कभी कुछ पल जीवन के

Submitted by कांदापोहे on 8 October, 2009 - 05:57

पुण्यात दरवर्षी पंचमदा यांच्या जयंती व पुण्यतिथी निमीत्त www.panchammagic.org हे गेले अनेक वर्ष एक कार्यक्रम आयोजीत करते. यामधे मुखत: पंचमदांबरोबर काम केलेले किंवा त्यांचे चाहते असलेले संगीतकार, वादक, चित्रपट निर्माते इ. पैकी कुणालातरी आमंत्रीत केले जाते. आरडी बर्मनला त्यानेच संगीत दिलेल्या गाण्याने श्रद्धांजली देण्यात येते व त्याचा अनोखा वाढदिवस साजरा केला जातो. आत्तापर्यंत गुलजार, मनहरी सिंग, केसरी लॉर्ड, फ्रँको वाझ इ. दिग्गज कलाकार या कार्यक्रमात आपली उपस्थिती लावुन गेले आहेत.

नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात गीतकार योगेश हे मुख्य अतिथी होते. कार्यक्रम सुरु झाला तेव्हा माहीत नसलेल्या प्रेक्षकांना हा कोण माणुस आहे हे कळलेच नाही. नंतर किशोरकुमारचे व लता मंगेशकरचे भयंकर सुंदर गाणे 'रिमझीम गीरे सावन' लिहीणारा गीतकार तो हाच याचा साक्षात्कार झाला.

आनंदसारख्या महान चित्रपटात कवी योगेश यांची 'कही दूर जब दिन ढल जाये, जिंदगी कैसी हे पहेलि' सारखी गाणी होती. गम्मत म्हणजे मैने तेरे लिये ह्या गुलजारसाहेबांच्या गाण्याकरता पण लोक योगेशजी यांचे अभिनंदन करत. 'रजनीगंधा फुल तुम्हारे' व बातों बातों मै मधले 'न बोले तुम न मैने कुछ कहा' पण यांचेच. 'ना जिया लागे ना, तेरे बिना मेरा कहीं जिया लागे ना' हे अप्रतिम गाणे व 'ना जाने क्युं होता है ये जिंदगी के साथ' हे माझे फेवरीट गाणे.

आयुष्यात अनेक खस्ता खाउन इंडस्ट्रीत आलेल्या या कलावंताला लक्ष्मी मात्र प्रसन्न झाली नाही. कमर्शीअलपेक्षा आर्ट फिल्म जास्ती मिळाल्या. अर्थात त्यांना त्याचे दुख: अजीबात नाही. कदाचीत त्याचमुळे त्यांना 'जिंदगी उल्झनो से भरी है, अजनबी है सफ़र की राहें, हमसफर थे जो कल तक हमारे फेर ली है उन्हीने निगाहे' सुचले असेल.

लखनौवरुन कामाकरता (फिल्म लायनीत नाही) आलेला हा कलावंत सत्यप्रकाश नावाच्या मित्रामुळे या लायनीत १९६३ साली आला. लखनौच्या उर्दुने प्रभावीत झालेला हा शायर, फ़िल्म लायनीत जवळजवळ सगळ्या गाण्यांची धुन आधी बनते व त्यावर गाणे लिहावे लागते हा धडा मिळाल्यावर कवी झाला. त्यांना पहिला ब्रेक मात्र आनंद मधे मिळाला. त्यांनी मुख्यत्वे सलील चौधरींसोबत काम केले व सबसे बडा सुख, मिली, रंग बिरंगी, किसी से ना केहना, ऊस पार, रजनीगंधा, प्रतिक्षा, छोटी सी बात, प्रियतमा, दिल्लगी, मंज़ील, बातों बातों मैं, अपने पराये, शौकीन इ. चित्रपटांकरता लेखन केले.

'आये तुम याद मुझे' ची धुन आधी योगेश यांनी म्हणुन दाखवली व किशोर कुमारने ती तशीच म्हणायचे ठरवले. पंचमच्या यादीत मात्र योगेश यांचे नाव आनंद बक्षी, मजरूह सुलतानपुरी, गुलशन बावरा, गुलझार यांच्या नंतर होते.

राज कपुरने त्यांची 'जिंदगी कैसी है पहेली' व 'कही दूर जब दिन ढल जाये' ही गाणी ऐकुन आरके स्टुडियोत बोलावले होते. जेव्हा योगेशजी तिथे पोचले तेव्हा तिथल्या वॉचमनने त्यांना 'तुम्हारे जैसे यहां रोज आते है' असे म्हणुन हाकलवुन लावले. यांच्याकडे बघुन ते शायर असतील व राज कपुरने त्यांना बोलावले असेल यावर त्याचा विश्वासच बसला नाही.

रफीला श्रध्दांजली वाहताना हा शायर म्हणाला होता.
'जीन गीतोंको जीन गझलोंको तुम होठों से छु लेते थे|
अपने स्वरके परससे, तुम उनको कंचन कर देते थे|
पर तुम तक जो न पहुंच पाये, वोह गीत कितने अभागे हैं|
अब उन गीतों का क्या होगा, जो इसी आँस मै जागे हैं|'

पंचमदांसोबत गुलजार व योगेश यांनी साधारण एकाच काळात दोन गाणी केली. विषय होता 'पल'. ही दोन गाणी म्हणजे गुलजार साहेबांचे 'आने वाला पल जाने वाला है हो सके तो इस में, ज़िंदगी बिता दो पल जो ये जाने वाला है' आणी कवी योगेश लिहीतात 'कभी कुछ पल जीवन के, लगता है कि चलते चलते कुछ देर ठहर जाते हैं'

एक जण म्हणतो की आयुष्य क्षणभंगुर आहे ते जगुन घ्या तर दुसरा म्हणतो काही क्षण असे असतात की जे थोडा वेळ तरी तसेच रहावे असे वाटते. आनंद चित्रपटानंतर मिळालेल्या प्रसिद्धीनंतर योगेशजी यांना खरच हे क्षण असेच थांबावेत असे वाटले असेल का?

खरच काही क्षण असेच थांबवता आले तर??

कभी कुछ पल जीवन के, लगता है कि चलते चलते कुछ देर ठहर जाते हैं
कभी कुछ पल जीवन के, लगता है कि चलते चलते कुछ देर ठहर जाते हैं

हर दिन की हलचल से, आज मिली ख़ामोशी हल्की है तन मन में प्यार भरी मदहोशी
बदले बदले मौसम के, मुझे रंग नज़र आते हैं

कभी कुछ पल जीवन के, लगता है कि चलते चलते कुछ देर ठहर जाते हैं

फ़ुरसत की ये घड़ियाँ रोज़ कहाँ मिलतीं हैं अब ख़ुशियाँ हाथ मेरा थामे हुए चलतीं हैं
मेरे साथ गगन ये धरती, मेरा गीत मधुर गाते हैं

कभी कुछ पल जीवन के, लगता है कि चलते चलते कुछ देर ठहर जाते हैं

कितना भला लगता है सूरज का ये ढलना हो, दुनिया से दूर छुपके यहाँ, तेरा मेरा यूँ मिलना
कभी कभी दीवानेपन की हम हद से गुज़र जाते हैं

कभी कुछ पल जीवन के, लगता है कि चलते चलते कुछ देर ठहर जाते हैं

चित्रपट : रंग बिरंगी

गुलमोहर: 

छान माहीती आहे. मी किशोरकुमारचा पक्का पंखा आहे त्यामुळे वाचायला अजून मजा आली Happy

तटी: हे नाकारलेले तर नाही ना Proud

योगेश यांच्याबद्दल आज पहिल्यांदाच काहीतरी वाचले. वर दिलेली सगळी गाणी फेवरिट असूनही!
चांगले लिहिलेस केपी. अजून त्यांच्या बाकी गाण्यांबद्दल , सध्या ते कुठे असतात, काय करतात याविषयी थोडे लिहायचे की.. Happy म्हणजे << आयुष्यात अनेक खस्ता खाउन इंडस्ट्रीत आलेल्या या कलावंताला लक्ष्मी मात्र प्रसन्न झाली नाही. >> असं का? नक्की काय काय घडलं याची उत्सुकता वाटली म्हणून म्हटलं.

आशूशी सहमत. लेख गाण्यानंतर असा अर्धवट सोडून का दिलास? अजून लिहायचं ना..

रच्याकने, जे 'विविधभारती' नियमित ऐकतात, त्यांना 'योगेश' नाव चांगलंच परिचित आहे Happy

खुपच छान माहिती दिलीस.:स्मित:
फिल्म ईंडस्ट्रीत काही कलावंत खरोखरच ईतके प्रतिभावान होते.पण त्यांच्या पदरी कायम उपेक्षाच आली.उदा.संगीतकार जयदेव्,मदनमोहन्,गीतकार नीरज.अशा उपेक्षित पण गुणी कलावंताबद्दल लिहीलेलं वाचायला निश्चीतच आवडेल.

हो विविधभारती ऐकणार्यांसाठी योगेश परिचीत असतातच ! Happy

केपी जेव्हढे लिहीले आहेस ते मस्त वाटले. अजून लिही की !

छान. Happy
या योगेशबद्दल मलाही नव्हती माहिती. माझं प्रचंड आवडतं गाणं 'रिमझिम गिरे..' यांनीच लिहिलं आहे, हेही माहिती नव्हते.

लोकहो धन्यवाद. Happy

मुळात खूप काही लिहावेसे वाटत होते पण खूप कमी साहीत्य उपलब्ध आहे योगेश यांच्याबद्दल. त्यांना स्टेजवर बघीतल्यावर 'हे योगेश?' असे वाटले. अतिशय साधा मनुष्य. लक्ष्मी प्रसन्न झाली नाही असे जेव्हा म्हणले तेव्हा हेच लक्षात आले होते की किती कमी प्रसिध्दी मिळाली आहे या माणसाला. विजेंद्र गौर या लेखकाशी नाते असुनही कष्ट करावे लागले. त्या काळातील ५-६ नविन संगीत दिग्दर्शकांना ब्रेक मिळाला/हीट झाले योगेश यांच्यामुळे पण त्याचे श्रेय काही मिळाले नाही. गुलजार, जावेद अख्तर यांना मिळाली तेव्हढी प्रसिध्दी मिळु शकली नाही. कित्येकांना ते माहीत पण नाहीत. खस्ता खाऊन म्हणजे मुंबईत पायी, ट्रेनने प्रवास करुन राज कपुरला भेटायला गेल्यावर यांचा साधा अवतार बघुन बाहेरच्या शिपायाने हकलवुन दिले होते त्यांना. हँगीग गार्डनमधे बसुन ते कविता लिहीत व चाळीत रहात. खरतर जे काही थोडे वाचनात आले त्यावरुन त्यांच्याविषयी लिहावेसे वाटले.

केपी - का रे बाबा अर्धवट सोडलास? पण तरीदेखील धन्स तुला, माझ्या कमी ज्ञानात बरीच भर पडली.

छान लेख. वरती जे सगळ्यांनी लिहिलय तेच मलाही म्हणायचय. अजुन वाचायला आवडेल. ह्या इतक्या आवडत्या गाण्यांचा गीतकार कोण याचा कधी विचार सुध्दा केला नव्हता मी , याचं वाइट वाटतय,

छान लिहीलं आहेस रे केप्या. योगेश मला ऐकून माहिती होता पण त्याची गाणी माहिती नव्हती. तुझ्यामुळे समजली, धन्यवाद!

Pages