वर्ख

Submitted by Godeya on 9 September, 2011 - 11:19

श्रावणातल्या एखाद्या शनीवारी अकरा साडे अकराच्या सुमारास दूरवरून सायकल वरून आपले बस्तान अडकवून एक ब्राउन टोपीवाला यायचा. कळकट धोतर, वहाणा तोंडाच्या कडेला अर्धवट जळालेली विडी, ह्या सगळ्या साजासकट हे प्रकरण दोन चाळीच्या मध्यात किंवा मोकळ्या जागेत सायकल लावून एक हात कमरेला टेकवून ए कल्हई .... ए कल्हई !!!! अश्या दोन चार आरोळ्या दिल्या की स्वारी सगळं सामान सोडवून दुकान लावायच्या मागं लागायची चांगलीशी जागा पाहून बैठक जमवली की लोखंडी गजाने जागा खणून भट्टी लावायच्या मागं लागायचा, तडतड वाजत कोळसे फुलू लागले की आम्हा मुलांचं कोंडाळं त्या भोवती पहिल्यांदा जमत, हवेनी हळूहळू फुलणारे लाल पिवळे कोळसे बघण्यात एक वेगळीच मज्जा यायची, एव्हाना बायका मंडळीत वर्दी गेलेली असायची, दोन चार घरातुन पितळी भांड्यांचे आवाज येवू लागायचे, बायांचा अन् कल्हईवाल्याचा संवाद मोठा मजेशीर असायचा, 'पोरं टोरं' असल्याने आम्हाला मध्ये बोलण्याची परवानगीही नसायची. किंवा आम्हाला त्यात रस नव्हता म्हणा. ..... आम्हाला ती कल्हईची विलक्षण जादू केव्हा सुरु होते याची उत्सुकता ज्यास्त असायची. आत्तापर्यंत फुलारलेल्या कोळश्यावर एखाद्या गिर्‍हाइकाचं छोट्सं पातेलं चढवलेलं असायचं! पाण्याची दोन भागात सोय केलेली असायची, चिमट्याने खाली वर करुन आधी कथील वितळवण्याचा कार्यक्रम व्हायचा, आम्हाला बाजुला व्हायला सांगुन चमचमणारा तो गरम लोळ एखाद्या पितळेच्या ताटलीत ओतुन ताटली गोल गोल फिरवायचा, अन् थोड्यावेळाने एक अर्धचंद्रा़कृती कांब पाडायचा, त्याच्या त्या सर्व हत्यारांना देखील तापून एक प्रकारचा तांबुस लाल रंग आलेला असायचा, एव्हाना एखादं मोठ्ठं पातेलं गरम होवून तयार असायचं, उपडं करुन मग तो ते नवसागरांच्या धुरानं भरुन टाकायचा, मग पुन्हा उलटं करुन तो धुर कोंडुन ठेवायचा, ज्यास्त चटके बसू लागले की त्या भात्यावर आणि त्या विस्तवा भोवती प्रो़क्षण केल्या सारखं पाणी तो फिरवायचा, आता खरी गंमत बघायला मिळणार म्हणून आम्ही पोरं उकिडवे उभे राहायचो. त्या गरमागरम भांड्यावर मघाच्या चकचकीत काडीने ' क ' ' ड ' सारखं काहितरी लिहायचा, मग पोरांची उगाच चर्चा व्हायची, कोणाला तो ' फ ' दिसायचा तर कोणाला ' ई ' आणी मग हातातल्या जादूच्या बोळ्यानी, चिमट्याने गोल गोल फिरवित ते भांडं जे चांदी सारखं चकचकीत रुप घ्यायचं त्याला तोड नसायची, आजही तो अनामिक आनंद मला आठवतोय !.... मग ते भांडं कुणाचही असो, त्या झळाळणार्‍या आनंदाचा त्याच्याशी कुठलाही संबंध नसायचा. त्या काळी स्टिलची भांडी असायची पण ती वापरणं ही
उच्चवर्गियांची लक्षणं होती. असली तरी ति वापरायची नसायची तर जेवणाची असायची. स्वयंपाकाची किंवा पाणी तापवायची भांडी मात्र पितळाचीच असायची. आत्तापर्यंत बरीचशी भांडी कल्हई लावून झालेली असायची, बायका ती पारखून निरखून सुहास्यवदने घरी घेवून जायच्या. लोट्या, तपेले, पळ्या, चरव्या, सतेले, पातेले नवं रुप धारण करायची. मध्येच कोणीतरी आणलेली भाजी भाकरी बाजूला ठेवून कल्हईवाला जोमाने काम संपवण्याच्या मागे लागलेला आसायचा. पोरंही कंटाळून पांगलेली असायची.... त्याची जागा नव्या पोरांनी घेतेलेली असायची.... असं करता करता अखेर तो खाक्या संपायचा.... चमकदार भांड्याची उतरंड हळू हळू स्वगृही जायची, उन्हं उतरत जायची..... निखाराही कोळजत जायचा.... आणि त्यावर पाणी ओतुन तो त्याला शांती द्यायचा...पोरं त्या ओल्या वाफाळ्त्या चिखलात उकरुन कथिलाच्या गोळ्या शोधू लागयची..... कल्हईवाला सामान बांधून सायकलवर टांग मारुन निघून जायचा........
आज खूप वर्षांनी तो तडतडणारा आवाज पुन्हा ऐकू आला.... मन मागे डोकावलं, गॅलरीतुन पाहिलं तर एका पॅन्ट शर्टवाल्या कल्हईवाल्याने आपली भट्टीलावलेली होती. अर्धा तास मी पुन्हा बघत राहीलो दोनच भांडी करुन तो निघून गेला खरा..... पण मला अन् माझ्या गतकाळाला चांदीचा वर्ख लावून गेला.

गोदेय..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आमच्या सोसायटीतसुध्दा येतो कल्हईवाला. पण कधी ही प्रक्रिया पाहिलेलीच नव्हती. आज इथे वाचल्यामुळे थोडी कळली. खरं तर ह्या अश्या नामशेष होत चाललेल्या व्यवसायांबद्दल आणि ते करणार्‍या लोकांबद्दल माबोवर एक लेखमालिका व्हायला हवी.

मस्त लिहिलय यार! माझ्या आजीची आठवण आली, लहाणपणी तिच्याकडे राहात होतो तेव्हा नेहमी यायचा कल्हई वाला आमच्याकडे

मस्तच! माझाही हा एक उत्सुकतेचा खेळच होता. पण ज्या बारकाईननिरीक्ष्क्णकेलएयत्याच्ला दाद!

खूप लहान असताना मलाही आठवते आहे की आमच्याकडे सुधा यायचा कल्हईवाला. सगळ वर्णन अगदी बरोबर मिळत जुळत. अजूनही हे कलई वाले बघायला मिळतात हे वाचतानाच खूप मज्जा वाटत होती. खूप छान वर्णन केल आहे.

अरे छानच, सो नॉस्टेल्जिक!!!

अजूनही कल्हईवाले येतात???

किती छान आठवण करून दिलीत... ते कल्हई प्रकरण बघताना भोवतालच्या सगळ्या पोरांचा आ सताड वासलेला असायचा.