"तीट कवितेला - कविता क्र.१ - अगा पांडुरंगा ..."

Submitted by संयोजक on 16 September, 2015 - 14:21

गुलमोहरात पूर्वी काय काय लिहिलंय हे बघत असताना आम्हाला कवितांचा एक खजिनाच सापडला. काही वाचलेल्या, काही न वाचलेल्या, तर काही वाचलेल्या असूनही परत वाचताना वेगळाच अर्थ गवसलेल्या. अशा कित्येक सुंदर कविता, काळाच्या... आपल धाग्यांच्या उदरात गडप झाल्या आहेत. आता हा खजिना शेअर केल्याशिवाय आम्हाला राहवतय थोडच?
पण नुसता त्या त्या कवितेचा दुवा देण्यापेक्षा एक उपक्रम घेतला तर? ह्या कवितेला तुम्ही शेवटच्या कडव्यानंतर एक कडवं जोडायच. थोडक्यात ती कविता समजून घेऊन, त्यातल्या कल्पनांचा विस्तार करून आणि अर्थातच स्वतःचा स्वतंत्र विचार करून आणखी एका कडव्याची रचना करायची, बरोबरच कवितेला एक नवीन नावही सुचवायच. कशी वाटतेय कल्पना?

यात कवी/ कवयित्रीच्या प्रतिभेशी बरोबरी करायचा किंवा त्याच्या कलाकृतीला जरासाही धक्का लावायचा हेतू नाही. फक्त कवी/ कवयित्रीच्या प्रतिभेला दाद देउन आपल्याला अशीच रचना करायची वेळ आली तर आपण कसा विचार करू याचा एक खेळीमेळीत अंदाज यावा आणि उत्तमोत्तम कविता पुन्हा वाचल्या जाव्यात इतकाच उद्देश आहे.

नियम:
१. या उपक्रमा अंतर्गत आम्ही मायबोलीवर पूर्व प्रकाशित कविता, कवी/ कवयित्रीच्या नावासकट प्रकाशित करू. त्या कवितेच्या शेवटी तुम्हाला एक कडवं रचायच आहे आणि त्या कवितेला एक नवीन नावही सुचवायच आहे.
२. या उपक्रमात रोज एक नवीन कविता देण्यात येईल.
३. कडवं आणि नाव दोन्ही सुचवणे आवश्यक आहे.
४. तुमचं कडवं आणि नाव इथेच प्रतिसादात लिहा.
५. एका प्रतिसादात एकच कडवं लिहिण अपेक्षित आहे.
६. एक आयडी कितीही वेळा या उपक्रमात भाग घेऊ शकतो.

आजची कविता:

मूळ नाव: अगा पांडुरंगा ...
कवी: विशाल कुलकर्णी
कवितेची लिंक: http://www.maayboli.com/node/48300

किती आळवावे स्मरावे तुला मी पुन्हा चित्त बेभान व्हावे अता
भुलावे जगाचे किती पांडुरंगा मनाचे मला भान व्हावे अता

नसे शुद्ध गंगा न पावन किनारे नको मोक्ष आता नको स्वर्ग ते
तुझ्या उंबर्‍याचा मिळो कोपरा ’मात्र’ जगणेच आख्यान व्हावे अता

पुन्हा देहकोशी धुमारे फुटावे किती पापणीने लवावे पुन्हा
तुला मी पहावे भजावे पुजावे, जळो दंभ हा, ज्ञान व्हावे अता

नको चंद्रभागा न भीमा हवी मज उराशी हवा वेदनाडोह तो
तुझे स्पर्श माझ्या अभंगास जैसे सुखाचेच सोपान व्हावे अता

मला भावते ती जनी नामयाची सखी भाबडी रे तुझी सावळ्या
भले ती अडाणी..., तिची एक ओवी, झणी दूर अज्ञान व्हावे अता

नसे मी तुकोबा, नसे मी विसोबा, नसे भक्त गोरा विठू मी तुझा
भिकारी प्रभो मी तुझ्या पायरीचा असे आस ’उत्थान’ व्हावे अता

जरी सर्व देतोस पृच्छेविना तू तरी आर्त माझ्या मनी ते उरे
पुन्हा मागणे मागतो हे अनंता जगाचेच कल्याण व्हावे अता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कवितेचे शीर्षक - विज्ञान! नको

कवितेचे शीर्षक - विज्ञान!

नको ती प्रमेये नको सिद्धता अन नको भूमिती रेखल्या आकृत्या
तुझ्या भौतिकाचे अनोखे रसायन तुझे ज्ञान विज्ञान व्हावे अता

साती, मस्त!
शीर्षक - प्रार्थना
असे आस ज्यांना अवताराची तुझ्या, असे कोटी जन जे तुला पूजिती
प्रकटूनी त्या कोटी हृदयांत देई अवताराची तुझ्या अनुभूती अता

गझल- रदीफ-काफिया. त्यात बारा डब्यांच्या गाडीइतकं लांबलचक सुमंदारमाला (हे मला ओळखता आलेलं किंवा आठवलेलं नाही. मायबोलीच्या अधिकृत गीतकाराने सांगितले)

साती, मान गये!

पृथ्वीचे प्रेमगीत पण याच वृत्तात आहे. म्हणजे मला आता वृत्तं लक्षात नाहीत पण त्याच चालीत ही विशालची कविता म्हणता येतेय.

कवितेचे शीर्षक - मागणे
नको प्रतिष्ठा,पैसा अन कीर्ती जरा..संवेदनशीलता दे तू मना
अन्नदाता हा इथला उपाशी मरे समृद्ध त्याला करावे अता

शीर्षक - तूच तू

तुला भेटलो मी इथे याच देही, कशाची आता आस नाही मना
पुरा धन्य झालो तुझी साद येता सुखानेच प्रस्थान व्हावे अता

शीर्षक : भेटशील का?

किती सोहळे अन किती सोवळे ते, किती साहशी रे रुढींच्या पिडा
क्षणी मुक्त हो देऊळा त्यागूनी तू, तुझ्या भेटीची आस लागे अता

पुन्हा शांततेचे सूर संगीत युद्धाच्या रक्तरंजित बातम्या पुन्हा
कुणी समजावे, शिकवावे, सुधारावे, नव्या कृष्णाने अवतरावे अता

शीर्षक : जगाच्या कल्याणा...

असे घोर निद्रेत काहीतरी मी बरळता म्हणे रागवोनी प्रिया
'मरो ती सदाची जगाची उठाठेव, पाणी उठोनी भरावे अता!'

Light 1 Proud

शीर्षकः- तूच हवास

अखेरचे एक मागणे आता रे, नको याहुनि आणिक काही दुजे
तूच हवास मज, ये मिठीत घेण्या आस एकचि मम हॄदयी वसे

निर्वासित
पहावे तिथे बंद जाळ्या आता मी, कसा वाचवू जीव व्याकूळला
तराफे समाधी, शरीरे किनारी पाषाण फुटला धडा घे अता!