चेक आऊट

Submitted by साजिरा on 5 June, 2008 - 08:17

गर्दीच्या लोंढ्याबरोबर तो फलाटावर उतरला, अन दोन मिनिटे स्तब्ध उभा राहिला. आपण इथे कशासाठी आलो, ते आठवत! त्याचं असं बर्‍याच वेळा होतं. एवढ्या प्रचंड गर्दीत, कोलाहलातही तो पार बुडून जाण्याइतका विचार करत असे. खरं म्हणजे, एवढ्या लाखो लोकांच्या गोंधळात आपण अतिशय क्षुद्र, किडामुंगीच असतो. पण म्हणून काही कुणी स्वतःला विसरत नाही. उलट एवढ्या गर्दीत स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जपण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करीत असतो.

आपण ट्रेनमध्ये किती वेळ होतो? क्षणभर? की युगानुयूगे? ठेच लागली, तेव्हा तो पुन्हा भानावर आला. छे! असं हरवून जायची सवय सोडली पाहिजे. जाणीवपुर्वक तो झपझप चालू लागला. स्टेशनच्या बाहेर येऊन त्याने टाईम्स विकत घेतला. पेपरवाला म्हातारा आज ओळखीचं हसला नाही-ते त्याला खटकलं. तोही कसल्यातरी विचारात गढून गेला असावा- आपल्यासारखाच! खरं म्हणजे त्या गर्दीतला प्रत्येक जण कुठेतरी हरवला असावा, पण शुध्दीवर असल्याचं नाटक करताहेत सर्वजण- त्याला वाटून गेलं, अन मग त्या विचारांचं हसूही आलं.

ऑफिसच्या बिल्डिंगपाशी आल्यावर नेहमीप्रमाणे थोडंसं हसत त्याने वॉचमनकडे पाहिलं, अन पुढे जाऊ लागला, तसा वॉचमन त्याला म्हणाला- कोण पाहिजे साहेब?

त्याने आश्चर्याने वळून वॉचमनकडे बघितलं. गेल्या सात वर्षात त्याला न बघितल्याचे भाव त्याच्या डोळ्यांत होते. साला इडियट! एकतर रात्रीची उतरली नसावी, किंवा रात्रीची झोप हा आता घेत असावा..

वॉचमनकडे दुर्लक्ष करून तो लिफ्टमध्ये शिरला. बंद होणार्‍या दरवाजातून त्याला दिसलं- वॉचमन 'सुनिए साब' वगैरे करत दुडक्या चालीने लिफ्टच्या दिशेने येत होता.

ऑफिसमध्ये शिरून तो नेहमीप्रमाणे ग्लासभर पाणी प्याला. जागेवरची ट्युब अन फॅन ऑन केला. हातातली बॅग जागेवर ठेवली, अन रुमालाने घाम पुसत तो खुर्चीवर व्यवस्थित रेलून बसला. मग वर बघितल्यावर त्याला जाणवलं- सर्वजण विचित्र नजरेने आपल्याकडे बघताहेत!

मग मात्र तो व्यवस्थित सावरून बसला. केस अन चेहर्‍यावरून हात फिरवला. टायची गाठ अन बेल्ट उगीचच चाचपला. आपण आज काही वेगळे दिसतोय का? शंका नको म्हणून तो बेसिनच्या आरशासमोर गेला. सर्व व्यवस्थित असल्याची खात्री करून घेऊन तो पुन्हा जागेवर आला. त्यानं पाहिलं- वॉचमन नंदू कारखानीसशी काहीतरी बोलत होता. तो जागेवर येईस्तोवर ते दोघेही तिथंच आले होते.

"एक्स्क्यूज मी-- कोण हवंय आपल्याला?" कारखानीसने त्याला विचारले तसा आश्चर्यचकित होऊन तो दोघांकडे आळीपाळीने बघू लागला.
"नंद्या, लेका- ही काय चेष्टा आहे? मी--"
"एक मिनिट, तुम्हाला माझं नाव कसं माहिती? आणि मला नंद्या काय म्हणताय?"
"अरे असं काय करतोस? गेली सात वर्षे मी तुला त्याच नावाने बोलावतोय! आजच असं काय झालं?"
"सात वर्षे?" आता मात्र कारखानीस किंचाळला. "हे बघा मिस्टर, मी तुम्हाला ओळखत नाही. तुम्ही ऑफिसात कसे घुसलात? अन त्या जागेवर का बसलात? कोण तुम्ही?"

हे ऐकल्यावर मात्र त्याचा ताबा सुटला. विचित्र अशा उंच स्वरात तो चित्कारला, "मिस्टर कारखानीस, गेली सात वर्षे मी या ऑफिसात नोकरी करतोय, ह्याच इमारतीत येतोय, अन याच जागेवर बसतोय. तुला, ह्या बर्व्यांना, त्या जोश्याला, सुलभा गुप्तेला, वाडेकर मॅडमना, त्या युसूफला, ह्या वॉचमनला बघतोय.."

प्रकरण गंभीर आहे. मघाशी तो पेपरवाला, मग वॉचमन, मग हे सर्व.. काहीतरी भयानक गोंधळ आहे!

"एक मिनिट, तुमचं नाव काय हो?"
"अरे असं काय करताय? मी श्री.. श्रीधर गोडबोले!"
"गोडबोले"? पाचेक वर्षापुर्वी इथे होते, ते गेले. शिवाय त्यांचं नाव श्रीधर नव्हतं. गेल्या बर्‍याच वर्षांपासून इथे राजा कुलकर्णी बसताहेत. अन ते आता सीक लीव्हवर आहेत. तुम्ही एक तर ठार वेडे आहात किंवा लफंगे तरी. प्लॅन करून आलेले दिसताय. इथे तुमच्या समोर दगड बसले आहेत असं वाटलं काय? चला, आधी बाहेर निघा.."

हे काय चाललंय त्याला कळेना. तो भयंकर केविलवाणा झाला. शेजारच्या बर्व्यांना त्याने विचारलं, "तुम्ही मला खरंच ओळखत नाही?" तर बर्वे त्याच्याकडे, वेड्याकडे बघावं तसं बघत मानेनेच नाही म्हणाले. ही भयानक आश्चर्याची गोष्ट होती. खरं म्हणजे समोर उभ्या असलेल्यांपैकी बर्‍याच कंटाळवाण्या चेहेर्‍यांकडे तो रोज बघायला टाळे. पण आज त्यांनीच त्याला किमान ओळ्खावं यासाठी त्याचा आटापिटा चाललेला होता..!

"एक मिनिट-" कारखानीस म्हणाला. हा नेहमी 'एक मिनिट' नेच वाक्याची सुरूवात करी. अशा सर्वांच्याच काहीनाकाही लकबी त्याला आठवत होत्या. बर्वे नेहमी दात कोरत. सुलभी रुमालाने चेहरा टिपे. वाडेकर मॅडमचा ओठांचा चंबू, विजय गोळेचं गुणगूणणं, युसूफचं पाय हलवणं, पाटीलचं सिगरेटसारखं पेन तोंडात धरणं- हे आणि इतर बरंच काही त्याला सवयीचं होतं. कारखानीसला मात्र हा वेडा वाटत नव्हता. सर्वांची आधी रीतसर माहिती काढून घेऊन एखाद्या प्लॅनसाठी कम करणारा लफंगा वाटत होता!

"वॉचमन, त्याला आधी बाहेर काढा. अन पुन्हा आत सोडू नका," तो म्हणाला. वॉचमनचा मोठा पंजा त्याच्या खांद्यावर पडला, तेव्हा आता आपलं कुणी काही ऐकणार नाही, याची त्याला जाणीव झाली.

जाता जाता त्याने आपल्या टेबलाकडे वळून पाहिलं. तिथल्या त्रिकोणी लाकडी ठोकळ्यावर त्याला 'राजा कुलकर्णी' अशी अक्षरे दिसली..!

*****

चालू आहे, ते स्वप्न नाही- याची त्याने कितीतरी वेळा खात्री केली. सगळ्या जगाने आपल्याविरूध्द कट केलाय, असं त्याला वाटू लागलं. अगतिक होऊन त्याने बरेच मार्ग वापरून पाहिले. पहिल्यांदा ऑफिसमधून बाहेर पडल्यावर तो खाली नेहमीच्या रेस्टॉरंटमध्ये आला होता. "कसं काय सोकाजीशेठ," म्हणून हसल्यावर तो त्याच्याकडे त्याचा चहा संपेपर्यंत संशयाने बघत राहिला.

मग त्याने कमीत कमी आठ-दहा ओळखीच्या ठिकाणी फोन लावले. पण त्याला कुणीच ओळ्खत नव्हते. त्याने ओळख देण्याचा प्रयत्न केल्यावर कुणी राँग नंबर म्हटलं, कुणी शिव्या दिल्या, कुणी वसकन ओरडून फोन आदळला, तर कुणी चक्क पोलिसांत जाण्याची धमकी दिली.

जग त्याचं अस्तित्व्च नाकारत होतं!
काय करावं? तो अगतिक झाला.

काहीतरी सुचून त्याने बैंकेत फोन लावला. पाच मिनिटे बोलून गळाल्यागत फोन बंद केला. 'श्रीधर गोडबोले' नावाच्या माणसाचं तिथं अकाऊंटच काय, पण कसल्याही नोंदीत नाव नव्हतं. जो अकाऊंट नंबर तो त्याचा म्हणून सांगत होता, तो प्रत्यक्षात 'राजा कुलकर्णी' नावाच्या व्यक्तीचा खातेक्रमांक होता!

त्याची क्रेडिट कार्डे त्याने खिशातून काढून बघितली. 'हं! एव्हाना ही सुध्दा त्या राजा कुलकर्णीचीच झाली असणार..' तो असहायपणे पुटपूटला. त्याच्या जवळ असणारे त्याच्या अस्तित्वाचे पुरावे, कागदपत्रे त्याला मदत करणार नव्हते. बनावट कागदपत्रे बनविल्याबद्दल तो सहज गजाआड जाऊ शकत होता!

हे असं होऊ शकतं, यावर त्याचा विश्वास ठेवणं अवघड होतं, पण ते प्रत्यक्षात घडत होतं. डोळ्यांसमोर- साक्षात- सत्यात. अन हे सत्य फारच विचित्र, भयानक होतं. राजा कुलकर्णी नावाचा कुणीतरी अचानक वादळासारखा येऊन त्याच्या विश्वात घुसला होता. तो देखील असा, की त्याचं स्वतःचंच विश्व त्याच्याशी असलेला संबंध नाकारीत होतं!

आता काय होणार? आपलं भविष्य काय? तो रडवेला झाला. मग जो विचार तो आतापर्यंत टाळ्त होता, तोच त्याच्या मनाला स्पर्शून गेला. अगदी हटवादीपणे!

शैला, मनू, बाळ..
आपल्या घरी काय झालं असेल?

*****

असं झालंच कसं? भाईजी सुन्न होऊन बसले होते.
छे! परिस्थिती अवघड आहे हे खरं. पण डोकं शांत ठेवलं पाहिजे. अशी हार मानून कशी चालेल? काहीतरी मार्ग निघेलच.

बीइंग मॅनेजिंग डयरेक्टर ऑफ ए वेल एस्टॅब्लिश्ड कंपनी, पुष्कळ अवघड परिस्थितीत आपण योग्य निर्णय घेतलेत.
खरं म्हणजे होतो. आता आपल्याशिवाय आपण एका कंपनीचे एम्.डी. असल्याचं कुणी मान्यच करत नाहीये! आपल्या लहरी अन विचित्र अवभवाला वैतागून बोर्डमेंबर्सनी प्लॅन करून असं काही केलं असेल म्हणावं, तर आपल्या या वर्तूळाच्या बाहेरही आपल्याला कुणी ओळखत नाहीये. शिवाय आपण लहरी, धक्कादायक निर्णय घेत असलो, तरी त्यामूळे कंपनीचा नेहमी फायदाच झालेला आहे.

आपली प्रचंड महत्वाकांक्षा असलेली बायको, नाजूकशी प्रेमळ पोरगी अन हुशार मुलगा- तीन टोकाची तीन व्यक्तिमत्वे- त्यांच्यापैकी कुणीच आपल्याला ओळखत नाही! आपलं स्वत:चं असं काहीच उरलेलं नाहीये- माणसं, वस्तू, प्रॉपर्टी- काही नाही.

भाईजींनी उसासा टाकून आपली बॅग चाचपली. दिल्लीच्या टुरवरून आल्यावर उरलेली पंधरा-वीस हजारांची रक्कम तीत होती. काळाने अजब डाव टाकलाय, हे खरं. अगदी जगावेगळीच परीक्षा चालू आहे. पण शेवटच्या श्वासापर्यंत तगून रहायला, लढायला पाहिजे. दैवाने विचित्र संकटात टाकलंय- तसं दैवच एखादा मार्ग दाखवेलही. तोपर्यंत ही रक्कम उपयोगी पडेल..

दिल्लीहून आल्यानंतर हे सगळं घडलं होतं. भाईजींसाठी या विश्वात जणू जागाच नव्हती. आतापर्यंतचं जगणं म्हणजे जणू एक स्वप्न होतं. दीर्घ स्वप्नानंतर माणूस सत्य सहज स्वीकारत नाही. पण इथे सत्य होतं कुठे? समजा ते स्वप्न होतं, तर त्याची जागा वास्तवाने घ्यायला हवी होती. ते तर पुढे येतच नव्हतं, अन भाईजी मध्येच अडकले होते, त्रिशंकूसारखे. ना धड स्वप्न ना सत्य. वर्तमान ना अकल्पित. भुत ना भविष्य. तुकडे-तुकडे जोडून एखादा नकाशा पुर्ण जुळला जावा, अन एखाद्याच तुकड्यासाठी त्या नकाशात जागा राहू नये- त्या नको असलेल्या तुकड्यागत त्यांची गत झाली होती!

ह्या क्षणी आपण कुणालाच नको आहोत. खरं म्हणजे आपण या जगात आहोत, हेच कुणाला महिती नाही... ओ गॉड!

आता भाईजींना जाणवलं- आपलं आजपर्यंतचं अस्तित्व म्हणजे दुसर्‍यांच्या जाणीवांचा एक संच होता. दुसरे म्हणत होते, म्हणून आपण होतो- असं म्हणायचं. आता आपल्याला अचानक भुत झाल्यासारखं वाटतंय- माणसातून उठविल्यागत!

की वेड लागलंय आपल्याला? ते शहारले..

वेड्यांचं एक वेगळंच जग असतं. त्यांच्या जगात ते शहाणे असतात. त्यांच्या जगातील अस्तित्वाचे नियम, सीमारेषा अन रीती-पध्दती इथल्यापेक्षा वेगळ्या असतात म्हणून ते इथं वेडे ठरतात. एका वेगळ्या दुनियेत ते वावरत असतात. ते स्वप्नच त्यांचं सत्य असतं. शेवटी हा सर्व जाणीवांचा भाग आहे.. त्यांच्या जाणीवेत कदाचित इथले शहाणे लोक वेडे असतील!

शेवटी सामान्य माणसांचं जिणं म्हणजे तरी काय? जाणीवा- कित्येक प्रकारची सेन्सेशन्स- यांचा एक भलामोठा संच? एकेक करून त्या संपल्या, की आयुष्य संपलं, असं म्हणायचं!

पण तरी सामान्य जगणं जगणार्‍या माणसाबद्दल कालपासून भाईजींना असूया वाटू लागली होती. जीवन म्हणजे अळवावरचं पाणी, असं ज्या कुणी पहिल्यांदा म्हटलं असेल, त्याने ते अशाच एखाद्या भावनेने म्हटलं असेल का?

कदाचित प्रत्येकाच्या जाणीवांचं एक वेगळं जग असेल आणि ही सर्व विश्वे कोणत्यातरी पातळीवर एकमेकांहून भिन्न असतील. कदाचित इतरांच्या जाणीवेत भाईजी होते तिथंच अजूनही वावरत असतील- पहिल्यासारखेच. पण आपल्या जाणीवेत मात्र वाटतंय, की ते भाईजींना ओळखत नाहीत. भाईजी एकटे पडलेत..

किंवा ही सुध्दा शक्यता आहे, की असे कुणी भाईजी अस्तित्वात नव्हतेच. पण आपल्याला वाटतंय की ते होते- म्हणजे अजूनही आहेत- पण आता त्यांना अचानकच कुणी ओळखीनासं झालंय..

किंवा युगानूयुगे आपण असेच असू. वेगवेगळी स्वप्ने 'जाणवून' घेणारे- एक मानवसदृष कुणीतरी किंवा काहीतरी. परवा कुणीतरी, मग काल भाईजी, उद्या दुसराच कुणी अन परवा आणखी तिसराच..! कित्येक युगे अमरत्वाचा शाप भोगणार्‍या अश्वत्थाम्यासारखे! तो अजूनही असाच कुठेतरी भटकत असेल का? जिवंत.. भुतागत.. की वेड्यागत.. की वेगवेगळ्या जाणीवांच्या रूपात वेगवेगळ्या शरीरांत प्रवेश करून.. भयंकर अवस्थेत..! असंच आपलंही होणार आहे का?

पण मग हेही शक्य आहे का, की या ग्रहावरचा प्रत्येकजण असाच एकेक अभिशाप भोगत असेल. पण प्रत्येकाला दुसरे सर्वजण सामान्य जीवन जगताहेत, असं आपल्या स्वतःच्या जगात, जाणीवेत जाणवत असेल?

छे!! आपण वेडे होणार. विचार करणं बंद करायला हवं.
प्रत्येक गोष्टीचा आपण असाच खोलवर, क्रिटिसाइझ करत विचार करतो- वेगळ्या शक्यता विचारात घेऊन. म्हणून बाकीचे लोक आपल्याला हुशार, पण तरीही लहरी, चक्रम समजतात! सद्यस्थिती एवढी भयंकर आहे, की त्यावर असं हरवून जाईस्तोवर विचार करत राहिलो तर आपल्याला सहज वेड लागेल..

भाईजींनी जोरजोरात मान हलवली- जणू विचारांचं जोखड उतरवून टाकण्याचा प्रयत्न करीत. त्यांनी समूद्राकडे पाहिलं. भर दुपारच्या कडक उन्हानं पाणी चमकत होतं. काल संध्याकाळपासून ते इथंच होते- जगाने त्यांना झिडकारल्यापासून!

मग त्या सुनसान किनार्‍यावर- अगदी समोरच त्यांना दिसलं. क्षणापूर्वी व्यवस्थित हाताची घडी घालून शांतपणे समूद्राकडे पाहत असणारा माणूस खाली पडत होता- बहूधा उष्णतेने त्याला चक्कर आली असावी; बेशूध्दही झाला असावा. भाईजी झपझप चालत तिथे गेले. त्यांनी इकडेतिकडे बघितलं, चिटपाखरूही नव्हतं.

त्या माणसाला मग त्यांनी सरळ खांद्यावर टाकलं अन झपझप पावले टाकीत ते जवळच असलेल्या हॉटेलमध्ये जायला निघाले. हे हॉटेल त्यांचं ओळखीचं अन नेहमीचंही. एरवी माना लववून नमस्कार करणारी तिथली लोकं आता त्यांना ओळ्खतही नव्हती. पण त्यांनी त्याची पर्वा वाटेनाशी झाली होती.

कुणी सांगावं? हा भान हरपलेला माणूस आपल्याला एखादेवेळी ओळखेलही!!

*****

तो शुध्दीवर आल्यावर भाईजींनी त्याचं नाव विवारलं. श्रीधर गोडबोले.

श्रीधरची कथा ऐकल्यावर भाईजी अवाक झाले. दोघांची भेट घडविण्याच्या या अजब खेळाला काय म्हणावे तेच त्यांना कळेना. अशा भयानक परिस्थितीतही त्यांना गंमत वाटली. एखादा नवीन प्रयोग करण्यासठी काळाने आपल्याला निवडावं याचा त्यांना क्षणभर अभिमान वाटला. खरं सांगायचं तर त्यांचं व्यावसायिक आयूष्य असंच गेलं होतं- प्रत्येक समस्येत नवीन संधी शोधण्यात! पण ह्युमन लॉजिक्सच्या पुढे घडत असलेला हा प्रकार बघून त्यांचीही मती खुंटली होती. आता पुढे काय, हा प्रश्न आ-वासून उभा ठाकला होता..

भाईजींनी आपलीही कथा श्रीधरला सांगितली, तेव्हा तो दुसर्‍यांदा बेशुध्द पडण्याच्या बेतात होता, पण भाईजींनी त्याला सावरलं. नंतर त्याला थोडं बरं वाटलं. समदु:खी भेटल्यावर वाटतं तसं.

बिचारा श्रीधर मुळापासून हादरला होता. त्याची लाडकी बायको अन नाजूकशी दोन पोरंही त्या राजा कुलकर्णीने गिळली होती. त्याच्या शैलीनं त्याला न ओळखून धाडकन त्याच्या तोंडावर दरवाजा लावला होता, अन त्या दरवाजावर राजा कुलकर्णीची पितळी अक्षरे त्याला वेडावून दाखवत होती.

'बास्टर्ड!' तो पुटपुटला. प्रत्येक ठिकाणी आक्रमण केलेला हा राजा कुलकर्णी, प्रयत्न करूनही त्याला प्रत्यक्षात भेटला नव्हता. एखाद्या भुतपिशाच्चाने अचानक आपल्या जीवनात घुसून हा वेडाचार माजवला असावा- अशीही शंका त्याला बर्‍याच वेळा येऊन गेली होती.

भाईजींनी त्याला कवेत घेऊन सावरले. सगळ्या जगाने नाकारलं, तरी त्यांची लाडकी छोकरी मात्र असं करणार नाही, असा विश्वास असणार्‍या भाईजींची अशीच अवस्था झाली होती, त्या पोरीनं त्यांना वेडा समजून घराबाहेर काढलं, तेव्हा!

डोक्यात राख घालून उपयोग नव्हताच. श्रीधरला सांभाळून आता घडेल त्याला तोंड द्यायची तयारी ठेवायला हवी.

"स्वप्न की सत्य, याचा विचार करणंही व्यर्थ आहे श्रीधर," भाईजी एकेक शब्द उच्चारत संथपणे बोलू लागले, "स्वप्न संपून जागं होईस्तोवर आपल्याला कळत नाही, आपण स्वप्न बघत होतो ते, बरोबर ना? अन आजकाल प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या निकषांवर तपासली जाऊ लागलीय. पण जे उलगडत नाही, ज्याला काही लॉजिक नाही- ते सर्वच खोटं किंवा अशक्य ठरवू नये. लॉजिक्स ही आपल्या बुध्दीने तयार झाली आहेत; पण आपल्यासकट या प्रचंड सृष्टीला जन्म देणारी एक शक्ती आहे, हे नक्की. तिची लॉजिक्स कुणाला समजली आहेत? मला तर वाटतं, ही प्रचंड सृष्टी म्हणजे अद्वैताचा एक कण आहे. आपण कल्पना करू शकणार नाही, एवढं प्रचंड, अजब, विचित्र असं ते अज्ञाताचं विश्व असावं. त्या अज्ञाताने आपला पडदा थोडा बाजूला करून या खेळात आपल्याला सामावून घेतलं असावं. नेहमी या पडद्याच्या अलीकडेच वावरण्याची सवय झालेले आपण त्यामुळे अगदी भांबावून गेलो आहोत. घडतंय ते स्वप्न, सत्य, कल्पनेचा- मनाचा खेळ- जे काय असेल ते आपण स्वीकारायला हवं. खरं तर श्रीधर, आपण आतापर्यंत जगलो, अनुभवलं तोच एखादा कल्पनेचा खेळ, स्वप्न वगैरे असेल, असं कधीकधी तुम्हाला वाटत नाही का?"

श्रीधर त्यांच्याकडे एकटक बघत त्यांचं बोलणं ऐकत होता. तो आता बराच शांत झाल्यासारखा वाटत होता. दोन क्षण थांबून तो म्हणाला, "भाईजी, हे सर्व मला पटतंय. पण मी आणखी एक शक्यता बोलून दाखवतो- आपल्याला लौकिकार्थाने वेड लागलं असेल का? अन या वेडाच्या भरातच प्रत्यक्षात नसलेल्या गोष्टी घडताहेत, असं आपल्याला वाटतंय?"

भाईजी हसले. अगदी हाच विचार मघाशी आपल्या मनात आला होता..
शांतपणे त्यांनी सिगरेट पेटवली. श्रीधरही आता बराच सावरला होता. त्यानेही शांतपणे सिगरेट पेटवली.
त्याने बोलायला सुरूवात केली, " आता हा जो राजा कुलकर्णी आहे.."
"कोण?"
"तोच तो- घुसखोर! माझ्या चांगल्या चाललेल्या जीवनात अचानक घुसून धुडगुस घालणारा-"
"त्याचं नाव राजा कुलकर्णी?"
"हो. त्याला एकदा मला व्यवस्थित बघायचंय."

भाईजी अचानक सावरून बसले. त्यांना कसली तरी शंका आली. मग ते उठून फोनजवळ गेले अन एक नंबर डायल करून ते बोलू लागले- " हॅलो, तुमच्या आजच्या बोर्ड मिटींगमध्ये मॅनेजिंग डायरेक्टरचं सिलेक्शन होणार होतं असं मी ऐकलं.. अच्छा.. मी तुमच्या एका व्हेंडर कंपनीचा मार्केटिंग डायरेक्टर बोलतोय. ओके. मी नंतर त्यांच्याशी बोलतो. बाय द वे, मला नवीन एम्.डी. साहेबांचं नाव कळेल का?.. अं? ओके.. थँक्स अ लॉट!"

भाईजी उठले. त्यांनी ट्रेमध्ये सिगरेट विझविली. मागे हात बांधून ते खिडकीजवळ गेले. मग वळून श्रीधरकडे दोन क्षण बघत राहिले, अन नेहमीप्रमाणे एकेक शब्द उच्चारत संथपणे बोलू लागले.. "अज्ञाताचा खेळ खरोखर अजब आहे, श्रीधर. पण या जगावेगळ्या खेळाचं कोडं लवकर सुटेल असं मला वाटलं नव्हतं. छे!! भयानक- आश्चर्यकारक- विचित्र- अतर्क्य- काय म्हणावं या खेळाला.."

श्रीधर वेडावल्यासारखा भाईजींकडे पहत होता. मग ते त्याच्या जवळ येऊन म्हणाले, "तुम्ही जिथं जिथं गेलात, तिथं तो राजा कुलकर्णी तुम्हाला भेटणं शक्यच नव्हतं श्रीधर- कारण तो नेमका त्याच वेळी या विचित्र खेळातला दुसरा डाव अनुभवत होता. बघा श्रीधर, तो ह्या क्षणी तुमच्यासमोर उभा आहे!!"

*****

अजून किती वेळा आपल्यावर बेशूध्द होण्याची वेळ येणार आहे कुणास ठाऊक.. श्रीधरच्या मनात आलं. रॉक्-एन्-रोल मध्ये बसल्यावर चारही बाजूला फेकले गेल्यावर कसं अगदी आपला शेवट जवळ आल्यागत वाटतं, तशीच गत आता त्याची झाली होती.

श्रीधरचे डोळे विस्फारले गेले. त्याच्या तोंडून शब्दच फुटेना. आपल्याला बरबाद केलेला माणूस आपल्या समोर उभा आहे? कळस म्हणजे, तो स्वतःच हे सर्व सांगतोय?

त्याची अवस्था पाहून भाईजींना क्षणभर त्याची दया आली. "पुढे ऐका श्रीधर. मी आता माझ्या कंपनीत फोन लावला होता. खरं म्हणजे ती आता माझी नाही" ते एकेक शब्द सावकाश उच्चारत बोलू लागले, "आज तिथं नवीन कार्यकारी संचालकांची निवड झालीय. अँड इट्स ए ग्रेट न्युज श्रीधर- त्यांचं नाव 'श्रीधर गोडबोले' असं आहे!"
"माय गॉड.. पण भाईजी.. पण मी तर इथं आहे..!!" श्रीधर आता अक्षरशः ओरडला.
"होय श्रीधर. पण आता या क्षणी तुमच्या इथं असण्याला काहीच अर्थ नाही. कारण जगाच्या दृष्टीने तुम्ही खरे तिथं आहात. तुम्ही तिथं असणंच त्या अज्ञात शक्तीला अभिप्रेत आहे. एक्झॅक्टली इथंच तो पडदा विरळ झाला आहे- तुम्हाला या विश्वातून त्या विश्वात जाता यावं म्हणून! आपल्या भेटीचं गुढ मला आता उकललं श्रीधर. ही अदलाबदल सहज, आपणा दोघांना अगदी व्यवस्थित समज दिल्यानंतर व्हावी म्हणून ही अजब अन जगावेगळी भेट घडवून आणली गेली. हे प्रकार घडताना काळाला कशा घड्या पडल्या असतील, ते मला सांगता येणार नाही- पण हे घडलंय, हे सुर्यप्रकाशाइतकं स्वछपणे समोर दिसतंय.."

"पण भाईजी, आपण आधीचं आयूष्य कसं विसरणार? ते तर मला लख्खपणे आठवतंय! अन याउलट जिथं आपल्या बदल्या झाल्यात, तिथलं आपल्याला काडीइतकंही काही माहिती नाही..." श्रीधर अजूनही नक्की काय घडलंय, याचा अंदाज घेत होता!!

"कुणी सांगावं श्रीधर, कदाचित या ट्रान्समध्ये, त्या विश्वात गेल्यावर आपल्याला आधीचं काहीच आठवणार नाही. कित्येक वर्षांपासून आपण याच विश्वात आहोत असं आपल्याला वाटेल, अन असं घडणंच खरं म्हणजे फायदेशीर आहे. हा नियतीचा निर्णय आहे श्रीधर, त्याविरूध्द आपल्याला जाताच येणार नाही. कमॉन, मिळालेला हा नवीन रोल आता नवीन स्टेजवर वठवायलाच लागेल. हे सर्व कशासाठी- हे समजून घेण्यासाठी आपली बुध्दी पुरे पडणार नाही बहुतेक. काही विशिष्ठ हेतूने त्या अज्ञात शक्तीने दोर्‍या हलवून आपल्याला कठपुतळ्यांसारखं असं नाचवलंय.. कमॉन, लेट्स गो!"

श्रीधर अन भाईजी उर्फ राजा कुलकर्णी भारावल्यासारखे उठले. "श्रीधर, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली? आपली पुर्ण विश्वे बदलूनही आपली नावे मात्र तीच राहिली!" भाईजी उद्गारले. " आणखी एक. तुमचं चक्क प्रमोशन झालंय- मॅनजिंग डायरेक्टर म्हणून, अन माझं डिमोशन! शक्य झालं तर आपण नंतरही बोलू, भेटू. कमॉन नाऊ, लेट्स चेक आऊट.. लवकरात लवकर आपल्याला नवीन जागेत चेक्-इन व्हायचंय!!"

मग संथ पावले टाकत ते दोघेही निघाले.. अज्ञाताने ठरवून दिलेल्या त्यांच्या ठिकाणावर जाण्यासाठी.

*****

गर्दीच्या लोंढ्याबरोबर तो फलाटावर उतरला, अन दोन मिनिटे स्तब्ध उभा राहिला. ही एवढी गर्दी तो रोजच, वर्षानुवर्षे बघत होता. पण आज त्याला काहीतरी वेगळं त्याला वाटत होतं. हे काहीतरी वेगळं म्हणजे काय, ते मात्र त्याला कळत नव्हतं. खरं म्हणजे एवढ्या लाखो लोकांच्या महासागरात तो एखद्या थेंबासारखाच होता. पण आता मात्र एवढ्या गर्दीत स्वतःचं वेगळं अस्तित्व असल्यासारखं त्याला वाटलं..!

ऑफिसच्या दिशेने तो झपझप पावलं टाकीत तो चालू लागला. रस्त्यात त्याने 'टाईम्स' विकत घेतला. पेपरवाला म्हातारा त्याला आज चक्क तरूण असल्यासारखा वाटला. त्याल ते थोडं खटकलं, अन मग त्या विचारांचं हसूही आलं. ऑफिसच्या इमारतीत आल्यावर वॉचमन नेहमीप्रमाणे 'नमस्कार साहेब' म्हणाला, पण नेहमी कंटाळवाण्या वाटणार्‍या त्याच्या दुडक्या चालीचं अन चपट्या नाकाचं आज हसू का येतंय, ते त्याला कळेना..!

ऑफिसात आल्यावर त्याला प्रसन्न वाटलं. युसूफला एक टप्पल मारून त्याने सुलभीचा रूमाल हिसकावला. मग पाटीलच्या तोंडातलं पेन हिसकावून घेऊन मुद्दाम खाली पाडलं अन विजय गोळेसारखं गाणं गुणगुणत जागेवर बसला. आज उत्साहात काम होणार असं त्याला वाटलं. अस्ताव्यस्त टेबल त्यानं नीट मांडलं. आपल्या 'राजा कुलकर्णी' नावाची पाटी हळूवार पुसून झोकात सर्वांना नीट दिसेल अशी ठेवली.

मग क्षणभर तो थबकला. ती नावाची पाटी त्यानं पुन्हा उचलून हातात घेतली. स्वतःचं नाव त्याला नेहमी खुप आवडे. आज त्यात आणखी काहीतरी वेगळं-विशेष आहे असं त्याला वाटलं.

त्या लाकडी ठोकळ्यावरची 'राजा कुलकर्णी' ही अक्षरे तो कितीतरी वेळ न्याहाळत राहिला. बरीच मिनिटे. बहुधा बरीच युगे..!!

*****

छे! असं हरवून जायची सवय आपण सोडली पाहिजे. एसी कारमध्ये बसूनही बर्‍याच वेळेला आपल्याला असं रेल्वे स्टेशनच्या कोलाहलात बुडून गेल्यासारखं कसं वाटतं?

त्यांनी मान जोरजोरात हलवून जणू एखादं जोखड उतरविण्याचा प्रयत्न केला. ड्रायव्हरने आरशात बघून न बघितल्यासारखं केलं. बहूधा त्याला हे नेहमीचंच असावं.

नो वे..! आता असं चालणार नाही. आता आपण एम्.डी. आहोत! असं अबसेंट माइंडेड राहत गेलो, तर हाताखालची लोकं त्याचा गैरफायदा घेतील..

ऑफिसमध्ये आल्यावर सर्वांनी त्यांचं आपुलकीनं स्वागत अन अभिनंदन केलं. केबिनमध्ये गेल्यावर वर्तमानपत्रातली आपली छबी बघून ते खुष झाले. सर्व वर्तमानपत्रे बघून एका बाजूला ठेवताना ते चरकले. घाईघाईने सर्व पाने त्यांनी चाळली अन थरथरत बेल मारून शिपायाला बोलवून विचारलं, "कधीचे पेपर आहेत हे?"

साहेबांचा चेहरा बघून तोही गोंधळला. सर्व पाने चाळून 'आजचेच आहेत' असं सांगितलं. त्यांचेच फोटो त्यांना पुन्हा तो आवर्जून दाखवू लागला. साहेबांचे फोटो छापून आल्याचे त्याला कोण कौतूक!

साहेबांनी त्याला बाहेर घालवलं. पुन्हा ती आजपासून बरोबर पंचवीस वर्षानंतरची तारीख असलेली वर्तमानपत्रे ते विमनस्क अवस्थेत चाळू लागले..!!

गोडबोले साहेबांच्या खरं म्हणजे लक्षात आलं नव्हतं..
की अज्ञाताने एक खेळ संपायच्या आतच दुसरा चालू केला होता. तो कधीच थांबणार नव्हता..!!

*****
*****
संपूर्ण
*****

गुलमोहर: 

सही है.. लवकर पूर्ण करा.. सिझोफ्रेनिया ????
==================
मन उधाण वार्‍याचे

लवकर पुर्ण करा.... फार वेळ केलात तर थोड्या वेळाने माय्बोलिकर तुम्हालाच विचारतील..... 'कोण तुम्ही?'

द नेट बहुतेक

येप मला पण आधी सुरवातीला द नेट आणि त्याचा सिक्वेल द नेट २ आठवला..
छान लिहीताय..

>>>Sandra Bullock ची ती कुठली फिल्म Identity Theft वाली. सुरूवात तरी तशी वाटतेय...
>>>द नेट बहुतेक

मंडळी,
कोणत्याही इंग्रजी पिक्चरचे भाषांतर किंवा रिमेक मायबोलीकरांच्या तोंडावर फेकण्याचे धाडस मी करणार नाही.
कारण मला माहितेय.. मायबोलीकर पुरेसे जाणकार आहेत. दुसरी गोष्ट मायबोलीकर जगातल्या प्रत्येक कानाकोपर्‍यात पोचलेत.
धन्यवाद आणि आभार!

साजिरा,
कथा वेगळी आणि सही!...
लवकर पुर्ण करा....
Happy

अहो साजिरा.. गैरसमज नका करून घेऊ.. तुम्ही ढापलीये कथा त्याच्यावरून असं मुळीच म्हणणे नाहीये.. फक्त त्याला कोणीच न ओळखणे, बँक्,सेल्फोन्,घर सगळ्या गोष्टींमधे त्याचे नाव पुसले जाणे हे त्या पिक्चर्स मधे होते,ते आठवले.. म्हणून लिहीले..
पिक्चर्स वेगळेच घेतलेत, तुमची कथा अर्थातच वेगळी आणि छान चाललिय ! लवकर लिहा पुढचे !

साजिरा,कथासूत्र मस्त आहे.. मती गुंग करायला लावणारं... लवकर पूर्ण करा कथा...

उत्कंठा आता वाढली आहे पुढचे पोस्ट कधी?

प्रच्चंड भिनतेय कथा... साजिरा, पुढे काय? लवकर लिहा हो!

गुड मॉर्निंग लोक्स..
मंडळी, एक तांत्रिक शंका-
Krushna, Srushti, koushik
हे शब्द कसे लिहायचे हो?

खुप उत्सुकता लागली आहे,पुढे काय होइल याची..

कृष्ण - k R u S h N a, सृष्टी - s R u S h T I
आणि हो, गोष्ट छान आहे. Happy

कौशिक - kaushik
.
फार ताणू नका उत्सुकता....... भन्नाट चालू आहे कथा...

कथा आणि लिहिण्याची शैली दोन्ही छान आहेत............ आता पुढे काय होणार? लवकर लिहा...

कथा पूर्ण झाल्यावरचा माझा पहिला प्रतिसाद माझाच आहे असं दिसतंय.
भन्नाट आहे एकदम!!!
..प्रज्ञा

साजीरा जबरदस्त कथा Happy

साजिरा,जबरी होती कथा... ती फुलवण्याची तुमची लेखनशैलीही मस्त.... Happy

मस्त!! आवडली कथा

साजीरा लगे रहो...... सॉलिड कथा...
परत सलग सगळी वाचुन काढली...

जबरी आणि भन्नाट कथा एकदम....

ज.. ब्ब..र..द..स्त...................
Happy
.............................................................
**Expecting the world to treat u fairly coz u r a good person is like
expecting the lion not to attack u coz u r a vegetarian.
Think about it.**

अप्रतिम कथा, सहज म्हणुन वाचायला घेतली आणि वाचतच राहीलो ! हे काळामधे उलटा सुलट होणे ही कल्पना मस्त आहे छानच !
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **

सहज म्हणुन वाचायला घेतली आणि वाचतच राहीलो ! >>>
मी पण. Happy
गुंतवुन टाकणारी कथा आवडली.

जबरी रे Happy
आधी प्रतिक्रिया वाचल्या, आणि मग कथा वाचली Happy

एकदम वेगळ्या धाटनीची कथा .... वाचायला सुरुवात केली .... आणि कथेमधे गुंतुन गेले... वाचुन झाल्यावरही डोक्यात श्रीधर आणि भाईजींची पात्र फेर धरुन राहिलेत... व्वा मस्त वेगळा अनुभव मिळाला.

अप्रतीम! Happy
उत्कृष्ट कथासुत्र ओघवत्या शैलीत हाताळले आहे!
सिम्पली ग्रेट
(आयला, क्षणभर, माझा मलाच "मी नक्की कोण?" असा प्रश्ण पडला)
...;
आपला, लिम्बुटिम्बु

Pages