किस्सा - ए - गुलबकावली

Submitted by तुमचा अभिषेक on 21 August, 2014 - 14:34

* प्रेरणास्त्रोत - http://www.maayboli.com/node/49063

तर किस्सा आहे कॉलेजच्या जमान्यातील. कॉलेजचे आमच्या नाव घेत नाही. पण तुमच्या आमच्या, चारचौंघांसारखेच, कट्टा असलेले. ज्यावर वॅलेण्टाईन डे, चॉकोलेट डे, रोज डे, डे बाय डे गुण्यागोविंदाने साजरे होणारे.

तर तो ‘रोज डे’ होता की ‘फ्रॅंण्डशिप डे’, हे आता नक्की आठवत नाहीये. कदाचित फ्रॅंण्डशिप डे चे औचित्य साधून वृक्षप्रेमींकडून गुलाबं खपवली जात होती. लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक तर पिवळा गुलाब मैत्रीचे प्रतीक. रुपयांत किंमत दोघांचीही सारखीच. तरीही ते समोरच्या पार्टीला देताना लागणार्‍या गटसमध्ये मात्र जमीन-अस्मानाचा फरक असल्याने पिवळ्या फुलांचा खप नेहमीच जास्त व्हायचा.

पण यावर्षी मात्र चक्रं पलटली होती. लाल गुलाबांना किंचित जास्त डिमांड आला होता. कारणीभूत होता आमचाच टारगट मुलांचा ग्रूप. एका कमालीच्या सुंदर पण (साहजिकच) तितक्याच घमेंडखोर मुलीला यावर्षी टारगेट करायचे होते. आमच्यातले काळे-सावळे, जाडे-भरडे, लुक्के-सुक्खे, कधी मुलींशी स्वप्नातही गप्पा न मारलेले, एक्कूण एक जण तिला गुलाब भेट करणार होते. ते देखील मैत्रीचे पिवळट नाही, तर देठाला "आय लव्ह यू" ची चिठ्ठी डकवलेले लाल टपोरे काटेदार गुलाब. हेतू एकच, "कोणीही यावे आणि मला प्रपोज करून जावे" असे तिला वाटून तिच्यातल्या अहंकाराची जागा न्यूनगंडाने वा गेला बाजार भयगंडाने तरी घ्यावी.

तर, असे काय झाले होते?
तर, काही खास नाही. आमच्यातल्या एका लोक-अ-प्रिय विद्यार्थ्याला तिने पहिल्याच फटक्यात नकार दिला होता. बरे नकार देताना एखादे मिळमिळीतच कारण दिले असते. "माझ्या घरी असे चालत नाही" पासून "मला माझी करीअर करायची आहे" पर्यंत काहीही खपवून घेतले गेले असते. किमान "आपण चांगले मित्र बनू शकतो" म्हणत मांडवलीच केली असती. पण नाही, "आरश्यात कधी आपले तोंड बघितले आहेस का?" म्हणत पठ्ठ्याचा पार तोंडावरच कचरा केला होता. या उपर तिच्याबद्दल माझे स्वताचेही मत फारसे अनूकूल नव्हते. जेव्हा ती आमच्या वर्गासमोरून जायची तेव्हा व्हरांड्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत हातातले सबमिशन बाजूला ठेउन मी नजरेनेच तिला सोबत करायचो. पण त्या मोबदल्यात ती एकदा ढुंकून बघेल तर शप्पथ. आम्ही आसपास घुटमळताना कधी तिच्या चेहर्‍यावरची माशीही हलली नव्हती. बस्स आज ती माशी हलताना बघायची होती.

तब्बल १७ स्वयंसेवकांनी या उपक्रमात आपली नावे नोंदवल्यानंतर आता या भाऊगर्दीत हरवून जाता येईल म्हणत अठरावे नाव मी सुद्धा नोंदवले. आम्हा अठरा प्रेमवीरांची नावे ती प्रत्येक चिठ्ठी वाचत पाठ करणार नाही याची खात्री असल्याने या ऐतिहासिक किडेगिरीचा एक भाग होण्याची संधी मी सोडली नाही. आणि तसेही हे फूल स्वताहून नेऊन द्यायचे नव्हतेच. आमच्या कॉलेजमधील हौशी विद्यार्थ्यांची संघटना, जे हे डे’ज वगैरे प्रकार साजरे करतात, तेच याबाबत पुढाकार घेऊन लोकांचे प्रेमसंदेश गुलाबासह इच्छित स्थळी पोहोचवायचे काम करतात, ज्यामागे मुखदुर्बळ आणि लाजर्‍याबुजर्‍या व्यक्तीमत्वांनाही त्यांचे प्रेम मिळावे हा सदहेतू. त्यामुळे या मिशन गुलबकावलीमध्ये आपले नाव नोंदवून आता फक्त गंमत बघायची होती.

सकाळचे लेक्चर आटोपल्यानंतर दुपारची जेवणे उरकून सारे प्रयोगशाळेच्या आवारात जमले. आज त्यांचे कुठले प्रॅक्टीकल आहे आणि योग्य संधी आणि पुरेसा वेळ केव्हा मिळणार याचा अभ्यास आम्ही अगोदरच केला होता. ठिक दिड वाजता त्या गुलबकावलीला पहिले फूल मिळाले. तिने पाहिले, नाव वाचले, प्रमोद आत्माराम माटे ! सोबतीला आम्ही आमच्या पजामा छाप क्लासरूमचे नावही टाकले होते. अर्थातच हा कालपर्यंत अज्ञात असलेला प्रेमवीर आज कोण कुठून उगवला ते तिला समजले नसणारच. मात्र आत्माराम माट्यांची सून होण्यात तिला जराही रस नसल्याने तितक्याच सहजपणे तिने ते फूल बाजूला सारून ठेवले. दोनच मिनिटात दुसरे फूल हजर. तर चौथ्या मिनिटाला तिसरे. पुन्हा तीच तशीच प्रतिक्रिया. फक्त चेहर्‍यावर एखादी आठी जास्त उमटल्याचा भास तेवढा झाला. पुढच्या दहाबारा मिनिटांत एकेक करून सहा-सात फुले तिच्याकडे जमली. आता हळूहळू तिच्या वर्गातल्या आणि आजूबाजुच्या इतर मुलामुलींचे लक्ष या प्रकाराकडे वेधू लागले. सुरुवातीला काही जणांना वाटणार्‍या कौतुकाची जागा, नंतर हेव्याने घेत, आता चेष्टा मस्करीने घेतली होती. आठ-दहा फुलांनतर तर अशी वेळ आली की तिला येणार्‍या प्रत्येक फुलागणिक तिच्याच वर्गमित्रांकडून जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊ लागला. सोबतीला चार शिट्ट्या आम्हा गावगुंडांकडूनही येऊ लागल्या. बघता बघता चिडवाचिडवीचा असा काही माहौल बनला की एका चुकीच्या पद्धतीने आपण सेंटर ऑफ अ‍ॅट्रेक्शन बनलो आहोत याचा संताप तिच्या चेहर्‍यावर झळकू लागला.

आमचा कोटा अठरा फुलांचा होता, मात्र चार-पाच फुले शिल्लक असतानाच तिचा संयम सुटला आणि ती आतापावेतो मिळालेली सर्व फुले एकत्र गोळा करत ती मोकळ्या जागेत आली. इथून दोन बाजूंना इमारती होत्या, तर एका बाजूला उपहारगृह. आधी जी गोष्ट चार-चौदा लोकांसमोर घडत होती ती आता चारशे डोळ्यांना दिसणार होती. प्रकरण आतल्या बाजूला जात दडपायच्या ऐवजी ती चव्हाट्यावर घेऊन आली होती, याचा अर्थ आता काहीतरी गोंधळ घालायचा विचार तिच्याही मनात होता. अरे देवा, प्रिन्सिपॉल वगैरे कडे तक्रार गेली तर मेलो असा विचार पहिल्यांदाच मनात आला. पण सुदैवाने माझे नाव असलेले गुलाब अजून तिच्यापर्यंत पोहोचले नव्हते, रांगेतच होते. पण तिचा असा काही विचार नव्हता. तिने ती सारी फुले खाली मातीत टाकली आणि आम्हा सर्वांकडे बघून तशीच सॅंडल घातलेल्या पायाने कुस्करू लागली. जणू या सॅंडलने तुमचे गालच रंगवतेय बघा असा आवेश तिच्या चेहर्‍यावर होता. सोबतीला म्हणून लगोलग तिच्या दोन जिवलग मैत्रीणी आल्या आणि कश्यात काय नाय तरीही आपला पाय, त्या फुलांवर साफ करून गेल्या.

तिच्या या अघोरी कृत्याने आता पुन्हा एकदा वातावरण पलटले होते. जणू वादळानंतरची शांतता !
पण इथेच अजून एक ट्विस्ट बाकी होता..

एवढा वेळ गर्दीच्या पार मागे गंमत बघत उभा असलेलो मी सावकाशपणे पुढे आलो. त्या कुस्करलेल्या फुलांना हळूवारपणे उचलले आणि त्यावरची माती झटकत त्यांना साफ करू लागलो. डोळ्याच्या कडेने एक तिरपी नजर तिच्या हालचालींवर होतीच. हा त्यांच्यातलाच एक म्हणत माझे नावगावही माहीत नसताना ती माझ्याशी तावातावाने भांडायला आली आणि आईशप्पथ ... त्या दिवशी मी राजेंदरकुमारची अ‍ॅक्टींग तोडली! तिचा आवेश पाहता ती माझ्या कानाखाली गणपती नाचवणार इतक्यात मी उत्तरलो, "माफच कर मैत्रीणी, मी तुला ओळखतही नाही मग तुला प्रेमाचे फूल देणे तर दूरची गोष्ट. मी एक वृक्षप्रेमी आहे. तुम्हा लोकांच्या भांडणात हि फुले बिचारी धारातीर्थी पडली ते मला बघवले नाही म्हणून उचलायला आलो." एवढे बोलून मी ती फुले छातीशी कवटाळली. खरे तर माझे बोलणे तिला बकवास वाटले तर होणारे दुष्परीणाम टाळण्यासाठी घेतलेला तो बचावात्मक पवित्रा होता. पण उलट तिचा मवाळ झालेला चेहरा पाहता मी ऐनवेळी सुचलेला आणखी एक डायलॉग चिपकवला जो ऐकून तिचा चेहरा पार पोपटासारखा पडला. म्हणालो, "मैत्रीणी, माझ्यासाठी प्रेम हा शब्द उच्चारताना बाह्य सौंदर्य काऽही मायने ठेवत नाही. पण जी मुलगी रागाच्या भरात का होईना एखादी निष्पाप कळी निर्दयीपणे पायाखाली कुस्करते, त्या मुलीला मी तरी कधी चुकूनही गुलाबाचे फूल दिले नसते..."

अन या संवादफेकीनंतर पुनश्च जोरदार टाळ्यांचा कडकडाट होईल असे मला वाटलेले खरे. पण कसले काय, सारेच ढिम्म. पहिल्यांदा साहित्याची जाण नसलेले मित्र पाळल्याचा पश्चाताप मला झाला. ईतकेच नाही तर मला हिरो बनायचा मौका आला अन काय है दुर्दैव. अचानक पांगापांग सुरू झाली. त्यांचे प्रॅक्टीकल सुरू झाल्याने त्यांची गर्दी ओसरली, लगोलग झाले तेवढे पुरे म्हणत तिनेही काढता पाय घेतला, तर माझे अगोदरच गळपटलेले मित्र एव्हाना दृष्टीच्या पार पलीकडे पोहोचले होते. गुलाबही गेले होते, गुलबकावलीही गेली होती, तर हाती राहिलेल्या पाकळ्यांचे गुलकंदही बनणार नव्हते. इति किस्सा-ए-गुलबकावली संपुर्ण असफल !

- तुमचा अभिषेक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिषेक , माबो वर खूप दिवसानी आलात . उद्या सावकाशीने वाचते.
काहीतरी छानच असेल.

मनीमोहोर, धन्यवाद, आणि हो खरेय, हल्ली थोडासा बिझी झाल्याने आणि मुलीलाही नुकतेच घरी घेऊन आल्याने टाईम मॅनेजमेंट पार गंडलेय. तरी माबोवर वाचनमात्र आहे नियमित. कुठेतरी एखाददुसर्‍या प्रतिसादातही आहे, फक्त लिखाण नवीन झाले नाही इतकेच. माझाच चॉकोलेट डे चा धागा वर आलेला पाहिला आणि आजच्या सुटीचा फायदा उचलत हे लिहिले. उद्या तुम्हाला आवडेल अशी आशा करतो, शुभरात्री Happy

प्रतिसादांचे धन्यवाद Happy

,'राजेंदरकुमारची अ‍ॅक्टींग'{?) येक्दम डोळ्यासमोर आली....... नुस्तं Rofl

मस्त लिहिलंस रे ..खासमखास अभिषेक टच... टू गुड!!!

आभिषेक, वेलकम बॅक, बर्‍याच दिवसानी दिसलात म्हणून.

सकाळी सकाळी काहितरी खुस्खुशीत वाचायला मिळणारसं दिस्तय..
वाचून देतेच प्रतिक्रिया.

छान लिहिलंयत, आवडलं.

पहिल्यांदा साहित्याची जाण नसलेले मित्र पाळल्याचा पश्चाताप मला झाला>>> हे तर लयी भारी

मस्त!!!

Pages