१०० विचार- मौक्तिके - मराठी डेली सोप

Submitted by वाट्टेल ते on 26 January, 2016 - 17:06

१. मालिकांना "सोप" म्हणण्याचे कारण त्या सोप म्हणजे साबणाच्या वडीसारख्या संपता संपत नाहीत.
२. मालिकांना "सोप" म्हणण्याचे कारण त्या कथानकात उदंड घातलेल्या पाण्यात तरंगत असतात
३. मालिकांना "सोप" म्हणण्याचे कारण त्या बघताना सोपसारखा (तोंडाला) फेस येतो.
४. मालिकांना "सोप" म्हणण्याचे कारण त्यातून सोपसारखे अभिनय, संगीत वगैरे कलांचे पोकळ बुडबुडे निघतात.
५. मालिकांना "सोप" म्हणण्याचे कारण जसे सोप संपल्यावर काहीही उरत नाही तसे मालिका संपल्यावर त्यातून काहीही निष्पन्न होत नाही.
६. मालिकांना "सोप" म्हणण्याचे कारण जसे सोप वरून दिसायला गुळगुळीत सुगंधी असले तरी त्यात नको नको ती रासायनिक द्रव्ये असतात त्याप्रमाणे मालिका बाहेरून कितीही सुंदर दिसल्या तरी त्यातला कच्चा माल टाकावू असतो.
७. मराठी मालिकांतील कुटुंबे शक्यतो फक्त व्यवसाय करतात , नोकरीसारखी क्षुल्लक गोष्ट करण्याच्या भानगडीत मंडळी सहसा पडत नाहीत आणि म्हणे मराठी लोक व्यापारात मागे असतात.
८. मराठी मालिकांतील कुटुंबांची आडनावे घसघशीत असतात जसे - सरपोतदार, जहागीरदार, राजेभोसले वगैरे. डबीर, भेंडे, कवडी, पडवळ वगैरे आडनावे असणाऱ्यांच्या घरात मालिकेतील नाट्य घडू शकत नाही.
९. मालिकेतील कथानक पृथ्वीवर कोणत्याही ठिकाणी घडत असले तरी traffic, उकाडा, घाम, धूर , धूळ, रस्त्यातली घाण, डास, कचरा, संप, चिखल, महागाई, भाववाढ, उर्मट रिक्षावाले-बस conductor, गर्दी, रस्त्यातली मोकाट कुत्री या पातळीला कधीही येत नाही.
१०. मालिकेतील सर्व पुरुषासाठी गुढग्याखाली लोंबणारे one size fits all झब्बे हा एकमेव मान्यताप्राप्त dresscode आहे.
११. साडी नेसलेल्या इतक्या स्त्रिया एकगठ्ठा, लग्नसमारंभ वगैरे वगळता फक्त मालिकेतच बघायला मिळतात.
१२. सर्व मालिकेतल्या सर्व नायिकांना super woman syndrome असतो.
१३. मालिकेत क्वचित CD, phone किंवा file वगैरे पात्रांच्या हातातून निसटून खाली पडली तरी पडण्याचा मुख्य रोल असणारी गोष्ट म्हणजे पेटते निरांजन असलेले तबक.
१४. पेटते निरांजन आपोआप विझल्यावर किंवा पडल्यावर मालिकेत काही अशुभ घटना घडली नाही तर मालिकेचा TRP घसरतो.
१५. मालिकेचा लेखक हा व्यासाच्या जातकुळीचा असल्याने मूळ कथानकाच्या आसपास भरपूर उपकथानकांची ठिगळे जोडतो.
१६. व्यासोच्छिष्ठ जगत सर्वं हे सर्वस्वी खरे नाही. महाभारतात त्याने सर्वांचे संघर्ष चितारले सासू - सुनेचे वगळता.
१७. पात्रे झोपून उठल्यावर बेड वर सुरकुती नसतेच पण चुकून पांघरूण एखादे दिवस तसेच पडले आहे असे सुद्धा कधी होत नाही, सर्व लोकांनी व्यवस्थितपणाचा हा धडा घेण्यासारखा आहे.
१८. मुंबई पुण्यासारख्या शहरात सुद्धा सगळे एकत्र राहत असतात आणि सगळ्यांना अगदी स्वतंत्र ऐसपैस खोल्या असतात. अशी घरे परवडतील अशा किमतीत कशी मिळवावी याबद्दल प्रेक्षकांचे एखादे बौद्धिक, मालिकेत अखंड सर्वांना बोधामृत पाजणाऱ्या काही पात्रांकरवी आजोजित करण्यात यावे.
१९. प्रशस्त घराप्रमाणेच अतीव प्रेमळ बॉस\कर्मचारी , आव-जाव घर तुम्हारा type office आणि कसलीही ददात पडू देणार नाही असे उत्पन्न देणारी नोकरी वा धंदा कसा करता येईल याबाबत प्रबोधन करण्यासाठी मालिकेचे काही भाग खर्चण्यात यावेत अशी सर्व निर्मात्यांना नम्र विनंती आहे.
२०. मालितील पात्रे स्वत: कधीही तासंतास tv बघत नसतात. नाटक, सिनेमा वगैरे गोष्टींना जात नसतात.
२१. सरळ साध्या मालिकेत शेवटपर्यंत अजिबात न कळणारी गोष्ट म्हणजे पात्रांचे स्वभाव निश्चित कसे आहेत.
२२. मालिकेतल्या पात्रांना स्पष्ट आणि स्वच्छ बोलून गैरसमज टाळण्यास सक्त मनाई आहे.
२३. जुन्या नाटकांत काम करणाऱ्या लोकांना सोंगे किंवा पात्रे असे संबोधत असत, हे संबोधन मालिकांतील कलाकारांना जास्त शोभून दिसते.
२४. मालिकेच्या लेखक\ लेखिकंचे मुख्य काम म्हणजे "चहा\कॉफी घेणार का?", " चहा\ कॉफी\शिरा करते\करतो" , "मस्त आलं घालून चहा कर\करा\करते\करतो ", " जायफळ घालून कॉफी कर\ करा \ करते\करतो", " "तू\तुम्ही काहीही tension घेऊ नकोस\ नका", " माझी मदत कर\ करशील का?" , "तो\ती असं का वागतोय\ वागतेय", "सsssss गssssळं नीट होईल", "कsssसं आहे ना" वगैरे वाक्यांच्या अधेमधे कथेच्या अनुषंगाने १-२ वाक्ये टाकणे.
२५. "कामवाली बाई किंवा पाणी आज येणार नाही" वगैरे वाक्यांनी एरवी सामान्य घरात भूकंप झाला तरी मालिकेत असे कधीही घडत नाही.
२६. चकाचक घरात राहणारी मालिकेतील मंडळी कपड्यांच्या बाबतीत "एक दांडीवर आणि एक **वर" ( सोज्वळ, घरगुती मालिकांत कटकारस्थाने किंवा विवाहबाह्य संबंध अस्थानी नसले तरी हा शब्द अश्लील आणि अस्थानी वाटू शकतो आहे याची आम्हाला कल्पना आहे) इतपतच कपडेपट बाळगून असतात.
२७. प्रत्येक मालिकेस नवीन प्रकारचे मंगळसूत्र, साडी , दागिने, पर्स, केशरचना , घरसजावटीचे प्रकार यातील किमान एक गोष्ट रूढ करणे बंधनकारक आहे.
२८. Computer वर काहीतरी करत बसल्यासारखे दाखवणे म्हणजे office चे काम करणे हा प्रकार मालिकेपुरता मर्यादित न राहून त्यास रोजच्या जगण्यात सर्वमान्यता मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
२९. ज्या ज्या देवस्थानांना प्रसिद्धी व आवक वाढवायची असेल त्यांनी मालिकेच्या नायक-नायिकेला दर्शनाचे आमंत्रण करावे.
३०. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मेळे वगैरे जन्मास येऊन हौशी लेखक-कलावंतांची पैदास वाढली. आपल्या कलाकार पूर्वजांवरचे, सण - परंपरा - व्रतांचे हे जुने ऋण फेडण्यासाठी, प्रत्येक मालिकेला सर्व सण साजरे करणे, प्राणपणाने परंपरा टिकवणे, संस्कृतीबद्दल अव्याहत बडबड करणारी पात्रे निर्माण करणे बंधनकारक आहे.
३१. महाराष्टातील प्रत्येक देव, जुने पुढारी, समाजसुधारक जे जे म्हणून कोणी ज्ञात असतील त्यांच्या नावाने एकामागून एक मालिका चालू करण्याचे सर्व निर्मात्यांनी मनावर घ्यावे. हल्ली सर्वकाळ जुने sets व वर्षानुवर्षे लाल आलवण किंवा नथ - नऊवारी नेसलेली किंवा धोतर - बंडी घालून गोटा केलेली पात्रे कायम उपलब्ध असतात आणि ती reuse करता येऊ शकतात.
३२. हिंदी सिनेमात जे स्थान 'गाजर का हलवा' चे आहे तेच जवळजवळ मराठी मालिकांत 'गोडाचा शिरा' या पदार्थाचे.
३३. लेखक\कलाकारांना कामाचा कंटाळा आला की मालिकेत कधी कधी अंताक्षरी खेळणे, नाचणे वगैरे प्रकार केले जातात. ते पाहिल्यानंतर मूळ मालिका अधिक सुसह्य होते तेव्हा हे प्रकार अत्यंत स्तुत्य आहेत.
३४. मालिकेतल्या हिरविणीचे लग्न झाल्यावर सर्व प्रेक्षकांचे लक्ष तिचे डोके दुखणे, मळमळणे किंवा पोट पुढे दिसणे यावर एकाग्र होते. तसे काही नसल्यास प्रेक्षकांना अशी हूल देत बसू नये व हिरविणीनी आपापल्या शरीराचा विस्तार मर्यादेत ठेवावा.
३५. मालिकेचे आता पुढे काय करायचे याबद्दल कोणाचेही डोके चालेनासे झाले की कोणाचातरी स्मृतीभ्रंश होतो.
३६. लग्नाआधी बिनधास्त, outgoing वगैरे असणारी हिरविण लग्न झाले की लगेच u turn घेऊन ( screen वरच्या) अलका कुबल ला complex येईल अशा प्रकारे वागू लागते.
३७. भारत भूषण - प्रदीप कुमार वगैरे थोर मंडळींची परंपरा खंडित होऊ नये म्हणून मालिकेत हिरो हे पात्र घालण्यात येते.
३८. सर्व मराठी मालिकंचे वर्णन गैरसमज या एकाच शब्दात करता येईल - कथानकातले मूलभूत गैरसमज, दिग्दर्शकचे स्वत:बद्दल गैरसमज, पात्रांचे स्वत:च्या दिसण्याबद्दल गैरसमज, प्रोमोवरून प्रेक्षकांचे मालिकेबद्दल झालेले गैरसमज इत्यादी इत्यादी
३९. मालिका म्हणजे रोजच्या ठिकठिकाणच्या भानगडी, fashion, सण- व्रते, पाककृती, घरगुती उपांय, रूढी वगैरेंचा quick आढावा घेता यावा म्हणून स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेले रोजचे बुलेटिन
४०. TV चा Small Screen पूर्णपणे झाकून टाकण्याइतकी भरभक्कम शरीरयष्टी असणाऱ्या कलावंताना Big Screen Star समजण्यात यावे व त्यांच्या खुराकासाठी विशेष भत्ता द्यावा. मालिकेतील त्यांच्यासाठी पात्रासाठी खास आहाराची योजना करण्यात यावी.
४१. मालीकेत scene ची Continuity सांभाळणारे जे कोणी असतील ( आणि असे कोणी अस्तित्वात असतील तरच) त्यांनी long term आणि short term साठी वेगवेगळ्या teams ठेवाव्या. Long Term ची team मालिकेत अमुक अमुक पात्रं ( सुद्धा) आहेत , त्यांच्या स्टोऱ्या तशाच लटकत आहेत वगैरे नम्र सूचना दिग्दर्शकाला करू शकतील.
४२. जाहिरात विरहीत मालिका बघता याव्यात म्हणून दर्शकांच्या सोयीसाठी एक फंड चालू केला आहे त्यात सढळहस्ते दान करावे. बॅंक Account नंबर सर्व मलिकांदरम्यान सांगण्यात येईल.
४३. वरील फंडातील काही भाग मालिकेतील काही गरजू पात्रांसाठी वापरण्यात येणार आहे. उदा . जान्हवीच्या बाबांचे पायाचे operation, बानू व म्हाळसा यांना स्वत:चा भूतकाळ अजून का आठवत नाही म्हणून त्यांची neurologist कडून तपासणी, दिल दोस्ती दुनियादारी मधील अनेक तरूण पात्रांनी जरा भरभर बोलावे, हलावे म्हणून vitamin च्या गोळ्या इत्यादी.
४४. वरील फ़न्डच्या संदर्भात जाहिरातदारांना पर्याय म्हणून मालिकेच्या कथानकातच जाहिरात करण्याची सोय करण्यात आली आहे. जाहिरातदारांकडून त्यासाठी जास्तीचे मानधन व ( एरवी फुकट मिळणाऱ्या भावाच्या जोडीला )फुकट उत्पादनेही मिळवीत यासाठी लेखकांनी व कलाकारांनी संप करण्याचे संकेत दिले आहेत.
४५. मालिकेतील घटना व पात्रे अगदी रोजच्या जगण्यात आढळणारी असल्याने पात्रांनी काही पराक्रम गाजवल्यास त्यांचे नाव कोणत्या तरी record बुक मध्ये यावे यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. उदा. जास्तीत जास्त काळ मानवी गर्भ धारण करण्यासाठी जान्हवी, विरार - फ़ोर्ट - दादर या त्रिकोणात एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी ९ मिनिटात जाऊ शकणारी अदिती किंवा इतर अनेक पात्रे.
४६. मालिकेचा घसरता TRP सावरण्यासाठी मालिकेतील गुळमुळीत, गुळचट, अळणी , बेचव, अशक्य बावळट पात्रांना व शेवटी लेखक-दिग्दर्शकाला असंतोषी प्रेक्षकांच्या ताब्यात देण्यात यावे. या सर्वांवर आपला राग काढल्यावर TRP सुधारण्यास मदत होईल.
४७. हल्लीच्या काळात कमी होत चाललेला patience वाढवण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे दिवसाकाठी किमान ३ मालिका बघणे आणि त्यातील किमान एक अथ ते इतिपर्यंत पहाणे.
४८. रविवारी घरातील मालिकाप्रेमी मंडळी चांगली सुट्टीच्या दिवशी वैतागलेली आणि वेड्यासारखी दिसतात असे वाटल्यास ते रविवारी मालिका नसल्याने होणारे withdrawal symptom चे लक्षण समजण्यात यावे, त्यांना दाखवण्यासाठी त्यांच्या आवडत्या मालिकांचे जुने एपिसोड्स हाताशी ठेवावेत.
४९. आपण फक्त news बघतो वगैरे म्हणत मालिका बघणाऱ्यांकडे तुच्छतेने पाहू नये. दोघांत तसा विशेष फरक नसतो.
५०. ही मौक्तिके कितीही ताणली तरी मालीकांइतकी ताणणे शक्य नाही तेव्हा तूर्तास एक छोटासा ब्रेक घेण्यात येत आहे.
५१ . उरलेली ५० विचार- मौक्तिके वाचण्यासाठी तसेच अमेरिकेतील रहिवाश्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी आमची खालील विषयांवरील विचार-मौक्तिके (मूल्य प्रत्येकी $9. 9 9 फक्त ) उपलब्ध आहेत. गरजूंनी त्यांचा लाभ अवश्य घ्यावा -
१. अमेरीकेतील खरेदी - सुगृहीणीसाठी
२. अमेरिकेत घर घेणे, बदलणे आणि घरातील दुरुस्ती - दाम्पत्यसुखासाठी
३. अमेरिकेतील स्वैपाक - सुगृहीणीसाठी व तिच्या नवऱ्यासाठी
४. अमेरिकेत मुलांचे व मुलींचे संवर्धन - सर्वांसाठी
५. अमेरिकेतील मराठी मंडळांचे कार्य - मराठी मंडळांसाठी
६. अमेरीकेतील हिंदू सण आणि रिवाज - सुगृहीणीसाठी व तिच्या नवऱ्यासाठी
७. अमेरिकेतील नाटके - नाटकवाल्यांसाठी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही आहे....आवडले.

१८. मुंबई पुण्यासारख्या शहरात सुद्धा सगळे एकत्र राहत असतात आणि सगळ्यांना अगदी स्वतंत्र ऐसपैस खोल्या असतात. अशी घरे परवडतील अशा किमतीत कशी मिळवावी याबद्दल प्रेक्षकांचे एखादे बौद्धिक, मालिकेत अखंड सर्वांना बोधामृत पाजणाऱ्या काही पात्रांकरवी आजोजित करण्यात यावे.>>>>>>जबरी!!!

१९. प्रशस्त घराप्रमाणेच अतीव प्रेमळ बॉस\कर्मचारी , आव-जाव घर तुम्हारा type office आणि कसलीही ददात पडू देणार नाही असे उत्पन्न देणारी नोकरी वा धंदा कसा करता येईल याबाबत प्रबोधन करण्यासाठी मालिकेचे काही भाग खर्चण्यात यावेत अशी सर्व निर्मात्यांना नम्र विनंती आहे.>>>>ग्रेट!!!!

३५. मालिकेचे आता पुढे काय करायचे याबद्दल कोणाचेही डोके चालेनासे झाले की कोणाचातरी स्मृतीभ्रंश होतो.

<<

हहगलो अगदी

Biggrin
५२. एखादा प्रसंग विनोदी आहे किंवा गंभीर हे फक्त बॅकग्राऊंड म्युझिकमुळेच कळते कारण अभिनय सगळीकडे सारखाच असतो आणि तिसर्‍या प्रकारचे प्रसंग नसतातच.

Masta

अजून एक अ‍ॅडा.
याला आपण वुडवर्डस ग्राइप वॉटर सिंड्रोम म्हणूया सोयीसाठी. मालिकेत ल्या एखाद्या पात्राचा समजा काही कारणाने फोन लागत नाहीये. तर "अमुक अमुक चा फोन लागत नाहीये" हे वाक्य त्या पात्राचे सगळे नातेवाईक वेगवेगळ्या तर्‍हेने अर्धा एपिसोडभर म्हणत राहतात.
... 'धूमधडाका' मधे 'प्रियतम्मा' गाणे सुरु होण्याआधी अशोक सराफ 'नॉनसेन्स' हा शब्द जसा वेगवेगळ्या पद्धतीने बोलून दाखवतो... तस्संच !

जबरी आहेत मौक्तिकं Lol

पेटत्या निरांजना सोबत पड्ण्याचा गुणधर्म असणार्‍या अजून दोन वस्तू अ‍ॅड करा.
एक म्हणजे चहाने भरलेला कप + बशी आणि फोन. कोणतीही वाईट घटना ऐकली की
का$$$य म्हणत कपबशीचे बलिदान ठरलेले.

३७. भारत भूषण - प्रदीप कुमार वगैरे थोर मंडळींची परंपरा खंडित होऊ नये म्हणून मालिकेत हिरो हे पात्र घालण्यात येते.
४९. आपण फक्त news बघतो वगैरे म्हणत मालिका बघणाऱ्यांकडे तुच्छतेने पाहू नये. दोघांत तसा विशेष फरक नसतो.>>> Proud

प्लीजच सासु-सुनान्च्या मालिकान्ना नाव ठेवू नका! सास्ररा-जावई विथ ओफिस कुरुक्षेत्र ही ट्रेन्ड जास्त खतरनाक आहे! :-o

१८. मुंबई पुण्यासारख्या शहरात सुद्धा सगळे एकत्र राहत असतात आणि सगळ्यांना अगदी स्वतंत्र ऐसपैस खोल्या असतात. अशी घरे परवडतील अशा किमतीत कशी मिळवावी याबद्दल प्रेक्षकांचे एखादे बौद्धिक, मालिकेत अखंड सर्वांना बोधामृत पाजणाऱ्या काही पात्रांकरवी आजोजित करण्यात यावे. >>>>>>>>>वेगवेगळी घरे दाखवायची म्हणजे वेगवेगळी लोकेशन्स किंवा वेगवेगळा सेट (घराचा) दाखवावा लागणार. त्यापेक्षा एकाच घरात कोंबतात हि पात्रे. जेणेकरून प्रॉडक्शनच्या खर्च कमी होईल.