दिव्यत्वाची जेथे प्रचिती ...

Submitted by SureshShinde on 31 July, 2014 - 12:47

s-hospital-prasanthigram.jpg

पुण्याहून वेल्हेमहाल येथे जाणाऱ्या एस.टी.च्या रस्त्यावर साखर नावाचे एक छोटेसे गाव लागते. तेथून आतमध्ये कच्च्या रस्त्यावर आहे एक वाडी - 'भोसलेवाडी'.
या भोसलेवाडीमध्ये बत्तीस वर्षे वयाचा, गुलाब भोसले नावाचा एक उमदा शेतकरी अर्ध्या एकरात भातशेती करुन कसेबसे आपल्या दहा कुटुंबियांचे पोट भरत असे. हल्ली त्याची तब्येत थोडी नीट रहात नव्हती. आपल्या पत्नीला तो वांरवार सांगत होता की थोडेसे अंतर चालल्यावर, वजन उचलल्यावर, चढ चढल्यावर त्याला दम लागल्यासारखे होत होते, थोडा वेळ थांबले व विश्रांती घेतली की पुन्हा बरे वाटत होते. असे हे दम लागण्याचे प्रमाण हळूहळू वाढतच चालले होते. त्यामुळे दोघां पतीपत्नीनी मिळून साखरला जावून डॉ.मुळेंना तब्येत दाखविण्याचे ठरविले. डॉ.मुळे म्हणजे साखरचे जुने व एकमेव डॉक्टर! उत्तम ज्ञान व सेवाभावी वृत्ती यामुळे ते त्या भागात चांगलेच लोकप्रिय होते. डॉक्टरांनी गुलाबची तक्रार ऐकून घेतली. पेशंटच्या छातीला स्टेथोस्कोप लावत असतानाच या रुग्णाला काहीतरी नेहमीच्या चाकोरीबाहेरील आजार असावा व त्याला पुढील तपासणीसाठी पुण्यास पाठवावे असा त्यांचा विचार चालू होता.
"गुलाब, तुझी तब्येत तशी व्यवस्थित दिसते पण चालताना दम लागणे हे काही चांगले लक्षण नाही. तू पुण्याला जाऊन छातीचा फोटो व रक्त, लघवी तपासून यावे हे उत्तम.'' डॉक्टरांचा सल्ला ऐकून गुलाबने प्रश्नार्थक मुद्रेने बायकोकडे पाहिले. पण बायकोला परिस्थितीचे गांभीर्य बहुतेक समजले असावे. एरवी तिला सायकलवर डबलसीट घेऊन येणारा तिचा नवरा आज बैलगाडी करुन आला होता यावरुनच ती हबकली होती. "डॉक्टर आम्हाला चिठ्ठी द्या, मी लांडगे वकीलासंगे यांना पुण्याला पाठविते.''
डॉ.मुळे माझे जवळचे स्नेही होते. त्यांनी साखरच्या परिसरातील अनेक रुग्ण माझ्याकडे सल्ल्यासाठी पाठविले असल्याने व डॉक्टरांच्या कुटुंबाच्या सालस स्वभावामुळे आमचे संबंध व्यवसायापलिकडील जिव्हाळ्याचे झाले होते. डॉक्टरांची चिठ्ठी घेऊन गुलाब भोसले माझ्या क्लिनिकमध्ये आला, तो अठरा वर्षापूर्वीचा दिवस मला आजही आठवतो. "डॉक्टर, माझी तब्येत जरा जास्त आहे, मला जरा लवकर तपासले तर बरे होईल.'' गुलाबने माझ्या स्वागतिकेस विनंती केली. माझ्याकडे येणारे बरेचसे रुग्ण गर्दी पाहून लवकर नंबर लागावा म्हणून अनेक सबबी नेहमीच सांगत असतात. गुलाब बरोबर एक बोलकी सुशिक्षित व्यक्ती होती, लांडगे वकील! त्यांनी आत येऊन गुलाबला लवकर तपासण्याची विनंती केली. मी त्यांना त्याला माझ्या तपासणी कक्षात आणण्यास सांगितले.
गुलाबची तब्येत तशी ठणठणीत दिसत होती. तो मला सांगू लागला, "डॉक्टर, आता मी बसलेलो असताना मला काहीही त्रास होत नाही. पण थोडेसे चाललो की मला दम लागतो व मला थांबावेच लागते. एवढा कामाचा दमदार गडी मी पण आता मला काहीही काम करता येत नाही. तुमचा हा जिना चढलो पण दोन वेळा थांबावे लागले. मरणाचा दम लागला होता.'' त्याचे हे वर्णन ऐकून मी चांगलाच हादरलो.
"तुला दम लागतो तेव्हा छातीमध्ये दुखते काय? '' मी त्याचे ब्लडप्रेशर पाहता पाहता त्याच्याशी बोलत होतो. "मला फक्त दम लागतो, दुसरे काहीही होत नाही.''
गुलाबची जीभ चांगलीच लालभडक होती. म्हणजे रक्त कमी असण्याची शक्यता मुळीच नव्हती. एरवी असा त्रास होण्याचे पहिले कारण म्हणजे रक्तक्षय अथवा ऍनेमिया ! मग आता दोनच मुख्य कारणे उरली, एकतर हृदयविकार किंवा फुप्फुसाचा आजार ! शरीर तपासणीमध्ये हृदय उत्तम होते, हृदयाच्या झडपा उत्तम काम करीत होत्या. हृदयाचे रक्ताभिसरणाचे काम उत्तम चालू होते. त्याच्या पावलांवर सूजही नव्हती. छातीमध्ये अथवा हृदयाभोवती पाणी साचलेले नव्हते. फुप्फुसामध्ये टी.बी. अथवा दम्यासारखा आजारही नव्हता. मग गुलाबला दम का लागत होता?
"गुलाब, तुझ्या तब्येतीत तर काही दोष दिसत नाही. तुझा ईसीजी काढून हृदयाच्या कंपनाचा आलेख काढून पहावा लागेल'' मी म्हणालो. गुलाबचा ईसीजी देखील संपूर्णपणे नॉर्मल आला. गुलाबच्या फुप्फुसाच्या रक्तवाहिनीमध्ये गाठ आली असेल अशी एक शंका मनात होती पण नॉर्मल इसीजीमुळे ती शक्यता ही दुरावली. झालेल्या तपासणीची लांडगे वकीलांना कल्पना देऊन त्यांना मी छातीचा एक्स-रे काढण्यासाठी पाठविले.
थोड्याच वेळात एक्स-रे काढून व रक्त, लघवीचे रिपोर्ट घेऊन मंडळी परत आली. छातीचा एक्स-रे अगदी नॉर्मल होता. हृदयाचा आकार, फुप्फुसे यात काहीही दोष नव्हता. रक्तातील हिमोग्लोबीन, रक्तशर्करा व युरिया यांचे प्रमाणही व्यवस्थित होते. डायबेटीस अथवा किडनी विकार नव्हते. आता एकच शक्यता उरली होती, हृदयाला होणाऱ्या रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण झाला असण्याची.
एरवी असा अडथळा आल्यास चालल्यानंतर छाती भरुन येते यालाच आम्ही "अंजायना'' असे म्हणतो. चालल्यानंतर छातीमध्ये दुखू लागते व चालणे थांबविल्यावर दुखणे थांबते. पण गुलाबला चालल्यानंतर छातीमध्ये दुखत नव्हते तर दम लागत होता. याचा अर्थ स्पष्ट होता, त्याच्या हृदयाच्या डाव्या कोरोनरी रक्तवाहिनीच्या सुरुवातीसच्या भागातच अडथळा आला असण्याची शक्यता होती. या ठिकाणास 'लेफ्ट-मेन' असे म्हणतात. माझे स्नेही व सुप्रसिद्ध हृदयशल्य विशारद डॉ. नितू मांडके यांनाही नेमका याच ठिकाणी हृदयविकार होऊन यातच त्यांचे दु:खद निधन झाल्याचे र्सवश्रुतच आहे.
मी रुबी हॉलमध्ये संपर्क साधून गुलाबची तातडीने "स्ट्रेस टेस्ट' करण्याची व्यवस्था केली. या टेस्टमध्ये रुग्णाला "ट्रेडमिल'' नावाच्या एका फिरत्या पट्टयावर चालवतात व ईसीजी काढतात. चालल्यामुळे हृदयक्रिया वाढते व जर हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये अडथळा असेल तर हृदयाला वाढीव प्रमाणात हवा असलेला रक्तपुरवठा होऊ शकत नाही व मग छातीमध्ये दुखू लागते व त्यावेळेस ईसीजीमध्ये हृदयाच्या स्नायुंना प्राणवायू कमी पडत असल्याची लक्षणे दिसतात व हृदयविकाराचे निदान होऊ शकते. सामान्य माणूस सर्वसाधारणपणे दहा मिनिटे 'ट्रेडमिल'वर चालू शकतो. पण गुलाब मात्र फक्त पंधरा सेकंदच चालू शकला व त्याच्या ईसीजीमध्ये खूपच बदल दिसल्यामुळे व त्याला दम लागल्यामुळे ही 'स्ट्रेस टेस्ट' थांबवावी लागली. गुलाबची स्ट्रेस टेस्ट 'स्ट्रॉंग पॉझिटिव्ह' आली होती! म्हणजेच गुलाबला होता गंभीर हृदयविकार!
मला फोनवरच त्याचा रिपोर्ट समजल्यानंतर मी माझे मित्र डॉ.परवेझ ग्रॅंट यांच्याशी बोलून गुलाबचे निदान पक्के करण्यासाठी त्याला दाखल करुन घेतले. त्याला आता करावी लागणार होती पुढची तपासणी अर्थात कोरोनरी अँजिओग्राफी! या तपासणीमध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे फोटो काढले जातात व त्यात हृदयाच्या तीन रक्तवाहिन्यांमध्ये कोठे व किती प्रमाणात अडथळा आला आहे याचे शंभर टक्के निदान होऊ शकते.
आता प्रश्न होता खर्चाचा! अँजिओग्राफीचा अपेक्षित खर्च होता दहा हजार रुपये. गुलाबची आर्थिक परिस्थिती पाहून डॉ.ग्रॅंटनी पाच हजारातच त्याची 'अँजिओ' करण्याचे मान्य केले. त्याच दिवशी पाच वाजता त्याची अँजिओ झाली. भारतामध्ये सर्वात जास्त म्हणजे एक लाखाच्या पेक्षाही जास्त 'अँजिओग्राफी' केलेल्या सुप्रसिद्ध डॉ.चंद्रशेखर मखले यांनी त्याची ''अँजिओ' केली. पहिल्याच 'शूट'मध्ये जे चित्र संगणकाच्या पडद्यावर उमटले ते पाहून मखले सरांचाही हृदयाचा ठोका कदाचित चुकला असावा. गुलाबची 'लेफ्ट मेन' रक्तवाहिनी जवळजवळ पंच्च्याण्णव टक्के बंद होती. केसाच्या जाडी इतकाच रक्ताचा प्रवाह पुढील भागामध्ये सरकत होता. उजवी कोरोनरी कशीबशी हृदयाला लागणारे रक्त पुरवित होती व म्हणूनच केवळ गुलाब जिवंत होता. एखाद्या चित्रपटातील नायक दरीच्या टोकावर दोराने लोंबकळत असतो व त्या दोराचे अनेक धागे तुटून काही धाग्यांवरच तो लटकत असतो असेच जणू काय ते चित्र दिसत होते.

LtMain.JPG

गुलाबचे हृदय 'अँजिओ' करतानाच थांबले नाही याबद्दल परमेश्वराचे आभार मानीत डॉ.मखले यांनी 'अँजिओ' आटोपती घेतली.
डॉ.परवेझ यांनी लांडगे वकीलांना आपल्या केबिनमध्ये बोलावून 'अँजिओग्राफी'मधून समजलेल्या जीवघेण्या आजाराची कल्पना दिली. गुलाबचे आयुष्य कसे धोक्यात आहे हे आपल्या पारशी-मराठीमध्ये सांगत असताना मी देखील शेजारीच उभा होतो. एखाद्या सिद्ध ज्योतिषाप्रमाणे जन्मकुंडली मांडून गुलाबच्या आयुष्यातील अशुभ योग सांगताना डॉ.परवेझच्या आवाजातील कंप जाणवत होता. गुलाबचे आयुष्य धोक्यात होते. त्याच्या हृदयाची 'लेफ्ट-मेन' रक्तवाहिनी कोणत्याही क्षणी बंद पडण्याची शक्यता होती. त्याला वाचविण्याचे दोनच पर्याय होते. पैकी पहिला पर्याय होता 'अँजिओप्लास्टी'चा! या पर्यायामध्ये रक्तवाहिनीमध्ये कॅथेटरद्वारे एक फुगा घालून तो नेमका ज्या ठिकाणी रक्तवाहिनी अरुंद झाली आहे तेथे तो फुगवतात व त्या रक्तवाहिनीला रुंद करतात. ही रुंदावलेली रक्तवाहिनी पुन्हा बंद होऊ नये म्हणून त्याच कॅथेटरमधून बॉलपेनच्या रिफीलसाठी वापरल्या जाणाऱ्या स्प्रिंगप्रमाणे दिसणारी एक स्पेशल 'स्प्रिंग' म्हणजेच 'स्टेन्ट' बसविला जातो. त्यामुळे अरुंद रक्तवाहिनीमधील अडथळा दूर होवून रक्त पुरवठा पूर्ववत चालू होतो. अशी अँजिओप्लास्टी डॉ.परवेझ व त्यांचे अनेक सहकारी करु शकत होते. पण 'लेफ्ट-मेन' अँजिओप्लास्टी त्यावेळी जगात एकच माणूस करु शकत होता तो म्हणजे, फ्रान्समधील डॉ.मार्क सिल्व्हेस्ट्री! डॉ.मार्क नियमितपणे रुबी हॉलमध्ये येऊन अशा 'प्लास्टी' करीत असत पण त्यांच्या नियोजित भेटीपर्यंत थांबण्याइतका वेळ गुलाबजवळ नव्हता. त्यासाठी आता दुसरा एकच पर्याय उपलब्ध होता तो म्हणजे, "बायपास सर्जरी''! या शस्त्रक्रियेमध्ये अरुंद रक्तवाहिनीच्या पुढील भागाला नवीन रक्तवाहिनीचा जोड दिला जातो व अशा प्रकारे कमी झालेला रक्तपुरवठा पुन्हा नवीन वाहिनीद्वारे वाढविला जातो. बायपास शस्त्रक्रिया करताना हृदय व फुप्फुस यांचे कार्य काही वेळ "हार्ट-लंग'' मशिनद्वारे करविले जाते व रुग्णाचे हृदय पूर्णपणे थांबवून त्याच्या रक्तवाहिन्या जोडण्याचे काम केले जाते. सध्या हृदयशस्त्रक्रियेमध्ये झालेल्या प्रगतीमुळे हृदयक्रिया न थांबविता, "बायपास'' शस्त्रक्रिया होऊ शकते. पण ही सोय तेव्हा उपलब्ध नव्हती. त्यामुळे शस्त्रक्रियेसाठी जास्त खर्च येत असे. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया मोफत केली तरीदेखील शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या साहित्याला खूपच खर्च येत असे. त्यामुळे गुलाबच्या हृदयशस्त्रक्रियेसाठी कमीतकमी खर्च पासष्ट हजार रुपये येणार होता.
अशा शस्त्रक्रियेसाठी दानशूर व्यक्ती, धर्मादाय न्यास, पंतप्रधान व मुख्यमंत्री निधी, महापौर निधी अशा अनेक स्त्रोतांकडून मदत मिळण्याची शक्यता होती. पण त्यासाठी अर्ज, मंजूरी व प्रत्यक्षात पैसे मिळणे या सर्व गोष्टींना कमीत कमी चार-पाच आठवडे लागणार होते. गुलाबजवळ तर पैशांची काहीच सोय नव्हती.
"सर, माझी संपूर्ण जमीन विकली तरीही वीस हजारापेक्षा जास्त पैसे मिळणार नाहीत. मला इतके पैसे उभे करणे केवळ अशक्य आहे. जमीन विकून माझ्या कुटुंबाच्या चरितार्थाचे साधनच घालवून बसण्यापेक्षा मी मेलेलोच बरा!''
एकटा गुलाबच मरणार नव्हता तर त्याच्यावर अवलंबून असलेले त्याचे दहा माणसांचे कुटुंबदेखील उघड्यावर पडणार होते. पैशांची जमवाजमव करण्याइतकाही वेळही त्याच्याजवळ नव्हता.
त्या दिवशी रात्री जेवताना माझे मन खिन्न झाले होते. माझ्या पत्नीला माझ्या खिन्नतेची चाहूल लागल्यामुळे मी तिला गुलाबविषयी सांगितले.
"अहो, तुम्ही त्याला साईबाबांच्या हॉस्पिटलमध्ये का नाही पाठवीत?'' सौ.माधुरीने सुचविले. मी एकदम चपापलो. श्री सत्यसाईबाबांच्या हॉस्पिटलविषयी मी केवळ ऐकूनच होतो. भारतातील हृदयशस्त्रक्रिया करणाऱ्या सात उत्तम रुग्णालयांपैकी "श्री सत्यसाई हॉस्पिटल'' एक होते. एक पैचाही मोबदला न घेता शस्त्रक्रिया करण्यासाठी ते प्रसिद्ध होते. देशविदेशातील अनेक तज्ज्ञ तेथे काही काळ निःशुल्क सेवा देत असतात. पुण्यातील सुप्रसिद्ध हृदयशल्य विशारद डॉ.अशोक कानेटकर हे ही तेथे वर्षभर सेवा देऊन आल्याचे मला ऐकून माहीत होते. मी रात्रीच फोनवरुन त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना सर्व माहीती दिली. डॉ.कानेटकरांनी लांडगे वकीलांना दुसऱ्याच दिवशी 'पुट्टपर्ती' येथे कसे जावे याचे मार्गदर्शन तर केलेच पण "सत्यसाई'' रुग्णालयाचे मुख्य डॉ.सफाया यांच्यासाठी शिफारस पत्रही दिले. "सत्यसाई हॉस्पिटल''मध्ये मोफत शस्त्रक्रिया होत असल्यामुळे खूप गर्दी असे व साहजिकच शस्त्रक्रियेसाठी सहा महिन्यांपर्यंत थांबावे लागत असे. डॉ.कानेटकरांनी शिफारसपत्रामध्ये आवर्जून लिहीले की "गुलाब हा रुग्ण रांगेमध्ये थांबू शकणार नाही. त्याच्या शस्त्रक्रियेला कृपया प्राधान्य द्यावे. त्याचे एकट्याचे प्राण वाचणे म्हणजे त्याच्या कुटुंबातील दहा माणसांचे प्राण वाचविण्यासारखे आहे.''
त्याच दिवशी संध्याकाळी आठ वाजता गुलाब व लांडगे वकील हे मद्रास मेलने पुट्टपर्तीसाठी रवाना झाले.

नेहमीच्या कामामध्ये पुढील दहा दिवस कसे निघून गेले ते समजलेच नाही. अकराव्या दिवशी दुपारी तीनच्या सुमाराला 'गुलाबाचे फूल' हातात घेऊन गुलाब व लांडगे वकील माझ्या क्लिनिकमध्ये आले.
"आज तुमचा जीना चढलो पण दम मुळीच नाही लागला!" गुलाब मला म्हणाला.
त्याने माझ्यासाठी आणले होते एक गुलाबाचे फूल व श्री सत्यसाईबाबांचा एक फोटो! तो फोटो आजही माझ्याकडे आहे.
आज या घटनेला जवळ जवळ अठरा वर्षे होऊन गेली आहेत. गुलाबची तब्येत अजूनही ठणठणीत आहे. त्याच्या कुटुंबालाही आता स्थैर्य आले आहे. पण आजही सत्यसाईबाबांचा फोटो त्याच्या देवघरात आहे. इतरांच्या मते सत्यसाईबाबा हे एक जादूगार असले तरी पण गुलाबसारख्या असंख्य रुग्णांच्या दृष्टीने ते एक देवदूतच!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेळेत मदत मिळून गुलाबचे प्राण वाचले. तुमच्या पत्नीने योग्य वेळी हा उपाय सुचवला याबद्दल त्यांचे आभार मानायला हवेत.

एखाद्या चित्रपटातील नायक दरीच्या टोकावर दोराने लोंबकळत असतो व त्या दोराचे अनेक धागे तुटून काही धाग्यांवरच तो लटकत असतो असेच जणू काय ते चित्र दिसत होते. अशी उपमा सुचणे म्हणजे धन्वंतरी असल्यासोबत आपल्याला सरस्वती सुध्दा प्रसन्न आहे.

अवांतर - होमीयोपाथ - डॉ हानिमान ( बहुतेक ) पुजनिय मानतात तर आयुर्वेदीक तज्ञ धन्वंतरी . अ‍ॅलोपाथ तज्ञांचे कोणते श्रध्दास्थान असते ?

Surekh....
Sir, tumhala eethe parat lihitana pahun khup anand zala..
Nehamich tumache lekhan khup positive energy denare asate..

चांगला लेख.
गुलाबचे नशीब म्हणून तो तुमच्यासारख्या सेवाभावी लोकांच्या संपर्कात आला.

सत्यसाईबाबांच्या हॉस्पिटलात गरीब रूग्णांवर केवळ नि:शुल्क शस्त्रक्रियाच होतात असे नाही तर पुढिल एक ते तीन महिन्याचे औषधही फुकट मिळते.
दुर्गम गावातल्या रूग्णांसाठी पुट्टुपर्थीला अफिलिएटेड एक डॉक्टर असतात जे पुढिल औषधोपचारही रूग्णांपर्यंत विनामूल्य पोहोचवितात त्यांची वार्षिक तपासणीची वेळ होईपर्यंत.

एकंदरच अगदी सेवाभावी संस्था आहे हे हॉस्पिटल.

वा, डॉ.साहेब - किती सुंदर आणि माहितीपूर्ण लेख ...

भारतातील हृदयशस्त्रक्रिया करणाऱ्या सात उत्तम रुग्णालयांपैकी "श्री सत्यसाई हॉस्पिटल'' एक होते. एक पैचाही मोबदला न घेता शस्त्रक्रिया करण्यासाठी ते प्रसिद्ध होते.>>>> ही नवीनच माहिती मिळाली. या मंडळींनी श्री गुलाब यांच्या शस्त्रक्रियेला प्राधान्य देऊन त्याचे प्राण वाचवले यासाठी त्या सर्व लोकांना सलामच ...

नमस्कार डॉक्टरसाहेब,

खरोखरच दिव्यत्वाची प्रचीती म्हणायला हवी. गुलाबची आयुष्याची दोरी बळकट होती.

अवांतर : माझाही असाच छुपा हृदयविकार होता. जरासा थकवा यायचा, पण गुलाबइतकी धाप कधीच लागली नाही.

आ.न.,
-गा.पै.

भारतातील हृदयशस्त्रक्रिया करणाऱ्या सात उत्तम रुग्णालयांपैकी "श्री सत्यसाई हॉस्पिटल'' एक होते. एक पैचाही मोबदला न घेता शस्त्रक्रिया करण्यासाठी ते प्रसिद्ध होते.>
ह्या माहितीबद्दल धन्यवाद . पण मला १ प्रश्न पडलाय .
पण 'लेफ्ट-मेन' अँजिओप्लास्टी त्यावेळी जगात एकच माणूस करु शकत होता तो म्हणजे, फ्रान्समधील डॉ.मार्क सिल्व्हेस्ट्री!
आत्ता आपल्याकडे अशी करणारे डॉक्टर्स उपलब्ध आहेत का ?

इतरांच्या मते सत्यसाईबाबा हे एक जादूगार असले तरी पण गुलाबसारख्या असंख्य रुग्णांच्या दृष्टीने ते एक देवदूतच!>>>>
डॉक्टर साहेब, सत्यसाईबाबांच्या व्यक्तिमत्वाविषयी जरी वाद असला तरी त्यांनी स्थापन केलेल्या हॉस्पिटलमध्ये गरीब रूग्णांवर मोफत उपचार करून जर त्यांना जीवनदान मिळत असेल तर ते त्यांच्यासाठी देवदुतच आहेत हे शंभर टक्के पटले. खर तर त्यावेळी तुमच्या पत्नीला त्या हॉस्पिटलची आठवण झाली त्यामुळेच गुलाबला जीवनदान मिळाले. मला तर गुलाबसाठी तुमची पत्नीच देवदुत आहे असे वाटते.

Atishay sundar lekh.... Tumchya pratyek lekha madhun Naveen Naveen shikayala milate Happy

एखाद्या चित्रपटातील नायक दरीच्या टोकावर दोराने लोंबकळत असतो व त्या दोराचे अनेक धागे तुटून काही धाग्यांवरच तो लटकत असतो असेच जणू काय ते चित्र दिसत होते. अशी उपमा सुचणे म्हणजे धन्वंतरी असल्यासोबत आपल्याला सरस्वती सुध्दा प्रसन्न आहे. >>>> +१००

खरंच नेहमीप्रमाणेच मस्त लेख. Happy

पण 'लेफ्ट-मेन' अँजिओप्लास्टी त्यावेळी जगात एकच माणूस करु शकत होता तो म्हणजे, फ्रान्समधील डॉ.मार्क सिल्व्हेस्ट्री!
आत्ता आपल्याकडे अशी करणारे डॉक्टर्स उपलब्ध आहेत का ? +1

गेल्या 6-7 वर्षांत काय काय तांत्रिक बदल झाले आहेत?