सांगायचे आहे माझ्या सानुल्या फुला.....

Submitted by मोदक on 21 May, 2010 - 04:13

ही घटना माझा मुलगा राजस ६ महिन्यांचा असतानाची आहे. त्या दिवशी मी ऑफिसमधून थोडासा लवकरच (रा. ०८:३०) घरी आलो होतो. घरातला सीन नेहेमीसारखाच होता. म्हणजेच घरात झी मराठीवर डेलि सोप चे दळण चालू होते. माझे बाबा ऑफिसमधून घरी आलेले होते आधीच. माझी आई राजसशी खेळण्यात मग्न होती. तो पण तिच्या मांडीत बसून मस्ती करत होता. त्याचा अनुप काका (माझा धाकटा भाऊ) बेडरुम मध्ये बसून C.A. चा अभ्यास करत होता. आणि आप्पा (माझे आजोबा - वय वर्षे ८७) त्यांच्या खोलीत काहीतरी अध्यात्मिक वाचन करत होते. तो दिवस होता शुक्रवारचा! म्हणजे पुढे वीकएन्ड होता. धम्माल! २ दिवस सुट्टी. पिल्लूशी मस्ती करण्याचे व खेळण्याचे २ हक्काचे दिवस!

त्या पूर्ण आठवड्यात मला सतत काहीतरी चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं. कसलंतरी guilty feeling आलं होतं. कसला अपराधीपणा वाटतोय ते कळतही होतं आणि नव्हतं पण असं काहितरी विचित्रच झालं होतं. पण पुरुष असल्यामुळे चारचौघात नीट व्यक्तही होता येत नाही आणि धड रडताही येत नाही. आठवडाभर तसाच ऑफिसला जात राहिलो. रात्री घरी पोचतो तेव्हा पिल्लू दिवसभर खेळून दमून झोपायला आलेलं असतं. शुभा आणि माझी ऑफिसहून येण्याची वेळ ही कायम अशी. त्यामुळे बर्‍याचदा माझी आईच राजसला रात्रीचा भात वगैरे भरवून झोपवते.

त्या दिवशी मी थोडा लवकर घरी आलो होतो पण शुभा अजून पोचली नव्हती. माझी आई मग म्हणाली की "मीच राजसला भाताची पेज भरवते आणि झोपवते. मग शुभा आली की आपण सगळे जेवायला बसू." मी आईला बरं म्हटलं. पण मनात वाटत होतं की बिच्चारं पिल्लू. काहीही तक्रार करत नाही. दिवसभर आजीशी खेळत राहतं. रडत नाही अजिबात! दिवसभर मी, शुभा, बाबा, अनुप ऑफिसमध्ये असतो. आम्हा सगळ्यांना घरी येईस्तोवर ८ ते ९ होतातच होतात. म्हणजे सकाळी ८ ते रात्री ८ पिल्लू आणि आजीचीच गट्टी असते. दोघेही बिच्चारे बिनातक्रार एकेमेकांशी खेळत असतात. आता रात्रीचं जेवण तरी त्याला त्याच्या आईने भरवायला हवं की नको! पण आमच्या या असल्या नोकर्‍यांमुळे बर्‍याचदा ते शक्य होत नाही.

मी अशा विचारात असतानाच दाराची बेल वाजली. शुभा आली होती. मी एकदम खुश झालो. म्हटलं आज सगळे वेळेत घरी आलेले आहेत (म्हणजे राजसला झोप लागण्यापूर्वी!). राजसच्या चेहर्‍यावर देखील त्याच्या आईकडे बघून खुशी प्रकट झाली. शुभा फ्रेश होईस्तोवर माझ्या आईने राजसला भरवायला घेतलं. मी बाजुलाच बसून पिल्लूशी गप्पा मारत होतो. तो मजेत जेवत होता. हसत होता. शुभा पण आम्हांला join झाली. राजसला भरवत असताना सभोवताली १-२ जण लागतात. त्याच्याशी सगळ्यांनी गप्पा मारायच्या, मोबाईलवर ससा-कासवाचं गाणं लावायचं. एकाने हातात खुळखुळा किंवा तत्सम काहीतरी वाजणारं खेळणं घेऊन बसायचं असा आमचा जेवणाचा कार्यक्रम चालतो.

त्या दिवशी घरातले सगळे त्याच्या अवतीभवती असल्याने राजसचे जेवण अगदी खुशीत चालले होते. मी त्याला एकेक चित्रविचित्र चेहरे करून दाखवून जबरी हसवत होतो. तो जोरजोरात हसायला लागला की मी अजून अजून हावभाव करून दाखवत होतो. शेवटी माझी आई म्हणाली की "बास आता! राजसला ठसका लागेल! त्याला जेवताना हसवू नकोस. घशात घास अडकेल त्याच्या. जेवण झालं की मग करा हवी तेव्हढी मस्ती." तरी आमचा आपला दंगा चालूच होता. इतक्यात आई म्हणत होती तसेच झाले. राजसला जोरदार ठसका आला. त्याच्या तोंडातून सगळी भाताची पेज उलटून पडली. थोडीशी पेज त्याच्या घशातून नाकात पण गेली आणि नाकपुड्यांमधून बाहेर येऊ लागली. त्यामुळे त्याला श्वास घेता येईना! तो घाबरून हातपाय झाडायला लागला. जाम कावरा-बावरा झाला तो! जवळजवळ ७-८ सेकंदभर त्याने श्वासच रोखून धरला. चेहरा पूर्ण लाल झाला त्याचा बराच वेळ श्वास न घेतल्याने. माझ्या तर तोंडचे पाणीच पळाले. मला अक्षरशः रडू यायला लागलं. माझ्या डोळ्यांतून कधी आसवं वहायला लागली माझं मलाच कळलं नाही. आवाज रडवेला झाला. मी "सोनु, सोनु" असं करून पिल्लूला हाक मारत होतो. त्याला दिलासा द्यायचा प्रयत्न करीत होतो. "घाबरू नकोस, तुझा बाबा आहे इथेच. तुझ्याजवळ! तुझी आई, तुझे आजी-आबा पण सगळे इथेच आहेत. रडू नकोस! माझ्या सोन्या!" असं त्याला सांगण्याचा प्रयत्न करीत होतो.

हे सगळे इतक्या क्षणार्धात घडले की १-२ मिनिटांत सगळे ठिक झाले होते. आईने हळूहळू त्याला शांत करून त्याच्या नाका-तोंडातून पेज पूर्णपणे काढून टाकली. त्याचे रडणेही हळूहळू कमी झाले. शुभा आणि माझी आई या दोघीही त्या क्षणाला खूपच खंबीर होत्या. दोघी माझ्याइतक्या मुळीच घाबरल्या नव्हत्या. दोघींनी मिळून ती situation एकदम नीट handle केली होती. पिल्लू पण नंतर हसायला लागलं होतं. त्याचं ते गोड हसू बघून मला अजूनच भरून आलं. किती निरागस जीव तो! माझ्या वेड्या चाळ्यांमुळे त्याला हसायला आलं आणि हे मोठ्ठं रामायण घडलं. त्यामुळे त्याचं ते निर्व्याज हसणं पाहून मला अजूनच guilty वाटू लागलं. आधीच असलेल्या अपराधीपणाच्या भावनेत अजूनच भर पडली. खूप रडायला यायला लागलं. कंट्रोलच होईना. मनसोक्त रडून घेतलं मग मी. बाबा माझ्या पाठीवरून हात फिरवीत होते. मला शांत करीत होते.

रडणं ओसरल्यानंतर विचार करताना असं वाटलं की इतका हळवा का झालो मी? जिथे शुभा आणि माझी आई यांनी स्त्रिया असूनही स्वतःला control केलं तिथे मला अगदी मुळूमुळू रडायला का यावं? हा सगळा गोंधळ पाहून आप्पा पण त्या खोलीत आले. त्यांनीही माझ्या खांद्यावर हात ठेवून मूकपणेच मलाच दिलासा दिला. मी शांत झाल्यानंतर बाबा आणि आप्पा दोघांनीही मला समजावलं की "पुरुषाने इतकं हळवं होता उपयोगी नाही." मी अंतर्मुख झालो. खरंच मी मनाने इतका कमकुवत आहे का? मला का बरं असं रडायला आलं. मग माझ्यातलंच दुसरं मन मला म्हणालं की "तु चांगला बाबा होण्याचा प्रयत्न करता करता थोडासा गडबडला आहेस. आपल्या काळजाच्या तुकड्याला तुला सगळी सुखं, आराम आणि प्रेम असं सर्व द्यायचं आहे. देतही आहेस तू. पण तुला त्याला वेळ देता येत नाहिये." इथेच खरी मेख आहे.

जेव्हा माझ्या ऑफिसमध्ये मजबूत काम असतं तेव्हा किंवा parttime MBA चे classes असतात तेव्हा मला घरी यायला रात्रीचे ११ वाजतातच! रात्री कितीही लेट झाला तरी सकाळी निघण्याची वेळ ७:३० चीच! म्हणजे पिल्लूला मी सकाळचे ६:३० ते ७:३० या १ तासातच काय ते भेटणार! शुभाचीही तर्‍हा थोड्याफार फरकाने अशीच. मग पिल्लूला आई-बाबांचे प्रेम मिळणार तरी कसे? दिवसभर माझी आई त्याला सांभाळते म्हणून ठिक आहे. आज त्याला पाळणाघरात ठेवावे लागले असते तर कुठल्या पाळणाघराने त्याला रात्री ९ पर्यंत सांभाळले असते? बरं सांभाळले जरी असते तरी आपल्या स्वतःच्या घरात आजीकडून जी माया आणि प्रेम मिळते तसे मिळाले असते का?

आता आपण खूप पैसा कमावतोय. पण त्यासाठी जीवाची तगमग करावी लागतेय. आयुष्यातलं काहीतरी sacrifice करावं लागतंय. पिल्लूला हवा तसा वेळ न देता येणं ही त्यासाठी किंमत चुकवावी लागतेय. आम्हां दोघांच्या नोकर्‍या, माझं MBA चं college, अभ्यास अशी सर्व सर्कस असल्याने पिल्लूला सांभाळण्यासाठी माझ्या आईला दिवसभर घरात अडकून पडावं लागतं. ती पण त्याच्या मागे सारखी उठबस करून दमून जाते बिचारी. पण हे सगळं ती हसत हसत करते. मग खरंच आपण जे करतोय ते बरोबर आहे का? मी नोकरी सोडून घरी तर बसू शकत नाही. शुभा पिल्लूसाठी नोकरी सोडायला मागेपुढे पाहणार नाही. शेवटी पैशापेक्षा पिल्लू महत्त्वाचे! पण माझी आई म्हणते की "अरे, मी आहे ना घरी! मी सांभाळते पिल्लूला! तुम्ही अजिबात काळजी करु नका." मग आमच्या मनात असा प्रश्न उभा राहतो की पैसा महत्त्वाचा की घर? आज माझे आई-बाबा आमच्यासोबत राहत आहेत म्हणून आम्हां दोघांच्या नोकर्‍या शक्य आहेत.

या सगळ्या संमिश्र भावना माझ्या मनात एकाच वेळी निर्माण झाल्या आणि बांध फुटून मला रडायला आले. मला वाटते की आमच्या पिढीतल्या ज्या आई-बाबांच्या घरी अशीच situation असेल त्यांच्याही मनात असाच प्रकारचे द्वंद्व उभे राहत असेल. आजकालचे जीवनच असे बनून गेले आहे. त्याला इलाज काय! आणि मग हा प्रश्न अनुत्तरीत राहिला की असं एका क्षणी मनाचा संयम गळून पडतो आणि डोळे भरुन येतात!

गुलमोहर: 

हो. सेम टू सेमच असत बर्‍याचदा पण आपण ते मांडत नाही तोवर ते फक्ट आपलंच आहे असे वाटत असतं Happy
खूप छान लेख लिहिला आहे. !!

आपल्या रुढीप्रिय समाजाने खालील अलिखीत बंधने घातली आहेत ती काळाच्या ओघात वाहुन जाणे आवश्यक आहे. आजच्या युगात सर्व समाजाने ही घातक बंधने तेव्हा ती का आली असावीत आणि आता ती का अयोग्य आहेत ह्याचा सारासार विचार करुन काढून टाकली पाहिजेत. मात्र सारासार विचार करणे आवश्यक आहे. केवळ जुनी बंधने म्हणून मी पाळणार नाही हा विचारही तितकाच घातक आहे.

१. पुरुषांनी रडायचे नाही. एकतर दाबून टाकायचे नाहीतर एकट्याने कोणाला न दाखवता रडायचे
२. कुटुंबातील पुरुषानेच कमवायचे, स्त्रीने नोकरी/ करीयर नाही केले तरी फरक पडत नाही
३. पुरुष कितीही अडचणीत सापडला तरी बायकांसमोर त्याने प्रश्न मांडू नयेत कारण त्याने तो कमकुवत मनाचा आहे असे सिद्ध होईल

वास्तविक ह्या अतिशय घातक प्रथा आहेत! जाचक म्हणणे underestimated होईल!
Psychology मध्ये हे सिद्ध झालेले आहे की कोणतीही भावना सप्रेस केली की त्याचे काही ना काही परिणाम मानसिक्/शारिरीक लगेच वा कालांतराने दिसून येतात. मनावरचा ताण हलका करण्यासाठी रडणे ही निसर्गाने दिलेली जादुई शक्ती आहे.

नवरा घरकाम व मुले सांभाळत आहे व बायको नोकरी करत आहेहे दृश्य अमेरिकेतील भारतीय कुटुंबात व्हिसा किंवा तत्सम मर्यादांमुळे दिसते. मात्र ते त्या दांपत्याने आवडून केलेले असतेच असे नाही. मात्र जर त्या दांपत्याने ठरवून असे करायचे ठरवले तर त्यात काहीही चुकीचे नाहीये. किंबहूना अशी उदाहरणे आता असणे अपरिहार्य झालेले आहे.

वर लिहिल्याप्रमाणे अशा fictitious नियमामुळे आपण बरेच सोपे Options घालवून बसतो.
'लोक काय म्हणतील' हा एक महत्वाचा factor धरला जातो. तो महत्वाचा नाही असे मी म्हणत नाही पण लोकांनी काहीही म्हटले तरी शेवटी जेव्हा आपले, आपल्या प्रियजनांचे अस्तित्व पणाला लागते तेव्हा तरी ह्या गोष्टींना दुय्यम स्थान देणे गरजेचे आहे.

किरण ची पोस्ट आवडली.
ही बायकोची कामं-हे नवर्‍याची , भारतीय समाजात कोणी कसं वागायचं याचे नकळत जे नियम घातलेत ते खरच घातक आहेत !
बाबा पण आई सारखेच हळवे असतात, होतात !

आता रात्रीचं जेवण तरी त्याला त्याच्या आईने भरवायला हवं की नको! पण आमच्या या असल्या नोकर्‍यांमुळे बर्‍याचदा ते शक्य होत नाही.

<<< हे वाक्य थोडं खटकलं, आई च्या जागी 'आई किंवा बाबा' असतं तर जास्त पटलं असतं :).

गेल्या वर्षी भारतात गेले होते तेंव्हा कि एक गोष्टं बर्‍याच घरी पाहून वाईट वाटलं.
अज्जी आजोबा नातवंडांना मनापासून सांभाळतात पण दिवसभर टी.व्ही पण चालु असतो.
सगळी छोटी मंडळी पण कंटिन्युअस्ली सिरियल्स बघत बसतात, आगदी प्रत्येक चॅनल च्या शोज चं टायमिंग, केरॅक्टर्स ची नावं पण तोंडपाठ असतात त्यांना :(.
दिवस भर दमलेल्या बिचार्‍या आज्जी अजोबांना विरंगुळा म्हणून टी.व्ही पहावासा वाटतो, पण वाईट वाटतं ते ज्या वयात मैदानी खेळ खेळायचे त्या वयात लहान मुलं सुध्दा इंटरेस्ट घालून 'के' छाप सिरियल्स पहातात !:(.

मोदक,

खुप छान लिहिलं आहेस... हल्ली सगळ्याच घरात हे पहायला मिळतं.
माझा मुलगा ओम आता ३ वर्षाचा आहे. मी आणि माझी बायको तृप्ती दोघेही नोकरी करतो. ओम दिवसभर त्याच्या आजी आजोबांबरोबरच असतो. मी तर रोजच रात्री ११ वाजल्यानंतर घरी येतो. त्यामुळे माझ्या घरीही तिच परस्थिती आहे. आपण पैसे कमवतो, घरकामाला नोकर ठेवतो, घरात जास्त खर्च करतो हे सर्व ठिक आहे. पण आजी आजोबांना पैसे नको असतात. त्यांना ते आपाल्या नातवासाठी जे काही करतात त्याचं त्यांना क्रेडीट दिलं गेलें पाहिजेनाआपल्याकडुन चार प्रेमाचे आभाराचे शब्द त्यांना पुरेसे असतात. तिथे दुर्लक्ष होउन देउ नकोस. Happy

छान लिहिलय. पण बाळाला आजी नाहीतर आईच भरवेल असं का? तुम्ही लवकर घरी आलात तर तुम्ही भरवायला हव ना? तो वेळ केवळ तुमचा आणि बाळाचाच असेल की.

मोदक सगळीकडे हेच चित्र असेल बहुदा...
त्यातल्या त्यात सुवर्णमध्य म्हणजे...शक्यतो सुट्टीच्या दिवशी आजी-आजोबांना पूर्ण विश्रांती घेणे भाग पाडावे. नातवामुळे दिवसभर अडकून राहिलेल्या आज्जीला तिच्या मैत्रिणींकडे, बाजारात, आवड असल्यास सिनेमाला घेऊन जावे, जमल्यास संपूर्ण फॅमिलीने एखादी वन-डे ट्रीप करावी छान निवांत...
या छोट्या छोट्या गोष्टी खूप भावतात...

हृदयस्पर्शी लेख.....आवडला Happy

पण आई करते आहे म्हणून तिच्यावरही जास्त ताण येउ न देण्याची खबरदारी घ्या तुम्ही लोकं. अन हो, ती करते आहे त्याची जाणिवही तुम्हाला आहे ती तशीच ठेवा.>>> अनुमोदन

शक्यतो सुट्टीच्या दिवशी आजी-आजोबांना पूर्ण विश्रांती घेणे भाग पाडावे. नातवामुळे दिवसभर अडकून राहिलेल्या आज्जीला तिच्या मैत्रिणींकडे, बाजारात, आवड असल्यास सिनेमाला घेऊन जावे, जमल्यास संपूर्ण फॅमिलीने एखादी वन-डे ट्रीप करावी छान निवांत >>>

आशुचँप, ऑलरेडी करतोय आम्ही असं Happy
सॅटर्डे - संडे ला त्यांना त्यांचे प्लॅन्स करण्यास वाव देतो. (सिनेमा, नाटक, आप्तेष्टांकडे चक्कर etc). आणि आम्ही कुठे बाहेर जाणार असल्यास राजसला सोबत घेऊन जातो. शिवाय माझं माहेरही जवळच असल्याने तिथे पिल्लूला घेऊन जाण्याचाही ऑप्शन आहेच. Happy

तुम्ही लवकर घरी आलात तर तुम्ही भरवायला हव ना? >>> आमच्या बाबांना जमत नाही ते. Wink मोदक असे करू गेल्यास त्याला नानी याद येईल अशी (किंवा "येथे पाहिजे जातीचे" या म्हणीची आठवण येईल अशी) सिच्युएशन येते eventually. Happy

माझा मुलगा अर्जुन, २ वर्षाचा झाला. १६ महिन्याचा असताना माझे आईबाबा परत निघून गेले (लंडन to इंडिया)..

अर्जुन आता nursery मध्ये कसा राहील ह्या काळजीने मला २-३ आठवडे ना झोप येत होती ना अन्न जात होतं.पण पिल्लू माझा वया पेक्षा खूपच मोठा निघाला. १ वीक मध्ये पूर्णपणे सेट झाला nursery मध्ये. आजही रोज सकाळी त्याला सोडताना त्याचा चेहरा खूप बारीक होतो.पण एकदा nursery मध्ये पोहचला की मला पापा देतो, मिठी मारतो आणि अशा पद्धतीने tata म्हणतो जसा काही म्हणत असावा, 'बाबा!! नकोस रे काळजी करू..मी राहीन छान'

Pages