किमया........

Submitted by स्मिता द on 20 July, 2009 - 02:31

किमया

"अनिलऽऽऽऽऽऽऽ... ए अनिल"
हरीअण्णा आले वाटत. मी चटकन पुढे होऊन म्हटले
"या अण्णा "
हरीभाऊंना पाहिले की मला नेहमी पुलंचे हरीतात्या आठवतात ! हे आमच्या तिर्थरुपांचे आतेभाऊ. वय साधारण ७०-७५..वडिलोपार्जित गडगंज संपत्ती जमिन जुमला! पण हा माणूस अगदी कफल्लक वाटावा असे रहाणीमान! अण्णांची उंची चांगली सणसणीत. सहा एक फूट असेल आणि तब्येत एकदम मस्त ठणठणीत. गोरा लालबुंद रंग, तजेलदार चेहरा आणि डोळ्यात चमक. आवाज ही असा खणखणीत की चारी वाड्यांना ऐकु जाईल असा. आमच्याकडे आले की पहिली मला हाक दिंडी दरवाज्यातच! अशी हा़क आली की ओळखायचे अण्णां आले. अण्णांकडे बघीतले की आदराने मान झुकायची. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारचे आकर्षण होते. मी तर जसा बघतोय त्यांना तसा तसा त्यांच्या कडे अजुन अजुन आकर्षित होत गेलो.दरवेळेचे त्यांचे किस्से ऐकले, काही नवीन गोष्ट ऐकली मी अक्षरशः ओढला जायचो त्यांच्या कडे.पण या अवलीयाचा पेहेराव अगदी साधा. धोतर आणि ओपन शर्ट तर कधी नेहरू शर्ट! पायात साधी चप्पल अगदी.. कधी कधीतर ती ही नसे. ते त्यांच्याच दुनियेत रमलेले असत. अण्णांच म्हणे लहानपणीच लग्न झालेले....ते सांगायचे त्यांच्या लग्नाचे किस्से कधीतरी लहर आली की. बायको लग्नात खुप छोटिशी..आणि तिला दागिने इतके घातलेले की ती अगदी झाकुन गेली त्याखाली..अण्णांना लग्नात बायको दिसलीच नाही दिसले फक्त दागिने. खरंच नंतरही ती ईतके दागिने घालून असायची की आई सांगते कायम त्या दागिन्यांच्या भाराने वाकलेली असायची. पण हे असे बायको संसार या विषयावर बोलणे क्वचितच... अगदी कधीतरी . नाहीतर कधी हा माणुस संसारात रमलाच नाही. त्यांचा एकच ध्यास होता आयुष्यभरीचा! . अण्णांना दोन मुलगे आणी दोन मुली. संपन्न कुटुंब. वतनदारी ,शेती ..आणि त्यात अण्णा एकुलते एक . सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणं म्हणजे काय ते मला अण्णांकडे बघुन समजलं.. अगदी गर्भश्रीमंत घराणं. घरी इतकी सुबत्ता ,दोन मोठे चिरेबंदी वाडे ह्यांचे , अगदी प्रशस्त असे .पण हे असायचे वाड्यातल्या एका जुनाट खोलीत. तिथे कोणी फिरकायचे देखील नाही अश्या खोलीत. ती खोली आणि अण्णां बस्स.
संसारात अजिबात न रमलेला हा माणुस... रमला मात्र फक्त किमयेत! अत्यंत कुशाग्र बुद्धीमत्तेच्या हरी अण्णांना एकच ध्यास लागलेला 'किमया' . 'किमया' म्हणजे सोन्याची रासायनिक निर्मिती! काय गंमत आहे बघा घरी किलोने सोने असलेल्या ह्या माणसाने आपले अवघे आयुष्य ह्या किमये मागे व्यतीत केले.
सतत ते त्यातच रममाण असायचे. संसारात लक्ष नाही, मुलाबाळात लक्ष नाही. हे तुमचं आहे तुम्ही याचा उपभोग घ्या अशीच भुमिका असयची त्यांची घरच्यांबाबतीत. संसारात असुनही संसारापासुन इतका अलिप्त माणूस मी दुसरा नाही पाहिला. मला कळते तसे मी बघितलेले त्यांची पत्नी गेलेलीच होती. मुले त्यांच्या त्यांच्या नादात. त्यांना ह्यांच घेणं देणं नाही आणि ह्यांना त्यांच घेणं देणं नाही अश्या पध्दतीचे व्यवहार. मग बर्याचदा अण्णा आमच्याकडेच असायचे जेवायला. आईच्या हातचा स्वयंपाक त्यांना आवडायचा. आले की तासन तास रंगवुन काही सांगत बसायचे. आणि काही सांगितले के त्याचा शेवट "मजा येते कधी कधी!" ह्या वाक्याने खरं सांगायच तर मी अगदी वाटच बघत असायचो त्यांची. कारण एखाद्या जादुगाराच्या पोतडीतुन एक एक जादुई बाहेर पडावे तसे हरी अण्णांच्या बोलण्यातुन बर्‍याच अदभूत गोष्टी मला कळायच्या.
अत्यंत कुशाग्र बुद्धीमत्तेच्या ह्या माणसाला खेळ, राजकारण, शेती, अध्यात्म आदींवर बोलायचेही तेवढेच उत्तम प्रभुत्व. रोज सकाळीच वर्तमान पत्र घ्यायला ते बाजारात येत तिथेच जरासा पेपर चाळत आणि मग जेवायला येताना पेपर घेऊन घरी आले की मला पहिला प्रश्न
"अनिल, आजचा भारत वाचला का?"
हा भारत म्हणजे 'तरूण भारत',
"अरे , भिशीकरांचा लेख वाच. खूप छान लिहलयं!"
मला तेंव्हा सिनेमाच्या जाहिराती आणि क्रिकेटच्या बातम्या आणि फार फार तर व्यंगचित्र एवढाच वर्तमान पत्राचा उपयोग असे वाटायचे. कारण माझी झेप त्यापलिकडे पोचलीच नव्हती. पण हे लेख, अग्रलेख वाचायचा छंद अण्णांमुळेच जडला! काय वाचावं आणि काय वाचु नये याचा उत्तम परिपाठ म्हणजे अण्णा.
अण्णांचे शेतीविषयक ज्ञानही तेवढेच भारी! एकदा असाच पावसाळ्याला उशीर झाला. मी ११वी त होतो तेव्हा घरची जबाबदारी माझ्यावर! तिर्थरूप नोकरीच्या गांवी तरी वडील बंधु पदव्युत्तर शिक्षणार्थ नगरला! त्यामुळे शेती पासून घरापर्यंत सगळे मीच. घरात सगळ्या बहिणी, आई आणि पुरुषमाणुस म्हणजे मीच. शेतीकडे बघुन, कॉलेज करायचे अशी माझी तारेवरची कसरत. बरं आधी कधी फारसे लक्ष घातलेले नाही शेती मध्ये कारण तेव्हा आम्ही तिर्थरूपांबरोबर त्याच्या नोकरीच्या गावी. माहितेय कुणाला फारसे शेतीविषयक? आता येऊन पडले सगळे मानेवर तर ओढणे भाग होते. तर काय पावसाळ्याला उशीर झाला.
पाऊस लांबल्याने पेरणी ठप्प आणि आता मागास पिके येतील का नाही शंका. बियाणं वाया जायची भिती! अण्णा असेच आले त्यांना मी अडचण संगितली! त्यांचा उपाय लगेच तयार!
"एक काम कर. बियाणं १-२ तास भिजत घाल आणि नंतर राखेत घोळून घेऊन पेर खुशाल!"
तसा मीही ही ह्यात नवखा मग शेजारच्या वावरातल्या शेतकर्‍याला हे विचारले का? तर तो म्हणे
"यडा हायेस का? समदं बियाणं पाण्यात जाईन त्या पेक्षा तसच फुकून दे एक पाऊस झाला तर मागास का होईना पर थोडफार हातात मिळल!"
शेवटी द्विधा मनस्थितीत कसेतरी अधोलीभर बियाणं अण्णांनी सांगितल्या प्रमाणे गुपचूप पेरले! आणि काय सांगू त्याच तुकड्यातला शाळू अगदी जोमानं पिकला! तर असे हे अण्णांचे ज्ञान.

अण्णांची मदत तर मला अनेक बाबतीत व्हायची. अगदी जीजी आणि पुष्पीच्या लग्नात, अण्णा हाच मोठा आधार होता कारण एकतर आमचे तिर्थरूप बाहेर गावी . गावात आम्ही नविन आणि बरेचसे माझ्या खांद्यावर. तेव्हा अण्णांचा मला मोठा आधार होता. काही विचारायचे विचार अण्णांना. आणि अण्णा अगदी अगत्याने मार्गदर्शन करायचे.

'किमये' वर बोलू लागले तर ह्या अण्णांचा उत्साह तर अगदी द्विगुणीत व्हायचा. किमया ह्या एकाच विचाराने त्यांना ईतके झपाटले होते की बस. त्यांच्याकडे खुप मोठमोठी पुस्तके होती ह्या किमयेवर. अगदी शात्रज्ञ शोभतील असे त्याचे प्रयोग आणि अभ्यास! त्याच्याकडे 'पारद संहिता ' नावाचा मोठा ग्रंथ होता,त्यात ह्या किमयेविषयी खुप काही लिहिलेले होते. अगदी संपूर्ण. मी बर्‍याचदा त्यांच्या त्या प्रयोग शाळेत गेलो की बघायचो. आपल्याला काही कळतय का ह्यातल ते बघायचो. हा मोठा ग्रंथ अण्णंचा मुखोद्गत होता. अण्णांना एकंदरीत गुढतेची ही ओढ होती. अ. ल. भागवत ह्यांचे मोहिनी विद्या, अनंताकडे झेप ही पुस्तके मी वाचली त्यांनी संगितल्यावर. तसे इतरही गुढ वाचन करायला आवडायचे त्यांना. मी ही बर्‍याचदा रमायचो त्यांच्या कडे. पण दादा आला की त्यांना विशेष आनंद व्हायचा. ते त्यांचे नवनवीन प्रयोग त्याला सांगायचे. बहुदा त्यांना किमयेची दिक्षा दादाला द्यायची असेल असे वाटायचे. कारण ते कायम दादाला "तु तुझे हे सगळे शिक्षण कधी संपवून येणार रे?" असे विचारायचे तो आला की त्याला उत्साहाने नवे नवे प्रयोग ऐकवायचे.
एकदा असेच एक मोठी वीट घेऊन आले
'अनिल, बघ आता सोने मिळवणे फार दूर नाही!"
त्या विटेला पोखरून क्वाईल बसवता येई अशी सोय केलेली! त्यांच्या शेजारी कुणी एमेसीबीचा इंजिनियर आला होता रहायला! त्याच्या कडून अण्णांनी ही भट्टी बनवून घेतली होती किमयेसाठी. अण्णांचे काम आता अधिक सोपे होणार होते म्हणुन अण्णा अगदी खुष झाले होते.
मध्ये एकदा अण्णा असेच घरी आले. आणि बंद मुठ उघडून म्हणाले "अनिल हे बघ" पहातो तर काय हातात एक छोटीशी पिवळी धमक गोळी! "आता झालाच माझा प्रयोग सफल म्हणून समज" असे म्हणताना त्यांच्या चेहर्‍यावर अभिमाना ऐवजी चॉकलेट मिळालेल्या लहान मुलासारखा आनंद जाणवत होता.नंतर त्या गोळीचे पुढे काय झाले कळलेच नाही. पण त्यांच्या डोळ्यात उतरलेली त्या गोळीची चमक मला अजुनी आठवतेय.

चार पाच दिवसांपासून अण्णांची घरी चक्करच झाली नाही. शेवटी आईच म्हणाली
"अनिल अरे अण्णांना बरं नाही का बघुन ये रे जरा"
"अग सकाळी आला होता ना तो भाऊ त्याला का नाही विचारलेस?"
भाऊ म्हणजे अण्णांचा मोठा मुलगा. तो सकाळीच तात्या आहेत का विचारायला आला होता.
"तूला माहितेय ना त्यांना बापाचे काही घेणे देणे नाही..मग कश्याला विचारायचे ?"
"अस कस गं मला नेहंमी गंमत वाटते बघ. ईतका श्रीमंत माणुस आणि रहातो कसा. भाराने सोन असेल घरात पण ह्यानी आयुष्य उधळलय ते रासायनिक सोने तयार कसे करता येईल या किमये पाठी"
"असते बाबा वेड काहींना... त्या वेडातच जगतात असे लोक. जा तू जाऊन ये बघुन"
"बरं"
मी गेलो अण्णांच्या वाड्याकडे. रस्त्यात नाना दिसले.
"काय रे कुणीकडे?'
"हरिअण्णांकडे. दिसले का तुम्हाला ते?"
"नाही बा. चल मी पण येतो"
मी आणि नाना गेलो अण्णांच्या वाड्यात. त्याच्या त्या अंधार्‍या प्रयोगशाळेत..
"अण्णां.. ओ अण्णां" काहीच आवाज नाही तितक्यात नाना म्हणाले
"अनिल, ते बघ अण्णा तिथे"
अरेच्या अण्णा असे कसे झोपले? आम्ही जवळ जाउन बघीतले.
"अण्णा" मी हलवायला गेलो त्यांना तर ते अगदी निष्प्राण ... बापरे आण्णा गेले..?
"नाना..आण्णा.."
"हो बाळा.हो..गेला तो वेडा जीव अखेरीस त्या वेडातच. ईमान पाळल त्याने त्या वेडाशी"
तेवढ्यात भाऊ आला तिथे
"गेले ४ दिवस आजारीच होते अजिबात काही खाल्ले नव्हते "
मी अगदी गोठलेल्या अवथेत उभा राहुन अण्णांचा तो निष्प्राण देह बघत होतो.. डोक्याशी एका बाजुला पारद संहितेचे तेच पान उघडलेले आणि दुसर्‍या बाजूला वीटेची भट्टी! किमयेसाठी वाहिलेला सोन्या सारखा माणूस!
अण्णांचा देह जरी गार पडला होता तरी भट्टी मात्र गरम होती!

गुलमोहर: 

बासुरी, छान रंगवली आहेस कथा, आवडली.. Happy

ही खरी कथा आहे का? माझ्या वडिलांनी पण मला एका व्यक्ती बद्दल सांगितले होते. पण ती खुप खुप वर्षापुर्वीची गोष्ट आहे. बहुतेक त्या व्यक्तीला पार्याच्या वाफांचा (mercury vapors) त्रास होउन त्यमुळे तीचा म्रुत्यु झाला होता.

एका नवनाथ पंथीय साधुने असे तांब्यापासुन सोने बनवले असल्याचे एका वयोव्रुद्ध व्यक्तीने मला सांगीतले होते. खरे खोटे देव जाणे.........

सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....

बासुरी, भाषेवर, त्यातल्या खुब्यांवर काय सुंदर प्रभुत्वं आहे, तुझं. ह्याचा शेवट मला आवडला -
<<अण्णांचा देह जरी गार पडला होता तरी भट्टी मात्र गरम होती!>>

बासुरी,

नेहमीप्रमाणे.. खूपच छान!

कल्पू

धन्यवाद.. दक्षिणा, अनघा, निवांत, दाद आणी कल्पू..:)

ही खरी कथा आहे का? माझ्या वडिलांनी पण मला एका व्यक्ती बद्दल सांगितले होते. पण ती खुप खुप वर्षापुर्वीची गोष्ट आहे.>>>>>>> ही कथा खरतर माझ्या नवर्‍याच्या अगदी जवळच्या कुटुंबातील. मला अगदि डिटेल्स नाही ठावुक..:) कथा त्याची आहे शब्दांकन मी केलय. अर्थात त्याच्या मदतीनेच.:)

दाद अभिप्राया बद्दल धन्स! Happy

खूप छान! दादला अनुमोदन. Happy

बासुरी नेहमीप्रमाणेच सुंदर! नवनवीन कथाविषय कसे काय सुचतात बुवा?

Searching for guaranteed search engine optimization services at affordable rates? Your search ends here!!! Find your website on the top of popular search engines with our seo services...

बासुरी... छान लिहिलयेस ... आवडली कथा...
पुढच्या कथेची वट बघतेय.
----------------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

दाद ला मोदक... कथा आवडली!!

मलाही शेवट खुप आवडली. खुप छान कथा बासुरी!

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

बासुरि... कथा खुप खुप आवडलि गं......:)

सानिका, कथा मस्तच... नेहेमीप्रमाणे... पु ले शु... Happy

मस्तय व्यक्तीचित्रण. आवडलं.
.........................................................................................................................
आयुष्याच्या पाऊलवाटी, सुख दु:खांचे कवडसे
कधी काहीली तनमन झेली, कधी धारांचे व़ळसे

मनःपूर्वक धन्यवाद प्रकाश, ड्रिम गर्ल, अनघा , केदार, माणीक, सुमेधा, धनू, निका, लाजो, कौतुक, उदय...:)

*************************
हा देह तुझा पण देहातिल तू कोण
हा देह तुझा पण देहाविण तू कोण