अघटीत

Submitted by नितीनचंद्र on 13 August, 2010 - 11:40

नेहमी प्रमाणे सोमवार उजाडला. रविवारच्या सुट्टीचा आनंद घेऊन चाकरमाने कामावर वेळेवर रुजु झाले. ही चाकरीची चाकोरी मान्य नसलेले चाकरमाने उशीरा का होईना रुजु झाले. सरकारी,निमसरकारी ऑफिसमधे उशीरा येण्याची चैन परवडते कारण साहेबच उशीरा येत असतात आणि तो पर्यत मस्टर उघडे असते. मग काही नेहमी प्रमाणे उशीरा आले.

स्टेट बँकेच्या रिजनल ऑफिसमधे आज तेच घडले. महेश रोजच कधी वेळेवर येत नाही. दर सोमवारी तर हक्काने उशीरा येतो. मग अर्धा दिवस का उशीर झाला याची चर्चा करण्यात, साहेबांना पटवुन लेट मस्टर ऐवजी नेहमीच्या मस्टरवर सही करण्यात जातो. साहेबांच्या दृष्टीने महेशला उशीर का होतो किंवा तो लेट मस्टरवर सही का करत नाही ही कारणे महत्वाची नसतात. यापेक्षा तो आपल्याकडे येतो, उशीर का झाला याचे कारण सांगतो आणि उशीरा न येण्याचा उपदेश ऐकुन घेतो हेच समाधानाचे असते. कोणीतरी आपला साहेब असण्याला महेश किंमत देतो यातच साहेबांना समाधान.

साहेबांना महेशच्या करामती चांगल्या माहितीच्या होत्या. स्टेट बँकेच्या रिजनल ऑफिसमधे त्याला स्वतःचा असा पोर्टफोलिओ नव्हताच तरी पण सर्व साहेबांच्या दृष्टीने तो कामाचा माणुस होता. रिजनल ऑफिसची सर्व चाकोरीच्या बाहेरची काम करण्याचा हातखंडा त्याला बदली पासुन वाचवत होता. त्याच्या उशीरा येणे, लवकर जाणे या अवगुणांवर पांघरूण टाकत होता.

ऑफिसमधे ऑडीटर येणार आहेत त्यांना एअरपोर्टवर रिसीव्ह करायला जायचे आहे. सकाळी सहा वाजल्यापासुन महेश कामाला लागायचा. ज्या गाडीने त्यांना एअरपोर्ट पासुन आणायचे ती गाडी स्वच्छ धुतलेली आहे का नाही. त्याचे दरवाजे निट उघडतात की नाही इथपासुन त्यागाडीचे कागदपत्र ड्रायव्हरने घेतले आहेत किंवा नाही याची बारकाईने तपासणी केल्या शिवाय तो ऑडिटरना रिसीव्ह करायला जात नसे. ऑडीटरची हॉटेलमध्ये रहायची व्यवस्था, संध्याकाळी फिरायला, खरेदीला जायची व्यवस्था सर्व काही बिनचुक करण्यात तो समाधान मानी. शेवटी जाताना त्यांना गिफ्ट देऊन कडक रिमार्क सौम्य करुन विमानतळावर पोचवुन त्याची ड्युटी संपे.

१५ ऑगस्ट, २६ जानेवारीचे झेंडावंदन, बदली होऊन आलेल्या रिजनल मॅनजरच्या मुलांचे अ‍ॅडमिशन, दुसर्‍या साहेबांच्या मुलाने केलेला अ‍ॅक्सीडेंट मधे तडजोड करुन समोरच्या पार्टीच्या लोकांना पोलीस तक्रार मागे घ्यायला लावणे इ कामे तो सहजतेने, लिलयेने करत असे. कोणत्यातरी ब्रॅचमधे तिजोरीच्या कुलपात बिघाड होऊन उघडत नसलेले कुलुप असो किंवा वीज बिल भरले नाही म्हणुन लाईट तोडायला आलेले वीज बोर्डाचे अधिकारी असोत महेशपुढे शरणांगती घेत. या शिवाय सामान्य स्टाफ लाही मदत करण्यात तो आघाडीवर असे.

दररोजची महेशचा ऑफिसमधे प्रवेश म्हणजे झोपलेल ऑफिस जाग होण्याची वेळ असे. तो आला म्हणजे प्युन पासुन रिजनल मॅनेजर पर्यत सगळयांना नमस्कार, गुड मॉर्निंग, वड्क्कम, जवळ जवळ सर्वच भाषात अभिवादन करत, पुरुषांच्या नविन शर्टची किंवा स्त्रीयांच्या ड्रेस्-साडीची प्रशंसा करत स्वारी कामाला लागायची.

ऑफिसर नायर सोडता त्याला समोरा समोर नाव ठेवणार कोणी नव्हत.
" आया आया स्टेट बँक का दामाद आया" हा रोजचा डायलॉग मारल्या शिवाय अटेंडन्स रजिस्टर महेशला नायर देत नसे.
हे सर्व ऐकुनही महेश त्याला "गुड मॉर्निंग बॉस" म्हणुन हसुन अभिवादन करत असे.
"गुड आफटरनुन होनेको आया फिरभी गुड मॉर्निंग बॉस बोलता है."
कैसा कैसा लोग रिक्रुट किया है. काम तो आता कुछ नाही उपरसे लेट आता है." "लो, लो अटेंडंन्स रजिस्टर" अस म्हणुन नायर त्याच्यापुढे रजिस्टर आपटत असे.

" नायरसाब गुस्से मे है" अस महेश शेजारच्याला म्हणत असे आणि हसत अटेंडंन्स रजिस्टरवर सही करुन जात असे.

"एक दिन स्टेट बँक मे ये रजिस्टर के जगह जब कार्ड पंचिंग आएगा तब समझेगा सबको."
नायरला पर्सोनेल डिपार्ट्मेंटचा चार्ज दिल्यापासुन एखाद्या वेळी उशीरा येण्याची संधी नायरने गमावली होती. अटेंडंन्स रजिस्टर त्याच्या ड्रॉवरमधे असायचे. तो उशिरा आला की त्याच्या टेबलभोवती लोक सह्या करायला जमा व्हायचे आणि तो वेळेवर आला नाही लक्षात यायचे. मग ही चिडचिड व्यक्त साधारण दोन चार दिवसाने केली जायची. त्याच्या कडे फारस लक्ष कोणी द्यायच नाही. हा सगळा राग मग महेशवर निघायचा कारण तो रोजच साधारण अर्धा पाऊणतास लेट यायचा.

नायरच्या मेहुणीची नेमणुक महेश आसवानीच्या मुळे हुकली होती. केरळ लॉबीत पक्की फिल्डींग लाऊनही ऐन वेळेला महेशच्या मुळे त्यांना माघार घ्यावी लागली होती. महेशला ही नोकरीच करायची नव्हती. त्याला व्यवसाय करायचा होता जातभाईंसारखा. पण वडिलांचा अवेळी अपघाती मृत्युने त्याला अनुकंपा तत्वावर स्टेट बँकेत नोकरी मिळाली होती. नाईलाजास्तव त्याला ती स्विकारावी लागली होती. त्याचे वडील अतिशय हुशार ऑडिट ऑफिसर म्हणुन स्टेट बँक मध्ये नावाजलेले होते.

नेहमी एखाद्या विजयी योध्यासारखा ऑफिसमधे प्रवेश करणारा महेश आजच्या सोमवारी नेहमी प्रमाणे उशिराच पण एखाद्या चोरासारखा गुपचुप आला होता. आज नायर सुट्टीवर होते त्यामुळे अटेंडंन्स रजिस्टर एखाद्या बेवारस प्रेतासारखे त्यांच्या टेबलावर उघडे पडले होते. महेशने गुपचुप सही केली आणि आपल्या जागेवर जाऊन बसला.

सकाळी अकरा वाजता सगळेजण आपपल्या कामात मग्न असताना माधवीच लक्ष महेशकडे गेल.
" काय रे महेश, तुझ्या टेबलवर बसलायस आणि तोही गुपचुप ?" माधवीने त्याची चौकशी करताच सगळ्या सेक्शनच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. क्षणभर ऑफिसला घड्याळाचे काटे थांबल्याचा भास झाला. महेशच टेबल हे नावाला होत. या टेबलवर स्वारी कधीच नसे. कुठेतरी अर्जंट काही हव असेल त्याच्या टेबलवर मदतीला जाण हे त्याच ऑफिसमधल काम. टेबलाचा उपयोग जेवण झाल्यानंतरची मुखशुध्दी ठेवायला. जास्तीचे स्टेपलर्स , व इतर स्टेशनरी ठेवायला आणि कुणी मागीतली तर ती पुरवण्यासाठी पटकन हाताशी असायला.

महेश आज मान खाली घालुन बसला होता. माधवी आणि स्टेला या दोघींची नेत्रपल्लवी झाली. कोणालाच महेश शांत का आहे याच कारण कळत नव्हत. किरकोळ कारणावरुन नाराज होऊन गप्प रहाण्याचा महेशचा स्वभावच नव्हता. मग घडल तरी काय ? महेशने अद्याप लग्नही केल नव्हत म्हणजे घरगुती या कारणासाठी सुध्दा काहीच नव्हत. त्याची विधवा आई आणी तो दोघच रहात होते.

सिनीयर ऑफीसर राजे यांनी सगळ्यांना शांत राहुन जास्त चौकशी न करण्यास दटावले तेव्हा कुठे लोक कामाला लागले. लोक कामाला तर लागलेच पण महेश शांत का आहे यावर कुजबुजण्यासाठी उत्सुक होते.

कसा बसा लंच टाईमपर्येंतचा वेळ गेला. नेहमीप्रमाणे महेशने डबा आणलेलाच नव्हता. तो काही मागवतो का यावर स्टेलाचे लक्ष होते. महेशचे कशातच लक्ष नव्हते. लोक रिकाम्या टेबलावर जेवायला बसले. नेहमी प्रमाणे पुरुषांचा एक ग्रूप जो कधीच महेशला जेवायला बोलावत नसे. दुसरा लेडिजचा ग्रुप. यात स्टेला महेशची वर्ग मैत्रीण असल्यामुळे तिला त्याला सोडुन जेवणे जमायचे नाही. त्याने डबा आणला तरी आणि खालुन जेवण मागवले तरी ती तिच्या डब्यातले त्याला थोडेसे तरी दिल्याशिवाय रहात नसे. सुरवातीला लेडिज ग्रूप मध्ये यावर चर्चा होत असे. आता तर स्टेलाचे लग्न झाल्यावरही हे चालु राहिल्यामुळे यात नाविन्य राहिले नव्हते. या दोघांची निख्खळ मैत्रीच आहे यावर सर्वांचे आणि खास करुन महिलांचे एकमत होते.

पुरुषांची पंगत बसली स्त्रीयांचीही बसली तरी महेश अजुन उठला नव्हता. पाय लांब करुन खुर्चीच्या मागे डोके टेकवुन कुठल्याश्या विचारात गढला होता. मग स्टेला जवळ गेली. "खाना नही खाना क्या ? " महेशने तीच्याकडे एकदा कटाक्ष टाकला आणि पुन्हा तो विचारात गढला. " क्या हो गया है ? इतना क्यु अपसेट हो ? मै मंगाऊ क्या डोसा ? मेरा टिफिन खाता क्या मै मेरे लिए कुछ मंगाती हु. इतक्या वाक्यांची सरबत्ती झाल्यावर स्टेलाने समोर धरलेला टिफीन महेशने आपल्या हातात घेतला. ती लेडीज टेबलवर चालु पडली. आज प्रथमच कोणाशी न बोलता महेश आपल्या स्वतःच्या टेबलवर जेवण करत होता.

लंच टाईम संपला तरी परिस्थीतीत काहीही बदल घडला नाही. महेशने स्टेलाचा टिफीन संपवला. स्टेलानेच रिकामा डबा आपल्या जागेवर आणला. दोघात पुन्हा काही संवाद घडला नाही. असे प्रथमच घडत होते. जरी स्टेला त्याची वर्गमैत्रीण असली तरी महेशचा खरा जिवाभावाचा सखा अनिलच होता. अनिल प्युन होता तरी दोघांच्यात घट्ट मैत्री होती. मनातले बोलण्यापासुन एखादा पेग मारण्याची इच्छा असली तरी महेश अनिलशिवाय कोणालाच जवळ करत नसे. आज लंच टाईम पर्यंत अनिल आलेला नव्हता.

लंच टाईम संपता संपता अनिला आला आणि सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर पडल्या.

"काय अनिल आज काही खास ?" जोश्यांनी मुळ विषयाला हात न घालता लांबुन चौकशी केली. अनिल डॉट मॅट्रीक्स प्रिंटर वर पेपर लोड करत होता. जोशींचा पुकार ऐकुन त्याने हातातले काम संपवुन जोशींच्या टेबलाकडे धाव घेतली.

"अहो, प्री प्रींटेड स्टेशनरी संपली होती. शनिवारी बोंब झाली. गुप्ता च्या दुकानात गेलो. त्याच्याकडे डिलिव्हरी बॉय नव्हता. शेवटी मीच उचलली आणि आणली. हे घ्या व्हाऊचर, करा सही " म्हणुन रिक्षाच्या बिलाचे पैसे लावलेल व्हाऊचर अनिलने जोशींच्या पुढे ठेवल. खर तर प्रि प्रिटेड स्टेशनरी थोडी शिल्लक होती. काहीतरी स्वतःच काम असेल म्हणुन अनिलने रिक्षाचे पैसे पण मिळवायचे आणि हाफ डे ऑन ड्युटी लागावी यासाठी हा केलेला प्लॅन होता.

" तुझी नाटक कळतात मला" सही करताना जोशींनी शेरा मारला " पण भर उन्हाळ्यात तिकडे ठंडावा कसा आला ?"
अस म्हणत नेहमीच्या पध्दतीने महेशचे नाव न घेता अनिलकडे महेशची चौकशी केली.

अनिलही महेश आपल्या टेबलावर शांत पणे बसलेला पाहुन चक्रावला. सध्या त्याची आई त्याच्याकडे लग्न कर म्हणुन लकडा लाऊन आहे हे त्याला माहित होत. महेशला इतक्यात लग्न करायच नव्हत. त्याला इतक्यात ही जबाबदारी नको होती. अजुन काही काळ खुषाल रहायचे होते म्हणुन तो चालढकल करत होता.

त्याची आई अक्सीर इलाज नावाखाली कृती करण्यात पटाईत होती. कालच्या रविवारी असच काही झाल असणार. महेशला मुलगी पहायला नकार देण्यास संधी न देता त्याच्या आईने मुलीला आणि तिच्या नातेवाईकांना घरी बोलावले असणार. पण महेशने असली कित्येक किरकोळ प्रकरणे हातावेगळी केली होती. अंगाशी आलेल्या एका प्रकरणात तर महेशचे ऑफिसमधल्या एका विवाहीतेशी लफड आहे असा निनावी फोन त्यामुलीच्या घरी अनिलनेच केला होता. मग आता काय झाल ?

जोशींनी पेटी कॅशमधुन पैसे देताच अनिल तडक महेशच्या टेबलावर गेला. आता सगळ्यांच्या नजरा त्या दोघांच्यावर होत्या. अनिलने नेहमीपेक्षा हळु आवाजात " क्या बॉस कल मॅच मे पहिले बॉल पर विकेट गया क्या ? " असा खास परवलीच्या शब्दात पण रोख ठोक काल पहाण्याचा कार्येक्रम होऊन याला लग्नाला हो म्हणाव लागल की काय अश्या स्वरुपात त्याने विचारणा केली. महेशने फक्त मान हलवली. याचा अर्थ ना पहाण्याचा कार्येक्रम झाला ना मुलीला हो म्हणावे लागले. अश्या मॅटरमध्ये महेश चल अण्णा के पास चलते है म्हणायचा. लोकांचे कान लागलेले असायचे मग ऑफीसमधे नीट बोलता यायचे नाही. मग अण्णाच्या पानाच्या दुकानात एक सिगारेट शिलगाऊन महेश त्याच्या व्यथा सांगायचा. अनिल वयाने मोठा होता. यातुन बाहेर कस पडायच याचा नेमका सल्ला तो द्यायचा.

अनिलने महेशला खुणावले की चल अण्णाकडे जाऊ. महेश नाईलाजाने उठला. आता दोघे खाली जाणार आनी काही वेळाने का होईना पण महेशला काय झाले आहे हे कळणार अशी खात्री उत्सुक स्टाफची झाली.

आपल्या खास नेव्ही कट विल्स चा जोरदार कश लावत अनिलने तीच सिगरेट महेशच्या हातात दिली. महेशला मराठी छान बोलता यायच

. "काही नाही रे माझा लोणावळ्यात एक मावस भाऊ रहातो त्याने रे रहायला बोलावल शनिवारी रात्री " महेशने धुर सोडता सोडता तोंड उघडल. " मग काय गेलो त्याच्या कडे. गप्पा मारता मारता तो म्ह्णाला की त्याच्या घराच्या वरच्या डोंगरावर एक बाबा रहातो. तो का नाय प्लँचेट करतो. "

प्लँचेट म्हणजे ? अनिलला बर्‍याच गोष्टींचे अपडेट नसायचे. मग त्याची मस्करी न करता समजाऊन सांगणारा एकच व्यक्ती तो म्हणजे महेश.

"प्लँचेट म्हणजे तो बाबा मेलेल्या माणसांना बोलावतो. आणि त्यांच्याशी बोलतो"

"छ्या ... कायतरीच " माणुस एकदा का मेला की सगळा संपला. असला काय मला पटत नाय" अनिलने पुण्यात येऊन कोकणी भाषा बदलुन बोलायचा यशस्वी प्रयत्न केला पण एखादा विषयात त्याचा फर्स्ट ब्रेन त्याचा ताबा घेत अशी काहीतरी प्रतिक्रिया देतो की मग कोकणी हेलच बाहेर पडतो.

अनिल, असे मला तरी कुठे मान्य आहे हे सगळ ? माझा माझ्या भावाशी वाद झाला. खर तर माझ्या आईचा हा अक्सिर इलाज असावा. माझी आई मावस भावाशी बोल्ली असल की मी लग्न करत नाय. हा येडा म्हणला असत त्याला बोलावतो आणि बाबा कडे घेऊन जातो. तिथ याचे वडील बोलले की लग्न कर तर हा काय नाय म्हणणार नाय.

मग रे ? मग काय झाल ? गेला का त्या बाबा कडे तु ?

हा रे . माज्या काय लक्षात नाय आला मी माझ्या भावाला चॅलेज केला. अस काय घडत नाय मेलेला माणुस कधी बोल्तो का ? मग तो म्हणाला चल बाबा कड आणि खात्री कर.

मग रे ? अनिलने दुसरी सिगरेट पेटवली. खर तर त्याला दिवसा सुध्दा असल्या गोष्टी ऐकताना काटा यायचा अंगावर पण महेशला सांगायच होत म्हणुन ऐकण भागच होत.

अनिल कडुन महेशने परत सिगारेट घेतली आणि एक दमदार कश लावला.

क्रमश :

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

बरेच दिवस ही कथा अर्धवट लिहुन पडली होती ती आज पुर्ण केली. याला दुसरा भाग आहे तो पण लिहुन झालाय. तिसरा अजुन लिहायचा आहे.