आठवे पुस्तक भाग २ (अंतीम) !

Submitted by कवठीचाफा on 24 June, 2008 - 14:57

आधी पहीला भाग वाचा जर वाचला नसेल तर ! अन्यथा गोंधळ उडण्याची दाट शक्यता.

माझे हे पोष्ट तुम्ही वाचत असताना फ़ार उशीर झालेला असेल.

मी गेले दोन दिवस हाच विचार करत होतो पण पक्का निर्णय घेण्याआधी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची आठवण झाली तुमच्याकडुन मिळालेला आपलेपणा मला पुन्हा लिहायला भाग पाडत आहे.

आपले आयुष्य म्हणजे काय हो नक्की? कधी तुम्हाला हा प्रश्न पडलाय का हो? असेल कित्येकदा असेल पण इतके दिवस मी ज्या प्रमाणे तुकडे दुर्लक्ष करत आलो तसे तुम्हीही करत असणार हे नक्की.
माझ्या आयुष्याचा विचार करत असताना मला प्रकर्षाने जाणवले ते म्हणजे मी कोण? माझी काय लायकी या जगात? उत्तर तसे पचायला कठीण आहे पण कठोर सत्याला सामोरे हे कधीना कधी जावेच लागते ना? मला दोन दिवस-रात्र तळमळुन काढल्यानंतर जे मला समजले ते असेच कठोर सत्य.
मी कोण? तर मी कुणीच नाही. या पृथ्वीतलावर कधीतरी कुणाच्या एका मोहमयी क्षणाला बळी पडुन जन्माला जन्माला घातला गेलेला एक साधारण जीव. ज्याच्या असण्या नसण्याने कुणाचेच फ़ारसे नुकसान होणार नाहीये.
माझी या जगातली लायकी काय? तर शुन्य आणी शुन्यच का? तर त्याच्या खाली किंमत देता येणार नाही म्हणुन.
बरं मी एकटाच असा आहे का? तर नाही, सगळ्यांच्याच नशीबात ( कीती गोड फ़सवणुक? कारण नशिब नावाची चिज अस्तित्वात असती तर आज आपल्याला जगण्यासाठी जी धडपड करावी लागते आहे ती आपण का केली असती? ) हेच आहे. प्रत्येक जण इथे आपले जिवन यशस्वी करण्याच्या मार्गावर टक्के-टोणपे खात आहे.
आता जरा निट विचार करा, जर तुम्हाला माहीताय की आपण जेंव्हा जाणार तेंव्हा रित्याहस्तेच जाणार. जे काही इथे कमावलेय त्याचा एक सहस्त्रांश हिस्सा तरी आपल्या बरोबर येणार आहे का? आणि जर तो येणार नसेल तर मग आपण का धडपडतोय हे जगणे सुसह्य करण्यासाठी?
माझ्या मनात उठलेल्या काहुरातला आणखी एक विचार, आपण जन्माला आलो शिकलो, सवरलो काहींनी आपल्यायोग्य जिवनसाथी निवडले काहींच्या नशीबात ( आता तरी नशीब या शब्दाचा भोंगळपणा लक्षात आला असेलच ) ते ही नव्हते. मग कोणीतरी कुणाची तरी चाकरी करायला लागला कोणी आपणच मालक बनण्याचा प्रयत्न करण्यात गर्क झाला. पण या सर्वाची अखेर काय? जिथपत शरीर नावाचे हे ओझे साथ देत आहे तिथपत त्याला सुखासीन ठेवण्याचा प्रयत्न करणे इतकाच ना?

जिवनातले अखेरचे सत्य काय हो? मृत्युच ना? मग हे ही विस्मरण होउ द्यायला नको की कधी ना कधी त्याची गाठ ही पडणारच आहे, त्यानंतर? तुम्ही कोण आहात याचे स्मरण असे कुणाला रहाणार आहे? तुमच्या सग्यासोयर्‍यांना? कदाचीत तसे होईलही पण किती दिवस? फ़ार फ़ार तर एखाद दुसरा महीना हळहळतील सगळे. नंतर तेही पुन्हा आपल्या शुन्य किंमतीच्या आयुष्यात आणखी काही आनंदाचे क्षण शोधत जगत रहातील. त्यांचे हे आनंदी क्षण तरी त्यांच्या सोबत जाणार आहेत का हो? तेही शक्य नाही तरीही ते जिवाचा आटापिटा करत ते शोधत रहातील. म्हणजे ज्या जिवाचे ओझे आपण घेउनच फ़िरत आहोत त्याला सुखी करण्यासाठी आपणच आपल्या जवळच्या माणसाला दुरावतो की नाही?

आता मनुष्य सोडुन बाकी काही प्राणिमात्र पृथ्वीवर आहेच ना? पण त्यांना मानवासारखा विचार करता येत नाही हे त्यांचे दुर्देव म्हणायचे की ते त्यांचे सुदैव म्हणायचे? की त्यांना आपल्या गरजा याव्यतीरिक्त दुसरे काही कळतच नाही भले मग त्यासाठी आपल्याच छाव्यांचा प्राण घेणारी सिंहीण असो की एकदा झाडावरुन पडल्यावर पुन्हा आपल्या समुदायात न येउ देणार्‍या वानरांचा कळप असो. त्यांना फ़क्त आपल्या गरजा भागवायच्या असतात नाती गोती हा प्रकार माहीत नसलेले ते जीव जगतच असतात ना? पुन्हा एक हैराण करणारा सवाल मनात येतो की आपण समजुतदार माणसे असे वागत नाही का? जरा हाच सवाल तुम्ही तुमच्या मनाला विचारुन पहा ! कदाचीत मला ज्याची भिती वाटते त्सेच होकारार्थी उत्तर मिळेलही कदाचीत. म्हणुनच पृथ्वीचे तुकडे पाडुन हे माझे ते माझे असे करत आपण भांडतो आहोत का? जसे इतर प्राणीमात्रांच्यात असते तसे जास्त मारक शक्ती असलेला जनसमुदाय जास्त बलाढ्य मानला जातो तसे आपल्यालाही मानले जावे म्हणुनच ना ?

तुमचे आमचे सोडा हो निदान या पृथ्वीवरच्या त्या बलाढ्य जासमुदायाबद्दल म्हणायचे तरी यातल्या कुणाला खात्री आहे की उद्याच्या दिवसात किंवा महीन्यात आख्ख्या पृथ्वीचाच बळी जाणार नाही? नक्कीच तशी खात्री नाही, नाहीतर समुद्राची वाढती पातळी, वातवरणाचे वाढते तापमान असल्या बाबींचा त्यांनी इतक्या गंभीरपणे अभ्यास केला नसता नाही का? त्यातुनही एखादी महाप्रचंड उल्का कोसळलीच पृथ्वीवर तर ? वाचवु शकतील का हे स्वत:ला ?

आजही आपण पाप पुण्यासारख्या भ्रामक तत्वांच्या मागे लागलेलो असतो का? तर मृत्युनंतरचे जिवन सुसह्य व्हावे, पण जर मृत्यु हेच जर अंतीम सत्य असेल तर त्या पलीकडे विचार करण्याची गरजच काय आपल्याला? पाप, पुण्य, सदाचार, अनाचार, सुख, दुखः, आनंद या असल्या क्षणिक सुखांनी जर आपले जीवन बांधल्या जात असेल तर त्या जिवनाला अर्थच काय?

तुम्हाला कदाचीत हे विचार वेडगळ वाटत असतील पण तुम्हीही जर मनाच्या आगदी खोलात जाउन विचार केलात तर नक्कीच माझे विचार उथळ नाहीयेत असे तुमच्या लक्षात येईल. आणि मग कदाचीत तुम्हीही माझ्यासारखाच निर्णय घ्याल.

अर्थात हे इतके प्रगल्भ विचार मांडण्याची माझी क्षमता नाही पण नाथबाबुंचे ते आठवे पुस्तक वाचल्यावर मला त्यातले जे विचार पटले ते मी थोडक्यात तुम्हाला कळवण्याचा प्रयत्न करत आहे. अर्थात त्यांच्या लिखाणाच्या शैलीच्या हजाराव्या भागाची सुध्दा सर नाहीये माझ्या या खरडण्याला, वेळे आणी जागे अभावी त्यातली उदाहरणेही मी ईथे लिहू शकत नाही पण जे माझ्या मनाला जाणवले ते मी लिहीत राहीलो. पण शेवटी मला हाच प्रश्न पुन्हा भेडसावतोय की मी हे लिहीतोय तरी का?

मला हे लेखन पुसुन टाकायची इच्छा होते आहे. ती खरोखर क्रियेत उतरण्याआधी मला हे लेखन थांबवलेच पाहीजे.

दोन दिवस-रात्री तळमळुन विचार केल्यावर मला तरी हेच जाणवतेय की जर माझे असणे जर जगाच्या लेखी काहीच नसेल, जिवनाच्या अंतीम सत्याची वाट पहात जर मला माझ्या आयुष्यात सुखाचा शोध घेत ठोकरा खाव्या लागणार असतील तर मी जगावेच का?

त्यामुळेच मी माझ्या आयुष्याचा शेवट करुन घेत आहे. तुम्ही हे लेखन वाचत असाल तेंव्हा मी या जगात नसेन याची मी पुरेपुर दक्षता घेतलेली आहे. म्हणुनच मी माझ्या या लेखनाच्या सुरुवातीला कदाचीत उशीर झाला असेल असे म्हंटले आहे.

मी माझ्या पुर्ण विचाराअंती आणि स्वखुषीने हा निर्णय घेत आहे. कदाचीत नाथबाबुंना हा विचार माझ्यापेक्षा जास्त भिडला असावा म्हणुनच तर त्यांनी आपल्या जिवनाची अखेर अशी शांतपणे करुन घेतली. मी सुध्दा त्यांच्याच वाटेने जाण्याचा निर्णय घेत आहे. आता मी हे लेखन पोष्ट केल्यावर असाच बाहेर पडणार आणि वाट नेईल तिकडे जात रहाणार कुठे ना कुठे तरी एखादा भरलेला तलाव, डोंगराचा उंच कडा, दुथडी भरुन वहाणारी नदी मला सापडेलच.

---------------------- आपल्या सर्वांच्या आपलेपणाने भारवलेला जगाच्या दृष्टीकोनातुन शुन्य किंमत असलेला आणि सर्वात महत्वाच म्हणजे नाथबाबुंचा चाहता ( माझी खरी ओळख हिच असावी )

गुलमोहर: 

अरे गोष्टच आहे ना ही? काल्पनिक म्हणुन तरी लिही ना लवकर! पोस्ट कर पाहू काही तरी.

क्रमशः की समाप्त? काहितरि कळु दे कि. आणि हे काय लिहलय? मला पामराला नाहि उमजले.

मला वाटत समाप्त Happy
नेहेमी पेक्षा एकदम वेगळ लिहीलयस रे लेका Happy

चाफ्या, लिखाण जमलय रे. Happy

"बाकी शुन्य" वाचलस की काय???
.............................................................
**Expecting the world to treat u fairly coz u r a good person is like
expecting the lion not to attack u coz u r a vegetarian.
Think about it.**

छान जमली आहे.
पण कुठे तरी अशीच कथा वाचल्यासारखी वाटतेय

चाफ्या,

कथा शैली एकदम जबरदस्त आणि अनोखी, पण गोंधळ हा उडतोय की हा आत्महत्या करणारा नेमका कोण?

गोंधळ झाल्याबद्दल क्षमस्व पण मुळात या कथेचा पहीला भाग वाचल्याखेरीज दुसरा भाग कशाशी संबंधीत आहे ते न कळल्याने घोळ होण्याची शक्यता जास्त आहे ! जर दोन्ही भाग सलग वाचले तर नक्की कथा काय आहे हे कळेल,
सर्वानाच अश्या कोड्यात टाकल्याबद्दल पुन्हा एकदा क्षमस्व !

.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **

चाफ्फ्या, लिखाण तर छानच आहे.
पण "त्या कोण्या एकाने" स्वतःला इतकं "कः पदार्थ " का समजावे बरे?

त्या आठव्या पुस्तकाचं नाव 'आत्महत्येची गुरुकिल्ली' होतं का? Happy
.
चाफ्फ्या, शुद्धलेखन तपासून लिही ना प्लिज.... छान लिखाण वाचताना रसभंग होतो....

आँ.......... हे तीन तीन वेळा मी रिपीट कधी केले ? यातले दोन काढुन टाकता येतील का ?
मन्जु, शुध्दलेखन:( बापरे !!!! ते सुधारणे माझ्या शिक्षकांना शिक्षा दिल्यासारखे वाटत होते ते आता काय सुधारणार Sad तरी मी प्रयत्न करेन नक्की. Happy

.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **

ईतक्या जणाना ईतके प्रश्न पडलेत, मला वाटत त्यातच तुझ्या कथेच साफल्य असाव. अस सगळ्याना कोड्यात पाडणे हा प्रकार थोडासा ईब्लिसच वाटतोय.
तुझी ही कथा वाचुन एखाद्या शहाण्याने खरच आत्महत्या केली तर? म्या म्हनतो जबाबदार कोन?
बरे झाले तु खुलासा केलास नाहीतर 'उशीर व्हायच्या आत' मायबोलिकरान्नी तुझ्या घरी फोन केले असते Wink

कालपासनं टाळतोय प्रतिसाद द्यायचं, वाटलं 'एक्सपर्ट कॉमेंट' देऊ म्हणून!
पण हरलो बाबा. आता सांगतोस की..
मला माहित असलेल्या हॉरर कथा इथं पोस्ट करू?

कालचा भाग अर्धवट ठेवलास "क्रमश:" लिहून ते जास्ती effective होते रे.

चाफा बोलेना.........
चाफा चलेना............
काहीच समजेना.........

मला माहित असलेल्या हॉरर कथा इथं पोस्ट करू?
>>>
साजिरा, तुम्ही स्वतः लिहिलेल्या हॉरर कथा इथे जरूर पोस्ट करा.
चाफ्फ्या, मस्त जम्लिये, तुझ्या नेहमीच्या शैलीपेक्षा वेगळी शैली. मज्जा आ गया.
समीर, तुझ्यावर माझ्यावर आणी चाफ्फ्यावर विश्वास कोण ठेवणार? मग आत्महत्या करणे तर दूर...
त्यामुळे तू ती चिंता करू नकोस.

साजिरा, तुम्ही स्वतः लिहिलेल्या हॉरर कथा इथे जरूर पोस्ट करा.
>>>>
पण त्याच्यामुळे हा चाफ्फा अजिबात घाबरणार नाही ना!!
म्हणुन म्हटलं 'माहित असलेल्या'!!

मी निघालेच होते तळी विहिरी शोधायला!
तेवढ्यात चाफ्याची पोस्ट पाहिली. फसवलत की हो आम्हाला.

कुठंतरी काहीतरी राहीलंय, असं मला का वाटतंय??
लिखाण छानच आहे, पण बरेच प्रश्न अनुत्तरीत राहतात की Sad

आता पुन्हा 'आठवे पुस्तक' इथे लिही म्हणून चाफ्याला कुणी सांगू नका..
त्या पुस्तकामुळेच नाथबाबू अन चाफ्याची दोघांची अशी सेम अवस्था झालीय!
आता सांगा, कुणाला वाचायचंय 'आठवे पुस्तक'..?

चाफ्या,
छान आहे कथा. काल्पनिक असावी कारण तू काही प्रतिक्रियाना उत्तरही दिलेस Happy
ह्या कथेवरून मला शाळेत मराठीच्या पुस्तकातला एक धडा आठवला. "भेट" नाव होते त्याचे. लेखक आठवत नाहीत. पण भिंती ओलांडून बाहेर पडलेल्या युवराज गौतमला अश्वत्थामा भेटतो असा प्रसंग आहे. अश्वत्थामा गौतमाला सांगतो की "जीवन हे दु:खाने भरलेले असले आणि मृत्यू विदारक असला तरीही मृत्यू आहे म्हणून जीवन अर्थपूर्ण आहे". जराजर्जर झालेल्या, डोक्यावरीज जखमेच्या असह्य वेदनेने तडपणार्‍या आणि अमरत्वाच्या शापामुळे मृत्यूही न येऊ शकणार्‍या अश्वत्थाम्याचे ते बोल ऐकले की मृत्यूचे महात्म्य पटते. आर्थात ह्या लेखात जे विचार व्यक्त केलेस ते आणि मी वरती मांडलेले विचार पूर्ण भिन्न आहेत.
<<पण "त्या कोण्या एकाने" स्वतःला इतकं "कः पदार्थ " का समजावे बर<< अनघाला पूर्ण अनुमोदन.
<<मला तरी हेच जाणवतेय की जर माझे असणे जर जगाच्या लेखी काहीच नसेल, जिवनाच्या अंतीम सत्याची वाट पहात जर मला माझ्या आयुष्यात सुखाचा शोध घेत ठोकरा खाव्या लागणार असतील तर मी जगावेच का?<<
सुखाचा शोध घेताना ठोकरा खाव्या लागणार असतील? सुख मानण्यावर असते. ते आपल्या आतमध्ये असते. आणि ते शोधताना ठोकरा खाव्या लागत नाहीत. तशा लागत असतील तर चुकिच्या ठिकाणी शोध चालू आहे.
घरी आलेले मृत्यूदूत विन्मुख का पाठवावे? आपले जीवन त्यातल्या सुख, दु:ख, आनंद, समाधान, अपेक्षापूर्ती, अपेक्षाभंग, प्रेम, द्वेष, इर्ष्या, मत्सर, असूया, आदर ई. कांगोर्‍यांसकट पूर्ण भरून पावावे आणि हसत हसत मृत्यूला सामोरे जावे हा जगण्याचा सकारात्मक दृष्टीकोन आहे.
ह्या कथेत "जाउदे बाबा! एकदिवस मरणारच ना? मग उगाच जगत रहाण्याऐवजी अत्ताच मेलेले काय वाईट?" असा थोडासा नकारात्मक दृष्टीकोन मांडल्यासारखे वाटले.
खूप लांबलचक बौद्धिक दिले नाही?
चाफ्या, टीकेबद्दल माफी मागतो. पण तुझ्या कथेने विचार करायला प्रवृत्त केले राव!

तुम्ही जो धडा म्हणताय तो जी ए कुलकर्णी लिखित कथा आहे.

अभिजात,
माझी चूक सुधारल्याबद्दल धन्यवाद!

आयला हा धडा आम्हालापण होता, ( इथे मी ही सुशिक्षीत आहे हे दाखवुन देण्याचा प्रयत्न केलेला नाही Lol )
पण मुळातच मला या कथेने खुपच उलगडे करायला भाग पाडलेय एक संदेह कथा या सदरात थोडीफार बसणारी कथा आहे ही . एका नाथबाबुंच्या लिखाणाचा इतका पगडा या मनुष्यावर आहे की तो त्यांची कथा जगतो तसा उल्लेखही केलेला आहे. आणि कदाचीत म्हणुनच त्याच्यावर आठव्या पुस्तकाचा परीणाम आपल्यासारख्यांपेक्षा जास्त होतो परीणाम............. Happy
असो हे सगळे काल्पनिक आहे Happy हे विचार माझे नाहीत Happy मी इतका बोअर माणुस नाही हो Happy
असो पण बर्‍याच जणांच्या डोक्याला ताप केला हे नक्की Happy

.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **

या पुर्वी खुप उथळ प्रतिसाद दिल्यबद्दल क्षमस्व. खरेतर कथा वाचुन मती गुंग झाली होती म्हनुन थोडा विरंगुळा. पण हे प्रश्न कुणाही सुजाण व्यक्तीला नक्की पडतील. आयुष्य महणजे काय? आयुष्यभर जगुन पण याचे उत्तर मिळत नाही. (गंमत आहे ना?) आणि जे शोधायला जातात ते कोणीतरी सिध्द्पुरुष होतात. आपण काय सामान्य माणुस (पुन्हा पळवाट...) हे प्रश्न मलाही पडतात, पण मग कधीतरी मरायचे आहे तर मग आता का नाही? असे मात्र वाटत नाही, कारण ज्याअर्थी जन्माला आलोय किंवा घातलेय त्यार्थी त्या परमेश्वराचा (सॉरी डॉ. श्रीराम लागु...) काहीतरी हेतु असणार. कदाचीत मला ते माहित नसेल. आणि शेकडा ९०% लोक हे स्वतःसाठी न जगता जबाबदारी पार पाडन्यासठीच जगतात, असे मला तरी वाटते. हा नाथबाबु प्रत्येकाच्या मनात असतोच... तिव्रता मात्र वेगळी असेल.
चाफा.... एक अतिशय उत्क्रुष्ट प्रयत्न.

चाफा, सहज म्हणून माझी एक जुनी चारोळी मलाच आठवली बघ-
मृत्यू समोर आल्यावर त्याच्या
गळ्यातच हात टाकला..
म्हटलं, बरं झालं, आजपर्यंत
कुणी भेटलाच नव्हता आपला-!
..
जीवनात काहीच उरलं नाही म्हणून वैफल्यग्रस्त होऊन मृत्यूला कवटाळणं अन या सुंदर जीवनाची इतिकर्तव्यता अन शेवटची अपरिहार्यता म्हणून मृत्यूला आनंदाने सामोरे जाणे यात फरक आहे, असं वाटतं; पण या दोन्ही प्रकारची पात्रं आपल्याच आजूबाजूला सापडतात. तुझी कथा पुन्हा वाचल्यावर तीतलं 'कादंबरी' जगणारं (की मरणारं!) पात्र अवास्तव नाही, ते आसपास सहज कुठेही सापडेल असं वाटून गेलं खरं!!

आवडली Happy