ऑल दॅट ब्ल्यू - मालदीव

Submitted by दिनेश. on 8 July, 2009 - 14:02

मालदीव, भारताच्या दक्षिण पश्चिमेचा एक छोटासा देश. मी तिथे एरवी जाण्याचे काहि कारण नव्हते. म्हणजे मला तसे भटकायला खुप आवडते. पण ते
निसर्गरम्य ठिकाणी. समुद्राचे मला तितकेसे आकर्षण नाही. ( दिल्लीकराना वाटते, तेवढे नक्कीच नाही.) कारण माझे बरेचसे आयुष्य समुद्राच्या सानिध्यातच गेलेय.

male.jpg

मालदीवला जायचे मुख्य कारण म्हणजे माझा पुतण्या केदार, हा तिथे असतो. हॊटेल मॆनेजमेंट्चा कोर्स प्रथम श्रेणीत पुर्ण केल्यानंतर, त्याला तिथल्या शेरेटन ग्रुपमधे नोकरी मिळाली. पहिल्यांदाच तो नोकरीसाठी देशाबाहेर गेला. आणि त्याची माझी वर्षभरात भेटही झालेली नव्ह्ती. तर त्याला भेटणे हा मुख्य उद्देश.

थॉमस कूक तर्फे मी माझे बुकींग परदेशातूनच केले होते. खरे तर एवढ्याश्या रजेत मला न्यू झीलंड्ला पण भेट द्यायची होती. पण या दोन्ही सहली एकाच तिकिटात होणे शक्य नव्हते. ( म्हणजे मला भारतात येणे आवश्यक होते ) पण त्यातल्या त्यात एक समाधानाची बाब म्हणजे मालदीवचा व्हिसा हा ऑन अरायव्हल आहे. हॉटेल बुकिंग थॉमस कूकनेच करुन दिले. केदारसाठी मला शेरेटनच्या फ़ूल मून रिसॉर्ट्मधेच बुकिंग करायचे होते. तेही करुन टाकले.

male1.jpg

न्यू झीलंडचा व्हीसा मला अपेक्षेपेक्षा फ़ाऱच लवकर मिळाला. त्यामूळे तिथले वास्तव्य वाढवले. तिथून भारतात आलो आणि बारा तासाच्या आत परत विमानतळावर आलो. मालदिव ( याला आपण माले म्हणू या. लाडाचे नाव म्हणून नव्हे, त्या देशाची ती राजधानी आहे ) ला जायला, मुंबईहून श्रीलंकन हि सगळ्यात
सोयीची सेवा आहे. तसे बंगरुळू व त्रिवेंद्रमहुन थेट सेवा आहे. पण मुंबैहुन श्रीलंकनच सोयीची आहे.
हे विमान होते पहाटे तीन वाजता. मुंबईत पाउस पडत होता, म्हणुन मी रात्री दहा वाजताच विमानतळावर हजर झालो. माझ्याकडे माझे स्वत:चे फ़ारसे सामानच नव्हते, पण केदारसाठी म्हणून आई आणि वहिनीने गूळपोळ्या, चटण्या, मसाले, सुका मेवा, मुक्ता चमक, च्यवनप्राश असे बरेच सामान बांधून दिले होते.
ते चेक ईन केल्यावर मी मोकळाच. पुर्वी सहार विमातळावर कायम दुष्काळी कामे चाललेली असत. आत मात्र तो चकाचक झालाय. माझ्यासारख्या (?) माणसांसाठी (???) तिथे चक्क टच स्क्रीन मॉनिटर्सवर गेम वगैरे आहेत. त्यामूळे वेळ मजेत गेला.

male2.jpg

या श्रीलंकन साठी मी ग्राऊंड हॅंडलींग एजंट म्हणून काम केले आहे, पण तरिही या विमानसेवेबद्दल माझ्या फारश्या अपेक्षा नव्हत्या. या देशाबद्दल पण माझ्या मनात अढी होती. ( कदाचित हे माझ्या श्रीलंकन मित्रांच्या जेवणाच्या पद्धतीमूळे असेल. त्याने माझ्यासमोर भातात चिकनचा रस्सा आणि श्रीखंड मिसळून कालवून खाल्ले होते. ) पण हे दोन्ही माझे पूर्वग्रह ठरले. आता या देशाला पण भेट द्यावेसे वाटतेय.

हे विमान छोटेसे असल्याने विमानतळाच्या वन अल्फा गेटवर लावले होते.छोटे म्हणजे ३ बाय ३ चे. नो टिव्ही स्क्रीन. सावळ्या आणि नम्र हवाई सुंदऱ्या. (त्यांच्या खास साड्यांमधे ) आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे भरपूर लेग स्पेस. एकदम घरगुति वाटायला लागले.
ईन फ़्लाईट मॅगझिन मस्तच होते. या एवढ्याश्या देशात शंभराच्या वर नद्या आणि चारशेच्यावर धबधबे आहेत. त्यांचे देखणे फ़ोटो होते त्यात. ( परत एवढ्याश्या देशात म्हणायचे कारण म्हणजे या देशापेक्षा जास्त क्षेत्रफळ असणाऱ्या लेक व्हिक्टोरियाच्या काठावर मी ३ वर्षे काढलीत.) नाश्त्याला खमंग बटाटेवडे होते. फ़्लाईट शो नसल्याने, बाहेर खाली दिसणारे लाइट्स गोव्याचे की मदुराईचे असा विचार करताच उजाडू लागले. आणि हिरव्यागार श्रीलंकेचे दर्शन होऊ लागले. भारतात येताना ज्यावेळी विमान कच्छच्या रणावरुन येते त्यावेळी हाच का तो आपला, "सुजलाम सुफलाम" देश असे वाटू लागते. पण श्रीलंका मात्र खराच हिरवागार दिसत होता. कोलंबोचा विमानतळ देखणा आहे. चकाचक आहे. मालेचे विमान लागलेलेच असल्याने माझ्याकडे वेळ नव्हता. ( तरिपण तिथून मायबोलीवर डोकावलोच )
मालेचे विमान मात्र मोठे आणि सर्व सुखसोयीनी अद्यावत होते. त्या विमानातली गर्दी खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल होती. (श्रीलंकन माले ला अनेक देशांशी जोडते. जपान, लंडन पासून थेट सेवा आहे ). कोलंबो ते माले हा प्रवास जेमतेम तासाभराचा. त्यात विमानात अनेक मधुचंद्रीय जोडपी. त्या रंगीबेरंगी वातावरणात माले आल्याची घोषणा झाली, आणि खाली बघितले तर जमिनच दिसत नव्हती. ( विमानाच्या उड्डाणाच्या सुरवातीला, इन द अनलाइकली इव्हेंट ऑफ़ इमर्जन्सी लॅंडींग वगैरे सांगतात, तसे होणार असे वाटू लागले. ) फ़ॉरवर्ड कॅमेरात शेवटी चिंचोळी धावपट्टी दिसू लागली. आणि विमान तिथे उतरले.

male3.jpg

माले म्हणजे १२०० बेटांचा एक देश. जगाच्या नकाशात दाखवतात तर तो ठिपक्या ठिपक्यानेच, इतका छोटा. ते ठिपके म्हणजे बेटं नव्हेत, तर बेटांचे समुह. बेटं अगदीच छोटी छोटी. राजधानी असलेले बेट आपल्या दादरपेक्षाही छोटे. या बेटावर विमानतळाला जागाच नाही म्हणून शेजारचे एक बेट विमानतळासाठी दिले आहे. या १२०० बेटांपैकी केवळ २०० बेटांवर वस्ती आहे आणि त्यापैकी ८७ बेटांवर रिसॉर्टस आहेत. लोकसंख्या फ़क्त तीन लाख.
इथल्या लोकांचे मूळ इतिहासाला माहित नाही. ते भारतीय वंशाचे वाटत नाहीत. त्यांची भाषा "दिवेही" ऐकताना बरीचशी मल्याळम सारखी वाटते. ती म्हणॆ संस्कृत व अरेबिक यांच्या मिश्रणातून बनलीय. शुक्रिया, बराबर असे काहि ओळखीचे शब्द सोडले तर भाषा ओळखीची वाटत नाही. लिपी तर फ़ारच किचकट. पण त्याने काही अडत नाही. व्यवहारात सगळीकडे इंग्रजीच वापरतात. हा देश पुर्णपणे मुस्लीम. ( म्हणुन इस्लामला अप्रिय असलेल्या तीन वस्तू, दारू, मुर्ती आणि डुक्कर तिथे नेता येत नाही. पण घाबरु नका, इंटरनॅशनल प्रॉपर्टीज वर दारु आणि पोर्क उपलब्ध आहे.) पण एरवी काहि जाचक बंधने नाहीत.

माझी तारीख ठरल्यापासून केदारचे सारखे फ़ोन येत होते. दिनू ( हो तो मला दिनूच म्हणतो ) तूला न्यायला हा येईल. तू आलास कि मला लगेच कळव वैगरे. ( खरे तर त्याला वेगळाच प्रश्न पडला होता. या कट्टर शाकाहारी माणसाला काय खायला घालायचे ते. हा प्रश्न माझ्या सर्वच मित्रमैत्रीणीना पडतो, हा भाग वेगळा.)

male4.jpg

विमानतळ अगदिच छोटासा. विमानातून उतरल्यावर चालत जायचे. ( हा प्रकार करुन बरीच वर्षे झाली असतील नाही का ? ) सगळ्याजणात अगदी उत्साह भरुन आला. बहुतेक जणानी विमानाचे फ़ोटो काढायला सुरवात केली. विमानतळाच्या मानाने विमानच खुप मोठे दिसत होते. इमिग्रेशनमधे जुजबी चौकशी झाल्यावर बाहेर पडलो, तर फ़ूल मून रिसॉर्ट चा बोर्ड घेउन माणूस उभाच होता. ( आधीच सांगतो हे रिसॊर्ट बरेच महागडे आहे. दिवसाचा खर्च ६०० ते ७०० डॉलर्स आहे. त्या मानाने श्रीलंकनचे तिकिट बरेच स्वस्त म्हणजे १९ ते २० हजार रुपयाना पडते. ) माझ्यासाठी चकाचक स्पीड बोट आली होती. मी एकटाच होतो आणि दिमतीला तीन माणसे. सामान वगैरे परस्पर उचलण्यात आले. बोटिची क्षमता ४३ आणि प्रवासी मी एकटा. बोटीत विमानातल्याप्रमाणे फ़्रेश टॉवेल आणि ज्यूस देण्यात आला.आत केबिनमधे बसवल्याने समुद्रवारा वगैरे काहि नव्हते. आतून मी काही फ़ोटो काढलेच. १५ मिनिटातच रिसॉर्ट वर पोहोचलो. समुद्राचा तळ दिसणे, म्हणजे अप्रुपाचेच. बोटीतून धक्क्यावर उडी मारताना, समजा पाय घसरुन खाली पडलो तर, असा विचार मनात येतोच. मुंबईच्या गेटवे वर असा विचार आला तर ते शेवटचेच पाऊल ठरणार असे वाटते, इथे मात्र नितळ पाण्याखाली दिसणाऱ्या रेतीचा आधार वाटला.
रिसेप्शन अगदिच साधे पण प्रशस्त. ( मुख्य रिसेप्शन वेगळे आहे ) माझ्या नावाची कागदपत्रे तयारच होती. पाच दहा मिनिटात सोपस्कार आटपले. एक रशियन ललना, मला छोट्याश्या गाडीत बसवून माझ्या रुमवर घेऊन आली. वाटेत अखंड बडबड. त्यात मधे गाडीखाली एक सरडा येता येता वाचला. ( बेटावर तेवढेच वाईल्ड लाईफ़ ) रुम मात्र अगदी प्रशस्त. थेट ब्रिटिश काळातली. उत्तम फ़र्निचर. अद्यावत सुखसोयी. भला मोठा ब्राव्हिया चा टिव्ही आणि थेट समुद्राकडे उघडणारी मागची बाजू. तिथेहि पाय धुवायची सोय.

male5.jpg

माले विषुववृत्ताला लागूनच असल्याने, सुर्य प्रखर. त्वचा नाजूक असेल तर क्रीम आवश्यक आहे. म्हणुम मी जरा उन्हे उतरायची वाट बघत बसलो. केदार लगेच भेटायला आला. मला मात्र त्याच्या घरी जायची परवानगी नव्हती आणि त्यालाही खास परवानगी घेऊनच माझ्याकडे यावे लागले. भरपुर गप्पा झाल्यावर त्याच्या ड्यूटीची वेळ झाली म्हणून तो गेला. मी ताणून दिली. पाच वाजता कॅमेरा घेउन बाहेर पडलो.
पहिल्यांदा डोळ्यात भरते ती निळाई. निळ्या रंगाच्या इतक्या छटा या पाण्याला आहेत, कि आपल्या डोळ्यांवरचा विश्वास उडावा. मी जे फ़ोटो काढले त्यात ती सर्व निळाई उतरली आहे असे अजिबात नाही. पण त्या निळाईचे वर्णन ही मी करु शकत नाही. या निळाईत स्वत:ला झोकून द्यावे, "ऐसी तमन्ना, एक नही कई बार हुई ".

तिथल्या वास्तव्यातला माझा बराच वेळ मी समुद्रकिनारीच घालवला. अगदी सकाळी ५ वाजताच मी तिथे जाउन बसायचो. रात्री उशीरापर्यंत तिथेच असायचो. सकाळी सर्वत्र धुके असायचे. त्यावेळी जागेपणी स्वप्नात वावरत असल्यासारखे वाटायचे.
रात्री केदारने त्याच्या सर्व मित्राना माझ्यासाठी कामाला लावले होते. त्या बेटावर किंवा त्या देशातच फ़ारसे काहि पिकत नाही. सर्वच आयात करावे लागते. पण ब्रेकफ़ास्ट आणि डिनरही कुठल्याही पंचतारांकीत हॉटेलात मिळते तसेच होते. त्या ठिकाणी उत्तम चीज, सलाद उपलब्ध करुन देणे सोपे अर्थातच नाही. त्यातले निवडक शाकाहारी पदार्थ मी खातोच, पण केदारचे मित्र माझ्यासाठि खास चपात्या, पराठे, चना मसाला, मसाला चाय असे पदार्थ पेश करत असत. साधी चॉकलेट्स पण उत्तम सजावट करुन पेश करत असत. त्यानी तयार केलेल्या पेष्ट्रीज खायचा मला मोह होत असे, पण माझे खास पदार्थ खाल्ल्यावर मला भूकच उरत नसे. तिथे सुभाष भट नावाचा उत्तरांचल मधला शेफ़ आहे. तोही माझ्यासारखाच कट्टर शाकाहारी आहे. चक्क मंगळवारचा उपास करतो.

male6.jpg

या सगळ्या बेटावर मी भरपुर फ़िरलो. ( छोटेसे बेट आहे. एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे जायला, १५ मिनिटे पुरतात ) पण त्या सर्व जागेचा उत्तम वापर केलाय. जिम, स्विमिंग पूल सारख्या सोयी आहेतच. शिवाय स्पा पण आहे. काहि रुम्स थेट समुद्रातच बांधल्यात. त्याच्या मागच्या बाजूने थेट समुद्रात उतरता येते. बेटावर भरपुर हिरवाई आहे. सर्व रुम्स झाडात लपलेल्या आहेत. अनेक प्रकारच्या जास्वंदी, बोगनवेली, चाफ़ा, रुक्मिणी अशी झाडे आहेत. उंडी, नोनी पण दिसले. थोडीफ़ार नारळाची झाडे देखील आहेत.

सगळीकडे शुभ्र वाळू. समुद्रातून फ़ारसा कचरा येत नाही. झाडांची गळून पडलेली पाने, तत्परतेने साफ़ केली जातात.पक्षीही नाहीत फ़ारसे. बेटावर थोडी वटवाघळे आहेत. दूरवर मोठ्या बोटी जाताना दिसतात. पण एकंदर निवांत जागा.

male7.jpg

बेटाभोवतीचा समुद्र खास बंधारे बांधून पोहण्यासाठी सुरक्षित केलाय. तिथे मोठ्या लाटाही येत नाहीत. अगदी किनाऱ्य़ालगत अनेक शोभेचे मासे दिसतात. सोनेरी रंगाचे आणि काळ्या पिसाऱ्याचे शार्क मासेहि दिसतात. पण खाण्याजोगे फ़ारसे मासे नाहीत. ते सगळे आयात करावे लागतात. नेहमीचे वॉटर स्पोर्टस आहेतच. प्रवाळ पण भरपूर आहेत. किनाऱ्यालगतही दिसतात. पण ते उचलून आणायला परवानगी नाही.
पण या सगळ्यांपे़क्षा काहिही न करता किनाऱ्यावर पडून रहाणेच मी पसंत केले. दोन दिवस स्वत:चे लाड करुन घेतल्यावर परतीचा प्रवास सुरु झाला. हे रिसॉर्ट तसे विमानतळापासून आणि माले गावापासुन जवळच आहे. आजुबाजुला एक दिवसात जाउन येण्यासारखी अनेक बेटे आहेत. काहि ठिकाणी फ़िश फ़ार्म आहेत. विमानतळावरुन एअर टॅक्सीज मिळतात. त्यांची खास उड्डाणे जरा कमी उंचीवरुन केली जातात. लगुन्स चे उत्तम दर्शन घेता येते.

चेक आऊट केल्यानंतरही माझ्याकडे भरपूर वेळ होता. विमानतळावर बसण्यापेक्षा मी गावात जायचे ठरवले. दहा रुफ़्फ़िया ( त्यांचे चलन. १ डॉलर म्हणजे १२.७५ रुफ़्फ़िया. पण डॉलर सगळीकडे चालतात ) भाड्यात बोटीने गावात गेलो. गाव अगदीच छोटे पण स्वच्छ. दर्शनी भागात मोठमोठ्या सरकारी इमारती. स्टेट बॅंक ऑफ़ इंडीया, ची मोठी इमारत आहे. मागच्या भागात घरे. पण एवढ्याश्या गावात दोन फ़ुटबॉलची मैदाने.
तिथला समुद्रकिनारा मात्र रौद्र. भल्यामोठ्या लाटा. पण निळाईचा वसा न सोडलेल्या. एका बाजूला बाजार. नेहमी अश्या टिकाणी असतो तसाच. शंखशिंपले, कपडे विकणारा. थोडाफ़ार भाजीपाला, मासे. तासाभरातच सगळा गाव पालथा घातला मी. परत विमानतळावर गेलो. विमानतळ अगदी समुद्रकिनारी. नीटस. स्वच्छ. भरपूर मोकळा. कुठलेच फ़्लाईट नसल्याने, दोनचार माणसे इकडे तिकडे. शहरातून येणाऱ्या बोटीही रिकाम्याच. दुकानात नेहमीचे सामान. खास मालदिवचे असे काहि शंख शिंपले. माश्यांची चित्रे. थोडीफ़ार पोवळी.
नारिताहून येणारे माझे विमान बरेच आधी उतरले. मग मी आत गेलो. तिथेहि नेहमीची मोठी दुकाने. खास मालदिवचे म्हणुन नारळ ( हो हो नारळ, प्रत्येकी एक डॉलरला ) सुका मेवा म्हणून मुंबईत सर्वत्र आढळणाऱ्या बदामाच्या झाडाच्या बिया. श्रीलंकन चहा. विमान वेळेवर सुटले.
यावेळी कोलंबोला थोडासा वेळ मिळाला. चहा वगैरेची खरेदी केली. टि शर्ट घेतले.

एकंदर मालदीवची ट्रिप मजेत पार पडली. एवढासा देश पण संपुर्ण विमानतळ वायफ़ाय. प्रदूषण नावालाही नाही. त्याबाबतीत देश अत्यंत जागरुक. पण देशाला भविष्य नाही. आपण सर्वानी केलेल्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे येत्या काहि वर्षात, सर्व देश पाण्याखाली जाणार आहे. हि सगळी लोकसंख्या मग ऑष्ट्रेलियामधे स्थलांतर करणार आहे. तसे ठरलेही आहे. परत बघता येईल का, कुणास ठाउक ?

male8.jpg

गुलमोहर: 

आज माझे पिकासा चालत नाही. यातला कुठलाच फोटो त्यात एडीट केलेला नाही. सर्व नैसर्गिक रंग आहेत.

फोटोज आणि वृतांत दोन्ही मस्त. निसर्गाची इतकी छान देणगी माणसाच्या चुकांमुळे लोप पावेल!

मस्त लेख. कधि एकदा मालदीव अथवा लक्षद्विपला जातोय असं झालयं!
>> आपण सर्वानी केलेल्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे येत्या काहि वर्षात, सर्व देश पाण्याखाली जाणार आहे.
बापरे!!

इतकं सुंदर वर्णन व फोटो पाहील्यानंतर शेवटचे वाक्य वाचून कसंतरीच झाले! Sad
असं नको व्हायला!

www.bhagyashree.co.cc/

दिनेश, आवडलं वर्णन आणि फोटोपण.

छान आहेत सर्व फोटो. ईथे सामोआ ( साउथ पॅसिफिक मध्ले एक आयलण्ड)ला पण असेच सुन्दर बीच आणी निळ्या पाण्याच्या शेडस दिसतात.

वर्णन आणि फोटो दोन्ही सुरेख Happy

-------------------------------------------------------------------------
जो संपतो तो सहवास, आणि ज्या निरंतर रहातात त्या आठवणी

खूपच छान वर्णन आणि फोटोज.. Happy
शेवटचा परिच्छेद मनाला चटका लावुन गेला Sad

०-------------------------------------------०
दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?

मी दोन दिवसापुर्वी मालदिवमध्ये अलाइड इन्शुरन्स मध्ये जॉइन झालो आहे.... लेख खूप आवडला.... हे आता सगळे मीही पाहून घेईन.... ( मालदिवला जायला यलो फिवर चा डोस लागत नाही ही किती समाधानाची गोष्ट आहे ना ! Happy ) आता लवकरच इन्डिया क्लबला जॉईन होईन... तिथे बहुधा केदारही असेलच... १५ ऑगस्टला मोठा कार्यक्रम असतो म्हणे.... मालदिवमध्ये असलो तरी ऑफिसात मात्र कायम भारतात असल्यासारखे वाटते..... सतत हिन्दी गाणी सुरु असतात... तेरे नाम, फिजा आणि हिमेशची गाणी (!) इथे कायम सुरु असतात..........

डॉ. गजानन कागलकर,
अलाइड इन्शुरन्स कं. लि.
एस टी ओ ट्रेड सेंटर, पहिला मजला.
माले सिटि, रिपब्लिक ऑफ मालदिव्ज...

छान माहितीपूर्ण लेख अन फोटो. एक डेस्कटॉपवर चिकटवला.. Happy
व्वा मज्जा आहे जा.मो.प्या.ची.. Happy

दिनेश मस्त वर्णन अजुन फोटो असल्यास टाका. एकदा येथे जायला हवे.

मंदार

सगळे फोटो सुंदर! आधी २-३ दा नुसते फोटोच बघुन घेतले. वर्णनही छान, नेहमीसारखंच.

लेख छान आहे. शेवटचा फोटो कसला आहे? कळलं नाही.
- सुरुचि

सुंदरच !
***************
अबीर गुलाल उधळीत रंग | नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग ||

छान लिहिलंय, फोटो सुंदर!
---------------------------------------------
यह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..

छानच दिनेश.. मस्त लेख.

शुभान्गी
छान लिहिलंय, जेवढे फोटो सुंदर तितकच वर्णनही सुन्दर.

छान वर्णन, अप्रतिम फोटो Happy

~~~
मन उधाण वार्‍याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान कसे गहिवरते...

खुप महितीपूर्ण आणि तरीही मनोरंजक वर्णन... धन्यवाद!

आशिष दामले
कार्यक्रम प्रबंधक, दक्षिण आणि मध्य एशिया
सेव्ह द चिल्ड्रन, स्वीडन

छान लिहीलय. फोटो सुरेख!

फोटो आणि माहीती दोन्हीही मस्त Happy

पण शेवटचे वाक्य वाचुन गलबलुन आले Sad
************
To get something you never had, you have to do something you never did.

हे घ्या त्या निळाइचे आणखी काही तुकडे !!!

m1.jpgm2.jpgm3.jpgm4.jpgm5.jpg

अतिशय सुरेख! फोटो आणि वर्णन सगळेच छान. काही फोटोत पण समुद्राचा तळ दिसतोय. पाण्याचा रंग पण वेगळाच निळा आहे.

अहाहा! नितळ समुद्राचे सुंदर फोटो आणि वर्णन!

<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...

http://www.maayboli.com/node/7762#comment-249911

Pages