'उगाच'चा दंतवैद्य

Submitted by कौतुक शिरोडकर on 14 May, 2009 - 07:35

माबोकरांनो नमस्कार. इथे माबोवर आल्यावर मी शक्यतो सगळेच प्रकार खरडले आणि तुमच्या माथी मारले. फक्त हे एक दालन सोडून. कारण विनोदाचं अंग की काय म्हणतात त्याची बोंबच. पण इथे काहीतरी खरडावं ही उर्मी अधूनमधून फास्ट गॅसवर उतू जाणार्‍या दुधासारखी उफाळत होती. यातच माझी भेट श्री. उमाकांत गाबाजी चरफडे यांच्याशी झाली. हे श्रीयुत म्हणजे माझे कॉलेजमित्र. आम्ही वर्तक कॉलेजातले सगळे 'टवाळ' (ही आमच्या ग्रुपची सर्वमान्य ओळख होती. याच्याशी 'टवाळ' या आयडीचा काहीच संबंध नाही.) त्याला 'उगाच' म्हणायचो. उगाच म्हणजे तसा उगाच नाही. उमाकांत गाबाजी चरफडे. संक्षिप्त 'उगाच'. तेव्हा हे चिकटलं ते चिकटलंच. दुसरं कारण म्हणजे घरात तो शेंडेफळ. तीन भाऊ व दोन बहिणीत धाकटा. म्हणून जो तो म्हणे हा आपला 'उगाच'. आता तेव्हा मनोरंजनाची साधनं फारशी नव्हतीच आणि वीजेचीही सोय फारशी नव्हती. यात त्याचा काय दोष ! इथे अजूनही बर्‍याच गोष्टी लोडशेडींगच्या नावावर अलिकडेही खपताहेत. तसा हा उगाच. असो.

मी त्याला म्हणालो की मी 'मायबोली' वर बरचं काही खरडतो.
"तुक्या, मी लिहीलेलं खरडशील का ? ते मराठी टायपिंग जमत नाही रे मला. मी ऑफिसात प्रयत्न केला पण तो खर्डे कायम नजर ठेवून असतो." (इथे तुक्या म्हणजे मी स्वतः आणि खर्डे म्हणजे हेडक्लार्क.) पण तू आधी मला दाखव काय खरडशील ते. ते सगळं मी आधी 'सेन्सॉर' करीन मग तू साईटवर टाक. मित्र असला तरी भलतसलतं लिहायला देणार नाही मी." इति 'उगाच.' आता पुढील सर्व 'उगाच'च्या शब्दात. एक काडी .. म्हणजे काना व मात्रा इकडचा तिकडे केलेला नाही.

खर तर कुठून सुरूवात करू हा मोठा यक्षप्रश्न. माझ्यासारख्या कारकुनाच्या आयुष्यात थ्रिलर असं नाहीच हो काही. जगावेगळं काही घडेल तर शपथ ! चुकूनमाकून गॅस सिलेंडार बुकींग केलेल्या दिवशीच जर घरी आला किंवा लोकलच्या डब्यात चढल्या चढल्या चौथी सीट मिळाली तर ते मात्र मला फार जगावेगळं वाटतं. पण ते कथा, कादंबर्‍या वा गेलाबाजार टिव्ही सिरियलमघ्ये घडतं, तसलं किंवा त्याच्या जवळपास जाईल असंही काही नाही. मग म्हटल कालचा किस्सा लिहावा. हा शंभर टक्के खरा नाही हे आधीच सांगतो.

म्हणजे झाल काय की गेले काही दिवस दात लागले शिणशिणायला. तसा मी दोनदा दात घासतो बर का ! लहानपणी सामान्य विज्ञानाच्या पुस्तकात वाचलं होत व आबांची छडी पाठीत पडली तेव्हापासून . दातांना त्रासदायक ठरेल असं कोणतचं व्यसन मला नाही. पान, मावा, गुटका, सिगारेट वगैरे. या पगारात परवडत नाही हो. डिसपॅचमधला चौरसिया त्याला रजा हवी असल्यास कधी कधी फुकटात मसाला पान देतो. तेवढं सोडल्यास अजून काही नाही. तरी पण दाताचं काहीतरी बिनसलं. दातावर दात ठेवायची चोरी. असं वाटायला लागलं की आता खायला वेगळे आणि दाखवायला वेगळे दात वापरायला लागतील. शेवटी मन घट्ट केल आणि एकदाचा दंतवैद्याच्या दवाखान्याची पायरी चढलो. यालाही धाडस लागतं हे त्याच दिवशी समजलं.

समोरच त्यांचा "आनंद नाडकर्णी' असा मोठा फलक. नावातच आनंद असल्यावर थोडी भीती कमी झाली पण नंतर मात्र नाडीची गती वाढली. छातीचे ठोके एकशेवीसच्या वेगाने ह्रदयाच्या एक्सप्रेस हायवेवरून धावू लागले. कसलं भयानक चित्र होत त्यावर. मध्ये एक टाचणीसारखं काही. दोन बाजुस दोन नाग आणि वर दोन पंख. ते पाहता-पाहता त्या तीन पायर्‍या मी कसा चढलो ते माझ मलाच माहीत.

आत एकजण आधीच ठाण मांडून बसलेला. सगळ्या मॅगझिन्सना आपल्या पार्श्वभागाखाली घेऊन. त्यातलं एकेक मॅगझिन काढून तो दुसर्‍या बाजूने पार्श्वभागाखाली पुन्हा आत सारत होता. मी म्हटलं आपण पेपर वाचावा. पण कसचं काय ? पेपरही तिथेच. आता तिथला पेपर वाचणं म्हणजे अवघडच म्हणा. पण इतकं इंग्रजी वाचतोय म्हणजे माणुस शिकला सवरलेला असावा असा आपला एक ग्रह. म्हटल यालाच विचारावा त्या चिन्हाचा अर्थ काय ते ?
"काय हो, ते फलकावर ते चिन्ह आहे ना ......?...." मी मुळ प्रश्नावर उतरलो.
"ते अधिक चिन्ह ना, लाल रंगात. ते ....." अर्धवट ऐकलेल्या प्रश्नावर त्या अर्धवट माणसाचं उत्तर. आता मी चेहर्‍याने दिसत असलो तरी एवढा काही बावळट नाही की मला त्या अधिक चिन्हाचा अर्थ कळू नये. येडच्याप कुठचा !
"ते नाही हो. ते टाचणी, साप आणि ते पंख." मी त्या सदगृहस्थाला एका बाजूस ओढून बाहेरच्या फलकाकडे अंगुलीनिर्देश केला.
"ते होय. ते माहीत नाही तुम्हाला. सोपं आहे. काय आहे की ते मध्ये टाचणीसारखे आहोत ते आपण. पेशंट. निमुळता झालेला. आजाराने. ते दोन साप आहेत त्यातला एक आहे औषधोपचार आणि दुसरा आहे पत्थपाणी. डॉक्टर देतात ते. हे दोन साप मग पेशंटला हळूहळू घट्ट आवळतात. मग त्याचा जीव त्याच्या गळ्याकडे येतो. शेवटी देहातून आत्मा बाहेर पडतो आणि पंख लावून स्वर्गलोकी निघून जातो. कळलं ?" त्याने कोण्या एका बापूंच्या अर्विभावात विचारलं. जीव कानात आणून ऐकणारा मी, त्याच कानातून बाहेर पडू पाहणारा जीव, पुन्हा मागे ढकलून, स्वतःही मागे सरकलो व नंदीबैलासारखी मान डोलावली. घशाला कोरड पडली. बहुधा आतल्या डॉक्टरांना याची कल्पना होतीच. त्यांनी आधीच हिन्दुस्तान लिव्हरची मशिन बाहेर ठेवून लोकांची सोय केली होती. मरणार्‍याला पाणी पाजणं सगळ्या धर्मात पुण्य कर्म मानलं जात याची खात्री झाली. दोन घोट रिचवून मी बाहेर पाहीलं. वर पोहोचवयाला शिवशिवणार्‍या हातांपेक्षा शिणशिणणारे दात परवडले. 'आता निसटावं' असा एक उत्कृष्ट विचार मनातून डोकावला व पायापर्यंत घरंगळला. मी उभा राहीलो आणि बेल वाजली.
"तुमचा नंबर." तो वाचाड्या बोलला.
"तुम्ही नाही जाणार आत ? " मी आश्चर्याने विचारलं.
"मी ? मी कशाला ? मी इथे फक्त हे वाचायला येतो. जा तुम्ही." तो पुन्हा त्या मॅगझिनमध्ये शिरला. नुसताच वाचाड्या नव्हता तर फुकट्या वाचाड्या होता. (वाचाड्या ह्या शब्दाचा उगम कॉलेजमध्ये झाला होता. कायम लायब्ररीत पडीक असणार्‍या मुलांसांठी हा शब्द संशोधित करण्यात आला होता.) मी 'बाहेर की आत' अशा 'टू बी ऑर नॉट टू बी' या द्विधा मनस्थितीत असतानाच दरवाजा उघडला आणि एक काटकुळ्या शरीराचं गोरटेलं स्त्रीमुख बाहेर आलं. पांढर्‍या कपड्यांवरून त्या डॉक्टर असाव्यात अशी शंका मनाला चाटून गेली.
"या आत." कसायाने बकर्‍याला निमंत्रण द्यावं तसं बाईंनी निमंत्रण दिलं. मी मुकाट आत गेला. आत पहिल्या प्रथम टेबल लागल आणि मग खुर्चीही.
"सांभाळून." मी आवाजाच्या रोखानं पाहीलं. नुसता नावात आनंद असणार डॉक्टर समोर बसला होता. पण त्याचं ते 'सांभाळून' माझ्यासाठी होतं की टेबल खुर्चीसाठी ते कळलं नाही कारण तो माझ्याएवजी त्यांच्याकडेच पहात होता.
"बसा." मी खुर्चीला सांभाळून बसलो.
"काय होतय? " त्यानी चष्म्याआडून प्रश्न टाकला कारण मला ते ओठ जास्त हललेले दिसलेच नाही.
"काही नाही. " मी पटकन बोललो. 'मग इथे काय झक मारायला आलात' असे भाव चेहर्‍यावर स्पष्टपणे आणून त्यांनी स्मितहास्य नावाचा एक हास्यातला प्रकार असतो तो केला.
"दातांची काही तक्रार ? "
"छे.. छे.. ते कसली तक्रार करतील. उलट माझीच तक्रार आहे दातांबद्दल." यावेळेस त्याच्या चेहर्‍यावरचे भाव नीट कळले नाहीत. काय येडफुक्या (खर तर त्याने इथे येड.. अशी नोंद केलेली. इथे मी जरा बदल केलाय.) माणूस आहे अशा पद्धतीचं काहीतरी होतं ते.
"काय तक्रार आहे तुमची ? "
"दात शिणशिणतात." मी तक्रार नोंदवली.
"कधी ? "
"म्हणजे नक्की वेळ सांगता यायची नाही पण .... " मी विचारात पडलेला पाहून त्यांना माझी आपादमस्त्क दया आली.
"म्हणजे काही खाताना त्रास होतो की थंड-गरम काही घेताना त्रास होतो ? " त्यांनी त्या प्रदिर्घ विचारातून माझी सुटका केली.
"खाताना एवढं विशेष नाही. पण काही थंड म्हणजे पाणी वगैरे आणि गरम म्हणाल तर फक्त चहा वगैरे घेताना दात शिणशिणतात." मी माहीती पुरवली.
"वगैरे मध्ये काय-काय आहे ? " खवचट माणूस आहे हा. हे माझं स्पष्ट मत मी मनातल्या मनात नोंदवलं.
"वगैरे मध्ये काही नाही. तो फक्त सवय म्हणून तिथे अवतरला आहे." मी फार पुर्वी केलेल्या नाटकातल्या भुमिकेत शिरून रोख ठोक वाक्य उच्चारले.
"बरं. या पाहू इथे." मी त्यांच्या हाताच्या दिशेने पाहील. तिथे एक कैदयांना टोर्चर करायला वापरतात तसली एक इलेक्ट्रोनिक चेअर होती. मी दचकलो. घाबरलोही. पण चेहर्‍यावर अजिबात दाखवलं नाही. चरफडे घराण्याचा वंशज साध्या दंतवैद्याला घाबरला हे जर चार लोकांना कळलं तर..... कळू दे. मी उठलो आणि दाराच्या दिशेला वळलो. तोच ती काटकुळी गोरटेली 'करवलीने नवरदेवाचे दार अडवावे' तशी दारात उभी.
"इकडे." पाठून आनंदी आवाज. मी धीरोदत्त पावलं (म्हणजे प्रचंड धीर एकवटून एकेक पाऊल न लटपटता) टाकत खुर्चीकडे वळलो. डॉक्टरांच्या नुसत्या नजरेच्या इशार्‍यावर त्या खुर्चीत पडलो. त्याबरोबर त्यांनी वर लटकलेला एक विजेचा दिवा खाली आणला.
"नही.. नही... ये मैने नही किया |" अस्सं मी ओरडेन की काय याची मलाच भीती वाटली. डॉक्टरांनी आता स्वतःचा अर्धा चेहरा झाकलेला. पण मी मघाशी त्यांना नीट पाहीलेलं त्यामुळे त्यांना सहज कुठेही ओळखू शकेन याची खात्री होती मला. त्याच्या दोन्ही हातात त्यांनी पांढरे हातमोजे घातले. हवेत तरंगत असलेला नानाविध हत्यारांचा ट्रे त्यांनी पुढे घेतला. माझ्या पाठीमागे हालचाल झाल्याचं जाणवलं मला. पण मी घाबरलो नाही. भीती होतीच. पण तरीही. डॉक्टर जवळ आले आणि अचानक खुर्ची आडवी होऊ लागली. मला आता छताचा पांढरा रंग स्पष्ट दिसत होता. दवाखाने, हॉस्पिटल्स अशा ठिकाणी पांढरा रंग एवढा मुबलक का वापरतात ? (या प्रश्नाचं उत्तर इथून सुटल्यावर मी नक्कीच कुणाला तरी विचारेन.) त्यात मध्येच डॉक्टरांचा चेहरा आला. त्यांनी त्याच्या दोन्ही हातात हत्यारं उचलली. मी भीतीने आ वासला आणि त्यानी ताबडतोब त्यांची हत्यारं आत कोंबली. त्यांचा तो चेहरा (अर्धवट दिसणारा) फारच गंभीर भासला आणि त्याचवेळेस मागून तो काटकूळा गोरटेला चेहरा पुढे आला. तोही गंभीरपणे माझ्या वासलेल्या जबड्यात डोकावू लागला. एकाच वेळी चार डोळे बहिर्गोल भिंगासारख्या चष्म्यातून माझ्या 'आ' मघ्ये मनसोक्त हुंदडत होते. त्या दोन गंभीर चेहर्‍यामधून मला आता छत कमीच दिसत होती.
"दुखतय का ? " डॉक्टरांचा प्रश्न. आता त्या वासलेल्या तोंडातून मी त्यांना उत्तर द्यावे ही त्यांची अपेक्षा. एकमेव तोंड त्यांच्या ताब्यात असताना मी आता कुठल्या तोंडाने त्यांना उत्तर देणार ? दुसरं तोंडही नाही. पण उत्तर देणे गरजेचे होते नाहीतर ते अजून खोलवर गेले असते.
शेवटी जगप्रसिद्ध भाषेचा वापर केला. म्हणजे डोळ्यांची भाषा. जी फक्त प्रेमिकांनीच वापरावी. पण मी डोळ्यांच्या इशार्‍याने त्यांना माझं दु:ख सांगण्याचा पुर्ण प्रयत्न केला. पण तो बहुधा यशस्वी झालाच नाही कारण मग पुन्हा तेच दात, तेच हात सुरू झाले.

बराच वेळ माझ्या वासलेल्या जबड्यात खाडखूड करून डॉक्टरांनी शस्त्र बाहेर काढली. चेहर्‍यावरचा मास्क हटवला. त्यांचा गंभीर चेहरा पाहून आता ते कदाचित 'दातांचा एड्स' किंवा 'दातांचा ब्लड कॅन्सर' असं काहीसं बोलतील अशी एक कुशंका मनात डोकावली आणि तशीच खाली घरंगळत गेली. 'आ' वासलेला असून दातखीळ बसली. पण 'आ' चा 'अ' करायला कोणी सांगेच ना ! शेवटी माझा मीच निर्णय घेतला आणि तोंड मिटले.
"हे बघा, दाताला किड लागलेली आहे. कॅव्हिटी निर्माण झालेली आहे. दातांचे तीन लेयर असतात. दात शिणशिणतात म्हणजे किड दुसर्‍या लेयरपर्यंत पोहोचली आहे. इथे सेन्सिटिव्हीटी असते. तिसर्‍या लेयरला पोहोचली असल्यास रूट कॅनल करावे लागेल." गंभीर चेहर्‍याकडून असं काही गंभीर घडलेलं ऐकू आलं. मला उगाच गुफेत बसून कॅनल खोदणारे डॉक्टर दिसले.
"चला एक एक्सरे काढूयात. म्हणजे नीट निदान करता येईल." म्हणजे मघाशी जे होतं ते नेमकं काय होतं ? पुन्हा सगळा कार्यक्रम त्याच क्रमाने झाला आणि यावेळेस मात्र त्यांनी एक बाय दोनचा एक तुकडा तोंडात कोंबला.
"शुट." मी डोळे मिटून गोळीच्या आवाजाची वाट पाहू लागलो. पण आवाज आलाच नाही. बहुधा सायलेन्सर लावला असेल. मला काहीच झाल नाही हे जाणवलं आणि मी समाधानाने डोळे उघडले. जिवंत असल्याची जाणिव फार सुखकारक असते.

तोंडातला तुकडा डॉक्टरांनी त्या गोरटेलीला दिला. ती मघासच्याच मख्ख चेहर्‍याने तो घेऊन समोरच्या अंधार्‍या खोलीत गेली व तिने दार लावलं.
"आता तुमचा एक्सरे आला की ठरवू काय करायचय ते. आज आपण प्राथमिक कार्य करून घेऊ आणि..." आता हा पुढच्या वेळेस अंतिम कार्य करणार की काय.... डोक्यात आता काहीही यायला लागलेलं. मी एक डोळा त्या बंद दारावर आणि दुसरा डोळा डोक्टरांच्या गंभीर चेहर्‍यावर ठेवून होतो. ती बया आली आणि तिने तो छोटासा काळासा एक्सरे त्यांना दिला. आपल्या मुळच्या गंभीर चेहर्‍यावर एक दोन आणखी गंभीर असे मास्क चढवून त्यांनी तो एक्सरे चहु दिशेने पाहीला. मी बळीच्या बकर्‍यासारखा 'पुढे अजून काय ? ' या प्रश्नाला चेहर्‍याच्या ७० एमएम च्या पडद्यावर सजवून तयार.

"रुट कॅनल करायची गरज नाही." ते काही करणार नाही याचाच गगनात मावेनासा आनंद माझ्या चेहर्‍यावर गरबा खेळु लागला. मुळापासून कालवा खणणे म्हणजेच रुट कॅनल असावं हे माझ्या अगाध इंग्रजी ज्ञानामुळे माझ्या लक्षात आलं होतं. आपल्या टिचभर जबड्यात असलं काही झाल तर आपलं काय होईल ? मराठी सिरियल्सच्या नायिकेसारखा मला पडलेला एक भयाण प्रश्न.
"सिमेंट भरूया. मग काही त्रास राहणार नाही. " त्या प्रदिर्घ प्रेग्नंट पॉजनंतरचं वाक्य. हा डॉक्टरचं आहे की मी बोर्ड वाचण्यात चुकलोय या शंकेपर्यंत घेऊन आले. बाहेर गवंड्याची वा प्लंबिगची पाटी नव्हती.
"सिमेंट ? " माझा पुन्हा ७० एमेम प्रश्नार्थक चेहरा. ज्याला त्यांनी बिल्कुल भीक घातली नाही.
"या." यावेळेस मी सराईतासारखा गेलो. मघासचे सगळे काही पुन्हा क्रमाक्रमाने रितसर झाले. डॉक्टर हत्यारांसहीत तयार होताच मी आ वासला आणि पाठीमागून त्या बयेने एक पाईप तोंडाच्या बोळात सारला. त्यानंतर डॉक्टर माझ्या दातांवर दातओठ चावत तुटून पडले. वारा-पाण्याचा मारा करणार्‍या त्या बयेसोबत त्यांनी दातात ड्रिलिंग सुरू केल्यासारखं वाटलं. माझ्या तोंडात नेमकं काय चाललय हे मलाच कळेना. थोड्या वेळाने दोघे आतून बाहेर आले आणि डॉक्टरांनी इशारा केला. मी आधी तोंडात साठलेलं पाणी जवळच्याच इटुकल्या थाळीसारख्या भागात थुकून मोकळा झालो.
"सॉरी. जवळपास कुठे वॉशबेसिन दिसलचं नाही." मी एखाद्या सभ्य व संस्कार असलेल्या माणसाप्रमाणे त्याची माझ्या या कृत्यासाठी माफी मागितली.
"ते वॉशवेसिनच आहे." इतकं म्हणून पुन्हा जोडगोळी झुंजायला लागली. थोडावेळानंतर कदाचित दमल्यामुळे त्यांनी एक ब्रेक घेतला आणि मीही वासलेला जबडा जवळ घेऊन वरच्या खालच्या दातांवर व ओठावर जुळवला.

एका छोट्याशा व्रेकनंतर दोघे पुन्हा माझ्या दाताशी कुस्ती खेळायला तयार झाले. कापसाचे साबुदाण्याएवढे गोळे घेऊन त्यानी आत बरीच टिपाटिपी केली तेव्हा गोरटेली मघासच्या पाईपाने तोंडात जमा झालेली लाळ आणि पाणी खेचून बाहेर काढत होती. माझ्या आधी अजून कुणाबरोबर यांनी हाच कार्यक्रम केला असेल आणि तोच पाईप पुन्हा माझ्या तोंडात......... शी.... नुसत्या कल्पनेनेच ओकारी आली पण स्वतःच तोंड आता स्वतःच्या हातात न राहील्याने ओकारी कल्पनेतच राहीली. दोन छोट्या उशा दाताच्या दोन्ही बाजूस ठेवून डॉक्टर नाहीसे झाले. म्हणजे माझ्या नजरेच्या टप्प्यातून नाहीसे झाले. जबडा ताणलेला मी आणि त्यात नळी धरून बसलेली ती. दोघेच. ते क्षण किती भयानक होते याची तुम्हास कल्पना यावी तर ती कशी ? पण सुदैवाने डॉक्टर परतले आणि मग गवंडी कामाला सुरुवात झाली. बरीच ठाकठोक झाल्यावर जबड्यातील सगळे अनाहूत पाहूणे परतले आणि जबड्याच घर रिकामं झालं.

"आता काही वेळ काही नको."
"म्हणजे ? "
"काही खाऊ नका वा काही पिऊ नका."
जशी आपली आज्ञा जिल्लेइलाही... असलं काहीसं पुटपुटत मी विचारलं," किती झाले ? "
"द्या अडीचशे." मी अडीचशे दिडक्या कष्टाने त्या पांढर्‍या हातावर ठेवल्या. आता पुन्हा येणे नाही... असं भावपुर्ण गाणं मी मनातल्या मनात गाऊन घेतलं व बाहेर पडता-पडता वळलो.
"डॉक्टर, रात्री जेऊ शकतो ना ? "
"तासाभराने वाटेल ते करा. तोवर सिमेंट पक्क होईल." प्रत्येक गवंडयाला त्याच्या कामाच्या मजबूतीची खात्री असतेच.

मी बाहेर आलो तो वाचाड अजून तिथेच. मी दाराकडे वळलो.
"एक मिनिट." मी थांबलो.
"बो...ला." खालच्या दातावर वरचा दात न लावता मी बोललो. पण ते त्याला कळलं.
"तुम्ही तो नाडकर्ण्यांचा बोर्ड का पहायला लावलात मघाशी ?"
"म्हणजे ? "
"म्हणजे तुम्ही इथे गाडगीळांकडे आलात. मात्र बोर्ड नाडकर्ण्यांचा वाचत होता. ते का म्हणून ? "
"काय ? म्हणजे हे डॉक्टर नाहीत. " मी जागच्या जागीच उडालो.
"अस कुठे म्हटलं मी. हे डेंटल डॉक्टर सुशील गाडगीळ. तो बोर्ड आहे फिजिशियन डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचा. ते चिन्ह यांच नसतं. ते फक्त एम्.बी.बी.एस. किंवा बी.एच.एम. एस. डॉक्टरांचं असत." बापूंनी पुन्हा प्रवचन दिलं. तेही सगळं झाल्यावर. अस वाटल की एक गुच्चा हाणून त्याची बत्तिशी त्याच्याच घशात घालावी. पण एका दाताने मीच इतका त्रासलो की आता त्याला तो त्रास देऊ नये असं मला माझ्या सह्रदयाने सांगितलं. मी उदार मनाने त्या वाचाडाला माफ करून बाहेर पडलो.

मित्रहो, माझ्या एका मित्राला आपलं लेखन तुमच्यापर्यंत पोहचवायचं होतं व त्यासाठी त्याने माझ्या खांद्यावर बंदुक ठेवून गोळी झाडली. आवडलं असेल तर प्रतिसाद मलाच द्या. नसेल तर शिव्या कृपया विपूत टाका.

गुलमोहर: 

ही ही ही. छान.

..............................................................................
किती पायी लागू तुझ्या
किती आठवू गा तुते
किती शब्द बनवू गा
अब्द अब्द मनी येते (मर्ढेकर)

<<टाचणी, साप आणि ते पंख." >> विश्लेषण मस्तच :P, वाचाड्या Happy उगाच ची इस्टोरी वाचताना त्याची डॉक्टरकडे गेल्यावरची गोची न तुमचं लेखन छान भट्टी जमवलीत लेखनाची Happy

तोच ती काटकुळी गोरटेली 'करवलीने नवरदेवाचे दार अडवावे' तशी दारात उभी.>>>> Lol

हे आणि अशी काही वाक्यं तुफान आहेत.

त्या डॉक्टरांच्या चिन्हाच विश्लेषण...अफलातून! Lol

कौत्तूक,मस्त मजा आ गया बॉस ! Proud

कौतुक, किती कौतुक करू रे तुझे!!!!! फारच छान !!!
माझ्या वडिलांना झाला होता दातांचा त्रास फक्त तेव्हाच चढलो होतो त्या दवाखान्याची पायरी!!!!
अगदी असच चाललं होतं २ तास !!!!
मस्त!!!!

डब्बो!!!!!

मस्त Happy
----------------------------------------
मै जिंदगी का साथ निभाता चला गया ...

दंतवैद्याकडचं निरिक्षण अचूक! Happy
----------------------------------------------------
No matter how you feel, get up, dress up and show up.

वा रे वा मस्तच की.. माझ्या डेंटल वार्‍या आठवल्या.. अगदी बळीच्या बकर्‍यासारख वाटतं . Happy

एकदम झक्कास...........

मला सुद्धा अगदी माझाच अनुभव असल्यासारखा वाटला हा लेख पण मी शेवटी कंटाळून डॉ. कडे जाणेच सोडून दीले विनाकारण कोण सहन करणार ते ड्रील मशीन.

कौतुक,
जम्या रे.. मजा आली..
ऐसाच लिखते रहो. वाचनेको हम है. क्या?..
- अनिलभाई
It's always fun when you connect.

>>"दातांची काही तक्रार ? "
>>"छे.. छे.. ते कसली तक्रार करतील. उलट माझीच तक्रार आहे दातांबद्दल."
येकदम बरोबर. इथे त्रास आपल्याला आणि यांना काळजी 'दातांना होणार्‍या त्रासाची', हे काय बरोबर नाय हा. Lol

एकदम मस्त Happy

मला तर नेहमीच वाटते की वैरयावर पण dentist च्या खुर्चीत बसायची वेळ येवू नये ..... फार भितीदायक प्रकार

३ ३ रूट कनाल चा अनुभव आहे Lol

मस्त जमलय रे... Happy
येवू देत अजून असेच..
___________________
हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूं है
अब तो हर वक्त यही बात सताती है हमे.

परमेश्वर करो आणि दर महिन्यात तुझा एक दात पडो....किडो...
दर महिन्यात एक नवीन , मस्त किस्सा Proud

कौतुका मस्त रे Happy
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

मस्त!!!!! दरवाज्यातुन आत शिरल्यापासुन (तुम्ही) बाहेर येइतोवर (तुम्हीच) जवळजवळ सर्व वाक्याला हसत होते.

मी भीतीने आ वासला आणि त्यानी ताबडतोब त्यांची हत्यारं आत कोंबली. त्यांचा तो चेहरा (अर्धवट दिसणारा) फारच गंभीर भासला आणि त्याचवेळेस मागून तो काटकूळा गोरटेला चेहरा पुढे आला. तोही गंभीरपणे माझ्या वासलेल्या जबड्यात डोकावू लागला. एकाच वेळी चार डोळे बहिर्गोल भिंगासारख्या चष्म्यातून माझ्या 'आ' मघ्ये मनसोक्त हुंदडत होते.<<<<<<<<<<<<<<<

आई गं, ह.ह. पू.वा.
मी ही अगदि हरेक वाक्याला जाम हसत होते, आणि स्वतः सोबत घडलेला प्रकारहि आठवत होते!

मस्त Lol

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

कौतुक, मस्त जमलाय, लेख. तो शब्दं "वाचाड"... भलताच आवडला.

>>>>>>ते कदाचित 'दातांचा एड्स' किंवा 'दातांचा ब्लड कॅन्सर' असं काहीसं बोलतील >>>>>
मुळापासून कालवा खणणे म्हणजेच रुट कॅनल असावं हे माझ्या अगाध इंग्रजी ज्ञानामुळे माझ्या लक्षात आलं होतं. आपल्या टिचभर जबड्यात असलं काही झाल तर आपलं काय होईल ? मराठी सिरियल्सच्या नायिकेसारखा मला पडलेला एक भयाण प्रश्न.>>>>>>>>

सहीच. नाद खुळा
सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....

Pages