अमिताभ वि. विनोद खन्ना, एक जबरदस्त रंगलेला सामना

Submitted by अतुल ठाकुर on 22 March, 2014 - 23:08

AAA - 2.jpg

हिन्दी चित्रपटसृष्टीत काही कलाकार असे होऊन गेले कि ते जेव्हा कधी काळी एकत्र आले, रसिकांना जबरदस्त रंगलेली जुगलबंदी पाहायला मिळाली. मात्र कुठले कलाकार एकत्र आल्यावर ही आग पेटणार होती याचं गणित फक्त परमेश्वरालाच ठाऊक असणार. दिलिपकुमार राजकपुर प्राचिन काळी “अंदाज” मध्ये एकत्र आले तेव्हा एक पडद्यावर युद्ध घडलं होतं. मात्र ही चकमक “इन्सानियत” मध्ये देव आणि दिलीपकुमार एकत्र आल्यावर झडली नाही. “संघर्ष” मध्ये संजीव कुमार विरुद्ध दिलीपकुमार असा सामना होता. त्यात पुन्हा बलराज साहनी. मात्र तेथे जयंतच काही दृश्यात भाव खाऊन गेला. पुढे अनेक वर्षांनी “विधाता” मध्ये जेव्हा संजीव दिलीप एकत्र आले तेव्हा दिलीपकुमारला larger than life दाखवलं गेलं होतं. संजीवकुमारचा रोल छोटा होता. तरीही ” तुमने तो मुझे रिश्तेसेही रिटायर्ड कर दिया” म्हणत संजीवकुमारने आपली चुणुक दाखवलीच. प्राण, अशोककुमार सारखे कसलेले अभिनेते चित्रपट कसाही असो, समोर कुणीही असो, नेहेमीच उत्तम अभिनय करुन गेले. जगन्मित्र असल्याप्रमाणे त्यांना कुठल्याही सामन्यात ओढता येणार नाही. मात्र त्या सोनेरी दिवसात “पैगम” मध्ये जानी राजकुमार आणि दिलीपसाहेबांचा सामना झाला होता. आणि पुढे अनेक वर्षांनी ती चकमक “सौदागर” मध्ये रसिकांनी पाहिली. तसे काहीवेळा गाजलेले कलाकार काही चित्रपटात एकत्र आले पण कुठे अंगार दिसला नाही. किंवा एकानेच चित्रपट खाऊन टाकला. शशी कपुर, जितेंद्र, मनोज कुमार सारखे कलाकार समोर असताना युद्ध घडण्याची शक्यता कमीच. मात्र शम्मी आणि राज कुमारच्या “उजाला” मध्ये खलनायक राजकुमार वरचढ ठरला होता. “मेरा गाव मेरा देश” मध्ये विनोद खन्ना आणि धर्मेंद्र सारखे तगडे देखणे मस्तवाल कलाकार समोर उभे ठाकले होते. आग पेटली होतीच. पण खलनायक विनोद खन्नाच्या जब्बरसिंगचे प्रचंड कौतुक झाले. पुढे हे दोघेही कलाकार काही चित्रपटांमध्ये जरी एकत्र आले तरी ते परस्परांना पुरक म्हणुनच. शत्रु म्हणुन प्रेक्षकांनी त्यांना स्विकारलं नाही. “बॉम्बे टु गोवा” मध्ये अमिताभ शत्रुघ्नसिन्हाला पाहयला मजा आली होती. पुढे “कालापत्थर”ने अपेक्षा आणखि उंचावल्या होत्या. “दोस्ताना” मध्ये तर कळस झाला होता. पण पुढे काही घडलं नाही. त्यातही प्रेक्षकांनी अमिताभचा प्रतिस्पर्धी म्हणुन शत्रुघ्न सिन्हाकडे पाहिलं नाही. अमिताभने सुपरस्टार पदाकडे जाताना अनेक कलाकारांवरोबर जोड्या जमवल्या. धर्मेंद्र, ॠषी कपूर, शशी कपूर त्याला पूरक ठरले. “शक्ती” त खर्‍या अर्थाने सामना रंगला. पण तो अभिनयाचा सामना होता. कुणाचंही पद हिरावुन घेण्याचा तेथे प्रश्नच नव्हता. दिलीपकुमारची बेताज बाहशाही आणि अमिताभचे सुपरस्टार पद अढळच राहणार होते. सुपरस्टारपदाकडे जाताना अमिताभला खर्‍या अर्थाने प्रतिस्पर्धी लाभला तो विनोद खन्नाच्या रुपातच.

१९७३ साली “जंजीर” पासुन हिन्दी चित्रपटसृष्टीत नव्या झंझावाताला सुरुवात झाली. अमिताभ बच्चनने युवकांच्या क्रोधाला पडद्यावर वाट करुन दिली. “आनंद” नंतर “नमकहराम” मध्ये आद्य सुपरस्टार राजेशखन्नासमोर बच्चन खर्‍या अर्थाने उभा ठाकला. मात्र “मेरे सपनोंकी रानी” चे दिवस संपले होते हेच खरं. आता “है कोई माई का लाल” चे दिवस आले होते. अमिताभने त्यानंतर मागे वळुन पाहिलंच नाही. त्याने केलेले सर्व चित्रपट तुफान चालले असं नाही मात्र बच्चनला लोकांनी नेहेमीच डोक्यावर उचलुन धरलं. हे काहीसं क्रिकेटसारखं होतं. मॅच हरली तरी बच्चनची सेंचुरी ठरलेली असायची. म्हणुनच आजदेखिल त्याचे “फरार”, “बेनाम”, “परवाना”.सारखे चित्रपट पाहायला मजा येते. त्यातच अमिताभला “सौदागर”साठी फिल्मफेअर पारितोषिक मिळाले. तेव्हा या अभिनेत्यात “अँग्री यंग मॅन” पेक्षाही बरंच काही आहे हे जगाला दिसुन आले. त्याच वेळी दुसर्‍या बाजुने एका आणखि अतिशय देखण्या आणि तगड्या अभिनेत्याचा प्रवास सुरु झाला होता. अस्सल नर म्हणता येईल अशा मर्दानी पुरुषी सौंदर्याचा तो एक दुर्मिळ नमुना होता. विनोद खन्नाने “मेरे अपने” मध्ये आपल्या जबरदस्त अभिनयाची चुणुक दाखवुन दिली. गुलजार सारख्या संवेदनशील दिग्दर्शकाचा हा चित्रपट बेकार तरुणांच्या नैराश्याचा आणि क्रोधाचा आदिम अविष्कार होता. पुढे यातर्‍हेचे अनेक चित्रपट आले. पण यासम हाच. त्यानंतर “मेरा गांव मेरा देश” ने इतिहास घडवला. त्यामागोमाग विनोद खन्नाच्या करियरला वेगळं वळण देणारा “अचानक” आला. काहीशा कलात्मक चित्रपटाकडे झुकणार्‍या “अचानक” ने खन्नामधील अभिनेत्यावर शिक्कामोर्तब केले. पुढे “इम्तेहान”, “हाथकी सफाई” असा प्रवास करत हा अभिनेता “जमीर” मध्ये बच्चनसमोर उभा राहिला. तसा दोघांचा एकत्र असा हा पहिला चित्रपट नव्हता. आधी “रेश्मा और शेरा” मध्ये दोघं एकत्र आले होते. पण त्यावेळी अमिताभ बच्चन हा “अमिताभ बच्चन” झाला नव्हता नी विनोद खन्ना देखिल “विनोद खन्ना” नव्हता. शिवाय त्यात दोघेही मुख्य अभिनेते नव्हते. चित्रपट सुनील दत्तचा होता. “रेश्मा और शेरा”, “जमीर”, “हेराफेरी”, “अमर अकबर अँथनी”, “खून पसिना”, “परवरिश” आणि “मुकद्दर का सिकंदर” अशा तब्बल सात चित्रपटात दोघं एकत्र आले. पैकी “जमीर” मध्ये खन्नाला विशेष काम नव्हतंच. हा चित्रपट पुर्णपणे बच्चनचाच होता. दोघांच्या जुगलबंदीविषयी लिहिताना बाकीच्या पाच चित्रपटांचाच गांभिर्याने विचार करावा लागेल.

“हेराफेरी”, “परवरीश” या दोन चित्रपटांचा एकत्रित उल्लेख केला तर काहींना आश्चर्य वाटेल. पण दोन्हीत विनोद खन्नाला इतर चित्रपटांच्या तुलनेने जवळपास अमिताभ इतकेच काम आहे. नकारात्मक भूमिकेत खन्नाचा अभिनय जास्त खुलतो असं माझं निरिक्षण आहे. अमिताभ मात्र रुढार्थाने दोन्हीत “हिरो”च आहे. मला स्वतःला “परवरीश” जास्त भावला याचं कारण दोघांची सरळसरळ टक्कर होती. खन्ना सुरुवातीपासुनच नकारात्मक भुमिकेत होता. सारे काही गोडगोड होताना सुदैवाने चित्रपटच संपतो. यात खन्नचे पारडे मला तरी जड भासले. त्याच्या भुमिकेला कंगोरे होते. खलनायकाचा मुलगा असल्याची समजुत लहानपणापासुन करुन घेतलेला नायक त्याने चांगला सादर केला आहे. “अमर अकबर अँथनी” हा सर्वार्थाने अमिताभचा भाव खावुन जाणारा चित्रपट होता. त्याचे संवाद, दृश्य सारे काही अमिताभला, त्याच्या क्षमतेला समोर ठेउनच लिहिल्यासारखे वाटत होते. अमिताभनेही आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवित धम्माल उडवुन दिली. “अँथनीभाय” सारखी बंबईया हिन्दी त्या ठसक्यात बोलावी ती अमिताभनेच. फक्त एकमेव हाणामारीच्या दृश्यात दोघांचा सामना झाला. अ‍ॅक्शन हा विनोद खन्नाचा प्रांत आहे यावर बहुतेक चित्ररसिकांचे एकमत होईल असे मला वाटते. हा सीन खन्नाने खाउन टाकला आहे अशी माझी आजदेखिल समजुत आहे. “खूनपसिना”त पुन्हा “परवरीश” प्रमाणेच खन्नची भूमिका वेगळी होती. त्याने त्या विशिष्ट गेटअपच्या आधारे झोकात केली. आतुन पेटती आग राखलेला खन्नाचा “शेरा” पहायला मजा आली. त्यामानाने अमिताभची भुमिका चाकोरीबद्ध “हिरो”ची होती. “मुकद्दर का सिकंदर” हा चित्रपट अमिताभचाच होता हे बहुतेकांना मान्य व्हावे. प्रकाश मेहराने आपल्या आवडत्या अमिताभला संपूर्ण वाव दिला होता. विनोद खन्ना या चित्रपटात दुय्यमच भासला. त्यानंतर अचानक विनोद खन्ना भरल्या ताटावरुन उठुन रजनिशांकडे निघुन गेला आणि एक रंगलेला सामना निर्णय न लागताच संपुष्टात आला. आता प्रश्न असा आहे कि समजा विनोद खन्ना मध्येच सोडुन गेला नसता तर काय झालं असतं? यासाठी या दोन दिग्गजांची तुलना करणे नुसते आवश्यकच नसुन अपरिहार्य देखिल आहे.

विनोद खन्ना हा मला दिग्दर्श्काच्या हातातील अभिनेता वाटतो. गुलझार सारख्या दिग्दर्शकाने त्याला आपल्या चित्रपटात घेतले यातच त्याची ताकद दिसुन येते. पण या भूमिका विशिष्ट तर्‍हेच्या होत्या हेही येथे नमुद करायला हवा. विनोद खन्ना हा विशिष्ट साच्यातल्या भुमिकेसाठी योग्य अभिनेता असे त्याचे वर्णन करता येईल. “मेरे अपने” मध्ये समाजाने नाकारलेला तरुण, “अचानक” मध्ये बायकोच्या विवाहबाह्य संबंधांमुळे उध्वस्त झालेला फौजी, “इम्तहान” मध्ये वडीलांशी भांडुन बाहेर पडलेला प्रोफेसर, “इन्कार” मध्ये प्रेयसीने संबंध तोडलेला इन्सपेक्टर, खन्नाच्या या सार्‍या भुमिका गाजलेल्या आहेत. आणि त्यात काहीएक पॅटर्नदेखिल दिसुन येतो. कुठुनतरी नाकारला गेलेला माणुस्…अगदी “मीरा” मध्येही विनोदच्या भोजराजाला बायकोचे म्हणजे मीरेचे प्रेम मिळत नाही. ती श्रीकृष्णाच्याच प्रेमात आकंठ बुडालेली असते. त्यामुळे हॉलिवुडमध्ये ज्या तर्‍हेच्या डर्टी हॅरी भुमिका क्लींट इस्टवूडने साकारल्या त्या किंवा चार्लस ब्रॉन्सनच्या डेथविश टाईप भूमिका खन्नाला अगदी चपखल बसल्या असत्या. त्यात त्याला तुलनाच नव्हती. मात्र अमिताभ हे वेगळं रसायन आहे. चतुरस्त्र हेच विशेषण त्याला योग्य आहे. वर सांगितलेल्या “अमर अकबर अँथनी” मधला हाणामारीचा सीन जरी विनोद खन्नाने खाल्ला असला तरी पुढे जोडुनच जेलच्या दृश्यात ” अपुनने सिर्फ दो फाईट मारा लेकीन सॉलिड मारा कि नही? ” असं मिस्कीलपणे विचारुन पुन्हा अमिताभच सीन घेऊन जातो. त्यातही विनोदी दृश्य आणि नृत्य यात अमिताभच्या जवळपासही विनोद खन्ना जाऊ शकेल असं वाटत नाही. आवाजाचंही तेच. तेथेही बच्चन वरचढच राहणार. दारुड्याचे सीन करावेत तर बच्चननेच. भावनिक दृश्यातही तुलना केली तरी बच्चनचंच पारडं जड भासतं. बच्चनने वाट्याला आलेल्या गाण्यांचं सोनं केलं. “डॉन”, “याराना”,”अभिमान”, “मंझील”,”आलाप” मध्ये अमिताभला पडद्यावर गाताना पाहणे हा आनंदाचा भाग असतो. विनोद खन्नाने असा चमत्कार अपवादात्मकच केला असेल. अमिताभच्या यशस्वी भुमिकांमधले वैविध्यही लक्षणियच आहे. ही सारी गोळाबेरीज करुन म्हणावेसे वाटते कि विनोद खन्ना मध्येच चित्रपटसृष्टी सोडुन रजनिशांकडे गेला नसता तरी इतिहास फारसा बदलला नसता. अमिताभचं सुपरस्टारपद हे निश्चितच होतं.

खरं सांगायचं तर विनोद खन्ना हे आमचं पहिलं प्रेम. कॉलेजमध्ये तो अमिताभपेक्षा श्रेष्ठ कसा यावर घातलेले वाद आठवतात आणि त्यावेळच्या मानाने आता समज किंचित वाढल्याने ह्सु येतं. अजुनही विनोद खन्ना हेच आमचं पहिलं प्रेम आहे. त्याचा देखणा चेहरा, बलदंड शरीरयष्टी आणि अफलातुन अ‍ॅक्शनवर आम्ही आजही फिदा आहोत. तो परत आल्यावर भक्तीभावाने त्याचे नवीन चित्रपट पाहायला सुरुवात केली. “इन्साफ” मध्ये पुन्हा तो देखणा चेहरा दिसला. “सत्यमेव जयते” ने तर अपेक्षा वाढवल्या पण पुढे “महादेव” नंतर त्याचे चित्रपट पाहवेनात. मग पुन्हा आम्ही “मेरे अपने” कडे वळलो.तरीही हे मान्य करायला हवं कि अमिताभला सर्वाधिक टक्कर दिली ती विनोद खन्नानेच. हा सामना निश्चितच खूप रंगला होता. पण अखेरीला “छोरा गंगा किनारेवाला”च वरचढ ठरला.

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लेख..
अमिताभ की विनोद, आशा की लता, किशोर की रफी, गावसकर की तेंडूलकर... हे न संपणारे वाद आहेत... पण प्रत्येक वेळी दोन्ही बाजूंनी वाद घालायला वाव आहे हे नक्की आणि बहुतेक हेच या लोकांचं यश म्हटलं पाहिजे Happy

मला स्वतःला विनोद खन्ना जास्त आवडायचा. एकतर त्या डॅशिंग भुमिकांकरता आवश्यक असे लु़क्स आणि शरीरयष्टी त्याच्याकडे होती आणि त्याला दिग्दर्शकही चांगले मिळाले. ( बच्चन कधीच तगडा नव्हता. त्याची मारामारी मला कधीच पटली नाही. त्याने अर्थपूर्ण भुमिका दुसर्‍या सत्रातच केल्या. )

त्याचे दोन चित्रपट मला खास आठवतात. एक होता लगाम.. ज्यात तो दिना पाठकच्या वचनात अडकलेला असतो.
आणि दूसरा वादा ( नावाबद्दल खात्री नाही.) पण त्यात तो आत्महत्या करायला जातो आणि वाचवला जातो.
मग वेगळ्याच तिढ्यात अडकतो. दोन्हीत त्याचा अभिनय छान होता.

विनोद खन्ना आणि ऋषी कपूर यांचा अभिनय आता वृद्धापकाळी अधिकच बहारदार झाला आहे आणि तो देखील नकारात्मक भूमिकांमध्ये. पाहा - रिस्क आणि डी-डे.

भुमितीचा प्रमेय वाचत असल्याचा फील आला मला Happy
अभ्यास तरी कशाकशाचा करता अहो तुम्ही?? अ वा क !!
मस्तच लिहिलंय, खुप आवडला लेख.

दोघेही आवडतात. विनोद खन्ना एनीटाईम जास्त हँड्सम अर्थात Happy पण मग 'दिलबर मेरे'चा अमिताभ पण लगेच आठवतो! मी लहान होते पण विनोद खन्ना सिंथॉलच्या जाहिरातीपासून आवडायला लागला एवढं आठवतंय.. म्हणजे लक्ष गेलं त्याच्याकडे Happy विशेषतः जिवणीवर फिदा! अक्षय आणि राहूलही वडिलांवर गेलेत म्हणुन तेही आवडत्या यादीत.
असो.. तुमच्या अभ्यासू तुलनेपुढे आमचे निकष म्हणजे अगदीच कहां राजा भोज और कहां गंगू तेली टाईप Uhoh

<<खरं सांगायचं तर विनोद खन्ना हे आमचं पहिलं प्रेम. >>>

१००% सहमत अतुलभाऊ. मग अगदी तो 'मेरे अपने' मधला विनोद खन्ना असो वा 'इन्कार' मधला असो.
तो जेवढा 'अमर , अकबर.....' मध्ये इन्स्पेक्टर म्हणून शोभला तेवढाच तो 'इम्तिहान'मधला 'प्राध्यापक' म्हणूनही शोभला.
अगदी 'मेरा गाव मेरा देश' मधला जब्बरसिंग कोण विसरू शकेल?

आचार्य रजनीशांच्या मागे लागून मधला काही काळ जर इंडस्ट्रीच्या बाहेर गेला नसता तर आज कदाचित चित्र काही वेगळं असलं असतं.....

देवा! काही खरे नाही. खरे सान्गायचे तर कॉलेजमध्ये असताना माझे जे सिनेमा वेड होते, ते लग्नानन्तर लयाला गेले.:फिदी: बरेच दिवस वाचले नाही त्या विषयी. नाहीतर घरात चन्देरी, रसरन्ग अशी सटर फटर पडलेली असायची.

मात्र तुम्ही, शर्मिला फडके आणी अशोक मामा जे लिहीता ना सिनेमाविषयी, त्याला खरे तर तोड नाही.:स्मित:

एखाद्या कसलेल्या सन्गीतकाराला सहज चाल सुचावी, तसे तुम्ही सगळे लिहीता. नेमके मनातलेच लिहीता.

सई एकदम बरोबर. सिन्थॉलमध्ये विनोद खन्ना आणी इम्रान खान मस्त शोभायचे. देखणेपणात विनोद्ने अमिताभला नक्कीच मात दिली. पण क्या करे दिल तो है दिल, दिलका ऐतबार क्या किजे.. अमिताभ आखिर अमिताभ है भई.:स्मित:

मित गावसकर व्हर्सेस तेन्डुलकर पेक्षा मी गावसकर व्हर्सेस दिलीप वेन्गसरकरला जास्ती पसन्ती देईन.

अमिताभ बच्चन हे नाव करोडो मुखात (तसेच हृदयातही) विराजमान झाले त्याला कारण म्हणजे या नावाने पूर्ण अर्थाने प्रेक्षकाला "मेरे सपनोकी राणी" च्या स्वप्नाळू डोळ्यांना व्यवहारी जगाचे रखरखीत रोखठोक दर्शन घडविले आणि या जगात नायकाने केवळ शालीमार गार्डनमध्येच दिसले पाहिजे ह्या पुस्तकी व्याखेला छेद दिला...तोही आपल्या अभिनयाच्या बळावर.....अभिनय ही त्याची जबरदस्त अशी शिदोरी होती आणि भांडवलही. चित्रपटाची मांडणी करणारा मनमोहन देसाई असो वा प्रकाश मेहरा....चोप्रा फॅमिली असो वा बरजात्या....सार्‍यांच्या नजरेत तो दिलीपकुमारनंतरच्या कालखंडातील एक चतुरस्त्र असा अभिनेता होता....शिवाय त्याची सार्वजनिक प्रतिमा खूप कौटुंबिक वातावरणातील....उच्च शिक्षणा पाठोपाठ आलेली विनम्रता त्याने पडद्याबाहेरही तितक्याच प्रभावीपणे दर्शविली असल्याने "अमिताभ बच्चन" हे नाव घरोघरी जितक्या आदराने घेतले गेले तितक्याच प्रेमानेही. आवाज हे त्याच्या अभिनयासाठी असलेले एक मोठे भांडवल. या आवाजाची विलक्षण जादू इतकी की अमिताभ बच्चन अजून "ग्रेट बच्चन" नव्हता त्या काळातही आपल्या आवाजाने प्रेक्षकाला "हा कुणाचा आवाज" असा प्रश्न विचारणे भाग पाडले होते. उदा. उत्पल दत्त आणि सुहासिनी मुळ्ये अभिनित १९६९ चा "भुवन शोम" हा चित्रपट.....या चित्रपटाच्या कथानकाची पार्श्वभूमी सांगण्याची जबाबदारी दिग्दर्शक मृणाल सेन यानी अमिताभ बच्चन या युवकावर सोपविली होती....त्यावेळी "आनंद" विषयही कुठे नव्हता.

तर असे हे अष्ठपैलुत्व विनोद खन्नाच्या अंगी नव्हते....विनोद कधीही प्रेक्षकाला "हसविणारा" अभिनेता बनू शकला नाही...."हेराफेरी" मध्ये तसा प्रयत्न जरूर होता...पण तेही शेजारी बिग बॉस होता म्हणून. तरीही एक सशक्त अभिनेता म्हणून विनोद खन्ना नेहमीच लक्षात राहील....विशेषतः "मेरे अपने" आणि "अचानक" ही दोन मनी घर केलेली उदाहरणे.

तुलनाच करणे क्रमप्राप्त असले तरी अमिताभला विनोदच्या तुलनेत झुकते माप द्यावे लागेल.

सहमत आहे काकाश्री...

समर्थ अभिनयाची ताकद, कमालीचा नम्रपणा आणि वक्तशीरपणा हे अमिताभचे सर्वात मोठे गुण आहेत. त्याबरोबरच तुम्ही सांगितलेल्या इतर गोष्टी उदा. सर्वसामान्यांना काय हवे आहे, कसे हवे आहे याची त्याला जाणीव होती आणि त्याबरहुकूमच आपला नायक त्याने साकारला. अर्थात याचे बरेचसे श्रेय त्याला मिळालेल्या लेखकद्वयीलाही (सलीम-जावेद) जाते. या दोघांनी खास बच्चनसाठी म्हणून 'तशा' भुमिका लिहील्या ....

विनोद खन्ना कधी कधी (सई म्हणते तसा सिंथॉल च्या अ‍ॅड मध्ये) आवडला ..

त्याची अमिताभशी तूलना करावी एव्हढे त्याचे पिक्चर मी पाहिलेले नाहीत .. मुँगडा गाणं ज्यात आहे त्या इन्कार मध्येही तोच आहे ना?

खूप सुंदर, अभ्यासपूर्ण लेख. विनोद खन्ना आवडतोच, इन्कारमध्ये खूप आवडला पण अमिताभ बच्चन खूप जास्त आवडतो. fan आहे मी अमिताभची लहानपणापासून.

मामा छान प्रतिसाद, नेहेमीप्रमाणे.

>>सहमत आहे काकाश्री... << ++१

विनोद खन्ना आणि "खामोश" सिन्हा एकाच पठडितले. त्यांच्या व्यक्तीमत्वाला साजेशा भुमिकेत उठुन दिसले, पण बाकि भुमिकेत, विशेषतः विनोदि भुमिकेत तर अगदि आनंदि-आनंद... नाच-गाण्यातहि तीच तर्‍हा -डोळ्यावर नुस्ता अत्याचार...

विनोद खन्ना रजनीशांच्या आश्रमात गेला नसता तर काहि फरक पडला असता असं वाटत नाहि... Happy

केवळ अप्रतिम लेख... इतक्या ओघवत्या आणि रसाळ भाषेत अद्याप एकही परीक्षण किंवा लेख मी वाचलेला नाही.
विनोद खन्ना अॅक्‍शन हिरो म्हणून लहाणपणी आवडायचाच, त्यात बच्चन असला तर सोने पे सुहागाच. पण, आजही बच्चन जसा कुठल्याही भूमिकेत, अगदी बागबानसारख्या ‌‘टीपीकल’ बापाच्या भूमिकेतही सूट होतो. तसं विनोद खन्नाला पाहवत नाही. म्हातारपणामुळे पूर्वीचा रूबाब हरविलेल्या वाघासारखा तो वाटतो.

मेरा गांव मेरा देश च्या बहुतेक सर्व फाईट सिक्वेन्समधे खलनायक जब्बर हा नायकापेक्षा वरचढ ठरताना दाखवला आहे. आणि विनोदची तगडी शरीरयष्टी पाहून धर्मेंद्र फक्त अशाच व्हिलनकडून मार खाऊ शकतो हे अगदी मनोमन पटतं
अतुलने उल्लेख केलेल्या उजाला मधे राजकुमारचा व्हिलन असाच भाव खाऊन गेलाय. बाकी अतुल, विशाल, अशोकजी ही सगळी माझेच समविचारी आणि चित्रपटवेडाच्या बाबतीत समव्यसनी देखील म्हणता येतील. त्यामुळे सहाजिकच आमचे विचारही पुरक आणि पटणारे. मस्तच लेख ! वाचायचा राहीला होता. धन्यवाद विशाल लिंक दिल्याबद्दल.

विनोद खन्नाच्या निधनानंतर विशालभाउंनी या लेखाची लिंक दिली होती. आज खरंच खुप दु:ख झालंय. माझा सर्वात आवडता अभिनेता. थोडं कळायला लागल्यावर त्याच्या मर्यादाही लक्षात येऊ लागल्या होत्या. पण आपल्या आवडत्या अभिनेत्यावर प्रेम म्हणजे प्रेम. त्यात मर्यादांची पत्रास बाळगली जात नाही हेच खरं. आजदेखील विनोदखन्नाला पाहणं हा एक आनंदाचा भाग असतो. त्याच्या पद्धतीच्या भुमिकांमध्ये त्याला तोड नव्हतीच. नुसते आपल्या चालण्यातूनही मर्दानी देखणेपण जाणवून देणारा अत्यंत देखणा अभिनेता हरपला. मनःपूर्वक श्रद्धांजली!

विनोद खन्ना यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! _/\_
त्यांच्या निधनाची बातमी वाचल्यावर सर्वप्रथम याच धाग्याची आठवण झाली होती..

अमिताभ बच्चन यांची भावपूर्ण पोस्ट खालच्या लिन्क वर मिळाली, आणि ती संग्रही ठेवण्यासाठी हाच धागा योग्य वाटला म्हणून इथे पोस्ट करत आहे:-
http://indianexpress.com/article/entertainment/bollywood/amitabh-bachcha...