चहा ......!

Submitted by विशाल कुलकर्णी on 17 August, 2009 - 06:46

"साला चहा प्यायचा म्हणले की माझ्या अंगावरचे सगळे केस अटेंशनमध्ये उभे राहतात.......!" मी तिसर्‍या वेळेस हे वाक्य उच्चारले तसे सगळे माझ्याकडे डोळे विस्फारुन पाहायला लागले.

"हे जोशी पण ने, साला एकदम घोचू हाये! चाय काय घाबरायचा गोष्ट हाये काय? जोशी तू पन ने साला काय पन गोष्टी करते, गपचुप कप उचल अँड खाली करुन टाक तुज्या पोटामंदी. स्टॉप युअर ड्रामा नाऊ! समजला....!" म्हातारा पारशी भडकला!

आमचा होरमसजी दारुवाला म्हणजे एक पात्रच आहे! बर्मा फ्रंटवर महापराक्रम गाजवलेल्या या पारशी म्हातार्‍याला चहा म्हणजे जीव की प्राण. कधीकधी मला आश्चर्य वाटते, की सगळे आयुष्य आर्मीत घालवलेला हा म्हातारा रमच्या ऐवजी चहाला प्राधान्य देतो याचे. असा हा चहाबाज आता आमच्या पेन्शनर्स क्लबला जॉइन झाल्यापासुन आमचा कँटीनवालादेखील कुरकुरत असतो. गंमत म्हणजे म्हातार्‍याला चहा म्हणून नुसते उकळलेले पाणीही चालते, फक्त त्याला गोड चव आणि चहाचा रंग असले की झाले!त्यामुळे, मला चहाची भिती वाटते म्हणल्यावर त्याचे पित्त भडकणे साहजिकच होते.

"जोश्या, चहा न आवडणे कळू शकते, पण चहाचे नाव ऐकून अंगावर काटा उभा राहाणे...... हे मात्र जरा हास्यास्पदच वाटते रे! आणि ते सुद्धा तुझ्यासारख्या वॉर फ्रंटवर पाकिस्तान्यांना कंठस्नान घालणार्‍या, वीरचक्रासारख्या सन्मानांनी गौरवण्यात आलेल्या पराक्रमी मेजरला चहाची भिती वाटते?" पोलीस डिपार्टमेंटच्या क्राईम ब्रांचमधून अ‍ॅडिशनल सी.पी. म्हणुन निवृत्त झालेले रणजीतराव निंबाळकर आपल्या भरघोस मिशांवर चिकटलेले चहाचे कण पुसता पुसता खिदळले!

हा माणूस म्हणजे शौर्याचा मूर्तीमंत नमुनाच होता! मुंबईत कार्यरत असताना या माणसाने मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात आपल्या नावाचा विलक्षण दरारा निर्माण केला होता. एके काळी मुंबईचे गुन्हेगारीविश्व ढवळून सोडलेला हा ढाण्या वाघ, कसल्या ना कसल्या कल्पनांनी सदैव सळसळत असायचा. मुंबईतला गुन्हेगारीचा वाढता प्रभाव त्याला कायम अस्वस्थ करायचा. मग तो राग काढायला आम्ही तीन बकरे आयतेच सापडायचो त्याला. गाडी शेवटी पोलीसखात्यातल्या भ्रष्टाचारावर येऊन थांबायची. आमच्यावर वैतागून झाले, की उद्विग्नतेने त्याचा शेवटचा पेटंट प्रश्न यायचा.
"तुम्ही लोक मारे तिकडे बॉर्डरवर शत्रूशी लढता, पण ज्यासाठी लढायचे तो देशच इथे आतून पोखरला जातोय, त्याचे काय? साले हे दांभिक लोक, पैसाच कमवायचा असतो तर धंदा का करत नाहीत, पोलीस खात्यासारख्या पवित्र क्षेत्रात कशाला येतात?"

"जोशा, तु पण कधी कधी सॉलीड जोक करतोस बरं का! चहाला टरकतो म्हणे.... चहाला?" सॅम डिसोझाला नेहेमीप्रमाणेच आपल्या हसण्यावर आवर घालता आला नाही आणि त्याच्या त्या गगनभेदी हसण्याने, नेहेमीप्रमाणेच आत किचनमध्ये गोविंदने आणखी एक प्लेट फोडली!

सॅम डिसोझा, पूर्ण नाव सॅम्युअल डिसोझा....... सगळं आयुष्य इंडियन एअरफोर्स मध्ये घालवल्यानंतर आयुष्याची संध्याकाळ घालवायला पुण्यात सेटल झालेला. आम्ही सगळेच या खाजगी क्लबचे मेंबर्स. बहुतेक जण पंचावन्न - साठच्या पुढचे. पाकबरोबरच्या एका युद्धात हा माणूस त्याच्या फायटरवरच शत्रूचा बाँबगोळा येऊन आदळल्याने जखमी झाला. त्यात त्याचा एक हात कायमचा निकामी झाल्याने, त्याला नाईलाजाने एअरफोर्स सोडावे लागले. तेव्हापासून त्याने पुण्यात नवीन भरतीसाठी आवश्यक ते प्रशिक्षण देणारी एक खाजगी अकॅडमी सुरु केली होती.

" अरे लेको, मी चहा प्यायला आवडत नाही, असे कुठे म्हणतोय? पण चहाचे नाव काढले, की क्षणभर अंगावर काटा उभा राहतो एवढे मात्र खरे!" मी प्रामाणिकपणे उत्तरलो. मी, रिटायर्ड मेजर प्रताप जोशी, १९७१च्या भारत पाक युद्धातील कामगिरीबद्दल सरकारने मला वीरचक्र बहाल केले होते. तसे मी लष्करातून निवृत्त झाल्यावर, पुण्यात स्वत:चा सिव्हिल काँट्रॅक्टरचा व्यवसाय सुरु केला होता. आणि आता त्यात बर्‍यापैकी स्थिरही झालो होतो. ग्रूपमध्ये मी वयाने सर्वात लहान, म्हणजे वय वर्षे सत्तावन्नचा तरुण.

वयाच्या अठराव्या वर्षीच सैन्यात भरती झालो. अंगात रग होती, घरची सांपत्तिक स्थिती सधन म्हणता येईल, एवढी चांगली होती. सुरुवातीला घरातून विरोध झाला होता थोडा. घरचा व्यवसाय सोडून लष्कराच्या भाकरी (अक्षरश:) मोजायला जातोय म्हणून. पण एकुलता एक असल्याने, नंतर आपोआप विरोध कमी होत गेला. शिक्षणाने सिव्हिल इंजिनीअर असल्याने, आणि अंगी कदाचित इतरांपेक्षा थोडे वेगळे असे गुण असल्याने, वाव मिळत गेला. सुदैवाने, तेव्हा सैन्यात अजूनही बर्‍यापैकी इंग्रज अधिकारी वरच्या पोस्टवर असल्याने, तथाकथित राजकारणाचा अनुभव घ्यावा लागला नाही. धाडसी वृत्ती आणि समयोचित निर्णय घेण्याची क्षमता अंगी असल्याने, भराभर वरच्या पायर्‍या चढत गेलो. नंतर इंग्रज अधिकारी निवृत्त होऊन परत गेले, पण तोपर्यंत, मी बर्‍यापैकी ध्रुवतार्‍याप्रमाणे अढळ झालो होतो. पाकिस्तानशी झालेल्या दुसर्‍या, १९७१ च्या युद्धातली ही घटना. चहा समोर पाहिला, की ती घटना आठवते आणि ती घटना आठवली की मला चहा प्यायची भीती वाटते.

आम्हा चौघांचीही ओळख इथे या क्लबमध्येच झाली होती. तसा होरमसजीला मी ओळखत होतो, पण दुरुनच. इथे आल्यानंतर आधी ओळख आणि मग घनिष्ठ मैत्री झाली. रणजीत आणि सॅम आमच्या आधीपासून क्लबचे मेंबर होते. साधारणपणे व्यवसायाचे क्षेत्र एकच असल्याने, आमची वेव्हलेंग्थ चांगलीच जुळली होती.

"जोश्या, आता तोंड उघडायला काय घेशील? आपल्याला तर खरंच उत्सुकता लागून राहिलीय यार! असं नक्की काय घडलं होतं ज्यामुळे तुला चहा प्यायची भिती वाटते? " रणजीतरावांनी आपल्या गडगडाटी आवाजात विचारलं.

"रणजी, यार, पहले एक एक पेग स्कॉच हो जाये, ऑन द रॉक्स... उसके बाद इसका चायवाला किस्सा सुनेंगे.... ! क्यों होरमसजी, क्या खयाल है?" हातातला ग्लास संपवता संपवता सॅमने विचारले.

"आय डोंट माईंड! पन साला मला स्कॉच चायच्या मगमंदे घालून दे रे गोविंद!" होरमसजीने टाईम्सच्या क्रॉसवर्डमधून डोके न काढताच उत्तर दिले, तसे आम्ही तिघांनीही डोक्यावर हात मारुन घेतला.

"गोविंद, स्कॉच लाव, साथमें खारा काजू अँड रोस्टेड पापड अँड ऑफ कोर्स तेरा स्पेशल चिकन तंदुरी. आज जोशीसाब का किस्सा सुननेका है! चलो जल्दी करो!" सॅमने ऑर्डर सोडली, तसा गोविंद लगबगीने तयारीला लागला. पुढच्या दहा मिनिटांत एक चिकन तंदुरी सोडली, तर सगळे पदार्थ टेबलवर हजर होते. चिअर्स करुन पहिला घोट घेतला. काहीही अ‍ॅड न करता, ऑन द रॉक्स घेतलेली स्कॉच घसा जाळत आत उतरली, तसे आसमान आठवले. पुन्हा एकदा जाणीव झाली..... "साला वय झालंय आता, नाही झेपत! "

म्हातारा होरमस मात्र मस्तीत होता!

"ए साला गोविंद, या होरमसच्या स्कॉचमध्ये थोडा शक्कर डालके उबालके देना मंगता था ना इसको स्कॉच, वर्ना चाय का फिल कैसा आयेगा? " सॅमच्या डोक्यातून नेहेमीच अशा भन्नाट कल्पना निघत. मी क्षणभर डोळ्यासमोर तो प्रसंग उभा करण्याचा प्रयत्न केला...... "चहाच्या कपात वाफाळणारी स्कॉच आणि होरमसजी त्यात चिकन तंदुरी बुडवुन, बुडवुन खातोय." आणि मला ठसका आवरला नाही!

तसा रणजीत माझ्याकडे बघून म्हणाला, "जोश्या साल्या, तुला स्कॉचमध्ये चिकन बुडवून खाणारा होरमसजी दिसला काय?" मी त्याच्याकडे बघतच राहीलो! साला हा कमिशनर, याला मनातलं पण कळतं काय? तसा रणजीत हसायला लागला..

होरमसने क्रॉसवर्डमधुन डोके वर काढले आनि मिस्कीलपणे डोळे मिचकावत म्हणाला, " साला, आमच्या मिसेसला सांगायला पायजेल, चांगला रेसिपी हाये." तसा तिथे हास्याचा धबधबा उसळला! "ए जोश्या, साला, किती भाव खायेल? आता सांग ना बाबा तुजा किस्सा! चायने काय चुहा मारलाय तुझा तो.......!"

आणि मी भूतकाळात हरवलो.
........................................................................................................................

सन १९७१ चा मार्च महिना, आताचा बांग्लादेश...त्यावेळी पुर्व पाकिस्तान या नावाने ओळखला जात असे. राजपुत बटालीयनची एक तुकडी त्यावेळी चित्तगाँगच्या परिसरात गुप्तपणे कार्यरत होती. बांग्लादेशी बंडखोरांना प्रशिक्षण देण्यासाठी. ७ मार्च १९७१ रोजी मुजिब उर्र रहेमान यांनी एका जाहीर सभेत जाहीर केले होते की हा लढा आता आपल्या स्वातंत्र्याचा लढा आहे. त्यानंतर काही दिवसातच मेजर झिया उर्र रहमान यांनी चित्तगाँगच्या कारुलघाट रेडिओ स्टेशनवरुन स्वातंत्र्याची घोषणा केली आणि बांगलादेशाचा अस्तित्वाचा लढा चालु झाला. तोपर्यंत भारतीय सैन्याचा लढाईत प्रत्यक्ष सहभाग नव्हता. मुळात त्याला युद्ध म्हणणेच कठीण होते. चौदा पंधरा वर्षाची स्वातंत्र्याच्या भावनेने भारलेली पोरे सोरे हातात बंदुका घेवुन युद्धाच्या गोष्टी करत होती. बांग्लादेशचे अधिकृत सैन्य तसे फारच थोडे होते. पाकिस्तान्यांनी ऑपरेशन सर्च लाईटची सुरुवात केली होती. हजारो लोक त्यात मारले गेले. या चकमकी छोट्या मोठ्या प्रमाणावर चालुच होत्या. आपला सहभाग असला तरी तो गुप्त आणि अप्रत्यक्षच होता. साधारण डिसेंबर १९७१ च्या सुरुवातीला पाकिस्तानी विमानांनी भारतीय विमानतळावर हवाई हल्ले करायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यावेळच्या पंतप्रधान इंदीरा गांधी यांनी हा आमच्यावर हल्ला आहे असे जाहीर करुन पाकिस्तानबरोबर युद्ध पुकारले. ६ डिसेंबर १९७१ रोजी भारताने पुर्व पाकिस्तानला बांग्लादेश या नावाने एक स्वतंत्र राष्ट्र म्हणुन मान्यता दिली. १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानच्या लेफ्टनंट जनरल नियाझींनी मित्र वाहीनीचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अरोरा यांच्यापुढे शरणागती पत्करली आणि या युद्धाचा अंत झाला. बांग्लादेशला एक स्वतंत्र राष्ट्र म्हणुन मान्यता, प्रतिष्ठा मिळाली. युद्ध संपले आणि त्यानंतर मायदेशी परतताना वाटेत ती घटना घडली.

आम्ही सगळेच विजयाच्या धुंदीत मस्त होतो. गेल्या कित्येक महिन्याची मेहेनत कामी आली होती. विजयाचा तर आनंद होताच, पण ज्या राष्ट्रामुळे आपल्या परमप्रिय मातृभुमीचे दोन तुकडे झाले, आज त्या राष्ट्राचेही दोन तुकडे करण्यात यश आल्यामुळे झालेला आनंद काही औरच होता. (बांग्लादेशाच्या स्वातंत्र्ययुद्धादरम्यान जे बांग्लादेशी निर्वासीतांचे लोंढे स्थलांतरीत होवुन भारतात येवु लागले आणि आजही येताहेत, त्यामुळे ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत तो एक वेगळाच मुद्दा आहे म्हणा)

पण तेव्हा मात्र आम्ही प्रचंड खुषीत होतो. पार्ट्या चालु होत्या. अशाच जवळच्या एका खेड्यातुन आलेले मेजवानीचे आमंत्रण स्विकारुन आम्ही गेलो होतो. मन्सुरखान पठाण नावाच्या एका संपन्न शेतकर्‍य़ाने आम्हाला जेवायला बोलावले होते. मुक्ती वाहीनीतल्या काही सहकार्‍यांबरोबर भारतीय फौजेचे आम्ही काही अधिकारीही या मेजवानीत सामील होतो. मन्सुरच्या शेतावरील घरात या मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. युद्धसमाप्ती जाहीर करण्यात आलेली असल्याने आणि घरगुती कार्यक्रम असल्याने आम्ही शस्त्रे बरोबर घेतलेली नव्हती. सगळे मजेच्या मुडमध्ये होतो. नाही म्हणायला माझ्याकडे एक छोटेसे बॅरेटा होते, पण ते किती जणांना पुरे पडले असते?

असो, मन्सुरने जोरदार तयारी केली होती. एक पुर्ण बोकड आणि कितीतरी कोंबड्या धारातिर्थी पडल्या होत्या. दारुची नुसती रेलचेल होती. रात्रभर नुसती धमाल चालली होती. गेल्या काही महिन्यात इथल्या बर्‍याच जणांशी खुप छान मैत्री झालेली होती. दोन दिवसात आम्ही परत फिरणार होतो. पुन्हा या इथल्या मित्रांची कधी भेट होइल कुणास ठाऊक म्हणुन हाती असलेला वेळ आम्ही सगळे पुर्णपणे वापरुन घेत होतो. मध्यरात्र होवुन गेलेली होती. आमच्यापैकी काही जण जन्नतच्या वाटेवर रेंगाळत होते. आम्हीदेखील बर्‍यापैकी झोकली होती, अर्थात तरीही सैनिकाच्या रक्तात मुरलेला सावधपणा होताच. अडीच तीन च्या दरम्यान तळाकडे परत निघालो आणि अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आमची जीप बंद पडली.

नाही म्हणायला थोडे टरकलोच. घनदाट जंगल, जवळ फारशी हत्यारे नाहीत. युद्धबंदी झालेली असली तरी पाकड्यांचा काही भरवसा देता येत नाही. पाकिस्तानी सैन्याची एक सवय आहे, एखादे ठाणे हातातुन गेल्यावर देखील ते लगेच तो इलाका पुर्णपणे सोडुन जात नाहीत. त्याच भागात दबुन राहतात आणि शत्रु जरा बेसावध झाला की पुन्हा उचल करुन हल्ला करतात. तो अनुभव ध्यानात घेता या जंगलात काही पाकडे अजुन लपुन असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. आमच्या ड्रायव्हरने जीप चालु करण्याचा थोडाफार प्रयत्न करुन बघितला, पण ती अगदीच एखाद्या हट्टी, रुसुन बसलेल्या मुलासारखी फ़ुरंगटुन बसली होती. जागेवरुन हालायलाच तय्यार नाही. चावी फ़िरवली की माजावर आलेल्या घोड्यासारखी थोडावेळ फ़ुरफ़ुरायची आणि मग पुन्हा फतकल मारुन थंड पडायची. आम्ही गाडी ढकलुन स्टार्ट करायचाही प्रयत्न केला पण जैसे थे. काही उपयोग नाही.

"जोशीसाब, यहा खुलेमें जादा देर रुकना खतरनाक हो सकता है! हम या तो जीप यही छोडकर आगे चलते है या फीर किसी सेफ जगहपें पनाह लेके सुबहका इंतजार करते है! अगर पाकिस्तानियोंने हमपें हमला कर दिया तो उनसे लडने किये हमारे पास जादा हथियार भी नही है!" आमच्या सोबत असलेला मुक्तीवाहीनीचा कमांडर जलाल थोडा गंभीर झाला होता.

तसे आम्ही सगळेच गंभीर झालो होतो. कारण प्रसंग खरोखरच बाका होता. डोक्यात पार्टीत झोकलेल्या मदीरेची नशा होती आणि मनात आकस्मिकपणे होवु शकणार्‍या पाकिस्तानी हल्ल्याची कुशंका. शेवटी आम्ही जीप तिथेच सोडुन कुठल्यातरी सुरक्षीत ठिकाणी मुक्काम करण्याचा निर्णय घेतला, तसे लगेच आमच्या तळावर वॉकीटॉकीच्या माध्यमातुन कळवण्यात आले. आम्ही सुरक्षीत जागा शोधत निघालो.

"खांसाब, सामने एक मकान नजर आ रहा है!"

सोबतचा एक सैनिक कुजबुजला तसे सगळ्यांच्याच नजरा तिकडे लागल्या. घर कसले चार भिंती आणि छप्पराचा एक आडोसा शिल्लक होता. या लढाईत अनेक घरे, कुटुंबे उध्वस्त झाली होती. कित्येक जण तर घरे सोडुन पळुन गेले होते युद्धाच्या भितीने. त्यापैकीच ते एक घर असावे बहुदा. कारण ते घर पुर्णपणे रिकामे होते. एकुण तीन खोल्या होत्या. एक स्वयंपाकघर, एक छोटीशी खोली... जिला फारतर मिनी बेडरुम म्हणता आलं असतं आणि एक दर्शनी हॉल. आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटत होतं की गावापासुन दुर या एकाकी घरात कधी काळी कोण राहात असावं? स्वयंपाकघर आणि हॉलमधल्या कॉमन भिंतीला एक झरोका होता. ज्याद्वारे या खोलीतुन त्या खोलीत डोकावता यायचे. घरातल्या सगळ्या वस्तु अस्ताव्यस्त पडलेल्या. फक्त एक गोष्ट खटकत होती, ती म्हणजे घरात प्रचंड प्रमाणावर पसरलेली धुळ. अगदी वर्षानुवर्षे बंद असल्यासारखे घरातल्या सर्व वस्तुंवर धूळीची पुटे चढली होती. घरात बहुदा कुणीच राहात नसावेत. आम्ही सगळे आत शिरलो. अजुन उजाडायला तीन - चार तास होते. म्हणुन जलालने सुचवले ...

"जोशीसाब, आप थोडा आराम फरमाओ, हम पहरा देते है!"

खरे तर मला ते योग्य वाटले नव्हते, पण डोळ्यावरची धुंदी आता सहन होत नव्हती. म्हणुन मी थोडावेळ आडवा झालो. डोळ्यावर झोप रेंगाळायला लागली होती. मध्येच जलाल स्वयंपाकघरातुन एक चक्कर टाकुन आला. मी त्याला विचारलं....

"क्युं मिया, क्या तलाश कर रहे हो? यहा कुछ नही मिलनेवाला."

"जी साबजी, देख रहा था, और कुछ ना सही चाय की पत्तीही मिल जाती. सिगडी तो पडी है अंदर, थोडा चाय का पानी उबालके पी लेते तो निंद भाग जाती, लेकीन यहा तो कुछ भी नही है!" जलालने हसुन उत्तर दिले. आणि पुन्हा दारापाशी जावुन उभा राहीला.

साधारण पंधरा - वीस मिनीटांनी ......

"या अल्ला, ये कैसा अजुबा है! या खुदा मदद, ये जरूर शैतानी करामात है!"

मी दचकुन उठुन बसलो.

"क्या हुवा जलालमिया? इस तरह कांप क्युं रहे हो?"

जलाल अक्षरश: थरथर कापत होता. डोळे मधल्या भिंतीवर असलेल्या त्या झरोक्यावर लागलेले. त्याने घाबरतच त्या झरोक्याकडे बोट केलं. त्याचा हात कमालीचा कापत होता. मी त्याच्या बोटाच्या अनुशंगाने झरोक्याकडे पाहीले....

"क्या हुवा मिया, कुछ भी तो नजर नही आ रहा है! एक बहादुर जवान हो मिया तुम, अंधेरेसे घबरा रहे हो क्यां? "

मी थोडा विनोद करुन ताण कमी करण्याचा प्रयत्न केला.

"हुजुर वहा देखीये, अभी मै अंदर गया था, तो उधर कुछ भी नही था! फीर बातो ही बतोमें मैने आपको अपनी चायकी तलब के बारे में बता दिया और अब देखीये उधर! " जलाल प्रचंड घाबरला होता.

मी थोडेसे पुढे जावुन झरोक्यातुन आत डोकावलो आणि ......

सर्रकन माझ्या अंगावर काटा उभा राहीला......

मघाशी पुर्णपणे रिकाम्या असलेल्या त्या स्वयंपाकघरात चुलाणापाशी एक किटली ठेवलेली होती. आणि किटलीतुन चांगलीच वाफ बाहेर पडत होती. शेजारीच काही रिकामे अ‍ॅल्युमिनियमचे पेलेही ठेवले होते!

मी हलकेच वळुन जलालकडे पाहीले. त्याचे आपले जोरजोरात "जल तु, जलाल तु... आई बला को टाल तु..!" चालु होते. मला क्षणभर हसु आले, पण लगेच भानावर आलो. कारण त्या तसल्या जंगलातल्या एकाकी, (भुताटकीच्या वाटणार्‍या) घरात अचानक वाफाळलेल्या चहाने भरलेली किटली कुठुन आली? हा प्रश्न थरकाप उडवणाराच होता.

"साब, सबको उठाते है और यहासे भाग चलते है! मुझे ये जगह अच्छी नही लग रही! मैने सिर्फ सोचा और चाय हाजीर? ये जरुर शैतानी करामात है साब!"

जलाल कसाबसा बोलला आणि परत त्याचे "जल तु जलाल तु... चालु झाले.

मी धीर करुन उठलो आणि स्वयंपाकघराकडे निघालो, तसा जलाल एकदम पुढे आला.

"अरे साब क्या कर रहे है, उस कमरेमें शैतानका ठिकाना है, वहा मत जाईये, यहा से भाग चलीये!"

"जलाल बेवकुफी मत करो, तुम खुद वहासे दो बार हो आये हो! तुमको कुछ तकलीफ हुयी है क्या? हम सिपाही है, ऐसे डरनेसे काम नही चलेगा, चलो देखते है की माजरा क्या है! अगर तुममे हिंमत नही है तो मत आओ, यही खडे होके देखो!"

मी माझं पिस्तुल काढुन हातात घेतलं, बुलेट्स चेक केल्या आणि स्वयंपाकाच्या खोलीत शिरलो आणि काळजीपुर्वक खोलीची तपासणी करायला सुरुवात केली. काहीच कळायला मार्ग नव्हता. स्वयंपाकघराला एकच खिडकी होती, पण ती लोखंडी गजांनी बंदिस्त केलेली होती. दुसरा दरवाजा नव्हता. नाही म्हणायला धुर बाहेर जायला छताला एक छोटेसे धुराडे होते पण तिथुन जेमेतेम एखादे पाखरु आत येवु शकले असते. मग चहाची किटली आली कुठुन?

खरेतर माझ्याही मनात धाक धुक वाढली होती. सगळीकडुन बंद अशी खोली, आत यायच्या एकुलत्या एका दारावर आम्ही सगळे हजर. असे असताना आम्हाला, कुणालाही न कळता स्वयंपाकघरात चहाची किटली कुणी आणली असेल आणि कशी? खरोखरच ही जागा झपाटलेली तर नसेल?

तो विचार मनात आला आणि मी थरारुन उठलो...

तेवढ्यात .....

"तु चुप कर बेगम, मेहमानोंको चाय पिने दे!"

कुजबुजत्या स्वरातले ते बोलणे कानावर आले आणि माझाही धीर सुटला. ऐकु तर येतय पण दिसत तर काहीच नाही. मी एकदा किटलीकडे बघितलं आणि पटकन बाहेर आलो. तिथे काहीतरी नक्कीच होतं. आता मात्र माझाही धीर सुटला.

अरे शत्रु समोर दिसत असेल तर हजारांच्या संख्येत येवु द्या ना, साला निशस्त्र लढलो असतो. पण इथे कुणाशी लढायचे तेच माहीत नाही. ज्याच्याशी लढायचे तो समोर दिसत नाही. मी धाडसी आहे, पण दुराग्रही किंवा अविचारी नाही. धाडसाच्या नावाखाली मला उगाच धोका पत्करायचा नव्हता. म्हणुन मी पटकन खोलीच्या बाहेर आलो.

"तुम सही कह रहे हो जलाल, यहा से निकल जाना ही ठिक है! चलो सबको उठाते है और यहासे चलते है!"

आम्ही दोघे मिळुन सगळ्यांना उठवायला लागलो. पटापट सगळ्यांना उठवले आणि बाकी कसलीही कल्पना न देता बाहेर पडण्याच्या ऑर्डर्स दिल्या. बाहेर पडता पडता सहज स्वयंपाकघराकडे लक्ष गेले, तर चहाच्या किटलीपाशी आता एक मोठी थाळी देखील होती, रोटल्यांनी भरलेली. आता तर चांगलीच तंतरली. पण एक कळत नव्हते, ते जे काही होते ते आम्हाला कसलाही त्रास देत नव्हते. उलट आधी चहा आणि आता रोटल्या......? आम्हाला मदतच तर करत होते ते! आम्ही विनाकारणच घाबरत होतो का? पण काहीही असो, ते जे काही होते ते दिसत नसल्याने उगाच विषाची परिक्षा घेण्यात अर्थ नव्हता. हो.. त्या चहात किंवा रोटलीत तसंच काही असेल तर.

"अरे साहाब, मेरे एक दोस्तने ऐसाही जंगलमें मिला हुवा एक सेब खा लिया था, उसके बाद कभी वो दिखायी नही दिया! लोगबाग बोलते है को सेब शैतानने रखा था, जिसे खाते ही ये बंदा शैतान का गुलाम हो गया और गायब हो गया! "

एका बांग्लादेशी सैनिकाने लगेच पुडी सोडुन दिली.

"ए चुप कर, डरा मत सबको, चुप चाप भाग चलो यहासे अब!"

आम्ही बाहेर पडलो आणि भराभर पावले उचलत घरापासुन दुर जायला निघालो. बाहेर नुकतीच पावसाला सुरुवात झाली होती. पाउस मुसळधार कोसळत होता. मधुनच जंगली प्राण्यांचे चित्र विचित्र आवाज ऐकु येत होते. रातकिड्यांची किरकिर रात्रीच्या भयावहतेत आणखीनच भर घालीत होती. तेवढ्यात मागुन एक हाक आली ......

"अरे हुजूर, सुनीये तो....!

मी मागे वळुन पाहायला गेलो, तसे जलालने मला रोखले.

"नही जोशीसाब, मुडकर मत देखना ! ये खबीस है शायद, पिछेसे पुकारता है, आपने उसकी पुकार का जवाब दे दिया तो समझो आप गये! चुपचाप चलते रहीये, पिछे मत देखीये!"

मागुन हाकावर हाका येतच राहील्या. तसे आम्ही भराभर पावले उचलयला सुरुवात केली. तर मागुन कुणीतरी पळत येत असल्याचा आवाज झाला तसे आम्हीही पळत सुटलो.

"अरे सुनिये हुजूर, डरीये मत! मै कोई भुत-वुत नही हूं, इन्सान हूं आपकी तरहा!"

मागच्या हाका जवळ जवळ येत चालल्या होत्या. तसा जलालने मला हाताला धरुन खेचले.

"उधर ध्यान मत दिजीये जोशीसाब, ये शैतान खबीस ऐसेही झुट बोलके लोगोंको फसाते है और फिर अपना गुलाम बना लेते है!"

मी नकळत वेग वाढवला तेवढ्यात परत मागुन हाक आली, "डरीये मत हुजुर मै कुछ नही करुंगा."

आम्ही तसेच चालत राहीलो, तेवढ्यात आमच्या समोरच्या वळणावरुन एक माणुस अचानक उगवल्यासारखा पुढ्यात उभा राहीलो.
तो धापा टाकत होता, कुठुन तरी लांबुन पळत आल्यासारखा. मी झटक्यात पिस्तुल काढले आणि त्याच्यावर रोखले, ट्रिगर दाबणार तेवढ्यात तो माणुस आपले हात वर करुन गुढग्यावर बसला.

"रहम हुजूर, मै दुश्मन नही हूं!"

मी त्याच्याकडे नीट पाहीले साधारण पन्नाशीच्या घरातला होत तो. गोरा पान, देखणा मुसलमानी चेहरा, मेंदीने रंगवलेली दाढी. डोक्यावर पठाणी पगडी. अंगात मुसलमानी पद्धतीचा कुर्ता पायजामा.

"मै दुश्मन नही हुं साब. दोस्त हुं! आप लोगोने अपनी जानपें खेलकर हमारे बांग्लादेशको आजादी दिलवायी है, आपका कुछ बुरा कैसे कर सकता हुं मै?"

तो धापा टाकत म्हणाला.

तसे मी जरा शांत झालो, पण पिस्तुल तसेच रोखलेले ठेवुन त्याला विचारले..

"कौन हो तुम? क्या चाहते हो? कहा से आये हो? किसने भेजा है तुमको?" मी प्रश्नांची सरबत्ती चालु केली. तसा तो घाबरुन उत्तरला.

"साबजी मै एक मामुली नाई हुं, यही पासवाले गांव में नाईकी दुकान है मेरी! आप अभी जिस घर में रुके थे, वही रहता हूं! और कुछ नही आप लोगोंको चाय चाहीये थी तो सोचा थोडी आपकी खिदमत कर लुं! आज आपकी वजहसे आजादी की सांस ले सकते है हम, आपके लिये अगर इतना कर पाता हुं तो अल्ला जन्नत बख्शेगा मुझे और मेरे कुनबेको!"

"व्हॉट, लेकीन उस घरमें तो कोई नही रहता, मै उसका कोना-कोना छान चुका हूं! झुट मत बोलो, सच सच बताओ, कौन हो तुम? कहासे आये हो?" मी साशंक स्वरात दरडावुन विचारले.

"अल्लाताला की कसम हुजूर, झुट बोलु तो मेरे बच्चे भुके सोये! आप चलीये मेरे साथ मै आपको दिखाता हूं सबकुछ! चाहे तो मेरी कनपटीपें बंदुक लगाये रख्खे जबतक की आपको यकीन नही होता!"

मला त्याच्या बोलण्यात कुठेतरी खरेपणाचा अंश जाणवला. एकीकडे जलाल नको नको करत होता, पण मी माझ्या अधिकारात परत त्या घराकडे जायचा निर्णय घेतला. आता भितीची जागा कुतुहलाने घेतली होती. हा जर तिथेच राहात असेल तर कुठे राहात होता? आम्हाला दिसला कसा नाही?

"चलो, लेकीन कोइ चालाकी मत करना! तुम गनकी नोकपें हो मेरी, याद रखना!"

"जी साब, बिलकुल हरकत नही करुंगा!" तो पुढे झाला, आम्ही त्याच्या मागोमाग निघालो.

"अकेलेही रहते हो?" मी जरा मोकळा झालो होतो.

"नही साब, हम चार लोग है, मै, मेरी बेगम और दो बच्चे! सोला सालका एक लडका और अठारह सालकी लडकी! साब जबसे उन हरामी पाकिस्तानीयोने उनका वो "सर्च लाईट ऑपरेशन" चालु किया था, तबसे हम लोग यहा छुपके रह रहे है! साले घर घरसे जवान बच्चोंको ढुंढ ढुंढके मार रहे थे, बच्चीयोंको उठाके ले जाते थे, अपनी हवस मिटाने के लिये! उनसे बचने के हम गाव के बाहर बने इस पुरखोके मकानमें आ छिपे है! आपकी हिंदुस्तानी फौजनें हमारे बहादुरोंकी मदत करके जो अहसान हमपें किया है, वो हम कभी नही भुल सकते साब! "

तो सांगत होता. तोपर्यंत आम्ही त्या घरापाशी येवुन पोहोचलो होतो.

"अरे लेकीन यहा तो हमें कोई भी दिखायी नही दिया था!"

"वो क्या है ना साब, पाकिस्तानियोंका कोई भरोसा नही, वो यहाही आ सकते थे! खुशकिस्मतीसे मेरे पुरखोने जब ये मकान बनाया था, तब घरकें निचे सामान रखने, खास कर छुपने के लिये एक तहखाना बनाया था! खाना बनाने के कमरेमें एक अलमारी है, आपने देखी होगी? उसी अलमारीमेंसे नीचे तहखानेमें जानेका रस्ता है!"

अरेच्चा असं आहे तर, त्या खोलीत एक कपाट होतं खरं. पण ते उघडुन बघायचं मला सुचलंच नव्हतं.

"आप लोग जब घरमें दाखिल हुये तब मै सो रहा था, लेकीन बेगम जाग रही थी! वैसे भी इन दिनो निंद बडी मुश्किलसेही आती है! आप को चाय के बारेंमे बात करते सुना तो उससे रहा नही गया! और उसने मुझे जगा दिया! आपके बात करने के तरिकेसे मै जान गया की आप पाकिस्तानी नही है! इसलिये हमने सोचा की आपको चाय पिलाते है! लेकीन पक्का पता नही था, इसलिये सामने आने की हिंमत नही जुटा पाये! और चुपचाप चाय की केटली उपर रखके फिर निचे चले गये! फिर अचानक बेगमको सुझा की पता नही आप लोगोंने खाना खाया भी है की नही, इसलीये उसने फटाफट रोटीया बनायी और उन्हे उपर रखके चली गयी! वापस आनेके बाद उसने मुझे बताया की चाय अभीभी वैसे के वैसे ही पडी हुयी है! तो फिर मुझसे रहा नही गया और मै उपर आपसे मिलने चला आया! तब तक आप मकानसे दुर जा रहे थे! मैने आपको पुकारकर आवाजभी दी लेकीन आपने पता नही मुझे क्या समझा और भागतेही चले गये, तो फिर मै दुसरे एक छोटे रास्तेसे होते हुये आपके सामने पहुंच गया! उसके बाद जो हुवा वो तो आप जानते ही है साहब!"

मी हसुन जलालकडे बघीतले. त्याने वरमुन मान खाली घातली. तसा मी खिदळलो...

"आप क्युं शरमिंदा हो रहे हो मिया? घिघ्घी तो हमारी भी बंघ गयी थी!"

त्या घरात घराची मालकीण आपल्या दोन लेकरांसमवेत आमची वाट पाहात होती. मी आधी त्या कपाटात शिरुन खाली तहखान्यात (भुयारात) उतरलो. खात्री करुन घेतली आणि मगच वर आलो.

"भाभी, खाना तो रातको पेटभर खाया था हमने, लेकीन हाँ, आपके हाथकी बनी लजीज चाय जरुर पियेंगे, बशर्ते की आप उसे फिरसे गर्म करके लाओ, अबतक तो ठंडी हो चुकी होगी ! और हाँ, अब आपको इस तरह तहखानेमें दुबककर रहने की जरुरत नही है! पाकिस्तानी दुम दबाके भाग चुके है, अब आप और आपके बच्चे आजाद बांग्लादेशमें चैनकी खुली सांस ले सकते है!"

..............................................................................................................................

"त्या दिवसापासुन मला चहा म्हटले की आधी ती वाफाळणार्‍या चहाने भरलेली किटली आठवते आणि मग तो सगळा किस्सा आठवतो. त्या रात्री भितीने वाईट झालेली अवस्था आठवते आणि मग अंगावरचे रोम रोम अटेंशनमध्ये उभे राहतात." मी खुसखुसत बोललो

"साल्या भितीच्या नावाखाली तुला आपली झालेली फजीती सांगायची होती हे सांग ना!"

सॅमने माझ्या मनातली गोष्ट बोलुन दाखवली आणि क्लबचा हॉल आम्हा पाच जणांच्या हसण्याने भरुन गेला.

(पुर्णपणे काल्पनिक)

विशाल कुलकर्णी

गुलमोहर: 

मस्त!!!
शेवट काय होईल हा अंदाज नाही करता आला. शेवतपर्यंत वाचावेच लागले त्यासाठी. सॉल्लिड आवडली कथा.

(पुर्णपणे काल्पनिक)>>>? ??? वाटत नाही... खरीच घडल्यासारखी वाटतेय... (म्हटलं बर्‍याच दिवसांनी भयकथा वाचायला मिळेल...)

पण छान होती, आवडली...

अरे मला कोणीतरी मदत करा ना..
१) मी मागच्या महीन्यात अफगाणी माणसाची कथा वाचली होती मायबोलीवर्...(नाव आठवत नाही...) पण ३रा भाग होता बहुदा... पुढचे भाग कुठे बरं मिळतील?

२) मायबोलीवरचं ७२ तासांपूर्वीचं साहित्य कुठे वाचायचं?

३) ही अशी चौकशी करण्याचा विभाग कुठे आहे? म्हणजे पुढच्यावेळी तिथेच चौकशी करेन Happy

Searching for guaranteed search engine optimization services at affordable rates? Your search ends here!!! Find your website on the top of popular search engines with our seo services...

विशालदा,
खूप दिवसांनी?
नेहेमीप्रमाणे मस्त. आणखी येऊ द्यात.

विशालदा, कथा नेहमीप्रमाणेच क्लास!!! अंदाज नाही लागला शेवटाचा..खुप मस्त!
पण एक छोटीशी गडबड आहे....वयाच्या अठराव्या वर्षी सैन्यात भरती झालेला नायक शिक्षणाने सिव्हील इंजीनियर कसा असु शकतो? इंजिनीयरिंग २१ व्या वर्षी पुर्ण होते ना, म्हणजे आमची तरी त्याच वर्षी झाली Happy

बाकी कथा झकास एकदम!!!

सुमेधा, मिलिटरीमध्ये स्पेशल प्रोविजन असते, नंतर तुम्ही एकदम मोठी रजा घेवुन आपले शिक्षण पुर्ण करु शकता. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे बारावीनंतर तुम्ही जर थेट एन्.डी.ए.ला अ‍ॅड्मिशन घेतले की सैन्यात भरती झाल्यासारखेच मानले जाते. त्यातच तुम्ही ईंजीनिअरिंगही करु शकता. त्या अर्थाने घेतलेय.
बाकी सगळ्यांचे मनापासुन आभार.
केदारभाऊ बदल केलाय, धन्यवाद.

कथेचा शेवट चान्गला आहे. पण ते लोक जर तिथेच राहत होते, तर घरातल्या सामानावर धूळ कशी काय साठली? आणि ते घराचे दार उघडे ठेवून का झोपले होते?

वेव...

प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
सामानावर धुळ होती कारण ते लोक घरात नव्हे तर घराच्या तहखान्यात राहात होते. घर मुद्दामच अस्वच्छ आणि उघडे ठेवलेले आहे, जेणे करुन कोणी पाकिस्तानी सैनिक तिथे आलेच तर तिथे कोणी राहात आहे हे त्यांच्या लक्षात येवु नये आणि तिथे राहणारी माणसे प्राणाला मुकू नयेत.

आवडली