‘तारे जमिन पर’ आणि ‘जिंकी रे जिंकी’

Submitted by paluskar on 12 January, 2008 - 09:27

नुकतेच दोन सुंदर चित्रपट बघण्याचे योग आले. एक ‘तारे जमिन पर’ आणि दुसरा मराठी , ‘जिंकी रे जिंकी’.
एरवी सिनेमा जुना झाल्याशिवाय मी बघत नाही. अतीप्रसिद्धीमुळे थियेटरवर उडणारी गर्दी , ते मल्टिप्लेक्सचे अव्वाच्या सव्वा दर हे सगळं टाळायचं असेल तर काही आठवडे वाट पहाणं अधिक बरं वाटतं. काही परीक्षणं वाचली, कुणाच्या तोंडून प्रशंसा ऐकली तरच मी चित्रपट बघण्याचं धाडस करते. पुन्हा तो मल्टिप्लेक्समध्ये पाहीला आणि वाईट निघाला तर फारंच पैसे फुकट गेल्याची हळहळ येते , त्यापेक्षा वाट पाहीलेली बरी. परंतू माझेच हे सर्व नियम तोडून मी हे दोन्ही चित्रपट रीलीज झाल्याबरोबर लगेच पाहीले. कारण पूर्वप्रसिद्धीने भितीवर मात केली.

तारे जमिन पर हा अमीर खानचा असल्यामुळे तो बघण्याची मला उत्सुकता होतीच. तो मतीमन्द मुलांबद्दल आहे असं वाटलं होतं ; पण प्रत्यक्षात तो अगदी वेगळा आढळून आला. डिस्लेक्षिया ह्या मुलांमध्ये आढळून येणार्या समस्येबद्दल किंवा लर्निंग डिसॅबिलिटीबद्दल हा सिनेमा भाश्य करतो. अनेक वर्ष शिक्षणक्षेत्रात काढूनसुद्धा डिस्लेक्षिया ह्या प्रकाराची, तो असतो , यापलीकडे मला काहीच माहिती नव्हती ह्याचं आता मला आश्चर्य वाटतंय.

कथेचा नायक आहे एक नउ -दहा वर्षाचा मुलगा; तिसरीत शिकणारा. धड लिहिता वाचतादेखील न येणारा, त्यामुळे अभ्यासात मागे पडलेला, नापास होउ घातलेला, सर्वांनी खोड्याळ , मठ्ठ असे शिक्के मारलेला, सतत शिक्षा होवून वर्गाबाहेर उभा. शिक्षेच्या भितीने एक दिवस तो शाळेतून पळून जातो आणि दिवसभर ईकडेतिकडे फिरून संध्याकाळी गुपचूप घरी जातो.ह्याचा पत्ता लागल्यावर शाळेचे शिक्षकही खोलवर जाउन विचार न करता , त्याला मतिमंद मुलांच्या शाळेत घालण्याचा सल्ला देउन मोकळे होतात. वडीलही त्याला ‘सुधारण्यासाठी’ होस्टेलला नेउन टाकतात.
ईथेही मूळ प्रॉब्लेम तसाच राहातो. परत मार , शिक्षा , अगणित अपमान , शिवाय आपल्याला आई- वडीलांनी दूर लोटल्याचं दुःक्ख ! त्या लहानग्याचं भावजीवन उद्ध्वस्त होउ लागतं. न्यूनगंड, भय , निराशा , अविश्वास , राग. नुसता भावनाकल्लोळ. एका छोट्या जीवाला फार होतं ते सगळं. त्याची चित्रकला , त्याची तरल कल्पनाशक्ती , त्याचा खेळकर आणि खोडकरपणा , सर्व लयाला जाऊ लागतं.

आणि मग येतो एक नवा कलाशिक्षक , तात्पुरत्या वर्षासाठी (temporary). तो कोणी देव नसतो, पण माणूस नक्किच असतो. स्वतःही अश्या अडचणीवर मात करून मोठा झालेला , मुलांमध्ये रस असलेला, मुलांना वेळ देणारा , त्यांच्या समस्या समजून घेणारा. तो पालकांना आणि मुख्याध्यापकांना समजावून देतो की हा प्रॉब्लेम म्हणजे मतिमंदत्व नव्हे. आपला कथानायक हा अतिशय तरल कल्पनाशक्ती असलेला एक बुद्धिमान मुलगा असतो. तो उत्तम चित्रकारही असतो. त्याला आकार , अवकाश(space), ह्या संकल्पना थोड्या जड जात असतात. त्यामुळे त्याला आकडे , अक्षरं ओळखायला आणि लिहायला त्रास पडत असतो. मेंदूत थोडा वायरिंगचा प्रॉब्लेम असतो. लहानपणापासून ह्या समस्येकडे कोणीही लक्ष न दिल्यामुळे त्याला धड लिहिता-वाचताही येत नसतं. परंतू त्याचं जनरल नॉलेज उत्तम असतं. थोड्या प्रयत्नांनंतर तो नक्कीच सुधारणार असतो. आणि तसं होतं.

आता मला प्रश्न पडतो की अभ्यासात ढ गणल्यागेलेल्या किती मुलांमध्ये हा प्रॉब्लेम असेल? त्याला एक सर मिळाले ज्यांनी त्याला समजून घेतलं , पण असे किती बळी प्राथमिक शिक्षणाच्या वेदिवर जात असतील? समाज आणि मुख्यतः शिक्षक ह्या समस्येबाबत कितपत संवेदनाशील् असतात? कितीजणांना डिस्लेक्षिया म्हणजे काय हे माहीत असतं ? (मलातरी नव्हतं ) .

मध्यांतरानंतरचा सिनेमा थोडा फिल्मी होतो. परंतू तो हिंदी व्यावसायिक सिनेमा असल्यामुळे तेवढं माफ आहे.
मध्यवर्ती भूमिकेतील दर्शिल सफरीचं कौतूक करावंस वाटतं. त्याचं ते वर्गात काही न समजणं, स्वप्नरंजन आणि होस्टेलला ‘टाकून्’ दिल्यानंतरची उदासी, सर्व अगदी खरंखुरं वाटतं.

एक सुन्दर आणि जनजाग्रुती करणारा चित्रपट बनवल्याबद्दल अमीर खानचं हार्दिक अभिनंदन्. आणि ह्या कथेवर, समस्येवर चित्रपट बनवण्याचा ध्यास घेउन आठ वर्ष धडपडून तो प्रत्यक्षात आणणार्या अमोल गुप्ते ह्यांचंही हार्दिक अभिनंदन्. असेच उत्तमोत्तम चित्रपट पुढेही आमच्यासाठी आणा ही विनंती.

जिंकी रे जिंकी बद्दल आता पुन्हा केव्हांतरी.

गुलमोहर: 

चित्रपट खुपच छान आहे. त्याबद्द्ल आमीर खान चे अभिनन्दन. पण दर्शीलला(कथेचा नायक) डिस्लेक्शिया झाला आहे हे दखविण्यासाठी जेवढे प्रसन्ग दाखविले, त्या मानानी तो सुधारण्या साठी फ़क्त एक ड्राईन्ग कोम्पीटीशन घेतली गेली, हे फारच थोडे किन्वा फास्ट उपचार झाले असे वाट्ते. अजून एक दोन प्रसन्ग हळूवार पणे दाखवावयास पाहिजे होते. त्यातील आत्मविश्वास हळू हळू वाढत जाउन तो एक हुशार मुलगा होतो, असा प्रवास हवा होता.

सगळे उपचार तर दाखवणे अवघडच आहे, परंतू तरीही थोडेफार दाखव्ले आहेत.. आमिर त्याला बसून सगळे उच्चार शिकवताना दाखवला आहे, अक्षर ओळख होण्यासाठी ते चित्रांच्या माध्यमातून शिकवतो त्याला,त्यांचा ध्वनी कळण्यासाठी रेकॉर्ड करून ऐकवले आहेत.. ड्रॉईंग काँपिटीशन ही फक्त त्याची क्षमता सर्व लोकांना कळण्यासाठी आणि मुख्ख्यतह त्याचा कॉन्फीडन्स वाढवण्यासाठी,त्याला लोकांकडून ऍप्रिसिएशन मिळावं म्हणून घेतली असावी...
असो.. पिक्चर फारच सुरेख आहे! आणि ते मां गाणं तर अप्रतीम! सगळीच गाणी वेगळी आहेत! एकंदत मुव्हीच वेगळा!!

अमीर खान आणि अमोल गुप्ते बरोबरच त्या छोट्या मुलाचं कौतुक करावं तेव्हढ कमीच! डिस्लेक्सिया हा प्रकार मला माझ्या मुलीच्या शाळेतील
एका 'अश्या' मुलामुळे माहित झाला आणि सांगण्यास अत्यंत अभिमान वाटतो की हा प्रकार पुण्यातल्या गुरुकुल सारख्या शाळेत व्यवस्थितपणे
हाताळला जातो. त्या मुलाच्या पालकानी सकाळ पेपरात काही महिन्यांपूर्वी या विषयावर लेख लिहिला होता. तो मुलगा शाळेत छान रुळलाय
आणि तो बुद्धिबळ छान खेळतो व पियानो/क्यासिओ उत्तम वाजवतो. मधे पुण्यात अशा डिस्लेक्सिक आर्टिस्टचा workshop झाला होता. त्याला गुरुकुलची मुलही म्हणजे माझी मुलगीही गेली होती. TOI मधे फोटो आला होता.
अमीर खानचं म्हणाल तर तो एकटाच हिरो/स्टार असा आहे की जो मध्यंतरा नंतर येतो. वास्तवता दाखवताना या सिनेमात त्याने कुठेही अतिशयोक्ती केली आहे असे मला वाटत नाही किंवा उगाच त्या मुलाच्या तोंडी emotional dialogues टाकून फार फिल्मी केलेले
नाही. वडिलांची निष्काळजी किंवा अती अपेक्षा बाळगणारी वृत्ती, मोठ्या भावाची घालमेल, आईची कुतओढ सगळ कस पाहिजे तेव्हढच!
उगाच कुणाला अती वाईट, अती चांगल किंवा मोठा भाऊ दुष्ट वगैरे दाखवून मूळ कथानकाला/प्रश्नाला फाटे फोडलेले नाहीत. उगाच अर्ध्या
कपडयात नाचणारे लोक, glamourous sets, costumes वापरलेले नाहीत. गाणी सुद्धा खूपच छान! विषेश करुन 'तुम्हे सब कुछ पता है
ना मां!' पुरुषांच्या डोळ्याततही चटकन पाणी आलेलं मी प्रथमच पाहिल असेल या गाण्याच्या वेळी. मी तर बोलूच शकत नव्हते. Hats off
to Ameer khan n his team!

जिंकी रे जिंकी’ च काय झाल??