे. फक्त अविनाश आणि सानिका यांचे पात्र चांगल्या रित्या उमलण्यात आली आहेत. इतर पात्रांना जास्त वेळ दिला नाही. यात आदिनाथ कोठारेने एका साइबर गुन्हेगाराची व्यक्तिरेखा साकारली आहे. या पात्राला आणखी थोडा वेळ देऊन रंगवायची गरज होती. संस्कृती बालगुडे यांची भूमिका खूप छोटी आहे आणि जास्त प्रभाव पाडत नाही. महेश मांजरेकरांनी पोलीस पवार यांचे प्रामाणिकपणे सादरीकरण केले आहे. पवार हा काही सिंघम पोलीस नाही त्याला त्याच्या मर्यादा माहीत आहेत. अचूक टायमिंग साधत ते अवघड प्रसंगात सुद्धा कॉमेडी करतात. मांजरेकरांनी व्यक्तिरेखेचे छान बेअरिंग पकडले आहे. दिग्दर्शकाचा हा पहिलाच चित्रपट असला तरी नवखेपण जाणवत नाही. कथा उत्तम फुलवण्यात ते यशस्वी झाले आहेत. पण काही मूलभूत चुका सुद्धा झाल्यात.

कथा उत्तम आहे. पटकथा सुद्धा उत्तम आहे. संवाद, सादरीकरण, चित्रीकरण छान आहे. दुसर्‍या भागात कथा थोडी मंदावते. पण थोड्या वेळाने परत ट्रॅक वर येते. मराठीत पहिल्यांदा सायबर क्राइम वर सिनेमा येत आहे. एकाच सिनेमात आपल्याला मोबाइल सिम हेराफेरी, इंटरनेट वरील खराब व्हिडिओ, ईमेल फिशिंग, साईबर गुन्हे, नवीन आणि जुन्या पिढीतील वेगवेगळे प्रश्न आणि त्यांच्यातील अंतर, बेरोजगारी, कमी वेळेत पैसा कमावण्याची मानसिकता आणि तरुण पिढीचे एकाकीपणा यावर भाष्य करतो. अविनाश आणि त्याचे कुटुंब एकमेकाच्या मदतीने आणि पोलीसाच्या मदतीने ५० लाख कसे मिळवतात आणि त्यांच्या आप-आपसातील नातेसंबंधाचा तिढा कसा सोडवतात हे दुसर्‍या भागात बघताना उत्कंठा वर्धक ठरते. शेवटी सानिकाचा संवाद आहे की तुम्ही व्याखाना मध्ये कथा ही दुसर्‍याची न सांगता स्वत:ची सांगा. त्यामुळे मला प्रेक्षकात बसता येईल आणि मी ज्या चुका केल्या त्या परत करू नका हे सुद्धा सांगता येईल. अविनाश सांगतो मी दुसऱ्या वेळेस प्रयत्न करेन. फास्टर फेणे किंवा द्रीशॅम यासारखे उत्तम प्रतीचे उत्कंठा वर्धक चित्रपट आधीच येऊन गेले आहेत. चित्रपट बघताना आपल्याला काही प्रश्न पडतात पण ते दुर्लक्ष केलेस एक चांगला सिनेमा आपल्याला बघायला भेटेल.

"थोडक्यात नवीन दमदार कथानक, योग्य दिग्दर्शन, चांगला अभिनय, रहस्याचा तडका, चांगल्या उपकथानकाची जोड, नात्याची तरल उकल, उत्तम निवडलेली कास्टिंग, उत्तम अभिनय, आणि एक सुद्धा गाणं न टाकता प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवण्याची कला यामुळे या चित्रपटाला मिळतात २.५ स्टार. चित्रपट कुटुंबासोबत एकदा जरूर बघण्यासारखा आहे."
Star_rating_2.5_of_5.png

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

आम्हीही काल पाहिला. महत्त्वाच्या विषयाला हात घातला आहे, त्यामुळे त्याबाबतीत सिनेमा उत्तम. जे लोक नव्याने इंटरनेट वापरायला लागलेत, विशेषतः ज्ये ना त्यांच्याकरता तर महत्त्वाचाच आहे हा सिनेमा.

पण थोडा भाबडाही आहे. विशेषतः पोलिसांनी केलेलं सहकार्य! Happy आजच वर्तमानपत्रात बातमी आहे की एकच सायबर सेल आहे, जो पुरेसा इक्विप्ड नाहीये, सायबर ठाणी उभारावीत याकरता केंद्र सरकारने फंड ही दिले आहेत, पण त्यांचा उपयोग करून घेतलेला नाही, त्यामुळे सायबर गुन्हे वाढतच आहेत. कॉसमॉस बॅन्केच्या सर्व्हरवर झालेला हल्ला हे ताजं उदाहरण. अशा पार्श्वभूमीवर पोलिसांनी धडाडीने केलेला तपास विश्वसनीय वाटत नाही, पण ठीके, सिनेमाचा मुद्दा पोलिस तपास नाही, गुन्हा कसा घडतो हा आहे, त्यामुळे ओके.

मला भावनांच्या प्रकटीकरणाबाबत मात्र सिनेमा कमी वाटला. अनेक इमोशनल संवाद फारच सपाट म्हणले गेलेत, त्यात नक्कीच सुधारणेला वाव होता. वन टाइम वॉच.

याच मुद्द्यावर सिनेमापेक्षा एक टीव्ही मालिका जास्त उत्कंठावर्धक होऊ शकेल. गिरिश जोशी यांनी 'रुद्रम'चं जबरदस्त लेखन केलेलं आहे, त्यामुळे हेही जमेल त्यांना.

प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद पूनम!!! आपला अभिप्राय मला चांगले लेखन करण्यास प्रेरित करेल!!!
मला भावनांच्या प्रकटीकरणाबाबत मात्र सिनेमा कमी वाटला. अनेक इमोशनल संवाद फारच सपाट म्हणले गेलेत, त्यात नक्कीच सुधारणेला वाव होता. वन टाइम वॉच. >> +१
50 लाख बँकेतून गायब झाले तरी आसावरी आणि सानिका यांच्या चेहऱ्यावर भाव सारखेच. "खुप मोठा प्रॉब्लेम झालाय" - हे वाक्य तर एकदम सपाट गेलाय. आदिनाथ एक दोन ठिकाणी लहान मुला सारखा चेहरा करतो.
याच मुद्द्यावर सिनेमापेक्षा एक टीव्ही मालिका जास्त उत्कंठावर्धक होऊ शकेल. गिरिश जोशी यांनी 'रुद्रम'चं जबरदस्त लेखन केलेलं आहे, त्यामुळे हेही जमेल त्यांना. >>+१

प्रोमो वरून वाटलं की दृश्यम चा रिमेक असेल। सचिन खेडेकर आणि पर्ण पेठे आवडतातच। वीकएंड ला बघावा वाटतंय।

नक्की बघेन >> +१
प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद वेडोबा!!! आपला अभिप्राय मला नक्कीच चांगले लेखन करण्यास प्रेरित करेल!!!