तेथे कर माझे जुळती … २

Submitted by SureshShinde on 11 November, 2015 - 15:05

SGH.jpg

पुण्यामध्ये अनेक हॉस्पिटल्स आहेत पण त्यातील सर्वात जुने आणि बी जे मेडिकल कॉलेजशी संलग्न असलेले मोठे हॉस्पिटल म्हणजे ससून हॉस्पिटल ! डेव्हिड ससून नावाच्या एका बगदादी ज्यू व्यापाऱ्याने दिलेल्या दोन लाख रुपयांच्या देणगीमधून १८६९ साली हे हॉस्पिटल उभे राहिले. आजपर्यंत कोट्यावधी रुग्णांना या हॉस्पिटलने अविरत सेवा पुरवली आहे. आजही नव्या ससूनच्या इमारतीमागे दडलेली हि सुंदर दगडी इमारत आणि तिचा सुंदर 'क्लॉक टॉवर' आपली नजर आकर्षून घेतो. या टॉवरमध्ये आहे एक सुंदर स्मारक - महात्मा गांधी स्मारक ! १९२२ साली महात्माजींना ब्रिटीश सरकारने देश्द्रोहासाठी पाच वर्षांची कैद सुनावून पुण्यातील येरवडा जेलमध्ये ठेवले होते. दोन वर्षांनंतर जानेवारी १९२४ मध्ये पोटदुखीच्या आजारासाठी त्यांना ससूनमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथील तत्कालीन सर्जन कर्नल मुर्डोक यांनी अपेंडीसायटीस चे निदान करून तांतडीने ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. टॉवरमध्येच असलेल्या कक्षात ऑपरेशन सुरु झाले. बाहेर जोरदार पाऊस व वादळ चालू होते आणि विजांचा कडकडाट चालू होता. ऑपेरेशनच्या ऐन मध्येच मोठ्ठी वीज कडाडली आणि टॉवरवर कोसळली. हॉस्पिटलचा वीजपुरवठा बंद पडला. पण डॉक्टरांनी प्रसंगावधान राखून कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशात शस्त्रक्रिया पूर्ण केली. ससून हॉस्पिटलच्या सेवकवर्गाने मोठ्या आग्रहाने महात्माजींच्या हस्ते समोरील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करून या अविस्मरणीय प्रसंगाची आठवण चिरंतन केली.

अनेक वर्षे निघून गेली. सुमारे १९६५ चा सुमार असेल. ससूनमधील जुन्या इमारतीसमोरील 'त्या' झाडावर एक सुशिक्षित तरुण चढून बसलेला दिसत होता. जवळून पहिले असता त्याच्या हातामध्ये जनावरांना देतात तशा प्रकारची इंजेक्शनची सिरींज दिसत होती आणि तो युवक त्या सिरीन्जने त्या झाडाला कसलेसे इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करीत होता. सकाळपासून संध्याकाळपर्यंतच नव्हे तर बरेच दिवस त्याचा हा उद्योग चालला होता. त्या युवकाचे नाव होते डॉ. एम जे नरसिम्हन ज्युनियर आणि तो बी जी मेडिकल कॉलेज मधील शरीरशास्त्र विभागामध्ये व्याख्याता म्हणून काम करीत होता. त्याचे आजोबा प्रो. एम जे नरसिम्हन सिनियर हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वनस्पतीआजार तज्ञ असून पेनिसिलिन निर्मितीसाठी प्रसिद्ध 'हिंदुस्थान एन्टीबायोटिक्स' मध्ये संशोधन प्रमुख होते. तर त्याच्या वडिलांनी वृक्षांना होणाऱ्या बुरशी आजारासाठी 'HAMYCIN' नावाचे औषध शोधले होते. आपला युवक हेच औषध त्या प्रसिद्ध झाडाला देवून त्याला जीवघेण्या बुरशीच्या आजारापासून वाचविण्याचा प्रयत्न करीत होता. आजूबाजूच्या चेष्टेखोर नजरांकडे दुर्लक्ष करून, त्या जीर्ण झालेल्या वृद्ध खोडामध्ये पुन्हा नवजीवन आणण्याचा प्रयत्न करीत होता.

त्याच सुमारास ससून हॉस्पिटलमधील वॉर्ड क्रमांक १४ मध्ये आणखी एक नाट्य घडत होते. ह्या वॉर्डच्या युनिटचे प्रमुख होते प्रख्यात निदान-निष्णात डॉ. सी आर सुळे ! त्यांच्या युनिटची 'ओपीडी'चा वार असे बुधवार, म्हणजे बुधवारी भरती झालेले सर्व आंतररुग्ण डॉ. सुळे युनिट च्या देखरेखीखाली दाखल होत. ससूनमध्ये प्रत्येक दिवशी सुमारे तीस ते पस्तीस रुग्ण मेडिकल युनिटमध्ये भरती होत असत. युनिटमधील रेसिडेंट डॉक्टर्सनी ह्या रुग्णांची तपासणी करून, केस पेपर्स लिहून त्यांची औषधयोजना अंमलात आणावयाची असते. शिवाय सर्व रुग्णांची प्राथमिक रक्त व लघवी तपासणीदेखील वॉर्डच्या डॉक्टर्सनीच करण्याची पद्धत असे. एव्हडे सर्व काम करताना बऱ्याच वेळा डॉक्टरांना ओपीडी इमर्जन्सीच्या दिवशी अक्षरशः चोवीस तास काम करावे लागे. वॉर्डमध्ये मध्यरात्री चहा पीतपीत जागरण करावे लागे. पण ही एक प्रकारे नवीन शिकण्याची संधीच असे.

असाच एक बुधवार …
डॉ. सुळे युनिटची इमर्जन्सी फारच हेवी गेली होती. मेल व फिमेल वॉर्डात मिळून तब्बल पन्नास अॅडमिशन झाल्या होत्या. ज्युनियर आणि सिनियर असे सर्वच जण दमले होते. पण सुळे सरांना राऊंडसाठी गबाळग्रंथी स्टाफ मुळीच आवडत नाही हे माहित असल्यामुळे प्रत्येकजण व्यवस्थित तयार होवून तयार होवून राऊंडसाठी सरांची वाट पाहत असे. नेहेमीप्रमाणे त्या गुरुवारी सिनियर रेसिडेंट डॉ. जोशी सरांची गाडी येताच त्यांना सामोऱ्या गेल्या.
"गुड मॉर्निंग,सर !"
"व्हेरी फाईन मॉर्निंग, विद्या !"
सुळे सर सर्व स्टाफला प्रथम नावाने आणि अतिशय आपुलकीने संबोधित असत.
"कसा होता कालचा दिवस ?" सर.
"खूपच हेवी इमर्जन्सी होती सर ! तब्बल पन्नास अॅडमिशन्स !"
"विशेष काय ?"सर.
"सर, विशेष म्हणजे काल एकाच गावातील दहा जण एकच कंप्लेनट्सने आलेत."
विद्या बोलत असताना सर थोडे थबकले, डोळ्यांवरील चष्मा काढून हातात घेतला व एखादया फलंदाजाने येणाऱ्या चेंडूची वाट पहावी तसे ते कान टवकारून ऐकू लागले.
"एकच तक्रार, एक गाव ,… काही साथ बीथ तर नाही न ?" सर.
"तक्रारही थोडी विचित्रच आहे, सर्वांना प्रमाणापेक्षा जास्त तहान लागतेय आणि जास्त युरीन होतेय. त्यातील दोघांच्या शरीरातील पाणी कमी होवून बीपी कमी झाले होते त्यांना आयव्ही फ्लूईडस द्यावे लागले. याच तक्रारींनी गावातले दोघे दगावले म्हणत होते !"
"तहान लागणे, लघवी जास्त होणे म्हणजे डायबेटीस ! युरीन शुगर किती ? युरीनमध्ये किटोन्स पाहिलेस का ? ब्लड शुगरचे काय ?" सरांचा आवाज आता गंभीर झाला होता.
"सर, आश्चर्याची गोष्ट आहे, देअर इज नो शुगर इन द युरीन !"
"तुझ्या त्या नवीन ज्युनियर रेसिडेंटनी युरीन शुगर नीट तपासून पहिली का ? या नवीन पोरांना युरीन तपासण्याचे महत्व कळत नाही म्हणून म्हटले." सरांनी अनेक पावसाळे आणि अनेक कामचुकार डॉक्टर्स पहिले होते याची जाणीव होत होती.
"नाही सर, मी स्वतः युरीन चेक करून घेतली माझ्यासमोर !"

असे बोलत बोलत सर वॉर्ड जवळ येवून पोहोंचले. दरवाज्याजवळच्या टेबलवर कोट अडकवून सरांनी राऊंडला सुरुवात केली. सर्व पेशंटच्या तक्रारी ऐकून ते स्वतः पेशंट तपासत असत. प्रत्येक पेशंट आपला आजार काय आहे ते त्याच्या भाषेत सांगत असतो, डॉक्टरने ते मनःपूर्वक ऐकून त्याचा आपल्या ज्ञानानुसार वैद्यकीय परिभाषेत अनुवाद करणे म्हणजेच निदान करणे असे सरांचे सांगणे असे. "Just listen to the patient !" हे सरांचे घोषवाक्य ससूनमध्ये प्रसिद्ध होते. अर्थात डॉक्टरकडे वेळ आणि ज्ञान या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत.
या सर्व पेशंटच्या तक्रारी जवळ जवळ त्याच होत्या. सुरुवातीला एक दोन दिवस ताप आला होता. भूक गेली होती आणि काहींना उलट्या देखील होत होत्या. काहीजण प्रमाणापेक्षा जास्त घाबरले होते. सर्वांना दिवसाकाठी सातआठ तर रात्री पाचसहा वेळा मिळून पाच ते सहा लिटर लघवी होत होती. झोप न मिळाल्यामुळे त्रासून गेले होते तर अंगातील क्षार कमी झाल्यामुळे काहींना कमालीचा अशक्तपणा जाणवत होता. आपली लघवी काही रंगद्रव्यांमुळे पिवळी दिसते पण यांची लघवी अतिशय डायल्यूट असल्यामुळे पाण्यासारखी दिसत होती. युरीनची स्पेसिफिक ग्रॅव्हीटी अर्थात विशिष्ठ घनता जी नेहेमी १०१० पेक्षा जास्त असते ती पाण्याइतकीच म्हणजे १००१ होती.

राऊंड संपवून सर टेबल जवळ येवून बसले, सर्व स्टाफ भोवताली उभा होता.
" विद्या, या विचित्र आजाराच्या पेशंटच्या निदाना विषयी तुमचे काय मत आहे ?"
"सर, मला प्रथमतः यांनी काही तरी डाययुरेटिक (लघवी जास्त होण्याचे औषध ) घेतल्याचा संशय आला होता. पण ते तशी हिस्टरी देत नाहीत. "
"अगदी बरोबर ! पण अन्नामध्ये भेसळ झाली असण्याची किंवा केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही." सर.
ज्युनियर डॉक्टरांकडे वळून सर म्हणाले, " डायबेटीस अथवा मधुमेह या शब्दाचा अर्थ काय ? "
उत्तरादाखल ज्युनियरने मन खाली वळवली.
मग सरच पुढे बोलू लागले," डायबेटीस किंवा मेह याचा शब्दशः अर्थ आहे प्रमाणापेक्षा जास्त लघवी होणे. मधुमेह अथवा डायबेटीस मेलीटस याचा अर्थ गोड व जास्त लघवी होणे. पण या पेशंटांच्या युरीनमध्ये साखर नाही म्हणजे गोडवा नाही, नुसतीच बेचव आहे, पाणचट आहे असे म्हणावे लागेल. म्हणजे यांना 'उदक-मेह' आहे. इंग्रजीमध्ये या आजाराला म्हणतात 'डायबेटीस इंसीपिडस' ! " एव्हडे बोलून सरांनी बाहेर जाण्यासाठी कोट हातात घेतला. निदान-महर्षी सुळे सरांनी 'सिक्सर' मारली होती व क्षणभर सर्व स्टाफ अवाक् होवून उभा होता.
"डॉ. विद्या , या सर्व पेशंट्सची हिस्टरी व्यवस्थित लिहून काढा. प्रत्येकाचा वॉटर इनटेक व आऊटपुट व्यवस्थित ठेवा. रुटीन इन्व्हेस्टीगेशन्स पूर्ण करा. कदाचित अशा प्रकारचे आणखी जास्त रुग्ण येण्याची शक्यता आहे. तुम्ही आजच वेळ काढून लायब्ररीमध्ये जावून अशा प्रकारचे काही केस-रिपोर्ट्स सापडतात कि काय याचा शोध घ्या. हा विषय सामाजिक दृष्टीने महत्वाचा असल्यामुळे डीनसाहेब यांच्याशी देखील चर्चा करावी लागेल "

आपले शरीराच्या वजनाचा सुमारे ६५% हिस्सा हा पाण्यामुळे असतो आणि हे प्रमाण, रक्ताची विशिष्ठ घनता व आम्लता (pH) हे सर्व काही केमिकल्सद्वारे आपला मेंदू नियंत्रित करीत असतो. त्यांनाच हार्मोन्स असे म्हणतात. रक्ताच्या घनतेमधील सूक्ष्म बदलदेखील समजू शकणार्या विशिष्ठ पेशी (Osmoreceptors) मेंदूमधील हायपोथॅलमस या भागात असतात. शरीरातील पाणी कमी झाल्यास या पेशी तहानेची संवेदना जागृत करतात व शरीराची पाण्याची गरज भागविली जाते. पण जर पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसेल तर मात्र दुसरा उपाय म्हणजे लघवीवाटे शरीराबाहेर पाणी कमी करणे. अशा वेळी याच पेशी मेंदूमधील हार्मोन्स तयार करणाऱ्या शीर्ष-ग्रंथीस (Pituitary gland ) जागृत करून मूत्ररोधक संप्रेरक (Anti Diuretic Hormone ) रक्तात सोडतात. हे हार्मोन मूत्रपिंडास लघवीचे प्रमाण कमी करावयास लावते व शरीरातील पाण्याची बचत करते. काही आजारामुळे शीर्ष-ग्रंथीमध्ये हे हार्मोन तयार होणे बंद झाल्यास 'उदकमेह' हा आजार होतो. काही औषधे अथवा विषारी पदार्थ यांचा मूत्रपिंडामधील पेशींवर विपरीत परिणाम झाल्यामुळे देखील 'उदक्मेह' सद्दृश आजार निर्माण होवू शकतो. आपल्या सर्व पेशंटनां असेच काहीतरी झाले होते. अर्थात याप्रकारे होणारा आजार हा काही दिवसांतच आपोआप बरा होणारा असतो हि त्यातल्या त्यात आशादायक बातमी होती.

अशा आजाराचे आणखी पेशंट येण्याबद्दल सुळे सरांनी वर्तवलेली भविष्यवाणी खरी ठरली आणि त्याच दिवशी याच तक्रारी घेवून त्याच गावातून आणखी पन्नास रुग्ण ससूनमध्ये अॅडमिट झाले. डीन साहेबांनी खास सूचना पत्रक जारी करून अशा रुग्णांसाठी एक नवीन वॉर्ड उघडला व डॉ. सुळे यांच्यावर सर्व जबाबदारी सोपवली. परिस्थितीचा आढावा घेवून चर्चा करण्यासाठी डीन सरांनी सर्व विभागप्रमुखांची एक खास बैठक आयोजित केली. सुळे सरांनी या बैठकीमध्ये या आजाराविषयी सर्व माहिती दिली. हा आजार काही विषबाधेमुळे व बहुतेक बाधित धान्यामुळे झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली.
या वेळी रोगप्रतिबंधक आणि सामाजिक वैद्यकीय विभागाचे प्रो. डॉ. एन एस देवधर हे बोलण्यास उभे राहिले. अशा प्रकारच्या साथीच्या आजारांविषयी त्यांचा अभ्यास आणि अनुभव दांडगा होता.
ते म्हणाले, "मित्रहो, या आजाराविषयी व अशा प्रकारच्या साथीविषयी मला असलेली माहिती मी सांगू इच्छितो. डॉ. विश्वनाथन यांनी वीस वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील बोटा या गावामधून अशाच प्रकारची साथ आल्याचे रिपोर्ट केले होते. सुमारे एक हजार रुग्णांना हा असाच आजार झाला होता. सुदैवाने कोणीही दगावले नव्हते. त्यांच्या मते हा आजार व्हायरसमुळे झाला होता. या आजाराला सुरुवात तापाने झाली असल्यामुळे मला स्वतःला देखील हा एक नवीन व्हायरस आजार असावा असे वाटते."
"जरूर असू शकेल. आपल्याच शहरामध्ये असलेल्या NIV या राष्ट्रीय विषाणू संस्थेमध्ये रक्ताचे नमुने पाठविण्याची व्यवस्था करू या." डॉ. सुळे.
इतका वेळ मागे बसून सर्व चर्चा ऐकणारे डॉ. एम जे नरसिम्हन बोलण्यासाठी उभे राहिले. त्यांच्याविषयी असलेल्या आदरामुळे ते काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा वळल्या.
"मी डॉ. सुळे सरांशी सहमत आहे. जर धान्य व्यवस्थित साठवले नसेल आणि साठवणीच्या जागी ओलसरपणा असेल तर त्या धान्यात बुरशी वाढते. हि बुरशी अनेक प्रकारची विषे तयार करते. बाजरीवर पडलेल्या अर्गट रोगामुळे कितीतरी लोकांना हातपाय गमवावे लागलेले आपणास ज्ञात आहेच. अशाच प्रकारच्या बुरशी-विषामुळे (Mycotoxin - Aflatoxin) लिव्हरचा कर्करोग होतो हेही सिद्ध झाले आहे."
"पण हा आजार बुरशीविषामुळे झाला आहे हे सिद्ध कसे करणार? त्यासाठी आधी त्या गावी जावून प्रत्यक्ष परिस्थितीचा अभ्यास करावयास हवा." देवधर म्हणाले.
चर्चा बरीच रंगली. शेवटी डॉ. देवधर व नरसिम्हन यांच्यासह एक पथक जुन्नर येथे पाठविण्याचे ठरले. हळूहळू या आजाराचे रुग्ण येणे बंद झाले. म्हणजेच हि विचित्र साथ एकदाची संपली होती. सुमारे एकशे पन्नास लोकांना ही लागण झाली होती. सुदैवाने ससूनमध्ये कोणीही दगावले नाही. व्हायरस तपासणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सर्व पेशंट बरे होवून घरी परतले. जुन्नरला गेलेल्या पथकाने सर्व पेशंटच्या अन्नाचा अभ्यास करून हा आजार जर बाधित धान्यामुळे झाला असेल तर ते धान्य बाधित बाजरी असण्याचा दाट संशय व्यक्त केला होता. वरकरणी पाहता ती बाजरी खराब दिसत नव्हती अथवा तिचा वास देखील येत नव्हता. बाजरी धुतल्यानंतर त्या पाण्यात कोठलेही जंतू सापडले नव्हते. पण डॉ. नरसिम्हन यांनी चिकाटी सोडली नाही. कदाचित बुरशी बाजरीच्या दाण्याच्या आत असू शकेल म्हणून त्यांनी बाजरीच्या दाण्याच्या गाभ्याचा अभ्यास केला. आणि काय आश्चर्य ! त्या कल्चरमध्ये अनेक वेळा एकच प्रकारची बुरशी सापडली व तिचे नाव होते Rhizopus nigricans ! ही बुरशी रंगाने काळी असते व सामान्यतः पावावर (bread) वाढलेली दिसते म्हणून तिला ब्रेड-मोल्ड असेही म्हणतात.

आता या बुरशीने हा आजार होतो हे सिद्ध करणे आवश्यक होते. नाहीतर कोणत्याही वैद्यकीय नियतकालिकात हा शोध निबंध स्वीकारला जाणे शक्य नव्हते. नरसिम्हन यांना तर तर हे संशोधन 'Lancet' या महत्वाच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्याची इच्छा होती. त्यांनी प्रो. गानला यांचे सहाय्य घेवून स्विस पांढऱ्या उंदरांवर हा प्रयोग करण्याचे ठरवले. उंदरांचे दोन गट केले. एकाला बुरशी तर दुसऱ्या गटाला केवळ पाणी पिण्यास दिले. अपेक्षेप्रमाणे, बुरशी प्यालेले सर्व उंदीर दोन दिवसांतच आजारी पडले. या बुरशी गटातील उंदीर दुप्पट लघवी करू लागले, मलूल झाले व कोणत्याही औषधांशिवाय चारसहा आठवड्यानंतर पुन्हा चांगले झाले. अशाप्रकारे डॉ. एम जे नरसिम्हन यांनी ही साथ बाजरीतील बुरशीबाधे मुळे झाल्याचे सिद्ध केले होते.

lancet.jpg

१९६७ साली हे संशोधन ल्यान्सेट या जर्नलमध्ये 'ससून हॉस्पिटल सिंड्रोम' या नावाने प्रसिद्ध झाल्यामुळे सर्वश्री सुळे, देवधर, नरसिम्हन आणि गानला ससूनच्या इतिहासामध्ये आपला ठसा उमटवून गेले.

माझ्या एम् डी च्या पदवीसाठी श्री डॉ. सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षे काम करण्याचे भाग्य मला लाभले याचा मला सार्थ अभिमान आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!

Mastch Happy

रॉबिन हुड +१००

आज सकाळीच लेख वाचला होता.

सध्या माबोवर चाललेल्या गोंधळात तुमचा आणि स्वीट टॉकर यांचा लेख वाचुन खुप छान वाटले!

वेळात वेळ काढून लिहीत रहा.

वाह, डॉ. साहेब - अनेक प्रकारची (वरवर किचकट वाटणारी) वैद्यकिय माहिती तुम्ही इथे किती सहज सोपी करुन देताय ....
याशिवाय तुमच्या गुरुजनांविषयीचा सार्थ आदरही व्यक्त करीत आहात - खरोखर तुमचे लेखन एक विशेष प्रकारचा निर्मळ आनंद देते, ज्ञानात भर घालते आणि वैद्यकिय क्षेत्रातली अधिकाधिक माहिती मिळवण्यास उत्सुक करते ...

अनेकानेक शुभेच्छा....

कृपया असेच अजून लेख लिहित रहावे ही नम्र विनंती..

सुरेख वाचनीय लेख..नेहमीप्रमाणेच! तुमच्या लेखातून नेहमी काहीतरी नवीन शिकायला मिळते. Diabetes = मेह आणि diabetes mellitus = मधुमेह हा फरक नव्याने कळला.

Pages