झाडाला केलेले खुंटी कलम

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 9 December, 2013 - 06:21

प्रत्यक्ष कलम करताना पाहण्याचा योग मला ह्या वर्षी आला. लहानपणी कलमे बांधलेली पाहीली पण तेंव्हा नेमकी कशी करतात ते पाहीली नव्हती.

आमच्या आंब्याला आमच्या एका नातलगांनी कलमे केली. त्याची पद्धत खाली क्रमवार देत आहे.

आपण खुंटी कलम पाहणार आहोत. खुंटी कलम हे असेच उगवणार्‍या, कमी दर्जाची, आंबट फळे देणार्‍या मोठ्या साधारण वितभर इंचीचा घेर असणार्‍या झाडांवर केले जाते.
आपल्याला हवे असणारे ज्या जातीचे, चांगल्या प्रतिचे फळ देणारे झाड माहीत असेल त्या झाडाच्या शेंड्याच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे जाड फांद्या कलम बांधण्यासाठी घ्यायच्या.

१)

२) कापण्यासाठी धारदार सुरी, चिकटण्यासाठी मेण, वरून लावण्यासाथी प्लास्टीक पिशवी.

४)शिवाय गोणपाटाचे तुकडे, धारदार तासणी, हाथोडा, ओली माती, काथ्या (रश्शी) हे सामानही लागते.

५) तासणीने अशा प्रकारे त्रिकोणी वरची साल काढून खालच्या बाजूच्या सालीला खालून २ इंचापर्यंत खाच पाडून घेतली.

६) धारदार सुरीने ज्या खुंटीचे (फांदी) कलम करायचे आहे त्याला अशाप्रकारे तासुन घ्या. एक साईडला थोडी कमी व एका बाजूला जास्त लांब.

७) आता खालच्या सालीच्या खाचेत सुरी धरून थोडी साल सैल करुन त्यात खुंटी खुपसा. दोन खुंट्या एका वेळी दोन दिशांना खुपसतात.

८) मेण कापुन ते चिरेवर चिकटवायचे.

९) आता एक गोणपाटाचा तुकडा ह्या भागावर काथ्याने बाधूंन घ्यायचा. (काथ्या आधी पाण्यात ओला करायचा त्यामुळे निट बांधले जाते.)

१०) वरच्या काचेला पुन्हा मेणाने पॅक करायचे.

११) आता जिथे खुंट्या लावल्या आहेत तिथे ओली माती पाण्याच्या सहाय्याने भरपूर चिकटवा. हे आतील भाग ओला राहण्यासठी करायचे.

१२) आता खुंट्यांच्या वरुन प्लॅस्टीकची ट्रान्स्फरंट पिशवी लावा ह्यामुळे बाष्पीभवन होउन आत ओलावा राहतो. असे कलम करणार्‍यांनी सांगितले.

झाली पूर्ण कलम करण्याची प्रक्रिया.

आता ह्या ओल्या मातीवर रोज हळूवार झारीने पाणी शिंपडायचे. खुंटी हलवायची नाही. हळू हळू ही खुंटी मोठ्या झाडाला एकरूप होऊन जीव धरू लागते. एका प्रकारे दत्तक घेतलेल्या ह्या खुंट्या नविन जोमाने वाढू लागतात.

१३) मी कोवळे अंकूर असतानाचे फोटो वेळेअभावी काढलेले नाहीत. हे फोटो पाने मोठी झाल्यावरचे आहेत.

ह्या खुंट्या चांगल्या वाढल्या त्यांचा थोडा घेर आणि उंची वाढली की पूर्वीचे मोठे झाड तोडून टाकावे लागते. त्यामुळे ह्या नविन कलमांना चांगला जोम येतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेव्वा... जागुडे! तुझ्याकडे खुंटीकलम जगलं म्हणजे. छान फुटवे आलेत. Happy आधीची पानं तशीच राहुन नविन पानं फुटली का?
मी एकदा घरच्या गुलाबाला 'डोळे भरण्याचा' असफल प्रयत्न केला होता. Proud

जागू, फोटोद्वारे छान समजावून सांगितलस. Happy
लहानपणी वडील अशी कलमं करायचे, आणि आम्हाला माहिती द्यायचे. तीच आठवण झाली. Happy

खुप दिवसांनी, आमची माती, आमची माणसं हा माझा अत्यंत आवडता कार्यक्रम बघितल्यासारखे वाटले.
( आता बाकिचे कलमाचे प्रकार पण येतीलच ! )

वा मस्तच, माझ्या सासरी जास्त करून भेट कलम करतात, मी नाही प्रत्यक्ष बघितले अजून, आता जाऊन असेच फोटो काढले पाहिजे.

मस्त फोटो आणि माहिती जागु , मी पण दहावीच्या सुटीत असताना कलम करायला शिकलो होतो, मजा यायची.
येवढं मोठं झाड तोडण्यापेक्षा , लहान रोपट्यांवर कलम केले तरी ४-५ वर्षात बर्‍यापैकी कलम वाढतं.

जागूताई, तुमची माहीती मस्तच असते. एक भोभाप्र आहे. जर कलमं वाढायला लागल्यावर जुनं झाड तोडून टाकावं लागत असेल तर रोपटी थेट मातीत का लावू नयेत? जुन्या झाडाचा सामुग्रीसंभार (इन्फ्रास्ट्रक्चर) आयता वापरायला मिळावा म्हणून कलम करतात का?
आ.न.,
-गा.पै.

गापै , रोपटं लावल्यानंतर त्याचं पुर्ण झाड बनुन आंबे यायला जवळपास १५-२० (?) वर्ष लागतात. पण कलम केल्यावर ४-५ वर्षात आंबे येऊ शकतात आणि तुम्हाला पाहीजे त्या वाणाचे. पण तुम्ही म्हणता तसं लहान रोपट्यांवर सुद्धा कलम करता येत.

मस्त माहिती, जागू.
लहानपणी गुलाबाचं कलम करताना पाहिलं होतं ते अंधुकसं आठवलं. तेंव्हा कलम केलेल्यांनी माती ऐवजी (किंवा बरोबर) शेण वापरलं होतं असं अंधुकसं आठवतय (आणि पूर्ण कलम प्रक्रियेत एवढंच आठवतंय :फिदी:). दोन वेगवेगळ्या रंगाचं गुलाबाचं फूल येण्याकरता वापरतातना ते कलम?

सगळं कसं बैजवार आणि फोटोसकट दिल्यामुळे खूप आवडलं हे कथन....

बाकी इतर कलमांचीही अशी माहिती दिलीस तर आवडेलच ....

जगू, एकदम मस्त माहिती.

गापै, कलमी आंब्याची (विशेषतः हापूस) फांदी लाऊन पण झाड येते. पण त्याला धरणारी फळे स्वादाला फारफार तर हापूसच्या जवळ जाऊ शकतात (किती प्रमाणात ते काहीच सांगता येत नाही) पण हापूसचा अस्सल स्वाद त्यांना कधीच येऊ शकत नाही. त्यासाठी कलमच करावे लागते.

बाकीच्या झाडांच्या बाबतीत श्रीने सांगितलय तसे लवकर आणि चांगल्या दर्जाची फळे मिळण्याकरता कलम करतात.

कधी कधी कापून टाकलेले मूळ झाड पुन्हा पालवते. मग त्या फांदीची फळे आणि कलम केलेल्या फांदीची फळे वेगवेगळ्या स्वादाची / रंगाची / आकाराची असतात.

आर्या - पाने नविन फुटली आहेत.

अवनी - हिवाळाच चांगला.

अश्विनी, दक्षिणा, शोभा, अन्जू, मिना, मो धन्यवाद.

माधव - माहीतीबद्दल धन्यवाद.

दिनेशदा, शशांकजी - बाकीचे कोणी करताना दिसले तर मी टाकेनच पण तुम्हा कोणाला माहीत असतील तर नक्कीच टाका. एक जोड कलम मला माहीत आहे. ते मी पूर्वी करायचे. सोप्पे असते. ते अनंत, मोगरा, गावठी गुलाब अशा फांद्यांवर करतात. त्याच झाडाच्या फांदीला थोड साल काढायच. थिथे माती लावायची आणि गोणपाटाने बांधून ठेवायचे. रोज पाणी घालायचे. मग तिथून मुळे फुटली की मुळांच्या खालच्या थोड्या फांदीसकट कापून ते कलम दुसरीकडे रुजवायचे.

श्री, गामपैलवान. - काय होत बाठ्यापासुन उगवलेली रोपे फळ येई पर्यंत आपण कधी कधी पाहतो कसे फळ आहे ते पाहू. पण बाठ्यापासुन येणार्‍या रोपाला झाड चांगल मोठ होईपर्यंत फळ धरत नाही. तोपर्यंत त्याचा बुंधा एवढा जाडा होतो. मग फळ कमी दर्जाचे आहे हे कळल्यावर त्याच झाडाच्या जीवात हे चांगल्या प्रतीचे कलम जीव धरण्यासाठी लावतात. बागायती जागेत अशी कमी दर्जाची फळे देणारी झाडे उपयोगी नसतात. कारण त्यामुळे जागा अडली जाते, इतर झाडांवर सावली येते. म्हणूनच मुळासकच झाडाचा जीव न घेता त्याच झाडावर दुसर्‍या झाडाला संजीवनी देण्यात येते.

विद्या - गावठी गुलाबाचे मी दिनेशदांना सांगितल आहे त्याप्रमाणे कलम करता येते. पण इतर गुलाबांना जंगली गुलाबांवर बहुतेक असेच खुंटी कलम करतात. मला नक्की माहीत नाही. पण ८०% असेच.

पराग मुळ झाड कलम केल्याची जागा सोडून थोड वरून तोडतात. खुंट्या पुन्हा खाली लावाव्या लागत नाहीत. कारण ह्या खुंट्या मुळ झाडाशी एकरूप झालेल्या असतात. त्याच झाडाद्वारे त्यांना पोषण मिळत असते. त्या अधीक जोमाने वाढाव्या, त्या झाडाचे सगळे पोषण केलेल्या कलमाला मिळावे म्हणून झाडाचा वरचा भाग तोडला जातो. मग हे कलम जोमाने वाढते.

जागू,
एअर प्रोपागेशन करून अमेरीकेत कलमं करायची पद्ध्त आहे(मला माहीती नाही भारतात करतात की नाही). पण त्याच झाडावर कलम केलेले मूळ झाडापासून वेगळं करून पुन्हा दुसरीकडे लावतात पण सुरुवात सेमच वाटली थोडीफार.

आताच तुझ्या प्रतिसादाता वाचले की त्याला जोड कलम म्हणतात. अनंताचे मस्त होते. बरोबर.

मस्त माहीती आहे पण खुंटी कलमाची.

मस्त!
एका मैत्रिणीने गुलाबचं कलम केलेलं. तिने फांदी कडेला तासटून कलम करायच्या रोपाच्या फांदीवर खाच करून दोराने घट्ट बांधले होते. खाचेच्या जागेवर तसेच कलमाच्या टोकाशीपण माती ओली करून लावली होती. छान धुमारे फुटले होते त्यातून.

झंपी, एस.आर.डी., सृष्टी, अम्या, देवकी चिन्नु धन्यवाद.
मलाही गुलाबावर कलम करण्याचा प्रयत्न करायचा आहे. माझ्याकडे फुले न येणारे जंगली गुलाब आहे.

खुप छान आणि उपयुक्त माहिती आपण दिली. आपले खुप धन्यवाद . यात एकच माहिती आपण दिली असती तर अजून चांगले झाले असते ;ते म्हणजे हे कलम केले ती वेळ , म्हणजे हंगाम आणि महिना. जर आपणास कळवता आले तर आवश्य कळवा . मी हा प्रयोग माझ्या शेतात करत आहे. पुन्हा एकदा धन्यवाद .
gopalvdy@outlook.com

कलम तज्ज्ञांना माझा एक प्रश्न
बाभळीच्या झाडावर आपण फळ झाडाचं कलम करू शकतो का, कारण बाभळीच्या झाडाला खतपाणी काहीच लागत नाही. आणि ही झाडे खूप वाढतात.