काही चित्रपटविषयक नियम - भाग १

Submitted by फारएण्ड on 24 September, 2009 - 03:15

आम्ही चित्रपटांच्या बाबतीत गंभीर व्हायचे अधूनमधून ठरवतो. कधीतरी एकदा याबाबतीत पीएचडी करायला उपयोगी पडावे म्हणून असे अभ्यासपूर्ण लेख लिहायचा प्रयत्न करतो. पूर्वी लिहीलेल्या "दिल" आणि "इश्क" यावरील लेखांनंतर हे आमचे तिसरे पुष्प. फूल ना फुलाची पाकळी असे लिहीणार होतो, पण येथे पाकळ्या इतक्या झाल्या की फूलच म्हणणे योग्य होईल. पण तरीही तुम्ही दिल इश्क वाचले नसतील तर ते आधी वाचावे म्हणजे... बरे पडेल(नोट-१).

पण यावेळेस रिसर्च करताना असे लक्षात आले की या गोष्टी ज्या नियमांमुळे घडतात त्या नियमांची माहिती घेतल्याशिवाय एखाद दुसर्‍या गोष्टींबद्दल लिहून फारसे काही हाती लागणार नाही. तेव्हा या पूर्ण चित्रपटसृष्टीचे म्हणून जे नियम आहेत त्याबद्दल हा लेखनप्रपंच.

आमचा पूर्वी असा समज होता की फक्त कार्टून्स मधल्या विश्वातच फक्त वेगळे शास्त्रीय नियम होते. म्हणजे टॉम किंवा डोनाल्ड पोळीसारखे लाटले जाउन पुन्हा (तव्यावर न ठेवता) फुगून पूर्वीसारखे होतात. त्यांच्या पायाखालचा सपोर्ट गेला तर तो गेलाय हे त्यांना कळेपर्यंत ते पडत नाहीत. घाटातून चाललेली आगगाडी रूळ सोडून आख्खा डोंगर हिंडून पुन्हा रूळावर येते किंवा मोठे वळण घेताना तिचे मागचे डबे एखाद्या लांब कापडासारखे हवेत तरंगून पुन्हा रूळावर येतात वगैरे. पण इतर चित्रपट बघून हे लक्षात आले की त्यात सुद्धा स्वतःचे काही नियम होते. त्यातील काही पाहू:

१. कॅमेर्‍याच्या फ्रेम मधून आपल्याला दिसले तर त्या प्रसंगातील कलाकारांना कोठूनही दिसते, आपल्याला दिसले नाहीतर त्यांनाही कोठूनही दिसत नाही.
अ. कथा एखाद्या मोठ्या हॉल मधे किंवा अगदी वाळवंटात घडत असते. दोन जण एकमेकांशी बोलत असतात. आजूबाजूला कोणीही नसते. मग एक दोन मिनीटांनी धाडकन कोणीतरी एकदम क्लोजप फ्रेम मधे येउन सगळ्यांना धक्का देते. ही अचानक आलेली व्यक्ती आपल्याला न दिसल्याने त्यांनाही दिसत नाही.

ब. याउलट दारावर वाजवलेली बेल ऐकून आतला माणूस जरी काही न बोलता दार उघडायला येउ लागला की बाहेर उभा असलेल्या माणसाला ते आपो आप कळून बेल वाजवायचे बंद होते.

२. डायनोसोर वगैरे प्राण्यांनाही कोणाला आधी खायचे आणि कोणाला चित्रपट संपेपर्यंत खायचे नाही याचे ज्ञान असते. मॉन्स्टर चित्रपटात हीरो, हीरॉइन व मुख्य व्हिलन हे सर्व सोडून बाकी जवळचे लोक हे त्या डायनोसोर, अजगर, मगर वगैरेंचे चित्रपटातील मधल्या वेळचे खाणे म्हणून घेतलेले असतात. मॉन्स्टर कितीही उंच असला तरी त्यापासून पळणारे लोक आकाशात कोठेही पाहात पळतात. तसेच डायनासोरच काय पण धावत्या वाहनापासून स्वत:ला वाचवायला पळणारे लोक त्या वाहनाच्या पुढे त्याच रस्त्यावर सरळ रेषेत पळतात, आजूबाजूला नाही. व्हिलन सहसा नको तेथे डेअरिंगबाजपणा केल्याने त्या मॉन्स्टरकडून खाल्ला जातो.

३. एखादी कथा जेव्हा एखाद्या मोठ्या शहरात घडते तेव्हा त्यातील प्रसंग नेहमी त्या शहरातील नावाजलेल्या ठिकाणाच्या जवळपासच घडतात. म्हणजे पॅरिस असेल तर आयफेल टॉवर, सॅन फ्रान्सिस्को असेल तर गोल्डन गेट ब्रिज वगैरे. प्रीती झिन्टा न्यू यॉर्क मधे जॉगिंग करत असेल तर ती ब्रूकलिन ब्रिज, सेन्ट्रल पार्क वगैरे मधेच जाते. सिडने ला आमीर खान चे ऑफिस त्या ऑपेरा हाउस समोरच असते. सत्या सुद्धा कोठूनही आला तरी व्हीटीलाच उतरावा लागतो, कुर्ला ट. वगैरे चालत नाही.

४. ज्या लोकांवर शास्त्रीय संकटे येणार असतात त्यांची मुले अगदी पाळण्यात असली तरी आधीच "हॅकर" म्हणून तरबेज असतात. डायनोसोर ठेवलेल्या पार्कचे इन्वेस्टर्स, त्याची इन्श्युरन्स कंपनी स्वतंत्र वकील पाठवून इतर गोष्टींची पाहणी करते पण अशा ठिकाणी टी-रेक्स चे पिंजरे इत्यादी ठिकाणची कुलुपे मात्र ८-१० वर्षांच्या मुलांनाही सहज उघडता बंद करता येतील अशी डिझाइन केलेली असतात. एवढेच नव्हे तर वापरायला सोपी व्हावीत म्हणून आख्ख्या पार्क चा नकाशा कॉम्प्युटर वर टाकून माउस ने सहज ओणत्याही ठिकाणी जाउन दारे उघडता वगैरे येतील एवढे सोपे केलेले असते. अशा गोष्टी सहज करणार्या लहान मुलांना कोणतेही पासवर्ड बाहेर दारावर रॅप्टर्स धडका मारत असताना दोन मिनीटात सुचतात.

५. एखादा कॅरेक्टर "फ़्लॉ" असल्याशिवाय नायक किंवा नायिका होताच येत नाही. आधी घटस्फोट दिलेली किंवा संबंध दुरावलेली बायको, लहान मुले किंवा आधी हातून घडलेली चूक, ड्रग्ज किंवा अती दारूचे व्यसन, एखादे अफेअर असावेच लागते. अजून एक म्हणजे दुरवलेले कुटुंब असेल तर हिरो ने काहीतरी अभूतपूर्व पराक्रम केल्यावर ते पुन्हा एकत्र येते.

६. चित्रपटातील सर्व टाइम बॉम्ब हे शेवटच्या एक दोन सेकंदात निकामी केले जातात. फार फार तर एखादे मिनीट. आणि मुख्य म्हणजे बहुधा हीरो वगैरे लोकांना त्यांच्याकडे नक्की किती वेळ आहे हे कळावे म्हणून ते तसे लावले जातात. तो बॉम्ब फुटायच्या आत तेथून स्वत: पळून जायचे हा उद्देश असलेला व्हिलन बहुधा हीरो किंवा हीरॉइन ला वाचण्यासाठी किती वेळ आहे हे सहजपणे कळेल असा इंडिकेटर दाखवणारा बॉम्ब ठेवून जातो.

७. कलाकारांबद्दल च्या चित्रपटात त्यांच्या आयुष्यातील प्रसंगाप्रमाणे आनंदी किंवा दु:खी गाणी ते स्टेज वर सादर करतात. एखाद्या दिवशी चांगली भरपूर देशी 'घेऊन' एखादी खटकेबाज लावणी ऐकायला त्या शो ची किर्ती ऐकून व आधीची "आ रं बत्ताशा, कशाला पिळतोयस मिशा" अशी भन्नाट गाणी ऐकायला किंवा स्वत:ची "गडी अंगानं उभा नी आडवा" वगैरे तारीफ़ ऐकायला आलेले प्रेक्षक ती "इष्काची इंगळी डसली" किंवा "मोसे छल किये जाय" सारखी रडकी गाणी सुद्धा त्याच उत्साहाने ऐकतात.

८. एखादी चांगली दणकट बिल्डिंग. आत व्हिलन लम्बे चौडे डॉयलॉग मारतोय. त्यात एखादा फारच आगाउ संवाद मारतो आणि तेवढ्या बाहेरून भिंत, काच फोडून हीरो एन्ट्री मारतो. कधीकधी ही एन्ट्री गाडीतूनही असते. गाडीतून फास्ट आल्यामुळे तो आधीचा संवाद म्हंटला जात असताना त्या जाड भिंतीच्या बिल्डिंग पासून लांब असला तरी त्याला तो संवाद ऐकू गेलेला असतो. एवढेच नव्हे तर भिंत वगैरे फोडून आत येताना त्याला त्याचे योग्य प्रत्युत्तर ही सुचते.

९. एखादा मौल्यवान हिरा, एखाद्या बँकेतील प्रचंड रक्कम. चार पाच जण एकत्र येऊन ती चोरायचे ठरवतात. या चोरांतही चांगले व वाईट चोर असतात. अटीतटीच्या क्षणी सर्व सुरक्षा रक्षकांचे लक्ष भलतीकडे असल्याने चोरी वगैरे यथासांग होते. आता सगळे चांगले चोर ती लूट एका बॅगेत टाकून निघणार तेवढ्यात त्यांच्यापैकी एकजण- वाइट चोर- पिस्तूल काढतो व ती बॅग स्वत:कढे घेऊन तेथून पळून जातो. मग चांगले चोर एक मिनीट दु:खी चेहरे करतात पण मग रहस्य उघडते. वाईट चोर विमानात बसल्यावर बॅग उघडतो, तर त्यात दगड निघतात आणि मूळ हिर्‍याची बॅग चांगल्या लोकांकडेच राहते. वाईट चोर लोक आपण चोरलेल्या बॅगेत खरच सोने वगैरे आहे की दगड भरले आहेत हे ती पुन्हा बदलायचा चान्स निघून जाईपर्यंत बघत नाहीत.

१०. ही टेक्नॉलॉजी हिन्दी चित्रपटात फारशी दिसली नाही. जेथे सुरक्षेसाठी क्लोज सर्किट व्हिडीओ लावलेले असतात अशा इमारतींमधे कोणत्याही खोली तून अथवा कॉरीडॉर मधून एखादे छोटे यंत्र बसवून कोणालाही तेथेच पूर्वी घेतलेल्या व्हिडीओचे पुन:प्रक्षेपण करता येते. असे इमारतींमधल्या वेगवेगळ्या ठिकाणचे प्रि-रेकॉर्डेड व्हिडीओ सर्वत्र उपलब्ध असतात. तसेच हा आधीचा व्हिडीओ live feed च्या ऐवजी लावला जात असताना अचूक त्याच वेळेस ज्यांनी हे सतत चेक करावे ती सिक्यूरिटी वाली मंडळी बरोबर दुसरीकडे कोठेतरी बघत असतात.

११. नायक किंवा नायिकेकडे असलेले कोणतेही नेटवर्क वाले उपकरण म्हणजे सेल फोन, लॅपटॉप वगैरे जगात कोठेही असले तरी लगेच नेटवर्क ला कनेक्ट होते, तेथून अतिशय वेगाने कोणतेही ग्राफिक्स दिसते, तसेच कोणत्याही देशाच्या कोणत्याही सरकारी किंवा खाजगी संस्थेच्या नेटवर्क वर तेथून जाता येते आणि ते हॅक करून पाहिजे ती माहिती मिळवता येते.

१२. कोणत्याही बँकेतून दुसर्‍या अकाउंट वर पैसे ट्रान्स्फर होत असले की स्क्रीन च्या दोन्ही बाजूला एक एक फोल्डर दाखवून त्या फाइल्स किंवा पैसे इकडून तिकडे उडी मारून जातात. तसेच कधी कधी जास्त पैसे ट्रान्स्फर होत असले की जास्त वेळ लागतो. या ट्रान्स्फर्स त्या करणार्‍याला पकडू शकेल असा माणूस स्क्रीन जवळ येईपर्यंत बरोबर पूर्ण होतात. तसेच काही वेळेस तर पेट्रोल भरल्यासारखे किती पैसे ट्रान्स्फर झाले हे दाखवणारा काउंटर वाढत जातो.

असो. तर असे हे १२ नियम आत्तापर्यंत कळाले आहेत. अजून काही सापडले आहेत, ते बर्‍याच ठिकाणी लागू होतात का नाही हे पाहून पुढचा भाग टाकला जाईल.

नोट-१: येथे "म्हणजे..." च्या पुढे त्या गंभीर टोन मधे काय लिहायचे सुचले नाही हे साफ खोटे आहे.

गुलमोहर: 

मस्तं...
प्रेमप्रसंग वगैरे झाल्यानंतर लगेच वाद्य वाजायला लागतात. हिरो हिरोईन ऑन द स्पॉट सगळ्या स्टेप्स न चुकता करत गाणी म्हणतात. गाणं म्हणता म्हणता नाचताना त्यांना अजिबात धाप लागत नाही.. Happy

सही फारेंडा. Happy
सिनेमावाले हे नियम पाळताना नेहेमी बघतो. पण हे सारे एकाच वेळी आठवून लिहिणे अवघड आहे ब्वा! त्या सिनेमावाल्यांनाही आठवणार नाहीत एकाच वेळी, इतके आहेत ते. हे वाचलं, तर ते पण तुला म्हणतील, 'तुस्सी ग्रेट हो, फारेंड!'

अमोल.. मस्तच. Happy

चिमण्या... अरे बाँड मिसाइल डिफ्युज करताना मिसाइलच्या बाजुला ठेवलेले मॅन्युअल तरी वाचतो .. पण हिंदी चित्रपटामधल्या हिरोला.. तसे मॅन्युअल वाचायचीही जरुरी नसते किंवा तशी तसदीही तो घेत नाही.. उदाहरणार्थ.. चित्रपट तिरंगा!... त्यात राजकुमार मिसाइल कसे निकामी करतो ते जुन्या मायबोलिवरच्या.. उचापतीच्या त्या चित्रपटावरच्या... या तुफान विनोदी पोस्टात ...तुला वाचायला मिळेल.. सगळ्यांनी जरुर वाचा.. काय जबरी लिहीले अहे उचापतीने....:)

http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=644&post=1042313#POS...

तळटिपः उचापती कुठे आहेस सध्या?आणि श्रद्धाके.. आजकाल तुही दिसत नाहीस अश्या मुव्हिज बद्दल लिहीताना?

सही Happy

मुकुन्द वाचलं परत.. मला जुन्या हितगूजावरचे बीबी वाचले की उगाचच गावातल्या पारंपारिक साध्या वाड्यात जाऊन आल्यासारखे वाटते, उगाचच 'काय ते दिवस होते' वगैरे वाटायला लागते , काही जुने, त्या काळात फॉर्मात असलेले आयडी पाहिले की तर जास्तच वाटते.. असो. Happy

उचापतीचे माहित नाही, पण श्रद्धाके यांचा नेट अ‍ॅक्सेस कंपनीने काढून घेऊन आपल्यावर लयच अन्याय केलाय, नाही का?

मस्तच नियम आहेत.... Biggrin

अजुन कही आठवलेले....

दु:खात असो नाहीतर सुखात... ३-३ कडव्यांची गाणी ती पण चालीत, आयत्यावेळेला सुचतात???

चित्रपट हिंदी असो वा इंग्रजी, हिरो ला कुठलही वाहन मग ती फटफटी असो की विमान व्यवस्थित चलवता येत. ते पण कुठल्याही देशात.... नियम, लायसन्स इ इ हिरो ला लागु नाही....

नवीन देशात, रस्ते माहित असतात...

बुलेट्स चा वर्षाव झाला तरी एकही गोळी हिरो ला लागत नाही????

सुपरहिरो /हिरॉइन जेव्हा सुपर काम करतात तेव्हा गंम्मतशिर कपडे घालतात??? (पँटवरतुन चड्डी....) Rofl

पावसात भिजत गाणे म्हणणे आणि त्यात सुध्ध्दा हिरोईनने पान्ढरे कपडे विशेशतः साडी घालणे कम्पलसरी असते आणि बर्फाळ प्रदेशात गाणे असेल तर हिरो पूर्ण कपड्यात अगदी ओवरकोट वगैरे घालुन असतो पण हिरोईन मात्र मिनी म्हणजे तोकड्या कपड्यातच पाहिजे...
आणखी एक म्हणजे अन्त्यसन्काराचा सीन असेल तर सर्वान्चे कपडे रिन सफेद्च असतात्...अगदी कितीही गरीब लोक असो...

सह्हिच!

नायकाचा दोन-सव्वादोन तास दुस्वास करणाऱ्या हिरोईनच्या बापाचे शेवटच्या ५ मिनिटात मत परिवर्तन होते....
भुताखेताना बन्द दरवाजा ओलांडता येतो, पण खुर्ची वर बसल्यानंतर ते पडत नाहीत...

Lol Rofl

>>चित्रपट हिंदी असो वा इंग्रजी, हिरो ला कुठलही वाहन मग ती फटफटी असो की विमान व्यवस्थित चलवता येत. ते पण कुठल्याही देशात.... नियम, लायसन्स इ इ हिरो ला लागु नाही..>>>>
वर आणि रस्त्याच्या कडेला सायकल लावून नेमका लघुशंका करणार्‍या माणसाची सायकल, रंगार्‍याची शिडी हे सगळे पळवतात. खलनायकाचा पाठलाग करायचा असला की हिरोला सोपं जावं म्हणून कुठे कुथे गाड्या, चाव्यालावून तय्यार ठेवलेल्या असतात...

आणि हिरो-हिरॉईन काळबेरं करत असताना त्या खोलित हळूच कोणीही येत नाही, सगळे बोंबलतंच येतात...
लग्नात हिरो-आणि हिरॉइनिला नवरा-नवरीपेक्षा जास्ती मागनी असते, नारायणसारखी...

>>पैसे इकडून तिकडे उडी मारून जातात. तसेच कधी कधी जास्त पैसे ट्रान्स्फर होत असले की जास्त वेळ लागतो. या ट्रान्स्फर्स त्या करणार्‍याला पकडू शकेल असा माणूस स्क्रीन जवळ येईपर्यंत बरोबर पूर्ण होतात. तसेच काही वेळेस तर पेट्रोल भरल्यासारखे किती पैसे ट्रान्स्फर झाले हे दाखवणारा काउंटर वाढत जातो.

Lol

Rofl

पाक्.गोओव्ही.पिके किंवा पाकनॅशनल्बँक ही साईट हॅक करता येइल का? हा प्रयत्न करुन बघावाच. पासवर्ड बहुदा तालीबान असावा. Proud

अजुन एक... हिरोला पर्किंग स्पॉट अस्सा दुकानाच्या, हॉटेल च्या स्म्मोर मिळतो... Happy
आणि आम्हाला??? शोध शोध शोधावा लागतो Sad

जबरी लिहीलंय! Rofl

तसेच काही वेळेस तर पेट्रोल भरल्यासारखे किती पैसे ट्रान्स्फर झाले हे दाखवणारा काउंटर वाढत जातो.>>>> Biggrin

भारीयेत नियम Lol

माझे दोन आणे -
कुठल्याही बॉलिवुड पिक्चरमध्ये शेवटी आनंदी आनंदच होतो.
हिरॉईनच्या मैत्रिणी तिच्याहून सावळ्या असतात.
गुंडांना स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल वगैरे वापरणं शक्य नसतं म्हणून ते ओमनीच वापरतात.

जबरदस्त!

आणखी काही निरिक्षणे :
१. कितीही छोटी गल्ली असली तरी हिरोची गाडी त्यातून सहज निघते. या गल्ल्यामधे कधीही डबल पार्किंग केलेले नसते. (सं. ट्रान्स्पोर्टर आणि इतर अगणित) (नाहीतर माझ्या घराबाहेरची गल्ली! गाडी बाहेर काढताना रोज फेफे उडते)
२. हिरोने गाडी कुठेही उभी केलेली चालते. टोईन्गवाले त्या भागात त्या काळात ढुंकूनही पहात नाहीत. (नाहीतर आमच्यासारखी कमनशिबी माणसं... अर्धा डझन केळी विकत घेईपर्यंत मागे पार्क केलेली गाडी सुमडीत टो करून नेलेली असते)
३. गाडीचे ब्रेक्स नेहमी घाटात आणि भरपूर पाउस असतानाच फेल होतात / फेल झालेले कळतात. असं कध्धीच होत नाही की बुवा हिरो / हिरॉईन इस्त्रीला दिलेले कपडे आणायला निघालेत आणि ब्रेक्स फेल झालेत.
४. व्हिलन लोकं हिरो-हिरॉईन्सच्या मागावर असतील तर ते एक युगलगीत झाल्याशिवाय मध्ये हस्तक्षेप करत नाहीत.

हे वाचलंच नव्हतं.. मस्त!! Lol

दु:खात असो नाहीतर सुखात... ३-३ कडव्यांची गाणी ती पण चालीत, आयत्यावेळेला सुचतात??? >> अगदी अगदी.. लहान असताना नेहमी वाटायच की श्या! मला एक पण गाणं कसं सुचत नाही

Pages