जिहाले मिस्किन मा कुन बा रंजीश...

Submitted by अतुल ठाकुर on 20 May, 2014 - 06:41

maxresdefault.jpghttp://www.youtube.com/watch?v=8UC7QWELzCY

लक्ष्मीकांत प्यारेलालने अगदी "दोस्ती","पारसमणी"पासुन ते अलिकडल्या "गुलामी" पर्यंत अनेक सुरेल गाणी दिली. सतत, सर्वकाळ हिन्दी चित्रपटसृष्टीत टिकुन राहणं हे सोपं काम नाही. वर्षाला एखाद दुसरा चित्रपट एक्सक्लुजिवली करुन त्यात उत्तम संगीत देणे वेगळे आणि नव्या जुन्या सर्व संगीतकारांच्या स्पर्धेत नुसतेच टिकणे नव्हे तर त्यांना पुरुन उरणे देखिल वेगळेच. असे आणखि उदाहरण "मै शायर बदनाम" सारखे गीत लिहिणार्‍या आनंद बक्षीचे. पण तो वेगळा विषय आहे.

"गुलामी" मधील "जिहाले मिस्किन मा कुन बा रंजीश, बाहाले हिजरा बेचारा दिल है"(माझ्याकडे असे परक्या नजरेने पाहु नकोस्....प्रियकराच्या वियोगाने माझे बिचारे हृदय आधीच पोळलेले आहे, त्या जखमा अजुनही ताज्या आहेत) हे माझे आवडते गाणे. गुलजारने पहिल्या दोन ओळी अमीर खुस्रोच्या काव्यातुन घेऊन त्यावर आपले गीत लिहिले आहे. एका विशिष्ठ ठेक्यात बांधलेल्या या गीताला एलपीने लोकसंगीताची आठवण यावी असा साज चढवला आहे. जेपी दत्ता म्हणजे वाळवंट कुशलतेने चित्रित करणारा दिग्दर्शक. त्यातुन ती खेडवळ माणसे. अस्सल राजस्थानी वेशात सुरेख दिसणारी अनीता राज. आपल्या चालीत देखिल फौजीचा रांगडेपणा उभा करणारा मिथुन आणि गाणे सुरु झाल्यावर त्याच्या स्वरांनी न राहवुन त्यावर झुलणारी नर्तकी.

सायंकाळच्या वेळी राजस्थानमधील वातावरणाच्या पार्श्वभुमीवर लताच्या स्वरात सुरेल ललकारी सुरु होते. आणि ती बंजारा स्त्री त्यावर डोलु लागते. त्यानंतर अगदी तिच्याच तालात रांगडा फौजी मिथुन देखिल दोन पावले टाकुन जातो. मात्र अनीता राजचा चेहरा अजुनही गंभीरच असतो. शेवटी "तुम्हारे सीनेसे उठता धुंवा, हमारे दिलसे गुजर रहा है" अशी तिच्या प्रियकराने तिला खात्री पटवुन दिल्यावर तिची कळी खुलते.

लताचा आवाज या सायंकाळच्या कातर वेळेला एक वेगळेच परिमाण देतो. "वो आके पहलु मै ऐसे बैठे के शाम रंगीन हो गयी है" एखाद्य बंजारा स्त्रीचा अगदी मोकळा ढाकळा आवाज ऐकल्यासारखे वाटते. अगदी असाच अनुभव पुढे अनेक वर्षानी "रुदाली" आणि "लेकीन" मध्ये देखिल आला. शब्बीरकुमारने गाणं नीट पेललं आहे. त्याला फार गळ्यात पडल्याप्रमाणे लाडे लाडे गाऊ दिलं नाही हे आपलं सुदैवच. पण हे गाणं रफीसाठीच होतं असं वाटल्याशिवाय राहवत नाही. मला तर हटकुन "निसुलताना रे" ची आठवण होते.

उत्तम संगीत, सुरेख गीत, त्याला पार्श्वगायकांनी दिलेला सुरेल स्वर, कलाकारांनी दिलेली अप्रतिम साथ, हे सारं गारुड समर्थपणे चित्रित करणारा दिग्दर्शक असा अपुर्व योग या गाण्यात जुळुन आला आहे. हे गाणं कुठेही सुरु झालं तरी पाय क्षणभर थबकतात. लताचे स्वर मोहीनी घालतात. आणि आपणही हळुहळु गुणगुणु लागतो.."जरा जरासी खिली तबियत जरासी जरासी गमगीन हो गयी है...

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख! मला आधी या गाण्याचे बोलच कळत नव्हते, धन्यवाद अतुल.:स्मित: हे गाणे त्या काळात जाम हिट झाले होते.

मस्त

khup chaan lekh, pan asa chota sa ka ???
ajun liha, ya ganya baddal ajun wachayala awadel..
aatishya taral gane, janu waryachi zuluk...

आवडते हे गाणे. मिथुन - अनिता राजही सुरेख शोभतात. मिथुनला जल्लाद, चांडाल, तडीपार इत्यादी खुळे चावायच्या आधीचा मिथुन डॅशिंग वाटायचा. गुलामीमध्येही तसाच वाटतो.
गीत, संगीत, स्वर यांचा सुरेख मिलाप. शब्बीर कुमार सुसह्य वाटतो हे संगीतकाराचे निर्विवाद यश. केवळ दोन गाण्यात आवडला तो. एक हे आणि दुसरे "सो गया ये जहां (तेजाब) " गाण्यात एक अंतरा गायलाय तिथे.

हे गाणं कुठेही सुरु झालं तरी पाय क्षणभर थबकतात. लताचे स्वर मोहीनी घालतात. आणि आपणही हळुहळु गुणगुणु लागतो.."जरा जरासी खिली तबियत जरासी जरासी गमगीन हो गयी है...<<<+१०००००००
माझंही अत्यंत आवड्दतं गाणं

या गाण्यात एका ठिकाणी ‘तुम्हारा दिल या... हमारा दिल है’ मध्ये घेतलेला पॉज जबरदस्त. माझे खूप आवडते गाणे. पण मुखड्याचे शब्द अजूनही कळत नाहीत.

मिथुनला जल्लाद, चांडाल, तडीपार इत्यादी खुळे चावायच्या आधीचा मिथुन डॅशिंग वाटायचा. गुलामीमध्येही तसाच वाटतो

अगदी सहमत अमेयराव Happy

खुळे चावायच्या आधीचा>>> अमेय Happy कित्ती वर्षांनी ऐकलं हे वाक्य!

छान आहे लेख, काही काही वाक्यं जमून गेली आहेत... गाणं छान आहेच, वादच नाही Happy

आहाहा.. खूप फेव गाणं... अर्थ सांगितल्याबद्दल अनेक धन्यवाद..
लग्गेच यू ट्यूब वर जाऊन पाहिलं आता अजून आवडतंय..
शब्द फारसी चे आहेत काय?? कारण उर्दू मधे शोधूनही सापडले नव्हते ..

हे गाणं कुठेही सुरु झालं तरी पाय क्षणभर थबकतात. लताचे स्वर मोहीनी घालतात. आणि आपणही हळुहळु गुणगुणु लागतो.."जरा जरासी खिली तबियत जरासी जरासी गमगीन हो गयी है... >>> +१

सुरेख, आवडते गाणे, लहानपणापासूनचे, मात्र तेव्हा कधीच परफेक्ट बोल कळले नाहीत, तरी गायची हौस मात्र नेहमी दांडगी, कारण चुकीचे गातोय की बरोबर हे ऐकणार्‍यालाही कधी कळले नाही Proud
पुढे ईंटरनेटचा जमाना आला आणि नक्की बोल समजले, गाणे डाऊनलोडही केले, ऐकतोही अधूनमधून, गातोही मधूनमधून, मात्र आजवर ते शब्द पाठ करायची तसदी घेतली नाही, पाठ झाले तर कदाचित ते गायचा गोडवा हरवून बसेन असे वाटते. मूडप्रमाणे गायले जाते, नवनवीन शब्द तोंडातून बाहेर पडतात, याची आपलीच एक मजा असते...

गुलजारने पहिल्या दोन ओळी अमीर खुस्रोच्या काव्यातुन घेऊन त्यावर आपले गीत लिहिले आहे.
>>>>>>>>
हे देखील हल्लीच कुठेतरी वाचनात आले होते.

बाकी लेख नेहमीप्रमाणेच सुंदर आणि संतुलित !
गाणे आहे मात्र खरे असे ज्यावर एक लेख लिहावासा आणि त्यावरचा लेख वाचावासा वाटावा !

पण हे गाणं रफीसाठीच होतं असं वाटल्याशिवाय राहवत नाही. मला तर हटकुन "निसुलताना रे" ची आठवण होते.>> काय बोललात! अगदी अगदी!!!

अमीर खुस्रोने या थक्क करुन टाकणार्‍या काव्यामध्ये एक ओळ पर्शिअनमध्ये आणि दुसरी ब्रजभाषेत असा अफलातून प्रयोग केला आहे.
zihaal-e-miskeen mukon taghaful (Persian)
doraaye nainaan banaye batyaan (Brij)

ke taab-e-hijraah nadarum-e-jaan (Persian)
na laihyo kaahe lagaye chatyaan (Brij)

संदर्भ - http://www.alif-india.com/

असाच काही प्रकार शांताबाई शेळक्यांनी 'निवडुंग' सिनेमातील 'ना मानोगे तो दूंगी तोहे गाली रे' या गाण्यात केला आहे.