"तीट कवितेला - कविता क्र.३ - मन चकव्याचे फूल"

Submitted by संयोजक on 18 September, 2015 - 13:19

गुलमोहरात पूर्वी काय काय लिहिलंय हे बघत असताना आम्हाला कवितांचा एक खजिनाच सापडला. काही वाचलेल्या, काही न वाचलेल्या, तर काही वाचलेल्या असूनही परत वाचताना वेगळाच अर्थ गवसलेल्या. अशा कित्येक सुंदर कविता, काळाच्या... आपल धाग्यांच्या उदरात गडप झाल्या आहेत. आता हा खजिना शेअर केल्याशिवाय आम्हाला राहवतय थोडच?
पण नुसता त्या त्या कवितेचा दुवा देण्यापेक्षा एक उपक्रम घेतला तर? ह्या कवितेला तुम्ही शेवटच्या कडव्यानंतर एक कडवं जोडायच. थोडक्यात ती कविता समजून घेऊन, त्यातल्या कल्पनांचा विस्तार करून आणि अर्थातच स्वतःचा स्वतंत्र विचार करून आणखी एका कडव्याची रचना करायची, बरोबरच कवितेला एक नवीन नावही सुचवायच. कशी वाटतेय कल्पना?

यात कवी/ कवयित्रीच्या प्रतिभेशी बरोबरी करायचा किंवा त्याच्या कलाकृतीला जरासाही धक्का लावायचा हेतू नाही. फक्त कवी/ कवयित्रीच्या प्रतिभेला दाद देउन आपल्याला अशीच रचना करायची वेळ आली तर आपण कसा विचार करू याचा एक खेळीमेळीत अंदाज यावा आणि उत्तमोत्तम कविता पुन्हा वाचल्या जाव्यात इतकाच उद्देश आहे.

नियम:
१. या उपक्रमा अंतर्गत आम्ही मायबोलीवर पूर्व प्रकाशित कविता, कवी/ कवयित्रीच्या नावासकट प्रकाशित करू. त्या कवितेच्या शेवटी तुम्हाला एक कडवं रचायच आहे आणि त्या कवितेला एक नवीन नावही सुचवायच आहे.
२. या उपक्रमात रोज एक नवीन कविता देण्यात येईल.
३. कडवं आणि नाव दोन्ही सुचवणे आवश्यक आहे.
४. तुमचं कडवं आणि नाव इथेच प्रतिसादात लिहा.
५. एका प्रतिसादात एकच कडवं लिहिण अपेक्षित आहे.
६. एक आयडी कितीही वेळा या उपक्रमात भाग घेऊ शकतो.

आजची कविता:

मूळ नाव: मन चकव्याचे फूल
कवयित्री: श्यामली
कवितेची लिंक: http://www.maayboli.com/node/5556

मन एक सान पक्षी
मन रानभर नक्षी
मन पिसारा पिसारा
मन मोठाच पसारा

मन भीती मन प्रिती
मन भुणभूण किती
मन आठवे साठवे
पुन्हा जुनेच नव्याने

मन कैरीची गं फोड
नाही कसलीच तोड
मन साजण साजण
गाली चढते तोरण

मन माय मन तात
मन सखीचा गं हात
मन जखम जखम
मन घालते फुंकर

मन भास मन त्रास
लक्ख उजेडाची आस
मन चकव्याचे फूल
पुन्हा पुन्हा देई हूल

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मन चांदणी

मन चांदणी चांदणी
लुकलुक करीती आठवणी
मन आकाश आकाश
मन आठवणींचे पाश.

शिर्षक: डोह

मन खोलखोल डोह
त्याचा पडे मला मोह
जाते शोधाया मी थांग
मग आसवांच्या संग

भुईकमळ, डिंपल, कविन-
छान आहेत रचना!

भुईकमळ- अप्रतिम!

एकदम चैत्रात कोवळ्या पानांनी पालवलेला पिंपळ डोळ्यासमोर आला.
मस्तच.

हा जरठ पिंपळ-
image_16.jpg

हा चैत्रात पालवलेला-
image_15.jpg

साती, भारी आयडीया..... चित्रावरुन चारोळी आहेच यंदा.... कवितेवरुन चित्र असे काहीतरी घेतले पाहिजे पुढच्या वर्षी!

वॉव! साती सुंदर प्रचिती .पिंपळपान खरच माझं खूप लाडकं आहे त्याची प्रत्येक अवस्थेतल रूप शब्दात ,रंगात चित्रात पाहयला खूप आवडतं.
आजची तुमची चारोळी खऱ्या अर्थाने नवदोत्तरी आहे, त्याला डोकं हवं , स्मित

हो.
हा आमच्या हॉस्पीटलच्या आवारातला पिंपळ आहे.
मागे मी 'उर्द्वमूलंअधःशाखम' म्हणजे काय ते कुणालातरी दाखवायला हा फोटो काढून ठेवला होता.

वा..वा ! एक पेक्षा एक रचना..!
एक प्रश्न.."मायबोली गणेशोत्सव २०१५ " च्या पानावर "तीट कवितेला - कविता क्र.२,३ .." चा दुवा का नाही दिसत?

कवितेचे शीर्षक - प्रतीक्षा
मन प्रतीक्षा प्रतीक्षा
जुन्या नव्या स्वप्नांची
कधी आतुर अस्थिर
कधी नि:संग निर्मोही