घर, परिसर, झाडं वेली, पशु पक्षी इत्यादि! : १) बोक्या, मनी आणि मॉस्किटो नेट

Submitted by मानुषी on 7 November, 2008 - 02:56

माझ्या स्वयंपाकघराला लागून पूर्वेकडे एक छोटीशी पॅसेजवजा खोली आहे. तिथे धुणंभांडय़ाची मोरी व कपडे वाळत घालायचा स्टँड आहे. या पॅसेजला फ़क्त चार फ़ुटी भिंत आहे व वर छतापर्यंत मोठी लोखंडी ग्रिल आहे. या ग्रिलपलीकडे शेजार्‍यांची गच्ची आहे. हे सगळं मला रोज ओटय़ाशी काम करताना दिसतं. कारण ओटयावर एक मोठी खिडकी सुद्धा आहे.
तर शेजार्‍यांच्या गच्चीत एक सिन्टेक्सची निळ्या रंगाची पाण्याची टाकी आहे. या टाकीच्या खाली दोन सुन्दर मांजरं नेहेमी येऊन बसत. त्या दोघातला एक काळा स्टाउट असा बोका होता व गोरी भुरकी सुन्दरी.... ती मनी होती... हे अस्मादिकांच्या लगेच ल़क्षात आलं......कारण अस्मादिकांचा "प्राणिमात्र" या विषयाचा बर्‍यापैकी अभ्यास आहे.
DSCN1726.jpg
तर हळूहळू या बोक्या व मनीमध्ये विचारांची देवाण घेवाण सुरू झालेली मला ऐकू येत होती व दिसतही होती. आपल्या सीसीडी, बरिस्ता किंवा वैशालीत जसं मंडळी समोरासमोर बसून तासन् तास गप्पा मारतात, तसंच काहिसं हे दृश्य होतं. ही टाकी या मंडळींची आवडती "हँगाउट प्लेस" होती.
या निळ्या सिन्टेक्सच्या टाकीला आपण सोयीसाठी एनएसटी(सीसीडी च्या चालीवर) म्हणू. तर या एनएसटीखाली निवांतपणे समोरासमोर बसून हे दोघे अगम्य व चमत्कारिक भाषेत तासन् तास जुगलबंदी चालू ठेवत. कुणाला वाटेल हे भांडताहेत की काय? कारण वेगवेगळ्या आवाजात वेगवेगळ्या लयीत (अगदी वेगवेगळ्या तालात व रागात असं म्हणायला सुद्धा माझी हरकत नाही.)ही जुगलबंदी चाललेली असते. कधी खूप वरची पट्टी लागल्यामुळे कुणाचा आवाज चिरकतो सुद्धा! कधी एकमेकांवर फ़िस्कारून ओरडताहेत की काय...असाही कुणा अज्ञानी पामराचा गैरसमज होण्याची शक्यता! कधी तर.... हे दोघे बसलेले असतात एकमेकासमोर.....योग्य अंतर ठेऊन(सेफ़ डिस्टन्स).......पण एकमेकांकडे न पहाता ही जुगलबंदी चालू ठेवतात. दोघांनी कुठे तरी लांब तिसरीकडे शून्यात नजर लावून सूर लावलेला असतो. पण महाराज....... गैरसमज नको...........हे प्रणयाराधन आहे! कोर्टशिप्!
तर यथावकाश या एनएसटीखालच्या भेटीगाठींचं पर्यावसान (मार्जार कम्युनिटीतल्या कस्टम्सनुसार) मनीबाईसाहेबांच्या बाळंतपणात झालं! हे बाळंतपण शेजार्‍यांच्या आवारात झालं अशी बातमी आली. मनी व बोक्या काही काळासाठी अदृश्य ‍ झाले. आता हळूहळू परिसरातून नवजात मार्जारबालकांचे पिपाणीसदृश, बारीक बारीक आवाज यायला लागले.
काही काळानंतर असं लक्षात आलं की ओटा/डायनिंग टेबलावरचा खाद्यपदार्थ गायब होतोय. या मागे दुसर्‍या तिसर्‍या कुणा परकीय शक्तीचा हात नसून मनी आणि बोक्याच आळीपाळीने लोखंडी ग्रिलमधून स्वयंपाकघरात यायचे आणि डल्ले मारायचे. जास्त करून मनीच यायची. बाळंतीण असल्याने ती अगदी कायम वखवखलेली असायची. अगदी कणकेचा गोळाही तिच्या तावडीतून सुटलेला नव्हता. दुधाच्या पातेल्यावरील जाळी तोंडाने हळूच बाजूला सारून आवाज न करता दूध फ़स्त करण्यात तिचा हातखंडा होता. जाळी शक्यतो खाली पडून आवाज होणार नाही याची ती दक्षता घेत असे.
शेवटी आम्ही(आम्ही म्हणजे मी व माझा मुलगा....आम्ही दोघेच या घरात प्राणीमित्र आहोत. पण त्या दोघांनी...अर्थातच नवरा व मुलगी...यांनी आम्हाला प्राणीवेडे ही पदवी बहाल केली आहे.) ग्रिलच्या कठडयावर एक वाडगा ठेवून त्यात त्या बिचार्‍या मनी साठी दूध ठेवायचं ठरवलं! बिचारी बाळंतीण होती ना! बिचारीने अगदी कणीक सुद्धा खाल्लेली पाहून तर माझ्या अगदी पोटात तुटलं! पण आता तीन्ही त्रिकाळ कठड्यावरील वाडग्यातलं दूध फ़स्त करूनही मनीने डल्ले मारणं चालूच ठेवलं.
इथपर्यंतही मला फ़ार काही वाटलं नाही. पण एका स्वच्छ सुंदर आणि मंगलमय अश्या सुप्रभाती स्वयंपाकघराचं पॅसेजमध्ये उघडणारं दार उघडून मी पॅसेजमध्ये गेले तर माझा पाय अत्यंत अपवित्र अश्या एका सेमीलिक्विड गोष्टीवर.......नाही.....गोष्टीत पचकन पडला. पॅसेजमधल्या पायपुसण्यावर मनी/बोक्याने घाण करून ठवली होती. मी नाक दाबून, एका पायावर लंगडी घालत पायपुसणं उचलून संडासात नेलं, फ़्लश केलं, स्वच्छ धुवून वाळत घातलं. वाळल्यावर परत पॅसेजमध्ये नेऊन घातलं.
रोजच हा कार्यक्रम रिपीट व्हायला लागला. मग मी ते पायपुसणंच तिथून हलवलं. तरी त्या जागेवर घाण असायचीच. सकाळी उठून रोज घाण काढण्याच्या कार्यक्रमाचा वैताग आला होता. आता त्या सुंदर मनी आणि हँडसम बोक्याचा मला अस्सा संताप आला होता......माझे हात दोघांना रट्टे घालण्यासाठी नुस्ते शिवशिवत होते.
आता मी सतत मनी/बोक्याचाच विचार करू लागले. माझ्या मनात नुस्ती विचारांची उलथापालथ चालू होती! त्या दोघांना(अर्थातच नवरा व मुलगी) माझं अस्वस्थ वागण पाहून दुसरीच शंका यायला लागली. त्यांना वाटलं माझ्या मनावर परिणाम झालाय. ते दोघे विचित्र नजरेने माझ्याकडे पाहू लागले आणि माझ्याशी विनाकारण सहानुभूतीयुक्त वागू लागले. कारण काही दिवस तर मी पहाटे लवकर उठून स्वयंपाकघरात बसून राहू लागले व सारखी मांजरांवर पाळत ठेवू लागले. त्याचाही काही उपयोग झाला नाही.
शेवटी आम्ही(अर्थातच मुलगा व मी) रोज पहाटे (मांजरांची प्रातर्विधीची वेळ पहाटेची असणार असं गहित धरून) लुईला फ़िरायला नेण्याऐवजी वर पॅसेजमध्ये ठेवावं का असाही विचार केला. लुई हा आमचा अती लाडाने बिघडलेला लॅब्रेडॉर! त्याला नक्की केंव्हा वर आणायचं.....तो एवढा मोठा लुई ..एवढयाश्या पॅसेजमधे किती वेळ बसणार ......मांजर नक्की कधी शी करणार........वगैरे बरेच महत्वाचे प्रश्न अनुत्तरित राहिल्याने लुईला वर आणण्याचा ऑप्शन रद्द झाला.
या प्रकारात अजूनही एक शंका मनात होतीच.........समजा लुईने मनी/बोक्याचं एनकाउंटरच केलं तर?ते आम्हाला नको होतं. आम्हाला फ़क्त मांजरांना पळवून लावायचं होतं.
हा लुई जेव्हा खालच्या अंगणात त्याच्या टेरिटरीत सुखेनैव संचार करीत असतो तेव्हा ही मांजरे जर इकडून तिकडे गेलेली जर त्याला दिसली तर हा नुस्ता जिवाच्या आकांताने भुंकून त्यांच्यावर धावून जातो. पण त्याची टेरिटरी म्हणजे, आमच्या अंगणाचा एक मोठा तुकडा, जाड तारांच्या कुंपणाने बंदिस्त असल्याने तो नुस्ता येणार्‍या जाणार्‍यांना फ़क्त पाहू शकतो व अर्थातच त्यांच्यावर धाऊनही जाऊ शकतो. पण कुणाला धरू शकत नाही. मग रात्री मात्र आम्ही त्याला पूर्ण आवारात मोकळे सोडून देतो. थोडे विषयांतर - लॅब्रेडॉर इतका प्रेमळ व फ़्रेंडली असतो की आम्ही म्हणतो, "जर रात्री चोर आला तर हा त्याचं चांगलं आगत स्वागत करेल व म्हणेल, .....या या चोरभाऊ........घर आपलंच आहे........काय काय चोरताय बोला!" असो.
तर शेवटी मनी/बोक्याचे खाद्यपदार्थांवरील डल्ले व पॅसेजमधील शी ला कंटाळून आम्ही एक निर्णय घेतला. आमच्या इंजिनिअर मित्राला बोलावून पॅसेजमधल्या ग्रिलला छोटी लोखंडी जाळी बसवायला सांगितली. तो म्हणाला ..."आपण संपूर्ण घराला मॉस्किटो नेटच लावू. म्हणजे मांजरच काय डास सुद्धा येऊ शकणार नाहीत".
अश्या रितीने त्या ग्रिलला मॉस्किटो नेट लागलं. संपूर्ण घरच डासप्रूफ़ व मांजरप्रूफ़ झालं व माझ्या रोजच्या शी काढण्याच्या कार्यक्रमाची सांगता झाली. अगदी हुश्य झालं!
...............................................थांबा थांबा.......गोष्ट संपली नाही अजून!
माझ्या किचनच्या पूर्वेला हा जसा पॅसेज आहे तसेच पश्चिमेला एक छानसं सिटाउट (sitout)आहे...... ओपन टू स्काय! आम्ही तिथे सकाळी आरामात बसून चहा पितो. या सिटाउटमध्ये गच्चीतून येणारा जिना उतरतो. हळूहळू असं लक्षात आलं की याच जिन्यावरून आता मनीने आणि बोक्यानेही उतरायला सुरवात केली आहे. आता घर मांजरप्रूफ़ झालं या विचाराने मी निर्धास्त होते. पण या दोघांनी आपले मार्गच बदललेले होते. आधी पूर्वेकडून ग्रिलमधून येणारी मण्डळी आता पश्चिमेकडून जिन्यावरून यायला लागली होती. कधी चुकून माकून काही उघडं राहिलं तर पुन्हा डल्ले सुरू झाले.
पण आता मी हारणार नव्हते. कारण मी वेल् इक्विप्ड् होते. कारण सिटाउटकडून आल्यावर आता त्यांना ग्रिलमधून पळून जाता येणार नव्हते. कारण ग्रिलला नेट बसले होते. आणि लवकरच एके दिवशी ....अखेर तो क्षण आलाच...........!
एके दिवशी मी ओटयाशी काम करत होते. मनी गच्चीतून येणार्‍या जिन्याने खाली आली.. सावधपणे तिने सिटाउट ओलांडलं ...स्वयंपाकघरात शिरली.... तिला अनपेक्षितपणे मी दिसले.....अत्यंत चपळाईने ती तशीच पॅसेजमधे शिरली.........आता ग्रिलमधून पळून जायचं या बेतानं! मी तिथे नसते तर डायनिंग टेबलावरच्या शिर्‍यावर तिने नक्कीच ताव मारला असता. मी ठरवलंच होतं मनात..... त्याप्रमाणे पटकन पॅसेजचं दार व ओटयावरची खिडकी लावून घेतली.
बाहेर पॅसेजमध्ये मनीला दगा फ़टक्याची जाणीव झाली होती. तिची धावपळ सुरू झाली होती. तिने कठडयावर उडी मारून ग्रिल चाचपडायला सुरवात केली. पण ग्रिलला मॉस्किटो नेट बसलेले असल्यामुळे तिचा नेहेमीचा खुष्कीचा मार्ग बंद झाला होता . आता ती आपल्या नख्यांचा वापर करून नेटवर चढू लागली.....कुठे सुटकेचा मार्ग सापडतोय का पहायला! हे सगळं मी ओटयावरच्या खिडकीच्या फ़टीतून पहात होते.DSCN1727.jpg
याच ग्रिलला मी एक जाड पडदाही लावलेला आहे. कारण मी ओटयाशी उभी असते तेव्हा मी पूर्वाभिमुख असते.(माझ्या नवर्‍याने माझ्या स्वयंपाकात सुधारणा व्हावी म्हणून असंख्य प्रयत्न केले त्यातलाच हा एक--- वास्तुशास्त्राप्रमाणे स्वयंपाक करणारीचं तोंड जर पूर्वेला असेल तर तिचं मन नेहेमी प्रसन्न रहातं व तिचा स्वयंपाक चवदार होतो असं म्हणतात.)तर पूर्वेकडून डायरेक्ट डोळ्यावर येणारा प्रखर उजेड टाळण्यासाठी या पडद्याचा मी उपयोग करत असे. आता मनी या पडद्यामागे जाऊन लपली होती. बहुतेक आपल्या सुटकेचं प्लॅनिन्ग करत असावी.
छान... अगदी मनासारखी सिच्युएशन जमून आली होती.......! मी माझ्या मुलाला विजयी मुद्रेने आणि हर्षोत्फ़ुल्ल आवाजात पाचारण केले. त्यालाही एव्हाना किचनमधील समरप्रसंगाची जाणीव झालेली होती. त्याला मी कॅमेरा घेऊन बोलावलं. तो आला.......कॅमेर्‍यासहवर्तमान ओटयावर चढला. ओटय़ावरील खिडकीच्या फ़टीतून मनीवर कॅमेरा रोखू लागला. खिडकी जास्त उघडता येईना कारण कोंडलेलं मांजर समोरच्यावर हल्ला करू शकतं म्हणे! आणि या खिडकीखालच्या गॅस सिलेंडरची एक पायरी करून मनीला या खिडकीतूनही डायरे़क्ट ओट्यावर यायची चांगली प्रॅक्टिस होती........म्हणून ती खिडकी जास्त उघडणे योग्य नव्हते!!
मध्येच ती कपड्यांच्या स्टँडवरून लोंबणार्‍या कपड्यांच्या खाली जाऊन बसून सुटकेचा विचार करत होती.
एव्हाना घाबरलेल्या मनीच्या तोंडून मियाँव मियाँव या मार्जारवाणीऐवजी काही दुसरेच चमत्कारिक आवाज निघू लागले होते. आता ती कपडयांच्या स्टँडवर उडी मारून चढली व ओटय़ावरील खिडकीच्या फ़टीतून आमच्याकडे पाहू लागली. तिने स्वता:च्या सुटकेसाठी खूप धडपड केली होती. पण सगळे रस्ते बंद होते. हळू हळू भेसूर आवाज काढून रडू लागली. मग मात्र आम्हालाच तिची दया आली. वाटलं बिचारीला खूप झाली आता शिक्षा. शेवटी आम्ही पॅसेजचं दार हळूच उघडलं.... तशी ती जीव घेऊन आल्या वाटेने ......स्वयंपाकघर........सिटाउट.......जिना.........गच्चीमार्गे सुसाट पळून गेली. त्याचेच हे जमतील तसे घेतलेले फ़ोटो.
त्यानंतर मनी/बोक्या दोघेही माझ्या घराचा रस्ता विसरले बहुतेक!! कारण परिसरात आजूबाजूला दिसायचे पण माझ्या टेरिटरीत फ़िरकले नाहीत त्यानंतर. बहुतेक मनीने बोक्याला सांगितलं असावं, "बोक्या, झालं एवढं बास झालं रे बाबा.........आता परत तिकडे फ़िरकायचं नाही बरं का! फ़ारच डेंजर दिसतात ते लोक! कोंडून घालतात वर फ़ोटोही काढतात! जर हे फ़ोटो आपल्या मार्जार कम्युनिटीत सर्क्युलेट झाले तर आपली काय इज्जत राहील समाजात, सांग बरं?"
DSCN1722.jpgDSCN1723.jpgDSCN1719.jpgDSCN1717.jpg

गुलमोहर: 

लिखाण आणि फोटो, दोन्हीही छान. मनीचे डोळे कसले चमकतायत.
पहिला फोटो पाहिला तेव्हा एकदम आवडली. पण जसं जसं घाण साफ करण्याचं वर्णन आलं तसतशी आवडेनाशी झाली. Wink काय करणार, प्राणीमात्रांबद्दल दुरुन सहानुभूती आहे पण घरी आणून पाळण्याची कल्पनाही सहन होत नाही.
>>>(माझ्या नवर्‍याने माझ्या स्वयंपाकात सुधारणा व्हावी म्हणून असंख्य प्रयत्न केले त्यातलाच हा एक--- वास्तुशास्त्राप्रमाणे स्वयंपाक करणारीचं तोंड जर पूर्वेला असेल तर तिचं मन नेहेमी प्रसन्न रहातं व तिचा स्वयंपाक चवदार होतो असं म्हणतात.)
Proud झाला मग वास्तुशास्त्राचा उपयोग? Wink

लै भारी. मांजर हा माझ्या आवडीचा विषय. अगदी धमाल आली वाचून. आमच्या घरी नेहेमी २-३ तरी मांजरे असतातच. त्यामूळे मनी आणि बोक्याचा संवाद एकदम परिचयाचा. ते शुन्यात नजर लावुन बसणे तर लै भारी Happy लहानपणी आम्ही खूप हसायचो या रागदारीला Uhoh

मांजरी जर खूप घाबरली किंवा अस्वस्थ झाली तर इकडे-तिकडे फिरत भरा-भरा खूप सगळी घाण करते हे माहिती असेलच Wink

मस्त लिहिलय! Happy

पण मग पिल्लं? ती कुठे नेली तिने? कधी नेली?? का शेजार्‍यांच्या आवारात अजून बाडबिस्तारा आहे पण तुमच्याकडेच येत नाही??

माझ्या लहानपणी मी सुद्धा मांजरवेडी होते, अजुन आहे पण आमच्या नवरोबांना आवडत नाही म्हणुन घरी पाळता येत नाहीत. माझ्या बहीणीच्या घरी असतात. हा सगळा संवाद, रोमान्स, पिलं झाल्यानंतरची आपली जबाबदारी (बोक्या फार वाईट असतो ना!) सगळं तुझ्या लेखानं जागं केलंस. मनीनं बोक्याला सांगितलेलं वाचु सॉलीड हसले. फोटो तर क्या बात है च ...

सर्वांचे आभार.
सायो वास्तुशास्त्राचा काही परिणाम झाला का हे नवरोबांना विचारायला हवे. आणि प्राणी पाळण्याचं म्हणशील तर लहानपणी माझ्या सायकलीला एक पिशवी असायची व जवळच सरकारी गुरांचा दवाखाना होता........तर घरातली पाळीव व परिसरातली कुत्री मांजरे माझ्या पिशवीत असायची. त्यांना या दवाखान्यात फुकट उपचार करून करून घेण्यासाठी!

सिन्ड्रेला......घाबरलेलं मांजर कशी धावपळ करून घाण करून ठवतं या.. या डोळ्यांनी समक्ष पाहिलेलं आहे. कित्ती मज्जा असते ना मांजरांचं निरिक्षण करण्यात!
आय टीगर्ल
एवढ्यात मनी/बोका माझ्या घरी आलेले नाहीत. पण दिसतात अधून मधून. व पिल्लावळ फिरते आहे परिसरात.आणि बाडबिस्तरा तूर्तास शेजार्‍यांच्या आवारातच आहे. शेजार्‍यांच्या मुलांनी त्यांना छान एका खोक्यात जुनी चादर वगैरे दिली आहे!
पल्ली एक मांजर/कुत्रा पाळून टाकच......लहान मुलांचा(व वडिलांचाही) बौद्धिक व भावनिक विकास उत्तम होतो....हे कारण दे........!
चिनू थँक्स!

आणि हो २ नं च्या फोटोत एनएसटी(अर्थात निळी सिन्टेक्सची टाकी) पाहिलीत का?

आमच्या घरचे मान्जरही असेच दिसते... .. मान्जर तसे स्वच्छताप्रिय असते.. पण 'दिवस गेले ' की स्वच्छतेचे 'दिवस जातात' .. आमचा अनुभवही असाच आहे...

फोटो आणि लिखाण दोन्ही मस्त.
हे वाचुन मला आमच्या शेजार्‍यांच्या मांजरीची आठवण झाली. तिच्या रोज घाण करण्याच्या सवयीला कंटाळुन त्यांनी तिला त्यांच्या शेतावर सोडले होते. पण १५ दिवसांत ती तेथून परत आली होती, १७ किमी अंतर चालत.

मस्तंच. माझ्यापण खूप आठवणी जागृत झाल्या. चार मांजरं पाळली होती लहानपणी. Happy

दोन्हीही मस्तच. अटीतटीचा प्रसंग सुरेख. प्राणीमित्रांचे असेही हाल होतात हे माझ्या मेहूणीमुळे माहीत आहे. तिच्या घरात माणसापेक्षा कुत्रेच जास्त आहेत व तिची अर्धी इनकम तेच खातात. यात कुत्रा ही एकच जात तिला अभिप्रेत आहे. तिच्या फॅशन डिझाईनिंगला त्याचा अधून मधून बराच दातभार लागतो.

फोटो आणि लेखन दोन्ही मस्त.
मनीचे डोळे भन्नाट आले आहेत फोटोत.

मस्त लिहिलय. वाचताना फार मजा आली.

मस्त लिहिलय.. Happy
पण ते मांजर जरा डेंजर दिसतय.. as in त्याचे डोळे पिसाळल्यासारखे दिसतायत.. !!!!

ऍडमा, तुला पिसाळलेल्या मांजरीचा अनुभव आहे वाट्टे Wink

बाकी, चिडलेली मांजर अशीच दिसते, अगदी जन्मापासून आपल्या घरी असली तरी.

मस्त लेख, mmm3... फोटोही सुरेख. मनीने शेवटी बोक्याला सांगितलेलं अगदी आवडलं.

ऍडॅम ते मांजर तसं डेंजर नाही बरं का........खूप क्यूट आहे........पण कॅमेर्‍याच्या फ्लॅशमुळे त्याचे डोळे फक्त चमकतायत.
ऍडॅम, दाद, स्मिता, ज.म्.प्यारे, मीना, आस, सायुरी, कौतुक सर्वांचे आभार्.......कौतुक.......दातभार.........आवडलं !

.

मानुषी, तो फोटो चिडलेल्या मांजरीचा नाहिये ते कळतय. तीने फक्त म्यांव करायला तोंड उघडलय.

बादवे चार मांजरबाळे आहेत आईविना. कोणाला दत्तक घ्यायचय ?

अरे, हे पण भारी लिहिलंय की - मांजरांचं तू केलेलं निरीक्षण जबरदस्तच - तुलाही आता "सीझर मिलान"सारखं कॅट व्हिस्परर किंवा मनी गुर्गुरर सुरु करता येईल असं वाटतंय...... बघ, खूप डिमांड असेल या मनी गुर्गुररला .......
लेखनशैली एकदम म्याँव.......

मानुषी, सगळा प्रसंग माझ्या डोळ्यांपुढे उभा राहिला. आणि मनीचे -बोक्याचे वर्णन अगदी पर्फेक्ट! असेच ताला-सुरात ते बोलतात आणि अशा अनेक गमती जमती असतात. आमच्याकडे मी आणि माझ्या मुली आम्ही मार्जारप्रेमी आहोत पण नवरा नाही. त्याच्या मते मांजरं हरामखोर असतात. आणि कुत्री चांगली असतात. पण सर्व अवगुणांसकट मला मांजरं आवडतात. शाळेत असताना ज्या मुलीला मांजर आवडतं ती जरा खास मैत्रीण असायची!
खूप आवडला लेख.

तिच्या फॅशन डिझाईनिंगला त्याचा अधून मधून बराच दातभार लागतो.>>>>>> Lol

रश्मी आणी शशांक
तेव्हा मला पिकासावरून फोटो अप्लोडायचं माहिती नवहतं. त्यामुळे जुने सगळे लिखाणातले फोटो गायबलेत.

Pages