अनादि मी अनन्त मी

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

(आपल्या मायबोलीवर चित्रपटान्चे आणिक तेही हिन्दी चित्रपटान्चे परीक्षण खुप होते पण दुर्दैवाने मराठी नाटकाचे परीक्षण समीक्षण होत नाही. वीर सावरकरान्च्या आयुष्यावर आधारीत " अनादि मी अनन्त मी " ह्या नाटकावर समीक्षण/ परीक्षण नोहे पण भाष्य करायचे भाग्य मला मिळाले हा मी माझा बहुमान समजतो. आणिक माझ्या तोकड्या लेखन शैलीला मायबोलीकर समजून घेतील ही अपेक्षा बाळगतो )

वीर सावरकरान्च्या आत्मसमर्पणाच्या ५० व्या वर्ष दिनी म्हणजे २६/०२/२०१६ रोजी अनादि मी अनन्त मी ह्या नाटकाचा प्रयोग पहाण्याचे भाग्य मला लाभले. श्री माधवराव खाडीलकरानी लिहीलेल्या अनादि मी अनन्त मी ह्या नाटकाचे त्यान्चा सुपुत्र श्री ओम्कार खाडीलकर ह्याने पुनरुज्जीवन केले आहे. हा कलाविष्कार साकार होण्यासाठी खाडीलकर कुटुम्बीयानी स्वतःला झोकुन दिले आहे.

वास्तविक वीर सावरकर ह्यान्चे नाव उच्चारताच शरीरभर एक उर्जा सन्चारल्याचा भास होतो. असा हा देव तुल्य व्यक्ता, नाटककार, समाज्सेवक, साहित्यीक, कवी, देश भक्त , राषट्राभिमानी देवतुल्य नरवराचे आयुष्य हे केवळ दोन अन्कात फक्त पावणेतीन तासात तोलणे ही केवळ अशक्यप्राय गोष्ट आहे आणि तरीही ती ओम्कार खाडीलकर, प्राजक्ता खाडीलकर, वेदश्री खाडीलकर (ओक) माधवराव खाडीलकर, आशाताई खाडीलकर आणिक इतर मेहेनती कलावन्ताच्या सन्चाने हे शिवधनुष्य पेलले आहे. हे प्रकटीकरण सादरीकरण करताना केवळ नाटक सन्वाद ह्यान्चाच आधार न घेता काव्य, कवन, पोवाडे, नॄत्य , वादन, गायन, आणिक काही स्थीर आणिक चलत चित्रे ह्यान्चे बेमालूम मिश्रण करुन एक अत्युच्च उत्तुन्ग कलाकॄती रसीकान्साठी सादर केली आहे.

ह्या नाटकाची सुरुवात होते ती राष्ट्रभक्त वासुदेव बळवन्त फडके ह्यान्च्या एडन येथील तुरुन्गातील मॄत्युच्या बातमीने आणिक त्याच वर्षीच्या श्री विनायक दामोदर सावरकर ह्यान्च्या जन्माच्या बातमीने. तीन-तीन समर्थ सुत्रधारान्च्या सहज वावराने हे नाटक मनाची पकड घेऊ लागते. ह्यात वीर सावकरान्चे बाल्यावस्थेतील शाळेतील सुस्पष्ट आणिक अलन्कॄत भाषण आपल्यापुढे सादर होते. बाल कलाकार अर्णव तेल्न्ग हयाने अतिशय मेहेनतीने हे सादर केले आहे. वीर सावरकान्ची अलन्करीक सुस्पष्ट भाषा आणिक त्यान्चे आपल्या मातॄभूमीवरील अलौकीक प्रेम हे त्यान्च्या "माझी मातॄभूमी" ह्या भाषणाला एका वेगळ्याच उन्चीवर नेऊन ठेवते. त्यासाठी चि. अर्णव ह्याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.

वीर सावरकानी रचलेला तानाजी मालूसरे वरील कवन असुद्या किन्वा वीर बाजी प्रभु देशपान्डे ह्यान्च्या वरील २४७ ओळीन्चा पोवाडा असू द्या सर्व सर्व तुमच्या मनाचा ठाव घेऊन सोडते. विशेषतः वीर बाजी प्रभु देशपान्डे ह्यान्च्या वरील पोवाडा ऐकताना ते प्रत्यक्ष द्रूष्य डोळ्यासमोर उभे रहाते. ह्याचे श्रेय जितके सावरकरान्च्या लेखणीचे आहे तितकेच ओम्कार खाडीलकर ह्या गायक नटाचे आहे.

सावरकरान्च्या " जयोस्तुते " ह्या कवनावर नृत्य केले जाऊ शकते हे मला स्वप्नातही वाटले नव्हते. पण सौ प्राजक्ता ओम्कार खाडीलकर ह्यानी ह्या अजरामर कवनावर एक अद्भूत नृत्याचा नजराणा पेश केला आहे. सावरकरान्चे " ने मजसी ने परत मातृभूमीला" हे कवन डोळ्यात पाणि आणल्यावाचून रहात नाही.

दूसर्‍या अन्कात सावरकरानी लिहीलेल्या " सन्यस्थ खडगः " ह्या नाटकातला एक प्रवेश सादर केला जातो. श्री माधवराव खाडीलकरानी साकारलेली " सेनापती वीरसेन " ही व्यक्ती रेखा दाद घेऊन जाते. हे नाटक खरे तर गौतम बुद्ध काळातील असले तरीही त्यातील टीपा , मासले हे केवळ तेन्व्हाच्या नव्हे तर आताच्या ही काळावर भाष्य करते. हा वीर सावरकरान्च्या रुपोआतील द्रष्टा नाटककार होय. ह्या नाटकातील " शतजन्म शोधाताना " हे नाट्यगीत सादर करून श्रीमती आशाताई खाडीलकरान्च्या गायन कलेने एक वेगळा कळस गाठला आहे. हे गाणे त्यान्च्या तोन्डून पुन्हा पुन्हा ऐकण्या सारखे आहे.

पुढे सावरकारानी लिहीलेल्या " उत्तरक्रिया " ह्या नाटकातील श्रीमन्त माधवराव पेशवे आणिक वेडी हा प्रसन्ग सादर होतो. सौ वेदश्री खाडीलकर ओक ह्यानी हा प्रसन्ग अप्रतीम रित्या अभिनित केला आहे. त्यातील भाष्य अगदी आताच्या परीस्थीतही लागू आहे.

स्वातन्त्र्यवीराना दिलेली दोन जन्मठेपेची शिक्षा सावरकरानी कशी काय भोगली असेल हा प्रश्न आपल्यासमोर उभा रहातो. त्यान्चा शिक्षेचा फक्त दिनक्रम ऐकून आपणं गर्भगळीत होतो. ही शिक्षा त्यानी कशी काय पूर्ण केली असेल आणि त्याहून शिक्षे दरम्यान त्यानी आपले कलासक्त मन कसे काय जीवन्त ठेवले असेल हा विचार आपल्या मनात आल्यावाचून रहात नाही (अधिक माहीतीसाठी वाचा " माझी जन्मठेप" )

पूढे स्वातन्त्र्य मिळाल्या नन्तर अनेकाना त्यान्चा सोयीस्कर रित्या विसर पडला आणिक स्वात.न्त्र्यविराना मुख्य प्रवाहा पासून दूर ठेवण्यात आले इतकेच नव्हे तर गान्धी हत्येच्या खटल्यात त्याना सह आरोपी ठरवून त्याना तुरून्गात डा.न्बण्यात आले (म्हणजे बघा स्वातन्त्र्या पूर्वी ह्या थोर देशभक्ताला ब्रीटीश सरकारने तुरून्गात डाम्बले आणि स्वातन्त्र्या नन्तर आपल्या करण्ट्या भारत सरकारने त्यामूळेच व्यथीत होऊन बहूदा असे सुपूत्र निर्माण जरणे बन्द केले असावे)

पुढे सावर्करानी हिन्दू महासभेचे अध्यक्षपद सलग ७ वर्षे भूषविले आणि मग भारत सरकारला त्यान्ची आठवण झाली. श्री मोहन धारीया ह्यानी स.न्सदेत (सन्सद हा शब्द सावरकारानीच मराठी भाषेला दिला ) ठराव माण्डला आणि स्वात.न्त्र्यवीराना देशभक्त म्हणून सम्बोधीत करण्यात येऊ लागले.

स्वातन्त्र्यवीरान्चे समाजकार्य ही प्रशन्सनीय होते. त्यानी निर्माण केलेले पतित पावन मन्दीर ज्यात पूजेचा मान महाराला आणिक चाम्भाराला दिला जात असे. हे सर्व-सर्व अगदी प्रभावीपणे नाटकात प्रकट करण्या आले आहे.

तान्त्रीक अन्गानेही हे नाटक अप्रतिम आहे. आणिक सर्वात महत्वाचे म्हणजे ह्या नाटकाचा "वेग" हा वेग कुठेही कमी पडत नाहीत. अगदी वेगवान सादरीकरण म्ह्णजे काय असते त्याचे अप्र्तिम उदाहरण म्हणजे हे नाटक

सर्वात शेवटी सान्गण्यासारखे म्हणजे ह्या नाटकाचे आर्थिक गणीत जुळवताना होणारी कसरत ही खाडीलकर कुटुबीयानी स्वतः पेलली आहे (हे नाटक रसिकान्साठी मोफत आहे हे येथे मुद्दाम नमूद करतो )

आणि म्हणूनच स्वातन्त्र्यवीरान्ची जीवनगाथा जितकी स्फूर्तीदायक आहे तितकीच खाडीलकर कुटुम्बीयान्ची हे नाटक सर्वसामान्य माणसापर्यन्त पोहोचावे म्हणूनची कळ्कळ सुद्ध्हा. खरोखर खाडीलकर कुटुम्बीयाना सलाम

चु भू द्या घ्या

केदार अनन्त साखरदान्डे
दिनान्क २९/०२/२०१६

please visit www.facebook.com/AMAMSavarkarDarshan/

For show request contact om.khadilkar@gmail.com or 8805982548 for new show requests

प्रकार: