बाबुल मोराsss

Submitted by दाद on 30 July, 2009 - 00:03

राजू हवालदिल झाला होता. अजून आपण नक्की काय करायला हवं, त्याला कळेना. बाबांचे आता काहीच तास उरलेत हे कळल्यावर, त्याने आधी विजूताईशी संपर्कं साधायचा प्रयत्नं केला. ती फोनवर भेटणं किती शक्य नाही ते पूरेपूर माहीत असल्याने, तिच्या कडे तर तार केलीच आणि शिवाय अहिरे काकांच्या गावातल्या घरीही केली. विजू काम करीत होती त्या आदिवासी वस्तीहून कुणी आलच तर त्यांच्याच घरी पहिला मुक्काम असतो.... तेव्हा तोच एकमेव मार्गं विजूताईला कळवण्याचा... आता फक्तं वाट बघायची.

संध्यामावशी, विमल मावशी, अण्णामामा, बाबू-काका, काकी, सतीश... सगळे येऊन भेटून गेले. बाबांचे ब्रिज क्लबमधले दोस्त, त्यांच्याबरोबर फिरायला जाणारे, कट्ट्यावरचे मित्रं... आठवून आठवून राजूने सगळ्यांना कळवलं. अगदी जुन्या बंगल्यातल्या माळ्यालाही. तो बाबांचा चहा-मित्रं.
आईच्या मागे बाबांनी राजू-विजूला कसं वाढवलं त्या सगळ्या सगळ्याचा साक्षीदार. बंगल्यातच रहायचा. अनेकदा बाबांच्या रागापासून त्यानं राजू-विजूला वाचवलेलं.

संध्याकाळी कधीतरी राजूचा मोबाईल वाजला.
"हॅलो, विजूताई? विजू? हॅलो... हॅलो" एव्हढच बोलू शकला. अतिशय खराब रिसेप्शन होतं, प्रचंड खरखर करीत दोनदा फोन कटही झाला. राजूला खात्रीच पटली की, फोन विजूचाच... तिला कळलय आणि तीच आपल्याला फोन करायचा प्रयत्नं करतेय. त्यानंही एक दोनदा प्रयत्नं केलाच होता.

गेले काही दिवस एकट्यानं सगळं धकवून नेताना राजूला जाणवलं नव्हतं ते ओझं... विजूचा नुस्ता फोन आल्याबरोबर... ते ओझं राजूला आता जाणवायला लागलं. विजू, त्याची मोठी बहीण.
कुणी जीवा-भावाचं येणार, तिच्याशी बोलू शकेन, दु:ख वाटून घेऊ शकेन... हे जाणवताच राजूला धीर तर आलाच पण आपण अतिशय दमलोय हे जाणवलं. हातातच फोन धरून तो लॉबीतल्या खुर्चीत बसला. मागे डोकं टेकून त्याने डोळे मिटले. एक प्रचंड थकवा डोक्यापासून साऱ्या शरीरातून पसरत गेला.

मनातल्या मनात त्याने विजूताईच्या खांद्यावर मानही ठेवली... अगदी लहानपणी ठेवायचा तश्शी. हट्टं करून तिच्याबरोबर तिच्या आवडीचे, पण त्याला कंटाळवाणे पिक्चर बघायला जायचा. कधीतरी झोप अनावर व्हायची तेव्हा खांद्यावर मान ठेवायचा तशीच अगदी. बसने गावी मावशीकडे दोघेच्यादोघे जातानाही... कधीतरी लुडकणारी त्याची मान विजू हाताने सावरून परत आपल्या खांद्यावर ठेवतेय, हे झोपेतच कळायचं.

म्हणायला मोठी बहीण पण... मोठा भाऊ, किंचित आई, बरीचशी मैत्रिण.... असलं सगळच असणारी त्याची विजूताई.
हवेतल्या हवेत टल्लू भोवरा फेकून अलगद आपल्या हातात ठेवणारी विजू, आपल्याला तासनतास बॉलिंगची प्रॅक्टीस देणारी विजू, आई गेल्यावर स्वयंपाक घरात लुडबुडत बाबांना मदत करणारी विजू... आई गेल्यावर पहिल्यांदाच, आपल्याला सोडून कॉलेजच्या कॅम्पला गेली असताना, आपण शाळेतून आल्यावर कावरेबावरे होणार हे माहीत असल्यानं, आठवणीने रोज फोन करणारी विजू, अनेकदा बाबांच्या तावडीतून सोडवणारी विजू, सुरेखाच्या भानगडीत... रागावून का होईना पण आपल्याला सावरणारी विजू, आपल्याला हर तर्‍हेनं मोठं करण्यासाठी धडपडणारी विजू...

राजू किती वेळ विचारात क्लांन्त होऊन बसला होता कुणास ठाऊक... एक विलक्षण थरथर हातात जाणवून दचकला... जागा झाला....आणि हसला.

मोबाईल फोनची थरथर... वाजत होता... विजूचाच असणार. काय दोन क्षण मिळतिल त्यात तिला सांगूया... की जमलं तर ये, गं.. म्हणजे जमवच.. येच. बाबा अगदी वाट बघतायत... बहुतेक फक्तं तुझ्यासाठी थांबलेत.

"हॅलो,... हॅलो विजू... अगं बाबा ना..." अतिशय एक्साईट होऊन राजू तिला कसंतरी करून ऐकू जावं म्हणून जोरजोरात बोलत होता. डेस्कवरच्या नर्सने "श्शूऽऽऽ..." म्हटलं.
त्याच्या लक्षातच आलं नाही. खरतर ह्यावेळी फोनवर रिसेप्शन व्यवस्थितच होतं. आवाज व्यवस्थित ऐकू येत होता.
"हॅलो, किलवर राजे काय म्हणता", विजूचा स्पष्टं आवाज, नेहमीची मायेची हाक ऐकून राजूला आता मात्रं हुंदका फुटला... हातात फोन घेऊन तो लोकांपासून दूर, कॉरिडोरच्या टोकाला जाऊन उभा राहिला.
"अरे... अरे असं काय करतोस. अजून मोठा झालाच नाहीस काय? अरे राजा, सगळं जबाबदारीने तर केलस... करतोयस. तूच माझा मोठा भाऊ शोभशील...
बरं, आता सांग... बाबा कसे आहेत?", विजूने त्याच्या नेहमीच्या शांत स्वरात विचारायला सुरूवात केली.
तिचा आश्वासक स्वर ऐकून राजूही स्थिरावला.

"विजा, बाबा... बाबा काहीच तास आपल्यात... असं डॉक्टरांनी परवाच सांगितलं. मी.. मी... लगेच तुला तार केली आणि अहिरे काकांकडे पण निरोप ठेवला ना... तुला कळवा..."

"अरे, हो.. हो. कळलं म्हणूनतर फोन केलाय... आणि काळजी करू नकोस. मी येतेय... कधीच निघालेय... कळल्या बरोब्बर. खरतर अजून चारेक तासात पोचेन सुद्धा..."

राजूचा आपल्या कानांवर विश्वास बसेना. ’विजू, खरच पोचतेयस? लवकर ये.. मी वाट.. बघतो.. आणि बाबांना सांगतोच...’

फोन कट झाला. राजू बाबांकडे धावला.

शुद्धी-बेशुद्धी च्या तळ्यात-मळ्यात करणार्‍या बाबांना, जवळ जाऊन त्याने सांगितलंही.
"बाबा, ...विजूला कळवलय, बाबा. ती येतोय... तिचा फोन आला होता, आत्ताच... बाबा... ऐकलं का? विजू येतेय",
शुद्ध-बेशुद्धीत ये-जा करणारे, फारसं काही ओळखत नसलेले, राजू-विजू अन मोजक्याच आठवणी सोडल्यास, बाकी काहीच आठवत नसलेले बाबा विजूच्या नावानेच सजग झाले... चेहर्‍यावर ओळख दिसली.. किंचित हसू ओठांवर आलं आणि परत बेशुद्धीत गेले.

*****************************************************
बाबांच्या बेडच्या बाजूच्या खुर्चीत पेंगणार्‍या राजूला, मधे मधे नर्स येऊन बाबांना बघून जात होती ते कळत होतं. पण विजूताई येतेय हे नुस्तं कळल्यावरच अर्धा भार नकळत अजून न पोचलेल्या विजूच्या खांद्यावर टाकून राजू अनेक दिवसांनी किंचित शांत मनाने पडला होता.

किती झालं तरी, बाबा आणि विजूचं जास्तं सख्य होतं. बाप-मुलीचं असतच म्हणतात. बाबांसारखीच गाण्यांची दर्दी, विजू. बाबांचं आणि तिचं अध्यात्मासारख्या... कसल्या कसल्या विषयांवर बोलणं चालायचं.

खांद्यावर हाताचा उबदार स्पर्श, कानाशी दोनच बांगड्यांची किणकिण... स्वप्नात की खरं? राजू दचकून उठला. नेहमीचं हसत, कमरेवर हात घेऊन, मान वाकडी करून त्याच्याकडे बघत... विजूताई समोर उभी....
राजूने सरळ तिच्या कमरेला मिठी मारली, गच्चं. अगदी लहानपणी शाळेतून आल्यावर मारायचा तश्शी.
एरवी, त्याला दूर करून, ’इस्पिक राजे... नुस्तेच वाढलात. लहानपण गेलं नाही अजून...’ असलं काहीतरी म्हणाली असती, विजा. पण ह्यावेळी त्याला गच्चं मिठीत घेऊन त्याच्या गदगदणार्‍या पाठीवरून नुस्ताच हात फिरवत राहिली.

मग अलगद बाबांच्या जवळ बसली. त्यांचा सलाईन टोचलेला हात तिनं हळूवारपणे हातात घेतला. त्यावर थोपटत अतिशय मायेनं भरल्या स्वरात हाक मारली, "बाबा... बाबा. डोळे उघडताय ना? बाबा... मी विजू. जाग आली असेल तर डोळे उघडा बघू...."

महत्प्रयासाने झापड दूर सारत बाबांनी डोळे उघडले... आणि त्यांना त्यांची विजू दिसली.
विजू अगदी लहान असताना, वर्षा रविवारी सकाळी तिला आपल्या पोटावर ठेवायची... इवल्या हातांनी थापट्या मारीत... आपल्याला उठवणारी विजू आठवली बाबांना. वर्षा गेल्यावर एकदम समजुतदार झालेली विजू.... जमेल तसा स्वयंपाकघराचा ताबा घेतलेली, लहानग्या राजूला संभाळणारी...
मध्यंतरीच्या काळात, ती कॉलेजात असताना आपल्याला मलेरिया झाला. तेव्हाही थंडी वाजून येताना, सगळ्या अंगातून हीवाने हाडन-हाड वाजताना, मोठ्ठी गादी आपल्या अंगावर टाकून आपल्याल गच्च धरून ठेवायचा प्रयत्नं करणारी...
गाणं शिकणारी, रोजचा रियाज करणारी विजू...
बाबुल मोरा... ह्या ठुमरीचा अर्थं समजून घेताना रड रड रडली होती... मग तिची ती गाण्यांची वगैरे डायरी घेऊन त्यात ’बाबांच्या शब्दांत’ असा अर्थं लिहून घेणारी.
आणि अर्थं कळल्यावर जीव ओतून गाणारी विजू...
अनेक दिवस तर लग्नच करणार नाही असं ठामपणे म्हणणारी.... पण मोठी झाल्यावर, लग्नं होऊन सासरी जाताना मात्रं, न रडता आपलेच डोळे पुसणारी.....
स्वत:चा भरला संसार उध्वस्त झाल्यावरही ठाम उभी, विजू... आपली शहाणी बाळी....
त्याच आठवणींच्या उबदार स्पर्शाने बाबा पूर्ण जागे झाले. नजर खोलीभर भिरीभिरी होऊन पुन्हा विजूवर स्थिर झाली.

"बाबा, कसं वाटतय? खूपच दुखतय का? वेदना होतायत का?", विजूनं विचारलं. राजू पलंगाच्या दुसर्‍या बाजूला येऊन बसला.

बाबांनी नकारार्थी मान हलवली आणि हाताशी असेलला मॉर्फिनचा ट्रिगर हलवून दाखवला... नकळत त्यांचे डोळे भरून आले.
कोण आता माझ्या मागे ह्या दोघांना? राजूचं तर अजून सगळंच व्हायचय. विजूच्या आयुष्यालाही अजून काही अर्थं मिळवून द्यायचाय... कसा काढणार उभा जन्मं ही एकटी? मला माहीतीये एकटेपणाचं दु:ख.... राजू समजदार आहे, जबाबदारीने सगळच करतोय...
दोघं एकमेकांना आहेत... पण माया करणारं, प्रसंगी दटावणारं, वाट दाखवणारं मोठं कुणी नाही...

मनाची तगमग वाढली तसा, बाबांचा श्वास वाढला, वेदनाही वाढल्या.

अतिशय जोर लावून, खूप प्रयत्नांनी ते काहीतरी करायचा प्रयत्नं करीत होते.
राजूला कळेना. "बाबा, काय हवंय? काय करू? नर्सला बोलावू?"

बाबांनी नकारार्थी मान हलवली. विजूने राजूचा हात आपल्या हातात घेतला, आणि दोघांच्याही हातावर बाबांचा क्षीण, सुरकुतलेला हात ठेवला... बाबांनी होकारार्थी मान हलवली. डोळ्यातलं पाणी आता अलगद उशीवर ओघळलं. राजूला दोन्ही हातांतली ऊब जाणवली.

"बाबा, तुम्हा काळजी करू नका. आम्ही दोघं नीट राहू. आपला राजू मोठा झालाय आता. माझीसुद्धा काळजी घेईल, तो. आम्ही अगदी व्यवस्थित राहू...", विजाचा स्थिर आवाज अजूनही हलला नव्हता. राजू तिच्याकडे बघत राहिला. हे इतकं डोंगराएव्हढं काळीज कसं हिचं? मरणाच्या दारात बाबा असूनही ही अजून जराही हलली नाहिये?

विजूने आपला हात काढून घेतला, राजूचाही हात दूर केला. बाबांच्या डोळ्यांमधलं पाणी तिनं आपल्या ओढणीनं निपटलं. बाबांचे दोन्ही हात एकत्रं आणून त्यांच्या छातीवर ठेवले. मग दोन क्षण थांबून ती बोलली.

"बाबा, तुम्ही निश्चिंत मनाने जा...", विजू असं म्हणाली आणि राजूला चटका बसला. काय बरळतेय ही?

"विजा.....", ओरडत त्याने विजूचा खांदा हलवला. विजू एकटक बाबांच्या डोळ्यात बघत बोलत राहिली.

"बाबा, तुम्ही मला जे शिकवलत तेच आज तुम्हाला सांगतेय. आपल्यातल्या प्रत्येकाच्या जन्मापासून आपल्या बरोबर चालतोय, तो. आपण हवं तेव्हा, हवी तशी त्याची फरपट केली. आपल्याला हव्या त्या गावी आपल्याबरोबर मुकाट वणवण फिरला तो... असा आपला सखा... मृत्यू. एकदाच. फक्तं एकदाच तो आपल्या खांद्यावर हात ठेवतो... तो शेवटचा एक प्रवास, त्यानं हाताला धरून कौतुकानं, ओढून नेऊन करवलेला... त्याला नाही म्हणू नका, बाबा. घुटमळू नका, आता....
मी, राजू.... आमच्यातून मन काढा तुमचं.’

तिनं मान वर करून राजूकडे बघितलं. त्याला डोळे भरून आल्यानं विजूचाच काय बाबांचाही चेहरा दिसेना.
’बाबा, तुम्हाला आठवतं? आई गेली तेव्हा मला किती-कशा प्रकारे समजावलत? माणूस असतं म्हणजे काय, जातं म्हणजे काय? तुम्ही दिलेली शिकवण, तुमचं बोट धरून केलेला आजवरचा आयुष्याचा प्रवास... हेच तुमचं असणं, बाबा. ती शिदोरी कुणीच आमच्याकडून हिसकावून घेऊ शकणार नाही... अगदी काळही नाही. तुमचं आमच्यातून जाणं होईलच कसं मग?’
राजू विस्फारल्या डोळ्यांनी तिच्याकडे, बाबांकडे बघत होता. आपण शब्दं ऐकत नसून नुसताच अर्थंच आपल्या डोक्यात उमटतोय, मनात झिरपतोय असं वाटायला लागलं त्याला.

विजूचा आवाज किंचित चढला होता. राजूच्या चेहर्‍याकडे एकदा बघून पुन्हा शांत स्वरात ती बोलू लगली.

’बाबा, आयुष्यात काय मिळवलं, काय गमावलं? ह्याचा ताळा करण्याची ही वेळ नाही.
आयुष्याचं गणित मांडण्याची जबाबदारी आपली नाही. तो हिशेब त्यानं ठेवायचा... पदरात पडलेली प्रत्येक जबाबदारी प्रसाद मानून मनोभावे पूर्णं केलीत, तुम्ही... हीच शिकवण आम्हाला दिलीत.... आता... आता त्या शिकवणीपासून तिळभरही हलण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला नाही...."

बाबांनी अगदी क्षीण मान हलवली. तरी त्यांना न जुमानता डोळ्यांमधून आसवं ओघळलीच. विजूने आपली शबनम उचलली आणि त्यातली तिची गाण्यांची डायरी काढली. त्यातलं एक पान उघडताच, खुणेला ठेवलेलं जाळीदार पिंपळपान हवेत हेलकावत जमिनीकडे झेपावलं.

ते उचलायला जाणार्‍या राजूला तिने हातानेच थांबवलं. ’बाबा, तुमच्याच शब्दांत तुम्ही सांगितलेला बाबुल मोरा वाचतेय... ऐकताय ना?’

एकदाच डोळे उघडून बाबांनी राजूकडे, विजूकडे बघितलं आणि परत डोळे मिटून घेतले.

विजू वाचत होती, ’बाबुल मोरा... ही ठुमरी निव्वळ, सासरी निघालेल्या एका लेकीची आळवणी नाही. ह्या संसारातून उठून जाताना, एका जीवात्म्याची होणारी तडफड आहे, घालमेल आहे.
आपलं आपलं म्हणून जे आयुष्यभर उराशी बाळगलं, ज्या पृथ्वीच्या अंगणात खेळलो, जे आकाश आपल्या माहितीचं, ज्या बागेचा, रानाचा सुगंध आपल्या आवडीचा... इतकच काय पण जे सगे-सोयरे आपले मानले, सुख-दु:ख ज्यांच्याशी वाटून घेतली, संगतीने भोगली त्या सगळ्या सगळ्याचा त्याग करून दुसर्‍या देशी निघायचय. अशी कासाविशी आहे....
जिथे परिणून दिली त्याच्या, त्या अनोळखी घरा-दाराचा रस्ता धरायचा. जिथल्या मातीचा सुगंध वेगळा, आकाश अपरिचित... किंबहुना ज्याच्या भरवशावर माहेरचा उंबरठा ओलांडायचाय, तो तरी अजून कुठे नीटसा माहितीये?
त्या प्रवासाला निघाल्या जीवात्म्याची ही ठुमरी.
असे निघू तेव्हा.. तेव्हा इतकं अवघड नक्की होणारय, जीवाची तडफड होणारय. पण बेटा... ज्याच्या मीलनासाठी हे घर सोडायचय, त्याची आठवण सदोदित असली की... हा बिछोडाही साहून जातो जीव. त्याच्या भरवशावर माहेरचा उंबरठा ओलांडण्याचं साहस करतो जीव.....’

विजूचा आवाज थरथरायला लागला, डायरी बंद केली तिने. राजू संमोहित झाल्यासारखा एकटक बाबांकडे बघत होता. अजूनही अगदी हलका चालू असलेला बाबांचा श्वास... जाणवेल न जाणवेल असा...

"बाबा, ज्याच्या जीवावर तुम्हाला प्रस्थान ठेवायचय, त्याच्याच भरवशावर इथल्यांची काळजी सोपवायचीये... तो सखा हात पुढे करून उभा असेल... तुम्हाला दिसेल..."
बाबांच्या हातावर हात ठेवीत एक लांब श्वास घेतला, तिनं. जणू, आपल्यातली सगळी आंतरिक शक्ती पणाला लावीत बाबांचं प्रस्थान सुसह्य, सुखाचं करीत होती, ती.

एकच दीर्घ श्वास घेऊन बाबा श्वास घ्यायचे थांबल्याचं राजूला जाणवलं. त्याने घाबरून विजूकडे बघितलं... आणि बाबांना हलवीत, मोठ्या मोठ्याने हाका मारीत सुटला, ’बाबा, बाबाsss... ओ बाबाssss.... ’

त्याच्या खांद्यावर हात ठेवून अतिशय अतिशय थकलेली विजू उठली आणि हातांच्या ओंजळीत चेहरा लपवून खोली बाहेर धावली.

त्याचं ओरडणं ऐकून नर्स धावत आली. तिने थोडं जबरदस्तीनेच त्याला बाजूला केलं आणि बाबांची नाडी बघितली, स्टेथास्कोपने ठोके ऐकण्याचा प्रयत्नं करू लागली. मिनिटाभरातच वळून राजूला म्हणाली, ’आय ऍम सॉरी राजीव, ते गेलेत... मी डॉक्टरना बोलावते’
तिनं त्याच्या खांद्यावर थोपटलं आणि डॉक्टरना फोन लावला.

’शांत दिसतायत तुमचे वडील. वेदना झाल्या नाहीत त्यांना जाताना. राजीव... मिस्टर राजीव, तुम्हाला कुणाला बोलवायचय का?’, राजूला अजून तिथेच डोळे विस्फारून उभा बघून नर्स विचारीत होती. तिने एका ग्लासात पाणी ओतलं, ’घ्या... पाणी घ्या. इट्स ओके. मी बाहेर जाऊ का? तुम्हाला थोडावेळ इथे वडिलांबरोबर...’

राजूला तिचं बोलणं ऐकू येत होतही आणि नाहीही.
हे घडणारय हे माहीत होतं. खरतर बाबांच्या वेदना लवकर संपाव्यात, त्यांना सुखाचं मरण यावं ह्यासाठी इथेच त्यांच्या बेडशेजारी बसून, बाहेर लॉबीत, घरी देवासमोर... त्यानेच कित्येकदा प्रार्थना केली होती. तरी प्रत्यक्षात घडलं तेव्हा धक्का बसायचा तो बसलाच. आई फारशी आठवत नव्हती, माहीतही नव्हती... बाबाच सगळं.... आणि हो! विजू!

बापरे... विजू! मला आता हिलाही सावरलं पाहिजे. मगाशी किती खंबीरपणानं बाबांना निरोप देत होती... पण कोसळली असणार आता.
विजू!!! तो बाहेर धावला... तर लॉबीत समोर अहिरे काका बसले होते. त्यांच्या हातात विजूची शबनम.

’अहिरे काका, तुम्ही? बाबा.... बाबांचं कळलं? आत्ताच... विजू बरोबर आलात? बरं झालं तुम्ही तरी आहात... तिला सावरायला....’

अहिरे डोळे विस्फारून त्याच्या कडे बघत होते... आणि काही क्षणातच विजूची शबनम त्याच्या समोर ठेऊन ते पायातलं बळ गेल्यासारखे उकिडवे बसले... आणि गदगदू लागले.

केशरी शबनमच्या पट्ट्यावर आणि एका बाजूला वाळून काळसर झालेले रक्ताचे डाग... राजूला काही कळेना. तो अहिर काकांच्या बाजूला बसला... आणि त्याने काकांच्या खांद्यावर हात ठेवला, ’काका... काका... काय झालय?’

’पोरा... खूप प्रयत्नं केले.. पन... आख्खी कपार कोसळली... सापटीत अडकून होती पोर सताठ तास... तवाच तुमाला फोन क्येलेला... तिथं शाप कवरेज नव्हतं. दोनदा क्येला... तुमचा आवाज ऐकू आला, थोडा... तुज्यावर, बाबांवर लई जीव. हितं बाबांचं ज्यास्तं झाल्यालं कळलं... तवा यायला निगाली व्हती... माजी बाय. वाटंत कळ्ळं की... वस्तीची ल्हान ल्हान पोरं कामाला न्येली म्हून कपारीला ग्येली बगाया, त्यांन्ला समजवाया.... आनि... हे इपरित.. कसं... काय सांगू.... आउषीद, डागदर येईस्तोवर... आठ-धा तास ग्येले, रं लेकरा... काय बी करू शकलो न्हाई... कायबी न्हाई...’

अहिरे फडाफडा तोंडात मारून घेत होता, ’उद्याच्याला बॉडी मिळल ताब्यात... पोरा... काय हा परसंग तुज्यावर... रे. लेकरा... कसं समजावू तुला...’

राजूला आपण नक्की काय ऐकतोय तेच कळत नव्हतं.... तो धावत बाबांच्या खोलीत गेला. बेडच्या त्या बाजूला....
अजून पडून होतं जाळीदार पिंपळपान!

समाप्तं.

गुलमोहर: 

दाद,

तुमच्या कथाना दाद द्यायला शब्द अपुरे पडतात..

अप्रतिम...

दाद, तुम्हांला आणि तुमच्या प्रतिभेला सलाम.............

दाद,
माझा शब्द वापर पुर्णपणे चुकला, म्हणजे मृत्युनंतर अस जिवाभावाच्या व्यक्तींना दिसण एवढच अभिप्रेत होत तिथे पण ते चुकिच उमटल म्हणाव लागेल. खर तर तुझी कथा वाचुन इतक भरुन आल कि काय अभिप्राय लिहाव ते हि सुचत नव्हत. वर पण दुरुस्ती केलेय

काय बोलायचे? काय प्रतिक्रीया द्यायची अन ......
जरावेळ नुस्तेच बसेन.

~~
तिल तिल तारा मिरा तेली का तेल, कौडी कौडी पैसा पैसा पैसे का खेल.
चल चल सडकोंपे होगी ढॅण टॅण. - ढॅण्टॅणॅण ...

छानच्.जगणं आणि मरणं ह्याची फिलॉसॉफी इतकी सुंदर मांडली आहेस न. सलाम तुझ्या प्रतिभेला.

शलाकाताई, यु आर ग्रेट!
आता बाबुल मोरा ऐकतांना ही कथा आणि त्यात तुम्ही मांडलेला ठुमरीचा अर्थ मनात भरून राहील.

दाद केवळ अप्रतिम......!
अगदी समोर घडल्यासारख द्रुष्य..... truly

सगळ्यांचे खूप खूप आभार.
ही कथा लिहिताना मलाच भरून आलं. एका बाप-लेकीचं हे गुज आहे. वडील-मुलीचं असतच असं गहिरं...
त्यांनी केलेला नात्याचा प्रवास कसा अन कुठे लौकिक अर्थाने संपतो अन तरीही... कसा पुढे जाऊ शकतो... लिहिताना माझीही कासाविशी झालीच.
आणि म्हणूनच, जेव्हा ही कथा वाचताना अगदी अलिप्तं राहू शकले, तेव्हाच इथे प्रकाशित केली. (कथा लिहून तीनतरी महिने झालेत).

दाद देण्याजोगं लिहीलं आहे.
शेवट तर अगदी मन हेलावुन गेला !!!

जबरदस्त! महान लिहीलं आहे.

दाद, काय दाद द्यावी आमच्यासारख्यांनी तुला !!! सरस्वतीचा वरदहस्त आहे तुला लाभलेला....
मनाला भिडणार लिहाव ते तूच.

...तु सब्र तो कर मेरे यार....
-प्रिन्सेस...

खूपच सुन्दर...मला वाटते प्रत्येक गोष्टच सुंदर असते तुमची!

दाद, नेहमीप्रमाणे सुंदर. डोळ्यात कधी पाणी तरारले कळलच नाही... अजुन मुसमुसत्येय...

बाबुल मोरा... माझी आवडती ठुमरी. ऐकताना नेहमीच डोळ्यात पाणी येत. आता तर तुझी ही कथा पण आठवेल प्रत्येक वेळी ऐकताना... किती सुंदर सोप्प्या शब्दात ठुमरी चा अर्थ लिहिला आहेस तु...

ठुमरी लिहीणार्‍या वाजिद अली शाह साहिबांना माझा सलाम... आणि तुला दंडवत...

दाद.. अप्रतिम गं!

दाद नेहेमीप्रमाणेच अप्रतिम. शेवट तर कमाल.

प्रतिक्रिया देण्यासाठी पण शब्द नाहीयेत इतकी अप्रतिम... समोरची स्क्रीन धुसर दिसतेय आता..धन्यवाद दाद...बाबुल मेरा एव्हढा सुरेख उलगडुन दाखवल्याबद्दल.

अप्रतिम... बाबुल मोराचा नवा अर्थ समजला... सुंदर!!! बर्‍याच दिवसांनी दाद ला दाद द्यायला मिळाली...

Searching for guaranteed search engine optimization services at affordable rates? Your search ends here!!! Find your website on the top of popular search engines with our seo services...

अप्रतीम! 'बाबुल मोरा' ची कासावीस मनाला भिडली,एकदम.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

अप्रतिम..!!
फक्त अप्रतिम ...!!!
आणी अप्रतिमच ..!!!!!!
मला सगळेजण निष्ठुर म्हणतात मला रडायला येतच नाही, पण आता मला असं कुणी म्हणणार नाही.

*****************************
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.
शुभांगी

Pages