शापवाणी.......

Submitted by kalpana_053 on 8 May, 2009 - 09:58

"श्री, मला अजिबात झोप येत नाहीय....... सासूबाईंच्या शापाचे शब्द तीक्ष्ण बाणासारखे अंगाला ठिकाठीकाणी रक्तबंबाळ करताहेत...... अन् त्याच्या मनाला होणार्‍या जखमा मेंदूला घायाळ करून बधिर करताहेत...... त्यावेळेस मी त्यांना मोठ्या हिंमतीने म्हणाले होते....., "कावळ्याच्या शापाने कधी गाय मरत नाही म्हणून..... पण आता या अभगी क्षणी, शांतपणाने विचार केल्यावर वाटतं, खरंच माझं खूप चुकलं..... अत्यंत हलाखीच्या दयनीय परिस्थितीत मी तुमच्या आईंना वृद्धाश्रमात नेऊन सोडले..... त्यांच्याविरूद्ध तुमच्या मनांत खूप गैरसमज करून दिले. कां कुणास ठाऊक... मला त्यांची घरात अडगळच वाटत होती.... अगदी डोळ्यासमोरही त्या नको असायच्या. त्यांची केलेली प्रत्येक गोष्ट चुकीचीच वाटायची..... खूप खूप राग यायचा त्यांचा! रागाच्या भरात घालून पाडून बोलून त्यांची अपमान करण्याची एकही संधी मी कधी सोडली नाही..... आज माझा मुलगा सुभाष.... हॉस्पिटलमध्ये जीवन्-मरणाशी झुंज देतोय...... अन् त्यांच्या तळतळाटाचे.... शापवाणीचे शब्द माझ्या डोळ्यासमोर फेर धरून मला वेडावत नाचताहेत...... मला चिडवताहेत..... त्यांची शापवाणी खरी होईल का हो? घरामधून त्यांना कायमचे वृद्धाश्रमात पाठवताना त्या एखादा घाव बसल्यावर होणार्‍या वेदनेप्रमाणे मला म्हणाल्या होत्या.... "मला माझ्या मुलापासून तू दूर करते आहेस..... पण लक्षात ठेव..... एका आईचा शाप आहे तुला..... एक दिवस तुझ्या आयुष्यात असा येइल... तुझ्या मातृत्वाला तूही पारखी होशील..... तुझे मातृत्व वांझोटे ठरेल..... मला माझा मुलगा निदान वृद्धाश्रमात तरी सोडतोय..... पण तुला याहीपेक्षा गंभीर परिस्थितीला तोंड द्यावे लागेल....... या जन्मी केलेल्या पापची फेड याच जन्मी करावी लागते.... एका माय-लेकराची ताटातूट तुला कधीच सुखाचा घास खाऊ देणार नाही..... जिवंतपणी नरकयातना भोगशील तू......." असं म्हणून सौदामिनी हमसून हमसून रडू लागली.......
डॉक्टरांनी "आता देवावरच भरवंसा....!" असं म्हटल्यापासून सौदामिनी स्वतःला सावरूच शकत नव्हती..... आयुष्यात केलेली सर्व पापे आता तिच्याच भोवती घिरट्या घालत तिला सावज करू पाहत होती...... सासूच्या साध्या जास्ती वेळ चालणार्‍या देवपूजेचा राग येणारी ती आता दररोज एका नवीन देवाला नवस बोलत होती.... पण काहीही उपयोग होत नव्हता..... सारखं काय करू, काय नाही म्हणजे आपला मुलगा शुध्दीवर येइल असं तिला झालं होतं...... घरातले सर्व वैभव तिला आता कस्पटासमान वाटू लागले होते.... बोलायला सासूबाई घरात असत्या तर त्यांनी निदान धीराचे चार शब्द तरी सांगितले असते याची जाणीव तिचं मन कुरतडत होती...... एकदा बरं नसताना त्यांनी साधी खिचडी व लिंबाच्या लोणच्याचा आग्रह धरल्याचे तिला स्मरले..... अन् आपण? "आता या वयात खिचडी व लोणच्याचे डोहाळे सुचताहेत..." असं मैत्रिणीपाशी त्यांना ऐकू जाईल असे बोलून त्यांचा केलेला अपमान सौदामिनीला आठवला..... अपमानाच्या नुसत्या मालिकाच तिच्या नजरेसमोर येत राहिल्या..... माझा स्मृतिभ्रंश झाला तर बरं होईल... पण या जीवघेण्या आठवणी नकोत, असे सौदामिनीला होऊन गेले..... रस्त्यावरच्या भयाण अ‍ॅक्सिडेंटने हातातोंडाशी आलेला मुलाचा घास देवाचा कायमस्वरूपी बनू पहात होता..... पाण्यासारखा पैसा खर्च करूनही काहीही उपयोग होत नव्हता. मुलाला काही शुद्ध येत नव्हती... गेले २५ दिवस तो कोमामध्येच होता...... त्यातून शुध्दीवर आल्यावर देखील डॉक्टर पॅरेलेटिक होण्याची शक्यता बोलून दाखवत होते.... पॅरेलेटिक मुलाला आयुष्यभर कसं संभळायचं.... हाही विचार अधूनमधून सौदामिनीला एखाद्या रडक्या मुलासारखा त्रस्त करत होता..... धडधाकट प्रेमळ सासूला घराबाहेर काढले.... तिच्यापासून तिच्या मुलाला दुरावले.... त्याचाच हा परिणाम...! "परमेश्वरा माझ्या पापाची शिक्षा मला कर...... मला काहीही होऊ दे...... पण माझ्या मुलाला त्याची शिक्षा देऊ नको.... त्याला शुध्दीवर लवकर आण...." या आळवणीचा परमेश्वराकडे जणू तिचा जपच चालला होता...
श्री सौदामिनीची खूप समजूत घालण्याचा प्रयत्न करत होता..... खरंतर त्याच्याही मनाची समजूत पटतच नव्हती...... पण उसनं अवसान आणून तो सौदामिनीला धीर देण्याचा प्रयत्न करत होता.... आपणही आपल्या आईला घराबाहेर काढण्यात तेव्हढेच भागीदार आहोत हे तो जाणून होता.....फक्त रोजच्या बायकोच्या कटकटीपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी त्याने तो मार्ग अंगिकारला होता; पण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, वरकरणी तो सौदामिनिला म्हणाला, "अगं असं स्वतःला अपराधी मानणं आता पुरे कर.... त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. आता जुन्या झालेल्या गोष्टीचा पश्चाताप करू नको...... जे झालं ते झालं.... आता आईही नाही...... अन् तिचा शापही नाही......! आई कधी आपल्या मुलाचं वाईट चिंतू शकते का? अगं परिस्थितीने घायाळ झाल्यामुळे ती बोलली असेल काहीबाही..... पण तिचे मन कायमच निर्मळ होते..... मी वृध्दाश्रमात तिला सोडून येताना नमस्कार केल्यावर ती मला खूप काही रागावून बोलेल असं वाटलं होतं..... पण तेव्हा देखील तिने मला डोळे भरून पाहात आशीर्वादच दिला..... केवळ तिची माझ्याबरोबर राहण्याची प्रबळ इच्छाशक्तीपायी ती जे बोलली असेल ते शब्द म्हणजे शापवाणी नव्हे. त्यातली तळमळ समजून घ्यायची...... पण त्याचबरोबर मी तिचा मुलगा असल्याने "माझ्यासारखे दु:ख तुझ्या पदरी कधीही न येवो....." असा आशिर्वादही तिनं त्यावेळी मला दिला. तिची शापवाणी तुला.... मला अन् सुभाषला लागणं शक्यच नाही...... अगं शाप आणि आशीर्वाद या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तिचा तुला शाप देताना भावनोद्रेक झाला होता..... संतापामुळे विवेक गळून पडला होता..... पण तेव्हढ्याच तळमळीनं मला आशीर्वाद देताना संथ, शांत व संयमित होऊन त्याला वात्सल्याचा स्पर्श...... गंध लाभलेला होता...... अगं मातेच्या वात्सल्यात इतके सामर्थ्य असते की शापापेक्षा तिचा आशीर्वाद नक्कीच प्रभावशाली ठरणार. माझी खात्री आहे .... माझ्या आईच्या स्पर्शातून..... बोलण्यातून वात्सल्य नुसते निर्मळ पाण्यासारखे झरत असायचे.... तिचा एक प्रेमळ कटाक्षसुध्दा मला जगण्याची उभारी द्यायचा..... पण एक आई असूनही तुला ते कधी उमगलंच नाही......" श्री सौदामिनीवरील राग गिळंकृत करून तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करणं सोडत नव्हता. तिचं दु:ख त्याला पाहावत नव्हतं.... खरंतर त्यालाही सुभाषच्या चिंतेनं सतावलं होतं.... पायातलं बळंच गेलं होतं.... अत्यंत जवळ असलेल्या हॉस्पिटलमध्ये चालत जाताना देखील आपण लंगडे झालोत की रस्ताच पांगळा झालाय असं मनांत येत होतं.....!
"तुम्ही कितीही समजावलंत तरीही माझ्या मनातून तुमच्या आईची शापवाणी जातच नाही...... मी खूप ठिकाणी वाचलंय.... ऐकलंय.... शापाचे परिणाम अत्यंत दारूण, अघोरी, दाहक, आणि क्लेशदायक तर असतातच.... तसंच त्याची कालमर्यादाही प्रदीर्घ असू शकते असं म्हणतात.... विश्वामित्राच्या शापाने लावण्यवती रंभा शिळा झाली...... श्रीकृष्णाच्या शापामुळे त्याच्या मुलाला अकाली वार्धक्य प्राप्त झाले...... बापाच्या शापाने तुर्वसुला आणि पौषाच्या शापाने उत्तंकाला अपत्यांना मुकावे लागले......" सौदामिनी तळ्मळीने बोलू लागली..... अन् तिच्या डोळ्यासमोर सासूबाईंना उपेक्षेनं दुलर्क्षित करून दिलेलं दु:ख डोळ्यासमोर उभं राहिलं......
"पण आईचा आपल्या मुलाला शाप लागल्याचं तुला माहित आहे का? नाहीच.... अगं, कधीकधी शापाचा हेतू शापिताला शिक्षा व्हावी, त्याने दोष सुधारावा अशीच असते. त्याचा संपूर्ण नाश व्हावा किंवा त्याला कायमस्वरूपी दु:ख व्हावे असं अपेक्षित नसतं...... त्यावेळच्या परिस्थितीने तसे बोलले जाते..... माझ्या सहवासाला.... प्रेमाला पारखी होणार असल्याने व्याकूळ झालेली माझी आई जरी शाप देण्यास उद्युक्त झाली असली तरी ती माझे अमंगल कधी चिंतूच शकणार नाही.....! मी जेव्हा जेव्हा तिला भेटलो तेव्हा तेव्हा तिने मला माफ करून माझ्याकडे केलेल्या कृपादृष्टीने जणू माझ्यावर प्रेमाचे अयाचित दानच पदरात टाकले.... माझ्या दृष्टीतली माझी असहायता तिला मी न बोलताही कळायची.... अन् तिचे ते माफीपूर्ण प्रेमाचे दान दयेच्या माध्यमातून माझ्यावर वात्सल्यातून झिरपायचे....."सौदामिनीला बर्‍याच काळानंतर आईविषयी काहीतरी श्री बोलला. खरंतर बायको आणि आई या तराजूमध्ये त्याला कधीकधी आईवर होत असलेल्या अत्याचारामुळे पत्नीचे नाते कायमचे मुळापासून उखडून टाकावे वाटे..... पण प्रत्यक्षात तसं कधी धाडस झालंच नाही..... डोळ्यातून अनेकदा आईच्या आठवणीनं नकळत आसवांचा पाऊस पडायचा, पण ते वाहून गेले की मन परत कोरडं व्हायचं.... स्वतःचा संसार वाचवण्यासाठी...!
दिवस रात्री भिरभिर्‍यासारख्या फडफडत निघून जात होत्या...... रात्रीचा दोघांच्याही डोळ्याला डोळा लागत नव्हता...... कदाचित थोडीशी झोप आलीच तर लगेचच झोपमोड होऊन परत झोप लागयला खूप त्रास होत होता....... मनाला आधार वाटावा म्हणून दोघं रात्री दिवा तसाच जाळत ठेवत होती......
पण मनातल्या काळोखाचं अंधारी वादळ त्यांच्यावर जीवानिशी तुटून पडत होतं. आजही तशीच दोघ झोप येत नसल्यानं समोरासमोर नंदी-महादेवाप्रामाणं बसलेले होते...... घरात शिजवलेलं अन्न तसंच कुणाच्या तरी भुकेची वाट पहात होतं. देवघरात दिवा मंदपणे तेवत होता...... घरातील सर्व देव देवघर सोडून पाणी भरलेल्या ताम्हणातून आपल्याला कोण आणि केव्हा बाहेर काढेल याची वाट पहात बसले होते...... कुणीतरी शिक्षा दिल्यासारखा श्री पाठीमागं हात दुमडून विमनस्कपणे खोलीत येरझार्‍या घालत होता...... इतक्यात फोनची घंटा ठणठणली...... रात्रीच्या वेळी तो भयानक आवाज कोणता वाईट संदेश घेऊन आला असेल याच्या भितीने दोघेही फोन घेण्याचे टाळू लागले...... सौदामिनी अन् श्रीच्या अंगावर सरसरून काटा आला.... हा फोन घेण्यापेक्षा कायमची आपल्याला झोप लागून जावी असं त्या दोघांना वाटू लागलं..... पायाखालची जमीन खचतेय की काय की वरून छप्पर कोसळू पहातंय असाही भासही झाला...... शेवटी सौदामिनीच श्रीला म्हणाली, "श्री फोन घेतोयस् नं......" एखाद्या विनयशील, आज्ञाधारक मुलासारखा श्री सौदामिनीला स्प्रिंगसारखी मान हलवत "हो..... हो..... घेतोय नं......" असं म्हणून फोनकडे भिंतीचा आधार घेतच निघाला...... कुठलातरी आधार घेतला की सगळंच कसं सोप्पं होऊन जातं अशा आशेनं..... विश्वासानं त्यानं फोन घेतला.....
"हॅलो, अहो मी सिटी हॉस्पिटलमधून डोक्टर जोशी बोलतोय..... सुभाषच्या आई-वडिलांचंच घर नं..... अहो, तो शुद्धीवर आलाय...... खरंच परमेश्वराचीच कृपा..... तुम्ही लवकर भेटायला या.... तो तुम्हाला भेटायला खूप आतूर झालाय....." डॉक्टरांचे शब्द श्रीच्या कानावर पडताच त्याच्या पायात दहा हत्तींच बळ आलं.... आपण स्वप्नात तर नाही नां याची त्याने दहादा खात्री करून घेतली..... तो एकदम सावरला..... "डॉक्टर, आम्ही लगेचच येतो......" असं डोळ्यात आसवे गाळत तो म्हणाला..... एका क्षणात सुखाची निश्चिंती होऊन जगण्याचा मार्ग गवसल्यासारखे त्याला वाटले...... कुठं अडथळा नाही..... कोणतीच शंका नाही..... गहिवरून डबडबणार्‍या डोळ्यांनी तो सौदामिनीला म्हणाला, "अगं, सुभाष शुध्दीवर आलाय...... सौदामिनी, सुभाष शुध्दीवर आलाय..... तुला आईनं दिलेली शापवाणी खोटी ठरली..... मला मिळालेला आईचा आशीर्वादच फळाला आला..... खरा ठरला.....! माझीच आई ती..... ती माझे अमंगल कधीच चिंतणार नाही......"
दोघेही घरात देवघरापाशी गेले.... नकळतच दोघांनाही कुलदेवतेचं स्मरण झालं..... देवांना कोरडे होऊन देवघरात जागा मिळाली...... उदबत्तीच्या धुराची फिरत जाणारी सुगंधी आवर्तनं दोघांच्याही मनाचा उदासपणा कमी करू लागली...... एका आईच्या प्रेमाचा साक्षात्कार अन् फोल ठरलेल्या शापवाणीच्या अंतिम सत्याच्या प्रचितीचा प्रकाश घरात भरून राहिला..... एका मातेचीच शापवाणी ती...... ती कशी फळाला येणार? म्हणतात नं.... कुपुत्र जन्माला येतात...... कुमाता कधीच नाही...... देवांबरोबर आपल्या आईच्याही फोटोलाही नमस्कार करणार्‍या सौदामिनीचा.... एका आईचा.... आनंदी चेहरा श्री मंत्रमुग्धतेनं पहातच राहिला.......! फोटोमधून आपली आई आशीर्वादपर हात हलवून सौदामिनीला माफच करत असल्याचे त्याला जाणवले......! एका आईच्या आशीर्वादाने स्वतःच्याच शापवाणीवर जिवंत विजय मिळवला होता......!!

गुलमोहर: 

खूप छान गोश्ट लिहिली आहे. आवडली. असच लिहित रहा.

कल्पना, आवडली कथा. मन कसं असतं न? दुखा:त सगळ्या चुका आठवतात. सुखात मात्र मिजाशीत रहातं.

कल्पना,
कथा आवडली, पण ते मधील ... नसते तर वाचायला त्रास नसता झाला.

०------------------------------------------०
मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.

येवढ वाचुन एकुन सुध्दा हिच कथा आज काल ९९ टक्के घरांमध्ये
अनुभवायला मिळते . कायद्याने जसा आई वडीलांच्या संप्पत्तिचा वारस मुलगा ठरतो.तसा म्हातार पणामध्ये आई वडीलांना सांभाळण्याची सर्वस्वी जबाबदारी मुलांकडे यायला पाहिजे . जे आई वडिलांना वार्‍यावर सोडतील त्याना कायद्यानेच बंधन आणायला पाहिजे . खुप छान मनाला भिडणारी.

दुखा:त सगळ्या चुका आठवतात. सुखात मात्र मिजाशीत रहातं. "true"

~~~//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\~~~
दिसलीस तू, फुलले ॠतू

खुपच सुन्दर!!!

खुप छान आहे कथा...आवडली.

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

अंतर्मुख करणारी व 'आपणही कधी असेच (सौदामिनीसारखे) वागतो का?' असा विचार करायला उद्युक्त करणारी कथा आहे.
दुखा:त सगळ्या चुका आठवतात. सुखात मात्र मिजाशीत रहातं... अगदी बरोबर आहे.