कट्यार : एक समर्थ माध्यमांतर !

Submitted by झंप्या दामले on 2 December, 2015 - 15:29

'कला श्रेष्ठ की घराणे', 'बांध घालून अडवून ठेवलेले स्वर महत्वाचे की पाण्याप्रमाणे जिथे जाईल त्याचे रंग रूप घेणारे नितळ स्वर श्रेष्ठ' या पुरातन वादावर भाष्य करणारे 'कट्यार काळजात घुसली हे दारव्हेकर मास्तरांचे नाटक जितके वसंतराव आणि अभिषेकीबुवांमुळे नावाजले गेले तितकेच त्यातल्या संगीतविचारांमुळेही !!! संगीताला कसलेही बंधन नसते. त्यांना कसले बंधन असलेच तर ते असते सात स्वरांचे, हे ठामपणे सांगणारे हे नाटक. नायक-नायिका, कौटुंबिक आव्हाने अशा नेहमीच्याच विषयापेक्षा वेगळे काही सांगणाऱ्या चित्रपटांची मी नेहमीच उत्सुकतेणे वाट बघतो. शिवाय नाटकाचे माध्यमांतर हा विषय जितका औत्सुक्याचा तितकाच नाजूक ! त्यामुळे रुपेरी पडद्यावरच्या कट्यारीची मी वाट पाहिली नसती तरच नवल !

मूळ नाटकाच्या गाभ्याशी हा चित्रपट पूर्णपणे प्रामाणिक आहे तरीही काही गोष्टींची मांडणी पूर्ण वेगळी आहे. खांसाहेब ही नाटकात नकारात्मक छटा असणारी परंतु पंडितजींचा प्रचंड आदर करणारी व्यक्तिरेखा इथे संपूर्णपणे नकारात्मक होऊन आलेली आहे त्याउलट नाटकात पंडितजी हे पात्र फक्त लोकांच्या बोलण्यातून उभे राहणारे होते ते इथे मूर्त स्वरुपात - आणि मूर्तिमंत सज्जन स्वरूपात घेण्याचा निर्णय सुबोधने इथे घेतलाय. त्यामुळे पंडितजी विरुद्ध खांसाहेब असा दोन व्यक्तींमधले, वृत्तींमधले, घराण्यांमधले नाट्य अधिक मोठ्या scale वर उभा राहिले आहे. कविराज ही नाटकाच्या 'गद्य' विभागात बराचसा भाव खाऊन जाणारी भूमिका इथे मर्यादित लांबीची झालेली तर नाटकात भाबडी असणारी सदाशिवची भूमिका इथे अधिक धीट, हिकमती (आणि एका प्रसंगात अतिउत्साहाच्या आणि भावनेच्या भरात स्वतःला संकटात टाकणारी) केली आहे. काही महत्वाची पदे कायम ठेवली आहेत (घेई छंद, लागी करेजवा कटार) तर कव्वाली, सूर निरागस हो ही गाणी नव्याने वाढवलेली आहेत. 'या भवनातील' हे गाणे वगळले आहे आणि त्या ऐवजी त्याच situation मध्ये वेगळे गीत घालण्याची कल्पकता दाखवली आहे.

यातल्या काही वाढवलेल्या गोष्टी खूपच प्रभावी झाल्या आहेत. 'मनमंदिरा' हे गाणे त्यातली परमोच्च गायकी आणि मशालीभोवतीचे तेजःपुंज काजवे यामुळे एका विलक्षण उंचीवर पोचते. आणखी एक आवडलेली गोष्ट म्हणजे दरबारातल्या प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी इंग्रज अधिकाऱ्याचे तिथे उपस्थित असणे. खांसाहेब आणि पंडितजी यांच्या मध्ये पध्दतशीरपणे वितुष्ट आणून 'फोडा आणि झोडा' हे धोरण राबवणे, राजाचे स्वतःचे संस्थान असले तरीही अंतिम नियंत्रण साहेबाचेच या गोष्टी सूचकपणे फार छान आल्या आहेत. कट्यारीवरचे सात स्वर आणि त्याबद्दलचे सुरुवातीचे कट्यारीचे मनोगत ही गोष्ट सुद्धा चित्रपट संगीताकडे, स्वरांकडे किती गांभीर्याने बघतोय याचीच साक्ष देणारी.

चित्रपटामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळाच्या बदलत्या पावलांची दखल घेतली आहे हे मला फार आवडले. विज्ञानाच्या प्रगतीमुळे गायकीच्या, संगीताच्या रेकॉर्ड्स निघणे.. असे काही अस्तित्वात असते याचीच कल्पना नसलेल्या सदाशिवने हरखून जात त्या ऐकत ऐकतच एकलव्याप्रमाणे दुरूनच पंडितजींच्या आवाजाचा अभ्यास करणे आणि शेवटाकडे येताना पंडितजींच्या आवाजातल्या रेकॉर्ड्स पायाखाली चिरडून खांसाहेबांनी सदशिवच्या भावनांचा आणि अप्रत्यक्षपणे पंडितजींचाच अपमान करत अधिकच छोटे होत जाणे या गोष्टींचे प्रयोजन अगदी चपखल ! शिवाय रेकॉर्ड ऐकून 'आपण अगदी पंडितजींच्या स्वरातच गात आहोत' हे कळल्यावर 'हुबेहूब पंडितजी होणे हे गौरवास्पद नाही कारण ती फक्त एक नक्कल झाली. अशाने त्या सुरांचे स्वतःच्या चिंतनातून प्रकटन करण्यात आपण अपयशी पडत आहोत' याची जाणीव सदाशिवला होणे हा चित्रपटातून मांडला गेलेला अतिशय महत्वाचा संगीतविचार !

मूळ नाटकात बरीच मोठी भर घालून हा सिनेमा साकारलेला असला तरी कुठेही 'पाणी घालून' वाढवल्याची भावना मला आली नाही. त्यामुळेच अजिबातच कंटाळवाणा झाला नाही. उलट इतके काही दाखवूनसुद्धा अजून काही गोष्टी दाखवायला हव्या होत्या असेच वाटले. 'कट्यार' १५ मिनिटे जास्त (आणि मुंपुमु-२ १५ मिनिटे कमी !! ) असता तर बरे झाले असते असे मला वाटत राहिले.

अर्थातच चित्रपटात बऱ्याच गोष्टी खटकल्यादेखील. मुळात नाटकातली आवडलेली गोष्ट म्हणजे खांसाहेब या पात्राच्या 'ग्रे शेड्स'. त्यांच्या मनामध्ये मध्ये एक अहंभाव असला, पंडितजींच्या प्रती एक ईर्ष्या असली तरी त्यांच्या व्यक्तीमत्वाबद्दल आणि गायकीबद्दल अतिशय आदर देखील आहे. उस्मान आणि चांद जेव्हा पंडितजींच्या कृष्णाच्या मूर्तीचा अपमान करू पाहतात तेव्हा ते त्यांचे कान उपटतात, तसेच वेळोवेळी पंडितजींच्या सुरांबद्द्ल आदरही व्यक्त करतात. इथे चित्रपटात खांसाहेब पूर्णपणे खलपुरूष झाले आहेत. (पंडितजीविरुद्ध कारस्थान केल्याबद्दल बायकोला तलाक देतात तोच त्यातल्यात्यात त्यांना उजळ करणारा भाग). अर्थात ते तसे का आहेत याचे सुबोधने मुलाखतीत स्पष्टीकरण देखील दिले होते. त्याच्या मते "मूळ नाटकात खांसाहेब ग्रे शेड मधले आणि सदाशिव सच्चा आणि भाबडा असा थोडा विचित्र सामना होता पण इथे पंडितजी पूर्णपणे धवल, खांसाहेब पूर्णपाणे खल आणि त्यांच्या मधोमध सदाशिव सच्चा असला तरी भाबडा नाही , उलट थोडा उतावीळच ... अशा प्रकारचा संपूर्ण रेंज मधला संघर्ष दाखवायचा होता". सुबोधच्या बाजूने स्पष्टीकरण चोख असले तरी मला मनापासून वाटते की खांसाहेब ग्रे शेड मध्ये दाखवल्याने कथानकाला जास्त खोली आली असती. खांसाहेबांच्या व्यक्तिमत्वातली द्वेषभावना फारच प्रकर्षाने आणि सदोदित दाखवत राहिल्यामुळे त्यांचे सुरांवर असणारे प्रेम, घराण्याच्या गायकीशी असणारी बांधिलकी दाखवण्यात चित्रपट कमी पडला आहे असे वाटले. (अधूनमधून खांसाहेब आपल्या घराण्याच्या गायकीची महत्ता संवादातून सांगतात खरे पण तेवढे अपुरे आहे ). पंडितजींच्या घरी जाताना बुरख्यात जाणारी झरीना सदाशिव समोर येताना बिनधास्त बुरखा - परदा वगैरे प्रकार न करता येते हेही न पचणारे... याशिवाय केवळ बायकांच्याच लक्षात येऊ शकते अशी चूक बायकोनेच दाखवल्यामुळे लक्षात आली. संपूर्ण चित्रपट मराठी वातावरणात घडत असताना पंडितजींची मुलगीच फक्त गुजराती साडीत दिसते काय माहित.

चित्रपटात पंडितजींची पूर्वपीठिका विस्ताराने दाखवल्यामुळे काही tracks, पात्रे यांच्यावर फारच अन्याय झालाय. (अर्थात कुठेतरी कात्री लागणे अटळ होते हे अगदी मान्य). कविराजाचे पात्र नाटकात काही महत्वाचे भाष्य करते. त्यातले 'कला आणि विद्या यातला फरक' हे भाष्य वगळता चित्रपटात काहीच येत नसल्यामुळे हे पात्र किती हुशार आणि विचारी आहे हे समोर येत नाही आणि त्यामुळे उलट 'कला आणि विद्या' वरचे भाष्य करतानाचा संवाद हा चपखलपणे बसल्यासारखा किंवा 'फ्लो'मध्ये आल्यासारखा वाटत नाही. असो. मूळ नाटकात चांद आणि उस्मान यांची उठ्वळासारखी संगीत साधना त्यामुळे 'आपल्याच घरात संगीतसाधनेला दुय्यम महत्व मिळते आहे, त्यावर मेहनत अजिबात घेतली जात नाही' याची खांसाहेबांना असणारी वेदना - जी त्यांची अढळ संगीतश्रद्धा दाखवते - चित्रपटात येऊ शकलेली नाही. चित्रपटात झालेल्या कथानकविस्ताराचा सर्वात मोठा तोटा जाणवला तो म्हणजे चित्रपटात अगदीच गैरहजर असलेला 'ठहराव' - pauses. अडीच तासात बरेच काही सांगायचे असल्यामुळे चित्रकर्त्यांना यावर विचार करणे शक्य झाले नसावे. पण सगळे काही पूर्वी ठरल्यासारखे घडत आहे असा फील येऊ द्यायचा नसेल तर हा ठहराव/ स्तब्धता / pause कोणत्याही नाटकात संवादांमधून आणि चित्रपटात कॅमेऱ्याच्या किंचितश्या विसाव्यामधून यायला हवा. किमान अशा संगीतविचाराच्या कलाकृतीमधून तर यायला'च' हवा. (ही उणीव खूप वेळेला मला जाणवते. अवांतर सांगायचे तर मध्यंतरी पाहिलेल्या मिस्टर and मिसेस या चांगल्या नाटकात देखील ती अतिशय प्रकर्षाने जाणवली होती).

चित्रपटाचे संगीत आणि अभिनय हे एका स्वतंत्र लेखाचे विषय ठरावेत. मुळात कट्यारच्या संगीतासाठी शंकरला घेणे हाच एक मोठा सिक्सर आहे.खऱ्या अर्थाने 'musical' ही संकल्पना इथे चपखल बसेल ! आपले ९९% चित्रपट कथानकात काडीची गरज नसताना अत्यंत अनावश्यकपणे गाणी घुसवून बनवलेले असतात. आपल्या इथली संगीत नाटकेही लोकांना गाणी ऐकायला मिळवीत अशा हेतूने त्यांच्याभोवती कृत्रिम संवाद आणि फारशी पटापट पुढे न सरकणारी कथा यांचे वेष्टण गुंडाळून दिलेली असत. पण कट्यार मध्ये एकही गाणे अनावश्यक नाही आणि एकही गाणे पाल्हाळ लावणारे नाही. चित्रपट बांधून ठेवतो त्याचे सर्वात मुख्य कारण माझ्यामते हे आहे. 'कट्यार' मध्ये नव्या जुन्याचे उत्तम मिश्रण आहेच पण वसंतरावांच्या स्वरांमधले मूळ गाणे ('लागी करेजवा कटार' की 'घेई छंद' हे आत्ता नक्की आठवत नाहीये) चित्रपटात पार्श्वभूमीवर ऐकू येणे या कल्पनेचे कौतुक करायला हवे. मला अत्यंत आवडलेले गाणे म्हणजे 'मनमंदिरा' या गाण्याच्या दोन्हीही आवृत्या - शंकरच्या गाण्यावर त्याच्या मुलाने गायलेले गाणे म्हणजे श्रीखंडाच्या जेवणानंतर खाल्लेले मघई मसाला पानच जणू. कव्वालीसुद्धा मस्तच.

खरेतर शंकरला महत्वाच्या भूमिकेत पाहून मला थोडी शंकाच वाटली होती. पण त्याने खटकणार नाही इतपत प्रामाणिक अभिनय केलाय याचे श्रेय नक्कीच सुबोधला जाते. पुष्कर श्रोत्री मला ट्रेलरमध्ये त्याची अशक्य वाईट मिशी आणि अकबराच्या दरबारातल्या काविसारखी वेशभूषा तेव्हापासूनच हास्यास्पद वाटला होता ... त्यात पुन्हा पटकथेमध्ये त्याला अगदी कमी वाव ! त्यामुळे त्याचा प्रभाव शून्य !! मृण्मयी देशपांडेचा 'पुरुषोत्तम'च्या 'पोपटी चौकट'मधला अभिनय (आणि दिग्दर्शन !) आणि टीव्हीवरच्या पहिल्याच भूमिकेतला (अग्निहोत्र) तिचा कॉन्फिडन्स पाहिला होता तेव्हाच तिचे नाणे किती खणखणीत आहे याची जाणीव झाली होती. ते नाणे इथल्या मर्यादित वाव असणाऱ्या भूमिकेत चांगले वाजले आहे. सुखद धक्का आहे तो अमृता खानविलकरचा !! यापूर्वीच्या भूमिकांमध्ये ती बर्यापैकी सहजपणे वावरली असली तरी ती काही वीणा जामकर किंवा स्मिता तांबेसारखी ताकदीची अभिनेत्री कधीच नव्हती ! झरीना ही तिच्या कारकिर्दीतली निःसंशय सर्वात महत्वाची भूमिका आहे आणि ती तिने भूमिकेचा आब राखून फारच छान उभी केलेली आहे. सुबोध भावेचा अभिनय नेहमीच जबरदस्त असतो त्यामुळे त्याबद्दल अधिक काहीच लिहित नाही. आता राहता राहिले महागुरू ! त्याबद्दल मी माझ्या फेसबुक पोस्ट वर आधी लिहिलेच होते - तेच पुन्हा लिहितो. हजारो साशंकांच्या काळज्या दूर सारत सचिनने खांसाहेबांच्या मनातला द्वेष, घालमेल, तुसडेपणा अतिशय समर्थपणे प्रकट केला आहे. शेवटच्या प्रसंगातले त्याचे हावभाव खरंच बघण्यासारखे आहे. इथले खांसाहेब नाटकापेक्षा 'लाऊड' नक्कीच आहेत. पण ती भूमिका लिहिलीच तशी गेलेली असल्यामुळे सचिनचे 'लाऊड' हालचालीदेखील फारसे खटकत नाहीत. फक्त गातानाचे त्याचे हातवारे हे शास्त्रीय गायकापेक्षा प्रेक्षकांच्या टाळ्यांकडे एक डोळा असणाऱ्या एका परफॉर्मरचे जास्त वाटतात. उलट सुबोधने कव्वालीध्ये केलेले हातवारे (त्यातले बरेचसे राहुल देशपांडेचे अचूक निरीक्षण करून तसेच वठवलेले असल्यामुळे असतील) मला अगदी एखाद्या पट्टीच्या गायकासारखे वाटले.

बरेचसे चांगले चित्रपट opening sequence मध्येच तुम्हाला बांधून घेतात, तुमचे लक्ष वेधून घेतात. कट्यारमध्ये तर पहिल्या प्रसंगाची/गीताची सुरुवात होण्याअगोदरच दोन-तीन गोष्टी विशेष लक्ष वेधून गेल्या. पहिली : बऱ्याचशा मराठी चित्रपटांची सुरुवात (त्यातून तो शहरी चित्रपट असेलच तर अगदी नेहमीच) इंग्लिश टायटल्सनीच सुरु करण्याची संतापजनक प्रथा आता पडलेली असताना इथे साधी स्वच्छ देवनागरीतली टायटल्स दिसू लागतात. दुसरी : इथे मूळ कट्यारशी संबंधित यच्चयावत कलावंत, लेखक, संगीतकार इत्यादी मंडळींची केवळ श्रेयनामावलीच दिसत नाही तर त्या सर्वांना अभिवादन देखील केलेले आहे. तिसरी गोष्ट : टायटल्स संपताना येणारी अक्षरे - दिग्दर्शक : सुबोध भावे... (दिग्दर्शनातली पहिली इनिंग असूनही) कुठल्याही चमकोगिरी करत पडद्यावर मोठ्या font मध्ये आदळत नाहीत. सहजगत्या उमटून जातात. ही दुसरी आणि तिसरी गोष्ट अगदी या चित्रपटाबद्दलची सुबोधची 'इदं न मम' वृत्ती दाखवणारीच. ती होती म्हणूनच चित्रपट जमून आलाय आणि प्रचंड उत्साहात प्रेक्षकांनी तो डोक्यावर घेतलाय !

(http://prasadgates.blogspot.in या ब्लॉगवर पूर्वप्रकाशित)

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगले लिहीले आहे .. काही गोष्टी पटल्या काही नाही .. पिक्चरबद्दल पण तेच वाटलं, म्हणजे काही गोष्टी आवडल्या काही नाही पण न आवडलेल्या गोष्टी अगदीच कमी आहेत आवडलेल्या गोष्टींच्या तूलनेत ..

"लागी करेजवाँ कटार" हे गाणं पंडीत जीतेंद्र अभिषेकींच्या आवाजातलं गाणं घेतलं आहे ..

चांगले लिहिले आहे.

प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी इंग्रज अधिकाऱ्याचे तिथे उपस्थित असणे. खांसाहेब आणि पंडितजी यांच्या मध्ये पध्दतशीरपणे वितुष्ट आणून 'फोडा आणि झोडा' हे धोरण राबवणे, राजाचे स्वतःचे संस्थान असले तरीही अंतिम नियंत्रण साहेबाचेच या गोष्टी सूचकपणे फार छान आल्या आहेत. >>>> अगदी हेच्च मी बेफिकिरांच्या लेखावर लिहिलं आहे.

कविराजचं 'कला आणि विद्या' बद्दलचं बोलणं महत्वाचं असलं तरी कविराजच्या सिनेमाभर असलेल्या वावरात ते साध्या लुगड्याला पैठणीचं ठिगळ लावल्यासारखे वाटले.

परवा डेन्वरला स्पेशल शो बघितला. सचिनने अप्रतिम काम केलेय. अम्रुता खान्विलकर्ने संयत भुमिका निभावली आहे. खासाहेबांची हतबलता मनाला भिडते.