छायागीत ८ - तु मेरे सामने है, तेरी जुल्फें है खुली, तेरा आंचल है ढला…...

Submitted by अतुल ठाकुर on 9 April, 2014 - 11:50

hqdefault_0.jpghttps://www.youtube.com/watch?v=MQ4YKgeZDPA

रफी आणि मदनमोहनने हिन्दी चित्रपट संगीतात जी क्लासिक गाणी दिली त्यापैकी एक महत्वाचे गाणे म्हणजे "तु मेरे सामने है". गुरुदत्त म्हटलं की "प्यासा", "चौदहवी का चांद", "साहब बीवी और गुलाम" किंवा "कागज के फूल" आठवणार्‍यांना "सुहागन" आठवणार नाही कदाचित. मात्र अस्सल संगीतप्रेमीच्या नजरेतुन (कानातुन?) हे गाणे सुटणे अशक्य. मदनमोहन मुळातच गायकाची प्रकृती, गाण्याची पार्श्वभुमी या सार्‍या गोष्टी पाहुन गाणे देणारा संगीतकार. "हर तरफ अब यही अफसाने है" या "हिन्दुस्तान कि कसम" मधल्या गाण्यासाठी मन्नाडे ची निवड मदनमोहनने अतिशय विचारपूर्वक केली होती. सैन्यातल्या अधिकार्‍यासाठी (राजकुमार) मन्नाडेचा सरळसोट आवाज त्याला चपखल वाटला. या पार्श्वभुमीवर या गाण्याचा विचार केल्यास रफिची निवड अगदी चोख वाटते.

पत्नीच्या प्रेमात बुडालेला गुरुदत्त, समोर पत्नीच्या रुपात मालासिन्हासारखी मदनिका, "तु जो हसती है तो बिजलीसी चमक जाती है" सारखे हसरत जयपुरीचे शराबी काव्य, रफीने लावलेला आसक्त सूर आणि त्यावर मदनमोहनची आर्जव दाखवणारी सुरेख चाल. या सार्‍या नशील्या गोष्टी एकत्र आल्यावर तयार झालेले गाणे ऐकताना रसिकाची अवस्था धुंद झाल्यास नवल ते काय? मात्र या गाण्याचा आस्वाद दोन तर्‍हेने घेता येतो. एक म्हणजे नुसते गाणे ऐकल्यास येणारी अनुभुती वेगळी. आणि गाणे पाहताना येणारा अनुभव वेगळा आहे. गाणे ऐकताना बनलेले गारुड हे रफी, मदनमोहन आणि हसरत जयपुरीचे आहे. मात्र पाहताना त्यात गुरुदत्त आणि मालासिन्हा, विशेषकरुन माला सिन्हाने केलेल्या सहजसुंदर अभिनयाचा परिणाम खुपच जाणवतो.

पतीला रत होण्याची इच्छा आहे. तो तिच्या लावण्याने भुलुन गेला आहे. मात्र तिला संयम ठेवावा लागणार आहे. कुठलीही उत्तेजना पतीचा जीवावर बेतु शकते हे तिला माहीत आहे. पण तिलाही मन आहे, शरीर आहे. तिचे तिच्या पतीवर प्रेम आहे. आपल्या प्रेमाने केलेली मागणी तिला पुर्ण करावीशी तर वाटते पण करताही येत नाहीय असा हा विचित्र खेळ आहे. "सुहागन" चित्रपटात कथेमध्ये चपखल बसलेले हे गाणे गुरुदत्तची पत्नीवरील आसक्ती आणि त्याची तिच्याबद्दलची शारिरीक ओढ अधोरेखित करते. "तेरी आंखे तो छलकते हुवे पैमाने है, और तेरे होंठ लरजते हुवे मैखाने है..." पती रतीसंगासाठी संपूर्णपणे पेटुन उठला आहे. "मै भला होशमें कैसे रहूं" असा प्रश्न तो तिला करतो आहे. गुरुदत्तच्या निरागस चेहर्‍यामुळे त्याची ओढ ही अगदी खरीखुरी वाटते. कसलीही ओव्हरअ‍ॅक्टींग न करता गुरुदत्तने या गाण्यात आपली ही अनावर ओढ दाखवली आहे.

माला सिन्हाबद्दल काय बोलणार? मीना कुमारी, नुतन, मधुबाला, वहिदा अशा जबरदस्त अभिनेत्रींच्या समांतर कारकिर्द धावल्याने या अत्यंत गुणी अभिनेत्रीचे अभिनय गुण काहीसे झाकोळले गेले असं मला वाटतं. पतीची इच्छा पुर्ण करु न शकणारी पत्नी तिने फक्त नजरेनेच उभी केली आहे. तिला देखिल शरीराची ओढ आहे. ती त्याच्या बाहुपाशात येते पण क्षणात स्वतःला सावरुन त्याच्या नजरेआड आपले अश्रु लपवुन ती स्वतःची सुटका करुन घेते. हे संपूर्ण गाणे हा अतिशय कसलेल्या कलाकारांचा अविष्कार आहे. रफीचा आर्त, आर्जवी स्वर, मदनमोहनची त्या आर्ततेला आणखी गहीरी करणारी रचना, गुरुदत्तचा समर्पणाची मागणी करणारा पती आणि माला सिन्हाची पतीवरील प्रेमापोटीच नकार दर्शवणारी लावण्यवती पत्नी. हे सारं ऐकताना, पाहताना रसिकांचीच अवस्था " मै भला होशमें कैसे रहूं" अशी होते हे नक्की Happy

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माला सिन्हाबद्दल काय बोलणार? मीना कुमारी, नुतन, मधुबाला, वहिदा अशा जबरदस्त अभिनेत्रींच्या समांतर कारकिर्द धावल्याने या अत्यंत गुणी अभिनेत्रीचे अभिनय गुण काहीसे झाकोळले गेले असं मला वाटतं.<<<<<अगदी अगदी पटलं
काही म्हणा माला सिन्हा ती माला सिन्हाच . तिची एकनेक अदा अगदी परफेक्ट असते . आधी मला ह्यातलं काही कळायचं नाही पण आता गझलेच्या सरावामुळे अनेक गोष्टींकडे पाहण्यात जरा सफाई आलीये माझ्या

असो
लेख खूप आवडला
आता कधी हे गाणं पाहण्यात आलं की ह्या बाबी नक्कीच लक्षात घेवून आस्वाद घेईन धन्यवाद

चांगलं लिहिलंय. वर्णन आवडलं. रफीचा आवाज मदीर आहे, ध्रुपद सिच्युएशनशी मेळ खात हळूहळू वरती जाते तर अंत-यांची चाल वळणावळणांची अवघड आहे. सुरेल, श्रवणीय गाणे आहे अतिशय. गाणं पाहिलेलं नाही, पण घरात बाबांच्या फेवरीट कलेक्शनच्या रफी सोलो कॅसेटमधे होतं त्यामुळे परवचेसारखं वारंवार कानावर पडत आलेलं आहे.

माला सिन्हाबद्दल अगदी सहमत. गुणी अभिनेत्री. वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका समरसून साकारली. घरगुती असो वा आधुनिक, ती शोभली त्या त्या रोलमधे. तिचा पडद्यावर नेहमीच प्रसन्न वावर होता. त्यात तिच्या तोंड भरून सुंदर हसण्याचं मोलाचं श्रेय आहे.
'लव्ह मॅरेज'मधली माला सिन्हा फार देखणी आहे.

मै भला होश मे कैसे रहुं. जबरी गाण्याची आठवण करुन दिलीत. कसला मधाळ किंवा वर सई म्हणली त्याप्रमाणे मदीर आवाज आहे यात रफीचा. Happy